आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात. की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. ना आखून दिलेली वळणे असतात. असं असलं तरी त्याला आकार मात्र देता येतो. त्याकरिता परिस्थितीच्या कातळावर आकृती कोरता यायला हवी. तिचे संकल्पित आकार अंतरी अधिवास करून असायला लागतात. पुढे पडत्या पावलांना मुक्कामाची ठिकाणे अवगत असायला लागतात. त्याची केवळ माहिती असणं पुरेसं नसतं, तर त्या परगण्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पथांचं पावलांशी सख्य असायला लागतं. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. बहुदा तोच अनेक प्रश्नचिन्हे सभोवती उभे करीत असतो.
अर्थात गुंते कुठे नसतात? अगदी साध्यासरळ वाटेने निघालेली पावलेही पथसंभ्रमित होऊ शकतात. गुंते केवळ विचारांना विचलित करणारे नसतात, तर आयुष्यही विस्कळीत करणारे असतात. जगण्याभोवती मर्यादांची कुंपणे उभे करणाऱ्या जटिल गुंत्यांबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद प्रतिवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असं नाही. त्यांची संगत समाज नावाची संकल्पना जन्मास आल्यापासून आहेच. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असं नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच. संवेदना शाबूत असल्याचे ते प्रमाण असते, कुणाला पर्याप्त वगैरे वाटत नसले तरीही. सगळे गुंते सोडवता येतात सहजपणे. पण विचारांचा गुंता वाढला की, विस्ताराची वर्तुळे सीमांकित होत जातात.
आयुष्याचे अर्थ समजून घेण्यासाठी आपणच आपला धांडोळा घ्यावा लागतो. खोदावं लागतं आपणच आपल्याला, आस्थेचा ओलावा हाती लागत नाही तोपर्यंत. जगण्याला वेढून असणारे एकेक थर खरवडून काढायला लागतात. संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो अथवा अपार प्रीतीचा. विषय काही असला म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही. किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ दिशा बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच.
जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. कुठल्या तरी आकाराला साकार करून त्यात आपल्या आस्था शोधत राहतो.
आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? अर्थात शेंदूर काही सहज लागत नाही आणि लागला म्हणून आपलं असणं देखणं होतंच असंही नाही. शेंदराचेही रंग असतात, काही छटा असतात. काही कमानी असतात, काही कोपरे आणि काही कंगोरे. काही या रंगापासून अंतराय राखून असतात. काहींनी स्वतःच लावून घेतलेला असतो. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतंच असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा.
सुखांचा अखंड वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? आयुष्यात उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे…’ लिहिणं जमून आलं असेल का? रामदासांना ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे…’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का? पानगळ ज्यांना समजून घेता येते, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात, हेच खरं. वसंतातल्या बहराचे अर्थ समजून घेण्यासाठी शिशिरातली पानगळ अनुभवावी लागते.
सुखांची काही सुनिश्चित सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली. ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यांचे काही आयते साचे नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. कुणाला आणखी कशात. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? सुखाची परिभाषा सतत बदलत असते. समाधानाची व्याख्या विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात. जातात. साद देत राहतात. त्याचे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••
0 comments:
Post a Comment