आनंदाची नक्षत्रे

By
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२१ अंक बदलून त्याजागी २०२२ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी केला आहे, तो संपेल. क्षणाला लागून आलेल्या पुढच्या क्षणाच्या कुशीतून नव्या क्षणांचे आगमन होईल. तोही पुढच्या क्षणाला जुना होईल. काळ आपल्याच नादात आणखी काही पावले पुढे निघून गेलेला असेल. वर्तमानात त्याला आठवताना फक्त स्मृतिशेष संदर्भ समोर येत राहतील.

भविष्याच्या पटलाआड दडलेल्या आनंदाची नक्षत्रे वेचून आणण्याच्या कांक्षेतून काहींनी संकल्पित सुखाचें साचेही तयार करून घेतलेले असतील. ते हाती लागावेत म्हणून काही आराखडे आखून घेतले असतील. त्यांच्या पूर्तीसाठी शोधली जातील काही आवश्यक कारणे. काही अनावश्यक संदर्भ. घेतला जाईल धांडोळा निमित्तांचा.

माणूस उत्सवप्रिय प्राणी असल्याने सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते शोधतच असतो. तेवढेच आनंदाचे चार कवडसे आयुष्याच्या ‘सेव्हिंग अकाऊंटमध्ये’ असण्याचे समाधान. खरंतर समाधान शब्दही तसा परिपूर्ण नाही. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील गोष्ट म्हणजे, समाधान. हे माहीत असूनही समाधान नावाचं मृगजळ माणूस शोधतोच आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समाधानाच्या क्षणांची परिभाषा प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात बदलत राहिली आहे. ते मिळवण्याच्या तऱ्हा आणि साजरे करण्याच्या पद्धतीही पालटत राहिल्या आहेत.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना सांधणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांना माणसाने उत्सवाचे निमित्त दिले. अर्थात, हेही काही नवं राहिलं आहे असं नाही. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची काहींची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने ओंजळभर आनंद शोधत राहील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंद फेसाळ रात्रीला काहींची बेधुंद पाऊले थिरकतील. कुठे मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंदीतून काही शोधतील नव्या वर्षाचे अर्थ. अर्थात, सगळेच त्याचं असं स्वागत करत असतील, असं नाही. नसतंही तसं. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची लहानशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता मार्गस्थ झालेले असतील.

निमित्ताचे धागे धरून चालत येणारा आनंद साजरा करण्याचं भाग्य साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेलं नसतं. नववर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा कितीतरी माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीचं स्वप्न सोबत घेऊन झोपले असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपलं. येणारं वर्ष भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात उभे राहू नये याची कामना करत असतील. शेकडो माणसे कुठेतरी डोंगरदऱ्यात, रानावनात जगणं आशयघन करणाऱ्या वाटांचा शोध घेत भटकत असतील. भटके आयुष्य सोबतीला घेऊन कितीतरी जीव व्यवस्थेच्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात सुखांच्या सूत्रांचा धांडोळा घेत असतील. शाळेत शिकून जगण्याच्या वाटा हाती देणारी उत्तरे पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत अनेक लहान लहान हात आयुष्याचे अर्थ शोधत असतील. कळशा, घागरी डोईवर घेऊन ओंजळभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या पाण्याचे पाझर शोधत असतील. शिक्षण नावाच्या व्यवस्थेत पास झालेला आणि पदवी हाती घेऊन भटकणारा सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का? या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल.

कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरागरा फिरत असतील. काळाचे किनारे धरून प्रगतीचे पर्याय पहात पुढे सरकत असतील. परिस्थितीचा पायबंद पडून काही अभाग्यांच्या विस्ताराचे अर्थ हरवले असतील. कितीतरी जीव शक्यतांचा परिघात स्वतःला शोधत असतील. आयुष्याला अर्थ देणाऱ्या संदर्भांचा धांडोळा घेऊनही फारसं काही हाती लागत नसल्याने हताशेच्या प्रतलावरून प्रवास करताना कवडशांची कामना करत असतील.

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याच्या गणिताचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाच्या पायघड्या घालत येतं ते अन् काहींच्या वाट्याला दुःखाच्या ओंजळी घेऊन. असं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. कदाचित काही म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं प्राक्तन. मग हेच दैव असेल, तर त्यानं माणसा-माणसांमध्ये असा भेद का करावा?

जाणाऱ्या वर्षाला विसंगतीची सगळी वर्तुळे नसतील मिटवता आली कदाचित, निदान येणाऱ्या वर्षात तरी संगतीची सूत्रे सापडावीत. ओंजळभर प्रकाश घेऊन त्याने दारी दस्तक द्यावी. वंचितांच्या, उपेक्षितांच्या, अपेक्षितांच्या अंगणी विसावा घ्यावा. त्यांच्या उसवलेल्या आयुष्यात पसाभर प्रकाश पेरून अंधारलेलं जगणं उजळून टाकावं. अशी कामना करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस प्राणी आशावादी आहेच ना!
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment