शुभेच्छा

By
शुभेच्छा... एक लहानसा शब्द. पण सकारात्मक विचारांचा 'अक्षर' आशय सामावला असतो त्यात, नाही का? कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात काही अनुकूल, प्रतिकूल बदल घडत असतात का? जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असं सांगता येईल पण... तरीही 'पण' हा शब्द उरतोच. या 'पण'मध्ये सकारात्मक, नकारात्मक भावनांचा किती कल्लोळ एकवटलेला आहे. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे मनाच्या राखेच्याआड दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखण्यासाठी जाणीवपूर्वक कसरत करायला लागते. संघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे आणि व्यवस्थेच्या वर्तुळात टिकून राहणे उपजत प्रेरणा. माणसांचा टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता, नाही आणि नसेलही, म्हणून की काय माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता सतत नांदत राहिली आहे. अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणंही नैसर्गिक.

संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो. तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जगण्यावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. अर्थात, मोहरही काही दीर्घकाळाचा सोबती नसतो, पण गंधाळलेपण घेऊन तो नांदतो, तेव्हा गंधभारीत श्वास आपल्या कार्याला आश्वस्त करीत राहतात. नव्या क्षितिजाच्या दिशेने चालण्यास ऊर्जा देतात. लहानमोठी प्रयोजने आणि स्वप्ने अंतरी घेऊन नांदणेच आयुष्याच्या प्रवाहांना समृद्ध, संपन्न करीत असते. असे ओंजळभर प्रवाह अनवरत प्रवाहित असणे आणि त्यातील चैतन्य अक्षय असणे माणसांच्या जीवन संचिताचे अंतिम प्रयोजनसुद्धा.

तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत अशी ही प्रयोजने वाहती राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक सतत करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं कुणाला वाटत असल्यास त्यात वावगं काहीही नाही. आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं. पण सुख म्हणजे नेमकं काय? समाधान कोणत्या बिंदूवर वसाहत करून असतं? खरंतर या व्यक्तीसापेक्ष संकल्पना. एकाचे सुख दुसऱ्यासाठी दुःखदायक नसेल कशावरून? प्रयोजने पाहून त्यांचे अर्थ ठरत असतात. सुख, समाधान, संतुष्टी या सगळ्या गोष्टींचे अर्थ काही असोत, मनात आपलेपणाचा ओलावा असेल, तर जगण्याला पडलेल्या मर्यादांच्या कुंपणांना पार करता येतं. चौकटींच्यापलीकडे दिसणाऱ्या रेषांचे अर्थ आकळतात, त्यांना परिणत विचारांच्या परिभाषा अवगत असतात.

म्हणूनच... विमल वाणी, कोमल करणी आणि धवल चारित्र्याचे धनी समाजासाठी सतत आस्थेचा विषय राहिले असावेत. आहेत. जगण्याला मांगल्याचं अधिष्ठान मिळणे. असण्याला सद्विचारांचे कोंदण लाभणे आनंददायी असते. आपलं असणं अक्षयकृतीची प्रयोजने पेरणारे ठरत असेल, तर तो सगळ्यांसाठी आस्थेचा विषय असतो. आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यात विसावलेले चार आनंददायी क्षण हीच खरी संपदा असते. तुमच्याकडे स्थावरजंगम किती, याला काही अर्थ असतीलही. पण ते वैयक्तिक वर्तुळाच्या पलीकडे नसतात. समाजासाठी आस्थेने केलेलं लहानसं कामही अनेकांच्या आपुलकीचा विषय होऊ शकतं. आपलेपणाने उचललेली चिमुटभर माती स्नेहसाकव उभे करते.

माणूस आपल्या मर्यादांच्या परिघात आयुष्याचे अर्थ शोधत राहतो. सीमांकित जगणं नियतीने त्याच्या ललाटी गोंदलेलं असेलही. म्हणून मर्यादांना प्राक्तन मानून प्रयत्नांना पूर्णविराम द्यावा का? याचा अर्थ आकांक्षांची असंख्य पाखरे त्याच्या मनाच्या आसमंतात भिरभिरत नसतील असे नाही. परिस्थिती प्रत्येकवेळी खो घातत असेल स्वप्नांना, म्हणून क्षितिजावर दिसणाऱ्या कवडशांची प्रतीक्षा करू नये का?

अपेक्षांच्या बिया मनाच्या मातीतून उगवून येण्यासाठी आपलेपणाचा ओलावा घेऊन येणारे शब्द अनवरत पाझरत राहायला हवेत. आश्वस्त करणारे दोन शब्द अंतरी ऊर्जा पेरून जातात. आकांक्षांच्या आभाळात विहार करायला पंख देतात. नाही का?

सामान्य माणसाची सुहृदांकडून स्नेहाने ओथंबलेल्या दोन ओल्या शब्दांशिवाय आणखी कोणती वेगळी अपेक्षा असते? बहुदा नाहीच. स्नेहार्द्र हृदयातून आलेलं आपलेपणाचं एक अक्षरही अक्षय उर्जेचा स्त्रोत असू शकतं. नाही का?

प्रियजनांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू वगैरेंच मोल काहीच नसतं असं अजिबात म्हणायचं नाही. सगळ्यांना सगळ्यावेळी ते संभव असतं, असंही नाही. पण आपलेपणाने ओलावलेले शब्द सगळ्यांकडे असतात. म्हणून द्यायचेच काही तर आपलेपणाने ओथंबलेल्या 'अक्षर' शब्दांइतके अनमोल काय असू शकते? स्नेह्यांच्या 'अक्षुण्ण' स्नेहाइतके सुंदर काय असते? आकांक्षाना 'अक्षय' नांदता ठेवणारा ओंजळभर ओलावा घेऊन आलेल्या शब्दांइतके देखणे आणखी दुसरे काय असू शकते?
**

0 comments:

Post a Comment