Samadhan | समाधान

By
चित्ती असू द्यावे समाधान

‘समाधान’ असा शब्द ज्याचं अस्तित्व आपल्या जीवनात कायम असावं, ही साऱ्यांचीच अपेक्षा असते. तसं थोडंफार समाधान प्रत्येकाकडे असतेच; पण ते नुसते असून चालत नाही. त्याचा प्रवाह आपल्या जीवनसरितेला समृद्ध करीत राहावा म्हणून धडपडही सुरु असते. यासाठी हे प्रवाह जेथूनही आपल्याकडे वळते करता येतील, तेथून वळते करण्यासाठी अखंड धावाधाव करताना काही माणसं आपल्या आसपास दिसतात. धावपळीतून त्यांना समाधानाची प्राप्ती होते का? असा प्रश्न बऱ्याचदा मनात डोकावून जातो. नसावी, कारण समाधानाचा एक प्रवाह आपल्याकडे वळता केला की, आणखी नवे स्त्रोत शोधण्याची इच्छा मनात उदित होत असते. आणि जे मिळालेले असते, ते चिरकाल टिकणारे असतेच असेही नाही. मिळाले तेच समाधान आहे, हे मानायला मन बहुदा तयार नसतेच. कारण हातून काहीतरी निसटल्याचे सतत वाटत असते. त्यातून आणखी काही मिळवण्याची तृष्णा जागी होते.

तृप्ती, संतोष, आराम हे समाधान शब्दाचे समानार्थी शब्द शब्दकोशात पहावयास मिळतात. हे शब्द कितीही चांगले वाटत असलेतरी ‘असमाधान’ या विरुद्धार्थी शब्दाचाच आपल्या जीवनात अधिक अधिवास असतो. आपली इहलोकीची यात्रा सुखमंडित असावी, ही अपेक्षा सतत सोबत करीत असते. म्हणून या अपेक्षेच्या पूर्तीसाठी काहीतरी करणं आलंच. कारण ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे वर्तल्यास संपन्न, समृद्ध वगैरे जगणं वाट्याला येणार नाही. पर्यायाने सुखाचा शोध घडणार नाही आणि सुख नाही म्हणून समाधानही नाही. म्हणूनच की काय जगात सुखी माणूस जन्माला यायचा आहे, असं म्हटलं जात असावं. सुख, समाधान ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना. थोड्याशा अनुकूलतेतही काही माणसं तृप्त असतात. काहींना कितीही मिळालं तरी पर्याप्त समाधान नसतं. त्यांना आपल्याकडे आणखी काहीतरी असावं, असं सतत वाटत असतं.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.’ तुकाराम महाराजांना येथे समाधान शब्दाचा काय अर्थ अपेक्षित असेल? सारंकाही देवाच्या हाती सोपवून आपण निश्चिंत राहावे. नाही! असा निष्क्रिय प्रारब्धवाद त्यांना नक्कीच अभिप्रेत नव्हता. आपल्या अंतर्यामी तृप्तीची धारा प्रवाहित राहावी. याकरिता अहर्निश परिश्रमरत राहून अनंताच्या अधिपत्याखाली आनंदाने जगावे. जगताना अनावश्यक गरजांच्या मागे न धावता अंतरीच्या समाधानाला शोधण्यासाठी जीवनाची शोधयात्रा घडावी. पुढे चालताना हीच जगण्याची आनंदयात्रा ठरावी, हेच त्यांना अपेक्षित असावे. आनंद आपल्या अंतरीचा अनमोल ठेवा असतो. त्याला शोधण्यासाठी कस्तुरीमृगासारखं वणवण धावण्याची आवश्यकता नाही. इहलोकीची सारी सुखं मनाच्या समाधानात साठली आहेत, सामावली आहेत. समाधान प्राप्त करण्यासाठी प्रसंगी आपल्या भौतिक गरजा कमी करून पदरी आलेल्या दैन्याचा विनम्रतेने स्वीकार करीत जीवनाचा नम्र शोध घेण्याची वृत्तीच समाधानाचे प्रदेश निर्माण करीत असते. समाधानाने बहरलेल्या वनात आनंदविभोर होणारं आत्मतृप्त, अत्मापर्याप्त, आत्मलीन मन आपल्यापाशी असलं की, समाधान अंतर्यामी सहज अवतीर्ण होतं.

हजारो वर्षापासून माणसाची जीवनयात्रा प्रगतीच्या नवनव्या प्रदेशांच्या शोधात अनवरत सुरु आहे. हा थकवणारा शोध कशासाठी? सुखप्राप्ती, हे त्याचं उत्तर. यासाठीच तो नव्या गोष्टी शोधत गेला. बैलगाडीपासून आगगाडीपर्यंत आणि आगगाडीपासून अवकाशयानांपर्यंत त्याच्या प्रगतीच्या पाऊलांनी गगनगामी झेप घेतली. समुद्रतळापासून अवकाशतळापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांची सफर त्याने सुखाच्या शोधासाठी केली. विज्ञानाचे दीप उजळून त्याच्या प्रकाशात अनेक भौतिक साधनं निर्माण केली; पण या साधनांनी माणूस खरंच सुखी झाला का? या प्रश्नाचं हो, असं उत्तर यायला आणखी खूप अवधी लागेल. शोधांनी काहीकाळ समाधान मिळालं असेल. पण ते काही चिरकाल टिकणारे नाही. त्याला अतृप्तीचा अभिशाप आहे. लागलेल्या शोधांनी माणसाच्या जीवनातील सारी दुःखे संपलीत, असंही कोणी म्हणू शकत नाही किंवा तसं म्हटल्याचं आठवत नाही.

विज्ञाननिर्मित सुधारणांसाठी आपल्याला भौतिकसुखांची विपुलता असणाऱ्या अमेरिकन संस्कृतीकडे पाहण्याची आवश्यकता वाटत असेल; पण जीवन समजून घेण्यासाठी कोठे बाहेर जाण्याची गरजच नाही. कारण शेकडो वर्षापासून समर्पणशील विचारांच्या पायावर भारतीय संस्कृती उभी आहे. येथील संस्कारक्षम जीवनाची महत्तता जाणवेल एवढी मोठी आहे. अमेरिकेचा दरडोई उत्पन्नाचा निर्देशांक अधिक असेलही, पण दरडोई समाधानाचा निर्देशांक भौतिकसुविधांमध्ये हरवत चालला आहे. भारतीय लोक संपत्तीने दरिद्री असतील, सुविधांची येथे वानवा असेलही. पण दारिद्र्यातही मनाची श्रीमंती आहे. हल्ली आपल्याकडेही जगण्याच्या कॅनव्हासवरील चित्र हळूहळू बदलत चालले आहे. सुखप्राप्तीचे नवे रंग माणूस त्यात भरू लागला आहे. सुखाच्या स्वनिर्मित मृगजळामागे धावण्याच्या स्पर्धेत जवळजवळ सगळेच सहभागी व्हायला तयार झाले आहेत.

मनात समाधान नाही म्हणून ते शोधण्यासाठी धावाधाव सुरु होते. निघतात माणसं सुखाच्या शोधात. कोणी कुठे, कोणी कुठे. कुणी यात्रेला, कुणी तीर्थयात्रेला, कुणी पर्यटनाला, कुणी परदेश वारीला. निदान तेथेतरी मनाला समाधान देणारा कोणीतरी सुखकर्ता असेल. तो असला म्हणजे तेथे सुखही नक्कीच सापडेल, असं वाटायला लागतं. एकदाचं आपल्याला सुखं मिळालं म्हणजे समाधानही येईलच असं मानून माणसं नद्या, समुद्रात डुबक्या मारतात, स्नान करतात. येथेही क्षणिक समाधानापलीकडे फारसे काही हाती लागतच नाही. शोधायला गेलो होतो, ते हाती आलेच नाही, म्हणून त्यातून पुन्हा आंतरिक अस्वस्थता निर्माण होते. समाधान आपल्या अंतर्यामी आहे. अंतरीचे हे सुख पाहण्यासाठी आपल्याकडे नुसते डोळे असून चालत नाही. डोळे सगळ्यांना असतात; पण दृष्टी फार थोड्यांना असते. ‘तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकलाशी’ अशीच आपली स्थिती होणार असेल, तर समाधान हाती लागेलच कसे?

समाधानाच्या शोधासाठी क्षणिक सुख पदरी ओतणारी भौतिकसाधनं माणसं पैसे देऊन आणू शकतील. पण समाधान पैसा देऊन विकत घेता येत नाही. घरात टीव्हीसेट आहे, सोफासेट आहे, डिनरसेट आहे, टीसेट आहे; पण माणसं मात्र येथून तेथून अपसेट आहेत. माणसं सुखाच्या शोधात स्वतःला हरवत चालली आहेत. निसर्गातलं निर्व्याज सुख देणारं जंगल दुर्लक्षित करून सिमेंट काँक्रिटच्या जंगलात सुखाचं नंदनवन उभं करायला निघाली आहेत. ते उभं राहावं म्हणून अखंड धडपडतायेत. एअरकंडिशन बसवून समाधानाचा शीतल गारवा निर्माण करू पाहत आहेत. अशा एअरकंडिशन घरांमध्ये काहीकाळ गारवा निर्माण करता येईलही. हा आल्हाददायक गारवा हेच खरे समाधान आहे, असेही वाटेल कदाचित; पण तेही क्षणिकच. कारण बंगल्याबाहेर असमाधानाचा वणवा उभा आहे. त्या वणव्यात गारवा शोधायचा कसा?

घर, बंगला, गाडी, माडीत काहींना संतोष मिळत असतो. पण तो काही चिरंजीव नाही. गाडीचे मॉडेल बदलून नवे आकर्षक मॉडेल बाजारात आले, ते आपल्याकडे असावं म्हणून वाटेल. स्मार्टफोन नव्याने मार्केटमध्ये आला. तो माझ्याकडे का नसावा, म्हणून मन झुरणी लागेल. माडीवर माडी बांधावी म्हणून कधीचा विचार करतोय, म्हणून मन स्वस्थ बसू देत नाही. हे मिळवण्यासाठी अस्वस्थता वाढत जाईल. त्यातून अंतरीचे समाधान अंतर्धान पावेल. आजूबाजूला दिसणारी झगमग आपल्या मनाची तगमग वाढवेल. खरंतर विद्यमान जग आपल्याला जगण्यासाठी कालच्या असुविधायुक्त जगापेक्षा सुसह्यच नाही, तर सुखाचंही झालं आहे. पण उद्याचं अधिक संपन्न, समृद्ध वगैरे प्रगत जग घडवण्याचा हव्यासातून अतृप्तीची बीजें मनात अंकुरतात. आजूबाजूला काटेरी झुडपे सहज नजरेस पडतात; पण चंदनाची झाडे क्वचितच दिसतात. ही चंदनाची झाडे जागोजागी रुजवल्याशिवाय समाधानाचा सुगंध आसपासच्या आसमंतात कसा पसरेल?

काही दिवसापूर्वी माझा एक विद्यार्थी भेटला. दहावीच्या परीक्षेत थोडे कमी गुण मिळाल्याने त्याला आवडणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची खंत व्यक्त करीत होता. शिकायला केवळ तेच महाविद्यालय कशासाठी हवं? इतरही महाविद्यालये आहेत, तेथे शिक्षण घे म्हणून सांगितले तर म्हणाला, “मी निवडलेल्या महाविद्यालयात चांगलं शिक्षण मिळण्याची संधी आहे. तेथे प्रवेश घेणारे विद्यार्थीही अभ्यासू, हुशार वगैरे असतात. मात्र, एवढ्या गुणांनी तशी संधी मिळण्याची शक्यता नाही. म्हणून विचारात पडलोय कोणता पर्याय निवडावा.” त्याच्या मनात समाधान-असमाधानाचे द्वंद्व सुरु झालेले. मिळवायचे होते, ते राहून गेल्याची खंत मनाला सतत कुरतडत राहील. त्यातून असमाधानाचे काटेरी झुडपं त्याच्या विचारविश्वात जोमाने वाढत राहतील. ‘आलीया भोगाशी असावे सादर’ म्हणीत परिस्थितीविषयी थोडा सकारात्मक विचार याला करता आला असता तर... पण नाहीच करीत आपण तसं. खरंतर समाधान शब्दाची परिभाषा आपण आपल्यापुरती तयार करून घेतलेली असते. त्याप्रमाणे जीवनात नाहीच काही घडलं की, मनात अस्वस्थतेचे मळभ जमा व्हायला लागतात अन् त्यातून असमाधानाचे विचार जन्म घेतात. त्यांना मनात एकदाची जागा करून दिली की, ते पद्धतशीर वाढत जातात.

परिपूर्ण समाधानी असणं लौकिक अर्थाने कितीही उत्तम असले, तरी भौतिक सुख-सुविधांकडे नेणाऱ्या मार्गाच्या निर्मितीसाठी अंतर्यामी थोडी अस्वस्थता, थोडे असमाधान असल्याशिवाय नव्या गोष्टी शोधणं माणसाला शक्यच होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सुखासाठी काहीतरी हवं, ही भावनाच माणसाला नव्या परगण्यांकडे चालण्यासाठी प्रेरित करते. कोणत्यातरी अपेक्षेने मनात उदित होणारी अस्वस्थताच नव्याचा शोध घेण्यासाठी उद्युक्त करीत असते. अल्पसंतुष्ट राहून घडणाऱ्या प्रगतीचं बोनसाय होणं, हे लिहिताना अपेक्षित नाही. गरजांतून निर्मित सुविधांचा वटवृक्ष वादळवाऱ्याशी संघर्ष करीत उभा राहणं आणि त्याचा विस्तार घडत राहणं, म्हणजे प्रगती. प्रगती घडताना आवश्यक काय, अनावश्यक काय याची जाण असणं आवश्यक आहे. नैतिकमूल्यांची होणारी पडझड थांबवून, त्यांचा अवनतीकडे होणारा प्रवास टाळला की, समाधान देखण्या पावलांनी चालत आपल्याकडे वसतीला येते.

मिळाले तेवढेच पुरे आहे, अशा समजाने संतुष्ट होऊन माणूस जगला असता, तर प्रगतीचा एवढा मोठा पल्ला त्याला गाठताच आलाच नसता. माणसाची सर्वांगीण प्रगती जीवनाला सुखी करण्यासाठीचा प्रवास असावा. अस्वस्थ दिशेने नेणारा विकास नसावा. संत ज्ञानेश्वरांच्या ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ या भावनेचा परीसस्पर्श विकासाला असावा. त्यातून तृप्तीचे, संतोषाचे निर्झर जन्माला यावेत. या निर्झरांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अनवरत प्रवाहित राहावे. त्याच्या नितळ प्रवाहाने आजूबाजूचा आसमंत फुलून यावा. बहरणे घडावे. या बहरण्याला कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळावे. अशा समाधानातून प्रगतीकडे नेणारा जीवनाचा प्रवास म्हणजे खरे समाधान असेल, नाही का?

0 comments:

Post a Comment