प्रतिसाद

By

माणूस नावाच्या जिवाची अनेकांनी अनेक अंगांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तो यथार्थ किती, अतिशयोक्त किती, अगम्य किती अन् असफल किती ते त्यालाच माहीत. पण वास्तव हे की, तो दिसतो तसा नसतो अन् असतो तसा कळतोच असंही नाही. कुणी म्हणेल यात नवीन काय? अशी संदिग्ध विधाने म्हणजे माणूस समजून घेणं नसतं. लिहायचं म्हणून काहीही शेंडाबुडखा नसलेली विधाने अक्षरांकित करायची अन् अर्धवट विचारांनी भरलेल्या गोण्या पाठीवर ठेवलेलं घोडं पुढे दामतट ठेवायचं असा अर्थ नाही होत. हे म्हणणं एक बाजू म्हणून अमान्य करण्याचं काहीच कारण नाही. कुणाचं काही मत असलं अन् ते मान्य नसलं, तर त्याला फाट्यावर मारून पुढे निघावं असं नसतं. मत कोणतंही असो, समर्थनाच्या बाजूने असो की, विरोधाच्या अंगाने त्यासोबत भलाबुरा काही असला तरी एक अनुभव असतो. तो धारणांचे किनारे धरून धावत असतो. असं असेल तर त्याला नाकारायचं तरी कसं? कारण किमान त्याच्यापुरतं तरी ते वास्तव असतं. 

अनुभव नावाच्या अनुभवाला अनुभवण्याचे अनुभव प्रत्येकाचे निराळे असतात. सापेक्षतेच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करत असतात ते. ही सापेक्षता मान्य केली, तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेली अनुभूती वेगळी असण्याची शक्यता अवास्तव कशी ठरवायची? वास्तव वेगळं असतं अन् कल्पित त्याहून भिन्न असू शकतं. ते नाकारण्यात कोणतंही हशील नसतं. असं असलं तरी आयुष्य काही सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. केवळ कल्पनेचे किनारे कोरत पुढे नेता येत नाही ते. त्याला वास्तवाच्या प्रतलावरून प्रवास करावा लागतो. खरं हे की, चांगली माणसे बेरजेच्या गणितात नाही सापडत. चांगल्याचा अभाव असणं काही असामान्य गोष्ट नाही. गोमट्या गोष्टींचा अभाव आसपास असण्यात नवीन काही नाही. चांगलं म्हणजे नेमकं काय? आदिम काळापासून इहतली नांदता असणारा हा प्रश्न. म्हणून माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास उडला असंपण नाही. याचा अर्थ जगातलं चांगुलपण एकाएकी सगळंच संपलं असाही होत नाही.  

माणूस विचारशील वगैरे जीव असल्याचा निर्वाळा जवळजवळ सगळ्यांनीच दिला आहे. कदाचित त्याच्या वर्तनात प्रासंगिक विसंगती असेलही. कोणी म्हणेल यात ते काय विशेष? अन्य जीव विचार करत नसतील कशावरून? यात वादाच्या वाटेने वळायचं प्रयोजन नाही. करत असतीलही. पण माणूस अन् अन्य जीव यात असणारी जगण्या, वागण्या, असण्याची तफावत समजून घेणार आहोत की नाही? विचार सगळेच करतात हे मान्य. पण सगळेच काही सुयोग्य विचारांनी वर्ततात असं नाही. विचार आहेत हे मान्य, पण विकारही सोबत आहेतच. बहुदा कणभर अधिकच आहेत. त्यांना वगळून  निखळ माणूस सापडला का कोणाला? 

माणूस विचार करतो हे ठीक. पण स्वतःचा विचार अधिक आणि आधी करतो. नाही का? असेल तसं. सगळेच जीव स्वतःपासून सुरू होतात अन् बऱ्याचदा स्वतःजवळ संपतात. स्व सुरक्षित राखण्याची उपजत जाण असतेच त्यांना अन् आसपासच्या असण्याचं भानही. जगाचं जगणं समजून घ्यायचीही आस अंतरी असते. कदाचित हेच कारण अज्ञात किनारे धरून वाहण्यास प्रेरित करत असेल. जिज्ञासा दिमतीला घेऊन माणूस आपणास माहीत नसणाऱ्या प्रदेशात काय आहे, हे डोकावून पाहतो. कदाचित या कुतूहलामुळेच तो आसपासच्या अज्ञात कोपऱ्यांचा धांडोळा घेत असतो. म्हणूनच इतर जिवांपेक्षा वेगळाही ठरतो.

शोधणं आलं म्हणजे, सापडणंही आहेच. पण प्रत्येकवेळी काही सापडेलच याची शाश्वती नाही. शोधणं अन् सापडणं दरम्यान अर्थ लावणंही ओघाने आलंच. तर्क नावाचा पडावही असतोच. अर्थ लावायचा तर आपल्या चौकटी पार करणंही आहेच. काही मिळवायचं, तर बांध पार करायला लागतात. बंधने मोडायची तर आधी स्वतःला तपासून पाहणं घडावं. प्रतिकाराच्या व्याख्या पडताळून पहाव्या लागतात. आपणच आपल्याला नीटपणे पाहता यावं, म्हणून आपल्या उंचीचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. स्वतःच स्वतःला पारखून पाहावं लागतं. असतील काही पापुद्रे तर खरवडून काढायला लागतात. असतील काही व्यवधाने तर पार करायला लागतात. बंधने परिस्थितीने निर्माण केलेली असोत अथवा आणखी कुणी. बंधनांच्या बांधांच्या पलीकडून परिवर्तनाचे सूर साद घालत असतात. त्यांना प्रतिसाद देता यावा. बदलाचा आवाज नसेल ऐकू येत तर दोष कानांचा की, कानांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा? माहीत नाही. पण योग्यवेळी आपणच आपणास बदलून घेता आलं की, आयुष्याचे एकेक पैलू आश्वासक वाटू लागतात अन् साद घालणारे अनोळखी आवाज आपलेच आपल्याला कळत जातात.

चंद्रकांत चव्हाण 


0 comments:

Post a Comment