पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, हे भौगोलिक सत्य आहे. पण ती पैशाभोवती फिरते हे आर्थिक सत्य आहे. हे कितीही खरं असलं तरीही आणखी एक सत्य सरावाने असेल अथवा अजाणतेपणाने आपल्याकडून दुर्लक्षित होत असतं, ते म्हणजे विश्वाचे व्यवहार व्यवस्थेने भोवती कोरून दिलेल्या परिघाभोवती भ्रमण करीत असतात अन् माणसे या साऱ्याभोवती.
माणसांचं जगणं देखणं असावं अन् असणं अर्थपूर्ण. ही अपेक्षा काही नवी नाही. परंपरेचे किनारे धरून तीही जगण्यासोबत वाहतच आहे. आपल्या अवतारकार्याचे अर्थ किमान ओंजळभर तरी आपल्याला अवगत असावेत. अभ्युदयाची आस सगळ्यांच्या अंतरी अधिवास करून असतेच. जगण्याला उंची अन् आयुष्याला लांबी देता यावी म्हणून माणसे काहीनाकाही करत असतात. पर्याय शोधून आपल्या असण्याला अर्थपूर्ण करू पाहतात. या सव्यापसाव्यात सापडतात कधी मुक्कामाच्या ठिकाणी नेणारे रस्ते. कधी निसटतात वाटा चालत्या पावलांच्या स्पर्शातून अन् सोबत करत राहते एक अस्वस्थ वणवण.
सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळत नसतात, हे सांगणं कितीही खरं असलं, तरी माणसांचा काही मिळवण्यासाठी सुरु असणारा शोध काही थांबत नाही. खरंतर कधी तो थांबला नव्हता अन् थांबेल असंही नाही. पदरी पडलेल्या प्रवासात तो शोधत राहतो प्रत्येक पर्याय. कधी लागतात हाती काही विकल्प. कधी निसटतात पाऱ्यासारखे अलगद. पण वास्तव हेही आहे की, सगळेच पर्याय पर्याप्त नसतात अन् वास्तव तर हेही आहे की, सुखांच्या ललाटी समाधानाचं गोंदण सतत नसतं. त्यात कायमच काहीतरी कमतरता नांदत असते. तिच्या पूर्तीसाठी शोधले जातात काही इकडचे थोडे तिकडचे पर्याय. अर्थात, तेही प्रत्येवेळी पुरेसे असतीलच असं नाही.
विकल्प संपले की, मागे उरते केवळ हताशपण अन् शक्याशक्यतांचा आवश्यक अनावश्यक गुंता. काही सुटलेली कोडी, काही सापडलेले संदर्भ, काही निसटलेले निर्णय अन् रित्या ओंजळी. बऱ्याचदा अशा प्रसंगांना कळत असेल अथवा नकळत किंवा सक्तीने म्हणा की, स्वच्छेने सामोरे जाणे घडते. पण खरं हेही आहे की, हताशेचे पळ काही कायमसाठी पथारी पसरून पुढ्यात पडलेले नसतात. ते चालते झाले की, निवळलेल्या आभाळासारखं सगळं काही नितळ होतं. पुन्हा नव्याने आभाळ निळाई पांघरून गात राहतं. झडून जाणे असेल, तर बहरून येणेही असतेच नाही का? विवंचना शब्दाचा अर्थ कळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत.
मुळात आयुष्यच संघर्षाचे सूत्र असते. संघर्ष वैयक्तिक असतो, तसा सामूहिकही असतो. समूहाच्या स्तरावर घडतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा परिस्थितीने पदरी पेटलेले प्राक्तन. कदाचित त्यावेळेची ती गरजही असू शकते. पण हेही दुर्लक्षित करता नाही येत की, प्रासंगिकतेचे अर्थही परिस्थितीनुरूप बदलू शकतात. परिवर्तनशील विचारांना परिभ्रमण घडणे क्रमप्राप्त असते. ज्यांना काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधार-उजेडाचे रंग वाचता येतात, त्यांना अंधाराच्या व्याख्या अन् उजेडाच्या परिभाषा समजावून नाही सांगायला लागत.
तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या प्रार्थना ज्यांना अवगत असतात, त्यांना पणत्यांचं मोल माहीत असतं. याचा अर्थ केवळ प्रार्थनेत परिवर्तनाचे पर्याय सामावलेले असतात असे नाही. बदल घडण्यासाठी पर्याप्त प्रयत्न प्रधान कारण असते. असेल माझा हरी... म्हणून कोणी वर्तत असेल, तर हरीही त्याला पाहून हरी हरी केल्यावाचून राहणार नाही. हरी हरेक चिंतांचे हरण करीत असेल, नसेलही. पण स्वप्रयत्नाने परिस्थिती परिवर्तनाचे अक्ष फिरवणाऱ्यांकडे पाहून मनातून हरकत असेल. प्रयत्नांस कोणी परमेश्वर मानतो, कोणी परमेश्वरालाच प्रयत्न. पण प्रामाणिक प्रयास ज्यांचे परमेश्वर बनतात, त्यांच्या घरी देव्हाऱ्यात नाही, पण मनात भगवंत आपलं घर अवश्य बांधतो.
काम कोणतेही असो, निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. यशप्राप्तीचा आनंद त्याचा असतो, तसे प्रमादही त्याचेच असतात. पराजयाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या की, पलायनाचे पर्याय स्वीकारणे कितपत सयुक्तिक असते? अस्मितांचे अर्थ ज्ञात असूनही अनभिज्ञ असल्याचे कोणी अशावेळी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातली अधिक गहिरी संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेल, तर ती आपणच आपणाशी केलेली प्रतारणा नाही का ठरत?
अर्थात, कोणास काय वाटावे, काय नाही, हे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असते. स्वातंत्र्य आबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम अवगत असायला लागतात. स्व तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी त्रयस्थ ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते. समजा कुणी नियंत्रणाचे सूत्रे हाती घेऊन स्वातंत्र्याचा संकोच करत असेल, तर मुक्तीसाठी स्वतःच विकल्प शोधावे लागतात. तपासून पाहावे लागतात. असतील त्यातले काही योग्य तर आणावेत आचरणात, नसतील रास्त तर वळावं नव्या वाटेने. कारण सगळेच पर्याय काही उत्तरे नाही होऊ शकत अन् समजा लागलीच काही उत्तरे हाती, तर त्यातील सगळीच सम्यक असतात असंही नाही. अशावेळी सद्सद विवेक जागता ठेवून विचारांना योग्य वाटेने वळतं करावं लागतं.
सारासारविचार नावाचा शब्द केवळ कोशाची पृष्ठसंख्या वाढवण्यासाठी नसतो. आचरणात आणण्यासाठीही असतो. विचार वेचावे लागतात. त्याआधी वाचावे लागतात. आचरणात आणण्यासाठी काही कंगोरे कोरून अन् काही कोपरे तपासून पहावे लागतात. त्यांना नैतिकतेचं कोंदण द्यावं लागतं. सुविचारांनी सगळं जग सत्वर नाही बदलत. याबाबत संदेह नाही. असं असतं तर आसपास अनेक किंतू विहार करत राहिले नसते अन् समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. पण याचंही विस्मरण व्हायला नको की, सदासर्वकाळ अवतीभवती अंधार नांदता नसतो. विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी ऋतूंच्या बदलांची प्रतीक्षा करता येतेच ना?
- चंद्रकांत चव्हाण
••
आभार!
ReplyDelete