कविता समजून घेताना... भाग: सोळा

By

निघून जावे सरळ सुरत

रोहिण्यांनी
अंडे गाळले
जिवाची काहिली
थोडी थंड झाली

मग
आर्द्रा, मृग कोरडाच गेला
मधे थोडा
आडवा-तिडवा पाऊस
फूर-गधडा
आला नि गेला
तो परतलाच नाही

त्याची
वाट पाहून
अंगावर होतं नव्हतं ते
किडकूमिडकू मोडून
पेरणी केली
याही वर्षी!

धोंडी, साधू, फकिरांच्या
आळवणीतून
मग तो आला
लहरिया
मेघुराया..!

पुन्हा मोड-घड झाली
तरी-
मूग, उडिदाने
बरा हात दिला,
साजरा झाला
पोळा

मग पाऊस पुन्हा
गडप झाला
अस्वस्थता
शिगेला पोहचली
घामातून निथळत राहिली
रस्ते, बाजार ओस पडले
निळ्या स्वच्छ आकाशात
पांढरे फट ढग
विकट हसत राहिले

मी करुणा भाकतो
देवा, आता इथे कसे भागवावे?
जनावरांचे, आपले...
आहे ती
ओल टिकवावी
कोळप्याने
मुळांना माती
आशेने लावावी बस्स!

उरलेल्यांनी
गाठावे कारखाने ऊसाचे
वा थापाव्या विटा शेकड्याने
किंवा
निघून जावे सरळ
भुसावळ-सुरत पॅसेंजरने
तिकिटही न काढता
पथारी टाकून
संडास, मुतारीजवळ
कुठेही झोप लागतेच!

लोंढ्यांनी
काम करावे
मिळेल ते
साच्यांवर विणत रहावे
धागे उभे-आडवे
गुंते सोडत रहावे
आपआपल्यापरीने वा
घासावे हिरेही असे
की एक दिवस
आपलेही दैव उजळावे!

धरावा धीर
पहावी वाट
गावाकडे नक्कीच येईल पाऊसही
अन् फुलेल कापूसही!

महेंद्र भास्करराव पाटील

माणसाच्या आयुष्यातील सुखाची पर्याप्त परिभाषा आणि जगण्याचे सगळे संघर्ष भाकरी या एका शब्दाजवळ येऊन थांबतात. ती मिळवण्यासाठी पर्याय शोधायला लागतात. ते काही सहजी हाती लागत नसतात. भाकरीकडे नेणारी एक वाट शेताकडे वळून विसावते. शेती-मातीचे अर्थ पाण्याशी निगडीत आणि पाण्याची सलगी आभाळातल्या भरलेल्या मेघांशी अन् श्रमणाऱ्याचे सख्य पावसाशी असते. एकूण आयुष्याचं गणित केवळ आणि केवळ भाकरीवर येऊन संपत असलं, तरी तिचं वर्तुळ खूप मोठा परीघ आपल्यात घेऊन नांदत असते. भाकरीचे प्रश्न अथांगपण घेऊन येतात. ते सहज असते, तर आयुष्याचे अर्थ प्रत्येकवेळी नव्याने शोधावे लागले नसते. बिरबलाला विचारलेला प्रश्न सर्वश्रुत आहे. सत्तावीसमधून नऊ वजा केले. बाकी शून्य. श्रमिकांच्या आयुष्याची सगळी सूत्रे आणि त्यांची उत्तरे या ‘नऊ’ अंकाभोवती प्रदक्षिणा करीत असतात, असे म्हटले तर अतिशयोक्त ठरू नये. पाऊसपाण्याची गणिते जुळली की, जगण्याला पैस प्राप्त होतो. एखादा हातचा सुटला की, ते अधिक टोकदार होत जातात. जगण्याच्या जखमा दिसत नसल्या, तरी ठसठसणाऱ्या वेदना आयुष्यातील कमतरतेची सतत जाणीव करून देत असतात.

ही कविता याच वेदनेची सोबत करीत वाहत राहते, अस्वस्थ आयुष्याचे तीर धरून. शेतकऱ्यांच्या जगण्याची सूत्रे आकाशातून बरसणाऱ्या धारांसोबत जुळलेली असतात. पडत्या पाण्यासोबत वाहत असतात ती. ‘पोटासाठी दाही दिशा का हिंडवीशी आम्हां जगदीशा’ या एक वाक्याने माणसांच्या मर्यादांना अधोरेखित करता येते. आयुष्याचे आपल्यापुरते अर्थ शोधत प्रत्येकाला वर्तावे लागते. भले त्या जगण्यात सुखांचे वाहते स्त्रोत नसतील. जवाएवढं सुख वेचून आणण्यासाठी पर्वताएवढे कष्ट उपसायला लागतात. अपेक्षांची अवजड ओझी घेऊन आपणच आपला शोध घ्यावा लागतो. उपजीविकेसाठी अनभिज्ञ वाटांनी निघणे नियतीचे संकेत ठरतात. गाव परिसर काही कोणी सहजी सोडून जात नाही. गावाची वेस ओलांडणे कधीही आनंददायक नसते. आपल्या अस्तित्वाची मुळं तुटण्याची जखम क्लेशदायक असते. या वाहत्या जखमांना घेऊन ही कविता मनात अस्वस्थपण पेरत जाते.    

पाऊस एक, मात्र त्याची रूपे कितीतरी. कोणासाठी तो लोभस असतो, कुणासाठी विलोभनीय, कुणाला रमणीय वाटतो. आणखी कुणाला काही काही. त्याच्या आगमनाची नांदी अनेकांच्या प्रतिभेला पंख देणारी. कोणासाठी सर्जनाचा सांगावा घेऊन येणारी. कोणाच्या पदरी भिजल्या क्षणाचं संचित पेरणारा. प्रेम पथावर प्रवास करणाऱ्यांसाठी त्याचं असणं किती विलोभनीय असतं. संवेदनांच्या प्रतलावरून वाहणाऱ्यांना तो रमणीय वगैरे वाटतो. असेलही तो तसा, पण प्रत्येकवेळी तो दिसतो तसा असेलच असे नाही. आकाशाच्या विस्तीर्ण पटावरून उतरताना तो देखणा वगैरे वाटत असला, तरी तोच पट रिता होतो अन् कुशीत वांझोटेपण घेऊन वसतीला उतरतो, तेव्हा त्यात केवढातरी गुंता सामावलेला असतो. तो ठरल्या वेळी येतो, मनाजोगता येतो, तेव्हा त्याचं असणं आनंदाचं अभिधान असतं. पण त्याने वाकुल्या दाखवायला सुरवात केली की, तो किती वेदनादायी असतो, हे त्याच्याशी ज्याचं जगणं बांधलं गेलं आहे त्यांना विचारा. त्याच्या कृपेने संसार बहरतात. अवकृपेने विखुरतात. आगमनाने आकांक्षांची अगणित पाखरे आभाळभर भिरभिरायला लागतात. आयुष्याच्या वाटा त्याच्या भिजलेपणात न्हाऊन निघतात. त्याच्या येण्याने केवळ सृष्टीलाच नाही तर आयुष्याला चैतन्याचा मोहर येतो. हे मोहरणे, उजडणे नियतीचे अभिलेख असतात की काय माहीत नाही, पण पाऊस या एका शब्दापाशी अनेकांच्या आकांक्षा अडकलेल्या असतात.    

रोहिणी नक्षत्राचा हात धरून तो धरतीवर हलक्या पावलांनी उतरतो. त्याचं चारदोन थेंब घेऊन येणं जगण्यात आश्वस्तपण पेरून जातात. ग्रीष्माची काहिली थोडी थांबते. क्षितिजावरून एक धूसर उमेद जागते. आशेचा क्षीण कवडसा मनाच्या आडून अलगद डोकावतो. पण कधीकधी ही उमेदच राहते. कारण ओंजळभर पाण्याने काही शेतशिवार आपल्या देहावर हिरवाई पांघरून घेत नाही. असे असले तरी पुढच्या नक्षत्रांची नांदी असते ती. आभाळाकडे डोळे लागलेले असतात. विस्तीर्ण निळ्या पटलावर काळ्या मेघांनी गर्दी करायला सुरवात केली की, उमेदीचा एकेक अंकुर मनाच्या मातीतून अलगद मान वर काढू लागतो. आयुष्याचे काही आडाखे, काही आराखडे आखले जातात. पण त्याचे आराखडे कोणाला कळले आहेत? असते कळले तर कशाला प्रार्थना करायला लागली असती त्याची. तो त्याच्या खेळी खेळतो. माणसे पळत राहतात त्याच्या पाठी. तो खेळत राहतो. आषाढातील काळ्या मेघांनी दाटून आलेलं आभाळ रस्ता चुकतं अन् वांझोट्या वाटांनी वाऱ्यासोबत धावत राहतं. प्रतीक्षेचे तीर कोरडे होतात. मृगात धारांनी धरतीला अभिषेक करावा, पण तो कोरडेपण घेऊन रखडत चालत राहतो. आर्द्रा कोरड्याच जातात. अधेमधे थोडा असल्या-नसल्यासारखा येऊन जातो. आशेचा एक कवडसा जागतो, पण तोही कुठे समाधानाची गंगा घेऊन वाहतो. कुठे येतो आणि कुठे जातो...

मनात असणारी आस काही सहजी टाकून देता येत नाही. उमेद कशी सोडता येईल? एक ही उमेदच तर जगण्याच्या गणितांना परत नव्याने शोधायला लावते. कधीतरी जमा केलेलं तोळा-मासा किडूकमिडूक कुठल्या कोपऱ्यात अडीनडीसाठी दडवून ठेवलेलं काढून आयुष्य पेरले जाते. नियतीसोबत जुगार खेळला जातो. वाहणं विसरून गेलेला तो जातो; तो परत येतच नाही. त्याच्या वाटेकडे आस लावून बसलेल्या डोळ्यातून मात्र वाहत राहतो. तो लहरीच. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना म्हणतात ना! मग देवालाच साकडे घातले जाते. धोंडी काढून माणसे पाणी मागत राहतात. महादेवाला गाभाऱ्यात कोंडले जाते. हताश मने एक आस्थेचा कवडसा शोधत राहतात सश्रद्ध अंत:करणाने. कधी साधू, फकिरांच्या आळवणीतून आली दया अन् आलाही थोडा, तरी तो नांदेलच असे नाही. पुन्हा मोड-घड होऊन गणिते विसकटतात, ती काही केल्या जुळत नाहीत. दैव संयमाची परीक्षा पाहते. अस्वस्थता टोक गाठते. आकाशातून पाणी नाही, पण आयुष्यातून अपेक्षाभंगाच्या वेदना निथळत राहतात. रस्ते, बाजार शेत-शिवारावर उदासपणाची चादर ओढली जाते. आभाळाची निळाई मोहक वाटत असेलही कुणाला. नितळ गगनात दिसणारा पौर्णिमेचा चंद्र देखणा वगैरे वाटत असेल. पण पावसाळ्यातल्या रात्री चांदण्यांनी हसणारं आकाश वेदनादायीच. शेतकरी करुणा भाकतो. उत्तरे काही हाती लागत नाहीत. विवंचना असते, आहे त्यात भागवावे कसे? जगावे कसे? माणसे कसेतरी पोट भरून घेतीलही, पण जनावरांचे काय? आकाशातून पाण्याच्या नाही, पण आयुष्याच्या कोरड्या आभाळातून प्रश्नांच्या धारा बरसत राहतात अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन.  

जगणं काही असं वाऱ्यावर भिरकावून देता येत नाही. आयुष्याला अपूर्णतेचा शाप असला, तरी उमेदीचं आश्वस्तपणही असतंच. ही उमेद माणसांना ढकलत नेते भाकरीच्या शोधात. घरातल्या कर्त्यांना जडावलेल्या पावलांनी निरोप घेणे भाग असते. मागे राहिलेले रखडत दिवस ढकलत राहतात. कोणी ऊसाचे कारखाने गाठतात. कोणी विटांच्या धगधगत्या भट्ट्यात आयुष्य जाळत राहतात. शेकड्याने हजाराने तयार होणाऱ्या विटा हाती चिल्लरशिवाय काही देत नाहीत. भटकंतीच्या वाटा सैरभैर करतात माणसांना. कोणी कुठे, कोणी कुठे वळचणीला जावून पडतो. कोणी निघून जातो  सरळ पॅसेंजरने तिकिटही न काढता, सुरतच्या रस्त्याने. पथारी टाकून संडास, मुतारीजवळ मूठभर देह विखरून पडतो. क्लांत देहाला कसली आलीयेत सुखांची स्वप्ने? कुठेही झोप लागतेच. शहरातही कुठल्याश्या गर्दीचा चेहरा बनून काम करावे. मिळेल ते घ्यावे. कुणी साच्यांवर धागे विणत राहतो. उभे-आडवे गुंते सोडवत. पण आयुष्याचे गुंते काही सहज नसतात सुटायला. कुणी घासतो हिरे. एकेक पैलू चमकत राहतात त्यांचे. मोल वाढत जातं त्यांचं, पण यांच्या जगण्याचं मोलाचं काय? एक दिवस आपलेही दैव उजळावे, या आशेने नशिबाला तो घासत राहतो. धरून असतो सुटणारा धीर. डोळे मात्र गावाच्या वाटेकडे लागलेले. प्रतीक्षा असते गावाकडे बरसणाऱ्या पावसाची. येईल अन् करपलेलं आयुष्य पुन्हा तरारून येईल याची.

देश बदलला आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्याएवढा. पण देशात राहणाऱ्या साऱ्यांना चेहरा मिळाला आहे का? ज्याच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा आहे त्यांनी सर्वत्र असावं; पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांनी कुठेच नसावं का? देश स्वयंपूर्ण वगैरे झाल्याच्या वार्ता झडत राहतात. पण किती शेतकरी स्वयंपूर्ण झाले? काही थोड्यांच्या आयुष्यात समृद्धीचा वसंत फुललाही असेल. ते प्रगतीशील वगैरे झाले असतील, फार्महाउसचे मालकही असतील. पण ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नावालाच आहे, त्यांनी जगावं कसं?

खेड्यातही प्रगतीच्या वाटेने चालत आलेल्या काही पाउलखुणा दिसू लागल्या. तरीही शेतकरी प्रसन्नतेच्या भावनेतून शेती व्यवसायाकडे का पाहत नाही? शेती कसत आहेत, त्यांना जाऊन विचारा, या व्यवसायात तो किती संतुष्ट आहे. यातील बहुतेक शेतीला रामराम ठोकण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसेल. कितीही राबा मातीतलं जीवन मातीमोल असल्याची खंत मनातला सल बनून, त्यांच्या बोलण्यातून प्रकटते. ज्यांच्याकडे खूप शेती आहे, त्यांच्या घरांचे पालटलेले रूप, धान्याच्या पडलेल्या राशी, दूधदुभात्याने भरलेले गोठे, अंगणात उभी असणारी वाहने, हे प्रगतीचं सार्वत्रिक चित्र नाही. कुडाच्या सारवलेल्या भिंती, धुरानं कोंदटलेले छप्पर, दाराशी असणारी चारदोन जित्राबं आणि छतातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यासह मनातलं गळणारं अवसान सावरत उभा असणारा विकल चेहराच नजरेसमोर दिसतो. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून आलेल्या समृद्धीने ब्रॅन्डेड वस्तूंचा तोरा मिरवणारे एकीकडे, तर दुसरीकडे कोणताच ब्रॅन्ड नसलेलं जगणं. कोंड्याला मांडा आणि निद्रेला धोंडा, असं जगणं सोबत घेऊन परिस्थितीशी धडका देत माणूस उभा आहे. उजाड झालेल्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आशेचे कोणतेही ओअॅसिस दमलेल्या जिवांना दिसू नये का?

एखाद्या गोष्टीविषयी नुसती सहानुभूती असून चालत नाही. तिची अनुभूतीही असावी लागते. अनुभूतीशिवाय सहानुभूती विफल असते. जगण्याच्या वाटा शोधत माणसं शहरांकडे धावत आहेत. शहराचं बकालपण वाढत आहे. बाहेर पडलेली माणसे नव्या प्रश्नांना सामोरी जात आहेत. भाकरीसाठी चाकरी शोधत आलेली, ही माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. साध्यासाध्या गोष्टींकरिता अस्वस्थता वाढत चालली असेल, तर त्यांनी करावं काय? गाव तेथे पार आहे. पारावरील स्वारही आहेत. पण तेथून चालणारा कारभार गावाला गावपण देणारा आहे का? हे एकदा तपासून पाहायला काय हरकत असावी, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment