Paus | पाऊस

By
आला पाऊस एकदाचा. त्याच्या लांबलेल्या आगमनाची प्रतीक्षा संपली. आसपासच्या साऱ्या आसमंताला चिंबचिंब भिजवत राहिला. त्याच्या येण्याने सृष्टीचा साराच नूर बदलला. वाऱ्यासोबत पाठशिवणीचा खेळ खेळत थांबला एकदोन दिवस मुक्कामाला प्रसन्न सोबत करीत. हुलकावण्या देणाऱ्या वांझोट्या ढगांकडे पाहून थकलेल्या नजरांचा त्याच्या आगमनाने सारा नजाराच बदलला. काळाचे भकास स्वप्न बदलून आशेचे नवे गीत गवसले. सचैल न्हालेल्या सृष्टीच्या आरस्पानी रूपाने वातावरणात चैतन्याचे सूर निनादू लागले. सुटकेचा मनमोकळा श्वास साऱ्यांनी घेतला. परिस्थितीने कूस बदलली. बरसणाऱ्या धारांनी ताल धरला. माणसांनी हा सुखसोहळा याची देही अनुभवला. मनात आनंदाचं  गोंदण करून गेला. पुन्हा परत येण्यासाठी.

सर्जनाचा गंध घेऊन धरतीवर अवतीर्ण होणारा ‘पाऊस’ चैतन्याचा साक्षात्कार. त्याच्या आगमनात इहलोकीच्या आनंदाची सारी गणिते एकवटली आहेत. चराचराला आपल्यात सामावून घेणारा पाऊस इहलोकी येताना आनंदयात्रा होतो. सृष्टीच्या रंगगंधांना सोबत घेऊन धरतीवर अवतीर्ण होताना सृजनसोहळा बनून प्रकटतो. सहस्रावधी सरींनी चराचराला भिजवणारा पाऊस सुखांची अनवरत बरसात करीत राहतो. त्याच्या आगमनात आशा-आकांक्षांचं आकाश समावलेलं असतं. त्याच्या येण्याने जगण्याच्या वाटा संपन्नतेच्या पथावरून मार्गस्थ होतात. उद्याचं भविष्य त्याच्या आगमनाने सजलेले असते. भविष्यातील सारी सुखं त्याच्या येण्यात सामावलेली असतात. तो यावा, वेळीच यावा; म्हणून त्याच्या येणाऱ्या वाटांकडे असंख्य डोळे लागलेले असतात. त्याच्या आगमनाने केवळ धरतीलाच चैतन्याची पालवी फुटते असे नाही, माणसांच्या मनातही आकांक्षांचे कोंब अंकुरित होतात. हिरवाईने सजलेल्या पानाफुलात मनातील रंगांच्या छटा उमटतात. बरसणाऱ्या धारांनी धरणीसोबत भिजणारी मने उद्याचं आश्वस्त जिणे पदरी आल्याने आनंदाच्या आकाशात मुक्त विहार करीत राहतात.

पाऊस वेळीच बरसला की, चेहरे आनंदाच्या स्मितरेषा सोबत घेऊन प्रसन्न तेजाने उजळून येतात. नसेल वेळेवर तर चेहऱ्यावरील तेजही काळवंडते. तो उदंड बरसावा आणि वेळीच बरसावा म्हणून माणसं मनातून प्रार्थना करीत राहतात. या प्रार्थनेत पुढील परिस्थितीची प्रखर वास्तवता सामावलेली असते. वेळीच येणार म्हणून त्याच्या आगमनाच्या मार्गावर अपेक्षांच्या पायघड्या घालून उभी असतात. पाऊस केवळ आकाशातून कोसळणाऱ्या जलधारा नाहीत. धारांसोबत माणसांची जीवनधारा जुळलेली असते. जगण्याचं आश्वस्त अभिवचन त्यातून प्रवाहित होत असतं. सर्जनाचा सोहळा बनून बरसणाऱ्या जलधारांमुळे जगण्याचे आश्वस्त अभिवचन मिळते. जगण्याचे सगळे संघर्ष आनंदपर्यवसायी व्हावेत म्हणून माणसं प्रतीक्षा करीत असतात. ज्या देशाची कृषीव्यवस्था पाऊस शब्दात सामावलेली असते, त्या देशाला त्याच्या आगमनाची प्रतीक्षा असणे स्वाभाविक आहे. तो येणार म्हणून केवळ शेतकरीच आसुसलेले नसतात, तर त्याच्याशी निगडित सगळेच त्याची करुणा भाकत असतात. 

अनेकांच्या आस्थेशी जुळलेला पाऊस अनेक रुपात धरतीवर अवतीर्ण होतो. तो केवळ पाऊस राहत नाही, तर अनेक रूपं धारण करणारा बहुरूपी होतो. खेळिया होतो. त्याच्या रूपाचं देखणंपण वेगळे आणि त्याच्या येण्याचे सोहळेही आगळे. कधी धो-धो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी थेंबाथेंबातून निथळणारा, कधी मुसळधार कोसळणारा, कधी झड लागून दैनंदिन व्यवहार ठप्प करणारा. त्याच्या प्रत्येक भेटीचं रूपं आगळे, भेटीचा सोहळासुद्धा वेगळा. कसाही येवो, साऱ्यांना प्रिय असणारा पाऊस माणसांच्या जिवाचा जिव्हाळा असतो. म्हणून त्याच्या आगमनाचाही सोहळा होत असतो. साऱ्यांना त्याची ओढ लागलेली असते. वेळीच आला तर मनामनातून आनंद बनून प्रकटतो. नाहीच आला वेळेवर की, काळजाचा ठोका चुकतो.

काही दिवसापूर्वी आईशी बोलत होतो. बोलण्याच्या ओघात विषय शेतीकडे आणि शेतीकडून पावसाकडे वळला. पावसाने यावर्षी चांगल्याच वाकुल्या दाखवल्या असल्याने तिच्या शब्दांतून चिंता प्रकटत होती. पावसाचे आगमन लांबल्याने जगण्याची स्वप्ने विस्कळीत होत चालल्याची वेदना जाणवत होती. आजच्या वास्तवात उद्याच्या भकास भावविश्वाचे भाकित दिसत होते. शेतं उजाड पडत चालल्याचे दुःख होते. माणसांच्या देहात जीव असला तरी न येणाऱ्या पावसामुळे आत्मा हरवत चालल्याची जाणीव प्रकर्षाने प्रकटत होती. उद्याच्या उजाड जगण्याच्या भीतीची भाकिते कळत होती. तो यावा म्हणून मनातील आर्तता शब्द बनून प्रकटत होती. याला केव्हा एकदा वात्सल्याचा पान्हा फुटतो आणि वर्षावात सारा शिवार कधी भिजतो, याची आस मनाला लागली होती. उशिरा का होईना; पण तो येईल ही खात्रीही होती. आजूबाजूचे सारे बंध तुटतात; पण माणसाच्या मनातील आशेचे बंध सहजासहजी नाही तुटत. आई तिच्या दैवशरण भावनेतून आस्थेचे समर्थन करताना म्हणीत होती. ‘सृष्टीचा नियंता साऱ्यांना वाऱ्यावर असे कसे सोडेल. तो कनवाळू आहे. येईल त्याला या हताश माणसांची दया.’ आई अजूनही वास्तव परिस्थिती स्वीकारून पराभव पत्करायला तयार नव्हती. भारतीय शेतकऱ्याच्या याच मानसिकतेने अनेक आघातांना सामोरे जाण्याचे बळ पिढ्या न पिढ्या दिले आहे. शेतकऱ्याचा तो विजीगिषू वारसा तिच्या शब्दातून जाणवत होता.

नेमेचि येणारा पाऊस यावर्षी लांबला. माणसांची परीक्षाच घ्यायचे त्याने ठरविले होते जणू. सत्वपरीक्षा शब्दाचा अर्थ काय असतो, याचे उदाहरण जणू तो देतो आहे. येईन म्हणता, म्हणता अनपेक्षित हुलकावणी देत माणसांच्या आकांक्षांवर पाणी फिरवीत आहे. तो यावा म्हणून माणसं कासावीस होत आहेत. येत नाहीये म्हणून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. माणसं कशीतरी धीर धरून उभी आहेत. ज्याचं सारं जगणं बरसणाऱ्या जलधारांशी बांधलं गेलं आहे, त्याच्या संयमाचे बांध फुटत चालले आहेत. आस्थेचे बंध सुटले आहेत. जीवनाच्या आसक्तीचे धागे तुटत जाऊन उद्याचं भविष्य काय असेल, या भीतीने आजचा वर्तमान उध्वस्त होतोय. जीवनाचे रंग शोधता-शोधता जगण्याचेच रंग हरवत चालले आहेत. त्याच्या असण्याने आणि नसण्याने सारं जगणं मुळापासून ढवळून निघतं. तो यावा, वेळीच यावा म्हणून माणसं आस लावून बसलेली असतात. 

माणूस मुळात श्रद्धाशील प्राणी आहे. उद्याचं भविष्य वर्तमानाच्या वर्तुळात शोधतो. उद्याचं समृद्ध जीवन घडविण्यासाठी धडपडत असतो. धडपडीतल्या कृतकृत्य भावनेचा गंध परिस्थितीच्या अनुकूलतेत सामावलेला असतो. प्रयत्नांनीही प्रारब्ध अनुकूल होत नाही, तेव्हा माणसं गलितगात्र होतात. थकतात. हरतात. जीवनाची स्वप्नेही हरवत जातात. हरवलेलं जगणं शोधताना परिस्थतीशरण होतात. पाऊस येऊन सर्वत्र आबादानी व्हावी, म्हणून देवाला साकडं घालतात. त्यालाच पाण्याखाली कोंडतात. महादेवाचा गाभारा पाण्याने भरतो. तो बुडताना निदान बुडणाऱ्या माणसांना, त्यांच्या स्वप्नांना तरी तरता यावे, ही वेडी आशा मनात घर करते. कोणी धोंडीधोंडी पाणी दे! म्हणीत दारोदार पाण्यासाठी याचना करीत फिरतात, तेव्हा संवेदनशील जिवांच्या मनाचे पाणी पाणी होते. तरीही देवाला पान्हा फुटेलच असे नाही. अशावेळी पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा या विचारांवर विश्वास करावाच लागतो.

माणसाने कितीही प्रगती केलेली असलीतरी अशावेळी माणूस किती छोटा आहे, याची जाणीव निसर्ग प्रकर्षाने करून देतो. माणसांनी धरणे बांधून पाण्याला अडवलं, साठवलं. कधीतरी ते आटणार आहेतच. या वास्तवाला नाकारून चालणार नाही. आडातच नाहीतर पोहऱ्यात कुठून येणार. आणीबाणीच्या वेळी माणसं पाण्याचं महत्त्व जाणून घेतात. पाणी नियोजनाचा, बचतीचा संकल्प करतात. पण आलेली वेळ टळून गेली की, पुन्हा येरे माझ्या मागल्या. वेळ आल्यावर आपण विचार करतो. पाणी बचतीचा संकल्प करून मोकळे होतो. तो पुढे पूर्ण होतोच, असे नाही. याबाबत आपण कधी संवेदनशील मनाने विचार करणार आहोत कुणास ठावूक? आकाशातून बरसणाऱ्या पाण्याचा थेंब न् थेंब अनमोल असल्याचे नुसते सांगून काय उपयोग. त्या थेंबाचे मोल जाणणारे मन आपल्याकडे असावे. परिस्थती हाताबाहेर गेल्यावर मोल कळून काय उपयोग. तहान लागल्यावर विहीर खणण्यात कोणते शहाणपण सामावले आहे. आपल्या मनातील विहिरींना संवेदनशील विचारांचे झरे असायला नकोत का?

लहान असताना अनुभवलेला पाऊस आता फक्त स्मृतीतून उरला आहे. आमच्यासारख्या अनेकांचे बालपण पावसाच्या आठवणींनी समृद्ध केले आहे. संपन्न केले आहे. प्रसन्नतेचे दान आमच्या ओंजळीत भरभरून ओतणारा तो पाऊस आता कुठे गेला, कुणास ठाऊक? अनुभवला तसा पाऊस राहिलाच नाही. त्याचं रंगरूप, नूर सारं काही बदललं आहे. चारपाच दिवस झड बनून बरसणारा पाऊस राहिलाच नाही. आला, गेला एवढंच त्याचं अस्तित्व उरलंय. असा अचानक गेला कुठे? त्याला पळवला कुणी? त्याच्या सतत बरसण्याने कधीकाळी माणसे कंटाळत. तो येत नाही म्हणून आता का तरसतात. पावसाचे धोधो कोसळणे फक्त वाक्प्रचारापुरते उरलेय. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आठवणींचा ठेवा झाल्यात. पुराच्या पाण्यात वाहत येणारी लाकडे पकडण्यासाठी बेधडक उडी टाकणारे शोधूनही दिसत नाहीत. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या छाताडावर नाचत विजयी वीराच्या थाटाने लाकूड ओढून आणणारी माणसं आता दिसतात तरी का?

उफाणलेल्या नदीत बिनधास्त उड्या टाकून पोहणाऱ्यांचे साहस भूतकाळ होऊन स्वीमिंग टँकपुरतेच उरले आहे. उन्हाळ्यातही न आटणाऱ्या नद्या कल्पनाविलासापुरत्या उरल्या आहेत. नदीवर पोहण्यासाठी जाणे हा आमच्या पिढीतील आनंदठेवा होता. आईवडिलांची नजर चुकवून नदीकडे धावणारी अनवाणी पाऊले कशाचीही फिकीर न करता तापलेल्या वाळूतून पोळणाऱ्या पायांना उचलीत पळायची. पोहण्याच्या ओढीने कधी पायाला शेणाने माखून, कधी पाण्यावर जाणाऱ्या म्हशीच्या पाठीवर बसून नदी गाठायची. तासनतास नदीच्या पाण्यात पोहत असायची. नदीच्या अथांग, नितळ पाण्याशी अस्तित्वाची नाळ अशी घट्ट जुळलेली असायची. बऱ्याचदा नदीवरून परत आल्यावर आईच्या हाताचा मार ठरलेला असायचा. पैजा लाऊन नदीचे दोन्ही तीर गाठण्याच्या आनंदापेक्षा मार खाण्यातील दुःख कमी वाटायचे. बालपणातील तो निरागस आनंद वाढत्या वयासोबत दुरावत गेला. नद्यांवरील धरणांनी पाणी साठवले. दुथडी भरलेले पात्र आटवले. नदीकाठ कोरडे पडले. आटणाऱ्या पाण्यासोबत आनंदही आटत गेला. आठवणीचा काठ मात्र अजूनही तसाच अल्याडपल्याड दोन्ही काठ तुडुंब भरला आहे.

पावसाचं येणं जाणं वरचेवर अनियमित होत चालले आहे. माणसांच्या अनिर्बंध हव्यासापोटी निसर्गाच्या चक्रात अक्षम्य हस्तक्षेप करून माणूस निसर्गनियमांचा अधिक्षेप करीत आहे. वैयक्तिक स्वार्थापायी निसर्गाला ओरबडताना आपले अस्तित्व आपल्याच हाताने आज उध्वस्त करीत चालला आहे. जगण्यातील सहजपण विसरून स्वार्थपरायण होत चालला आहे. माणूस जसा बदलत गेला तसा निसर्गही बदलतो आहे. माणसांच्या आवश्यक गरजा पूर्ण करायला समर्थ असणारा निसर्ग त्याच्या स्वार्थाला, लालसेला कसे पूर्ण करू शकेल. ‘धटाशी असावे धट’ या न्यायाने तोही वर्ततो आहे. सहस्रावधी धारांनी बरसताना आनंदाची उधळण करणारा, देहाला भिजवताना मनालाही आकंठ भिजवणारा पाऊस आठवणीत साठला आहे. कधीकाळी संततधार बरसणाऱ्या पाण्याला घालवण्यासाठी पोळवणारी माणसं त्याच्या पाठ फिरवण्याने पोळली जात आहेत. या साऱ्यां बदलांची कारणं माणसांना माहीत नाहीत, असे नाही. पण माणूस काही शहाणा होत नाही. शहाणपण केवळ दिसण्यात नसतं. वागण्यातही असतं, तसं जगण्यातही असतं. आनंदाने जगण्यातच खरे शहाणपण सामावले आहे. असा आनंद आसपासच्या आसमंतात सामावला आहे. हे शहाणपण आम्हा माणसाना कधी येईल? की पावसाप्रमाणे तेही वाट पहावयास लावेल? 

0 comments:

Post a Comment