काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे

By
माणूस नावाचा प्रकार समजून घेणं जरा अवघडच. तो कळतो त्यापेक्षा अधिक कळत नाही हेच खरं. अर्थात यात नवीन ते काहीच नाही. कितीतरी काळापासून तो हेच किनारे धरून वाहतो आहे. ना त्याच्या वाहण्याला प्रतिबंध करणारे बांध बांधता आले, ना प्रवाहाला अडवता आलं, ना अपेक्षित मार्गाने वळवता आलं.

नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात कोणताही किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. नितळपण जगण्यात विसावलं की, निखळ असण्याचे एकेक पैलू कळत जातात. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात. हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं हेही खरंय.

माणूस शक्यतांच्या चौकटीत कोंडता नाही येत. त्याच्या असण्या-नसण्याचे संदर्भ समजून घ्यायला कोणती एकच एक परिमाणे अपुरी असतात. कोण कोणत्या प्रसंगी कसा वागेल हे सांगणं अवघड. कोणी तसा दावा करत वगैरे असेल तर ते केवळ अनुमानाने त्याला शोधण्याचा प्रकार आहे. 

अंतरी आस्थेचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते आयुष्याची. काहींना जाणीवपूर्वक जपता येतं आपलं माणूसपण. माणूसपणाच्या व्याख्या अवगत असतात काहींना. काहींच्या कपाळी नियतीनेच करंटेपण कोरलेलं असेल, तर त्यांना कुठून अवगत व्हावेत आस्थेने ओथंबलेल्या ओंजळभर ओलाव्याचे अर्थ.

स्वार्थाला सर्वस्व समजणाऱ्यांनी केलेली सगळीच कामे काही त्यागासाठी नसतात. भिजलेल्या भावना अंतरी घेऊन आसपास सुंदर करू पाहणारी अन् अभावग्रस्तांचं जगणं देखणं करू पाहणारी माणसे संचित असतं संस्कारांनी निर्मिलेलं. निर्व्याज मनांनी अन् उमद्या हातांनी समाजाचा चेहरा सुंदर करू पाहतात ती. त्यांच्या सौंदर्याच्या व्याख्या कोशातल्या शब्दांत नाही सापडत. त्याचं कामच नव्या व्याख्या परिभाषित करत असतं.

नियतीने घडवलेली अशी माणसे काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे असतात. ती इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर विचक्षण विचारांनी केलेला नांदत्या वाटांवरचा प्रवास असतो. प्रज्ञा अवगुंठित करणारा चमत्कार नसतो तो अथवा पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसादही नसतो. प्रामाणिक प्रयासांची परिभाषा असते ती. प्रत्येक गोष्टीला परीघ असतो, त्याच्या विस्ताराच्या मर्यादा असतात. पण आस्थेभोवती एकवटलेल्या आकांक्षांना अन् त्यांच्या पूर्तीसाठी करायला लागणाऱ्या प्रामाणिक सायासांना सीमा नसते, हेही खरंच.

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे संस्कारांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते, व्यवस्थेचे किनारे धरून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात अशी नितळ, निर्मळपणाची गुढी उभी करून सद्विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी पर्याप्त समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही. त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

चांगलीवाईट, भलीबुरी माणसे सर्वकाळी अन् सर्वस्थळी असतात, नाही असे नाही. हा काळा अन् हा पांढरा अशी सरळ सरळ विभागणी नाही करता येत जगाची. या दोहोंच्या संक्रमण बिंदूवर एक ग्रे रंगही असतो त्याकडे आस्थेने पाहता यावं. माणूस चांगला की, वाईट वगैरे गोष्टी परिस्थितीचा परिपाक असेल, तर उत्तरे परिस्थितीच्या परगण्यात शोधावी. माणसांच्या मनात सापडतीलच याची शाश्वती देणं कठीण असतं. मनातच नसतील तर वर्तनात दिसतील तरी कशी. म्हणून आधी परिस्थिती बदलाचे संदर्भ शोधून मन अन् मत परिवर्तनाचे प्रयोग करायला लागतात.

डोळ्यांना वैगुण्येच अधिक का दिसतात. खरंतर चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात. वाईटाकडे लक्ष सहज वळतं. हे कळणं आणि वळणं यातलं योग्य ‘वळण’ म्हणजे माणूस.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्याच्या गर्भातून काही रोपटी उगवून आली तर... पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील, तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? आसपासच्या आसमंतात रखरख दाटली असतांना आकंठ भिजवणाऱ्या धारांचा शोध घ्यावा तरी कुठून? कोरडेपण वाढत असतांना राहिलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment