सुखांचं गोत्र

By
निसर्गासोबत जगताना देहाने झेललेले उन्हाळेपावसाळे पदरी शहाणपण पेरून जातात. अनुभवातून आलेल्या शहाणपणातून घडणाऱ्या साक्षात्काराला एक अनुभवनिष्ठ अधिष्ठान असतं. ते संचित असतं, भल्याबुऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यातून संपादित केलेलं. मिळवणं आणि वाटणं यातील सीमारेषा समजल्या की, विस्ताराच्या व्याख्या कळत जातात. आणि आपण मोठ्या वर्तुळाचे भाग होत जातो. पण याचा अर्थ सगळेच विस्तार अंतरी समाधान पेरणारे असतातच असं नाही. विस्तार सुखावह असला, म्हणून तो आनंददायी असेलच असं नाही. वर्तुळ क्षितिजापर्यंत पोहचलं म्हणून सुंदरतेची परिमाणे त्यावर अंकित होत नसतात. लांबी रुंदी वगैरे सारख्या भूमितीय संज्ञा काहीतरी अर्थ निर्देशित करत असल्या तरी अशा परिमाणाला खोलीशिवाय अर्थ नाही मिळत हेच खरंय. 

प्रगतीच्या विस्तारला सामाजिकतेची किनार असली की, त्यातून नव्या शक्यता जन्म घेतात. वास्तव हेही आहे की, आपलेपण असल्याशिवाय त्याला देखणेपण मिळत नाही. स्वतःसाठी तर सगळेच जगतात. अगदी सूक्ष्म जीवही आपलं अस्तित्व अबाधित असण्यासाठी अनवरत धडपडत असतात. अर्थात, हे स्वाभाविक आहे. जन्मणारा प्रत्येक जीव जगण्यासाठी संघर्षरत असतो. खरंतर माणसांव्यतिरिक्त अन्य जीव आपल्यापासून सुरू होतात अन् आपल्यापर्यंत येऊन थांबतात. बरेच या पडावावर संपतात. पण माणूस काकणभर का असेना यापलीकडे आणखी काही असतो. हे काही असणं त्याची समूहात असण्याचं, समूहातील एक होऊन जगण्याचं फलित आहे. समूहासाठी जगण्यातील सुख अनुभवण्याकरिता समूहाच्या कांक्षांचे अर्थ समजून घेता यायला हवेत. त्यांच्या स्वप्नांएवढं होता यायला हवं. त्यांच्या स्वप्नांच्या क्षितिजांचे अदमास घेता आले की, आपल्या विस्ताराचे अर्थही आपोआप आकळतात. आपल्यातील असलेलं नसलेलं असामन्यपण वगळून सामान्य स्तरावरून वाहत यायला हवं.

उमेदीच्या वाटेने प्रवास करणारे पांथस्थ एक अल्लडपण दिमतीला घेऊन चालत असतात कधी कधी. उत्साह उदंड असतो. पण तो विवेकी असेलच याची खात्री देणं अवघड. उत्साहाने कामे मार्गी लागतात, हे खरंही आहे. पण कधी कधी सळसळत्या चैतन्याला मर्यादांचे बांध घालणंही आवश्यक असतं. कधीकधी मर्यादाही माणसांच्या महात्म्याचं मूल्यांकन करण्याचा मार्ग असू शकतात. सगळेच उत्साह सकारात्मक असतीलच असं नाही अन् प्रत्येकवेळी तो काही पर्याप्त पर्याय असू शकत नाही. अंगात धमक आणि विचारांत चमक असेल तर झगमागटाचं अप्रूप नाही राहत. विचारांत विवेक असणारे समूहाचं संरक्षक कवच असतात, इतरांचे अन् आपलेही. समूहातला अभिनिवेशरहित सहज, सुंदर, सम्यक संवाद सहकार्य सुरक्षेचे प्रमाण असते. तसे प्रगतीचे गमकही.

प्रगतीच्या परिभाषा पर्याप्त पर्यायात सामावलेल्या असतातच असं नाही. त्या तयार करण्यासाठी समायोजन, सहकार्य, सहयोग असणं महत्त्वाचं. वैयक्तिक कांक्षा, आपापसातील हेवेदावे, एकमेकांचा द्वेष, परस्परांविषयी वाटणारी असूया ही प्रगतीच्या पथावरून प्रवास करताना अवरुद्ध करणारी व्यवधाने असतात. ती बाजूला सारून सहकार्याचे साकव उभे करता आले की, सुरक्षित राहण्याच्या शक्यता कितीतरी अधिक होतात. हे असं काही सांगायला किती सुंदर वाटतंय नाही का? पण समजा मुळात जगण्यात नकार अन् वागण्यात अस्वीकार वगैरे भरलेला असेल, तर लायकीची उदाहरणे सांगून कुठली सुंदरता जगण्यात सामावून जाणार आहे? माणूस म्हणून माणसांच्या वैगुण्यांना समर्थनाची लेबले लावता येतीलही, पण ते लावण्याचा प्रयत्न केला, म्हणून परिस्थिती पुढच्या वळणावर जाऊन विसवेल असं नाही. माणसांनी माणसांच्या प्रगतीच्या कितीही परिभाषा केल्या म्हणून त्याच्या असण्यात अपेक्षित परिवर्तन घडेलचं असं नाही. अप्रिय असलं तरी वास्तव हे आहे की, त्याचं न दिसणारं शेपूट काही सरळ होणार नाही.

आदर्शवत आयुष्य असण्यासाठी संयमाच्या कक्षेत विहार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही असते, ही एक बाजू. पण दुसरी बाजू जी कधी दिसत नसते, पण काम मात्र निष्ठेने करीत असते. सामान्य वकुब असणारी माणसे आदर्शांनी हरकून जातात. त्यांना हरवण्यासाठी अनेक विकल्प असतात. दुर्दैव हे की असे विकल्प लोकांना माहीत नसतात असं नाही, पण त्याची धग स्वतःला लागत नाही तोपर्यंत त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. 

विपरीत मानसिकतेने वावरणारे दोन वाईट माणसं आसपास नांदते असले, म्हणून काही सगळा समाज वाईट नसतो. पण बेफिकिरी समाजाच्या जगण्याची रीत झाली की, प्रश्न अधिक टोकदार होतात. चिमूटभर स्वार्थाला परमार्थ मानण्याची मानसिकता प्रबळ झाली की, आयुष्याची गणिते अधिक जटिल होतात. हे सगळं मान्य केलं तरी एक गोष्ट कायम शेष असते ती म्हणजे, नीतिमत्ता, नीतिसंकेत केवळ सामान्यांनी सांभाळायचे असतात का? ज्याच्याकडे जेवढे सामर्थ्य अधिक तेवढा तो सुसाट, असा अर्थ घ्यायचा का तळाकडील लोकांच्या जगण्याचा? सत्ता संपत्तीच्या बळावर काहीही केलं तरी बिनबोभाट पार पडणार आहे का? ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांनी काहीच अपेक्षा घेऊन जगू नये का? सामर्थ्य अधिक सुविधा अधिक अन् संधीही. समानतेचे सूत्र अशा विचारांत नाही सापडत. एकीकडे साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष, तर दुसरीकडे सुविधांचा सतत वर्षाव. काय नाव द्यावं अशा संदर्भाना? लोकांच्या स्वातंत्र्याचे गोडवे गायचे, समतेची सूक्ते सांगायची. लोकशाही व्यवस्थेच्या यशाचे पोवाडे म्हणायचे, पण व्यवस्थेतील व्यत्यास सोयीस्करपणे विसरायचा, यास काय म्हणावं?

गतीला अंगभूत अर्थ असले की, प्रगतीचे पथ प्रशस्त होतात. प्रगती विकास सूत्रांच्या व्याख्या निर्धारित करते. सुखाचं गोत्र सगळ्यांचं सारखं कसं असेल? सम्यक समाधानाचा धर्म साऱ्यांचे हित केंद्रस्थानी घेऊन मांगल्याची आराधना करतो, पण स्वार्थाचा संदर्भ संकुचितपणाला बरकत समजतो. एकीकडे पसायदान मागायचे अन् दुसरीकडे प्रसाद केवळ स्वतःच्या हाती राखायचा, हा वर्तन विपर्यास नाही का? 'समूहाचे समाधान' हा शब्दच मुळात निसरडा असला, तरी त्याला समर्पणाच्या चौकटीत अधिष्ठित करून पर्याप्त अर्थ प्रदान करता येतो, हेही वास्तव आहे. समूहमनाची स्पंदने कळली की, व्यवस्थेला सूर गवसतो अन् सुरांना सुंदरतेचा साज चढवता आला की, आयुष्याचं गाणं होतं, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: