Achhe Din... | अच्छे दिन...

By // No comments:
मे महिन्याच्या सोळा तारखेच्या मुहूर्तावर उघडले एकदाचे इव्हीएमचे पेटारे. सोळाव्या लोकसभा निवडणूक निकालांविषयी मनातील उत्सुकता, कुतूहल, अपेक्षांचे घोंगावणारे भुंगे झाले एकदाचे स्थिरचित्त. अपेक्षांचे कमळ फुलले. पहिल्यांदाच स्वबळावर सत्तासंपादनाचा कौल मिळून विजयाच्या जयघोषात भाजपच्या अंगणी आनंद आला. स्वातंत्र्यसंपादनानंतर प्रथमतःच काँग्रेसेतर पक्षाला स्वसामर्थ्यावर बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ. लोकांना सत्तेत परिवर्तन आवश्यक वाटत होते. आपल्या मतांच्या ताकदीने त्यांनी ते घडविले. काँग्रेससह काही लहानमोठ्या पक्षांची वाताहत झाली. अच्छे दिन... आयेगेच्या भरात काही पक्षांवर सत्तासंपादनाबाबत वाईट दिवस येण्याची वेळ आली. टीव्हीवरील अखंड चर्चेच्या आवर्तनांनी जयपराजयाचे विश्लेषण केले. जाणकार, माहितगार विश्लेषकांनी केलेल्या विवेचनातून मतमतांचा एकच गलका उडाला. प्रत्येकाने आपापल्या विचाराच्या परिप्रेक्षात पक्ष जिंकण्याची, पराभूत होण्याची कारणमीमांसा केली. काळाची गणिते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करून जुन्यानव्या काळाच्या वाटचालीची समीकरणे मांडली. पुढच्या घडणाऱ्या बऱ्यावाईट राजकीय प्रवासाचे अंदाज घेतले गेले. अनुमानांमध्ये काहींना परिवर्तनात विकास दिसतोय, तर काहींना काहीतरी कमी राहिल्यासारखे वाटतेय.

परिवर्तनप्रियता माणसाचा स्वभावाच असल्याने तो परिवर्तनाचे पर्याय शोधीत असतो. यावेळेस त्याने सत्तापरिवर्तनाचा प्रयोग करून पाहिला. प्रयोग करताना निरीक्षणे, अनुमान, तर्क या गोष्टी ओघानेच येतात. प्रयोग केल्याशिवाय निष्कर्ष हाती येत नाहीत, हेही तेवढेच सत्य. सत्ताधारी पक्षाचे हे चुकलेच पासून ते अतिविश्वासाने गाफिलपण आल्याने सत्तेतील गुड फील गेल्यापर्यंत अनेक कारणे पाहिली गेली, सांगितली गेली. व्यक्तींकडून, व्यवस्थेकडून चुका घडतात त्या दुरुस्त करायला लागतात. सर्वस्वी बरोबर अन् सर्वस्वी चूक असे कुणीही नसतो. कदाचित झालेल्या चुकांचे अवलोकन केल्यावर न जाणो पुढे परिस्थिती बदलेलही. ती बदलेल तेव्हा बदलेल; पण सर्वसामान्य माणूस आताच बदल घडवण्याची संधी आहे, असे समजून घरातून मतदानासाठी बाहेर पडला आणि मतदान केंद्रात जाऊन त्याने बदलावर शिक्कामोर्तब केलं.

आधीचे सरकार पायउतार होऊन नव्या शिलेदारांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या. सत्तेतील परिवर्तन शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता घडू शकते, याचे प्रगल्भ उदाहरण म्हणजे भारतीय लोकशाही. याचे परत एकदा जगाला प्रत्यंतर आले. पण या निकालांनी आणखीही एक गोष्ट अधोरेखित केली; मातब्बरांनाही कधीतरी सत्तेचा सहवास विसरून विजनवास पत्करायला लागतो. नेता जोपर्यंत लोकांना सोबत नेत असतो, तोपर्यंत लोक त्याला सत्तेच्या सिंहासनावर अधिष्ठित म्हणून पाहतात. पण नेत्याची लोकांशी, लोकमनाशी जुळलेली नाळ कळत न कळत केलेल्या दुर्लक्षामुळे विखंडित होते, तेव्हा त्यांच्याकडील सत्ताही खंडित होते. सत्ता नेहमीच बदलत असल्याने फार काळासाठी एखाद्या हाती स्थिरचित्त राहू शकत नाही. नेत्यांची कार्यप्रणाली, धोरणांबाबत असणारी विसंगती, उदासीनता जाणवण्याइतपत होते, तेव्हा ती सत्ताधाऱ्यांना नेहमीच भोवत आली आहे. एखाद्या कृतीबाबत नेत्याकडून लोकनुनयाचे वर्तन घडत राहते. लोकानुनयात असणारी लोककल्याणची भूमिका विस्मरणात जाऊन धूसर होत असेल, तर त्यांची राजकीय कारकीर्दही त्या धुक्यात अदृश्य होत जाते. लोकांच्या भावनांना समजून घेत त्यांच्या कल्याणाची वार्ता करणारा दृश्य आकलनाच्या परिघासमोर राहतो. या निवडणुकांमध्ये घडून आलेले परिवर्तन लोकांच्या अपेक्षाभंगातून निर्माण झालेला दूरगामी आणि तात्कालिक परिणामांचा आविष्कार होता, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

बदललेल्या स्थिती परिस्थितीचे अवलोकन करताना लोकांना परिवर्तन हवेच होते, असे दिसते का? हे म्हणणे कदाचित घाईचे ठरेल. दुसऱ्याही बाजूने विचार करून पाहताना हेही जाणवते की, भारतीय लोकशाही प्रगल्भ होत चालली आहे. आघाड्या, युत्यांचे एकत्र कडबोळे घेऊन सरकारे आतापर्यंत गेल्या काही निवडणुकांपासून चालत राहिली. त्यांच्या चालण्यात मर्यादा होत्या. सरकार तर आहे; पण पूर्णतः निर्णय स्वातंत्र्य नाही. पुढे जाण्यासाठी उचलली चार पावले, तर दोन पावले मागे सरायची वेळ अपरिहार्यता बनून अनेकदा समोर येत राहिली. निर्णयातही हितसंबंध, महत्वाकांक्षांचा कोलदांडा येत राहिला. मनाविरुद्ध केलेल्या लग्नातून कसातरी चाललेल्या संसारांसारखी परिस्थिती समोर येत राहिली. सोडताही येत नाही आणि मोडताही येत नाही. तडजोड हीच अगतिक अपरिहार्यता ठरत राहिल्यास आणखी नवे काय घडणार होते. भरीसभर महागाई, कथित-अकथित घोटाळ्यांच्या, भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनी उरलासुरला विश्वास वेशीला टांगला. सुशासनाचे अभिवचन लोकांना पचनी पडलेच नसावे. की लोकांना सारेच कळत होते, काय घडतंय ते. पण आत्ताच आपण काहीच करू शकत नाहीत, म्हणून योग्य संधीची प्रतीक्षा करीत होते. आपल्या देशाच्या लोकशाहीत एक व्यापकपण जन्मदत्त आहे. व्यापक विचारांना सामोरे जाताना साहजिकच सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा परिघही व्यापक होत जातो. विस्तारत जातो. जनतेला ‘सर्वजन हिताय’ या विचारांनी कार्य करणाऱ्या पद्धती स्वीकार्ह वाटतात. सांप्रत घडून आलेला बदलही अशीच काळाची अनिवार्य व्यापक आवश्यकता होती का?

लोकांना आहे यापेक्षा आणखी काही चांगले हवंय, असंतर वाटत नव्हतं ना? की खरंच एवढे वाईट दिवस भारताच्या शासनप्रणालीला आले होते की, आणखी याहून चांगलेपणाच्या आवश्यकतेची प्रकर्षाने जाणीव व्हावी. ‘यथा राजा, तथा प्रजा’ असे म्हणतात. पण राजाच यथातथा वर्तत असेल, तर प्रजाही अथपासून इतिपर्यंत विचार करतेच करते. या परिवर्तनामागे सत्ता आणि सत्ताधिशांविषयी असलेला सुप्त रोष, सत्तावर्तनाचा लोकांना आलेला उबग, हेही आणखी काही कारणं असू शकतील. सामान्य लोकांपुढे निदान किमान गरजांची पूर्तता होऊन सुखाने जगता यावे या अपेक्षांचे स्वप्न होते. महागाईने आधी त्याचे कंबरडे मोडले. नंतर भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनी आकड्यांचे उच्चांक गाठले. कोटीकोटीची उड्डाणे पाहून लोकांच्या डोळ्यासमोर दिवसा तारे दिसू लागले. काहींचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. या साऱ्या पसाऱ्यात सरकारने केलेली चांगली कामेही झाकोळून गेली. उरले सुरले तर केलेलं चांगलं काही कामही लोकांपर्यंत वेळेवर पोहचलेच नाही. जे पोहचले ते सर्वसामान्यांना पचनी पडलेच नसावे.

जीवनयापनाचे प्रश्न गंभीर होतात, तेव्हा माणसं परिवर्तनाची शस्त्रे परजून संघर्षात सहभागी होतात. सर्वंकष सत्तांची संवेदनहीनता संभ्रम निर्माण करते, तेव्हा संवेदनशील मने सत्तांतराचा पर्याय स्वीकारतात. सर्वसामान्यांच्या अपेक्षा फार काही मोठ्या नसतात. गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा, उद्याचे चांगले दिवस, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला सन्मानजनक भाव, कामगारांना रोजगाराची शाश्वती, मध्यमवर्गीयांना नोकरीची शाश्वती, एक छोटेसे घर, मुलांचे शिक्षण नंतर त्यांची लग्ने. एवढे झाले तरी खूप वाटते. पदरी अपेक्षाभंगाचे दुःख येते, तेव्हा आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी परिवर्तनाचा प्रयोग करावा लागतो. समाज नावाचं अस्तित्व अशा लहान-लहान अपेक्षांनी घडत असते. अपेक्षापूर्ती करण्यापासून त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी कोसो दूर राहून सत्तेच्या पाशात बद्ध राहत असतील, तर आणखी काही घडायचे बाकी राहत असते का?

हाताला काम, कामाला दाम आणि दामाला सन्मान असेल, तर माणूस मिळाले आहे, तेच सुख समजून वर्ततो. सर्वसामान्यांना मूलभूतगरजांची पूर्ती व्हावी एवढीच माफक अपेक्षा असते. अपेक्षापूर्तीत येणारी व्यवधाने यक्षप्रश बनून समोर उभी राहत असतील, तर साहजिकच सत्तापरिवर्तनाचा विचार प्रबळ होतो. स्वातंत्र्य संपादनाच्या पासष्ट वर्षांनंतरही समाजकारण, राजकारण जात, धर्म, वंश, पंथाच्या कक्षेतच फिरत आहे. या साऱ्यां घटकांच्यापलीकडे ‘माणूस’ नावाचं अस्तित्व असतं तेथे ‘माणुसकी’ नावाचा प्रगल्भ विचार उभा असतो. या विचारला नैतिक अधिष्ठान लाभणे आवश्यक आहे. यासाठी प्रयत्न करायचे विसरून आपले परगणे तयार करून सांभाळण्यात, धन्यता मानण्यात शक्तीचा व्यय होणे, हा वर्तन विपर्यास आहे.

काही दिवसापूर्वी गावी गेलो होतो. गावाकडे लहान भाऊ शेती करतो. परिवारातील सदस्यांशी इकडचं तिकडचं कौटुंबिक बोलणं झाल्यावर घरात सुरु असलेल्या टीव्हीवरील बातम्यांकडे थोडं लक्ष गेले. ऐकू लागलो. निवडणूक निकालांचे विश्लेषण सुरु होते. निवेदक, निवेदिका संबंधित विषयाच्या तज्ज्ञांच्या सोबत पायउतार होणाऱ्या आणि पदासीन होणाऱ्या सरकारांच्या यशापयश, उपलब्धी, ध्येयधोरणांबाबत काहीसे विवेचन करीत होते. मी ते ऐकतोय. टीव्हीकडे पाहत भाऊ म्हणाला, “सरकार बदललं; पण आम्हा शेतकऱ्यांचे नशीब कधी बदलेल कुणास ठाऊक?” त्याच्या बोलण्याचा हेतू लक्षात घेऊन आतापर्यंतच्या सरकारांनी कार्यान्वित केलेली शेतीबाबतची धोरणे, योजनांविषयी माहीत असलेली माहिती सांगू लागलो. शेती कसण्याचे, शेती करण्याचे कालचे आणि आजचे तंत्र, बदललेली पद्धती याविषयी सांगत होतो. तो शांतपणे ऐकत होता. माझं बोलणं थांबल्यावर मला म्हणाला, “भरल्यापोटी माणसाला शहाणपण सहज सूचतं, नाही का? तुमचं बरं आहे; दर पाचसहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढून मिळतो, तरीही तुम्ही महागाईच्या नावाने गळे काढतात. आमच्या शेतमालाला थोडा अधिक भाव मिळाला ठीक आहे. पण मातीमोल भावाने वस्तू विकतो, तेव्हा कोणीच कसे काही म्हणत नाही. आम्हां शेतकऱ्यांचे जगण्या-मरण्याचे प्रश्न काय प्रश्न नाहीत? तुम्ही नोकरी मिळाली की, सातआठ वर्षात कुठल्याकुठे पोहचतात. पण आम्ही... काल तुम्ही आम्हाला सोडून गेलात; तेथेच अजूनही सरपटतो आहोत. शेती, शेतीविषयक धोरणे बदलली असतील, तर शेतकऱ्यांची पोरे शेती सोडून शहरांकडे का पळत आहेत? परिस्थितीसमोर हताश होऊन शेतकरी आपली जीवनयात्रा का संपवत आहेत? सरकार कोणाचेही असू द्या, त्याने आम्हांला असा काय फार फरक पडणार आहे? कोणीही निवडून आला तर येऊ द्या, सरकार कोणाचेही असू द्या; मात्र ते आमच्यासारख्या सामान्य माणसांचे, गरिबांचे असू द्या. एवढं झालं तरी खूप आहे.”

मनातील सात्विक संताप तो व्यक्त करीत होता. या परिस्थितीचे कारण काय, याचा त्याच्या परीने शोध घेऊ पाहत होता. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मनात मुद्दे आठवून जुळवाजुळव करीत राहिलो; पण ते किती समर्थनीय असतील आणि असले तरी याला पटतीलच याची खात्री काय, या शंकेने याबाबत पुढे बोललोच नाही. तरीही मनातून वाटतच राहिले की, त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. शेतकरी, मजूर, कामकरी, भटके, विमुक्त, उपेक्षित, वंचित साऱ्याच सामान्य माणसांची अशीच अपेक्षा, व्यथा असेल का? माहीत नाही, पण असावी असे वाटते. सामान्यांच्या मनातली किमान अपेक्षाही पूर्ण होत नसेल, धोरणांविषयी, अंमलबजावणीविषयीची संदिग्धता वारंवार प्रत्ययास येत असेल, तर आणखी दुसरे काय घडावे? सरकारे आली आणि गेली, तरी आम्ही आहोत त्याच वर्तुळात आणि तेथेच का? या प्रश्नाचं उत्तर आम्ही अद्याप शोधलंच नाही. शेतीविकासाच्या वाटा चारदोन फार्महाउसवर जाऊन विसावल्या असतील, तर यालाच शेतकऱ्यांचा विकास समजावं का? लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणताना अर्थव्यवस्थेतील शेतीच्या योगदानाचं महत्त्व मान्य करायचं. पण तिचं उध्वस्त होत जाणे, याच डोळ्यांनी हताशपणे पहायचं का?

काहींनी सर्वत्र असायचं आणि काहींनी कुठेच नसायचं का? विकास सार्वत्रिक असावा. सर्व समावेशक असावा. देशाच्या सव्वाशे कोटी लोकंसाठी असावा. अच्छे दिन यायचेच असतील तर साऱ्यांसाठीच यावेत. काहीजण तुपाशी अन् काही उपाशी, म्हणजे निरामय लोकतंत्राचे लक्षण नाही. व्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्यांनाही आमच्यासाठी काय? या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थेकडून मिळावे. या प्रश्नाचं उत्तर ‘विकास’ असं असावं. शासन, प्रशासनाची उक्ती, कृती, धोरणे विकासाभिमुख करताना त्यांना सामान्य माणसाचा चेहरा असावा. नुसता विकासाचा मुखवटा नसावा. सरकार कोणत्याही पक्षाचे का असेना. त्याने काय फरक पडतो. प्रत्येकाचं स्वतंत्र आणि सामूहिक स्वप्न संपन्न भारत हेच असावं. घडेल हे सारे? हो शक्य आहे. देजेव्हा शातील नागरिकांच्या डोळ्यात एकच स्वप्न असेल. उज्ज्वल वारसा असणारा भारत. जगाचे नेतृत्त्व करणारा भारत. असा भारत घडविण्यासाठी कोणताही त्याग, समर्पण करण्याची तयारी. पक्ष, सत्ता, सरकार कोणते आहे, हे प्रश्न अशावेळी थोडे गौण ठरतात. असा विकसित भारत घडेल तेव्हा साऱ्यांसाठीच अच्छे दिन असतील, नाही का?

Sampark | संपर्क

By // No comments:
एक-दीड महिन्यापासून सुरु असलेली निवडणुकांची धामधूम बारा तारखेला शेवटची फेरी होऊन एकदाची थांबली. अनेक दिग्गजांचे भवितव्य इव्हीएमच्या कंट्रोल युनिटच्या पेटाऱ्यांमध्ये झाले बंदिस्त एकदाचे. पण त्या आधी एक्झिट पोलचे अंदाजांचे आकडे टीव्हीच्या पडद्यावर खेळू लागले आहेत. सोळा तारखेला कळेल सत्ता कोणाच्या गळ्यात माळ घालते ते. तोपर्यंत आकड्यांचे खेळ राहतील सुरु. होत राहतील त्यावर भाष्य. काही मानतील अंदाजाचे आकडे खरे. काही पेटाऱ्यात काय आहे, याची प्रतीक्षा करतील. गेल्या काही दिवसापासून फक्त आणि फक्त निवडणूक विषयाभोवती देश पिंगा घालत आहे. मीडियानेही निवडणूक विषय केंद्रस्थानी ठेऊन वार्तांकने केली. सामान्य माणसापासून असामान्य माणसापर्यंत साऱ्यांचेच लक्ष निवडणुकांकडे केंद्रित झाले होते. देशातील, देशाबाहेरील सगळ्यांचीच नजर तिकडे वळलेली अन् वेध निवडणूक निकालांचे. पण सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न; सरकार कोणतेही येवो, आमच्यासाठी त्याची धोरणे काय असतील? त्याने आमचे जगणे सुसह्य होणार आहे का?

प्रचाराची चरमसीमा गाठलेली. शो, रोड शो, सभा वगैरेंनी सारे वातावरण दणाणून गेलेले. प्रचारकी थाटापासून तर प्रचार सभेतील थाटामाटापर्यंत आणि गाव-वस्तीच्या वाटा आडवाटापासून वळणवाटांपर्यंत चाललेली धावपळ. लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक रस्ते शोधले गेले. त्यांचा कल्पकतेने वापर केला. स्वनातीत गतीचे वरदान लाभलेल्या सोशलमीडियाचा प्रचाराचे माध्यम म्हणून प्रचंड वापर झाला. दुसरीकडे दहापंधरा कोटी नवमतदारांच्या मतांना आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांच्या मनीमानसी विलसत राहणाऱ्या तंत्राचा वापर करून आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, हे मनांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. आपापले परगणे तयार करून संपर्क वाढवीत ठेवण्याचा प्रयत्न होत राहिला.

लोकशाही शासनप्रणालीत निवडणुकांमधील प्रचार अनिवार्यता असतो. सांप्रतकाळी त्याचा थाट आणि घाट सगळंच बदलेले आहे. विज्ञानतंत्रज्ञानाच्या साह्याने त्याचं अवघं रूपच पालटलेले आहे. देशात याआधीही निवडणुका झाल्या आहेत. त्यांचा प्रचारही झाला आहे. प्रचाराला आज व्यापक रूप मिळालं आहे. त्यापाठीमागे विज्ञानाच्या किमयेतून निर्मित वाटांचे योगदान मोठे आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सिंग, थ्रीडी सभांनी विज्ञानप्रणीत जगाचं सामर्थ्य केवढं मोठं आहे याची प्रचीती जवळजवळ साऱ्यांनाच ‘याचि देहा याचि डोळा’ दिली. माणसाने कुतूहल, जिज्ञासाबुद्धीतून इहलोकीचा प्रवास सुखावह करण्यासाठी ज्ञानतंत्रज्ञानाची निर्मिती करून प्रत्यक्ष देवालाही क्षणभर विस्मयचकित करणारे शोध लावले. शोधनिर्मित साधनांनी जग पूर्वीपेक्षा सहज, सुगम, सुसह्य केलं आहे. हे संपर्कसाधन निवडणुकीत प्रचार, प्रसार करणाऱ्यांसाठी सोबत करीत राहिले.

संपर्कासाठी फार काळ प्रतीक्षा करण्याचा काळ कधीच इतिहास जमा झाला आहे. पूर्वी एक साधा निरोप पाठवायचा असला तरी वाट पाहण्याशिवाय माणसाच्या हाती काहीच नसायचे. दूरवर निरोप पाठविणे एक दिव्य वाटायचे. आज जगाच्या कोणत्याही टोकाशी क्षणात संपर्क होतो आहे. संपर्कसाधनांनी विश्वातील प्रदेशांचे हजारो किलोमीटरचे अंतर काही सेकंदावर आणले आहे. सारं जग हातात सामावण्याएवढं लहान झालं आहे. संपर्कक्रांतीने विश्व जवळ आले. पण माणसं जवळ आली आहेत का? आपल्या गोतावळ्यासाठी, त्यांच्या भेटीगाठीसाठी वाट पाहणारे, त्यांच्या येण्याचा सांगावा आला असेल, तर त्याच्या रस्त्याकडे घरातील साऱ्यांचे डोळे लागलेले असायचे. आज यातील काही शिल्लक असेल, नसेल; पण माणसांच्या अंतर्यामी वसणाऱ्या भावनांचा पदर तसाच आहे. तो ओलावा अजूनही टिकून आहे.

निवडणुकांनी बहुतांची अंतरे कमी करीत बहुतेकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. कधी नव्हे इतका मतदानाचा टक्का वाढविला. सामान्य माणसांना आपल्या असामान्य मतांचं मोल प्रकर्षाने जाणवले. त्यांची पावले मतदानकेंद्राकडे वळली. मतांच्या वाढलेल्या टक्केवारीची आणखीही काही कारणं असतील. पण निवडणूक आयोगापासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत साऱ्यांनीच मतांचं मोल अनमोल असल्याचं अधोरेखित करून मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन केलं. मीडियाने मतांचं महत्त्व पटवून देताना जनसागराला एकत्र करण्याचं काम केलं. तरुणाईला आपल्या पहिल्यावहिल्या मतदानाची नवलाई जाणवायला लागली. प्रचार, प्रसार माध्यमांनी आपलं एक मत देशात परिवर्तन घडवू शकते, भविष्य आकारू शकते, म्हणून महत्त्व पटवून दिले. कधी काळी ५०-५५ टक्क्यांपेक्षा जास्त न होणारे मतदान ७०-८० टक्क्यांचे गड सर करू लागले. ही बाब लोकशाहीच्यादृष्टीने नक्कीच आनंदपर्यवसायी आहे. यामागे सातत्याने होणारा प्रचार आणि प्रसार हे एक महत्त्वाचे कारण आहे.

आम्ही लहान असतानाचा काळ आठवतोय. तेव्हा निवडणूक प्रचारासाठी गाव, वाड्या, वस्त्यांवर ‘ताई माई, अक्का...’ करीत रस्त्यावरील धूळ उडवीत कोणत्यातरी पक्षाच्या प्रचारासाठी गाड्या यायच्या. स्पीकरचा आवाज साऱ्या गावभर फिरत राहायचा. गाड्यांमागे पोरांचं लाटांबर गाडी गावाबाहेर जायीपर्यंत फिरत राहायचे. प्रचाराची पत्रके, मिळालेले एखाद-दोन झेंडे दिवसभर मुलांच्या हातात फडकत रहायचे. पक्षाचे चिन्ह असलेला बिल्ला घेण्यासाठी मुलांची किती धडपड चालायची. ज्याला मिळाला तो स्वतःला काहीतरी वेगळा समजायचा. आपल्या फाटक्या सदऱ्यावर लावून दिवसभर मिरवत राहायचा. साऱ्यांना अभिमानाने दाखवायचा. जणू काही अनमोल ठेवा फक्त आपल्याच हाती लागला आहे अशा अविर्भावात. पक्ष, पक्षाचा उमेदवार, मत, मतदान यांच्याशी त्याला काही देणं घेणं नसायचं. चिन्हाचा बिल्ला मिळाला की मोठी लढाई जिंकल्याच्या अविर्भावात गावभर फिरत राहायचा. बऱ्याचदा वेगवेगळ्या पक्षांचे बिल्ले एकाच सदऱ्यावर एकाचवेळी विराजमान झालेले असायचे. दोन-तीन वेगवेगळे बिल्ले सदऱ्यावर लागले असतील त्याची छाती अभिमानाने वगैरे फुलून यायची. खरंतर त्या वयात निवडणूक काय असते, हेही माहीत नसायचे. तर पक्ष, पक्षाचा उमेदवार, मतदान यांचा विचार करतोय कोण. आज वाटते केवढी ही निरागसता. एकाचवेळी सर्व पक्षांना आपल्या अंगावरील फाटक्या सदऱ्यावर मिरवणारी पोरं. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता नव्हती का?

आजमात्र परिस्थिती पालटली आहे. प्रचाराच्या मर्यादांचे कधीही उल्लंघन न करणारा तो काळ. प्रचारात मर्यादा ओलांडल्या गेल्या तरी फारसे कळण्याचा तो काळ नव्हताच. कारण आजच्यासारखी चोवीस तास वार्ता सांगणारी चॅनल्स नव्हती. आज आरोप, प्रत्यारोप, वाद, वितंडवाद, बेताल विधाने यांनी शिष्टसंमत संकेतांचे, मर्यादांचे सीमोल्लंघन होत चालले आहे. प्रचार करताना प्रतिस्पर्ध्यावर मनाला वेदना देणाऱ्या शब्दांचा प्रयोग न करण्याचा काळ इतिहासजमा होत चालला आहे. एकीकडे प्रगतीचे शिखरे संपादित करीत आहोत. देशाच्या इतिहास, भूगोलाला गौरवान्वित करण्याचा हा काळ असावा. वारसा जतन करण्याची, त्याला संपन्न करण्याची वार्ता करणारा असावा. पण एकमेकांची उणीदुणी काढण्याची वेळ का यावी?

देशाच्या संस्कृतीचा उन्नत वारसा सांगण्यासारखा असूनही; तो न सांगता वैयक्तिक टीका का व्हाव्यात? की अमाचाकडे सांगण्यासारखे काहीच मुद्दे शिल्लक राहिले नाहीत. आम्ही संयम विसरत चाललो आहोत का? ज्या देशाला संस्कारांचा संपन्न वारसा आहे. त्या देशात मूल्यांचा प्रवास प्रचंड वेगाने अवनतीकडे होत आहे काय? ही घसरण देशाचं भाग्य परिवर्तन करणारी खचितच नाही. सत्ता, संपत्ती फारकाळ एकाठायी वास्तव्य करीत नसते, असे म्हणतात. त्यांना चंचलतेचा शाप असतो. त्यात परिवर्तन होणं नियतीचा खेळ असेल, तर या खेळाचे नियम समजून तेवढ्याच खिलाडूवृत्तीने तो आम्ही का खेळत नाहीत? काळ बदलतो तशा अपेक्षाही बदलतात. मूल्यही काळसुसंगत गरज म्हणून बदलावे लागतात. त्या बदलांमध्ये विकार नसतात. विकास असतो. हा विकासपथ सांप्रतकाळी आम्हाला दिसत नसावा का?

यावर्षाच्या निवडणुकांच्या प्रचारतंत्राने उबग आणल्याचे बरेच जण म्हणतात. अर्थात हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक अनुभव. प्रचाराचा उबग आलेले माझे एक स्नेही म्हणाले, “सर, या निवडणुकांमध्ये प्रचाराचं जरा अतीच होतंय नाही का? टीव्ही लावा तेच. वर्तमानपत्र उघडा तेथेही तेच. चर्चा ऐका तेव्हाही तेच. सोशल मीडिया पाहा तेथेही तसेच. शेतात काम करताना विषय निवडणुका, गावात पारावर गप्पा करीत बसलेल्यांच्या चर्चेतही निवडणुकाच. अहो, देशात दुसरे आणखी काही प्रश्न, दुसऱ्या काही समस्या नाहीतच का? की संपल्या साऱ्या एकदाच?” त्यांचं बोलणं ऐकून शांतपणे त्यांना म्हणालो, “तुमचं म्हणणं ठीक आहे. लोकशाहीत लोक निवडणुकांव्यतिरिक्त आणखी कोणत्या चर्चा करतील? देशाने लोकांच्या तंत्राने चालणारी शासनप्रणाली स्वीकारली असेल, तर लोकांपर्यंत पोहचावेच लागेल ना! आणि प्रचाराचं म्हणाल, तर तो कधी नसतो. कालही होता, आजही आहे. फक्त प्रचाराचे रूप पालटले आहे. पूर्वी भिंती रंगवल्या जायच्या, आज सोशल मीडियाच्या भिंती रंगवल्या जात आहेत, ऐवढेच. तेव्हा आपल्याकडे टीव्ही तरी होता का? काही धनिकांकडे, शहरवासियांकडे असलातरी त्यावरील चॅनल्स संख्या किती होती? अहो, काळ बदलला तसं आपणही बदलायला नको का?”

माझं म्हणणं त्यांना समर्थनीय वाटले नसावे. ते पुन्हा म्हणाले, “पण प्रचारात असे एकमेकाचे गळे नव्हते धरले जात. असा चिखल नव्हते उडवत एकमेकावर.” तुमचं म्हणणं एकदम मान्य, आज असे होतही असेल कुठे, पण सगळंच वाईट घडतंय असं कुठं आहे. तेव्हाही असं घडलं नसेल, असं नाही. संपर्क माध्यमे वेगवान नसल्याने कदाचित तेव्हा आपणास कळले नसेल. आज माध्यमे प्रचंड वेगवान असल्याने घटना तात्काळ कळतात इतकंच.” माझ्या बोलण्याने त्यांचं समाधान झालं नसावं. म्हणाले,” “घटना घडतातच ना! हे घडू नये म्हणून काही करता येणार नाही का? थोडासा संयमाचा बांध आपण घालू नये का?” असंच बरंच काही-काही बोलत राहिले. अजूनही सांगत राहिले असते असंच काहीतरी. पण माझाच संयम ढळत चालला होता. माझा स्वभाव फारकाळ एकाच विषयात गुंतून त्याची टरफले सोलीत राहावा, त्याचा भुसा काढीत राहावा असा नसल्याने तो तेवढ्यावर संपवून त्यांचा निरोप घेतला. माझ्या कामाकडे वळता झालो. पण न कळत मनात त्यांचा तोच प्रश्न शंका म्हणून उभा राहिला. खरंच आम्ही समाजसंमत सभ्येतेच्या मर्यादांच उल्लंघन तर करीत नाही ना? 

Result | रिझल्ट

By // 4 comments:
संपलं एकदाचं शाळेचं शैक्षणिक वर्ष. वर्षभराच्या प्रगतीचे कागद प्रगतिपुस्तक, प्रगतिपत्रक अशी गोंडस नावं धारण करून शिकणाऱ्या मुलामुलींच्या हाती पडले. मास्तरांनी ठरवून दिलेल्या मोजपट्ट्या वापरून मुलांच्या वर्षभराच्या शैक्षणिक प्रगतीची मोजमापे केली. दिलेल्या मापात काही फिट्ट बसली. काहींची जोडपट्ट्या वापरून उंची वाढवावी लागली. त्या उंचीसह मुलांची प्रतवारी ठरली. कोण हुशार, कोणी साधारण, कोणी अप्रगत इत्यादी इत्यादी. आपापले परगणे घेऊन त्यांची शैक्षणिक प्रगती प्रगतिपत्रकात बंदिस्त झाली. हे प्रगतीबंद पेटारे उघडण्याचा दिवस साऱ्या शाळांमध्ये निकालाचा दिवस म्हणून ‘नेमेचि येतो पावसाळा’ तसा येत राहतो, प्रत्येक वर्षी. ठरलेल्या वेळी न चुकता. येताना एक अनामिक हुरहूर सोबत घेऊन येत असतो. आता मात्र ती हुरहूर हरवत चालली आहे. परीक्षेच्या निकालाचा दिवस केवळ उपचारापुरता उरला आहे. ना त्याची कोणाला फारशी उत्सुकता. ना कुतूहल. आठवीपर्यंत मी पास होणारच (?) म्हणून सारे कसे निर्धास्त. पुढच्या वर्गातला प्रवेश ठरलेला असल्याने प्रत्येकजण आपापल्या सवडीने शाळेत येतो. निकाल घेतो आणि पळतो. थोड्याफार फरकाने शाळाशाळांमध्ये दिसणारे हे दृश्य सगळीकडे सारखेच आहे.

निकालाचा दिवस म्हणण्यापेक्षा, शालेय शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस म्हणूया. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल द्यायचा असल्याने पाचवी ते आठवीचे सगळे वर्गशिक्षक आपापल्या वर्गांचे प्रगतिपत्रके इत्यादी साहित्य घेऊन वितरणासाठी शाळेत तयार. शाळेची बेल झाली. राष्ट्रगीतासाठी सारे शाळेच्या चौकात एकत्र उभे. बेल होऊन दोनतीन मिनिटे झाली. शाळेतील अडीच-तीन हजार विद्यार्थ्यामधून फक्त शेदोनशे डोकीच तेवढी रांगेत उभी. राष्ट्रगीत झाले. निकाल वाटपासाठी सूचना दिल्यानुसार विद्यार्थी नेमून दिलेल्या वर्गखोल्यांकडे वळले. वर्गशिक्षक नसणारे काही शिक्षक शाळेच्या चौकात उभे होतो. निकाल वाटपाच्या आजच्या दिवसाचे दृश्य पाहून आमच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर, पाचसहा वर्षापूर्वीचे शाळेचा निकाल वाटपाचे आणि आत्ताचे चित्र पाहून तुम्हाला काही फरक जाणवतो का?” त्यांच्या बोलण्याचा रोख लक्षात न आल्याने प्रश्नांकित चेहरे त्यांच्याकडे नुसतेच पाहत राहिले. आमच्या चेहऱ्यावरील पालटणारे भाव त्यांना समजले. म्हणाले, “पाचसहा वर्षापूर्वीचा परीक्षेच्या निकालाचा दिवस आठवा. दिलेल्या वेळेच्या आधीच मुलं, मुलांचे पालक शाळेत उपस्थित. बेल व्हायचा अवकाश दीडदोन हजारांचा लोंढा वेगाने आत शिरायचा. त्यांना आवरताना नाकीनऊ यायचं. आज- ना कोणाला निकालाची उत्सुकता. ना कोणाला हुरहूर.”

एक शिक्षक बोलते झाले. म्हणाले, “अहो, पास आणि नापास या द्वंद्वाची आता काळजी उरलीच आहे कोठे? जर सगळेच पास होणार असतील आणि पुढच्या वर्गात प्रवेश होणारच असेल, तर येथे या. रांगा लावा. निकाल घ्या. हे सगळे करायला वेळ आहेच कुठे पालकांना हल्ली एवढा.” त्यांना थांबवत दुसरे शिक्षक म्हणाले, “सर, तुमचं काहीतरी चुकतंय! पास नापास नाही कसं! सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने मुलं नापास होत नाहीत, असं कुठंय? जर पोरगं काहीच अभ्यास करणार नसेल तर त्याचा मुक्काम ठरलेलाच.” “ठीक आहे सर, मुक्काम होऊ शकतो. पण असे मुक्काम घडतातच किती? नापास केलेच कोणाला तर त्याच्या अभ्यासाचे पुनर्भरण करूनच पुढच्या वर्गाला पाठवावे लागेल. पर्यायाने त्याच्यासाठी संबंधित शिक्षकाला आपला अधिकचा वेळ देवून हे सोपस्कार पार पडावे लागतील. आहे एवढे सारे सव्यापसव्य करायची तयारी? त्यापेक्षा द्या धक्का. पाठवा वरच्या वर्गात, हे सोप्पं नाही का? पहिले शिक्षक म्हणाले.

संवादात सामील होत आणखी एक शिक्षक आपला अनुभव कथन करीत उपहासाने म्हणाले, “सर, दे धक्का तंत्र खरंच महान कार्य आहे हो, आपल्या शिक्षक पेशाचे! काय सर्जनशीलता असते बघा आपल्या एकेकाकडे. अहो, पोरगं पहिलीपासून ढकलत ढकलत थेट नववीत. येथे पोहचल्यावर कळते त्याच्या प्रगतीची गती आणि अधोगतीही. माझ्याच वर्गातील अनुभव सांगतो, माझा मराठीचा तास. म्हटलं आपण काय शिकवलं, मुलं काय शिकली, हे पाहावं जरा. लागलो शिकविलेल्या घटकावर प्रश्न विचारायला. एकेक करीत शक्य होईल तेवढ्यांना प्रश्न विचारीत गेलो. जमलं त्यांनी दिली उत्तरे आपापल्यापरीने. एका विद्यार्थिनीला केलं उभं. उत्तर देण्यासाठी ती काही उभी राहीना. तिला परत सारं समजावून सांगितलं. म्हणालो, सांग बरं आता, या प्रश्नाचं उत्तर. तिच्याकडून उत्तराबाबत काहीच प्रतिसाद नाही. शेवटी थोडा रागावून म्हणालो, नाहीना येत उत्तर! असं कर, हा धडा आहे. वाच मोठ्याने. नाईलाजाने का होईना, काहीतरी वाचण्याशिवाय पर्याय नसल्याने ती पुस्तकातील पाठ वाचू लागली. तिने केलेले वाचन ऐकून बेशुध्द व्हायची वेळ आता माझी होती. स्वतःला थोडं सावरलं विचारलं, बाबा काय करतात ताई तुझे? म्हणाली, शिक्षक आहेत. आता मात्र, माझा घसा कोरडा पडायला लागला. काय हे? काय म्हणावं याला? सर्वशिक्षा अभियानाचे सार्वत्रिक यश की आपल्या व्यवस्थेतील शैक्षणिकप्रगतीचे यश? ही मुलगी या टप्प्यापर्यंत पोहोचली कशी? याचंच आश्चर्य वाटतं. शिक्षकपाल्याची ही स्थिती आणि तीही या वळणावर. तर इतरांचं काय असेल? खरंतर तिला येथपर्यंत आणणारी व्यवस्था महान वगैरेच म्हटली पाहिजे.”

आमच्यातील आणखी एक शिक्षक आपला राग व्यक्त करीत म्हणाले, “सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धत चांगली की, वाईट हा वादाचा मुद्दा जरा बाजूला ठेवू या! शिक्षणव्यवस्थेत प्रयोगशीलता आवश्यक असते, ही गोष्ट एकदम मान्य! प्रयोगच केले नाहीत तर काळाच्या नव्या प्रश्नांशी आपण भिडणार कसे? प्रयोगशीलता मान्य. पण प्रयोग करून जगाला निष्कर्ष देणारे आईनस्टाईन आपल्या प्रयोगशाळांमध्ये आहेत किती? असले तरी बोटावर मोजण्याएवढे. प्रयोग करावे लागतात. निरीक्षणे करून निर्णय घ्यावे लागतात. चुकलो तर पुन्हा दुसरा प्रयोग हाती घ्यावा लागतो. अनुमान बांधावे लागतात. आम्ही मात्र हे प्रयोग कागदावर शक्य करून दाखवितो. पर्यायाने कागदी गुणवत्तेचे घोडे थयथय नाचते. त्याचा पदन्यास पाहण्यात आम्ही हरकून जातो. पण त्याच्या पावलांनी उडणाऱ्या धुळीकडे आमचे साफ दुर्लक्ष. असं का घडावं? आपण याची काळजी का करीत नाहीत?”

“आस्था असते ना, तेथे आपलेपण असते. असं आपलंपण आपल्यात आणि समाजातही आज कितीसं उरलंय? आपल्या वेळेचा शाळेचा काळ आठवून पाहा तेव्हाचे शाळामास्तर. त्यांची सेवापरायणता. समाजाकडून मिळणारा मान. मास्तर फक्त वर्गापुरता नसायचा. सगळ्या गावाचा असायचा. गावातील सुख, दुःखाचा सोबती असायचा. साक्षीदार असायचा. बनगरवाडी कादंबरीतील राजाराम मास्तरासारखा मास्तर आपल्या वाड्यावस्त्यांमध्ये दिसतो का? ‘रातवा’मधील नलगे मास्तर दूर दुर्गम भागातील शाळेशीच नाही, तर गावाशीही एकरूप होतो. तेथून बदली झाली म्हणून व्यथित होतो. आज असा मास्तर आपल्या भोवती दिसतो तरी का? मोक्याच्या जागी बदली नाही, म्हणून जीवाचं रान करण्याचा हा काळ. आडवळणी भाग म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा मानण्याची मानसिकता. तेथे बदली नको म्हणून काहीही करायचं बाकी न ठेवणारी आम्ही माणसं. एवढंच कशाला, आपणच आपल्याला बघाना! आपण कोणत्या वर्तुळात उभे आहोत? वैयक्तिक प्रयोजनासाठी कोणत्यातरी दावणीला बांधलेले. बांधले गेल्यावर आपल्याला स्वातंत्र्य तरी कितीसे असणार आहे? शाळेत असताना आपणास शिकवणारे गुरुजी आजही आठवतात. आज आपण गुरुजी आहोत. मुलं आपणास किती काळ आठवत राहतील? यंत्रयुगानं सारं जगणंच यांत्रिक केलं आहे. व्यवसायाची नाळ जुळली, पण नात्यांचे पीळ सुटत चालले आहेत.”-आमच्यातील आणखी एक शिक्षक.

“खरंय सर तुमचं म्हणणं, काळ बदलला तशी काळाची परिमाणंही बदलली आहेत. आजूबाजूला परिस्थितीच अशी तयार होत गेलीय. मला काय त्याचं, हे वाटणं स्वाभाविक होत चाललयं. सगळ्यांच्या अपेक्षाच बदलल्या आहेत. अंगभूत गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा, ठरवण्याचा काळ मागे पडला आहे. प्रगतिपत्रकातील गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा हा काळ. प्रगतिपत्रकातील गुणांपेक्षा जीवनाची गुणवत्ता मोठी असते, हे समजण्याचा काळ कधीच मागे राहिला आहे. शर्यतीत आपलं घोडं जोतो पुढे दामटतोय. मग आणखी दुसरं होणार तरी काय आहे?” दुसरे शिक्षक म्हणाले. बराच वेळ आमचं बोलणं सुरु होतं. परिस्थितीवश शरणता, परिवर्तन, अपेक्षा, हताशा, निराशा आदी भावनांच्या हिंदोळ्यावर विचार झोके घेत होते.

निकाल घेण्यासाठी आलेली मुलामुली प्रगतिपत्रक हाती घेऊन वर्गाबाहेर पडत होते. सहावी,सातवीच्या वर्गातील काही मुलं शाळेच्या चौकात येऊन एकमेकाशी बोलत थांबली. प्रगतिपत्रक पाहून एकमेकांना विचारत होते; अ१, ब२, क१ म्हणजे नक्की किती गुण आपल्याला मिळाले असतील. त्यांचं मिळविलेल्या गुणांविषयी बोलणं आमच्या कानी आले. आम्ही बोलणं थांबवलं. त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्याचं आमच्याकडे लक्ष नसावं. त्यातील एक पोरगं दुसऱ्याला म्हणालं, “अरे, कितीका असेनात? आपण पास झालो ना, पुरे!” दुसरा मुलगा त्यांना म्हणाला, “अरे, मला हा पेपर थोडा कठीण गेला होता. त्या विषयात नक्की किती गुण मिळाले असतील रे? जर गुण समजले असते तर...” त्याचं आपापसात बोलणं सुरु होतं. काही प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी होती. ती मिळण्याचे मार्ग माहीत करून घ्यायचे होते. त्यांच्या मनात उदित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या शिक्षणव्यवस्थेत मिळतील की, नाही माहीत नाही.

आमच्यातील एका शिक्षकाने त्यांना आवाज देऊन जवळ बोलाविलेही शिक्षकांनी त्यांच्याशी बोलणं सुरु केलं. आस्थेने विचारपूस केली. प्रगतिपत्रक पाहून अभिनंदन केले. मुलांचे चेहरे खुलले. हातातील प्रगतिपत्रक सावरत पोरं वाकली. एकेका शिक्षकांच्या पायांना स्पर्श करीत आपल्या अंतर्यामीचा कृतज्ञभाव व्यक्त करीत उभी राहिली. त्यांना म्हणालो, “तुमच्या हाती असणाऱ्या प्रगतिपत्रकातील गुण महत्त्वाचे आहेतच. ते किती असावेत, हे तुम्हालाच ठरवायचं आहे; पण जीवनाच्या प्रगतिपत्रकात असणारी श्रेणी आणि गुण त्याहून महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला निदान आत्तापुरते तरी खूप मिळाले आहेत.” पोरांना माझं बोलणं समजलं की नाही, माहीत नाही. घरी जाऊन आईबाबांना आपला निकाल सांगायचा होता. तशी घाई त्यांच्या हालचालीवरून दिसत होती. आम्ही घरी जातो म्हणून पोरं निघाली. प्रसन्न चेहऱ्यासह त्यांची पावले शाळेच्या चौकातून क्रीडांगणाकडे आणि क्रीडांगणाकडून रस्त्याकडे आनंदाने पळाली. पळणाऱ्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे आम्ही कौतुकाने पाहत राहिलो.

Nibandh | निबंध

By // No comments:
स्थळ: शाळेचे शिक्षकदालन. वेळ: सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान कोणतीतरी. शाळेतील पाचवी ते नववीच्या वर्गांच्या वार्षिक परीक्षा सुरु आहेत. काही शिक्षक शिक्षकदालनात थोडे निवांत बसलेले. शाळेचा शिपाई सूचनापत्र हाती घेऊन आला. सूचनापत्रातील विषय निबंध लेखनासंबंधी होता. संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकांसाठी निबंधलेखन स्पर्धा शाळेत दरवर्षी आयोजित केली जाते. लिहून देण्यासाठी अंतिम मुदत दिलेली. निबंध सर्वांना लिहिणे अनिवार्य. कोणत्याही कारणाने सवलत नसल्याबाबत स्पष्टीकरण दिलेले. सूचनापत्र वाचून शिक्षकांनी त्यावर स्वाक्षरी केली. शिपाई दुसऱ्या खोलीकडे वळला. क्षणभर स्तब्धता. शांततेला छेद देत एक शिक्षक म्हणाले, “सर, निबंधाचा विषय अवघड वाटतो काहो?” त्यांचं बोलणं ऐकून दुसरे एक शिक्षक आपल्या मनातील सात्विक संताप व्यक्त करीत म्हणाले, “सर, निबंध लेखनासाठी थोडा तरी सोपा विषय नव्हता का सूचवता येत तुम्हाला?” “सर, तुमचं काहीतरी चुकतंय. अहो, विषय सूचवणारा मी कोण? मी सूचवलेला नाही. मुख्याध्यापकांकडून माझ्या समोर आलेली विषयाशी संबंधित संकल्पना फक्त शब्दांत लेखांकित केली आहे, एवढंच.” मी म्हणालो.

आणखीही पुढे काही बोलणार होतो; पण माझं बोलणं मध्येच थांबवत एक शिक्षक म्हणाले,  “सर, विषय कठीण की, सोपा ते जाऊ द्या. आधी मला हे सांगा, ‘शिक्षण’ संकल्पना तरी आपण स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षात नीट समजून घेतली आहे का? संकल्पनाच आम्हाला नीट समजली नसेल, तर पाश्चात्त्य शिक्षणपद्धती आपल्यासाठी खूप दूरचा विषय नाही का?” विषयाची वर्तुळांकित चर्चा झोकदार वळणे घेत हळूहळू पुढे सरकायला लागली. चर्चेत सहभागी होत एक शिक्षक म्हणाले, “शिक्षणाची गंगाच प्रदूषित झाली आहे, त्यावर उपाय शोधता शोधता नाकीनऊ येते आहे. तर सुधारणा, परिवर्तन, ही खूप लांबची गोष्ट झाली. आणि परिवर्तन केव्हा होते, जेव्हा परिवर्तनप्रिय विचार आपल्या आसपासच्या आसमंतात असतात तेव्हाच ना! येथे परिवर्तनालाच अपमृत्यूचा शाप आहे. ते नेहमी कुपोषितच राहत असेल, तर बाळसं धरेल तरी कसे?”

चर्चा ऐकणारे एक शिक्षक सहभागी होत म्हणाले, “जेथे नावीन्याचे कोणतेही कौतुक नाही. काही करायला गेले तर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. तर शिक्षण परिपूर्ण होईल कसे? बदल करण्यासाठी हाती काही असायला लागते. काहीच नसेल आणि स्वातंत्र्याच्या भ्रामक संकल्पना सोबत देऊन बदलाचे मार्ग शोधण्यासाठी अनभिज्ञ दिशेला, अनोळखी वाटेला पाठविले जात असेल, तर बदल काय आणि कशात होणार आहेत?” या विचारांचा धागा हाती घेत पहिले शिक्षक आपले मत पुन्हा मांडते झाले. म्हणाले, “सर, सन्मानजनक जीवनयापन घडावे म्हणून माणसांना शिक्षण दिले जात नसेल, त्याऐवजी आपापले परगणे सांभाळण्यासाठी शिकावे म्हणून शिक्षणाचे महत्त्व सांगितले जात असेल, तर शिक्षण परिवर्तनाचे वगैरे साधन म्हणून माणसांना प्रेरित करेलच कसे? जगण्यासाठी परिपूर्ण करण्याऐवजी चौकटीत बंदिस्त करण्याकरिताच शिक्षण दिले-घेतले जात असेल, तर तेथे बदलाच्या वाटा प्रकाशित करणारा सूर्य कोणत्या क्षितिजावरून आणि कसा उदित होईल?”

इतकावेळ शांतपणे चर्चा ऐकणारे एक शिक्षक आपले म्हणणे परखडपणे विशद करीत सहभागी होत म्हणाले, “अहो, शिक्षण देणाऱ्या संस्थांची संस्थाने होत आहेत. ज्यांच्या हाती त्यांचे नियंत्रण आहे, ते संस्थानिकाच्या डौलाने वर्तत असतील, तर परिवर्तनवाद्यांना परिवर्तनाचा प्रारंभ करण्यासाठी स्वातंत्र्य उरतेच किती आणि कुठे? शिक्षणाचा प्रवाह वाहत ठेवण्याऐवजी अवरुद्ध करण्यासाठीच सारी ऊर्जा खर्च होत असेल, तर शिक्षण पाश्चात्त्य पद्धतीचे असले काय किंवा भारतीय असले काय, त्याने असा काय फरक पडणार आहे. काही शिक्षणसंस्थांमधील शिक्षणविषयक आस्था संशोधनाचा विषय व्हावा अशी झाली आहे. येथून ज्ञानाने संपन्न विचारांचे प्रदेश निर्मिण्याऐवजी स्वतःचे परगणे उभे करण्यासाठी कलह उभे राहत असतील, तर अशा कलहप्रिय विचारातून शिक्षणात परिवर्तन घडेलच कसे? समजा घडलेच, तर त्याची गती आणि प्रगती काय असेल?”

एक शिक्षक उत्साहाने आपले मत प्रदर्शित करीत संवादात सहभागी झाले. म्हणाले, “अहो, तुम्हा सर्वांचं म्हणणं क्षणभर मान्य करू या! ते खरंही आहे. आपल्या आजूबाजूला अंधार गडद होतो आहे. पण एवढं सगळंच काही अंधारलेलं नाहीये अजून. आशेचा पुसटसा का होईना प्रकाश दूरवर दिसतोय. तुम्ही तो का पाहत नाहीत. मिळेल एखादी पावलापुरती वाट त्यातून. चालूया त्या वाटेवर परिवर्तनाची एखादी मशाल हाती घेऊन.” सरांचा आशावाद काही अतिशयोक्त नव्हता. त्या सूत्राला हाती घेत मी मत मांडता झालो. “विश्वाचे दैनंदिन व्यवहार कशाच्या बळावर सुरु आहेत? उद्याचा दिवस खूप चांगला असेल, या आशेवरच ना! मग विचार कशाला करतात एवढा. कोणतेही परिवर्तन एका व्यक्तीचं काम नाही, हे खरंय. कुणाला तरी पुढे यावेच लागेल ना! तुम्ही असा की, मी की आणखी कोणीतरी. तो कुणीतरी आपणच का होऊ नये? असतील आपल्या व्यवस्थेत वाईट गोष्टी बऱ्याच; पण काहीतरी चांगलंही असेलच की! घेऊ या ना त्याचा शोध. नसेल समग्र, पण थोडा तरी प्रकाश सापडेल आपल्याला. तो आपल्या पावलापुरता का असेना! पण नसेलच शोध घ्यायचा कुणाला, तर परिवर्तन खडकावरचा पाऊस ठरेल. त्याच्या नशिबी वाहणं असेल; पण रुजणं नसेल” चर्चा आणखीही पुढे सुरु राहिली असती; पण पेपरचा वेळ संपला म्हणून उठले सगळे. निघाले शिक्षकदालनातून बाहेर. लागले आपापल्या कामांना.

मीही उठलो. वळलो शाळेच्या माझ्या कामाकडे. पण मेंदूला काम लागले. विषय तर मिळाला. लिहावे काय? पाहू पुढचं पुढे! म्हणून विसरलो तो विषय. तरीही मनात एक अस्पष्ट विचार पिंगा घालतच होता. स्पर्धेसाठी दिलेल्या विषयाचा आवाका खरंच मोठा आहे का? असेलही. पण या विषयावर आपले मतप्रदर्शित करणारे शिक्षक सुरक्षिततेच्या चौकटीत आपला ‘स्व’ सुरक्षित राहावा म्हणून तुम्ही अवघड विषय का दिला सर, असं उगीचच म्हणत असतील का? माहीत नाही. त्यांचं अवघडलेपण खरं आहे असं समजू. पण हेसुद्धा खरंय अवघड गोष्टीच आपली अंगभूत पात्रता तपासून घेत असतात. प्रत्येक जण आपल्या पावलापुरती निष्कंटक वाट पाहत असतो. त्यावरून चालत मुक्कामाचे सुरक्षित ठिकाण शोधत असतो. पण स्वतःसाठी सुरक्षित कवच शोधताना विसरतो की, परिस्थिती परिवर्तनासाठी आपण निवडलेल्या वाटा नेहमी अनुकूल असतीलच असे नाही. नसल्यास कल्पकतेने तयार कराव्या लागतात. पण तरीही एक प्रश्न उरतोच, त्या चांगल्याच असतील, असे कशावरून?

Jindagi | जिंदगी...

By // No comments:
एक दिन जिंदगी जन्नत मे बदल जायेगी.

ये किताबोकी दुनिया समजते समजते जिंदगी निकल जायेगी,
थेअरी के कन्सेप्ट मे लाईफ की इक्वेशन बिगड जायेगी,
सोचते है निकल आये किताबोकी दुनियासे, पर इतना पता है की,
इन्ही किताबोसे एक दिन जिंदगी जन्नत मे बदल जायेगी.
काही दिवसापूर्वी माझ्या मोबाईलवर आलेला हा मॅसेज. शिक्षण आणि शिक्षणव्यवस्थेसंबंधी ज्याने आपले स्वतःचे अनुभव विश्व स्वतःपुरते तयार केले आहे अन् शिकणं आवश्यकच असल्याने व्यवस्थेच्या वर्तुळात गरागरा फिरायला लागले आहे, अशा कोणाच्यातरी अनुभवातून हे शब्द प्रकटले असावेत. त्याच्या मनातील हे शब्द मॅसेज बनून फॉरवर्ड होत राहिले. इकडे, तिकडे पळत राहिले. आला. वाचला. वाटला चांगला. पाठवला पुढे. या क्रमाने तो माझ्यापर्यंत पोहचला. वाचला. वाचून त्याचा उल्लेख करावासा वाटला. केला.

हे मॅसेजच्या लेखनकर्त्याचे यश म्हणावे की, शिक्षणव्यवस्थेच्या बंदिस्त चौकटीतील अनिवार्य प्रक्रिया म्हणून पुस्तकांच्या दुनियेत हरवलेल्या (की हरलेल्या) मनातील खंत असावी. खरंतर शिक्षण नावाचा अध्याय बालवयापासूनच आपल्या जीवनग्रंथात लेखांकित केला जात असतो, नव्हे करावाच लागतो. तो तुम्ही स्वतः लिहिणार नसाल, तर लिहिण्यासाठी उत्सुक असणारे अनेक उत्साही हात आनंदाने पुढे सरसावतात. तो लिहिण्यासाठी काहीतरी व्यवस्था उभी करणे गरजेचे असते. या गरजेतूनच शाळा नावाची संस्था माणसांनी निर्माण केली. तिचं रूप आकाराला आणण्यासाठी आजूबाजूला चार भिंती उभ्या केल्या. त्यावर छत घालून ऊन, वारा, पावसापासून सुरक्षित केले आणि सुरक्षेच्या अभेद्य चौकटीत शिकण्यासाठी बाहेरचे चैतन्यदायी प्रवाह आणून कोंबले. या प्रवाहांना बांध घालून योग्य दिशेने वळते करण्यासाठी इमारती उभ्या केल्या. या इमारतींमधून शाळा नावाचं अस्तित्व ठरवून दिलेल्या चौकटीसोबत उभे राहिले. सर्वमान्यतेची मोहर घेऊन.

शाळा, शिक्षण या शब्दांचा जीवनातील अर्थ समजायला आयुष्याची काही वर्षे खर्ची करायला लागतात, तेव्हा त्याचं महत्त्व पुढे जाऊन कुठेतरी समजतं, हे खरंय. पण जोपर्यंत ते समजत नाही, तोपर्यंत शाळा हा जीवनातील नकोसा वाटणारा अध्याय असतो. शाळा आयुष्यातील अनिवार्य बाब असूनही किती जण तिचा आनंदाने स्वीकार करतात? जेथे आनंद असतो तेथे आपुलकी निर्माण होते. शाळा आपुलकीचे, आनंदनिर्मितीचे आलय न ठरता फक्त विद्यालय म्हणून ओळखल्या जात असतील आणि जेथे विद्यासंपादन करताना; संपादनातील आनंदाला सोयिस्कर बाजूला सारले जात असेल, तर शाळेविषयी आस्था कशी निर्माण व्हावी? माणसांना शिकवावे लागते. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते, तिचे काही नियम तयार करून चौकटी तयार कराव्या लागतात, हेही खरेच. पण नियमांच्या चौकटीत जिज्ञासेने, आपुलकीने प्रवेश करणे दूर राहून त्याची जागा आवश्यकता, अनिवार्यता घेत असेल तर शिक्षणातून आनंद निर्माण होईल कसा? व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. जर व्यक्ती आणि त्यांच्या प्रकृती भिन्न असतील, तर व्यक्तींना दिले जाणारे शिक्षण एकाच प्रकृतीचे का असावे? चॉइस असतो तेथे संधी असते आणि संधीमधून आनंद शोधता येतो. पण जेथून आनंदाला दुर्लक्षित केले जाते; सब घोडे बारा टके यावर विश्वास ठेऊन घडण्याची, घडवण्याची सक्ती केली जाते, तेथे आपुलकी, आस्था निर्माण होण्यासाठी संधी उरतेच किती?

विश्वातील यशस्वी माणसांच्या आयुष्याचं थोडं अवलोकन केलं तर कळतं, त्यांच्या आयुष्यात शिक्षण जरूर होतं; पण शाळा नावाच्या चौकटीत ही माणसं अशी रमलीच किती? पुस्तकांनी घडविलेले आयुष्य सोबत घेऊन वंचितांच्या आयुष्यातील गुलामगिरीच्या शृंखला विखंडित करणारे अब्राहम लिंकन, शाळेतील अभ्यासात फारशी प्रगती नसणारा; पण जीवनाची गती आणि प्रगती विज्ञानातून शोधणारा आईनस्टाईन, घराच्या हलाखीच्या परिस्थितीने शाळा सुटली; पण हातातील पुस्तक न सोडणारा न्यूटन ही जग प्रसिद्ध नावे आभाळाच्या छताखाली, जग नावाच्या मुक्त शिक्षणव्यवस्थेतून जेवढे शिकले, तेवढे शाळेतून शिकले असते का? हाही एक प्रश्नच आहे. शाळेत शिकणे आणि शिकवणे ह्या क्रिया यांत्रिकतेने होतात, तेव्हा त्यांची थेअरी होते आणि त्या थेअरित आयुष्याच्या कन्सेप्ट आपल्याभोवती स्वतःचे स्वतःपुरते एक वर्तुळ उभे करतात. पुस्तके फक्त गुण मिळवण्यासाठीच वाचली जात असतील, त्याच्यातून जीवन संपन्न करणारी गुणवत्ता शोधण्याऐवजी फक्त गुणांचाच शोध घेतला जात असेल, तर ती प्रिय कशी वाटतील?

आपण शाळेत असताना पुस्तकांमध्ये काय शिकलो, हे विसरून गेल्यानंतर आपल्या जवळ मागे शिल्लक राहते, ते शिक्षण असते. हेच खरे जीवनशिक्षण असते. शाळांना जीवनशिक्षण मंदिर नाव दिले, म्हणून तेथून जीवनाचे शिक्षण मिळेल आणि जीवनाला मंदिराचे पावित्र्य मिळेलच, असे नाही. आपण जेथून शिकलो, ते द्वार ज्ञानाचं मुक्तद्वार असेल, तर संकुचित विचारांच्या भिंती उध्वस्त करता येतात. व्यापक विचारांतून शिक्षणाचा संबंध जीवनाशी जोडता येतो. शिक्षणातून माणसं जोडणं आणि जोडलेली माणसं घडणं अभिप्रेत आहे; पण शिक्षणाचे वर्तुळ भाकरीच्या वर्तुळाशी जोडून आपण त्याला चाकरी पुरते सीमित केले आहे. भाकरी महत्त्वाचीच; पण ती मिळवताना कशी आणि कोणत्या मार्गाने मिळवावी, हे ज्ञानही असणे महत्वाचे नाही काय?

जीवन घडताना, घडवताना संघर्ष अटळ असतो. ही संघर्षयात्रा सफल करायला सक्षम करणारे शिक्षण असावे. शिक्षण हा कधीही न थांबणारा प्रवाह आहे. काही या प्रवाहात आपली तहान भागवण्यासाठी येतात. काही चारदोन घोट घेण्यासाठी येतात, तर काही एखादी चूळ भरण्यासाठी येतात. कोण काय घेतो, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. शिक्षणातून ज्ञानाची तहान निर्माण व्हायला हवी. ही तहानच माणसाला लहान-मोठं बनवीत असते. प्रत्येकाकडे विशिष्ट क्षमता असतात. त्या क्षमताना स्मरून माणसाला माणूस बनविणारे आणि माणूस घडविणारे शिक्षण मिळत असेल तर ते अप्रिय कसे वाटेल?

अँड्रयू कार्नोगी या विचारवंताने म्हटले आहे, सामान्य माणूस आपल्या क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश एवढे काम करतो. जी माणसं क्षमतेच्या पन्नास टक्के काम करतात, त्यांना जग सलाम करतं. जी माणसं क्षमतेचा पूर्ण वापर करून शंभर टक्के काम करतात, त्यांना जग डोक्यावर घेतं. जगाने डोक्यावर घ्यावे अशी संपन्न व्यक्तित्वे घडविण्यासाठी प्रयत्नरत असणारी शिक्षणव्यवस्था अप्रिय ठरू शकत नाही. प्रश्न आयुष्याच्या गुणवत्तेचे असतात. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेचेही असतात. केवळ गुणपत्रिकेतील गुणांमध्ये गुणवत्ता शोधणारे आय.क्यू. (इंटेलिजन्ट कोशंट) मोजून समाधानी असतील आणि जगणं समृद्ध करणारा इ.क्यू. (इमोशनल कोशंट) दुर्लक्षित राहत असेल, तर जगणं श्रीमंत कसे होईल? शिक्षणातून विचारांचं मंथन घडत असेल, मिळवलेल्या ज्ञानातून संशोधन घडत असेल; पण ते सर्वांसाठी नसेल तर त्या शिक्षणाचा, केलेल्या संशोधनाचा उपयोगच काय? केवळ आय.क्यू. वाढत जाऊन इ.क्यू. कमी होत जाणे, हा शिक्षणातून संपादित केलेल्या विचारांचा विपर्यास नव्हे काय?

शिक्षणाच्या स्वतःच तयार केलेल्या ठोकळेबाज कप्प्यांमध्ये आम्ही आम्हालाच बंदिस्त करीत आहोत का? दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यातील बऱ्याच जणांना डॉक्टर नाहीतर इंजिनियरच व्हायचंय. जणू काही आता या देशात अन्य व्यवसायांची आवश्यकताच उरली नाही. आपण आपल्यापुरत्या तयार केलेल्या संकल्पित ठोकळ्यात उभं राहून स्वतःला शोधणं आणि तो सापडावा म्हणून धडपडत राहणं, हा विचार शिक्षणाला कोणत्याही संपन्न पथावर नेणारा नाही. ठरावीक व्यवसायातील आर्थिक गणिते अभ्यासणे आणि त्यातून जीवनात प्रवेशणारी स्थिरता, संपन्नता, स्टेटस या गोष्टीना अनाठायी महत्त्व मिळत जाणे, हा शिक्षणयोग नाही. आय.आय.टी, आय.टी.वाल्यांना समाजात जो मान मिळतो, त्यातील किती मान कला शाखेच्या पदवीधराच्या पदरी पडतो? मेळघाट व्हॅली विसरून सिलिकॉन व्हॅलीची स्वप्ने मनात रुजत असतील. मनातून विचारात आणि विचारातून कृतीत येत असतील तर दोष कुणाचा, शिक्षणाचा की शिकणाऱ्यांचा?

व्यक्तींना व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य असावं, हे मान्य. पण सगळं क्रीम संपन्नतेच्या वाटांनी प्रवाहित होताना आजूबाजूला दिसते आहे. अधिक गुण संपादन करणारे सुखासीन आयुष्याच्या वाटा शोधायला निघतात. मागे उरलेले सर्वसाधारण या-त्या वाटांनी पांगतात. थोडं बरं ज्ञान असलेले अन्य व्यवसायांना जवळ करतात. शिक्षणाने ढ ठरविलेले शेतीकडे, मजुरीकडे वळतात. ज्यांना हुशार ठरविले; त्यांच्यापैकी कितीजण श्रमाच्या कामाकडे, शेतीकडे वळतात? वर्गात मुलामुलींना तोंडी परीक्षा घेताना पुढे जाऊन तुला काय बनायचं आहे? हा प्रश्न मी हमखास विचारतो. सगळेच- अगदी यथातथा शैक्षणिक प्रगती असणारेही- मी डॉक्टर होईन, मी इंजिनियर होईन असेच सांगतात; पण मी शिक्षक होईन, शेतकरी होईन म्हणून चुकूनही बोलत नाहीत. जणू साऱ्यांना एकाच छापाचे नमुने व्हायचे आहे.

शाळेतून मिळणाऱ्या शिक्षणाचा रोजच्या जगण्याशी संबंध असावा, असे म्हटले जाते; पण हा संबंध आहेच किती? असलाच तर परीक्षेतील गुणांशी आणि गुणांचा संबंध परीक्षेशी, परीक्षेचा स्मरणशक्तीशी एवढाच. गुण विसरून गुणवान माणूस बनण्याशी आहे तरी किती? चांगला नागरिक म्हणून शाळेत स्वतःला किती घडविले, या प्रश्नाचं उत्तर शोधाल कसं? शाळेतील शिक्षणातून शिस्तीचे धडे घ्यायचे आणि रस्त्यावरून बेशिस्त बनून चालायचे, याला काय म्हणाल? परदेशात जाऊन तेथील वातावरण पाहून आल्यावर तिकडे असणाऱ्या शिस्तीचे, स्वच्छतेचे गुणगान करायचे आणि आपल्या देशात आल्यावर पान खाऊन रस्त्यावर थुंकायचे. येथील सार्वजनिक शिस्त, गलिच्छपणा, बेफिकीर वृत्तीविषयी बोलायचं. हीच आपल्या शिक्षणाची उपलब्धी आहे का? कायदे तेथे आहेत, तसे येथेही आहेत. कायदा करून सारेच प्रश्न सुटत नसतात. ते आचरणात आणून, त्याचं प्रामाणिकपणे पालन करूनच निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

शिक्षण देशातील बऱ्याच घरांपर्यंत पोहचले आहे. अजून काही ठिकाणी पोहचायचेही आहे. शिक्षणाचा विस्तार झाला आहे. विस्तार झाला; पण त्याच्या दर्जाचे, गुणवत्तेच्या विस्ताराचे काय? सांप्रतकाळी आपल्या देशातील किती विद्यापीठे जागतिक क्रमवारीत शीर्षस्थानी आहेत? शिकणाऱ्यांची संख्या वाढून उपयोग नाही, शिकणाऱ्यांची गुणवत्ताही वाढायला हवी. शिक्षणातून गुणांचे संवर्धन होते, तेव्हा नागरिकशास्त्राच्या पाठात शिकवलेल्या नागरिकांसारखे स्वतःहून वर्तणारे आदर्श नागरिक आपणास आपल्या आसपास दिसतील. चाकोरीतला रस्ता कोणतेही नवी ठिकाणे शोधू शकत नाही. आपले शिक्षण मळलेल्या वाटेवरून चालत आहे. शाळेत शिकवला जाणारा अभ्यास कर्मकांड ठरू पाहत आहे. अभ्यासाचे तेच ते साचे, त्याच पद्धती, तसेच गृहपाठ, तसेच स्वाध्याय. हे कर्मकांड नेमकेपणाने करता यावे, म्हणून मास्तराने लिहून दिलेल्या आयत्या नोट्सही अशाच. हेही नसेल आयते मिळत, तर बाजारातील मार्गदर्शकाची सोबत आहेच. शिकणाऱ्याच्या हाती रोज एक आयता मासा दिला जातो. मासा पकडण्यासाठी लागणारं जाळं आणि ते कसं टाकावं यासाठी लागणारी कौशल्ये आपल्या शिक्षणातून किती दिली जातात? मुलांना स्वावलंबी, संपन्न, स्वतंत्र बनवणारे त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं करणारे, आत्मविश्वास जागृत करून मनात ज्ञानलालसा निर्माण करणारं शिक्षण पुस्तकातील पाठांमध्ये लपलं आहे. पण ते शोधण्यासाठी पाठातील ज्ञानाचे, त्यातील अनुभवाचे उत्खनन होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने ज्ञान परीक्षेतील उत्तरे लिहिण्यासाठी पाठांतरापुरते उरले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा निर्माण करण्याचे काम शिक्षकाचे; पण तो अन्य कामात जुंपला गेला आहे.

शिक्षक ज्ञानाची आसक्ती बाळगणारा असावा. अध्यापनकार्याविषयी विरक्ती धारण करणारा नसावा. पुस्तकात पुरलेल्या धड्याना उकरून अर्थाची फोलपटे उडवणारा नसावा. पुस्तकातून मस्तकात पोहचवण्यासाठी धड्यांमधून जीवनाच्या विविध पैलूंचे उत्खनन करणारा असावा. सर्जनाचे नवे प्रवाह शोधून जीवनाचा अर्थ संक्रमित करणारा असावा. त्याला वंचित, उपेक्षितांच्या सुविधाविरहित जीवनाविषयी जाणीव असेल, त्यांच्या अशा जगण्याने त्याचे अंतकरण गलबलून येत असेल, तर कोणतीही आव्हाने स्वीकारायची त्याची तयारी असते. अशा स्वयंप्रकाशित दिव्यांकडे शिकणारी मने आस्थेने वळतील. अर्थात सगळेच असे असतील, असेही म्हणण्याचे कारण नाही. शिक्षणाला आणि शिक्षकाला निवृत्ती कधीच नसते, कारण काहीतरी शिकणे माणसाच्या जगण्याची सहज प्रवृत्ती आहे. काहीतरी शिकविण्यासाठी शिक्षणगंगा अखंड प्रवाहित ठेऊन प्रवाह अवरुद्ध होण्यापासून मुक्त ठेवावे लागतील. प्रदूषणापासून संरक्षित करावे लागतील.

पर्वताचे शिखर सर करू पाहणाऱ्यापैकी साऱ्यांनाच कळसापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. म्हणून अर्ध्यावरून परतणाऱ्यांपुढचे नी प्रयत्न सोडायचे नसतात. शिक्षणाच्या विस्ताराचे प्रयत्न होत असताना गुणवत्तेचाही विस्तार घडत राहणे अपेक्षित आहे. गुणवत्ता केवळ बोर्डाच्या परीक्षेतील गुणवत्तायादीचा आधार घेऊन ठरत नसते. या गुणांच्या मोजपट्ट्यांपलीकडे गुणवत्ता आणखीही आहे, याचं स्मरण असावं. ‘प्रथम’ या संस्थेने शाळेतील मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या केलेल्या सर्वेक्षणात सुमारे पन्नास टक्के मुलं पुस्तक धड वाचू शकत नसतील, सत्तर टक्के मुलं गणित सोडवू शकत नसतील, तर शिक्षणाच्या गुणवत्तेचे प्रश्न सुटतील कसे? सोडवायचे कोणी? अंगावरील एकच एक सदरा हीच आपली मोठी कमाई मानणारे आगरकर, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून आत्मतेजाचा प्रकाश शोधणारे, दिव्याखालचा प्रकाश हीच आपली श्रीमंती समजून जगाला विज्ञानाच्या प्रकाशाने श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करणारे रघुनाथ माशेलकर अशा शिक्षणातून घडतील कसे?
  
आमच्या विषयातील किमान जाणकार (?) म्हणून आम्ही काही शिक्षक मराठी विषयाच्या शिक्षकपदासाठी मुलाखतीस आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो. तेथील अनुभव विस्मयचकित करणारा होता. एम.ए.ला अभ्यासलेला तुमचा आवडता विषय कोणता आणि का? असे साधे प्रश्न विचारल्यावर एम.ए.पदवी घेतलेले आवडता विषय कोणता सांगावा याचा विचार करीत राहिले. एम.एड., एम.फिल झालेली माणसं सलगपणे चार वाक्ये बोलू शकत नव्हती. मातृभाषा विषयात पदव्युत्तर पदवी घेणाऱ्यास अस्खलित चार वाक्ये बोलता येत नसतील, तर गुणवत्तेसाठी निकष वापरायचे कसे आणि कोणते? त्यातही कहर म्हणजे व्याकरणातील शब्दांच्या जाती कोणत्या हेसुद्धा माहीत नसावे. ऐवढेच काय; पण स्वतःचे नाव नामाच्या कोणत्या प्रकारात येते, हेही भविष्यातील शिक्षकांना माहीत नसावे. बाकी गोष्टी तर कोसो दूर राहिल्या. घडतील कशा पिढ्या? अभ्यास पदवी घेण्यासाठी आणि परीक्षेपुरता करायचा, हीच शिक्षण घेणाऱ्याची पात्रता बनत चाललेली आहे. गुणवत्ता परीक्षेत अडकली असेल; परीक्षा अभ्यासक्रमात आणि अभ्यासक्रमात वार्षिक नियोजनाच्या चौकटीत अडकला असेल, तर आणखी दुसरे काय होईल.

या मॅसेजमधून व्यक्त भावना अशीच काहीशी खंत व्यक्त करते. थेअरीच्या संकल्पनेत यशाचे सोपान शोधून शॉर्टकट तयार केले जात असतील; तर आयुष्याची समीकरणे बिघडत आहेत, हे म्हणण्याला अर्थच उरत नाही. तरीही आम्ही आमच्या शिक्षणव्यवस्थेतून स्पर्धेत धावण्यासाठी घोडे तयार करीतच आहोत. अभ्यास परीक्षेपुरता आणि परीक्षेतील गुणांसाठी करायचा ठरल्यावर पुस्तकातील धड्यांमधून जीवनासाठी धडे शोधतो कोण? परीक्षा, अभ्यास, निकाल आणि कपाळी पदवीचा टिळा. या तंत्रातून निर्मित चौकटींना ओलांडून अद्यापही आम्हाला बाहेर निघता आले नाही. पुस्तकांत जे दिलं आहे त्यातून आयुष्यात आनंद अवतरेल हा एक आशावाद आहे. तो जगण्यात यावा म्हणून आयुष्याला आनंदाचं अस्तित्व मिळवून द्यावं लागेल. याकरिता आपल्या अंगणी आनंदाचे झाड लावावे लागेल. आमच्या शिक्षणव्यवस्थेतून अशी झाडं जगवता येतील, असा आशावाद बाळगायला काय हरकत आहे.

Gavakadachi Maati | गावाकडची माती...

By // No comments:
बऱ्याच दिवसापासून गावी गेलो नव्हतो. घरी जाण्याचे अनेक प्रसंग आले, पण काही ना काही निमित्त काढून जाणं टाळत गेलो. हे जाणं आपण का टाळतोय, या प्रश्नाचं उत्तर आज तरी नीटसे देता येणार नाही. पण या टाळण्यात मी शहरवासी झालोय आणि शहरातील सुखसुविधा अंगवळणी पडल्यानं गावी जाऊन उगीच गैरसोय का म्हणून करून घ्यावी, हा स्वार्थपरायण विचारही असावा. गेल्या आठवड्यात घरी जाणं आवश्यक होते. गेलो घरी. थांबलो. बोललो परिवाराशी. बोलताना आईकडे पाहत होतो. वार्धक्याच्या खुणा तिच्या देहावर अधिक स्पष्ट दिसायला लागल्या आहेत. देहावरील, चेहऱ्यावरील सुरकुत्या जीवनाचा प्रवास क्षणाक्षणाने पुढे सरकत असल्याच्या पाऊलखुणा बनून अस्तित्वाची जाणीव घट्ट करताना दिसतायेत. इकडच्या, तिकडच्या, महत्वाच्या, बिनमहत्वाच्या गोष्टी सुरु होत्या. बोलणं थोडं थांबलं. थोडा वेळ निरव, निशब्द शांतता.

त्या शांततेला विराम देत आईने विचारले “कसा आहेस रे, तुझी लेकरं कशी आहेत? सारं ठीक चाललय ना!” “हो, सगळं व्यवस्थित आहे आणि मुलंही चांगली आहेत. मी येथे येताना पोरगं म्हणालं, शक्य असेलतर आजींना काही दिवसासाठी का असेना घेऊन या! मी अनेकदा फोन करून आजीशी बोललो. निदान दोनचार दिवसासाठी ये आणि राहा; पण प्रत्येकवेळी आजीची कारणं ठरलेली, आज काय तर शेतात पेरणी धरलीय. उद्या काय तर निंदणी करायचीय. परवा पिकांना खत द्यायचे. तेरवा काय कापूस वेचायचाय. पुढे हंगामानुसार कामांची यादी वाढतच जाते. सवड निघेल तशी येईन म्हणते. पण उसंत असतेच कुठे आजीला आणि शेतीची कामं थाबतात कुठे?” पोराचं म्हणणं आईला सांगतो. आईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. येईन, सांग त्याला म्हणून बोलते.

मीच पुढे बोलतो “तू आलीस तरी घरी राहतेच किती दिवस? झाले एक दोन दिवस की पुन्हा तुझं सुरु, घरी परत जायचंय. शेताची, घरची कामं खोळंबली असतील. गोठ्यातल्या गुरावासरांना नीट वैरणपाणी झालं असेल का? घरी शेतीकाम करणारी पोरं नीट सांभाळत असतील की, दुर्लक्ष करून गावाच्या पारावर चकाट्या पिटत बसली असतील. सारी काळजी तुलाच. ते आता काही लहान राहिले नाहीत. करू दे ना त्यांचं त्यांना! सांभाळतील सगळं नीट.” मला थांबवत म्हणाली, “ती लाख सांभाळतील सारं; पण त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ते तुमच्यासारखे शिकलेच कुठे चार पुस्तकं सारंच काही व्यवस्थित करायला. लागली इकडच्या तिकडच्या वाकड्या वाटांना चालायला तर. नाहीतरी आता गावात गावपण कितीसं राहिलं आहे असं?” सुखं शहरातून पायवाटांनी खेड्यात, गावात आलीत. त्या सुखांनी समृद्धीही आली; पण सोबत सैलावलेपणही आलं. असल्या बेगडी सुखाच्या फसव्या मृगजळापासून आपण दूर राहिलेलं बरं, असं तिचं व्यवहारिक तत्वज्ञान. यामुळेच तिचं येणं, थांबणं आणि जाणं यातील अंतर तसं कमीच. आपली मुलं मोठी झाली, त्यांचं ते बघतील, काय करायचं ते. यावर तिचा विश्वास असला, तरी गाव, गावाकडील माती आणि गावातील नाती यातच तिचा श्वास अडलाय.

शहरातील आपल्या मुलांकडे आली तरी तिला नाही थांबवत. येथील सुविधातही तिला अवघडल्यासारखं होतं. गावातील गावपण नाही मिळत तिला येथे. येथील झगमगीत तिची तगमग वाढते. घराच्या पेंट केलेल्या चकचकीत भिंतीवरून तिचा हात फिरताना अडतो. त्यातही एक बुजरेपण असतं. गावाकडील घराच्या मातीच्या भिंतीवरून पोतेरं फिरवताना तिला आपलंपण वाटतं. पोतेऱ्यातील मातीचा गंध आपलासा वाटतो. येथील रूम फ्रेशनरच्या सुवासाला तिचा मातीचा गंध खूप लांबचा वाटतो. घराच्या अंगणातील तुळशीला भक्तिभावाने दिवा लावताना, पाणी घालताना तिचा भक्तिभाव त्यात उतरून येतो. शहरातल्या टू रूम किचनमध्ये विज्ञानाने सुखाची अनेक यंत्रे आणली. पण जात्यावरून तिचा हात फिरताना ओठी येणारं गीत गिरणीतून दळण दळून आणताना अडलं. पाट्यावरवंट्याचं आपलंपण मिक्सरच्या चक्रात फिरताना हरवलं. सकाळी रेडिओ, टीव्हीवरचे भक्तिगीतांचे सूर ती ऐकते. पण शेतातून थकून भागून घरी परतल्यावर रात्रीच्या शांत प्रहरी गावातल्या मंदिरातील भजनांच्या साध्याशा सुरांनी तिच्या हृदयी उमलून येणारा भक्तिभावाचा गंध गायनाच्या शास्त्रीय चौकटीत बसवलेल्या सुरांना नसावा. शहराच्या गर्दीत हरवलेले सणवार तिला नकोत. गावातल्या साऱ्यांनी मिळून साजरे केलेले साधेसेच सणवार अंतर्यामी रुजले आहेत. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी जीवन संगीत बनून येणारा वारा, मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने शेतातून गावाकडे धुळीच्या आवरणाला पांघरून परतणारी माणसं, गुरंवासरं आणि गोठ्यातील वासरांच्या ओढीने हंबरत परतणाऱ्या गायी तिला येथे दिसतील तरी कशा आणि कुठे?

गावातील हे सारं गावपण जपताना आपल्या परक्या माणसातील नातीही आई आग्रहाने जपते आहे. नात्याचं बहरलेलं गोकुळ तिच्या मनाचा आनंददायी विसावा आहे. लेकीबाळी, सुना, नातवंडे, मुलं सारीसारी तिला आपल्याजवळ असावीत असं वाटतं. पण हे नेहमी, नेहमी शक्य नाही; म्हणून नात्यांचे पीळ घट्ट बांधण्यासाठी काहीना काहीतरी निमित्त शोधत राहते. कधी सणवाराच्या, तर कधी घरातील मंगलकार्याच्या माध्यमाने साऱ्यांना एकत्र आणू पाहते. एकत्र जमलेली मुलंबाळं पाहताना तिला जीवनाचं सार्थक झाल्याचे वाटते. पण तिचा हा आनंदही तसा क्षणिकच. चार दिवस झाले की, सारे पुन्हा पोटापाण्याच्यामागे परतीच्या ठिकाणी निघतात. तशी तिच्या मनाची घालमेल वाढत जाते. तसं जाणवू देत नसली तरी, ते कळतंच. परतीसाठी बॅगा भरल्या जातात. बॅगा भरताना तिचा हात जडावतो. निरोप देताना स्वर कातर होतो. डोळ्यांच्या कडा ओलावतात. थकलेला, थरथरता हात नातवंडांच्या पाठीवरून, डोक्यावरून मायेने फिरतो. थांबून, थांबून ही मुलं अशी कितीकाळ थांबणार, म्हणून थोड्या वेळाने तीच म्हणते, “निघा बाळांनो, सुखानं राहा! अधून-मधून येत राहावं. जीवाला तेवढंच बरं वाटतं.”

सारे निघण्याच्या तयारीत असतात. तरीही तिची पाऊले तेथून निघत नाहीत. शेवटी न राहवून मी म्हणतो, “आणखी किती थांबशील अशी येथे! निघतो आता आम्ही. पोहचलो की, कळवतो तसे फोन करून.” तिची पाऊले अनिच्छेने अस्वस्थ हालचाल करतात. आमची पाऊले परतीच्या वाटेला लागतात. आपल्या गोतावळ्याच्या अस्पष्ट होत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे ती पाहत राहते. हळूहळू त्या प्रतिमा धूसर होत जाऊन दृष्टीआड होतात. पुढे निघालेली पावले गावमातीचा गंध घेतलेली धूळ सोबत घेऊन चालत असतात. त्यांच्या चालण्याने पाठीमागे पसरत जाणाऱ्या धुळीच्या पडद्याआड वार्धक्याने नजर क्षीण झालेल्या डोळ्यातून आठवणींची सय घेऊन पाणी दाटत असते.

Avakali | अवकाळी...

By // No comments:
हिवाळ्यातील गारव्याला निरोप देत ऋतू सावकाश कूस बदलतो. वातावरणातला हवाहवासा गारवा जाऊन मार्च महिना येतो, तो सूर्याच्या तापदायक किरणांना सोबत घेऊनच. बोचऱ्या थंडीने निरोप घेतलेला असतो. जगाचे दैनंदिन व्यवहार नियत मार्गाने सरू असतात. उन्हाच्या तीव्रतेवरून यंदाचा उन्हाळा कसा असेल, याचे काही आडाखे बांधले जातात. खरीपाचा हंगाम कधीच आवरून झालेला असतो. रब्बीची स्वप्ने परिपक्व होऊन एकत्र साकोळण्याचा समय समीप आलेला असतो. समृद्धीचे माप पदरी टाकण्यासाठी लक्ष्मी शेतकऱ्याच्या घराकडे निघालेली असते. बारोमास राबणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे तिच्या आगमनाकडे लागलेले असतात. निदान वर्षभर जगण्याएवढी संपन्नता घरी येत असल्याचा आनंद मनात जागा झालेला असतो. स्वप्ने मातीच्या कुशीत रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट फळाला येण्याची खात्री असते. पतपेढ्यांचे, सावकाराचे कर्ज उतरवून उरलेच चार पैसे गाठीला अधिक, तर मुलामुलींचं लग्न उरकून घ्यायचं असतं. नसेल हे जमत तर चार खणांच्या घराचं थोडं का होईना, रूप पालटता आले तर घ्यावे पालटून असा विचार मनात घर करीत असतो. कारभारणीसोबत संसाराच्या सुखवार्ता करण्यात कारभारी विसावलेला असतो. मनातील स्वप्नांचे रंग आस्थेच्या क्षणांना घनगर्द करीत असतात. अंतरंगातून उमलणाऱ्या भावनांना संवेदनेचा मोहर यायला लागतो. स्वप्नांमध्ये रममाण होऊन जगण्याची उमेद माणूस बांधत असतो. आणि... एक दिवस सारं होत्याचं नव्हतं होतं. हातातोंडाशी आलेला घास दैवाच्या खेळाने विखरून जातो.

मनात साकोळलेली इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. स्वप्नांचा असा अचानक चुराडा होताना जगण्याला काळाची नजर लागते. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो परिस्थितीच्या हताशेचा भयाण अंधार. जीवनाला व्यापून टाकणारा, तरीही थोडासा मागे उरणारा. हरवलेली स्वप्ने, विखुरलेले जीवन घेऊन अंधारवाटेने चालायचे असते. आशेच्या किरणाच्या शोधात. हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने लख्ख प्रकाश शोधायचा असतो. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून पुन्हा काळ्याआईच्या कुशीत रुजवायची असतात. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असतात. त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनते. उसवलेल्या जगण्याला टाके घालण्यासाठी तो उभा राहतो. दैवाला आणि देवालाही आव्हान देत.

सन्मानाने जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांनाच नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. या परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतील, असेही नाही. नाही उत्तीर्ण होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात थकतात ते हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन संपवून घेतात. संपणाऱ्यांप्रती हळहळ व्यक्त करणारे चार शब्द ऐकायला येतात. नियतीच्या क्रूर आघातातून जीवनाची अवकाळी सांगता झाल्याने समाजमनातून राग व्यक्त होतो. धुमसणारा असंतोषाचा वणवा कालौपघात कमी होत जाऊन स्वभावानुरूप विस्मरणात जातो. नव्हे विसरावाच लागतो, कारण संघर्ष केल्याविन जीवनयात्रेची सफल सांगता कुणालाच करता येत नसते. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी माणसं मुकाटपणे चालतात. मनाचीच समजूत घालतात. आजचा दिन आयुष्याला मातीमोल करून गेला; पण निदान येणारा उद्याचा दिवस तरी जीवनात सफलतेचे रंग भरणारा असेल.

नानाविध रंगानी धरतीला नटवून मोहरलेपण देणाऱ्या वसंताचे आगमन निसर्गातील सर्जनाचा साक्षात्कार असतो. धरती सर्वांगाने फुलून येण्याचा खरंतर हा ऋतू. अनंत रंगानी नटून धरतीने साजशृंगार करण्याआधीच अवकाळी पावसाने आणि गारपिटीने सप्तरंगी छटांना अवकळा आणून रंगाचा बेरंग केला. मागे उरला निराशेचा उदास, भकास विसकटलेला रंग. मार्च महिना गारपिटीचे दुर्दैवी दान सोबत घेऊन आला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वैभवाने झुलणारी, डुलणारी शेतं उध्वस्ततेची अवकळा घेऊन विखुरली. भग्न अवशेष सांभाळीत उभ्या असलेल्या वास्तुसारखी उदास दिसायला लागली. रात्रंदिन राबून, उधार उसनवार घेऊन, कर्ज काढून फुलवलेले मळे, शेतं उजाड झाली. पिकं गारांनी झोडपून काढली. लाखमोलाचं धन घेऊन उभ्या असणाऱ्या धरतीच्या देहावरील रया पार लयाला गेली.

राजाने छळले, नवऱ्याने मारले, पावसाने झोडपले, तर दाद कुणाकडे मागायची असं म्हटलं जातं. नवऱ्याने मारले तर कायद्याने प्रश्न सुटू शकतो. राजा, राजपाट कालौघात संपले आहेत. त्याऐवजी शासन नावाची व्यवस्था माणसांनी उभी केली. ती चुकत असेलतर लोकमताच्या रेट्याने तीही बदलता येते. पण पावसानं झोडपलं तर दाद मागायची कुठे? अस्मानी संकटांचा दावा कुठल्या न्यायालयात दाखल करायचा? नशिबाला दोष देणं, हा एकच पर्याय परिस्थितीने विकलांग केलेल्यांच्या हाती उरतो. पण हाच एक उपाय आपल्या हाती असतो का? की शासनव्यवस्थेकडे मदतीकरिता पाहणे हाही एक उपाय असतो.

गारपीट माणसांना तशी काही नवीन नाही. या आधीही अस्मानी संकटे शेतकऱ्याने अंगभूतबळावर, आंतरिक इच्छाशक्तीच्या सामर्थ्यावर परतवून लावली आहेत. संकटांनी तो कोलमडला असेल; पण कोसळला मात्र कधीच नव्हता. गारपिटीने मात्र त्याला भुईसपाट केला. पुन्हा उठून उभं राहण्याइतकंही त्राण त्याच्याठायी राहू दिले नाही. गेल्या चाळीसपन्नास वर्षात माझ्या पिढीने एवढी गारपीट पाहिल्याचे, निदान मला तरी आठवत नाही. कुटुंबासोबत शेती कसताना माझ्या शेतकरी घराला कधीही एवढी हताशा आल्याचे दिसले नाही. संकटे आली नाहीत, असे नाही. संकटांशी दोन हात करीत माणसं पुन्हा नव्या जिगीषेने उभी राहिली आहेत. आस्थेचा कणा ताठ ठेऊन जगण्याचा आणि जीवनाचा नम्र शोध घेत राहिले आहेत.

काही दिवसापूर्वी गावी फोन करून आईला गारपिटीच्या संदर्भात विचारले. ती म्हणाली, “सारं होत्याचं नव्हतं झालं रे बाबा! उजाड शेतं आणि उध्वस्त पिकं तेवढी हाती शिल्लक राहिली आहेत. काय करावं, काही कळत नाही? माणसानं खावं काय आणि जगावं कसं? माणसं एकवेळ सावरतील कशीतरी; पण मुक्या जित्राबांचेही पार हालहाल केले या गारपिटीने. कुण्या जन्माचे भोग बघायला लावले दैवाने कोण जाणे?” आईच्या शब्दातील वेदना मनाला अस्वस्थ करीत होती. स्वतःला सावरत म्हणाली, “माझं नशीब त्यातल्या त्यात बरं म्हणावं लागेल. पोरं थोडं का होईना पोटापुरती कमावती आहेत. मिळतील चार घास खायला. खातील कोंड्याचा मांडा करून. पण बाकीच्यांचं काय? ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांनी करावं काय? हातातोंडाशी आलेला घास देवानं असा हिरावून घ्यावा. त्यांनी कुणाचं काय बिघडवलं होतं?” शेतीशी असणाऱ्या पिढ्यानपिढ्यांच्या नात्यावरच आघात झाल्याचं दुःख आईच्या शब्दातून प्रकटत होते. निराश, हताश बोलण्यातून अवकाळी उध्वस्त झालेल्यांच्या ललाटी नियतीने लेखांकित केलेल्या असाहय दुःखाची ठसठसणारी वेदना जखम बनून शब्दातून वाहत होती. व्यक्तीच दुःख हेच समष्टीचं दुःख असतं, असं मानणारं मन हळहळणाऱ्या शब्दांतून व्यक्त होत होते.

बाकीच्यांचं काय? हा केवळ एक प्रश्न नाही. या प्रश्नाचं उत्तर शोधणं इतकं सोपंही नाही. संकट अस्मानी असलं, ते कोणाच्या हाती नसलं, तरी ते भीषण आहे. दारूण पराभव करणारे आहे. संकटातून सावरण्यासाठी माणसांना उमेदीने उभं करावं लागेल. उभं करण्यासाठी मदतीचे हात पुढे यावे लागतील. शासन काही करेल, या अपेक्षेवर थांबून कसे चालेल? शासन आपल्या स्तरावरून यथास्थित प्रयत्न करेल. विझलेल्या चुली पेटवण्यासाठी इंधन मिळेलही; पण विझलेल्या मनांना प्रदीप्त करण्यासाठी मदतीची फुंकर घालावी लागेल. कोसळलेली घरं, उडालेली छप्परं पुन्हा आपल्या पायावर उभी करण्यासाठी उमेद जागी ठेवावी लागेल. त्याआधी माणसांच्या मनाचा पाया मजबूत करावा लागेल. त्याच्या मनातील उमेदीच्या, आस्थेच्या, आशेच्या अंकुरांना अंकुरित करण्यासाठी जाणीवपूर्वक जोपासना करावी लागेल. शेतकऱ्यांच्या शेतातील हानी मोठीच; पण मनावर झालेल्या आघाताची हानी त्याहून प्रचंड आहे. त्याचं मन येणाऱ्या उद्याची चिंता करणाऱ्या प्रश्नांच्या, समस्यांच्या गुंत्यातून मोकळं झालं, तर आयुष्यात येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्याइतके बळ मिळेल. गारपिटीच्या आघातातून कोलमडलेल्या जिवांना सावरण्यासाठी समाजाने पुढे येणे परिस्थितीची अनिवार्यता आहे. संवेदनशीलता आपल्या संस्कृतीचं लेणं आहे. संवेदनशील माणसांच्या संवेदनांवर समाज सजतो, सावरतो आणि वावरतोही. कोणा एकास फार मोठी मदत करणं अवघड आहे. पण अनेकांची थोडीशी मदतही मोठं काम करू शकते. लोकांचा फार छोटा त्यागही खूप मोठं काम करू शकतो. यावर विश्वास ठेऊन प्रयत्न करायला लागतील. कणाकणाच्या संचयाने मण होतो, थेंबा थेंबाने सागर भरतो. सर्वस्थळी, सर्वकाळी परिस्थिती काही आहे तशीच राहत नसते, ती परिवर्तनशील असते. शेतकरी उभा राहिला, तर त्याच्यासमोरचे सारेच प्रश्न संपतील असे नाही. निदान काही प्रश्न तरी थांबतील.

जगण्यात आलेल्या हताशेतून एखादा संवेदनशील शेतकरी हाय खाऊन जीवनयात्रा संपवतो. त्याच्यापुरत्या प्रश्नांच्या गुंत्यातून तो मोकळा होतही असेल; पण त्याच्या पश्चात कुटुंबियांच्या वाट्याला येणाऱ्या रोजच्या मरणयातनांचे काय? अवकाळी मरणातून कोणतेच प्रश्न कधी संपलेले नाहीत आणि सुटतही नाहीत. त्यातून आणखी दुसरे जटिल प्रश्न निर्माण होतात. अवकाळी मरणयात्रा थांबविण्यासाठी व्यवस्था काय करते आहे, असा प्रश्न बऱ्याचदा समाज विचारतो. समोर उभ्या राहणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही. ती मिळतात का? हाही एक प्रश्नच आहे. संकटाना थांबविण्यासाठी व्यवस्था प्रयत्नशील असूनही, पदरी निराशाच का येत असावी? यामागच्या कारणांचा शोध कुणी, कसा, कुठे घ्यावा? उत्तरे शोधावी कुणी आणि कशी?

स्वातंत्र्य संपादनाच्या सदुसष्ट वर्षात देश बदलला आहे. जगातलं एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याएवढा. पण देशात राहणाऱ्या साऱ्यांचा प्रभाव वाढला आहे का? ज्याच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा आहे त्यांनी सर्वत्र असावं; पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांनी कुठेच नसावं का? शेतातून येणारे उत्पन्न वाढले. हरितक्रांतीने, श्वेतक्रांतीने कृषीक्षेत्राचा कायापालट झाला. अन्नधान्य उत्पादनाबाबत देश स्वयंपूर्ण झाला; पण देशातील किती शेतकरी स्वयंपूर्ण वगैरे झाले? काही थोड्यांच्या जीवनात समृद्धीचा वसंत फुलाला असेल. ते प्रगतीशील वगैरे झाले असतील, फार्महाउसचे मालकही असतील. पण बहुसंख्य- ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नावालाच आहे, त्यांनी फार्महाउसची हौस करावी तरी कशी? दोनचार एकर जमिनीच्या तुकड्यावर त्यांनी जगावं कसं? कुटुंबाला जगवावं कसं? शासन शेतकऱ्यांसाठी काही करीत नाही, असे नाही. पण केलेले त्यांच्याकडे पोहचेपर्यंत फार काही उरत नाही, अशी भावना समाजात वाढत आहे. असं चित्र समोर दिसत असेल, तर शेतकऱ्यांच्या अभ्युदायाच्या वाटा उजळून निघतील तरी कशा? स्व. राजीव गांधींनी पैशाला फुटणाऱ्या वाटांबाबत केलेल्या विधानाचा आम्ही गांभीर्याने कधी विचार केला आहे का? विकास वाटेवर पाठविलेल्या पैशाला वाटा, आडवाटा, पायवाटा फुटणार असतील, तर विकास म्हणजे आक्रोडाचे फूल असे कोणास वाटल्यास नवल वाटू नये. कल्याणकारी राज्यात सर्वांचे कल्याण अभिप्रेत असताना फक्त काहींचे कल्याण होणे, हा परिस्थितीचा विपर्यास नव्हे काय?

ग्रामीण परिसरापर्यंत विकासाच्या वाटा पोहचल्या नाहीत, असे नाही. अन्यक्षेत्रातील प्रगतीसोबत शेतीक्षेत्राचीही प्रगती झाली आहे; पण तरीही शेतकरी प्रसन्नतेच्या भावनेतून शेती व्यवसायाकडे का पाहत नाही? आज शेती कसत आहेत, त्यांना जाऊन विचारा, या व्यवसायात तो किती संतुष्ट आहे. यातील बहुतेक शेतीला रामराम ठोकण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसेल. कितीही राबा मातीतलं जीवन मातीमोल असल्याची खंत मनातला सल बनून, त्यांच्या बोलण्यातून प्रकटते. ज्यांच्याकडे खूप शेती आहे, त्यांच्या घरांचे पालटलेले रूप, धान्याच्या पडलेल्या राशी, दूधदुभात्याने भरलेले गोठे, अंगणात उभी असणारी वाहने, हे प्रगतीचं सार्वत्रिक चित्र नाही. कुडाच्या सारवलेल्या भिंती, धुरानं कोंदटलेले छप्पर, दाराशी असणारी चारदोन जित्राबं आणि छतातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यासह मनातलं गळणारं अवसान सावरत उभा असणारा विकल चेहराच नजरेसमोर दिसतो. रात्रंदिन उरस्फोड मेहनत करूनही श्रमाचं पुरेसं मोल मिळत नाही, ही त्याची खंत. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून आलेल्या प्रासंगिक समृद्धीने ब्रॅन्डेड वस्तूंचा तोरा मिरवणारे एकीकडे, तर दुसरीकडे जगण्याचा कोणता ब्रॅन्ड नसलेलं जगणं. कोंड्याला मांडा आणि निद्रेला धोंडा, असं जगणं सोबत घेऊन परिस्थितीशी धडका देत माणूस उभा आहे. उजाड झालेल्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आशेचे कोणतेही ओअॅसिस दमलेल्या जिवांना दिसू नये का?

जगण्यासाठी भटकंती आणि कर्जासाठी भिक्षांदेही, हे प्रत्येक हंगामाआधी दिसणारं दृश्य. घेतलेलं कर्ज डोक्यावरून उतरवता आले नाही, म्हणून कोणीतरी अवकाळी जीवनसांगतेचा पत्करलेला मार्ग गारपिटीच्या पावसापेक्षा मोठी आपत्ती आहे. पावसाच्या तडाख्यातून माणसं एकवेळ कशीतरी सावरता येतीलही; पण ज्याचं जीवनच निराशेच्या आवर्तात आवरलं गेलं, त्याचं काय? त्यांच्या परिवाराचे काय? हा टोकाचा मरणपथ निवडताना काहीच विचार जाणाऱ्याच्या मनात येत नसतील का? त्याची लेकरंबाळं, त्याची सहचारिणी डोळ्यासमोर दिसत नसेल का? त्याचं मन परिवाराप्रती असणाऱ्या आसक्तीच्या, प्रेमाच्या बंधांनी बद्ध होत नसेल का? जेव्हा जीवनावरील आसक्तीपेक्षा, प्रेमापेक्षा जगण्यासाठी टिकून राहण्याचे प्रश्न अवघड होतात, आसक्तीचे पाश तटातटा तुटतात. उसवलेल्या जगण्याचे सगळे पीळ सैल होतात. जीव तुटतो तो मागे राहणाऱ्यांचा. भोग भोगावे लागतात मागे राहिलेल्यांना. केवळ पंचवीसतीस हजाराच्या कर्जाची धास्ती घेऊन जीवनयात्रा संपवतात. तेव्हा कुठेतरी भोजनावळीच्या हजाराच्या, लाखालाखाच्या पत्रावळी उठत असतात. अशा परिस्थितीला आपण देशाचा समतोल विकास वगैरे झाला, असं म्हणावं काय? काहींच्या वाट्याला सगळंच काही असावं आणि काहींच्या वाट्याला जगण्याइतपत पाशसुद्धा नसावेत का?

माणसाच्या जीवनात प्रश्न कालही होते. आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. मात्र प्रश्नाचं रूप पालटलं आहे. देशाचं दरडोई उत्पन्न वाढलं, पण दरडोई संवेदनशीलता कमी होत आहे. मला काय त्याचं, हा संकुचित विचार जगण्याचा संपन्न विचार असू शकत नाही. खिशात खुळखुळणारा पैसा आणि त्याच्या आवाजाने वेडावणारे मन, म्हणजे सगळंच काही असत नाही. बंगला, गाडी, माडी यातच सौख्य सामावलं असेल, तर भारत माझा देश आहे. सारे भारतीय बांधव आहेत, ही प्रतिज्ञा शाळेत शिकण्यापुरती आणि अर्थाशिवाय पाठांतरापुरतीच उरते. पुस्तकातलं जेव्हा मस्तकात उतरतं तेव्हाच जगणं संपन्न होतं. स्वतःभोवती सुखाचे वर्तुळ आखून त्यातल्या वलयांकित प्रगतीलाच विकास समजणं, वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेशी प्रतारणा नाही का? दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होणारी माणसं आपल्या आसपास नाहीत, असे नाही. शेकड्याने आहेत, पण त्यांच्या संवेदनांनी कितीही प्रयत्न केला, तरी आजूबाजूच्या वेदना कमी होऊन-होऊन किती कमी होणार आहेत? कमी करता याव्यात, म्हणून साऱ्यांनी थोडंतरी संवेदनशील होणं आवशक नाही का?

एखाद्या गोष्टीविषयी नुसती सहानुभूती असून चालत नाही. तिची अनुभूतीही असावी लागते. अनुभूतीशिवाय सहानुभूती विफल असते. माझा चौफेर विकास जरूर व्हावा. पण थोडा का असेना इतरांसाठीही तो असावा, असा विचार करून वर्तने हीच जगण्याची खरी श्रीमंती आहे. अशा जगण्याचे संस्कार कोणत्याही संस्कृतीचं संचित असतं. अशा संचिताची आपल्या देशात कमी नाही. आवश्यकता आहे, परिघाबाहेरच्या उपेक्षित जगाला आपल्यात सामावून घेण्याची. आपले वर्तुळ आणखी मोठे करण्याची. ज्यात माझ्यासह इतरांचं जगही सहज सामावेल एवढं. नसेल कोणी करीत तर मी तसे करीन, असं म्हणणाऱ्या उमद्या मनाची. गरज आहे समाजपरायण विचारांना अंगीकृत कार्य म्हणून स्वीकारण्याची. उदात्त विचारांना कृतिरूप देण्याची. आपल्या जगण्याचं वर्तुळ आणखी व्यापक करण्याची. कारण विश्वाच्या वर्तुळातून माणूस वजा केला तर मागे काय उरेल? या प्रश्नाचं उत्तरही एक मोठं वर्तुळ हेच असेल. प्रत्येक माणसाला हे ठाऊक आहे. उत्तर शोधण्याच्या पायऱ्या प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या, तरी अंतिमतः भोवतालच्या वर्तुळाला विश्वरूप देणारा एकच एक घटक विद्यमानकाळी विश्वात आहे, तो म्हणजे माणूस. माणसाइतकं विश्वात काहीही सुंदर नाही आणि त्याच्याकडे असणाऱ्या संवेदनांतून प्रकटलेल्या माणुसकीहून रमणीय काहीही नाही.