Swatantrya | स्वातंत्र्य

By
पंधरा ऑगस्ट एकोणाविसशे सत्तेचाळीस रोजी इतिहासाने कूस बदलली. गुलामगिरीच्या शृंखला तुटल्या. मुक्तीचे पंख लेऊन अस्मिता अवतीर्ण झाली. परदास्याचा काळ इतिहासाच्या पानात स्मृती बनून बंदिस्त झाला. अंधाराचे पटल दूर सारीत आकांक्षांच्या नक्षत्रांना सूर्य तेजाचे दान देता झाला. गलितगात्र मनांच्या मशाली पेटल्या. साम्राज्यवाद, वसाहतवादाच्या वणव्यात होरपळणाऱ्या देशासाठी मुक्तीचा आनंद शब्दातीत होता. नियतीशी करार करून मध्यरात्रीच्या अंधाराला छेदत स्वतंत्र ओळख घेऊन स्वातंत्र्य दारी आले. पारतंत्र्याच्या अनेक वर्षाच्या निद्रेतून देश जागा झाल्याचे इतिहास विस्मयाने पाहत होता. स्वातंत्र्य शब्दाभोवती स्वत्वाचे, अस्तित्वाचे अनेक हळवे क्षण जुळले. परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी चुकते केलेले मोलही मोठे होते. अनेक ज्ञात-अज्ञात देहाच्या समिधा स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित झाल्या. स्वातंत्र्याच्या वेदीवर धारातीर्थी पडणाऱ्या अनेक अनाम वीरांची नावे कदाचित इतिहासालाही ज्ञात नसतील. यांच्या पराक्रमाची परिसीमा पाहून काळही क्षणभर स्तब्ध झाला असेल.

जगातील सारे संघर्ष माणसांच्या शापित जगण्यातून मुक्तीसाठी झाले आहेत. स्वातंत्र्याचे हे संग्राम कधी मनोवांछित, तर कधी रक्तलांछित झाले. रक्ताळलेल्या वाटांवरून अगणित अडथळे पार करीत पाऊले स्वातंत्र्याच्या सूर्याला घेण्यासाठी निघाली होती. डोळ्यात स्वातंत्र्य नावाचे स्वप्न सजले होते, रुजले होते. भारावलेली मने स्वातंत्र्याच्या प्रकाशाचा कवडसा आणण्यासाठी क्षितिजाकडे चालती झाली. त्यांच्या पावलांनी पुढच्या पिढ्यांसाठी स्वातंत्र्याचे नंदनवन उभे केले. संघर्ष कोणताही असो, तो जटील असतो. जशास तसे न्यायाने वर्तणाऱ्या क्रांतिकारकांपासून, अहिंसेचे अमोघास्त्र हाती धारण करून सत्याग्रहाच्या मार्गाने संघर्षरत राहणाऱ्या गांधीजींच्या अहिंसामार्गापर्यंत साऱ्यांच्या मनात दास्यमुक्त भारताची प्रतिमा आकारास आलेली होती. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम जहाल, मवाळ आणि क्रांतिकारकांच्या मार्ग भिन्न असलेल्या; पण उद्दिष्ट एक असलेल्या ध्येयाचा साक्षात्कार आहे.

सदुसष्ट वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्य मिळविले. त्या मोहरलेल्या क्षणांची आपली पिढी साक्षीदार नसली, तरी तो ऊर्जस्वल इतिहास प्रेरणेचे दीप बनून अंतर्याम उजळण्यासाठी अनवरत तेवत आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील पिढ्यांना स्वातंत्र्य मिळविणे जीवनाची इतिकर्तव्यता वाटत होती. विद्यमान पिढी त्याकडे हक्क या भावनेने पाहत आहे. हक्क सांगितले जातात, तेव्हा कर्तव्ये दुर्लक्षित होतात. त्याग, समर्पण शब्द अशावेळी कोशात दडतात. कर्तव्यपराड्.मुख समाज देशाला ऊर्जितावस्था कशी देऊ शकेल? इतिहास घडवावा लागतो. तो काही सहज घडत नाही. त्याकरिता कोणतेतरी वेड धारण करावे लागते. ध्येयप्रेरित वेडेच इतिहास घडवितात. जो समूह आपला गौरवशाली वारसा विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही. भूतकाळाच्या गर्भातून भविष्य शोधावे लागते. त्यासाठी वर्तमानाचा प्रत्येक क्षण जिवंत करावा लागतो. जिवंत मनेच नवनिर्माणाचे शिल्पकार ठरतात. इतिहास घडविणारे आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात.

‘भारताला पंधरा ऑगस्ट एकोणाविसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले.’ हे वाक्य आपण शाळेत असताना शिकलो. आजही बहुदा तसेच शिकवले जाते. खरंतर आपणास स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. ते प्रयत्नपूर्वक मिळविले आहे. गोरे साहेब आपल्या देशात वर्षानुवर्षे राहून कंटाळले. आता आम्ही आमच्या देशात जातो. सांभाळा तुम्ही तुमचे राज्य, म्हणून ते काही आपणास ‘गिफ्ट’ देऊन गेले नाहीत. येथून जाण्यासाठी भाग पाडून ते आम्ही मिळविले आहे. असे असताना किती सहजगत्या आम्ही स्वातंत्र्य मिळाले, असा शब्दप्रयोग करतो. आधीच्या पिढ्यांनी सुखांचा, सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवले. त्याचं मोल सांप्रतकाळी आम्ही कसे करीत आहोत. सदुसष्ट वर्षात देशाला आम्ही काय दिले, याचा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? पराभूत मन आणि पराधीन मानसिकता वास्तव्य करून असते, तेथे स्वातंत्र्य असून नसल्यासारखेच असते.

विद्यमान भारत विकासाच्या कोणत्या बिंदूवर उभा आहे? त्याचं विश्वातील स्थान नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधली, तर काय चित्र दिसते. कधीकाळी विकासाची पुरेशी साधनेही हाती नसणाऱ्या देशाचा विकासाभिमुख प्रवास एक विस्मयगाथा आहे. साध्या-साध्या सुविधांसाठी परकीय मदतीकडे अपेक्षेने पाहणे देशाचे प्राक्तन होते. पण आज विज्ञान, तंत्रज्ञानाने संपन्न होत स्वसामर्थ्याने चंद्रापर्यंत पोहोचणारा अन् मंगळावर निघालेला भारत सामर्थ्यसंपन्न मानसिकतेचा आणि अमोघ जिद्दीचा साक्षात्कार आहे. कधीकाळी अभावात जगणारा देश आज अभावानेही कोणी दुर्लक्षित करू शकत नाही. भारताची ही गगनगामी प्रगती प्रामाणिक प्रयत्नांची परिश्रमगाथा आहे. देशांना मिळणारं मोठेपण सहजपणे त्यांच्याकडे चालत आलेले नसते. ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तो परिपाक असतो. त्याग, समर्पणाचा परिणाम असतो. शांतीचे स्वप्न डोळ्यात घेऊन मांगल्याची आराधना करीत, विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत असलेला भारत आशेचा किरण आहे. माणूस म्हणून जगण्याचा सन्मान करणाऱ्या विचारांचा एक उत्कट भाव आहे. माणूस नावाची अस्मिता जपण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या प्रयत्नांची यशोगाथा आहे. उद्याचं प्रसन्न, प्रमुदित जग निर्माण करणारे आशास्थान आहे. कलह टाळून सहअस्तित्वाला, सहजीवनाला सहजप्रेरणा समजणाऱ्या समृद्ध विचारांचा सहज सुंदर साक्षात्कार आहे.

देशांच्या विकासाचे लहानमोठेपण उपलब्ध साधनसुविधांनी उंचावलेल्या आर्थिक आलेखांनी निर्देशित करता येते. माणुसकीच्या परित्राणासाठी प्रयत्नरत असणारा विचार हीच विद्यमान विश्वाची आवश्यकता आहे. वैयक्तिक लालसेतून निर्माण होणारे स्वार्थप्रेरित कलह टाळूनच विकास साध्य होतो. विकासाला विधायक विचारांची सोबत असायला लागते. विकासाच्या वाटेने चालताना अवतीभवतीच्या भकासपणाला समजून घेत शुष्क डोळ्यात जगण्याची प्रयोजने पेरून आशावाद निर्माण करावा लागतो. उदास डोळ्यात स्वप्नांचे दीप प्रज्वलित करून आश्वस्त करू शकणारे विचारच शाश्वत सत्ये असतात. मानवकुळाचे आर्त दूर करून जगण्याला नैतिक अर्थ देऊ पाहणारे विचार आपली संपत्ती असते. मांगल्याची आराधना करीत प्रगतीचा प्रकाश निर्मिण्यासाठी प्रयत्नरत असणारे विचार चिरंजीव असतात. आपल्या देशाचे ‘भा-रत’ (आभा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे रममाण) हे नाव म्हणूनच सार्थ ठरते. 

शेकडो वर्षापूर्वी रानावनात, गिरिकंदरात राहणाऱ्या आदिमानवापासून विद्यमानकाळी प्रगतीची एकेक शिखरे संपादित करणाऱ्या माणसाचा जीवनप्रवास एक विस्मयगाथा आहे. माणूस परिणत होत गेला, तसे जगण्याचे संदर्भ बदलत गेले. शतकामागून शतके उलटत जाऊन एकविसाव्या शतकाच्या अस्मितांना सोबत घेत उदित झालेला सूर्य मानवकुलाच्या प्रगतीचा प्रकाश पाहत आहे. दुसऱ्या बाजूने अधोगतीही घडत आहे. प्रगतीच्या प्रखर प्रकाशात अधोगतीचा अंधार नेहमीच अव्हेरला जातो. अंधाराला विसरणे वैचारिक अपराध आहे. सांप्रतकाळी भारताने प्रगतीचे नवे परगणे निर्माण केलेले आपण पाहतो. प्रगतीचा प्रजेला अभिमानही आहे. पण भ्रष्ट्राचार, बेकारी, दारिद्र्य या व्यवधानांची सोबत स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे लोटली तरी घडतेच आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीची, विकासाची फळे सर्वसामान्यांच्या दारी पोहचली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही संदेहाच्या सीमेवर उभे आहे.

मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी अद्यापही संघर्ष करायला लागत असेल, तर याला सामाजिक विकास म्हणावा का? एकीकडे संपन्नतेचे, सुखाचे दुथडी भरून वाहणारे प्रवाह आहेत. तर दुसरीकडे परिस्थितीशरण भकासपण उभं आहे. देशातील कोट्यधिशांच्या संपत्तीचे आकडे उंचीच्या परिमाणांशी स्पर्धा करीत आहेत. स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षानंतरही जगण्याच्या वाटेवर सरपटणारी माणसंही आहेत. विस्कटलेलं जगणं सावरण्यासाठी धडपड करीत आहेत. दारिद्र्याच्या दशवातारांना सामोरे जात परिस्थितीशी धडका देत आहेत. दारिद्र्याची प्रशासकीय आकडेवारी कोणती गणितं मांडून केली जाते, माहीत नाही. पण ३५-४० रुपयात माणसं सुखात, समाधानात जगू शकतात, असं म्हणणारे अहवालातील आकडे विकासाच्या वाटेवर वाकुल्या दाखवत उभे आहेत.

काहींकडे सगळंच असावं आणि काहींकडे काहीच नसावं का? एकीकडे भरपेट भोजनाने अजीर्ण झालं असेल, तर अमकंतमकं औषध, गोळी घेण्याचे टीव्हीच्या रंगीत पडद्यावरून सुचविलं जातं. पण पोटापुरते पसाभरही नसल्याने जीर्ण होणाऱ्या देहांचं काय? अन्नसुरक्षा यांच्या उसवलेल्या जगण्याला सुरक्षा देऊ शकेल काय? कुपोषण अजूनही हद्दपार होत नसेल आणि म्हणून काहींची जीवनयात्रा अवकाळीच संपत असेल, तर याला विकास म्हणावे का? स्वातंत्र्य सर्वाना मिळाले असले, तरी त्याची फळे तळागाळातील लोकांपर्यंत सर्वार्थाने पोहचलीत का? अन्नधान्याच्या गोदामातील उंदीर-घुशींनामात्र सुरक्षा नक्की लाभली आहे. असुरक्षित माणसं वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते कसेतरी खाऊन जगण्याची उमेद सोडता येत नाही म्हणून परिस्थितीशी धडका देत आहेत. हजारो माणसांच्या जगण्याची वणवण अद्यापही थांबलेली नाही. त्यांच्यातील माणसाला हरवून टाकणारं अभावाचं वेगळं जग व्यवस्थेत उभे आहे. ना त्यांना घर, ना दार. चारदोन गाडगी, मडकी हाच त्यांचा संसार. गाठोड्याना डोक्यावरून, घोड्या-गाढवावरून घेऊन भटकणाऱ्यांचं भविष्य काय? कोणताही आशावाद न जागवणारं वणवण जगणं प्रगत जगाच्या विकासाच्या कोणत्या चौकटीत आपण बसवणार आहोत?

देशातील दारिद्र्याचा प्रश्न खरंच संपला आहे का? डोळे दिपवून टाकणाऱ्या झगमगीत हाती काहीच नसणाऱ्यांची जगण्यासाठीची तगमग समाजव्यवस्थेला दिसत नसावी का? विकासगामी वाटचालीचा अभिमान देशवासियांना असला, तरी तो सर्वंकष आहे असे म्हणवत नाही. मनात आशेचे दीप प्रज्वलित करण्याएवढी प्रगती देशाने केली असली, तरी अनेक घरांच्या ओट्यांवर आस्थेच्या पणत्या प्रज्वलित करायच्या राहिल्या आहेत. दारिद्र्याचा शाप सामाजिक अभिसरणाच्या वाटेवरचे व्यवधान आहे. वाढत जाणारी खाती तोंडे सांभाळायची, तर हातांना काम मिळणे आवश्यक आहे. बेकारीचा शाप सोबत घेऊन अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण करणारी तरुणाई सैरभैर भटकते आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांच्या हातांनी देशाच्या विकासाचं बांधकाम करावे लागेल. ही नवनवोन्मेषशालिनी, सर्जनशील ऊर्जा विकासाकडे वळती करावी लागेल. या अफाट ऊर्जेला दिशा देण्यात आपण अद्यापही पुरेसे यश मिळवू शकलो नाहीत. या सळसळत्या चैतन्याचा विचार देश घडवतांना करावा लागेल. संधीचा सदुपयोग करणारा सत्प्रेरित विचार सांभाळावा लागेल. सांभाळलेले सामर्थ्य संवेदनांचा साक्षात्कारात परावर्तीत करायचे असल्यास नव्या युगाचा, नव्या दमाचा, नवा शिपाई शस्त्राने नव्हे, तर शास्त्राने संपन्न करावा लागेल.

भ्रष्ट्राचाराचा संसर्ग देशाच्या प्रगतीच्या स्वप्नांना उध्वस्त करणारा शाप आहे. श्रमाशिवाय समृद्धी शोधणाऱ्या स्वार्थांध बांडगुळांच्या लालसेने येथला संपन्न वारसाही मलीन होत आहे. ‘कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरेची चोरी नको’ यासारखी वाक्ये सुविचार बनून शाळेच्या भिंतीवर लटकली आहेत. भ्रष्ट्राचाराचे कोटीच्याकोटी आकडे ऐकून सर्वसामान्यांची मती गुंग होते आहे. अनैतिकमार्गाने मिळवलेली संपत्ती हव्यासाचा सोस बनून उभी आहे. वामनाची विश्वव्यापी तीन पाऊले प्रतीकात्मक असतील; पण भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या पावलांनी कोपरानकोपरा व्यापला आहे. भ्रष्ट्राचारमुक्त भारत हे वाक्य म्हणण्यासाठी कितीही चांगले असले, तरी नीतिमूल्यांची घसरलेली पातळी भ्रष्ट्राचारमुक्त भारत उभा राहू देत नाहीये. भ्रष्ट्राचाराने सारेच हात भरले आहेत, असे नाही. चिरीमिरी दिल्याशिवाय कामेच मार्गी लागत नसतील, तर दोष नेमका कुणाचा? स्वातंत्र्याचा की स्वातंत्र्याच्या नावाखाली घडणाऱ्या सैल आचरणाचा की, स्वैराचाराला प्रतिष्ठा मिळत जाणाऱ्या विचारांचा, सांगणे अवघड आहे.

ऊर्जाक्षेत्रातला बाकी असलेला अंधार अजूनही दूर करायचा शिल्लक आहे तो आहेच. विकासाचे पर्याय उभे करूनही अपेक्षांचे दीप आपण प्रज्वलित करू शकलो नाहीत. आठ-दहा तास विजेशिवाय जगणे, हेच आपलं नशीब म्हणून लोकांनी स्वीकारले असेल, तेथे पिकांनी बहरलेली शेते, वाढलेले उद्योग उभे राहतील कसे? अशावेळी रिकामी मने नसते उद्योग करीत असतील, तर दोष नेमका कुणाचा? प्रगतीचे अपेक्षित परिणाम साधता का आले नाहीत, हे सांगताना मोठी लोकसंख्या कारण सांगून क्षणिक समाधान मिळवता येते. हे काही एकमेव कारण नाही. प्रगतीचा झगमगाट ज्यावर अवलंबून आहे, त्या ऊर्जानिर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अपेक्षित फळे अजूनही येत नाहीत. आरोग्यसुविधातील वाणवा जणू नियतीचे देणे झाले आहे. व्याधीग्रस्त जीवन जगणे प्राक्तन समजून जगणारी माणसे कोणते स्वातंत्र्य अनुभवत आहेत? योजना अनेक आहेत. पण अनेकांपर्यंत त्या पोहचतच नाहीत. सामान्यांना सामान्य दरात आणि त्यांच्या दारात आरोग्य सुविधा मिळणे दिवसेंदिवस दुरापस्त बनत चालले आहे. आजारी पडणे जणू महागडा शोक होत चालला आहे. आरोग्यकेंद्रे आहेत; पण त्यांच्याकडून सामन्यांच्या अपेक्षांची पूर्ती होत नसल्याने आरोग्यकेंद्रांचेच आरोग्य तपासून पहायची गरज आहे, असे माणसांना वाटत असेल तर दोष नेमका द्यायचा कुणाला?

शिक्षणक्षेत्र देशाच्या विकासाचा राजमार्ग असतो. अद्यापही आमच्या शिक्षणपद्धतीला प्रवासाचा निश्चित मार्ग सापडत नाही. शिक्षण प्रयोगशाळा झाले आहे. नुसत्या मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून शिक्षणव्यवस्था परिणत वगैरे होत नसते. असली तरी त्यासाठी प्रयोग करायला लागतात. पुस्तकातून मूल्ये शोधून आपणही तसेच वागण्याची शिकवण वर्गातून देता येते; पण आचरणात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. माणसांच्या जीवनातील मूल्ये हरवत चालली आहेत. माणूस हरवू नये, म्हणून शिकवावे काय आणि कसे याचे उत्तर अजूनही सापडत नाहीये. शिक्षणातून सक्षम हात आणि संवेदनशील मने निर्माण होणे अवघड होत आहे. ज्यांच्याकडे साधनं आहेत, मोजण्यासाठी पैसा आहे ते पंचतारांकित शिक्षणसुविधा मिळवितात. ज्यांच्याकडे देण्यासाठी यापैकी नाहीच काही, त्यांच्याकरिता आहेत सरकारी शाळा, आश्रमशाळा नावाची विद्यामंदिरे. नावात मंदिर असले, तरी पावित्र्याचे, प्रसन्नतेचे प्रवाह शिक्षण नाव धारण करून येथून प्रकटायला हवेत, अशी सक्ती नाही. सरकारी आणि खाजगी शाळांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणसुविधात आणि पद्धतीत असणारे उत्तरदक्षिण ध्रुवाइतके अंतर कधी कमी होईल? प्रश्न एवढेच नाहीत. अनेक आहेत. अडचणी आहेत. व्यवधानातून मार्ग काढीत अपेक्षित लक्ष गाठणे दिवसेंदिवस अवघड कसरत होत चालली आहे.

स्वातंत्र्य मिळवून देशाने प्रगतीचे नवनवे आयाम उभे केले आहेत. तरीही झालेल्या प्रगतीच्या खुणांचे ठसे सगळीकडे का दिसत नाहीत? विकासाची पाऊले अप्रगत परगण्यांकडे वळती करावी लागतील. या पथावर उभे असणारे अडथळ्यांचे हर्डल्स बाजूला करावे लागतील. प्रगतीच्या प्रकाशाने प्रत्येक परगणा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्नांच्या मशाली प्रज्वलित कराव्या लागतील. प्रामाणिक प्रयत्नांनी, परिश्रमाने हे साध्य होईल. केवळ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळपासून राष्ट्रभक्तिगीतांचे सूर कानी पडत राहणे, तात्कालिक भावनेचे प्रवाह वाहत राहणे, म्हणजे राष्ट्रप्रेम नसते. क्षणभराच्या भावनिक आवेगाने दिलेल्या उंच आवाजातल्या घोषणा आणि उंचावलेले ध्वज यातून राष्ट्रप्रेमाची प्रतीती येत असेलही; पण हे प्रेम मनातून वर्षभर वाहते का? पंधरा ऑगस्टला सकाळी मनात उदित झालेलं राष्ट्रप्रेम सूर्यास्ताबरोबर मावळत जाऊन विरत जाणे आणि पुन्हा सव्वीस जानेवारीलाच प्रकटणे, जमल्यास अधूनमधून त्याची प्रासंगिक आठवण होताना मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत राहणे, हा राष्ट्रप्रेमाचा उत्कट आविष्कार नसतो. स्वातंत्र्यदिनाची मिळणारी सुटी आजूबाजूच्या सुट्यांमध्ये जोडून हिलस्टेशन गाठण्यासाठी नसून; आपली सामाजिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आहे, याची जाणीव आपणास असावी. मला देशाच्या प्रगतीसाठी काय योगदान देता येईल, याचे चिंतन करण्यासाठी असावी. राष्ट्रभक्तिगानाबरोबर जनजागरण घडत राहणेही आवश्यक आहे. जयगानासोबत जबाबदारीचे भानही राहावे. लक्षप्राप्तीचे पथ शोधण्याकरिता निघालेल्या पावलांना कर्त्या मनाचे मोठेपण मिळावे. स्वातंत्र्याला स्वयंशिस्त असल्याशिवाय विकासाची शिखरे उभी करता येत नाहीत. आकाशाशी हितगुज करणाऱ्या आकांक्षांच्या शिखरांवर स्थिरावणारी नजर आणि त्या दिशेने निघालेली पाऊले म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य केवळ राजकीय असून चालत नाही. ते जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांमध्ये असणे आवश्यक आहे. तितकेच प्रत्येकाच्या विचारांमध्येही असणे महत्वाचे असते. कारण स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या साऱ्या वाटांचा जन्म विधायक विचारातून होत असतो. विचारांत अस्मिता असेल, तर स्वातंत्र्याचा सूर्य अपेक्षांच्या गगनात आपले सदन शोधतो. त्याच्या प्रकाशाला अन्य क्षितिजे शोधण्याची आवश्यकता उरत नाही.

0 comments:

Post a Comment