खुजी क्षितिजे

By // No comments:

मृगजळी सुखांचा मोह मोडता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटं असतं. त्याला आकार तर असतो, पण आत्मा नसतो. मोठेपण मिळवण्याच्या मोहात माणसे परिणामांची पर्वा न करता बऱ्याच उलाढाली करत राहतात. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. चिमूटभर त्यागही समर्पणाची परिमाणे उभी करू शकतो, फक्त त्याची भाषा समजून घेता यायला हवी. संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचं संवर्धन होत नसतं. त्यांचं संक्रमण होणं आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच; पण आचरणात आल्यास अधिक गोमटी होतात. त्याग, समर्पण वगैरे गोष्टी कृतीत सामावल्या की, अधिक देखण्या दिसतात. 

माणसांचा स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं नेमकं अंतर कळायला हवं. हेच अवघड असतं. पण वास्तव हे आहे की, आपण आपल्याच आकृतीच्या प्रेमात पडलं की, आसपासचे आकार ओबडधोबड दिसायला लागतात. काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि विज्ञानाने दिलेली निरांजने हाती असताना, अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची अनायासे संधी असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत असतील? 

जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व'तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. हे कुणीही सामान्य माणूस सांगू शकतो. पण सामान्यतः स्वातंत्र्याचे संदर्भ समजून जगणं सगळ्यांना साधतंच असं नाही. सामान्यांच्या कांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचं सहज रूप असतो. पण तो काही सहजपणे असण्यात सामावत नाही. त्यासाठी कितीतरी सायास करावे लागतात. स्वातंत्र्याचे सूर अन् मुक्तीची गाणी आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणं मानवकुलाची सार्वकालिक आवश्यकता असते. 

माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना भवताल विसरतात. आकाश अफाटपण विसरलं की, क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी अन् अनोळखी वाटांनी आणलेली सुखे मनाला सुखावू लागली की, विस्ताराचे स्वाभाविक अर्थ हरवतात. विश्वकल्याणच्या प्रार्थना कोरड्या होऊ लागतात. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाची सीमा विस्तारत जावून आत्मकेंद्री जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टींचे संदर्भ साखळ्यातून सुटू लागतात. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात. त्यांना ना दिशा असते, ना मुक्कामाचा पडाव. आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो. 

‘स्व’भोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत असण्याची आस असली की, प्राप्तीची परिमाणे पालटतात. मूल्ये वगैरे गोष्टी केवळ सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या वर्तुळाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलं की, परिघावरच्या प्रदक्षिणा प्रगतीची परिभाषा होऊ पाहतात. त्यांना गती तर असते, पण प्रगती नसते. माणूसपण संकुचित विचारांनी वेढलं गेलं की, सहजपण संपतं. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणं विपर्यास असतो. नाही का?

स्वत्त्व अन् सत्त्व अबाधित राखण्यासाठी स्वाभिमान असायला लागतो. लाचारी लाथाडण्यासाठी स्वाभिमानालाही स्वत्त्वाची जाणीव असायला लागते. जगण्यात सत्त्व असते, ते कुणा कृपाकटाक्षाचे आसुसलेले नसतात. कृपेची छत्रे घेऊन जगणारे फारतर आपली सद्दी सुरू असल्याचा अन् स्वनामधन्यतेचा आनंद घेऊ शकतात. असा हर्ष काही चिरंजीवित्वाचे अभिलेख कपाळी कोरून आलेला नसतो. त्या असण्याला माणूस म्हणून असणारे कणभरही कंगोरे नसतात. शोधलंच अन् असलंच काही, तर केवळ कोडगेपण असतं. अर्थात, अशा असण्यालाही समर्थनाचा मुलामा चढवून उदात्तीकरण करता येणं अवघड नसतं. वैयक्तिक कारणासाठी कुणाची कृपा स्वीकारली की, स्वाभिमान केवळ सांगण्यापुरता उरतो, हे वास्तव अस्वीकार करून कसे चालेल. कुठे, केव्हा अन् किती वाकावं, हे कळलं की, माणूस असल्याचे संदर्भ इकडेतिकडे शोधावे लागत नाहीत. संदर्भ सोडून जगणाऱ्यांना आपण सफल असल्याचं वाटत असेलही, पण ही सफलता किती काळ असते? याचं उत्तर सापडणं अवघड. कुणातरी क्षुल्लक नजरेत मोठं बनण्यापेक्षा माणूस बनणं अवघड असतं.

- चंद्रकांत चव्हाण