आस्था

By
माणूस समाजशील वगैरे प्राणी असल्याबाबत आपण कुठेतरी वाचलेलं, ऐकलेलं असतं. आपणही तसं कधीतरी लिहिलेलं असतं अथवा बोललेलंही असतं. माणूस समाजशील आहेच, याबाबत संदेह असण्याचं कारणच नाही. माणूस म्हणून त्याने केलेल्या प्रगतीच्या प्रवासाचं परिशीलन करून परिभाषेच्या कोणत्यातरी कुंपणात त्याला कोंडता येईलही. पण खरं हेही की, वास्तव काही एवढंच नसतं. आपल्या आकलनाच्या ओंजळभर परिघात सीमांकित करून त्याच्या विस्ताराच्या परिभाषा नाही करता येत. त्याच्या प्रगतीचा इतिहासच मुळात परिवर्तनप्रिय विचारांची प्रेरक गाथा आहे, हे विसरून कसं चालेले? तो प्रगमनशील वगैरे असल्याचं अभ्यासक, संशोधक, शास्त्रज्ञ आणि शास्त्रे सांगतात. त्याच्या वैयक्तिक, सामाजिक आयुष्याचे परिशीलन करून असण्या-नसण्याचे अन्वयार्थ अभ्यासक मांडतात. गवसलेले निष्कर्ष समोर ठेवतात. अनुमानाचे अनुबंध अधोरेखित करतात. पण खरं हेही आहे की, माणूस नावाच्या प्राण्याचा लसावि काढणे एकुणात अवघड प्रकरण आहे. त्याच्या वर्तनासंदर्भात एखादं विधान ठामपणे करता येईलच असं नाही. आणि केलं तरी ते पर्याप्त असेलच असंही नाही. संगती-विसंगतीचे अनेक कंगोरे त्याला असतात. ही अभ्यासाची मर्यादा अन् त्याच्याकडे असणाऱ्या मनाच्या अमर्याद असण्याची कथा. त्याचा थांग लागणे अवघड. मर्यादांचे बांध टाकून जगण्याला एकवेळ सीमांकित करता येईलही, पण कुडीत विसावलेल्या मनाला कुंपणात कसे कोंडता येईल? माणूस सगळं काही नसला, तरी आणखी काही असू शकतो, हेही वास्तवच. 

असं काही असलं तरी माणूस मुळात श्रद्धाशील जीव आहे हेच खरं. त्याची कशावर तरी श्रद्धा असते, हे सार्वकालिक सत्य. ती केवळ आजच उदित झाली असं नाही. काल त्याच्या जगण्यात होती, आज आहे अन् उद्याही असणार आहे. आयुष्याचा प्रत्येक प्रहर आस्थेचे कवडसे घेऊन उजळून निघण्याचा प्रयास असतो. त्याच्या जगण्याचा प्रवाहच कुठल्यातरी श्रद्धेचे किनारे धरून वाहत असतो. श्रद्धा मग ती कोणतीही असो, ती नेमकी कशावर असावी याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. पण सोयीचे कंगोरे मात्र असू शकतात. ते कसे असावेत याबाबत अपेक्षांची काही आवर्तने अवश्य असू शकतात. तसे नियंत्रणाचे निकषही. श्रद्धा धारण करण्यासाठी प्रत्येकवेळी प्रबळ कारण असायलाच हवं असंही नसतं. कोरभर कोपरे धरून ती जगण्यात विसावलेली असते. कारणासह ती आयुष्यात अधिवास करून असते, तशी कारणांशिवायही वसती करून असू शकते. श्रद्धेची सूत्रे वापरून आयुष्याची प्रयोजने शोधता येतात; पण प्रत्येकवेळी त्याची अचूक उत्तरे मिळतीलच याची खात्री नाही देता येत. अंतरी अधिवास करून असलेल्या स्वप्नांना आस्थेच्या लहानमोठ्या पणत्या हाती घेऊन साकळून आणण्यासाठी पावलापुरता प्रकाश पेरण्याचा प्रयोग श्रद्धा करीत असते. 

श्रद्धेचं क्षेत्रफळ निर्धारित करणारी सुनिश्चित परिमाणे नसतात. तो प्रासंगिकतेचा परिपाक असतो. खरंतर श्रद्धा एक भावजागर. अंतरी अधिवास करून असलेले भाव तिला अधिक गहिरे करीत असतात एवढं मात्र खरं. ओलाव्याच्या वाटेने मुळांचा विस्तार होत राहतो, तशी ती विस्तारत राहते. त्यासाठी कुणी स्वाक्षरीचे झोकदार फराटे ओढून आज्ञांकित केलेलं परिपत्रक काढण्याची आवश्यकता नसते. उताराचा हात धरून पाण्याने वाहते राहण्यात एक सहजपण असतं. कळीचं फुलात रुपांतरीत होण्यात स्वाभाविकपण सामावलेलं असतं. आस्थाही अशी सहजपणे आयुष्याचं अविभाज्य अंग बनते. एखाद्या गोष्टीविषयी आपलेपण अंतरी नांदते असण्यात वावगं काही नाही. पण त्यात अखंड डोळसपण मात्र असायला हवं. पाहणे आणि शोधणे यात अंतराय असतं. पाहण्यात हेतू असेलच असं नाही. कारणाशिवायही ते घडू शकतं. पण शोधण्यात सुनिश्चित दृष्टीकोन असतो. त्यासाठी दृष्टी असायला लागते. डोळे सगळ्यांना असतात; पण पाहावे काय, हे मेंदूच्या आज्ञेने ठरते. मेंदूला नियंत्रित करण्यासाठी विवेकाच्या वाती अन् विचारांच्या ज्योती अनवरत तेवत्या असायला लागतात. ज्योतीचा प्रकाश जगण्यात पेरता आला की, अंधाराचे अर्थ गवसतात अन् आयुष्याचे अन्वयार्थ सापडतात.     

‘आस्था’ शब्दाचे कळकळ, काळजी, आपुलकी, प्रेम, विश्वास हे कोशात असणारे काही समानधर्मी अर्थ. या मांदियाळीत अगत्याने अंतर्भूत असणारा ‘श्रद्धा’ हा एक आणखी शब्द. खरंतर या शब्दाशी माणसांचं सख्य काही नवं नाही. आयुष्य घट्ट बांधलं गेलंय त्याच्यासोबत. आस्था शब्दाला वेढून असणारा अर्थ आणि आयुष्यातला आकळणारा त्याचा अन्वयार्थ यात काही अंतराय असतं का? असेल अथवा नसेलही. शब्द कधी वांझोटे नसतात. एक नांदतेपण त्यांची सतत सोबत करत असतं. माणसांच्या मर्यादा त्यांच्याभोवती संदेहाचे कुंपण अवश्य उभं करू शकतात. त्याच्या आकलनात अंतराय असू शकतं. प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो तो. सोयीने आणि सवडीने अर्थांचं निर्धारण करता येईलही. पण अंतरीचे भाव विचारांतून वेगळे कसे काढता येतील? आसपास अनेक गोष्टी नांदत्या असतात, म्हणून त्या सगळ्याच आपल्या असतात असं नाही. आणि त्यातल्या सगळ्याच अगत्याने अंगीकारता येतात असंही नाही. स्वीकार आणि नकार जगण्याच्या दोन बाजू. यात केवळ एक अक्षराच्या अधिक्याचं अंतर नसतं. दोन टोकांच्या बिंदूंना सांधणाऱ्या भूमिका त्यात सामावल्या असतात. तुम्ही कोणत्या बिंदूचा विचार करतायेत, यावर आपल्या असण्या-नसण्याची प्रयोजने अधोरेखित होत असतात. 

व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती समाज अन् अपेक्षांच्या परिघाभोवती समाजाचे विचार प्रदक्षिणा करीत असतात आणि यासोबत माणसांचं आयुष्य परिवलन करीत असतं. व्यवस्थेने कोरलेल्या वाटा धरून अनेक गोष्टींचं आपल्या अंगणी आगमन होतं. परिस्थितीने पुढयात मांडलेल्या सारीपटावर आयुष्याच्या सोंगट्या सरकवत पलीकडचे किनारे गाठावे लागतात. आसपास अगणित घटना घडत असतात. काही उन्नत करणाऱ्या असतात, तर काही अधपतनाच्या आवर्तात भिरकावणाऱ्या. अगणित गोष्टी घडत असतात आसपास, किती गोष्टीचं सम्यक आकलन असतं आपल्याला? समजणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही सहज, सुलभ नसतात. अर्थांचे काही स्पष्ट-अस्पष्ट कंगोरे त्यांना असतात, आशयाच्या काही अज्ञात जागा, तसा परिस्थितीचा प्रासंगिक पैसही असतोच ना! काही विषयच मुळात असे असतात की, अस्पष्ट का असेना, त्यांच्याबाबत अंतरी द्वैत नांदतं असतं. अशावेळी नेमकी भूमिका कोणती घ्यावी, याबाबत एक किंतु अंतर्यामी अधिवास करून असतो. बरं हे काही आजच घडतंय असंही नाही. किती कालावधी लोटला असेल, ते काळालाही आता स्मरत नसेल. 

हो आणि नाही यांच्या सीमा जोडणाऱ्या रेषेवर एक संदेह सतत नांदता असतो. जिवांच्या जगण्याची निसर्गदत्त प्रेरणा आहे ती. इकडे वळावं की तिकडे पळावं, अशी काहीशी दोलायमान स्थिती असते. तराजूच्या दोनही पारड्यात पडणारं वजन सारखं असलं की, स्थिर असण्याचं अन्य प्रयोजन नसतं. पण दुसऱ्या भागात थोडं अधिक केलं की, तो तिकडे कलतो. माणसांच्या जगण्याबाबतही असंच काहीसं असतं. आयुष्य ठरलेल्या चाकोऱ्या धरून प्रवास करणं नसतं की, वाटा-वळणे टाळून मार्गक्रमण करणं. आलीया भोगाशी... म्हणत प्राप्त परिस्थितीसमोर शरणांगती स्वीकारून ठिकाणे गाठणंही नसतं. 

राव असो अथवा रंक, प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. फरक एवढाच की, कोणाची क्षितिजे दूरपर्यंत विस्तारलेली असतात. काहींची पावलापुरती. परिस्थितीने पेरलेल्या वाटेने पावले पडत असतात अन् मन स्वप्नांच्या मागे पळत असतं. इच्छा असो नसो चाकोऱ्यांशी सख्य साधावं लागतं. थांबला तो संपला वगैरे म्हणणंही कदाचित याच भावनेचा परिपाक. पळणं काहींना आयुष्याची अनिवार्यता वाटते. काहींना कर्तव्य. पुढयात पडलेले प्रसंग काहींना दैव वाटतात. काहींना परिस्थितीने घेतलेली परीक्षा. काहींना नियंत्याच्या संकेत सूत्राने चालणारे. काहींना नियतीनिर्धारित अन् नियंत्रित खेळणे वाटतो. नशीब माणसांशी सतत खेळत असल्याचा त्यांना विश्वास असतो. त्यांच्या दृष्टीने पराधीन आहे पुत्र मानवाचा, हेच सत्य असतं. सीमित अर्थाने हे खरंय की, इहतली माणसांइतका परावलंबी जीव अन्य कोणी नसावा. तरीही प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकाच्या पृथक असतात. परिस्थितीशी धडका देण्याची प्रयोजने सगळ्यांची सारखी कशी असतील, नाही का? 

- चंद्रकांत चव्हाण

0 comments:

Post a Comment