Result | रिझल्ट

By
संपलं एकदाचं शाळेचं शैक्षणिक वर्ष. वर्षभराच्या प्रगतीचे कागद प्रगतिपुस्तक, प्रगतिपत्रक अशी गोंडस नावं धारण करून शिकणाऱ्या मुलामुलींच्या हाती पडले. मास्तरांनी ठरवून दिलेल्या मोजपट्ट्या वापरून मुलांच्या वर्षभराच्या शैक्षणिक प्रगतीची मोजमापे केली. दिलेल्या मापात काही फिट्ट बसली. काहींची जोडपट्ट्या वापरून उंची वाढवावी लागली. त्या उंचीसह मुलांची प्रतवारी ठरली. कोण हुशार, कोणी साधारण, कोणी अप्रगत इत्यादी इत्यादी. आपापले परगणे घेऊन त्यांची शैक्षणिक प्रगती प्रगतिपत्रकात बंदिस्त झाली. हे प्रगतीबंद पेटारे उघडण्याचा दिवस साऱ्या शाळांमध्ये निकालाचा दिवस म्हणून ‘नेमेचि येतो पावसाळा’ तसा येत राहतो, प्रत्येक वर्षी. ठरलेल्या वेळी न चुकता. येताना एक अनामिक हुरहूर सोबत घेऊन येत असतो. आता मात्र ती हुरहूर हरवत चालली आहे. परीक्षेच्या निकालाचा दिवस केवळ उपचारापुरता उरला आहे. ना त्याची कोणाला फारशी उत्सुकता. ना कुतूहल. आठवीपर्यंत मी पास होणारच (?) म्हणून सारे कसे निर्धास्त. पुढच्या वर्गातला प्रवेश ठरलेला असल्याने प्रत्येकजण आपापल्या सवडीने शाळेत येतो. निकाल घेतो आणि पळतो. थोड्याफार फरकाने शाळाशाळांमध्ये दिसणारे हे दृश्य सगळीकडे सारखेच आहे.

निकालाचा दिवस म्हणण्यापेक्षा, शालेय शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस म्हणूया. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल द्यायचा असल्याने पाचवी ते आठवीचे सगळे वर्गशिक्षक आपापल्या वर्गांचे प्रगतिपत्रके इत्यादी साहित्य घेऊन वितरणासाठी शाळेत तयार. शाळेची बेल झाली. राष्ट्रगीतासाठी सारे शाळेच्या चौकात एकत्र उभे. बेल होऊन दोनतीन मिनिटे झाली. शाळेतील अडीच-तीन हजार विद्यार्थ्यामधून फक्त शेदोनशे डोकीच तेवढी रांगेत उभी. राष्ट्रगीत झाले. निकाल वाटपासाठी सूचना दिल्यानुसार विद्यार्थी नेमून दिलेल्या वर्गखोल्यांकडे वळले. वर्गशिक्षक नसणारे काही शिक्षक शाळेच्या चौकात उभे होतो. निकाल वाटपाच्या आजच्या दिवसाचे दृश्य पाहून आमच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर, पाचसहा वर्षापूर्वीचे शाळेचा निकाल वाटपाचे आणि आत्ताचे चित्र पाहून तुम्हाला काही फरक जाणवतो का?” त्यांच्या बोलण्याचा रोख लक्षात न आल्याने प्रश्नांकित चेहरे त्यांच्याकडे नुसतेच पाहत राहिले. आमच्या चेहऱ्यावरील पालटणारे भाव त्यांना समजले. म्हणाले, “पाचसहा वर्षापूर्वीचा परीक्षेच्या निकालाचा दिवस आठवा. दिलेल्या वेळेच्या आधीच मुलं, मुलांचे पालक शाळेत उपस्थित. बेल व्हायचा अवकाश दीडदोन हजारांचा लोंढा वेगाने आत शिरायचा. त्यांना आवरताना नाकीनऊ यायचं. आज- ना कोणाला निकालाची उत्सुकता. ना कोणाला हुरहूर.”

एक शिक्षक बोलते झाले. म्हणाले, “अहो, पास आणि नापास या द्वंद्वाची आता काळजी उरलीच आहे कोठे? जर सगळेच पास होणार असतील आणि पुढच्या वर्गात प्रवेश होणारच असेल, तर येथे या. रांगा लावा. निकाल घ्या. हे सगळे करायला वेळ आहेच कुठे पालकांना हल्ली एवढा.” त्यांना थांबवत दुसरे शिक्षक म्हणाले, “सर, तुमचं काहीतरी चुकतंय! पास नापास नाही कसं! सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाने मुलं नापास होत नाहीत, असं कुठंय? जर पोरगं काहीच अभ्यास करणार नसेल तर त्याचा मुक्काम ठरलेलाच.” “ठीक आहे सर, मुक्काम होऊ शकतो. पण असे मुक्काम घडतातच किती? नापास केलेच कोणाला तर त्याच्या अभ्यासाचे पुनर्भरण करूनच पुढच्या वर्गाला पाठवावे लागेल. पर्यायाने त्याच्यासाठी संबंधित शिक्षकाला आपला अधिकचा वेळ देवून हे सोपस्कार पार पडावे लागतील. आहे एवढे सारे सव्यापसव्य करायची तयारी? त्यापेक्षा द्या धक्का. पाठवा वरच्या वर्गात, हे सोप्पं नाही का? पहिले शिक्षक म्हणाले.

संवादात सामील होत आणखी एक शिक्षक आपला अनुभव कथन करीत उपहासाने म्हणाले, “सर, दे धक्का तंत्र खरंच महान कार्य आहे हो, आपल्या शिक्षक पेशाचे! काय सर्जनशीलता असते बघा आपल्या एकेकाकडे. अहो, पोरगं पहिलीपासून ढकलत ढकलत थेट नववीत. येथे पोहचल्यावर कळते त्याच्या प्रगतीची गती आणि अधोगतीही. माझ्याच वर्गातील अनुभव सांगतो, माझा मराठीचा तास. म्हटलं आपण काय शिकवलं, मुलं काय शिकली, हे पाहावं जरा. लागलो शिकविलेल्या घटकावर प्रश्न विचारायला. एकेक करीत शक्य होईल तेवढ्यांना प्रश्न विचारीत गेलो. जमलं त्यांनी दिली उत्तरे आपापल्यापरीने. एका विद्यार्थिनीला केलं उभं. उत्तर देण्यासाठी ती काही उभी राहीना. तिला परत सारं समजावून सांगितलं. म्हणालो, सांग बरं आता, या प्रश्नाचं उत्तर. तिच्याकडून उत्तराबाबत काहीच प्रतिसाद नाही. शेवटी थोडा रागावून म्हणालो, नाहीना येत उत्तर! असं कर, हा धडा आहे. वाच मोठ्याने. नाईलाजाने का होईना, काहीतरी वाचण्याशिवाय पर्याय नसल्याने ती पुस्तकातील पाठ वाचू लागली. तिने केलेले वाचन ऐकून बेशुध्द व्हायची वेळ आता माझी होती. स्वतःला थोडं सावरलं विचारलं, बाबा काय करतात ताई तुझे? म्हणाली, शिक्षक आहेत. आता मात्र, माझा घसा कोरडा पडायला लागला. काय हे? काय म्हणावं याला? सर्वशिक्षा अभियानाचे सार्वत्रिक यश की आपल्या व्यवस्थेतील शैक्षणिकप्रगतीचे यश? ही मुलगी या टप्प्यापर्यंत पोहोचली कशी? याचंच आश्चर्य वाटतं. शिक्षकपाल्याची ही स्थिती आणि तीही या वळणावर. तर इतरांचं काय असेल? खरंतर तिला येथपर्यंत आणणारी व्यवस्था महान वगैरेच म्हटली पाहिजे.”

आमच्यातील आणखी एक शिक्षक आपला राग व्यक्त करीत म्हणाले, “सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धत चांगली की, वाईट हा वादाचा मुद्दा जरा बाजूला ठेवू या! शिक्षणव्यवस्थेत प्रयोगशीलता आवश्यक असते, ही गोष्ट एकदम मान्य! प्रयोगच केले नाहीत तर काळाच्या नव्या प्रश्नांशी आपण भिडणार कसे? प्रयोगशीलता मान्य. पण प्रयोग करून जगाला निष्कर्ष देणारे आईनस्टाईन आपल्या प्रयोगशाळांमध्ये आहेत किती? असले तरी बोटावर मोजण्याएवढे. प्रयोग करावे लागतात. निरीक्षणे करून निर्णय घ्यावे लागतात. चुकलो तर पुन्हा दुसरा प्रयोग हाती घ्यावा लागतो. अनुमान बांधावे लागतात. आम्ही मात्र हे प्रयोग कागदावर शक्य करून दाखवितो. पर्यायाने कागदी गुणवत्तेचे घोडे थयथय नाचते. त्याचा पदन्यास पाहण्यात आम्ही हरकून जातो. पण त्याच्या पावलांनी उडणाऱ्या धुळीकडे आमचे साफ दुर्लक्ष. असं का घडावं? आपण याची काळजी का करीत नाहीत?”

“आस्था असते ना, तेथे आपलेपण असते. असं आपलंपण आपल्यात आणि समाजातही आज कितीसं उरलंय? आपल्या वेळेचा शाळेचा काळ आठवून पाहा तेव्हाचे शाळामास्तर. त्यांची सेवापरायणता. समाजाकडून मिळणारा मान. मास्तर फक्त वर्गापुरता नसायचा. सगळ्या गावाचा असायचा. गावातील सुख, दुःखाचा सोबती असायचा. साक्षीदार असायचा. बनगरवाडी कादंबरीतील राजाराम मास्तरासारखा मास्तर आपल्या वाड्यावस्त्यांमध्ये दिसतो का? ‘रातवा’मधील नलगे मास्तर दूर दुर्गम भागातील शाळेशीच नाही, तर गावाशीही एकरूप होतो. तेथून बदली झाली म्हणून व्यथित होतो. आज असा मास्तर आपल्या भोवती दिसतो तरी का? मोक्याच्या जागी बदली नाही, म्हणून जीवाचं रान करण्याचा हा काळ. आडवळणी भाग म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा मानण्याची मानसिकता. तेथे बदली नको म्हणून काहीही करायचं बाकी न ठेवणारी आम्ही माणसं. एवढंच कशाला, आपणच आपल्याला बघाना! आपण कोणत्या वर्तुळात उभे आहोत? वैयक्तिक प्रयोजनासाठी कोणत्यातरी दावणीला बांधलेले. बांधले गेल्यावर आपल्याला स्वातंत्र्य तरी कितीसे असणार आहे? शाळेत असताना आपणास शिकवणारे गुरुजी आजही आठवतात. आज आपण गुरुजी आहोत. मुलं आपणास किती काळ आठवत राहतील? यंत्रयुगानं सारं जगणंच यांत्रिक केलं आहे. व्यवसायाची नाळ जुळली, पण नात्यांचे पीळ सुटत चालले आहेत.”-आमच्यातील आणखी एक शिक्षक.

“खरंय सर तुमचं म्हणणं, काळ बदलला तशी काळाची परिमाणंही बदलली आहेत. आजूबाजूला परिस्थितीच अशी तयार होत गेलीय. मला काय त्याचं, हे वाटणं स्वाभाविक होत चाललयं. सगळ्यांच्या अपेक्षाच बदलल्या आहेत. अंगभूत गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा, ठरवण्याचा काळ मागे पडला आहे. प्रगतिपत्रकातील गुणांवरून गुणवत्ता ठरण्याचा हा काळ. प्रगतिपत्रकातील गुणांपेक्षा जीवनाची गुणवत्ता मोठी असते, हे समजण्याचा काळ कधीच मागे राहिला आहे. शर्यतीत आपलं घोडं जोतो पुढे दामटतोय. मग आणखी दुसरं होणार तरी काय आहे?” दुसरे शिक्षक म्हणाले. बराच वेळ आमचं बोलणं सुरु होतं. परिस्थितीवश शरणता, परिवर्तन, अपेक्षा, हताशा, निराशा आदी भावनांच्या हिंदोळ्यावर विचार झोके घेत होते.

निकाल घेण्यासाठी आलेली मुलामुली प्रगतिपत्रक हाती घेऊन वर्गाबाहेर पडत होते. सहावी,सातवीच्या वर्गातील काही मुलं शाळेच्या चौकात येऊन एकमेकाशी बोलत थांबली. प्रगतिपत्रक पाहून एकमेकांना विचारत होते; अ१, ब२, क१ म्हणजे नक्की किती गुण आपल्याला मिळाले असतील. त्यांचं मिळविलेल्या गुणांविषयी बोलणं आमच्या कानी आले. आम्ही बोलणं थांबवलं. त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्याचं आमच्याकडे लक्ष नसावं. त्यातील एक पोरगं दुसऱ्याला म्हणालं, “अरे, कितीका असेनात? आपण पास झालो ना, पुरे!” दुसरा मुलगा त्यांना म्हणाला, “अरे, मला हा पेपर थोडा कठीण गेला होता. त्या विषयात नक्की किती गुण मिळाले असतील रे? जर गुण समजले असते तर...” त्याचं आपापसात बोलणं सुरु होतं. काही प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी होती. ती मिळण्याचे मार्ग माहीत करून घ्यायचे होते. त्यांच्या मनात उदित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या शिक्षणव्यवस्थेत मिळतील की, नाही माहीत नाही.

आमच्यातील एका शिक्षकाने त्यांना आवाज देऊन जवळ बोलाविलेही शिक्षकांनी त्यांच्याशी बोलणं सुरु केलं. आस्थेने विचारपूस केली. प्रगतिपत्रक पाहून अभिनंदन केले. मुलांचे चेहरे खुलले. हातातील प्रगतिपत्रक सावरत पोरं वाकली. एकेका शिक्षकांच्या पायांना स्पर्श करीत आपल्या अंतर्यामीचा कृतज्ञभाव व्यक्त करीत उभी राहिली. त्यांना म्हणालो, “तुमच्या हाती असणाऱ्या प्रगतिपत्रकातील गुण महत्त्वाचे आहेतच. ते किती असावेत, हे तुम्हालाच ठरवायचं आहे; पण जीवनाच्या प्रगतिपत्रकात असणारी श्रेणी आणि गुण त्याहून महत्त्वाचे आहेत. ते तुम्हाला निदान आत्तापुरते तरी खूप मिळाले आहेत.” पोरांना माझं बोलणं समजलं की नाही, माहीत नाही. घरी जाऊन आईबाबांना आपला निकाल सांगायचा होता. तशी घाई त्यांच्या हालचालीवरून दिसत होती. आम्ही घरी जातो म्हणून पोरं निघाली. प्रसन्न चेहऱ्यासह त्यांची पावले शाळेच्या चौकातून क्रीडांगणाकडे आणि क्रीडांगणाकडून रस्त्याकडे आनंदाने पळाली. पळणाऱ्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे आम्ही कौतुकाने पाहत राहिलो.

4 comments:

  1. सर आमचे निकालाचे दिवस आठवले...:'( :'(

    ReplyDelete
  2. शाळा कायमच मनात असते.

    ReplyDelete
  3. शालेय शिक्षणश्रेत्रात "AUTONOMOUS" सारखा प्रकार नसतो का, सर???

    ReplyDelete
  4. khup changle divas hote sir aamche school madhle ..... . .................!!!!

    ReplyDelete