कविता समजून घेताना... भाग: बावीस

By
वस्ती आणि मोहल्ला

सकाळ उजाडली की,
वस्ती आणि मोहल्ल्याचा
मध्येच वाहणारा
नाल्याचा पुल ओलांडून
अहमद मामू
नान पाव, बन पाव अन् बटर पाव
आणि अशाच सटरफटर वस्तू
विकायला यायचा
तेव्हा साऱ्या वस्तीचा दिवस
चाय पावने सुरू व्हायचा

सारं अंग तेलकट मळकट केलेला
आणि कळकट कपडे घातलेला
मुख्तार चाचा
डोक्यावर मोठं टोमलं घेऊन
‘पप्पड ले लो... पप्पड ले लो...’
म्हणत भले मोठे तेलकट पापड विकायचा
सारी कळकट मळकट पोरं
चार-चाराने घेऊन त्याच्या भवती जमा व्हायची
आणि समदं टोपलंच्या टोपलं
सुपडं करून जायची,

‘दौ रूप्पे में बारा...’ ओरडत
आशाखाला केले विकायला यायची
आमच्या सिझनमध्ये
गुठली के दाम विकून सारी
पाटी झटकून जायची

दिवसातून दोनदा तरी
राजूचाचाच्या रंगीबेरंगी
बिल्लोरच्या किणकिणाटात
बाया रमायच्या घंटाभर तरी,
आपलं मनगट सोपवायच्या
त्याच्या हवाली बिनधास्त
बिल्लोर टिचला की हातातलं रक्तही
त्या पदरानं हलकेच टिपून घ्यायच्या हसत खेळत

अब्दुल किल्लीवाला घड्याळही
दुरूस्ती करायचा
मी थांबायचो त्याच्या घराच्या ओट्यावर
‘अब्बा, आरेले… बैठनेको बोलेल है’
अशा किणकिणत्या आवाजात
सांगणारी हमीदा
मान खाली करून बोलायची
तेव्हा
मीही शरमल्यागत
अंग चोरून खाटेवर बसायचो,
तिच्या अब्बाकडून
घड्याळ कधीच दुरूस्त झालं नाही
मी मात्र घड्याळ घ्यायला न चुकता गेलो
आणि एक दिवस
हमीदाच्या शादीची
दावत खाऊन आलो

मोहल्ल्यातले पोरं आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे
पण त्यांनी कधीच
रडीचा डाव खेळला नाही
मॉ-भैनीवरून शिव्या दिल्या तरी
जात धर्माचा उद्धार करून
अंगाशी कधी खेटलो नाही

फातिमा बुढ्ढी भर दुपारी
कुडकुड्या घेऊन यायची लपतछपत
आणि
पूर्ण दिवस बायांमध्ये सवतीचे
गऱ्हाणे करत बसायची
बस्तीतल्या बायांच्या दुःखाशी
आपल्या दुःखाचं नातं जोडायची
उस्मान चाचाच्या मैय्यतला
वस्तीने फाया जमा केला
त्याच्या बिबी बच्च्याला
दुखवटाबी दिला

वस्तीतल्या बालवाडीत
पंधरा ऑगस्ट साजरा व्हायचा
तेव्हा
मेहमूद भाई पाय आपटून
तिरंग्याला कडक सलाम हाणायचा
मोहल्ल्यात रंगायचा
शहाबानू आणि जॉनी बाबू
कव्वालचा रंगीन मुकाबला
तर
वस्तीत दणकायचा
वैशाली शिंदे आणि मिलिंदचा
आमना सामना...
तेव्हा वस्ती आणि मोहल्ला
रात्र रात्र जागायचा
आणि
एकमेकांना ओवाळून
पैसे उधळायचा

वस्तीला तोंडपाठ असायचे
अजानचे शब्द
आणि मोहल्ल्याला सांगता यायचा
प्रार्थनेचा अर्थ
आता कुठे विकासाची 'गंगा'
वस्ती आणि मोहल्ल्यावर अवतरलीय
स्वातंत्र्यानंतरच्या साठवर्षानंतर...
वस्ती आणि मोहल्ला
यांच्या मधून वाहणारा नाला
आता बंडींग करण्यात आलाय
वस्ती आणि मोहल्ल्याला जोडणारा पुलही
जमीनदोस्त करण्यात आलाय
आणि
त्यावरून संरक्षक भिंतही उभारली गेलीय
त्यामुळे वस्तीतून मोहल्ल्यात
आणि मोहल्ल्यातून वस्तीत
कोणी जाऊ शकत नाही
आता वस्तीला ऐकू येतात
दिवसातून चारदा मशीदीतले अजान
आणि
मोहल्ल्याला ऐकू जातात,
भारत माता की जय चे फर्मान...!!

डॉ. संजीवकुमार सोनवणे


गुंते अनेक प्रश्नचिन्हे दिमतीला घेऊन येतात. गुरफटणे त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. काही गुंते सहज सुटतात, काहींची उकल करताना सगळं कसब पणाला लागूनही हाती फारसे काही लागत नाही. पण काही गुंते असेही असतात, जे कळतं नकळत गोफ विणत राहतात. त्यांचे पीळ समजून घेता आले की कळते; केवळ गुंत्यांनाच नाही, तर त्याभोवती साकळलेल्या समस्यांनाही काही अंगभूत आयाम असतात. ‘भारत’ असाच एक गुंता आहे. भारतीय म्हणून आपले अनेक असणे आणि अनेकांत एक असणे, हाही सहजी न आकळणारा गुंताच. संभ्रमाच्या सीमारेषांवर सतत झोके घेत राहणारा. आपल्या सार्वजनिक जगण्याकडे एक कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर सहज येतं. एखाद्या देशप्रदेशाचा, तेथील जगण्याचा शोध केवळ परंपरेचे किनारे धरून वाहत आलेल्या संचिताने पूर्ण नाही होत. कुठल्या तरी अक्षांशापासून रेखांशापर्यंत असलेल्या विस्ताराचा भूगोल समजून घेता आला, म्हणजे त्या प्रदेशाचे भविष्य सांगता येतंच असं नाही. भूगोल समजून घ्यायचा, तर इतिहासाचेही परिशीलन होणे आवश्यक ठरते.  

राष्ट्र, राज्य शब्दांच्या सुनिश्चित परिभाषा काय असतील, त्या असोत. त्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी कशाची आवश्यकता असावी, ते काळ ठरवतो. काळाने परिस्थितीच्या कातळावर कोरलेल्या कृती त्यांचे प्रयोजन असतात. समान आशा-आकांक्षांच्या पात्रातून वाहणारे समूह राष्ट्रराज्य संज्ञेस अनुरूप असतात. निर्धारित संकल्पनांच्या निकषास पात्र असणारी अनेक राष्ट्रे इहतली नांदत आहेत. परिभाषेच्या कोणत्यातरी सामान्य सूत्रात साकळून त्यांना सांधता येतं. पण ‘भारत’ नावाच्या खंडतुल्य भागाचा ल.सा.वि. काढणे अवघड प्रकरण आहे. समन्वयाच्या, समर्थनाच्या, स्वीकाराच्या, नकाराच्या, विरोधाच्या, विवेकाच्या, अविवेकाच्या विचारधारा शतकांचे किनारे धरून येथून वाहत आहेत. मार्ग भिन्न असले, तरी शांतीची सूक्ते सगळ्यांना प्रिय असल्याचे अधोरेखित केले जाते. अर्थात, यातही आकलनाचा अन् आचरणातील अंतराचा गुंता असतोच. भारत सहिष्णू वगैरे असल्याच्या वार्ता नित्य ऐकू येतात. यात काही वावगं नाही. शतकांच्या प्रवासात आपण जपलेलं हे संचित आहे.

माणूस माणसाला आपला म्हणताना अनेक व्यवधाने असतात. आपल्याकडे ते नाहीत असे नाही; पण किमान स्तरावर व्यवहार करताना येथे अधिवास करणाऱ्या माणसांना ही व्यवधाने गतिरोधक नाही वाटली. संस्कृती नावाची संकल्पना काही एखाददोन वर्षात नाही उभी राहत. काळाचे किनारे धरून ती वाहत राहते, अनेक ज्ञात-अज्ञात परगण्यातून. सहानुभूती अनुभूतीचे काठ धरून ती उभी राहते. समान आशा-आकांक्षा असणाऱ्या माणसांनी एकत्र येवून मनात गोंदवलेल्या स्वप्नांना दिलेला आकार म्हणजे संस्कृती, असे म्हणणे वावगे होणार नाही. स्वप्ने घेऊन विहार करणारी माणसे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रतिबद्ध होतात. त्यांच्या प्रयासांचा परिपाक संस्कृतीचे प्रवाह समृद्ध होणे असतो. संस्कृतीच्या उदरातून संस्कार जन्मतात अन् संस्कारांचे साकव घालून जगणं सुंदर करावं लागतं.

समाज नावाची संकल्पना योजनापूर्वक उभी करावी लागते. अगत्यपूर्वक जतन करावी लागते. त्यासाठी सत्प्रेरीत विचारांचे रोपण मनोभूमीत घडणे अनिवार्य असते. विचार तेव्हाच रुजतात, जेव्हा त्याचं अवकाश आकांक्षांपेक्षा अधिक अफाट असते. अफाटपण सांभाळण्यासाठी अथांग अंतःकरण असणारी माणसे वसती करून असायला लागतात. सत्शील विचारांची रोपटी वाढतात, तेथे संस्कारांचे पोवाडे कधी गावे लागत नाहीत. संस्कृतीने साठवलेल्या संचिताचे पडघम बडवण्याची आवश्यकता नसते. संस्कारांच्या शीर्षस्थानी संवेदनशील अंतःकरण असणारी माणसे असली की, विचारांना नैतिकतेचे कोंदण लाभते. देव, धर्म, वंश, जात असे अनेक शब्द इहलोकी नांदते राहण्यास बराच अवधी झालेला असला, तरी ती काही सहजप्रेरणेतून घडलेली निर्मिती नाही. कुठल्यातरी संकुचित स्वार्थातून प्रकटलेले हे अभिनिवेश. माणूस मूळचा नितळच; पण वाहणं विसरला अन् साचलेपण येऊन जगण्यात गढूळपण वसतीला आलं. पाणी कधी शिळं होत नाही, असे म्हणतात. पाण्याचा धर्म वाहतावाहता निवळणे; पण ते साचते, तेव्हा त्याला कुजण्याचा शाप असतो. माणसांच्या जगात माणूस सगळ्या सुखांचे केंद्र असायला हवा. पण विचार तर्काचे किनारे धरून वाहणे विसरतात, तेव्हा जगण्यात साचलेपण येणे अटळ भागधेय बनते.

काळाची सूत्रे ओळखून आयुष्याची उत्तरे ज्यांना शोधता येतात, त्यांच्या वाटेवर प्रगती पायघड्या घालून उभी असते. जगण्याचे मोल माहीत नसते, त्यांच्या अस्तित्वाची किंमत शून्याभोवती प्रदक्षिणा करीत असते. निसर्गनिर्मित प्रेरणांना प्रमाण मानून विहार करणारी मानव जात नितळपण घेऊन नांदती असल्याच्या कहाण्या ऐकत असतो. अर्थात, याला आपला प्रदेशही कसा अपवाद असेल? येथील समूहाचा कालसुसंगत जगण्याचा परीघ सीमित असला, तरी विचारांची वर्तुळे किमान काही सामावण्याएवढी विस्तृत होती. याचा अर्थ व्यवस्थेत सगळंच आलबेल होतं, असंही नाही. पण माणूसपण जपण्याएवढं विशाल अंतःकरण माणसांकडे होतं. विषमतेच्या वाटांनी चालणे घडत होते, तरी सीमित का असेना; पण एक मोकळेपण जगण्यात नांदते होते.

वर्तमानाचे पेच घेऊन जगणारी गावं विषमतेचे संदर्भ समर्पणपूर्वक सांभाळत असल्याचे सांप्रत दिसतं. बदलत्या काळाने पदरी घातलेलं हे दान आहे. नितळपणाला लागलेलं ग्रहण आहे. पण कधीकाळी याच गावांमध्ये परस्पर विरोधी विचारधाराही सुखनैव कालक्रमणा करीत होत्या. लहान-मोठा, आपला-परका अंतरे असली, तरी ती एवढी दूर कधीच नव्हती की, पार करता येणारच नव्हती. एक रोटीबेटी व्यवहाराच्या कुंपणांना वगळलं, तर जगण्याचे व्यवहार परस्पर सहकार्याचे साकव घालून सहज पार पडत असत. व्यावहारिक पातळीवरील जगण्यात कोणी कोणाला धर्माच्या, जातीच्या मोजपट्ट्यानी मोजल्याची उदाहरणे असलीच, तर अपवाद असतील. धर्म, वंश, जात या गोष्टींपेक्षा भाकरीचे प्रश्न गहन असतात. जातीधर्माच्या अभिनिवेशाने अस्मितांचा जागर घडत असेलही, माहीत नाही. पण पोटात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी भाकरीच लागते. या प्रश्नांची उत्तरे धर्म, जातीने आखलेल्या चौकटींनी दिली आहेत की नाही, सांगता येत नाही. पण भाकरीची उत्तरे माणूस शोधत आला आहे. भाकरीला कुठलाही धर्म नाही चिटकवता येत. तिचा धर्म भूक असतो अन् जात ती मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट.

कवीने कवितेतून मांडलेला अनुभव हीच सार्वकालिक वेदना घेऊन येतो. त्यांना भेटलेली माणसे जगण्याच्या कलहात आयुष्याचे अर्थ शोधू पाहतात. त्यांच्या डोळ्यात बंगला, गाडी, माडीची स्वप्ने नाहीत. त्यांच्या जगण्याचं वास्तव भूक आहे अन् प्रत्यंतर भाकरी. भाकरीशी ईमान राखणारी ही माणसे माणसांशी इमानेइतबारे वर्ततात. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या माणसांना समोर माणसे नांदती दिसतात. त्यांचं माणूसपण अबाधित आहे. त्यांचे सण-उत्सव त्यांचा ओंजळभर आनंद आहे. त्याला धर्माची वसने कधीच चढवली नाहीत की, कोणी कुणाच्या विरोधात आवाज बुलंद केला नाही.

नाल्याचा पुल ओलांडून सकाळीच येणाऱ्या अहमदमामूने आणलेल्या पाव, बटरपावने वस्तीचा दिवस सुरु व्हायचा. त्याच्या दर्शनाने कुणाला अपशकून नाही झाला कधी. मुख्तारचाचाने आणलेले पापड अन् आशाखालाने विकायला आणलेल्या केळी आणि आंब्याना धर्माचा रस कधी चिकटला नाही. मुख्तारचाचाच्या मळक्या कपड्यांवरून पोरांनी जातीचे माग नाही काढले. राजूचाचाच्या रंगीबेरंगी बिल्लोरच्या किणकिणाटात बाया रमायच्या. त्याच्याकडून हातात बांगड्या भरून घेताना त्याच्यावर धर्माची लेबले लावून स्पर्श कधी टाळला नाही. बांगड्या भरून घेण्यासाठी परक्या पुरुषाच्या हाती आपलं मनगट सोपवायलाही विश्वास असायला लागतो. राजूचाचाचं मन कधी विकारांनी विचलित नाही केलं. त्याच्यासाठी प्रत्येक मनगट आईचं, बहिणीचं होतं. हातात बांगड्या भरताना बिल्लोर टिचला की, हातातलं रक्तही पदरानं त्या हसत हलकेच टिपून घ्यायच्या. त्या रक्ताला कधी धर्माचा रंग नाही दिसला. थोड्याशा विपरीत घटनांनी विचलित होऊन रक्ताचे सिंचन करण्याच्या वार्ता करणाऱ्या जगात या रक्ताचे रंग अन् अनुबंध कसे आकळतील?

फातिमा बुढ्ढी दुपारी बायांमध्ये सवतीचे गाऱ्हाणे करत बसायची. वस्तीतल्या बायांच्या दुःखाशी आपल्या दुःखाचं नातं जोडायची. मनात साचलेले किल्मिषं एकेक करून सांडत राहायची. बाईचं असणं बाईलाच कळतं. जातधर्म बघून वेदनांची उंची नाही ठरत. बाईच्या जन्माचे भोग सगळीकडे सारखेच. दुःखाची नावे बदलली, तरी जखमांचे वाहणे तिच्या जन्माशी जुळलेलं असतं. तिच्या आयुष्याचा धर्म एकच; तो म्हणजे वेदना. उस्मानचाचाच्या मृत्यूने पोरका होणारा त्याचा संसार सावरायला मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांचा धर्म कुठला असेल? त्याच्या जगण्याला नडणारी गरिबी माणुसकीचा गहिवर घेऊन येते. हे करुणार्त रूप धर्माच्या नितळपणाची परिभाषा होते. माणसांच्या विचारांच्या, वागण्याच्या व्याख्या करता येतात. पण माणुसकीच्या परिभाषा शब्दांत नाही, कृतीत दिसतात. वस्तीने पैसे जमा करून त्याचे अंतिम संस्कार केले. त्याच्या बिबी बच्च्याला दुखवटा देताना धर्माच्या चौकटींची गणिते नाही आणली.

अब्दुल किल्लीवाल्याकडे घड्याळ दुरूस्तीसाठी जाणे घडताना तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या मुलासाठी ओसरीचा उंबरठा मर्यादांची लक्ष्मण रेषा ठरतो. ही मर्यादा काही कुणी सक्तीने घातली नसते. ती वागण्यातून प्रतीत होते अन् जगण्यातून दिसते. ‘अब्बा, आरेले… बैठनेको बोलेल है’ हे किणकिणत्या आवाजात सांगताना हमीदाने मान वर करायचं धाडस नाही केलं कधी. मनात आसक्तीचं आभाळ ओथंबून यायचं; पण मर्यादांचे बांध तोडून ते नाही वाहिले. मनात उमलत्या वयाची फुलपाखरे भिरभिरत असली, तरी कधी त्यांनी रंग नाही उधळले. घड्याळ घ्यायला न चुकता जाणाऱ्या मुलाला मनाची मनोगते न कधी हमीदाला सांगता आली, ना तिने तिच्या मनाची भाषिते कधी याला कळू दिली. न याला शोधता आली.

मोहल्ल्यातली अन् वसतीतली पोरं सोबत क्रिकेट खेळायचे, पण त्यांनी कधीच रडीचा डाव खेळला नाही. खेळताना एकमेकाला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, तरी जातधर्माचा उद्धार करून डोकी फोडण्यापर्यंत कलह नाही गेला. वस्तीतल्या बालवाडीत पंधरा ऑगस्ट साजरा व्हायचा, तेव्हा मेहमूदभाईकडून पाय आपटून तिरंग्याला कडक सलाम हाणताना भारत त्याच्या नजरेतून कृतीत उतरून यायचा. शहाबानू आणि जॉनी बाबू कव्वालचा मोहल्ल्यातला मुकाबला, वैशाली शिंदे आणि मिलिंद शिंदेंच्या गीतांचा वस्तीत दणकणारा आमना सामना कधी एकमेकांच्या आड नाही आला. कलेला कसला आलाय धर्म अन् जात? हे काही यांना कोणी पुस्तकातून शिकवलं नव्हतं. रातभर जागून, एकमेकांना ओवाळून पैसे उधळताना वस्ती अन् मोहल्ला माणसांमध्ये भिंत नाही झाला. या उधळण्यात निखळ माणूसपण एकवटलेलं होतं. वस्तीला अजानचे शब्द तोंडपाठ असायचे आणि मोहल्ल्याला प्रार्थनेचे अर्थ मुखोद्गत. ईश्वर, अल्ला यांच्या मनात वसतीला होते. राम-रहीम जगण्यात होते. त्यांनी म्हटलेली कवने भक्ती होती. एक दिलाने नांदणे तपस्या होती. माणूसपणाच्या संकुचित व्याख्या वस्ती अन् मोहल्ल्याला कधीच आचरणात नाही आणता आल्या. संस्कृतीचे किनारे धरून वाहत आलेल्या प्रवाहात साऱ्यांना सामावून जाता यायचे. एका धाग्यात ओवण्यासाठी कोणाला सूत्रे घेऊन सांधण्याचे काम नाही करायला लागले.

काळाने कूस बदलून वळण घेतलं. प्रगतीचे प्रवाह वळते झाले. विकासाची स्वप्ने सोबत घेऊन वाहणारे ओहळ वस्ती, मोहल्ल्याची वळणे पार करत वाहते झाले. विकासाची 'गंगा' अंगणी अवतरली. वस्ती आणि मोहल्लामधून वाहणारा नाला बंडींग करण्यात आला. पण त्यांना जोडणारा पुल जमीनदोस्त करून. किती पिढ्या चालत राहिल्या असतील या रस्त्याने? किती पावलांनी हे अंतर पार करताना मनांचे मार्ग सांधले असतील? पण प्रगतीच्या एका पारिभाषेने केवढं अंतराय वाढवलं. प्रगतीची पावले लावून आलेला विकास परिसरात सुविधांचे स्मारके बांधते झाला. पण नितळपण घेऊन वाहणाऱ्या स्नेहाच्या स्मृती सौहार्दाच्या सूत्रातून सुटत गेल्या. आताही वस्तीला ऐकू येतात मशीदीतले अजान आणि मोहल्ल्याला ऐकू जातात, भारत माता की जय चे फर्मान...! पण प्रर्थानांमधील आर्तता अवकाळी आटली. अजानमधून आपलेपण घेऊन वाहणारे आस्थेचे प्रवाह अनपेक्षित अवगुंठीत झाले. कोणाचा आवाज बुलंद याचीच चढाओढ सुरु झालीय. कोणाचे आवेश अधिक अफाट, अमर्याद यावरून अभिनिवेशांचे महत्त्व ठरू लागले.

वर्षामागून वर्षे सरतात. पुढे जाताना आपल्या असण्याचे, नसण्याचे प्रश्नही अटळपणे बदलतात. काळ चांगला की वाईट, हे त्या-त्या वेळची परिस्थिती ठरविते. सगळीकडे अनिश्चिततेचे मळभ पसरलंय. परिस्थितीच्या रेट्यात गावं-शहरं बदलली. त्यांचा चेहरा हरवला. माणसंही बदलली. जगण्याचे संदर्भ बदलले. स्वार्थपरायणतेत सामाजिक हित हरवलंय. निर्व्याज, नितळ स्नेह बाजूला पडून भाऊबंदकीचे नवे परगणे उभे राहातायेत. गावातलं ‘राज’ गेलं त्याला ‘कारण’ जुळलं अन् राजकारणाचे नवे फड रंगू लागले आहेत. नव्या समस्या अधिवासास येत आहेत. पद आणि पैशातून येणारा मुजोरपणा दिसतो, तशी परिस्थितीवश विकलताही नजरेस पडते आहे. निर्लेप, निर्मोही, निर्लोभीवृत्ती, उदारमनस्कता आदि गुणांनी बहरलेले परगणे उजाड होत चालले आहेत. मुखवटे धारण करणारे साध्याभोळ्या माणसांना फसवण्यासाठी तत्पर आहेत. सभ्यतेची वसने परिधान करून लुच्चे, लफंगे उजळमाथ्याने वावरत आहेत. समाज आंधळ्या विचाराने निर्मित आस्थेतून त्यांना प्रतिष्ठा देत आहे. सहज घडणाऱ्या शिकारीसाठी ते सावज हेरत असतात. परिस्थितीवश विमनस्क झालेली माणसं विनासायास यांच्या हाती पडतात. एकदा का ही सापडली की, यांचे मेंदू पद्धतशीर धुतले जातात. वॉश केलेले मेंदू स्वतःहून डोळ्यांवर पट्ट्या बांधून घेतात. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधभक्तीच्या बांधलेल्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. अंधाराशी सोयरिक करून उजेडाला विसरणे वंचना असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment