कविता समजून घेताना... भाग: एकवीस

By

लक्षात ठेव पोरी

लक्षात ठेव पोरी
तू तुकडा आहेस काळजाचा
विपरीत काही घडलं
तर जीव जाईल आमचा

तुला घराबाहेर पाठवायला
मन आमचं धजत नाही
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं
असही वाटत नाही
तळ हातावरच्या फोडाप्रमाणे
जपलयं तुला काळजीने
जाणिव ठेव त्याची
आणि झेंडा लाव तुझ्या यशाचा

उच्छृंखल, धांदरट राहू नकोस
स्वप्नात उगीच गुंतू नकोस
आरशापुढे उभं राहून
वेळ वाया घालू नकोस
मोहात कसल्या पडू नकोस
अभ्यास करण्या विसरु नकोस
पैसे देवूनही मिळणार नाही
तुझा वेळ आहे लाख मोलाचा

मन जीवन तुझं कोरं पान
त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस
स्पर्श मायेचा की वासनेचा
भेद करण्यात तू चूकू नकोस
मोबाईल, संगणक आवश्यकच
त्यांच्या आहारी जावू नकोस
परक्यांवर विश्वास करू नकोस
अनादर नको करू गुरूजनांचा

देहाचं प्रदर्शन करण्यासाठी
संस्कार, कपडे टाकू नको
लाज वाटेल असं काही करण्यासाठी
चेहरा उगीच झाकू नको
चुकांना येथे नसतेच कधी माफी
गेलेली अब्रूही परत येत नाही
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे
सतत डोळा असतो समाजाचा

असं विपरीत घडत असलं तरी
आमचा तुझ्यावर विश्वास आहे
जिजाऊ, सावित्री आणि अहल्या
तुझा आदर्श आहे
युग आहे गुणांचं-स्पर्धेचं
हिमतीनं तू संघर्षही करशील
मात्र, यशावरती स्वार होण्या
लगाम लागतो बेटा संयमाचा

लक्षात ठेव पोरी
तू तुकडा आहेस काळजाचा
विपरीत काही घडलं
तर जीव जाईल आमचा

- प्रा.बी.एन.चौधरी

सौंदर्य शब्दाची सुनिश्चित परिभाषा करायची असेल, तर ती कोणती असेल? त्याचे संदर्भ नेमके कोणत्या बिंदूना सांधणारे असतील? सौंदर्य देहाशी निगडीत असावे की, मनाशी जुळलेलं? देहाचं सौंदर्य विखंडीत होऊ शकतं. मनाशी बांधलेलं सौंदर्य अभंग असतं. असं असेल तर त्याबाबत विचारांचा गुंताच अधिक का दिसतो? ते असतं की, तसं समजायचं? खरंतर ही प्रश्नचिन्हे न थांबणारी. कदाचित याबाबत ज्याचेत्याचे अनुभव निराळे अन् उत्तरे वेगवेगळी असतील. ती तशी असू नयेत, असं नाही. कोणाला उगवत्या सूर्याचा हात धरून धरतीवर अवतरलेल्या प्रसन्नतेत सौंदर्याचा साक्षात्कार घडेल. कोणाला मावळत्या प्रकाशात ते गवसेल. कोणाला चांदण्याच्या शीतल प्रकाशाच्या संगतीने सांडलेलं आढळेल. कोणाला झुळझुळ पाण्यातून वाहताना दिसेल. कोणाला डोंगराच्या कड्यावर बिलगलेले दिसेल. कुणाला आसपासच्या आसमंतात विखुरलेलं. कोणाला ते मूर्तीत दिसेल, कोणाला माणसात. कोणाला आणखी काही. ते कुठे असावं, याला काही मर्यादांची कुंपणे घालून सीमांकित नाही करता येत. गवसेल तेथून ते वेचावे. वेचून साठवत राहवे. आहे त्यातून थोडे वाटतही राहवे.

सौंदर्य वाहणाऱ्या झऱ्याचे नितळपण असते. वाऱ्याची मंद झुळूक असते. मंदिरातल्या आरतीचा स्वर असते. सश्रद्ध अंतकरणाने केलेली प्रार्थना असते. नंदादीपाचा प्रकाश बनून ते मनाचा गाभारा भरून टाकते. त्याचा परिमल अंतर्यामी आस्थेच्या पणत्या प्रज्ज्वलित करतो. पावन शब्दाचा अर्थ सौंदर्याच्या चौकटीत आकळतो. सौंदर्याचा अधिवास असतो, तेथे विकल्पांना वसती करायला जागा नसते. कुणी परमेश्वराला सौंदर्याच्या परिभाषेत शोधतो. कुणी सौंदर्यालाच भगवान मानतो. कुणी सौंदर्यात सकल सौख्यांचा शोध घेतो. अवनीच्या अफाट पसाऱ्यात सौंदर्य ठायी ठायी साकळलेलं आहे. फक्त ते पाहण्यासाठी नजर असायला लागते. हे सगळं खरं असलं, तरी नितळ, निर्व्याज, निखळ सौंदर्याचा शोध माणसाला अद्याप काही पूर्णांशाने घेता आला नाही, हेही तेवढंच सत्य. सौंदर्य डोळ्यात कधी नसतेच, ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. दृष्टीत पावित्र्याच्या परिभाषा अधिवास करून असतील, तर त्याला भक्तीचे साज चढतात. भक्ती असते तेथे श्रद्धा असते अन् श्रद्धेतून उदित होणारे विचार विश्वमंगलाच्या कामना करीत असतात. ते वासनेच्या, विकारांच्या, विषयांच्या दलदलीत अडकते, तेव्हा त्याला कुरुपतेचा शाप जडतो.

सौंदर्याच्या परिभाषा देहाभोवती येऊन थांबतात, तेव्हा जगण्याचे व्यवहार नव्याने पडताळून बघावे लागतात. आपणच आपल्याला परिणत करताना परिशीलन घडण्याची आवश्यकता असते. सगळीच माणसे काही सर्ववेळी, सर्वकाळी सोज्वळ, सात्विक वगैरे नसतात, म्हणून वर्तनव्यवहारांचे आकलन घडताना आसपास आढळणारे विसंगत विचार अन् विकृत नजरा समजून घ्याव्या लागतात. समाजाच्या चिंतेचे ते एक कारण असते. नितळ नजर लाभलेल्यांना अरत्र, परत्र पावित्र्याच्या परिमलाने गंधाळलेला परिसर दिसत असतो. विकार वसतीला असणाऱ्यांना विषय तेवढे दिसतात. विकारांचा विच्छेद करावा कसा? हा माणसांच्या जगातला सार्वकालिक चिंतेचा विषय आहे.

विकारांच्या वर्तुळात वसतीला असलेली विपरीत मानसिकता विश्वाच्या विवंचनेचा विषय राहिला आहे. विसंगतीच्या वर्तुळापासून विवक्षित अंतरावर वसती करावी कशी, या विवंचनेला घेऊन ही कविता विकल्प शोधू पाहते. काळजाचा तुकडा असणाऱ्या लेकीप्रती असणारी चिंता बापाच्या काळजातून वाहत राहते. तिच्या ललाटी लेखांकित झालेले अभिलेख सात्विकतेचे कवच घेऊन नांदते राहण्याची कामना करते. पोरीच्या प्रेमापोटी चिंतीत होणारा बाप म्हणूनच तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगून शहाणे करू पाहतो. प्रसंगी तिच्या सुरक्षेच्या काळजीपोटी धास्तावतो. हे कुणाला रास्त वगैरे वाटणार नाही. लेकीच्या मनी वसतीला असणाऱ्या आकांक्षांच्या आभाळाचा संकोच वाटेल कुणाला. असे वाटू नये असेही नाही. एका अनामिक काळजीपोटी बापाच्या काळजात कातरकंप उठतात. अनुत्तरित प्रश्नांचे काहूर दाटून येते. तिच्या काळजीने काळजाचा ठोका चुकतो. जगणं कलंकित नसावं, यासाठी तिच्या भोवती वात्सल्याचे वर्तुळ उभे करून; तिच्या जगण्याला सुरक्षित करू पाहतो. तिच्या वर्तनाचा परिघ समाजसंमत वर्तनाच्या चौकटीत असावा, म्हणून विवंचनेत असणारा बाप लेकीला उपदेश करताना ‘लक्षात ठेव पोरी’ म्हणतो. त्याचे असे म्हणणे संयुक्तिक नाही, असे कसे म्हणता येईल?

सुंदरतेचा समानार्थी शब्द ‘नारी’ असला तर... त्यात काही अतिशयोक्त नाही. तो आहे. असावा. तिच्या व्यक्तित्वाला सौंदर्याच्या परिभाषेत समजून घेता यावे. तिच्या अस्तित्वाने आयुष्याला अनेक आयाम लाभतात. तिच्या आगमनाने आयुष्याचे सगळेच परगणे प्रसन्नतेचा परिमल घेऊन जगणे गंधित करीत असतात. तिच्याशी जुळलेल्या प्रत्येक नात्यांनी आयुष्याचे अर्थ नव्याने आकळतात. या वास्तवापासून विचलित कसे होता येईल? हे असं सांगणं देखणं वगैरे वाटत असलं, तरी विचारांत अन् वर्तनातही ते तसेच असेल असे नाही. तिच्याकडे बघणाऱ्या सगळ्याच नजरा नितळ असतील, दृष्टीकोन निकोप असेल असेही नाही. हेच एक कारण तिच्या ललाटी दुय्यमत्वाचे अभिलेख लिहायला पुरेसे ठरते. नेमकी हीच चिंता ही कविता घेऊन येते.  

‘तू काळजाचा तुकडा आहेस, विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा’ म्हणताना तिच्या काळजीपोटी विचलित होणाऱ्या बापाचं मन तिला घराबाहेर पाठवायलाही धजत नाही. पण तिच्या विस्तारणाऱ्या विश्वाला सीमित करून कसे चालेल, म्हणून शिक्षणापासून तिला दूर ठेवावं असंही वाटत नाही. शिक्षणाशिवाय आयुष्याचे अर्थ आकळण्याचा काळ कधीच विस्मृतीच्या निवाऱ्यात विसावला आहे. आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी कुंपणाच्या मर्यादांचे उल्लंघन अनिवार्य आवश्यकता असते. सुरक्षेच्या कवचात जगण्याची प्रयोजने कशी आकळतील? ही जाणीव असल्याने यशोशिखरे संपादित करण्यास प्रेरित करताना तिला हेही सांगायला विसरत नाहीत की, उच्छृंखल, धांदरट राहून उथळ स्वप्नांच्या विश्वात रममाण होऊ नको. 

 

तिचं वयच झोपाळ्यावाचून झुलायचं. असं असलं तरी आभाळाशी गुज करू पाहणाऱ्या झोक्यांना जमिनीवरील वास्तवाचा विसर पडू नये, म्हणून अवगत करून देतो. उमलत्या वयाचा तिचा सगळ्यात निकटचा सवंगडी आरसा. आपणच आपल्याला परतपरत न्याहळण्यास सांगणारा अन् स्वतःच स्वतःशी संवाद घडवणारा हा सखा. प्रतिमेच्या प्रेमात पडायला प्रयोजने असायला लागतातच असे नाही. आपल्या प्रतिमेवर प्रेम अवश्य करावे, पण तिच्या पाशात बंदिस्त होऊ नये सांगताना म्हणतात, आरशापुढे उभं राहून वेळ वाया घालवण्यापेक्षा मनालाच आरसा करून त्यात आपल्या आकांक्षांचे प्रतिबिंब पाहा. मोहाचे क्षण हलक्या पावलांनी चालत येतात. मोहतुंबी क्षणांना टाळता येते, त्यांना यशाची परिमाणे नाही शिकवावी लागत. वेळेची समीकरणे विसरतात, त्यांना यशाची परिमाणे कशी अवगत होतील?  

तारुण्यसुलभ भावनेतून आवडणारे एखादे नाव नकळत आयुष्याचा भाग बनते; पण त्यात आस्थेचा भाग किती अन् आसक्तीचा किती? हा विचार होतोच असे नाही. ओढ कोणतीही असो, तिला काही अंगभूत अर्थ असतात. ते आकळले की, जगण्याची प्रयोजने कळतात. आसक्तीत विकारांचा अधिवास किती अन् विकल्पांचा किती? यातले अंतर समजून घेता यायला हवं. भल्याबुऱ्या गोष्टीत फरक करता यायला हवा. वाढत्या वयाचा हात धरून येणारे मोह अनेक स्पर्श आपलेसे वाटायला लावणारे असतात. त्यांचीही भाषा असते. ती अवगत करावी. तिचे अर्थ समजून घेता यायला हवेत. स्पर्श वात्सल्याचा की, वासनेचा हे समजून घेण्यात गल्लत होऊ नये. आपलेपणाची खात्री झाल्याशिवाय परक्यांवर विश्वास करू नकोस, हे सांगतातच. पण याचा अर्थ गुरुजनांचा, जेष्ठांचा अनादर करावा असा नाही होत. हेही तिच्या लक्षात आणून द्यायला विसरत नाहीत.

देहाचे सोहळे साजरे करण्यात तात्कालिक आनंद असेलही; पण त्यासाठी संस्कारांना तिलांजली देवून देहावर विसावलेल्या वसनांचा विस्तार कमी करत नेणे, असा होत नाही. अशा वस्त्रात विहार करण्यात वावगे काहीच नसेलही; पण विकृत नजरा वस्त्रांचा विच्छेद करून वेदना देणारच नाहीत, हे कसे सांगावे? मुलीच्या चालण्याबोलण्याकडे समाजाचा सतत डोळा असतो. लाज वाटेल असं काही करण्यासाठी विचार करावा लागत नाही. त्यासाठी एक लहानशी विसंगत कृतीही पर्याप्त असते, पण उजळ चेहऱ्याने वावरताना चेहऱ्याचं निर्व्याजपण जाणीवपूर्वक जपावं लागतं. चेहरा झाकून वावरायला लागेल असे काही घडूच नये, कारण चुकांना येथे कधी माफी नसतेच अन् गेलेली अब्रूही नव्याने उगवून येत नाही. हे तिला सांगताना अजूनही आपल्या परिवेशात पावित्र्याच्या परिभाषा देहाशी निगडीत असल्याचे त्यांना विस्मरण होत नाही.

लेकीला हे सगळं समजावून सांगताना इतिहासाच्या पानात स्मृतिरुपाने विसावलेले आदर्शांचे स्मरण करून द्यायला बाप विसरत नाही. जिजाऊ, सावित्री, अहल्या तुझा आदर्श आहेत. कोणीतरी बनणे सहज असते; पण उन्नत जगण्यासाठी आदर्शांच्या वाटेवर चालताना सहनशीलतेचा कस लावणाऱ्या क्षणांना वारंवार सामोरे जावे लागते. ती परीक्षा असते, आपणच आपल्याला उत्तीर्ण करण्याची. खरंतर लेकीवर बापाचा विश्वास नाही, असे नाही. विश्वासाची वासलात लागू नये, असं वाटण्यात काही वावगे नाही. अडनीड वयात मनात वसतीला आलेल्या विकल्पांना समजून घेता आलं की, आयुष्याची अवघड गणिते सुघड होतात. बाप यशाची सूत्रे लेकीच्या हाती देऊ पाहत असला, तरी त्यांचे उपयोजन तिलाच करायचे आहे. वेग घेऊन वाहणारा वर्तमान स्पर्धेच्या गुंत्यात गुंफला आहे अन् यश गुणांच्या आलेखात. ही वर्तमान युगातील विसंगती आहे. हिमतीनं तू संघर्षही करशील मात्र, यशावरती स्वार होण्यास संयमाचा लगाम लागतो, थोड्याशा यशाने हुरळून न जाता मनाला नियंत्रणाचे बांध घालता यायला हवेत, हेही आवर्जून लक्षात आणून देतो.   

प्रणयाच्या प्रवेशद्वारावर पहिले पाऊल टाकणाऱ्या वयाच्या पोरीला बापाचा हा उपदेश कदाचित सांस्कृतिक संचित म्हणून ठीक असेलही, पण येथेही तिची स्त्री म्हणून अधिक चिंता त्याला वाटते. मूल्यांच्या वाटेने वर्तताना, विचार करतांना हे सगळं संयुक्तिक वगैरे वाटत असले, तरी स्त्री म्हणून तिच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे, तिच्या अवकाशाचा अधिक्षेप होतो आहे, असं कुणाला वाटणार नाही असेही नाही. पण हेही वास्तव दुर्लक्षित करता येत नाही की, जगाच्या स्वार्थपरायण व्यवहारांपासून अनेक योजने दूर असणाऱ्या अनभिज्ञ, अननुभवी मनाला हे कळावं कसं? यौवनाच्या पावलांनी चालणाऱ्या लेकीला निसरड्या वाटांची जाणीव करून देताना येथे ‘चुकांना नसतेच कधी माफी आणि गेलेली अब्रूही परत येत नाही.’ म्हणण्यात उपदेश असला, तरी त्यापेक्षा अधिक काळजी आहे. याच विवंचनेतून हे समजावणे येते. आपल्या व्यवस्थेतील विचारांच्या चौकटींची लांबी, रुंदी आणि खोली अजून वाढायची असल्याची जाणीव असणारा बाप मनातलं बोलून दाखवतो. असं असलं तरी नात्यातील तरल अनुबंध अधिक भावनिकतेने मांडण्यात कवीची लेखणी यशस्वी झाली आहे.

सिमोन बव्हुआर ही फ्रेंच लेखिका म्हणते, ‘स्त्री जन्मत नाही, तिला घडवले जाते.’ आजही या विधानाचा अर्थ फार बदलला आहे असे नाही. आयुष्याच्या प्रवासात माणसाने जे काही मिळवले असेल ते असो; पण अद्याप त्याला नितळ नजर कमावता आली नाही. नारी म्हणून तिला निखळ स्वातंत्र्य देता आले नाहीये. याचा अर्थ समाजात सगळेच संकुचित विचारांनी वर्ततात, असं अजिबात म्हणायचं नाही. संख्येने थोडेच असले तरी ते असतात, हे कसं नाकारणार आहोत? व्यवस्थेच्या चाकोऱ्या धरून वाहणारे संख्येने अधिक असतात. विपरीत मानसिकतेने वागणारे बोटावर मोजण्याइतके असूनही ही दुरिते आसपास का नांदताना दिसतात? सज्जनाची शक्ती दुर्जनांचे जगणे का नियंत्रित करू शकत नसेल? की आखून दिलेल्या सीमांकित वर्तुळांचे उल्लंघन करून परिस्थितीला भिडायचे सामर्थ्य त्यांच्यात नसते? माहीत नाही. पण स्व सुरक्षित राखण्याचा प्रयास सामान्य वकुबाचा माणूस करीत राहतो. या काळजीपोटी उदित झालेले विचार घेऊन, ही कविता लेकीभोवती सुरक्षेचे कवच उभं करीत राहते.

स्त्री काही कुणाची दासी नाही की, कुणाची बटिक. तिला तिच्या जगण्याचा पैस असावा, नसेल तर सन्मानाने तिला द्यावा. या विचाराचे समर्थन करणारी माणसे कदाचित बापाची चिंता व्यर्थ म्हणून आपलं मत मांडतील. पण नवथर यौवनात नुकत्याच पदार्पण करणाऱ्या पोरीच्या बापाला वाटणारी विवंचना वैयक्तिक कशी असेल? निखारा वाऱ्याच्या झुळकीपासून सुरक्षित सांभाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सव्यापसव्याची अनुभूती तशी सार्वत्रिक. अस्मिता, स्वातंत्र्य, स्वमत, संकोच याबाबत कोणाला काय वाटावे, हा वैयक्तिक प्रश्न. पण एक मात्र खरंय की, विश्वास नावाच्या गोष्टीवर समाजाचा विश्वास स्थापित होत नाही, तोपर्यंत विवंचनेला विमोचनाचे विकल्प शोधावेच लागतील. नाही का?

चंद्रकांत चव्हाण

••

0 comments:

Post a Comment