आत्मनिष्ठ जाणिवांचे किनारे धरून वाहणारी कविता.

By
संवेदनशील मनाला विचार करायला उद्युक्त करते ती कविता, असं म्हटलं तर कोणतीही कविता आनंदाचं अभिधान असते, तशी अनुभवाचं अधिष्ठानही असते. तिच्यात भावनांची स्पंदने अखंड निनादत राहतात. ती सौंदर्याचा वेध घेत असते. समस्यांवर बोलत असते. वैगुण्यांना अधोरेखित करीत असते. सामाजिक दूरिते पाहून विचलित होत असते. तिचं आकाश मर्यादांच्या परिघात बंदिस्त नसतं. म्हणूनच तिच्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांना मर्यादांच्या चौकटी नसतात. कविता जेव्हा जगणं होते, तेव्हा ती जीवनाविषयी बोलत असते. कविता भावनांचा कल्लोळ असते. भावनांना मुखरित करण्याचं माध्यम असतं. भावोत्कट उद्गार असते. उत्कट अभिव्यक्तीचा हात धरून आलेल्या बाळकृष्ण सोनवणेंच्या कविता अनोखेपण सोबत घेऊन प्रवास करीत राहते, जाणिवांचे किनारे धरून वाहत राहते अन् संवेदनांच्या परिघात नांदते.

या आधी प्रकाशित झालेल्या ‘स्त्री सुक्ताच्या कविता’ (२००७), ‘उजेड गाभाऱ्यातला’ (२०१५) या संग्रहातून बाळकृष्ण सोनवणे वाचकांना अवगत आहेत. काळाची मनोगते घेऊन लेखांकित होणाऱ्या त्यांच्या कवितेला स्वतंत्र चेहरा लाभला आहे. काळाचा प्रभाव झेलून ती आपणच आपल्याला शोधत राहते. सोयीसाठी या कवितांना कोणत्यातरी निर्धारित परिभाषेत अधोरेखित करता येईलही, पण तिचं वेगळं असणं तिच्यापुरती तिची व्याख्या निर्धारित करते. कवीची स्वतंत्र अभिव्यक्ती लेखनाला नवे आयाम प्रदान करते. काळाची सूत्रे सोबत घेऊन निघताना अभिव्यक्तीची प्रयोजने ही कविता शोधत राहते.   
  
कविता प्रकारची व्याख्या काही असू द्या. अंतरी निनादणाऱ्या स्पंदनांची सोबत करीत निघालेली कविता परिभाषेच्या कुंपणात सहसा बंदिस्त नाही करता येत. कविता नुसती कविता असणं पुरेसं असतं का? खरंतर नाहीच. ती सत्यान्वेशी असावीच असावी; पण तिला साक्षात्काराच्या पातळीवर विहरता यायला हवं. अर्थात, आपल्याकडे असणाऱ्या अनुभवांच्या विश्वात नेमकं काय सामावलं आहे, त्यात तिचं असणं असतं. कितीतरी गोष्टी आसपास नांदत्या असतात. काही सहजपणे सामावून जातात जगण्यात. काही अगत्याने सांभाळतो, कारणासह अथवा कारणाशिवाय. जतन करीत राहतो काही आपलं म्हणून, काही निसटते तसेच. ओंजळीतून पाण्याचे थेंब लीलया ओघळून जावे तसे. कवी म्हणतो,
किती जिव्हाळ्याचे असतात
आपले लोभस मिथ्याभास
प्रदीर्घ प्रवासात आयुष्याच्या

अंतर्यामी अधिवास करून असणारी आस एक अस्वस्थ तगमग आयुष्यात उभी करते. ती जगण्याला अर्थ देणारी वाट होते. आठवणींच्या अंधारात विसावलेला भूतकाळ अन् अस्वस्थ वर्तमानाच्या वर्तुळात वेढलेले आयुष्य हरवलेल्या क्षितिजांचा वेध घ्यायला प्रेरित करते. भविष्याच्या पटलावर दिसणारे आस्थेचे कवडसे वेचायची उमेद जागती ठेवते. व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना घडणारी वंचना, आयुष्याच्या चौकटींना संकुचित करणारी विषमता, आकांक्षांचे परीघ शोधतांना प्रत्ययास येणारा अपेक्षाभंग, पावलागणिक गडद होत जाणारी जीवनाची दाहकता, विचारात विसावलेली दुरिते, जगण्याची गणिते अन् आयुष्याची सूत्रे ही कविता शोधू पाहते. आस्थेचे अनुबंध मनावर कोरून आयुष्याला भिडू पाहते. कवी म्हणतो,
चेतव तुझ्या उजेडाची वात
मातीत दरवळतील
गंधभारले श्वास
मार्दव अस्तित्वाने
जुन्या दुःखाचे दिवे
पाऊस पंखांचा
वारा श्वासाश्वासागणिक
अंगागावर
गोंदवून घेईन
मी

काळाचा हात धरून आलेल्या प्रश्नांना भिडणारे साहित्य वाचकाला आपले वाटत असते. अनुभवांचे संचित हाती देऊन काळ पुढे निघतो. वळताना मागे काही प्रश्न ठेऊन जातो. काळाने समाजजीवनावर ओढलेल्या ओरखड्यांचा शोध साहित्यिक घेत असतो. परिस्थितीने पुढ्यात मांडलेल्या गुंत्याची उकल करू पाहत असतो. समूहाची विखंडीत स्वप्ने अधोरेखित करणारी साहित्यकृती व्यवस्थेने नाकारलेल्या उत्तरांचा शोध घेत असते. काळाचे किनारे धरून ती पुढे जात असते. अंतर्यामी अधिवास करणाऱ्या अस्वस्थपणाला घेऊन ही कविता विहार करीत राहते. बदलता आसपास, मूल्यांचा अवनतीकडे होणारा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करते. स्वतःला मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त न करता, आपला मार्ग निवडून आसपास घडणाऱ्या घटितांचे चिंतन करत चालत राहते. कवी म्हणतो,
परिघाबाहेरच्या अंधाराला
घातला नाही वळसा
त्याच्या जखमांनी होऊन विद्ध
चेतवले रान
कवितेतून माझ्या

कवीच्या विचारांत समतेची, समन्वयाची  स्वप्ने सजलेली आहेत. स्वातंत्र्याचे अर्थ त्यांना अवगत आहेत अन् त्याचं मोलही ठाऊक आहे. स्वप्न आणि साध्यापर्यंतच्या प्रवासात अनेक व्यवधाने असल्याचे सजग भानही त्यांना आहे. ते म्हणतात,
गदगदून मनाच्या फांदीवर
औपचारिक विवशता
फेकून देत वाऱ्यावर
ठेवतो डोळे उघडे
माझ्या स्वप्नांना
फुटतात धीराचे अंकुर 

संवेदनांच्या प्रतलावरून प्रवाहित होताना घडणारा सर्जनाचा प्रवास प्रारंभ असतो नव्याचा. आत्मशोधाच्या वाटेने शब्दांशी सख्य साधत घडणारी भटकंती असते. कविता त्या वाटेवरचं माध्यम होत असते. आसपास घडणाऱ्या घटनांचे पडसाद निर्मितीचं प्रयोजन असतं. त्यात अनेक स्तर सामावलेले असतात. कविता वैयक्तिक असते, तेवढीच सार्वजनिक. पण त्यासाठी जाणिवांचं भान असायला लागतं. जगण्यावर आघात करणाऱ्या, अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या प्रश्नांवर कवीने बोलत राहायला हवं अन् प्रश्नांना कवितेने मांडत राहायला हवं. म्हणून कवी म्हणतात,
पाहवत नाही
कुठं दूर पांगत निघून जात आहेत
या पांगळ्या होत जाणाऱ्या
कातर कातर
निराधार मना माणसांच्या
सुरकुतल्या सावल्या
ज्यांच्या जगण्यावर तरारत आहेत
वेदना आणि वंचनेचे निखारे
   
काळाने कोरलेल्या प्रश्नांची जाणीव या कवितात असली, तरी तिला अनेक पदर आहेत. ते केवळ वैयक्तिक नाहीत. संवेदनांना वेदनांचे अर्थ कळले की, त्यांना वैश्विक परिमाण प्राप्त होत असतं. आयुष्यावर अनेक अंगांनी आघात होत असतात. ओंजळभर अस्तित्वालाच ते आव्हान असतं. त्याचे पेच असतात. ते पकडता आले की, स्वप्नांचे प्रदेश अन् वास्तवातल्या जगाची अंतरे आकळत जातात. कोलाहलात हरवलेल्या आवाजांना अर्थ असल्याची जाणीव होऊन शब्दांना अनुभूतीचे आयाम लाभतात. कवी अनुभूतीच्या प्रतलावरून प्रवास करताना कवडसे वेचून आणण्याची नितळ स्वप्ने पाहताना म्हणतो,
मी पहातोय
स्वप्न अम्लान
लावतो दिवा ज्याला येत नाही
काजळी तेजाळताना
श्वासतो तुला
येवून आश्रयाला

बाळकृष्ण सोनवणेंची कविता माणसांभोवती फिरते. जगण्यावर, वागण्यावर, आचार-विचारांवर बोलते, तशी वैगुण्यांवरही बोट ठेवते. जगण्यातल्या समस्यांना अधोरेखित करते. माणूस म्हणून माणसांच्या आशा-निराशांच्या विश्वात विहार करते. इहतली लाभणाऱ्या सुखांच्या केंद्रस्थानी माणूस आहे, नव्हे तो असावाच म्हणून आग्रही होते. आश्वस्त भाव जागा ठेवते. जीवनाची अनेक रुपे समर्थपणे मांडते. आसपासच्या अनुभवांना वेचत, वेदनांना वाचत अन् संवेदनांना अधोरेखित करत भावनांना दिलेलं शब्दांचं कोंदण त्यांच्या कवितेतील आशयाला प्रभावी आणि प्रवाही बनवते. ती मनाचा तळ शोधू पाहते.
कोसळकोसळ नुसता
कोसळत असतो पाऊस धुवाधार
संवेदनाविहीन
जाणीव एकच
दिवसा उजेडी अंधारलेले सारे

दु:ख, दैन्य, वंचना, उपेक्षा, समस्यांना मुखरित करण्याचा प्रयत्न संवेदनशील साहित्यिक करत असतो. जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष माणसांचे अटळ भागधेय असतं. कवीचं जगणं याला अपवाद असेल अथवा नसेल. कदाचित आसपासच्या सजग आकलनातून तसे लिहिता येईलही, पण कसदार कविता अपवादाच्या व्याख्येत नाही बसवता येत. काळोखाच्या कातळावर काव्यतीर्थे कोरण्याची कवीच्या अंतर्यामी असणारी आस साक्षात्कार बनून प्रकटते. प्रश्नांची दाहकता दृगोचर होत जाऊन संवेदनांना ओलावा लाभतो. संवेदनांचे किनारे धरून सरकणारे शब्द अंतरी अधिवास करून असणाऱ्या ओलाव्याला शोधत राहतात. वैचारिक स्थित्यंतर ही कविता घडवू पाहते. प्राप्त परिस्थितीवर भाष्य करते.
मी सहन करतोय
जगण्यातली दाहकता
जी खच्चून भरलीय
सुपीक भोवतालात माझ्या

काळ विचारांचं केंद्र असतं. विचारांचं नातं संवेदनांशी असतं अन् संवेदनांची सोयरिक सर्जनाशी. विचार परिवर्तनीय असतात. त्याचे पडसाद जगण्यात जाणवतात. साहित्य त्यावर भाष्य करीत असते. असण्या-नसण्याचे प्रश्न गुंता घेवून येतात. संवेदनांचा धागा पकडता आला की, अभिव्यक्तीला नवे आयाम लाभतात. जगण्याच्या प्रेरणा सर्जनाला आकांक्षांचं आभाळ आंदण देतात. आत्मशोधाच्या वाटेने वळती झालेली पाऊले भावनांच्या प्रदेशांपर्यंत पोहचली की, जगण्यापासून कविता दुरावत नाही. वेदनाच जगण्याचे ग्रंथ झाल्या की, शब्दांना परिभाषा शिकवायची आवश्यकता नसते. लिहित्या हातांना भावनांचा तळ गाठता आला की, तो केवळ अनुभव नाही राहत. सहजाविष्काराची विलक्षण अनुभूती घेऊन प्रकटणारी बाळकृष्ण सोनवणेंची कविता तरी याला कशी अपवाद असेल?
••

0 comments:

Post a Comment