Jindagi | जिंदगी...

By
एक दिन जिंदगी जन्नत मे बदल जायेगी.

ये किताबोकी दुनिया समजते समजते जिंदगी निकल जायेगी,
थेअरी के कन्सेप्ट मे लाईफ की इक्वेशन बिगड जायेगी,
सोचते है निकल आये किताबोकी दुनियासे, पर इतना पता है की,
इन्ही किताबोसे एक दिन जिंदगी जन्नत मे बदल जायेगी.
काही दिवसापूर्वी माझ्या मोबाईलवर आलेला हा मॅसेज. शिक्षण आणि शिक्षणव्यवस्थेसंबंधी ज्याने आपले स्वतःचे अनुभव विश्व स्वतःपुरते तयार केले आहे अन् शिकणं आवश्यकच असल्याने व्यवस्थेच्या वर्तुळात गरागरा फिरायला लागले आहे, अशा कोणाच्यातरी अनुभवातून हे शब्द प्रकटले असावेत. त्याच्या मनातील हे शब्द मॅसेज बनून फॉरवर्ड होत राहिले. इकडे, तिकडे पळत राहिले. आला. वाचला. वाटला चांगला. पाठवला पुढे. या क्रमाने तो माझ्यापर्यंत पोहचला. वाचला. वाचून त्याचा उल्लेख करावासा वाटला. केला.

हे मॅसेजच्या लेखनकर्त्याचे यश म्हणावे की, शिक्षणव्यवस्थेच्या बंदिस्त चौकटीतील अनिवार्य प्रक्रिया म्हणून पुस्तकांच्या दुनियेत हरवलेल्या (की हरलेल्या) मनातील खंत असावी. खरंतर शिक्षण नावाचा अध्याय बालवयापासूनच आपल्या जीवनग्रंथात लेखांकित केला जात असतो, नव्हे करावाच लागतो. तो तुम्ही स्वतः लिहिणार नसाल, तर लिहिण्यासाठी उत्सुक असणारे अनेक उत्साही हात आनंदाने पुढे सरसावतात. तो लिहिण्यासाठी काहीतरी व्यवस्था उभी करणे गरजेचे असते. या गरजेतूनच शाळा नावाची संस्था माणसांनी निर्माण केली. तिचं रूप आकाराला आणण्यासाठी आजूबाजूला चार भिंती उभ्या केल्या. त्यावर छत घालून ऊन, वारा, पावसापासून सुरक्षित केले आणि सुरक्षेच्या अभेद्य चौकटीत शिकण्यासाठी बाहेरचे चैतन्यदायी प्रवाह आणून कोंबले. या प्रवाहांना बांध घालून योग्य दिशेने वळते करण्यासाठी इमारती उभ्या केल्या. या इमारतींमधून शाळा नावाचं अस्तित्व ठरवून दिलेल्या चौकटीसोबत उभे राहिले. सर्वमान्यतेची मोहर घेऊन.

शाळा, शिक्षण या शब्दांचा जीवनातील अर्थ समजायला आयुष्याची काही वर्षे खर्ची करायला लागतात, तेव्हा त्याचं महत्त्व पुढे जाऊन कुठेतरी समजतं, हे खरंय. पण जोपर्यंत ते समजत नाही, तोपर्यंत शाळा हा जीवनातील नकोसा वाटणारा अध्याय असतो. शाळा आयुष्यातील अनिवार्य बाब असूनही किती जण तिचा आनंदाने स्वीकार करतात? जेथे आनंद असतो तेथे आपुलकी निर्माण होते. शाळा आपुलकीचे, आनंदनिर्मितीचे आलय न ठरता फक्त विद्यालय म्हणून ओळखल्या जात असतील आणि जेथे विद्यासंपादन करताना; संपादनातील आनंदाला सोयिस्कर बाजूला सारले जात असेल, तर शाळेविषयी आस्था कशी निर्माण व्हावी? माणसांना शिकवावे लागते. त्यासाठी व्यवस्था उभी करावी लागते, तिचे काही नियम तयार करून चौकटी तयार कराव्या लागतात, हेही खरेच. पण नियमांच्या चौकटीत जिज्ञासेने, आपुलकीने प्रवेश करणे दूर राहून त्याची जागा आवश्यकता, अनिवार्यता घेत असेल तर शिक्षणातून आनंद निर्माण होईल कसा? व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हटले जाते. जर व्यक्ती आणि त्यांच्या प्रकृती भिन्न असतील, तर व्यक्तींना दिले जाणारे शिक्षण एकाच प्रकृतीचे का असावे? चॉइस असतो तेथे संधी असते आणि संधीमधून आनंद शोधता येतो. पण जेथून आनंदाला दुर्लक्षित केले जाते; सब घोडे बारा टके यावर विश्वास ठेऊन घडण्याची, घडवण्याची सक्ती केली जाते, तेथे आपुलकी, आस्था निर्माण होण्यासाठी संधी उरतेच किती?

विश्वातील यशस्वी माणसांच्या आयुष्याचं थोडं अवलोकन केलं तर कळतं, त्यांच्या आयुष्यात शिक्षण जरूर होतं; पण शाळा नावाच्या चौकटीत ही माणसं अशी रमलीच किती? पुस्तकांनी घडविलेले आयुष्य सोबत घेऊन वंचितांच्या आयुष्यातील गुलामगिरीच्या शृंखला विखंडित करणारे अब्राहम लिंकन, शाळेतील अभ्यासात फारशी प्रगती नसणारा; पण जीवनाची गती आणि प्रगती विज्ञानातून शोधणारा आईनस्टाईन, घराच्या हलाखीच्या परिस्थितीने शाळा सुटली; पण हातातील पुस्तक न सोडणारा न्यूटन ही जग प्रसिद्ध नावे आभाळाच्या छताखाली, जग नावाच्या मुक्त शिक्षणव्यवस्थेतून जेवढे शिकले, तेवढे शाळेतून शिकले असते का? हाही एक प्रश्नच आहे. शाळेत शिकणे आणि शिकवणे ह्या क्रिया यांत्रिकतेने होतात, तेव्हा त्यांची थेअरी होते आणि त्या थेअरित आयुष्याच्या कन्सेप्ट आपल्याभोवती स्वतःचे स्वतःपुरते एक वर्तुळ उभे करतात. पुस्तके फक्त गुण मिळवण्यासाठीच वाचली जात असतील, त्याच्यातून जीवन संपन्न करणारी गुणवत्ता शोधण्याऐवजी फक्त गुणांचाच शोध घेतला जात असेल, तर ती प्रिय कशी वाटतील?

आपण शाळेत असताना पुस्तकांमध्ये काय शिकलो, हे विसरून गेल्यानंतर आपल्या जवळ मागे शिल्लक राहते, ते शिक्षण असते. हेच खरे जीवनशिक्षण असते. शाळांना जीवनशिक्षण मंदिर नाव दिले, म्हणून तेथून जीवनाचे शिक्षण मिळेल आणि जीवनाला मंदिराचे पावित्र्य मिळेलच, असे नाही. आपण जेथून शिकलो, ते द्वार ज्ञानाचं मुक्तद्वार असेल, तर संकुचित विचारांच्या भिंती उध्वस्त करता येतात. व्यापक विचारांतून शिक्षणाचा संबंध जीवनाशी जोडता येतो. शिक्षणातून माणसं जोडणं आणि जोडलेली माणसं घडणं अभिप्रेत आहे; पण शिक्षणाचे वर्तुळ भाकरीच्या वर्तुळाशी जोडून आपण त्याला चाकरी पुरते सीमित केले आहे. भाकरी महत्त्वाचीच; पण ती मिळवताना कशी आणि कोणत्या मार्गाने मिळवावी, हे ज्ञानही असणे महत्वाचे नाही काय?

जीवन घडताना, घडवताना संघर्ष अटळ असतो. ही संघर्षयात्रा सफल करायला सक्षम करणारे शिक्षण असावे. शिक्षण हा कधीही न थांबणारा प्रवाह आहे. काही या प्रवाहात आपली तहान भागवण्यासाठी येतात. काही चारदोन घोट घेण्यासाठी येतात, तर काही एखादी चूळ भरण्यासाठी येतात. कोण काय घेतो, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. शिक्षणातून ज्ञानाची तहान निर्माण व्हायला हवी. ही तहानच माणसाला लहान-मोठं बनवीत असते. प्रत्येकाकडे विशिष्ट क्षमता असतात. त्या क्षमताना स्मरून माणसाला माणूस बनविणारे आणि माणूस घडविणारे शिक्षण मिळत असेल तर ते अप्रिय कसे वाटेल?

अँड्रयू कार्नोगी या विचारवंताने म्हटले आहे, सामान्य माणूस आपल्या क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश एवढे काम करतो. जी माणसं क्षमतेच्या पन्नास टक्के काम करतात, त्यांना जग सलाम करतं. जी माणसं क्षमतेचा पूर्ण वापर करून शंभर टक्के काम करतात, त्यांना जग डोक्यावर घेतं. जगाने डोक्यावर घ्यावे अशी संपन्न व्यक्तित्वे घडविण्यासाठी प्रयत्नरत असणारी शिक्षणव्यवस्था अप्रिय ठरू शकत नाही. प्रश्न आयुष्याच्या गुणवत्तेचे असतात. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेचेही असतात. केवळ गुणपत्रिकेतील गुणांमध्ये गुणवत्ता शोधणारे आय.क्यू. (इंटेलिजन्ट कोशंट) मोजून समाधानी असतील आणि जगणं समृद्ध करणारा इ.क्यू. (इमोशनल कोशंट) दुर्लक्षित राहत असेल, तर जगणं श्रीमंत कसे होईल? शिक्षणातून विचारांचं मंथन घडत असेल, मिळवलेल्या ज्ञानातून संशोधन घडत असेल; पण ते सर्वांसाठी नसेल तर त्या शिक्षणाचा, केलेल्या संशोधनाचा उपयोगच काय? केवळ आय.क्यू. वाढत जाऊन इ.क्यू. कमी होत जाणे, हा शिक्षणातून संपादित केलेल्या विचारांचा विपर्यास नव्हे काय?

शिक्षणाच्या स्वतःच तयार केलेल्या ठोकळेबाज कप्प्यांमध्ये आम्ही आम्हालाच बंदिस्त करीत आहोत का? दहावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यातील बऱ्याच जणांना डॉक्टर नाहीतर इंजिनियरच व्हायचंय. जणू काही आता या देशात अन्य व्यवसायांची आवश्यकताच उरली नाही. आपण आपल्यापुरत्या तयार केलेल्या संकल्पित ठोकळ्यात उभं राहून स्वतःला शोधणं आणि तो सापडावा म्हणून धडपडत राहणं, हा विचार शिक्षणाला कोणत्याही संपन्न पथावर नेणारा नाही. ठरावीक व्यवसायातील आर्थिक गणिते अभ्यासणे आणि त्यातून जीवनात प्रवेशणारी स्थिरता, संपन्नता, स्टेटस या गोष्टीना अनाठायी महत्त्व मिळत जाणे, हा शिक्षणयोग नाही. आय.आय.टी, आय.टी.वाल्यांना समाजात जो मान मिळतो, त्यातील किती मान कला शाखेच्या पदवीधराच्या पदरी पडतो? मेळघाट व्हॅली विसरून सिलिकॉन व्हॅलीची स्वप्ने मनात रुजत असतील. मनातून विचारात आणि विचारातून कृतीत येत असतील तर दोष कुणाचा, शिक्षणाचा की शिकणाऱ्यांचा?

व्यक्तींना व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य असावं, हे मान्य. पण सगळं क्रीम संपन्नतेच्या वाटांनी प्रवाहित होताना आजूबाजूला दिसते आहे. अधिक गुण संपादन करणारे सुखासीन आयुष्याच्या वाटा शोधायला निघतात. मागे उरलेले सर्वसाधारण या-त्या वाटांनी पांगतात. थोडं बरं ज्ञान असलेले अन्य व्यवसायांना जवळ करतात. शिक्षणाने ढ ठरविलेले शेतीकडे, मजुरीकडे वळतात. ज्यांना हुशार ठरविले; त्यांच्यापैकी कितीजण श्रमाच्या कामाकडे, शेतीकडे वळतात? वर्गात मुलामुलींना तोंडी परीक्षा घेताना पुढे जाऊन तुला काय बनायचं आहे? हा प्रश्न मी हमखास विचारतो. सगळेच- अगदी यथातथा शैक्षणिक प्रगती असणारेही- मी डॉक्टर होईन, मी इंजिनियर होईन असेच सांगतात; पण मी शिक्षक होईन, शेतकरी होईन म्हणून चुकूनही बोलत नाहीत. जणू साऱ्यांना एकाच छापाचे नमुने व्हायचे आहे.

शाळेतून मिळणाऱ्या शिक्षणाचा रोजच्या जगण्याशी संबंध असावा, असे म्हटले जाते; पण हा संबंध आहेच किती? असलाच तर परीक्षेतील गुणांशी आणि गुणांचा संबंध परीक्षेशी, परीक्षेचा स्मरणशक्तीशी एवढाच. गुण विसरून गुणवान माणूस बनण्याशी आहे तरी किती? चांगला नागरिक म्हणून शाळेत स्वतःला किती घडविले, या प्रश्नाचं उत्तर शोधाल कसं? शाळेतील शिक्षणातून शिस्तीचे धडे घ्यायचे आणि रस्त्यावरून बेशिस्त बनून चालायचे, याला काय म्हणाल? परदेशात जाऊन तेथील वातावरण पाहून आल्यावर तिकडे असणाऱ्या शिस्तीचे, स्वच्छतेचे गुणगान करायचे आणि आपल्या देशात आल्यावर पान खाऊन रस्त्यावर थुंकायचे. येथील सार्वजनिक शिस्त, गलिच्छपणा, बेफिकीर वृत्तीविषयी बोलायचं. हीच आपल्या शिक्षणाची उपलब्धी आहे का? कायदे तेथे आहेत, तसे येथेही आहेत. कायदा करून सारेच प्रश्न सुटत नसतात. ते आचरणात आणून, त्याचं प्रामाणिकपणे पालन करूनच निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

शिक्षण देशातील बऱ्याच घरांपर्यंत पोहचले आहे. अजून काही ठिकाणी पोहचायचेही आहे. शिक्षणाचा विस्तार झाला आहे. विस्तार झाला; पण त्याच्या दर्जाचे, गुणवत्तेच्या विस्ताराचे काय? सांप्रतकाळी आपल्या देशातील किती विद्यापीठे जागतिक क्रमवारीत शीर्षस्थानी आहेत? शिकणाऱ्यांची संख्या वाढून उपयोग नाही, शिकणाऱ्यांची गुणवत्ताही वाढायला हवी. शिक्षणातून गुणांचे संवर्धन होते, तेव्हा नागरिकशास्त्राच्या पाठात शिकवलेल्या नागरिकांसारखे स्वतःहून वर्तणारे आदर्श नागरिक आपणास आपल्या आसपास दिसतील. चाकोरीतला रस्ता कोणतेही नवी ठिकाणे शोधू शकत नाही. आपले शिक्षण मळलेल्या वाटेवरून चालत आहे. शाळेत शिकवला जाणारा अभ्यास कर्मकांड ठरू पाहत आहे. अभ्यासाचे तेच ते साचे, त्याच पद्धती, तसेच गृहपाठ, तसेच स्वाध्याय. हे कर्मकांड नेमकेपणाने करता यावे, म्हणून मास्तराने लिहून दिलेल्या आयत्या नोट्सही अशाच. हेही नसेल आयते मिळत, तर बाजारातील मार्गदर्शकाची सोबत आहेच. शिकणाऱ्याच्या हाती रोज एक आयता मासा दिला जातो. मासा पकडण्यासाठी लागणारं जाळं आणि ते कसं टाकावं यासाठी लागणारी कौशल्ये आपल्या शिक्षणातून किती दिली जातात? मुलांना स्वावलंबी, संपन्न, स्वतंत्र बनवणारे त्यांच्या पायावर सक्षमपणे उभं करणारे, आत्मविश्वास जागृत करून मनात ज्ञानलालसा निर्माण करणारं शिक्षण पुस्तकातील पाठांमध्ये लपलं आहे. पण ते शोधण्यासाठी पाठातील ज्ञानाचे, त्यातील अनुभवाचे उत्खनन होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने ज्ञान परीक्षेतील उत्तरे लिहिण्यासाठी पाठांतरापुरते उरले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा निर्माण करण्याचे काम शिक्षकाचे; पण तो अन्य कामात जुंपला गेला आहे.

शिक्षक ज्ञानाची आसक्ती बाळगणारा असावा. अध्यापनकार्याविषयी विरक्ती धारण करणारा नसावा. पुस्तकात पुरलेल्या धड्याना उकरून अर्थाची फोलपटे उडवणारा नसावा. पुस्तकातून मस्तकात पोहचवण्यासाठी धड्यांमधून जीवनाच्या विविध पैलूंचे उत्खनन करणारा असावा. सर्जनाचे नवे प्रवाह शोधून जीवनाचा अर्थ संक्रमित करणारा असावा. त्याला वंचित, उपेक्षितांच्या सुविधाविरहित जीवनाविषयी जाणीव असेल, त्यांच्या अशा जगण्याने त्याचे अंतकरण गलबलून येत असेल, तर कोणतीही आव्हाने स्वीकारायची त्याची तयारी असते. अशा स्वयंप्रकाशित दिव्यांकडे शिकणारी मने आस्थेने वळतील. अर्थात सगळेच असे असतील, असेही म्हणण्याचे कारण नाही. शिक्षणाला आणि शिक्षकाला निवृत्ती कधीच नसते, कारण काहीतरी शिकणे माणसाच्या जगण्याची सहज प्रवृत्ती आहे. काहीतरी शिकविण्यासाठी शिक्षणगंगा अखंड प्रवाहित ठेऊन प्रवाह अवरुद्ध होण्यापासून मुक्त ठेवावे लागतील. प्रदूषणापासून संरक्षित करावे लागतील.

पर्वताचे शिखर सर करू पाहणाऱ्यापैकी साऱ्यांनाच कळसापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. म्हणून अर्ध्यावरून परतणाऱ्यांपुढचे नी प्रयत्न सोडायचे नसतात. शिक्षणाच्या विस्ताराचे प्रयत्न होत असताना गुणवत्तेचाही विस्तार घडत राहणे अपेक्षित आहे. गुणवत्ता केवळ बोर्डाच्या परीक्षेतील गुणवत्तायादीचा आधार घेऊन ठरत नसते. या गुणांच्या मोजपट्ट्यांपलीकडे गुणवत्ता आणखीही आहे, याचं स्मरण असावं. ‘प्रथम’ या संस्थेने शाळेतील मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या केलेल्या सर्वेक्षणात सुमारे पन्नास टक्के मुलं पुस्तक धड वाचू शकत नसतील, सत्तर टक्के मुलं गणित सोडवू शकत नसतील, तर शिक्षणाच्या गुणवत्तेचे प्रश्न सुटतील कसे? सोडवायचे कोणी? अंगावरील एकच एक सदरा हीच आपली मोठी कमाई मानणारे आगरकर, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून आत्मतेजाचा प्रकाश शोधणारे, दिव्याखालचा प्रकाश हीच आपली श्रीमंती समजून जगाला विज्ञानाच्या प्रकाशाने श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करणारे रघुनाथ माशेलकर अशा शिक्षणातून घडतील कसे?
  
आमच्या विषयातील किमान जाणकार (?) म्हणून आम्ही काही शिक्षक मराठी विषयाच्या शिक्षकपदासाठी मुलाखतीस आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो. तेथील अनुभव विस्मयचकित करणारा होता. एम.ए.ला अभ्यासलेला तुमचा आवडता विषय कोणता आणि का? असे साधे प्रश्न विचारल्यावर एम.ए.पदवी घेतलेले आवडता विषय कोणता सांगावा याचा विचार करीत राहिले. एम.एड., एम.फिल झालेली माणसं सलगपणे चार वाक्ये बोलू शकत नव्हती. मातृभाषा विषयात पदव्युत्तर पदवी घेणाऱ्यास अस्खलित चार वाक्ये बोलता येत नसतील, तर गुणवत्तेसाठी निकष वापरायचे कसे आणि कोणते? त्यातही कहर म्हणजे व्याकरणातील शब्दांच्या जाती कोणत्या हेसुद्धा माहीत नसावे. ऐवढेच काय; पण स्वतःचे नाव नामाच्या कोणत्या प्रकारात येते, हेही भविष्यातील शिक्षकांना माहीत नसावे. बाकी गोष्टी तर कोसो दूर राहिल्या. घडतील कशा पिढ्या? अभ्यास पदवी घेण्यासाठी आणि परीक्षेपुरता करायचा, हीच शिक्षण घेणाऱ्याची पात्रता बनत चाललेली आहे. गुणवत्ता परीक्षेत अडकली असेल; परीक्षा अभ्यासक्रमात आणि अभ्यासक्रमात वार्षिक नियोजनाच्या चौकटीत अडकला असेल, तर आणखी दुसरे काय होईल.

या मॅसेजमधून व्यक्त भावना अशीच काहीशी खंत व्यक्त करते. थेअरीच्या संकल्पनेत यशाचे सोपान शोधून शॉर्टकट तयार केले जात असतील; तर आयुष्याची समीकरणे बिघडत आहेत, हे म्हणण्याला अर्थच उरत नाही. तरीही आम्ही आमच्या शिक्षणव्यवस्थेतून स्पर्धेत धावण्यासाठी घोडे तयार करीतच आहोत. अभ्यास परीक्षेपुरता आणि परीक्षेतील गुणांसाठी करायचा ठरल्यावर पुस्तकातील धड्यांमधून जीवनासाठी धडे शोधतो कोण? परीक्षा, अभ्यास, निकाल आणि कपाळी पदवीचा टिळा. या तंत्रातून निर्मित चौकटींना ओलांडून अद्यापही आम्हाला बाहेर निघता आले नाही. पुस्तकांत जे दिलं आहे त्यातून आयुष्यात आनंद अवतरेल हा एक आशावाद आहे. तो जगण्यात यावा म्हणून आयुष्याला आनंदाचं अस्तित्व मिळवून द्यावं लागेल. याकरिता आपल्या अंगणी आनंदाचे झाड लावावे लागेल. आमच्या शिक्षणव्यवस्थेतून अशी झाडं जगवता येतील, असा आशावाद बाळगायला काय हरकत आहे.

0 comments:

Post a Comment