गुण

By

गुणांवरून गुणवत्ता ठरवण्याच्या आजच्या जगात जर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून शिकायला असते, तर गुणवत्तायादीत आले असते का? छत्रपती शिवाजी महाराज हे काही राज्यशास्त्र विषयात विद्यापीठचे गोल्ड मेडलीस्ट नव्हते, संत तुकाराम महाराज समाजशास्त्राचे पदवीधर नव्हते, संत ज्ञानेश्वरांनी काही तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली नव्हती. ‘बुडती हे जन देखवे ना डोळा’ म्हणणाऱ्या संत तुकाराम महाराजांचे शब्द समाजाप्रती असणाऱ्या आस्थेतून प्रकटले. तो अंतरीचा जिव्हाळा होता. ‘बंधू-भगिनी’ या दोनच शब्दांनी माणसांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या नावापुढे केवळ बॅचलर ऑफ आर्ट, ही पदवी होती.

रायबाचं लग्न नंतर, आधी कोंडाण्याचं म्हणणारे तानाजी मालुसरे, लाख मरोत; पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणीत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे बाजीप्रभू कोणत्या शाळेत त्याग, समर्पण, स्वामिनिष्ठा शिकले नव्हते. न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन त्यांच्या विद्यालयांच्या गुणवत्ता यादीत आले होते का? शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या लोकांच्या लोकविलक्षण जीवनकथा आम्हांस माहीत असूनही अंगभूत गुणवत्तेला नाकारून गुणपत्रकातील गुणांचाच आग्रह का, कशासाठी? थ्री इडियट चित्रपटात एक संवाद आहे, ‘काबिल बन, कामयाबी पीछे आयेगी.’ यशस्वी होणं गुणांवरच अवलंबून असेल, तर मग समाजातील बहुसंख्य माणसे, जे गुणवत्ता यादीत कधीच आले नव्हते, ते जगायला अपात्र ठरतील. तसंही परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आलेले असतात, त्यापैकी बऱ्याच जणांचे काय चालले आहे, त्यांनी पुढे जाऊन काय केले आहे, हे तरी कुठे आपणास माहीत असते. अनुभवातून आलेले शहाणपण घेऊन जगणारा एखादा सामान्य माणूसही कधी कधी व्यावहारिक शहाणपणात शरण जात नाही.

काळ कोणताही असू द्या. परीक्षापद्धती कोणतीही असू द्या, विद्यार्थी तोच असतो. त्याच्या भावस्थितीचा आपण कधी पुरेसा विचार करतो का? इवलासा अंकुर वाढत, वाढत आकाश कवेत घेण्याचे स्वप्न घेऊन ऊन, वारा, पाण्याशी सख्य साधत जमिनीत रुजतो. सुरक्षेचे कवच असले, तर निर्वेधपणे त्याची वाढ होते. आम्ही मुलांना आश्वस्त करणारं भावनिक सुरक्षेचं आभाळ कधी देणार आहोत?

झाडाच्या सळसळत्या हिरव्या पानांत, झुळझुळणाऱ्या झऱ्यात, गाणाऱ्या पक्षांच्या गळ्यात, दूरदूर वनराईत नेणाऱ्या वळणावळणाच्या पायवाटेत, नदीच्या खळाळत्या पाण्यात खरं शिक्षण सामावलेलं आहे. पुस्तकं दडली आहेत. ती उघडून वाचण्यासाठी त्यांना तेथे कधी नेणार आहोत का? महात्मा गांधीजी म्हणाले होते, ‘आमच्या शिक्षणपद्धतीत दोन्ही हातांचा वापर होत नाही. आणि जो एक हात वापरला जातो तो गृहपाठ, उत्तरपत्रिका लिहाण्यापुरताच.’ शिक्षणातून जर अर्ध्याच क्षमता वापरात येत असतील, विकसित होत असतील, तर या व्यवस्थेला परिपूर्ण तरी कसे म्हणता येईल?

शिक्षण एक पद्धती आहे. ती आत्मसात करावी लागते. ती प्रयत्नसाध्य आहे. या प्रयत्नात कदाचित काही चुका जाणते-अजाणतेपणी मुलांकडून घडतीलही. अपयश पदरी येईल; पण अपयश हा काही प्रयासांचा शेवट नाही. फारफारतर अपयश हा यशाचा चुकलेला मार्ग असू शकतो, तो रस्त्याचा शेवट नाही. रस्ते आणखीही आहेत. चाकोरीतला रस्ता कोणतंही नवं ठिकाण शोधू शकत नाही. प्रत्येकाकडे त्याच्या क्षमता असतात. त्याला त्या शोधू द्या. नसतील समजत, तर मदत करा. धावण्याच्या क्षमतेवर कविता राऊत यशस्वी होते. निरीक्षणबळावर न्यूटन थोर शास्त्रज्ञ होतो. मदर तेरेसा सेवेने जग फुलवतात. बाबा आमटे आनंदवनात आनंदाचे मळे फुलवतात. कोणी उंच उडी, कोणी लांब उडी मारून उच्चांक करतो. यश मिळवू शकतो. थोडे वेगळे काम करायची तयारी असली, थोडी युक्ती असली की, यशाचे मार्ग निर्माण करता येतात.

यशस्वी होण्यासाठी कशावरतरी श्रद्धा असावी लागते. जर ही श्रद्धास्थाने समाज, पालक, शाळा, शिक्षक झाले तर... मुलांच्या मनातील परीक्षेची भीती, अभ्यासाच्या समस्या, जगण्यातील गुंता संपवता येईल. नसेल सुटत सगळा गुंता; निदान कवडसा तरी नजरेस येईल. जातील माग काढत त्यांची पाऊले. घेतील शोध आपणच आपला. देतील आयुष्याला आकार. कारण, श्रद्धेच्या बळावर एकलव्यसुद्धा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतो, नाही का?
••

1 comment: