संथ वाहणं

By
जगण्याचं संथ वाहणं हरवलंय. सगळ्यांनाच पुढे निघायची घाई झालीये. थोडे जरी ढेपाळलो तरी मागे पडू, ही भीती मनात अधिवास करून आहे. स्पर्धेचा कोलाहल एवढा वाढलाय की, वेदनांचा आवाजही कुणापर्यंत पोहचत नाही. जगण्यात उरलाय फक्त वेग. वेगाशी सलगी करत धावणे अनिवार्यता झाली आहे. अर्थात, या साऱ्यास तुम्ही प्रत्यक्ष जबाबदार असायलाच हवं असं नाही. कळत असेल किंवा नकळत ही पुण्याई तुमच्या पदरी जमा होत असते. 

तुमचा आसपासच एवढा अस्वस्थ आहे की, तुम्हांला धावण्याशिवाय अन्य विकल्प नसतो. तेव्हा मनात एक प्रश्न साहजिकच फेर धरून प्रदक्षिणा करू लागतो, माणूस आणखी किती आणि कुठपर्यंत धावणार आहे? खरंतर अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे उपलब्ध असतातच असं नाही अन् असले म्हणून पर्याप्त असतीलच असंही नाही.

चालणं जिवांचं प्राक्तन आहे म्हणा किंवा निसर्गनिर्मित भागधेय. चालल्याशिवाय त्याच्या जगण्यात सामावलेल्या प्रश्नचिन्हांची उत्तरे मिळतील तरी कशी? आयुष्याच्या वाटेवर सोबत करणाऱ्या किंतुंची उत्तरे शोधायची तर पावलांना पुढे नेणाऱ्या वाटांशी सख्य साधायलाच लागतं. चालणारी पावले प्रगतीच्या परिभाषा लेखांकित करतात. थांबले की आपलं अवकाश हरवून बसतात. 

क्षणांचे कोपरे कोरत पळणाऱ्या काळाचे अर्थ कळले की, प्रगतीच्या परिभाषा अवगत करून घेण्यासाठी निघालेल्या पावलांना प्रयोजने सापडतात. अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या विचारांत स्वप्ने सजलेली असतात अन् पुढे पडणाऱ्या पावलात उद्याच्या जगाच्या जगण्याची उत्तरे सामावलेली असतात. आयुष्याला वेढून असलेल्या ज्ञातअज्ञात प्रश्नांची उत्तरे थबकलेल्या पावलात नाही सापडत. थकलेली असली तरी मुक्कामाची ठिकाणे गाठण्यासाठी पुढे पळू पाहणाऱ्या पावलात ती एकवटलेली असतात. पावलांना मातीचा स्पर्श हवासा वाटण्यात प्रगतीच्या परिभाषा सामावल्या आहेत. पुढे पडत्या पावलांना गतीचे गीत गाता यावेच, पण प्रगतीची स्वप्नेही पाहता यावीत. खरंतर प्रगती शब्दही नेहमी किंतु-परंतुच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा आहे. त्याचे परिणाम सारखेच, पण परिमाणे कधीच समप्रमाणात नसतात. याचा अर्थ प्रयत्न विसरावेत असा नाही.

माणसाने माणसासारखं वागणं, ही काही त्याला मिळालेली देणगी वगैरे नाही. ते स्वभावदत्त शहाणपण असतं. शेकडो वर्षाच्या प्रवासातून कमावलेलं संचित आहे ते. निसर्ग काही गोष्टी जिवांना उपजत देत असतो. जनुकांच्या वाटेने ते वाहत आलेलं असतं. निसर्गाला सगळंच सातत्य राखायचं असल्याने त्याने केलेली सोय असते ती. जगणं सुसह्य व्हावं म्हणून माणसांनी केलेल्या सोयीचे संदर्भ शोधता येतात. त्यामागे बरेच सायास असतात. कितीतरी वर्षांचा प्रवास सामावलेला असतो त्यात. हे मान्य केलं तरी केलेल्या प्रत्येक सुविधेची आयुष्यात अनिवार्यता असेलच असं नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या चौकटीत स्वाभाविकपण सामावलेलं असतं. कृत्रिमतेचे कोश कोरलेले नसतात. 

जगणं देखणं वगैरे करण्यासाठी केलेल्या प्रयासांना प्रगती म्हटलं, तर त्यांच्या परिभाषा पडताळून पाहता यायला हव्यात. प्रगतीची क्षितिजे पाहत घडणारा प्रवास जिवांच्या जगण्यातील चैतन्य असतं. याचा अर्थ सगळेच प्रवास काही देखणे नसतात अन् मुक्कामाची सगळीच ठिकाणे गोमटी. चालणं भागधेय असलं तरी भाग्य घडवावं लागतं. प्रयत्नांनी प्राप्त केलेल्या परिमाणात दैवाने कोरलेल्या भाग्यरेखा हरवतात तेव्हा मागे उरतात केवळ प्राक्तन परिवर्तनासाठी केलेल्या कष्टाच्या कथा. त्या वाचता येतात त्यांना भाग्योदयाचे साचे शोधावे नाही लागत. सुविधा अन् सुखं निर्माण करण्यात कसलं आलंय कौतुक? माणसांना मोठं करणारी व्यवस्था निर्माण करण्यात नवलाई आहे. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला आनंदाचं अभिधान होता यायला हवं. कुणाला तरी मोठं होता यावं म्हणून आपल्याला लहान होता आलं पाहिजे. संस्कार स्वयंभू असू शकतात; पण स्वयंघोषित कधीच नसतात. 

आदर आतून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलाची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका विचारत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही ओरडून कधी सांगितले नाही. जगाने त्यांचे मोठेपण मान्य केले. ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेचा प्रकाश अन् तुकोबांच्या जगण्याचा अवकाश आकळला त्यांना आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी वणवण करायची आवश्यकता नाही.

जगात एकही गोष्ट मागून मिळत नाही. पात्र बनून मिळवावी लागते. ते काही उताराचे किनारे धरून वाहणे नसते की, पुढ्यात पसरलेल्या पात्राचे कोपरे धरून घडणारा प्रवास. त्यासाठी आपणच आपल्याला अनेक कोनातून तपासून पाहायला लागतं. असतील काही खाचखळगे आपल्या असण्यात तर तासून, तपासून बघावे लागतात. रंधा मारून समतल करायला लागतात. धाग्यातून सुटणारे संदर्भ शोधावे लागतात. काट्यांचं काम करणारे काठ कोरावे लागतात. तेव्हा कुठे आकार शब्दाचा अर्थ समजू लागतो.

आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक आहेत, असतीलही. पण त्यामुळे आयुष्याची उंची वाढते, असे नाही. जगणं खूप समृद्ध वगैरे होतं, असंही नाही. संपन्नता येते, ती परिश्रमाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या विधायक कामाने. अमंगलाचा परिहार करून मांगल्याची प्रतिष्ठापना प्रयत्नपूर्वक करावी लागते. म्हणूनच जगणं असावं इष्ट असेल ते करण्यासाठी आणि रास्त असेल तेच बोलण्यासाठी. कारण जगण्यात मिंधेपण सामावले की, माणूस साचतो. त्याचा परीघ विस्ताराच्या परिभाषा विसरतो. विस्तार हरवला की विचार मर्यादित बनतो आणि भोवती मर्यादांची कुंपणे पडली की, क्षितिजे हरवतात. क्षितिजे हरवली की स्वप्ने वांझोटी होतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: