मोहरून येण्याचे ऋतू

By
झाडंपानंफुलं मोहरून येण्याचा आपला एक ऋतू असतो. तो काही नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो. ना त्याचं ते प्राक्तन असतं. काळाचे किनारे धरून निसर्ग वाहत राहतो अनवरत. कुणाच्या आज्ञेची परिपत्रके घेऊन नाही बहरत तो कधी. कळ्या उमलतात, परिमल पसरतो, सूर्य रोज नव्या अपेक्षा घेऊन उगवतो, रात्रीच्या कुशीत उमेद ठेवून मावळतो. अंधाराची चादर ओढून पडलेल्या आकाशाच्या अंगाखांद्यावर नक्षत्रे खेळत राहतात. आभाळातून अनंत जलधारा बरसतात. वळणांशी सख्य साधत नदी वाहते. पक्षी गातात. मोसम येतात अन् जातात.

कळ्यांचे कोश कोरून फुलं उमलतात, ते काही त्यांचं नशीब असतं म्हणून नाही. स्वाभाविकपणाच्या वाटेवरून घडणारा प्रवास असतो तो. निसर्ग निर्धारित मार्गाने चालत राहतो. ना तो कोणाच्या कांक्षेच्या पूर्तीसाठी घडणारा प्रवास असतो, ना कोणाच्या इच्छापूर्तीसाठी केलेला प्रयास, ना कोणाच्या आज्ञा प्रमाण मानून मार्गस्थ होणं असतं. एक स्वाभाविकपण सामावलेलं असतं त्यात. कुठले अभिनिवेश सोबतीला नसतात घेतलेले त्याने. पण माणूस एवढ्या नितळपणे नाही वाहू शकत. आपले नियत मार्ग तो निर्धारित करू पाहतो. त्यांच्या दिशा नक्की करू पाहतो. स्वाभाविक असण्याला अनेक कंगोरे असतात, हे माहीत असूनही सहजपणाचे किनारे धरून वाहणे विसरतो.

जगण्यातून सहजपणाने एकदाका निरोप घेतला की उरते ती केवळ कवायत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी. सोस पुढे सरकू लागला की, विसंगत विकल्पही आपलेसे वाटू लागतात. संगतीची सूत्रे सुटतात अन् विसंगतीची वर्तुळे विस्तारित होत जातात. सारासार विवेकाने विचारांतून निरोप घेतला की, माणूस वर्तनविसंगतीवर झुली टाकून समर्थनाच्या सूत्रात स्वतःला सामावू पाहतो.

उगवणे, वाढणे, मोहरणे या प्रवासात एक बिंदू असतो, तो म्हणजे, सामावून जाणे. नेमकं हेच घडत नाही. मग सुरू होतो प्रवास किंतु-परंतु घेऊन नांदणाऱ्या वाटांवरचा. म्हणून संदेहाचे विकल्प आयुष्यातून वेळीच वेगळे करता यायला हवेत. मनात उगवलेल्या विकल्पांचं तण वेळीच वेगळं केलं की, विचार मोहरून येतात अन् आयुष्य बहरून. बहरण्याला अंगभूत अर्थ असतात, फक्त ते कळायला हवेत. अभ्यास सगळेच करतात, पण अचूक अन्वय लावणं सगळ्यांनाच साध्य होतं असं नाही. अभ्यासाने त्याचे अर्थ समजतात अन् आपला आवाका. पण प्रत्येकाला प्रेत्येक कोपरा कळेलच याची खात्री देणं अवघड असतं.

इहतली अधिवास करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या तऱ्हा ठायी ठायी निराळ्या असल्या, तरी वेदनांच्या परिभाषा सगळीकडे सारख्याच. वेदनांचे वेद वाचता येतात त्यांना विसंगतीचे अर्थ समजून घेण्यासाठी व्याख्या पाठ नाही करायला लागत. वंचना, उपेक्षा, अन्यायाच्या व्याख्या वेगळ्या असल्या, तरी अर्थ सगळीकडे सारखेच. माणसांच्या वसतीचे परगणे वेगळे असले तरी भावनांचे प्रदेश निराळे कसे असतील? इहतली अधिवास करणारा माणूस काळाचं अपत्य असला तरी काळाच्या कपाळी कांक्षेच्या रेषा तो कोरत राहतो.

भविष्याच्या धूसर पटलाआडून शक्यतांचे कवडसे वेचता आले की, आयुष्याची एकेक प्रयोजने कळत जातात. ती समजावी म्हणून नितळ मन आणि मनात माणूसपण नांदते असायला लागते. आयुष्याप्रती असणाऱ्या आस्थेतून उगवून येणाऱ्यांना समर्पणाच्या परिभाषा अवगत असतात, त्यांना जगण्यातील सहजपण समजावून सांगावं नाही लागत. कोंबांना जन्म देण्यासाठी बियांना मातीत गाडून आपलं अस्तित्व विसर्जित करून घ्यावं लागतं. रोपट्याला आपले अहं त्यागता आले की, झाडाला उंचीचे अर्थ अवगत होतात.

डोळ्यांना अंतरावरचे धूसर दिसत असले, तरी विचारांना ही अंतरे सहज पार करता येतात. नजरेला अंतराच्या मर्यादा येतात, पण विचारांना अंतरे बाधित नाही करू शकत. योजनापूर्वक निवडलेल्या अन् विशिष्ट विचारांना प्रमाण मानून अंगीकारलेल्या मार्गावरून चालताना भविष्य स्पष्ट दिसत असतं. यासाठी अंधाराची पटले सारून आयुष्याचे अर्थ तेवढे शोधता यायला हवेत. अर्थ शोधण्याएवढी वेधक नजर असली की, आयुष्याचे एकेक पदर पद्धतशीरपणे उलगडत जातात. कळीतून फुलांच्या पाकळ्या जेवढ्या सहजतेने उमलत जातात तसे.

एखाद्याने एखाद्या विचाराला बादच करायचे ठरवले असेल, तर तेथे पर्याय असून नसल्यासारखेच. अशावेळी उगीचच मी माझ्यातून वजा होत असल्याचं वाटत राहतं कधी. खरंतर वजाबाकी बेरजेइतकेच शाश्वत सत्य, पण कधी कधी दिसतं ते स्वीकारायला अन् पदरी पडलं, ते मान्य करायला माणूस तयार नसतो. सूर्यास्त समीप आला की, पायाखालच्या सावल्या लांब होतात, माणूस मात्र आहे तेवढाच राहतो अन् आसपासचा अंधार आकृतीला वेढत आपल्यात सामावून घेण्यासाठी अधिक गहिरा होत जातो. अविचारांच्या वाटेवर चालताना एक बिंदू असा येतो, जेथे प्रतिसादाचे प्रतिध्वनी गोठतात. अशावेळी कुणी साद घातली, तरी त्याला अर्थ राहत नाहीत. अर्थांशिवाय शब्दांनाही मोल नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment