Shala, Shikshak ani Shikshan | शाळा, शिक्षक आणि शिक्षण

By // No comments:
‘शाळा’ असा एक शब्द जो बहुतेकांच्या जीवनाशी कोणत्यातरी निमित्ताने जुळलेला असतो. शिकणारा असेल तर शाळेशी त्याच्या शैक्षणिक जगण्याचा थेट सबंध असतो. नसेल शिकलेला, तर मनात आपण शिकलो नाहीत याची खंत असते. निमित्त काहीही असो, माणसाच्या सुजाण होण्याच्या वाटा शाळेशी जुळलेल्या असतात. शाळा शब्दासोबत केवळ अभ्यास, परीक्षा, पुस्तके, शिक्षक आणि शिकणे एवढंच चित्र नजरेत उभं राहत नाही. एक विशिष्ट प्रतिमा शाळा नाव धारण करून मनाच्या कॅनव्हॉसवर प्रकटते. इमारत, क्रीडांगण, भौतिकसुविधांसोबत शाळेचा आसमंत चैतन्याचा गंधाने भरलेला असतो. मुलांच्या रूपाने चैतन्याचे प्रवाह प्रवाहित होत राहतात. या उत्साहाला आपल्यात सामाऊन घेणारा परिसर जगण्याचं समृद्धपण सोबत घेऊन उभा राहतो. शाळा आणि शिक्षक हे परस्परांना पूरक शब्द. यांच्या साहचर्यातून जगण्याचं आभाळ समृद्ध करणारी व्यवस्था उभी राहते. शाळा शब्दांमध्ये जगणं आकाराला आणण्याचं सामर्थ्य एकवटलेलं आहे. व्यक्तित्व घडविण्यासाठी माणूस जे काही करीत आला, त्यातील जीवनाच्या जडणघडणीची एक वाट शाळेकडे जाते. सक्षम व्यक्तित्वे घडविण्यासाठी शाळा नावाचे स्त्रोत माणसांनी निर्माण केले. त्यास नवे आयाम दिले. सद्विचारांचे मळे येथे फुलत राहावेत अशी अपेक्षा व्यक्त होत राहिली. काळाचे अनेक आघात झेलत ही व्यवस्था वाढत राहिली. माणसाचं अस्तित्व तिच्यात सामावलं गेलं. शिकण्यासोबत शाळेतून उमलणं, फुलणं, बहरणंही घडत राहावं म्हणून प्रयत्न होत राहिले.

माणसाला जाणीवपूर्वक घडावे लागते. जीवनप्रवाहाला विधायक दिशेने नेण्यासाठी मार्ग आखावे लागतात. त्याच्या जडणघडणीचे नीतिसंमत प्रवाह निर्माण करावे लागतात. प्रवाहांचं उगमस्थान शाळेतून शोधले गेले. माणसांना शिकविण्याचं शाळा एक साधन आहे, भलेही ते एकमेव नसेल. विश्वाच्या अफाट, अमर्याद नभांगणाखाली माणूस स्वतःही शिकू शकतो, ती स्वयंसाधना असते. पण जीवनाचं समृद्ध आभाळ पेलण्यासाठी माणसाचं मनही आभाळाएवढं करणारे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात. म्हणूनच शाळा विचारांनी समृद्ध करणारी संस्कारकेंद्रे ठरतात. समाजाला परिवर्तनाच्या वाटेने नेण्यासाठी प्रेरित करणारी व्यवस्था म्हणून शाळेकडे पाहिलं जातं. नुसते पाहून अंतर्यामी परिवर्तनाची प्रेरणा रुजत नसते. बीज रुजण्यासाठी भूमीची मशागत करावी लागते. मगचच रोपटी तरारून वर येतात. त्यांचं यथासांग जतनसंवर्धन करावं लागतं. माणसाव्यतिरिक्त अन्य जिवांना औपचारिक शिक्षण देण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात; पण माणसांना मनालाही घडवावं लागतं. म्हणून जडणघडणीच्या वाटा शाळा नावाच्या संस्कारकेंद्राकडे जाणीवपूर्वक वळत्या कराव्या लागतात. म्हणूनच शिकण्याइतकं माणसाला काहीही प्रिय नसावं. त्याच्या मनी वसणाऱ्या कुतूहल, जिज्ञासापूर्तीसाठी निश्चित दिशा असावी लागते. ती दिशा शिक्षणातून, शाळेतून माणसाला गवसते.

शाळा काही माणसाला नवी नाही. प्राचीनकाळापासून ती माणसासोबत आहे. गुरुकुलापासून ग्लोबलस्कूलपर्यंत वेगवेगळ्या काळी वेगवेगळी नावं धारण करून माणसांना सोबत करीत आहे. या शेकडो वर्षाच्या प्रवासात शाळा उभी करताना नेमके काय मिळविले, काय मिळवायचे राहिले याचे हिशोब जुळवायचे आहेत. आमच्यावेळी शाळा अशा नव्हत्या, अशा असायच्या, असे अनेक अभिप्राय शाळेविषयी ऐकत असतो. शाळा आज नवे साज लेऊन उभ्या आहेत. पण या देखणेपणातून आत्मा हरवत चाललाय अशी शंका मनात निर्माण होण्याइतकी परिस्थिती पालटली आहे. शाळा, शिक्षक आणि शिक्षण यांच्याविषयी समाजातून विशिष्टप्रसंगी नकारात्मक प्रतिक्रिया उमटतात, तेव्हा प्रकर्षाने अधोरेखित होते की, शिक्षणातून काहीतरी हरवत चाललं आहे. शिक्षणातून काहीतरी मिळवायचे राहिल्याची खंत समाजाच्या विचारात असणे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे अपयश आहे. शिक्षणाचं अभियान उभं करून शिक्षणाला सार्वत्रिक करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरु आहे. शिक्षणाची गंगोत्री खेडोपाडी, वाड्यावस्त्यांवर पोहचवण्याचा प्रयत्न होतोय; पण तिचं तीर्थरूप जल तेथल्या भूमीत झिरपत आहे का? त्याच्या प्राशनाने ज्ञानासक्त मने घडत आहेत का? असे काही प्रश्न अद्यापही सोबतीला आहेत.

युनोस्कोच्या एका अहवालात शाळाबाह्य मुलांच्या संख्येत भारताचा जगात चौथा क्रमांक असल्याचे काही दिवसापूर्वी वाचनात आले. एवढ्या संख्येने मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहत असतील किंवा परिस्थितीमुळे फेकली जात असतील, तर समाजव्यवस्थेत संपन्न विचारांचे मळे बहरतील कसे? व्यवस्थेचे संतुलन घडेल कसे? सर्वशिक्षा अभियान आणून प्रत्येक घरापर्यंत शिक्षणाच्या गंगेचा प्रवाह पोहचविण्याचा प्रयत्न होऊनही त्यात भिजण्याऐवजी कोरडाठाक राहण्यात कोणतं शहाणपण सामावलं आहे. भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्रात एखादी योजना कार्यान्वित करताना असंख्य प्रश्न, अनंत अडचणी उभ्या राहतात. भारत संघराज्य म्हणून एक असला, तरी येथे समाजव्यवस्थेत अनेक सामाजिक, आर्थिक, वर्गीय, जातीय पदर आहेत. अनेक धाग्यांचा विणलेला गोफ भारत असेलही; पण या सुट्यासुट्या धाग्यांचे अनेक पीळ असतात. त्यांच्या स्वतंत्र अस्मिता असतात. कधी टोकदार प्रश्न असतात. मतमतांतराच्या ठिणग्या असतात. अशावेळी त्यांना एकत्र बांधून ठेवण्यात बरीच ऊर्जा खर्ची पडते. नको त्यागोष्टींकडे लक्ष वळवावे लागते. विकासाचे पथ चालताना दुसऱ्याच वाटांची सोबत घडते.

शिक्षणाचे महत्त्व विद्यमानकाळी समाजाला बऱ्यापैकी समजले असले, तरी शिक्षणाविषयी असणारी अक्षम्य उदासिनताही दुर्लक्षित करण्याजोगी नाही. जगण्याचे प्रश्नच एवढे कठीण आहेत की, त्यांच्याशी भिडताना अनेक आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. घरातले सगळे हात राबल्याशिवाय हातातोंडाची गाठ पडणे शक्य होत नाही, तेथे शिक्षणाचं रोपटं जगेलच कसं? जगण्याचे प्रश्न मोठे होत असतांना अन्य प्रश्न दुय्यम होत जातात. पंधरावीस वर्षापूर्वीचा भारत आणि आजच्या भारताच्या स्थितीत प्रचंड स्थित्यंतर झाले आहे. जीवनात संपन्नता आलेली आहे. तरीही जगण्याच्या प्रश्नांना रोज सामोरे जाणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. रोजच समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर माणसं कोणत्या गोष्टींना प्राथमिकता देतील? भाकरीच्या प्रश्नासमोर सगळेच प्रश्न लहान वाटायला लागतात.

शाळा आणि शिक्षणात आतापर्यंत अनेक बदल घडून आलेत. बदलांना कार्यान्वित करताना शाळा प्रयोगशाळा झाल्या. अपेक्षित निष्कर्ष हाती येण्यासाठी प्रयोग करावे लागतात हे मान्य; पण प्रयोगाचे परिणामही तपासून पाहावे लागतात. त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. तरीही एक सत्य नाकारून चालणार नाही, ते म्हणजे याच शाळांनी देशाच्या पिढ्या घडविल्या. भले येथे सुविधांची वानवा असेल. शिकण्या, शिकवण्याविषयी आस्था असायची. येथे वावरणारे मास्तर नावाचं विद्यापीठ संस्कारपीठ वाटायचं. हातांवर छम छम बसणाऱ्या छडीमुळेच विद्या घम घम येते, असं समजलं जात असे. गुरुजी साधेच होते. त्यांच्या साधेपणातून प्रकटलेले विचार जीवनसौंदर्य बनून मनःपटलावर अंकित होत राहायचे. असे ‘डिव्होटेड’ गुरुजी तेव्हा जागोजागी भेटत असल्याचे जुनी पिढी सांगते. विद्यमानकाळीही असे अनेक अध्यापक आहेत. अपवाद वगळल्यास अध्यापनाचे व्रत अंगिकारून प्रामाणिकपणे जगणारे खूप आहेत. मागच्या पिढ्यांचा गुरुशिष्य नात्यातील इमोशनल टच आजच्या गुरुशिष्य नात्याला नाही.  या नात्यातील ओलावा हरवत चालला आहे. माणसं कालोपघात एकेकटी होत चालली आहेत. समूहापासून सुटी होत आहेत. अशा जगण्यालाच सन्मान समजायला लागली आहेत.

आम्हा काही शिक्षकांमध्ये बोलणं सुरु होतं. विषय शाळा, शिक्षण आणि शिक्षकांकडे वळला. मनातील खंत व्यक्त करीत एक शिक्षक म्हणाले, “आपल्या शाळांची अवस्था पाहून वाटते, अजूनही आम्ही अंधारयुगात वावरतो आहोत. अशा शाळांना शाळा का म्हणावे, असा प्रश्न पडतो? यांना शाळा म्हणण्याऐवजी खरेतर कोंडवाडे म्हणणे अधिक योग्य वाटते.” तोच धागा पकडत दुसऱ्या शिक्षक म्हणाले, “सर, काही शाळा अशा असतीलही. शिकणाऱ्या मुलांचं भविष्य ज्यांच्या हाती आहे ते शाळेत कमी आणि अन्य ठिकाणीच जास्त रमलेले असतील, तेथे आणखी काय होणार आहे? ही माणसं कधी राजकारणाच्या फडात रंगतात. कधी अर्थकारणात रमतात. कधी कृषिकारणाला हातभार लावताना राबतात. पण शाळेतील अध्यापनाच्या प्रांगणात किती वेळ संचार करतात. असं वागताना यांच्या मनात काहीच वेदना होत नसतील का? इतरांना नैतिकतेचे पाठ शिकवून समर्थ बनवणारी, ही माणसं स्वतःच नैतिकतेचे पाठ विसरले असतील का?”

आपलं मत कळकळीने व्यक्त करणाऱ्या या शिक्षकाची खंत खरी असेलही. पण सगळेच शिक्षक, शाळा अशा असतात असे नाही. काही अपवाद असतात. अशा चारदोन शाळा, शिक्षक असतीलही. ते असणे म्हणजे सगळी शिक्षण व्यवस्था कुजली आहे. सगळा प्रवासच अंधारयात्रा झाला आहे, असे नाही. पलीकडे उजेडाचेही एक जग उभं आहे. तेथे सदसदविवेकाच्या मिणमिणत्या का असेनात, पणत्या पेटल्या आहेत. काही पावलं धडपडत का होईनात, पण जीवनाचा शोध घेत प्रकाशाच्या दिशेने निघाली आहेत. कदाचित काहींना योग्य वाट न सापडल्याने चुकून काही पावलं आडवाटेने निघत असतीलही. पण ती वाट काही सगळेच चालत नाहीत. 

हे सगळं खरं असलं तरी कधीकधी निराशेचे मळभ काही काळासाठी विचारांच्या आभाळात दाटून यावेत असंही घडतंय. गेल्या पंधरावीस वर्षात शिक्षणातून विधायक विचारांना रुजवण्याचे प्रयत्न झालेत. आपण बरेच पुढे सरकलो असलो तरी मंझील अभी बहोत दूर है, अशीच परिस्थिती दिसते आहे. समाजव्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्या वर्गातील मुलामुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण, विशिष्ट चौकटींमध्ये बंदिस्त झालेले शाळा, शिक्षक आणि शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवताना कौशल्यसंपादनातील समस्या; असे अनेक लहानमोठे प्रश्न आहेत, अडचणी आहेत. सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले कोणत्या वर्गाची आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते खाजगी शाळांमध्ये विसावतात. ज्यांच्याकडे नाहीच काही, ते येतात सरकारी शाळांच्या आश्रयाला. या शाळांचा दर्जा उंचावणार नसेल, तर सामान्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवावे कसे अन् शिकावे कसे?

शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावण्याचे आव्हान समोर उभे आहे. देशाचा उच्चशिक्षणाचा आलेख अद्यापही अठरा-एकोणावीस टक्क्यांवर रेंगाळतो आहे. उच्चशिक्षणाचा सोपान चढणे सामान्यांना दमछाक करणारे ठरतेय. तेथे पोहचले त्यांचे ठीक आहे असे समजलो, तरी राहिलेल्या बाकीच्यांचे काय? हा प्रश्न उरतोच. परीक्षांच्या निकालानंतर गुणवंतांच्या गुणवत्तेला गौरवान्वित करणारे गौरवसोहळे पार पडतात. पण संधी मिळाली नाही म्हणून मागे पडलेल्या गुणवंतांचे काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपल्याला सापडत नाहीये. ‘माणसाला जगण्यासाठी सक्षम बनविते ते शिक्षण’, असे म्हणतात. शिक्षणातून या कसोटीस पात्र ठरणारी गुणवंतांची मांदियाळी अजूनही उभी राहत नसेल तर दोष नेमका कुणाचा? शिक्षकांचा, शिक्षणव्यवस्थेचा की धोरणांचा? कुठलीही गोष्ट फारशी गांभीर्याने न घेण्याची आपली मानसिकता आणि सामाजिक, राजकीय अनास्था शैक्षणिक विकासास मारक ठरते. पदव्यांचा टिळा ललाटी लावून हजारो सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधार्थ अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण सोबत घेऊन हिंडत आहेत. पदवी मिळवणाऱ्या शंभरातील वीस-पंचवीस जणच आवश्यक कौशल्य संपादन करून रोजगारास पात्र असल्याचे सांगतात, याचाच अर्थ पंचाहत्तर टक्के अपात्र ठरतात. म्हणजे यांना घडविणाऱ्या शाळाही इतकेच टक्के अपात्र आहेत का?

शाळांच्या परीक्षेच्या निकालांचा उंचावलेला आलेख म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता नाही. शाळेचा शंभर टक्के निकाल म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण असा अर्थ होत नाही. गुणवत्ता संपादण्याचे शिक्षण एक साधन आहे, ते साध्य नाही. आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून दोन्ही हातांचा वापर होतो का? असा प्रश्न महात्मा गांधींनी शिक्षणव्यवस्थेविषयी कधीकाळी विचारला होता. समस्यांशी संघर्ष करून स्वतःला आणि सोबतच समाजाला आकार देणारे सक्षम हात आमचं शिक्षण घडवीत आहे का? सांगणे अवघड आहे. समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. सक्षम हातांसोबत प्रगल्भ मनेही शिक्षणातून, शाळेतून घडत राहण्यात शिक्षणाचे यश असते. समृद्ध मने घडविणारा शिक्षक कुशल शिल्पकार असतो. सुंदर शिल्पे घडविण्याचे उत्तरदायित्व त्यालाच पार पडायचं आहे. भलेही प्रवासात अनंत अडचणी, असंख्य प्रश्न उभे राहतील. एखादी कलाकृती  तयार करण्यासाठी अवधी लागतो. झाड लावल्यानंतर लागलीच फलप्राप्ती होत नाही. मधुर फळांसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्याआधी रोपट्याची काळजी घेऊन त्याचं अवकाश मिळवून द्यावं लागतं. आपला अवकाश घेऊन उभी राहणारी झाडं निकोप फळे देतात. झाडांच्या निकोप वाढीत माळ्याची मशागत उभी असते. शिक्षकही कुशल माळी असतो. झाड जोमाने वाढावे म्हणून माळी तण काढून त्याला सुरक्षित करतो. आम्हा शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या मनातील विकल्पाचं तण वेळीच उपटून काढायला लागेल. तेव्हाच आम्ही लावलेली रोपटी शाळा नावाच्या उद्यानातून जोमाने वाढतील, वाढताना बहरतील, नाही का?

Shikshak Din | शिक्षक दिन

By // 5 comments:
पाच सप्टेंबर कॅलेंडरच्या पानावरून ‘शिक्षक दिन’ असे नाव धारण करून अवतीर्ण होईल. नेहमीच्या रिवाजानुसार शिक्षक नावाच्या पेशाचे कौतुकसोहळे पार पडतील. शिक्षकांचे समाजव्यवस्थेतील स्थान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील योगदान अधोरेखित केले जाईल. संस्कारांचे संवर्धन करणारा, मूल्यव्यवस्था टिकवून ठेवणारा जबाबदार घटक म्हणून तो प्रशंशेस पात्र असल्याचे सांगितले जाईल. त्याच्या कार्याचे कौतुक करताना अध्यापकीय पेशाच्या सामाजिक उत्तरदायित्वाचीही आवर्जून आठवण करून दिली जाईल. शिक्षकी पेशात लक्षणीय कार्य करणाऱ्या आचार्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्शाच्यारूपाने सन्मानित करण्यात येईल. अशा आदर्श अध्यापकांनी उभी केलेली यशाची शिखरे संपादित करण्याची उर्मी अन्यांच्या अंतर्यामी उदित व्हावी म्हणून लहानमोठ्या समारोहातून प्रेरणेच्या ज्योती प्रज्वलित केल्या जातील. आहेत त्याहून मोठ्या यशाची शिखरं उभी रहावीत म्हणून प्रयत्न करू पाहणाऱ्या संवेदनशील मनांना प्रेरित केले जाईल. त्यांच्या हाती प्रेरणेचे पाथेय देऊन मार्गस्थ केले जाईल. काहींच्या वाणीतून गुरु-शिष्य नात्यातील गोडवा गौरवगाथा बनून प्रकटेल. जीवनाला आकार देणाऱ्या अध्यापकांच्या अंतर्यामी जतन करून ठेवलेल्या स्नेहमयी स्मृती काहींच्या लेखणीतून लेखांकित होतील. सगळा दिवस शिक्षक नावाच्या संस्कारकेंद्रांना सन्मानित, गौरवान्वित करण्यात संपेल. कृतज्ञतेचा भाव अंतर्यामी साठवत सूर्य निरोप घेऊन मावळेल. रात्र धरतीवर अवतीर्ण होईल.

क्षितिजाच्या वर्तुळाला पार करीत येणारा दिवस नवी आव्हाने घेऊन उदयाचली येईल. त्याच्या पसरलेल्या प्रकाशाच्या परिघात आपल्या व्यवस्थेचे वास्तव पुन्हा समोर येईल. माणसं ते सरावाने स्वीकारायला शिकल्यामुळे त्याकडे कदाचित फारसे लक्ष दिले जाणार नाही. शिक्षणाला परिवर्तनाचे साधन वगैरे म्हणतात. परिवर्तनाची आयुधे हाती घेऊन साध्याच्या परगण्यात पोहोचण्यासाठी प्रयोग होत राहतील. शिक्षणातून जे साध्य करायचे आहे, त्यापर्यंत आपली शिक्षणव्यवस्था पोहचली आहे का? या प्रश्नांचे उत्तर कदाचित पुन्हा जुनेच पाढे म्हणताना दिसेल. शिक्षणातून परिवर्तन घडणे अपेक्षित असेल, तर शिक्षक त्या परिवर्तनाचा भाष्यकार असावा हेसुद्धा ओघानेच आले. अर्थात परिवर्तनप्रिय विचार प्रबळ आसक्ती बनून अंतकरणात रुजल्याशिवाय बदल घडणं अवघड असतं. परिवर्तनशील समाजच प्रगतीचे नवे आयाम निर्माण करू शकतो. समाजाच्या वृत्तीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षणातही परिवर्तन घडणे म्हणूनच अपेक्षित असते. माणसाचा इहलोकीचा प्रवास ईप्सितप्राप्तीसाठी असल्यास त्याच्या हाती व्यवस्थापरिवर्तनाची साधनं असणं आवश्यक असते. शिक्षण हे परिवर्तनाचे असेच एक अमोघ साधन आहे. माणसाच्या वैचारिक वाटचालीतील संचित आहे.

औपचारिक शिक्षणाच्या परिघात आत्मशोध घेत नावीन्याच्या शोधासाठी निघालेल्या वाटेवर अध्ययनार्थी, अध्यापक आणि अध्यापनात परस्पर संवादाचे सेतू बांधल्याशिवाय व्यवस्थेत अपेक्षित परिवर्तन घडत नसते, हेही वास्तवच. शाळा केवळ सिमेंट, विटा, माती वापरून उभ्या केलेल्या निर्जीव इमारती नसतात. त्यांच्यातून चैतन्याचे झरे विद्यार्थ्यांच्या रूपाने अखंड प्रवाहित होत असतात. हे सळसळते चैतन्य घडविण्याची नैतिक जबाबदारी पालक आणि समाजासोबत शिक्षकाचीही आहे, हे वास्तव कोणीही शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नाकारू शकत नाही. शिक्षक म्हणून या चैतन्यदायी प्रांगणात पहिले पाऊल ठेवताना अध्यापकाच्या अंतर्यामी विद्यार्थी घडविण्याची आंतरिक उर्मी असल्याशिवाय तो अपेक्षित परिवर्तन घडवू शकणार नाही. निराकाराला आकार देऊनच साकारता येते. संस्कारांचे संचित दिमतीला घेऊन आकाराला आलेली व्यक्तित्वेच देशाची प्राक्तनरेखा स्वकर्तृत्वाने लेखांकित करीत असतात. विकसनशील, विकसित किंवा महासत्ता म्हणून एखाद्या देशाला माणसंच घडवीत असतात. शिक्षणातून विधायक विचारांचे पाथेय घेऊन घडलेली माणसं देश नावाची अस्मिता आकारास आणत असतात. अशी कुशल माणसं घडविण्याचं काम शाळा आणि शिक्षक करीत असतात.

समाजात रुजणाऱ्या विधायक विचारांच्या निर्मितीचं आणि माणसाच्या जडण-घडणीचं श्रेय शिक्षणाला द्यायचं असलं, तर स्वातंत्र्य संपादनानंतरच्या सत्तर वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेत काय घडलं, काय बिघडलं अन् काय निसटलं, याचं परिशीलन होणं प्रगतीच्या वाटेवरचा प्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक ठरते. आपली शिक्षणव्यवस्था प्रयोगशाळा झाल्याचा सूर आजही आपल्या आसपास उमटताना दिसतो. संस्कारसाधनेसाठी शिक्षण नावाचं नंदनवन प्रयत्नपूर्वक उभारावं लागतं. शासन, समाज, शिक्षक आणि शाळा ते घडवत असतात. शाळेतून केवळ पुस्तकी शिक्षण न मिळता जीवनशिक्षण मिळावे, अशी अपेक्षा समाजाकडून व्यक्त होत असेल, तर त्यात अवास्तव असे काही नाही. शाळा केवळ परीक्षा घेऊन उत्तीर्ण-अनुतीर्णतेचे ठसे कपाळी अंकित करणारे उद्योगकेंद्रे नसतात. येथे येणारी मुले उत्तीर्ण होण्यासाठीच येत असली अन् उत्तीर्णतेचा मळवट कपाळी असल्याशिवाय चालणार नसले, तरी पुस्तकी ज्ञानातून प्राप्त पदवी म्हणजे सर्वकाही असते, असेही नाही. संपादित केलेली पदवी दिलेल्या परीक्षा, सोडवलेल्या उत्तरपत्रिका, व्यवस्थेने निर्धारित करून दिलेला अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याचं प्रमाण असतो. पण जीवनातील सुख-दुःख, समस्या, संकटे यात उत्तीर्ण होण्याएवढं प्रगल्भ मन क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे मिळणाऱ्या अनुभवातून घडवावं लागतं. ते संवेदनशील संस्कारांतून घडत असतं.

शिक्षक म्हणून आपण या क्षेत्रात प्रवेशित होताना व्यवस्थेच्या परिघाभोवती असणारी संवेदनशीलता सोबत घेऊन आल्याशिवाय शिक्षकीपेशाचे मोल समजणे अवघड आहे. उत्क्रांत मने घडवण्याच्या जबाबदारीचं निर्वहन शिक्षकांना करायचं असल्याने, आधी त्याचं मन उत्क्रांत होणं आवश्यक आहे. आपल्या अंतर्यामी अधिवास करून असणारा आनंद आपण इतरांना तेव्हाच देऊ शकतो, जेव्हा आपल्या मनोविश्वात प्रसन्नतेचे निर्झर अनवरत प्रवाहित असतील. शिक्षकाची ओळख त्याचं निरामय चारित्र्य असतं, तसंच त्याचं परिणामकारक अध्यापनही. त्याच्या अध्यापनातून आसपासच्या आसमंतात आनंदलहर निर्माण होणं आवश्यक आहे. असा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षकाला निर्माण करता यावा. एखादा घटक शिकविताना आधी आपणच तो धडा, ती कविता होणं आवश्यक नाही का? मुलं संस्कारांनी घडविण्याचं समाधान तेव्हाच मिळू शकते, जेव्हा एखादा धडा, कविता आणि त्यातून प्रतीत होणारा अनुभव विद्यार्थ्यांच्या हृदयात जावून विसावतो. त्याचं मन हेच अनुभवांचं सदन होतं. सुंदर शिल्प साकारण्यासाठी कुशल कलाकाराच्या सर्जनशील हाताचा स्पर्श दगडाला घडावा लागतो. संवेदनशील शिल्पकाराला ओबडधोबड दगडातील सौंदर्य तेवढे दिसते. त्यातला अनावश्यक भाग काढून तो ते साकारतो. मुलांच्या अध्ययन प्रवासातील विकल्पांचे अनावश्यक ओझे शिक्षकाला वेळीच काढता आले की, त्यांचं जीवन सौंदर्याची साधना होते. अर्थात, यासाठी शिक्षक म्हणून त्याला लाभलेल्या हाताचा परीसस्पर्श वेळीच घडायला हवा. शिक्षक एक संवेदनशील कलाकार असतो. त्याचं अध्यापन समर्पणशील कलावंताची साधना असते. गायकाला रियाज करून सुरांना धार लावावी लागते. तलवारीला पाणी असल्याशिवाय मोल नसतं. म्यान रत्नजडीत अन् तलवार गंजलेली असेल, तर तिचं मोल शून्य असतं.

परंपरांच्या चौकटी मोडीत काढून परिघाबाहेर पाऊल ठेवल्याशिवाय वेगळे साहस सहसा घडत नाही. मनात ध्येयवेडी स्वप्ने उदित झाल्याशिवाय आकांक्षांची क्षितिजे खुणावत नाहीत आणि नवे परगणेही हाती लागत नाहीत. ज्याला परंपरांचा पायबंद पडला, त्याला नवे रस्ते कसे निर्माण करता येतील? परंपरांच्या चौकटी मोडण्याचा, ओलांडण्याचा प्रयत्न करताना अडचणींचे अनेक अडथळे अनाहूतपणे उभे राहतात. ते असणारच आहेत. पलायनवाद स्वीकारणाऱ्यांच्या जीवनग्रंथात नवे अध्याय कधी लेखांकित होत नसतात. कधी परिस्थिती अनुकूल नसते, तर कधी माणसे प्रतिकूल ठरतात. रस्त्यात अनंत अडचणींचे डोंगर उभे राहतात. कधी शासनाचे, कधी व्यवस्थापनाचे प्रश्न व्यवधाने बनून अनपेक्षितपणे वाटेवर भेटतात. कधी नियम आडवे येतात. कधी कायदे वाकुल्या दाखवितात. एवढं सगळं पार करून पुढे गेलात की, ज्यांच्यासाठी हे सगळं सव्यापसव्य करतो आहोत; तेच पालथे घडे बनतात. अशावेळी करावं काय? म्हणून प्रश्न समोर उभा राहतो. प्रश्नांची उत्तरे शोधूनही हाती लागत नाहीत. प्रश्नांचा गुंता आपला अर्जून करतो. अडचणी अनंत असतात. त्यांना अंत नाही. समस्या कुठे नसतात? सगळीकडेच त्या आहेत. परिस्थिती कोणत्याही बाजूने अनुकूल नसतांना समोर आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्नांनी निर्माण केलेल्या मार्गांवरून निघालेली ध्येयवेडी पाऊले पाहून नियतीही विस्मयचकित होते. अन् ध्येयप्रेरित जगणाऱ्यांचे वेगळेपण कालपटावर अधोरेखित करीत जाते.

शिकण्याचं, शिकविण्याचं व्यवस्थेतील हरवलेपण समोर येते, तेव्हा परिस्थितीची उदासीनता ठळकपणे अधोरेखित होते. आसपास दिसणारे उसवलेपण पाहून आपणास काही करता येणार नाही, असे वाटायला लागते. उदासिनतेचे मळभ मनाच्या आसमंतात दाटून येते. परिस्थितीच्या अंधारात आपण हरवतो. पायाखालच्या वाटा बेईमान होतात. अशा समयी अपेक्षित उत्तरांच्या शोधासाठी केलेली संयत प्रतीक्षा भोवताली दाटून आलेल्या अंधाराचे सावट दूर करते. काळ परिवर्तनशील असतो. तो सतत बदलत असतो. आताही तो बदलाच्या वाटेने नव्या क्षितिजांच्या शोधासाठी निघाला आहे. कालचक्राच्या वेगाशी सुसंगत वर्ततात, तेच संघर्षात टिकतात. शिक्षकालाही कालानुरूप बदलणं अनिवार्य आहे. विज्ञाननिर्मित सुखांनी वेढलेले जग नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून प्रगतीच्या दिशेने प्रचंड वेगाने झेपावत आहे. शिक्षकालाही आपली झेप बदलावी लागेल. ती आणखी पल्लेदार करावी लागेल, तेव्हाच तो मुलांपर्यंत पोहचेल. तो निद्राधीन असेल, तर व्यवस्थेत त्याला आपले अवकाश कसे निर्माण करता येईल? त्याला त्याचा व्यावसायिक सन्मान मिळेलच कसा? परंपरेच्या चौकटीत फारफारतर धडे, कविता, गणिते, सूत्रे, व्याख्या शिकवून शिक्षक होता येईलही; पण विद्यार्थिप्रिय अध्यापक नाही होता येणार. शिक्षक म्हणून मिळणारा आदर चौकटींच्यापलीकडे जाऊन काहीतरी नवीन केल्याशिवाय मिळत नसतो. भोवताल बंदिस्त करणाऱ्या चौकटींचे सीमोल्लंघन केल्याशिवाय आकांक्षांचे नवे आकाश हाती लागत नसते.

शिक्षक नावाच्या शिखराला आदर तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या शिखराची उंची लोकांच्या मनातील उंचीपेक्षा काकणभर अधिक असते. शिक्षकाची अनास्था, उदासिनता, निष्क्रियता त्याच्या पेशातील आदराची सांगता करीत असते. मुलांच्या मनातील शिक्षकांप्रती असणारा आदर उगवत्या सूर्यासारखा स्वाभाविक आणि उमलणाऱ्या फुलाइतका सहज असतो. सहजपण शिक्षकाच्या कर्तृत्वातून गंधित होत असतो. रेडिमेट नोटस् चा आयता रतीब घालणाऱ्या वर्तुळात आणि क्लास नावाच्या समांतर व्यवस्थेत शिक्षकाला स्वतःचा ‘क्लास’ टिकवून ठेवावाच लागेल. तो टिकून राहावा म्हणून आपल्या अध्यापनाचा ‘क्लासही’ वरच्या दर्ज्याचा असावा लागतो. आपुलाच वाद आपणाशी, तसा आपलाच संवाद आपल्याशी घडणे आवश्यक ठरते. स्वकेंद्रितवृत्ती आपल्यातील अंतर्मुखता संपविते. पोरांनी थोर व्हावे, यासाठी थोरांना काहीकाळ पोर व्हावे लागते. एखाद्या विद्यार्थ्याला घडविणे म्हणजे आपल्या अध्यापक पेशाचे यश नाही. यशाची शिखरे लहानमोठी का असेनात; ती चालत्या वाटांवर शिक्षकांना उभी करता यायला हवी. अर्थात असे यश सहजगत्या आपल्या पदरी येणार नाही हे मान्य. माणूस परिस्थितीचा निर्माता नसतो; पण तो परिवर्तनाचा प्रेषित बनू शकतो. मुलांच्या मनात आकांक्षांचं अफाट आभाळ कोरण्यासाठी आपणच आभाळ व्हावं लागतं.

परिस्थितीला व्यवस्थेच्या वर्तुळातून शोधून वेगळं केल्याशिवाय अध्यापकाला आपल्या पेशाची डूब कळत नसते. शाळा नावाच्या व्यवस्थेत आणि अभ्यासक्रमाच्या चौकटीत बंदिस्त करून निर्धारित केलेलं शिक्षण सगळ्यांना देता येईलही. पण संस्कारांचं आणि मूल्यांचं शिक्षण चौकटींच्या सीमांमध्ये बंदिस्त करून कसे देता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना संयमित जगण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावा लागेल. सार्वकालिक मूल्यांची बिजे विद्यार्थ्यांच्या अंतर्यामी रुजवणं शिक्षकाचं काम आहे. भौतिकसुविधांच्या बेगडी समाधानात सारेच आपापली सुखे शोधत आहेत. आजूबाजूला मृगजळी मोहाचे मायावी पाश अधिक घट्ट होत आहेत. स्वार्थप्रेरित जगण्याच्या झळा माणसांची मने शुष्क करीत आहेत. अंतर्यामी अधिवास करून असलेला आपलेपणाचा ओलावा आटत चालला आहे. आपापसातल्या संवादाची परिभाषा बदलत आहे. तंत्रज्ञानाने त्याला वैश्विकतेचे परिमाण लाभले. विज्ञानतंत्रज्ञानाच्या वाटेने घडणारा संवाद व्हर्च्युअल झाला, तसा माणसाला अॅक्च्युअल जगण्याचा विसर पडत गेला. आभासी जगण्याला सुविधांच्या विश्वात प्रतिष्ठा प्राप्त झाली. फेसबुकने संवाद सुगम होत असेलही; पण त्यात ‘फेस टू फेस’ व्यक्त होण्याचे समाधान कसे गवसेल?

शिक्षणातून संपादित केलेल्या जुजबी ज्ञानावर पोट भरण्याची सोय लावता येते. ती कौशल्ये पुस्तकातील धड्यांमधून मिळतात; पण जीवनासाठी शिक्षण घेताना त्याचे स्त्रोत शोधावे लागतात. या स्त्रोतांच्या शोधाची एक वाट शिक्षकाच्या दिशेने वळणारी असावी. पोटार्थी शिक्षण आणि शिक्षक परिस्थितीत परिवर्तन कसे घडवू शकतील? माणूस उदरभरणासाठी जगतो, हे वास्तव असले तरी त्यापलीकडे काहीतरी त्याला हवं असतं. फक्त उदरभरणाचा विचार करून उचललेली कोणतीही पाऊले नवनिर्माणाची मुळाक्षरे ठरत नसतात. पोटापासून सुरु होणारे प्रश्न पोटापर्यंतच जाऊन संपतात, तेव्हा नवे काही करता येत नाही. पण पोटतिडकीने केलेली विधायक कामे अनेकांच्या पोटापाण्याचे प्रश्न सोडवू शकतात. आकांक्षांचं व्यापक आभाळ पंखावर घेण्याचं बळ वैनतेयाने घेतलेल्या डौलदार झेपेत नसतं. झेप आधी मनात उमलून यावी लागते, तेव्हा ती पंखातून प्रकटते. आकाश कवेत घेण्यासाठी मनालाही आकाशाएवढं अफाट, अमर्याद व्हावं लागतं. अमोघ कर्तृत्वाचं गगन हे समाधानाचे सदन असते. अशी कर्तृत्वसंपन्न मने विद्यमानकाळाची अनिवार्य आवश्यकता आहे.

माझा आसपास वेगवेगळ्या कारणांनी दुभंगतो आहे. जगण्याचे टाके उसवत आहेत. मीपणाचा परीघ समृद्ध होत आहे. अशा वातावरणात मी अभंग राहणे आवश्यक आहे. क्षणिक सुखांची बरसात करणऱ्या फसव्या मोहापासून अलिप्त राहून विचारांचं आणि संस्कारांचं अभंगपण शिक्षक टिकवू शकतो. याकरिता मनात उगवणारं विकल्पांचे तण वेळीच काढून टाकावे लागेल. ‘गुरुजी’ या शब्दाला आपल्या सांस्कृतिक प्रवाहात लाभलेलं अढळपण टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ‘लघूरुपाला’ व्यापकतेच्या कोंदणात अधिष्ठित करून आकांक्षांचे आकाश आंदण द्यावे लागेल. जगण्याला वैश्विक विचारांचे परिमाण द्यावे लागेल, तेव्हाच त्याला ‘गुरुपण’ येईल. शिक्षक पेशाव्यतिरिक्त अन्य काही पेशांमधील यशापयशाची चर्चा फार थोड्या नफा नुकसानापुरती सीमित असते. त्यांच्या चुकांना दुरुस्तीसाठी कदाचित अवधी मिळू शकतो. ते चुकल्यास फारतर काहींना त्याचा फटका बसेल; पण शिक्षक चुकला तर पिढी बिघडते. पिढी बिघडणे हे दुर्लक्षीण्याजोगे नुकसान नक्कीच नाही.

शिक्षकाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागते. परिस्थती विपरीत असताना मी एकटा काय करू शकतो? असं अनेकदा मनात येईलही; पण असे एकएकटे प्रयत्नही विधायकतेचे एव्हरेस्ट उभे करू शकतात. विधायक कामे करण्यासाठी माणसानं झिजलं तरी चालेल. कारण गंजून जाण्यापेक्षा झिजून जाणे केव्हाही चांगलं. बिंदू-बिंदू जमा होऊन त्याचा सिंधू होतो. कणात असते, ते मणात दिसते. बिंदूत असते, ते सिंधूत दिसते. असे कणाकणाने, थेंबाथेंबाने जमा होणारे कर्तृत्व व्यक्तित्वालाच नाहीतर जगण्यालाही व्यापकपण देते. एखाद्या विशाल वृक्षाची उंची पाहणाऱ्याच्या अनुभवावर अवलंबून नसते. ती स्वयंभू असते. त्याची मुळे आपल्या अस्तित्वाचा ओलावा शोधत जमिनीत खोलवर जातात. धरतीला घट्ट धरून ठेवणाऱ्या मुळांमुळे तो वादळवाऱ्याशी झुंज देत उभा असतो, येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाना शीतल गारवा देत. अखंड. अविरत. शिक्षकांना असा वृक्ष होता येणार नाही का?

Paus: Athavanitala | पाऊस: आठवणीतला

By // 6 comments:
गंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत आहेत. गारवा घेऊन आलेला वारा अंगावरून अलगद मोरपीस फिरवतोय. झाडे पावसाच्या वर्षावात सुस्नात न्हाऊन आपल्या नितळ अंगकांतीकडे कुतूहलाने पाहत उभी आहेत. दूर क्षितिजावर इंद्रधनुष्याने सप्तरंगी कमान धरली आहे. ढगांआडून डोके अलगद वर काढून सूर्य बघतो आहे. पक्षांनी निळ्याशार आभाळाच्या विस्तीर्ण पटावर आपल्या पंखांनी फेर धरला आहे. त्यांच्या मोहक हालचालींनी आभाळभर नक्षी कोरली जात आहे. श्रावणातील ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ रंगला आहे. टेकड्यांच्या उतारावरून पाणी अवखळ पोराप्रमाणे उड्या मारीत धावते आहे. माळावरील गवत वाऱ्यासोबत झुलत, डुलत खेळते आहे. आजूबाजूच्या आसमंतात प्रसन्न चैतन्य ओसंडून वाहते आहे. हिरव्या माळरानावरून वाहत येणारा वारा मंत्रमुग्ध करणाऱ्या गंधाची सरमिसळ सोबतीला घेऊन येतोय. परिसरातील उत्साहाने आनंदाचा सूर धरला आहे. त्या सुरांनी मनःपटलावर गारुड केले आहे. डोक्यावरील पावसाळी आभाळाचा तुकडा मनाच्या गाभाऱ्यात साठत चालला आहे. पायाखालच्या माळाच्या चौकटीत पाऊले फिरताना मनातील स्मृतींचे कोष आठवणींनी ओलावून चिंबचिंब भिजत आहेत. भिजलेल्या देहावरून निथळणाऱ्या पावसासोबत मनातील पावसाळी आकाश हलकेच धरतीवर उतरत आहे. कळत नकळत तिकडे पावलं आतुरतेने चालती होतात. मनातील साठलेले झरे मोकळे होऊन वाहत राहतात.

किती दिवस, महिने, वर्षे झाली असतील डोईवरच्या निळ्याभोर विस्तीर्ण आकाशाला मनात साठवून याचा हिशोब मन करतंय. तो जुळत नाही. कारण स्वतःभोवती आखून घेतलेल्या स्वयंघोषित चौकटीत हे मुक्त आकाश नाही सामावत. आठवणींचा पाऊस दाटत जातो. मन आठवणींच्या ओथंबलेल्या झाडाखाली क्षणभर विसावते. नेणतेपणापासून ते जाणतेपणापर्यंत अनुभवलेला मनमुक्त पाऊस आणि आजचा स्वतःभोवती कोरून घेतलेल्या रेखीव चौकटीतला पाऊस, केवढं अंतराय निर्माण झाले आहे भिजलेल्या सहवासाच्या नात्यात. मध्यमवर्गीय बेगडी आवरणात जगण्याचा मुक्त आनंद मी कधीच झाकून घेतला आहे. वयासोबत शहाणपण आलं; पण जगण्यातलं सहजपण मात्र हरवलं. शहराच्या मध्यमवर्गीय सुखांच्या खिडकीतील आकाशाला डोक्यावरचं ते अफाट आकाश पेलणं अवघड होतंय. माणूस शिकून शहाणा होतो; पण त्याचं शहाणपण पुस्तकांत बंदिस्त होताना जीवनातून पाऱ्यासारखे अलगद निसटत जातं. हरवत जातं.

स्वतः भोवतीच्या परिघाला जग समजण्याचा स्वतःपुरता समजूतदारपणा (?) निसर्गातून मिळणाऱ्या आनंदातील सहजपणा हरवून टाकतो. प्रत्येक गोष्टींमध्ये माणूस प्रतिष्ठा शोधू लागतो. स्वनिर्मित कुंपणामध्ये बंदिस्त होताना त्यापलीकडील देखण्या जगाला विसरतो. पंचवीस-तीस वर्षापूर्वीच्या माझ्या जगण्यातील सहजपण हातून निसटले ते निसटलेच. ते पुन्हा हाती येईल का, माहीत नाही. निरामय आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सानिध्यात आटत चालला आहे. मनाच्या सांदिकोपऱ्यात तो काळ आक्रसून लपला आहे. आठवणींवर काळाची धूळ साठली आहे. पहिल्या पावसाच्या आगमनाला प्रतिसादाचा सहज हुंकार देणारा मृद्गंध दूरदूर कुठेतरी राहिला आहे. कोणत्यातरी पुस्तकातील वाक्यातून मातीचा दरवळ घेऊन सोबतीला क्षणभर आला, पण त्याचा मूळचा गंध हरवून. कधीकाळी मनाच्या आसमंताला भरून उरणारा तो गंध आसपास आजही आहे, याची गंधवार्ताही जगण्याच्या धडपडीत नाही. हे जगणं परिस्थितीशरण अगतिकतेतून अगदी सहज स्वीकारले आहे.

आयुष्यातील बराचकाळ खेड्यातील मातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या निर्व्याज सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. अनंत जलधारा बनून पाऊसकाळ हृदयात विसावला आहे. त्या क्षणांना चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले. आनंद बनून मनाच्या आसमंताला असीम, अमर्याद करीत गेलं. म्हणूनच की काय पुस्तकातल्या कवितेतून भेटणारा पाऊस अन् ती कविताही हवी हवीशी वाटू लागली. धडा, कविता वाचताना तो आपल्यासमोर उभा असल्याचे वाटायचे. बालकवींच्या कवितेतील श्रावणमास हिरवाई घेऊन मनातील भावनांना गहिरा रंग द्यायचा. त्या घनगर्द छटा गहिऱ्या होत जायच्या. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार होऊन मनात साठत राहायचा. त्याच्या विभ्रमाना पाहताना मनाला सुखद भ्रम होत राहायचा.

मधल्या सुटीनंतर दुपारची शाळा भरलेली असायची. शिक्षक वर्गात काहीतरी शिकवत असायचे. सगळी मुलं वर्गात शांतपणे बसलेली असायची. पण डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं मात्र खिडकीतून दिसणाऱ्या पश्चिमेकडील आकाशाच्या तुकड्याकडे झेपावत असायची. तेथे विहरत रहायची. आकाशाचे रंग पालटत जायचे. काळ्या रंगांची चादर त्यावर ओढली जायची. काळ्याशार रंगाने आकाश रंगायचे. इकडे आमची मने बरसणाऱ्या पाण्याने रंगायची. आमची अस्वस्थ चुळबूळ सुरु व्हायची. सरांचं लक्ष आमच्याकडे. "काय चाललंय?" म्हणून डोळ्यावरील चष्म्याच्या काचांवरून पाहत ओरडायचे. तेवढ्यापुरतं त्यांच्याकडे लक्ष. मनं मात्र आभाळाकडे केव्हाच पोहोचलेली. पुस्तकातील धडे मस्तकापर्यंत पोहोचणे अवघड होत जायचे. पुस्तकातल्या धड्यातील रंगापेक्षा बाहेरील पावसाचा रंग अधिक हवासा वाटायचा. पुस्तकातील धडे त्यांच्या तालात चालत राहायचे; पण आमच्या मनात पावसाने एव्हाना चांगलाच ताल धरलेला असायचा.

आमच्यातील कोणीतरी उभं राहून सरांना सांगायचा; "सर, पाऊस जोराचा येईल असं वाटतंय! आम्ही घरी जायचय का?" सरांचाही नाईलाज असायचा. शाळा गावापासून दीडदोन मैल अंतरावर. चिखलमाती, काट्याकुट्यातून तो रस्ता रोजच पायी तुडवत जावे लागायचे. पाऊस आला की रस्त्यावरील नाले, ओढे तुडुंब भरून वाहयचे. पाणी कमी होईपर्यंत इकडची माणसं इकडे आणि तिकडची तिकडे अडकून राहत असतं. पाऊस येणार असला म्हणजे शाळेतून घरी जाण्याची आम्हां पोरांना अनुमती असायची. दप्तर स्थानिक राहणाऱ्या मित्रांकडे नाही तर शाळेतच टाकून घरी जाण्यासाठी सारे भन्नाट सुटायचे. रस्त्यावरून चिखल, माती, पाणी उडवत, बोंबा मारीत निघायचे. जोराचा पाऊस येऊन ओढे, नाले नेहमीच तुंबायचेत असे नाही; पण पावसामुळे शाळा नावाच्या कोंडवाड्यातून काही वेळेसाठी का असेना आमची सुटका व्हायची. शाळा नावाच्या तुरुंगातून आम्हांला मुक्त करणारा पाऊस मुक्तिदाता वाटायचा. वाटायचे, हा असाच वर्षभर बरसत राहावा. मात्र सुटीचा दिवस सोडून. यासाठी आम्ही पावसाला मनातल्यामनात तशी विनंतीही करायचो; पण त्याने कधीही आमचे म्हणणे ऐकले नाही.

वाढत्या वयासोबत पाऊसही बदलत गेला. कधीकाळी कथा, कादंबरी, सिनेमातून नायक-नायिकांना चिंबचिंब भिजवणारा पाऊसच खरा पाऊस असतो, असे वाटायचे. पण तो फक्त पुस्तकांत, चित्रपटात राहिला. वास्तवात असा पाऊस आयुष्याच्या चालत्या वाटांवर कधी भेटलाच नाही. पुस्तकातून वाचताना भेटलेला, मनमुराद आनंदाची बरसात करणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. पण कोसळताना, धूळधाण करताना त्याला पाहिला, अनुभवला तेव्हा तो नकोसाच वाटायला लागला. त्याचं येणं हाच जीवनातील शाश्वत आनंद आहे, असे मानणारी मने; तो संततधार लागताना त्रासायची. वैतागायची. गावातील घरांनी सिमेंटची छते आपल्या डोक्यावर तेव्हा धारण केलेली नव्हती. सगळ्यांची घरे मातीची, धाब्याची. संततधार लागल्याने सारखी गळायची. धाब्यावरून गळणाऱ्या पाण्याने वैताग यायचा. घरात अंतरावर, अंतरावर भांडी आपलं आसन मांडून स्थानपन्न व्हायची. आई ओरडायची. छतावर मुंग्यांनी केलेली घरे मातीच्या पाट्या टाकून, बुजून गळती थांबवायला लागायची. पावसात छतावर चढून भिजताना माती टाकणे जिवावर यायचे. अंधाऱ्यारात्री धोधो बरसणाऱ्या पावसात हाती कंदील घेऊन डोक्यावरील गोणपाटाच्या घोंगडीला सावरत गोठ्यातल्या गायीवासरांना, बैलांना चारा टाकायला जाताना पावसाला बिनदिक्कत शिव्यांची लाखोली वाहिली जायची. पण त्याचा काही उपयोग नसायचा. तो आपलं कोसळण्याचं काम प्रामाणिकपणे करीत राहायचा.

शेतात खूप कामे असली की, तो अवचित यावा. चांगला जोराचा यावा असे वाटायचे. कारण शेतात वाफसा नसल्यावर ना निंदणी, ना कोळपणी. त्यादिवशी कामातून सुटका व्हायची. पण हाही आनंद तसा क्षणिकच असायचा. पाऊस कमी असेल, थोडी उघडीप मिळाली असेल, तर गोठ्यातली गुरंवासरं चरायला न्यावी लागत. हे काम टळत नसे; पण त्यातल्या त्यात बरे वाटायचे. आम्ही सगळीच समवयस्क मुले आपापली गुरंढोरं घेऊन माळावर एकत्र येत असू. सगळे जमल्यावर कधी सूरपारंब्यांचा तर कधी विटीदांडूचा खेळ रंगत आलेला असायचा. सारे खेळण्यात रंगलेले असायचे. आमच्यातल्याच काही लहान मुलांना गुरावासरांवर नजर ठेवायला सांगून मोठी मुले खेळत असायची. त्यांचं खेळणं पाहून लहान मुले आपलं काम विसरून खेळ पाहण्यात रमायची. तेव्हाशी नजर चुकवून दोनचार ओढाळ ढोरं शेजारच्या कोणत्यातरी शेतात घुसायची. योगायोगाने शेतमालक शेतात असला की, शिव्यांची बरसात करीत, बोंबलत यायचा. अशावेळी न बोलणंच शहाणपणाचे असायचे. हे शहाणपण अनुभवातून आम्ही चांगल्याप्रकारे आत्मसात केले होते.

शाळा शिकता, शिकता वर्ग वाढत गेले. तसा पाऊसही आठवणीतून वाढत, साठत गेला. शालेय वयातील भाबडा, निरागस पाऊस वाढत्या वयासोबत बदलत गेला. परिस्थतीची वास्तवता अनुभवात, अनुभवातून जीवनात प्रवेशित झाली. कथाकादंबऱ्यामधून रोमँटिक रुपात भेटणारा पाऊस कितीही खास, कितीही चांगला वाटत असला, तरी परिस्थतीच्या दाहकतेत तो रुक्ष होतो. हे कळायला लागले. त्याच्या याही रूपाशी हळूहळू परिचित झालो. त्याच्या आगमनाच्या वाटांशी शेतकऱ्याच्या जीवनाचे चक्र बांधले गेले असल्याने माणसं त्याच्या येण्याने का आनंदतात, न येण्याने विकल का होतात, हे कळायला लागले. पाऊसही प्रत्येकाचा वेगळा आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो. आपला पाऊस वेगळा आणि शहरातल्या लोकांचा वेगळा, असे वाटायचे. त्यांच्यासाठी आनंदाची बरसात करणारा. आपल्यासाठी राबराब राबून कष्टाचे डोंगर उपसायला लावणारा. कधी आला नाही म्हणून, तर कधी प्रमाणापेक्षा अधिक येऊन कोसळला म्हणून माणसं हमखास त्याच्या नावाने बोटं मोडत असत. त्याच्या अनियमित येण्याने उध्वस्त होणाऱ्या माणसांच्या डोळ्यातून कोसळताना पाहत होतो. तो दिसत होता. जाणवत होता. त्याचे अस्तित्व माणसांच्या जीवनाला, जाणीवांना वेढून टाकणारं असायचं. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार वगैरे असल्याचे वाचलेलं अशावेळी आठवायचे. वाटायचं हा आलाच नाही तर... आपलं कसं व्हायचं? त्याचं येणं लांबल्याने घरातील कर्त्या मंडळीच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट मनातलं आनंदगर्भ आभाळ काळवंडून टाकायचं. पण आशावादी मन हलकेच म्हणायचं, असं नाही होणार.

पावसाच्या गंधगार सहवासाच्या हिंदोळ्यावर झुलत कधी अभावात, तर कधी अविर्भावात जगलो. वाढलो. पावसाने त्याच्या धारांसोबत मनाचा आसमंत भिजवत परिस्थतीच्या मातीत रुजवले. शिकलो. चार पुस्तकांची सुंदर सोबत घडली. जगण्याच्या शाश्वत वाटा परिस्थितीतून सापडल्या, तशा पुस्तकातूनही सापडल्या. पदवीधर, द्विपदवीधर झालो. अंगावरची ठिगळांची नक्षी लागलेली कापडं गेली. परीटघडीचे कपडे परिधान करून वेगळ्या चौकटींच्या जगात आलो. परिस्थितीने शिकवलेल्या शहाणपणामुळे मिळालेल्या धड्यातून स्वतःला सिद्ध करीत गेलो. स्वतःला लेखत गेलो. तपासत गेलो. जगण्याने अस्तित्वाच्या भूमीत मुळं घट्ट रुजवली. काही मी शिकलो. काही अनुभवाने शिकवले. नोकरीच्या वाटेने पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो येथेच निवांत. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! आठवणींचा पाऊस कधीतरी असा अवचित आभाळभरून कोसळतो. मनात साठलेले आठवणींचे मेघ झरायला लागतात. मनातील आसमंताच्या क्षितिजावर आठवणींच्या इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान धरून कोसळणारा पाऊस रिमझिम बरसत राहतो. आठवणींचा ऊनपावसाचा खेळ सुरु होतो. मनातील गाव आणि गावातील पाऊस सोबत घेऊन शहराच्या सिमेंटच्या छतावरून ओघळत राहतो, आठवणींच्या रूपाने. 

Swatantrya | स्वातंत्र्य

By // No comments:
पंधरा ऑगस्ट एकोणाविसशे सत्तेचाळीस रोजी इतिहासाने कूस बदलली. गुलामगिरीच्या शृंखला तुटल्या. मुक्तीचे पंख लेऊन अस्मिता अवतीर्ण झाली. परदास्याचा काळ इतिहासाच्या पानात स्मृती बनून बंदिस्त झाला. अंधाराचे पटल दूर सारीत आकांक्षांच्या नक्षत्रांना सूर्य तेजाचे दान देता झाला. गलितगात्र मनांच्या मशाली पेटल्या. साम्राज्यवाद, वसाहतवादाच्या वणव्यात होरपळणाऱ्या देशासाठी मुक्तीचा आनंद शब्दातीत होता. नियतीशी करार करून मध्यरात्रीच्या अंधाराला छेदत स्वतंत्र ओळख घेऊन स्वातंत्र्य दारी आले. पारतंत्र्याच्या अनेक वर्षाच्या निद्रेतून देश जागा झाल्याचे इतिहास विस्मयाने पाहत होता. स्वातंत्र्य शब्दाभोवती स्वत्वाचे, अस्तित्वाचे अनेक हळवे क्षण जुळले. परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी चुकते केलेले मोलही मोठे होते. अनेक ज्ञात-अज्ञात देहाच्या समिधा स्वातंत्र्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित झाल्या. स्वातंत्र्याच्या वेदीवर धारातीर्थी पडणाऱ्या अनेक अनाम वीरांची नावे कदाचित इतिहासालाही ज्ञात नसतील. यांच्या पराक्रमाची परिसीमा पाहून काळही क्षणभर स्तब्ध झाला असेल.

जगातील सारे संघर्ष माणसांच्या शापित जगण्यातून मुक्तीसाठी झाले आहेत. स्वातंत्र्याचे हे संग्राम कधी मनोवांछित, तर कधी रक्तलांछित झाले. रक्ताळलेल्या वाटांवरून अगणित अडथळे पार करीत पाऊले स्वातंत्र्याच्या सूर्याला घेण्यासाठी निघाली होती. डोळ्यात स्वातंत्र्य नावाचे स्वप्न सजले होते, रुजले होते. भारावलेली मने स्वातंत्र्याच्या प्रकाशाचा कवडसा आणण्यासाठी क्षितिजाकडे चालती झाली. त्यांच्या पावलांनी पुढच्या पिढ्यांसाठी स्वातंत्र्याचे नंदनवन उभे केले. संघर्ष कोणताही असो, तो जटील असतो. जशास तसे न्यायाने वर्तणाऱ्या क्रांतिकारकांपासून, अहिंसेचे अमोघास्त्र हाती धारण करून सत्याग्रहाच्या मार्गाने संघर्षरत राहणाऱ्या गांधीजींच्या अहिंसामार्गापर्यंत साऱ्यांच्या मनात दास्यमुक्त भारताची प्रतिमा आकारास आलेली होती. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम जहाल, मवाळ आणि क्रांतिकारकांच्या मार्ग भिन्न असलेल्या; पण उद्दिष्ट एक असलेल्या ध्येयाचा साक्षात्कार आहे.

सदुसष्ट वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्य मिळविले. त्या मोहरलेल्या क्षणांची आपली पिढी साक्षीदार नसली, तरी तो ऊर्जस्वल इतिहास प्रेरणेचे दीप बनून अंतर्याम उजळण्यासाठी अनवरत तेवत आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील पिढ्यांना स्वातंत्र्य मिळविणे जीवनाची इतिकर्तव्यता वाटत होती. विद्यमान पिढी त्याकडे हक्क या भावनेने पाहत आहे. हक्क सांगितले जातात, तेव्हा कर्तव्ये दुर्लक्षित होतात. त्याग, समर्पण शब्द अशावेळी कोशात दडतात. कर्तव्यपराड्.मुख समाज देशाला ऊर्जितावस्था कशी देऊ शकेल? इतिहास घडवावा लागतो. तो काही सहज घडत नाही. त्याकरिता कोणतेतरी वेड धारण करावे लागते. ध्येयप्रेरित वेडेच इतिहास घडवितात. जो समूह आपला गौरवशाली वारसा विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही. भूतकाळाच्या गर्भातून भविष्य शोधावे लागते. त्यासाठी वर्तमानाचा प्रत्येक क्षण जिवंत करावा लागतो. जिवंत मनेच नवनिर्माणाचे शिल्पकार ठरतात. इतिहास घडविणारे आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात.

‘भारताला पंधरा ऑगस्ट एकोणाविसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले.’ हे वाक्य आपण शाळेत असताना शिकलो. आजही बहुदा तसेच शिकवले जाते. खरंतर आपणास स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. ते प्रयत्नपूर्वक मिळविले आहे. गोरे साहेब आपल्या देशात वर्षानुवर्षे राहून कंटाळले. आता आम्ही आमच्या देशात जातो. सांभाळा तुम्ही तुमचे राज्य, म्हणून ते काही आपणास ‘गिफ्ट’ देऊन गेले नाहीत. येथून जाण्यासाठी भाग पाडून ते आम्ही मिळविले आहे. असे असताना किती सहजगत्या आम्ही स्वातंत्र्य मिळाले, असा शब्दप्रयोग करतो. आधीच्या पिढ्यांनी सुखांचा, सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवले. त्याचं मोल सांप्रतकाळी आम्ही कसे करीत आहोत. सदुसष्ट वर्षात देशाला आम्ही काय दिले, याचा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? पराभूत मन आणि पराधीन मानसिकता वास्तव्य करून असते, तेथे स्वातंत्र्य असून नसल्यासारखेच असते.

विद्यमान भारत विकासाच्या कोणत्या बिंदूवर उभा आहे? त्याचं विश्वातील स्थान नेमके काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधली, तर काय चित्र दिसते. कधीकाळी विकासाची पुरेशी साधनेही हाती नसणाऱ्या देशाचा विकासाभिमुख प्रवास एक विस्मयगाथा आहे. साध्या-साध्या सुविधांसाठी परकीय मदतीकडे अपेक्षेने पाहणे देशाचे प्राक्तन होते. पण आज विज्ञान, तंत्रज्ञानाने संपन्न होत स्वसामर्थ्याने चंद्रापर्यंत पोहोचणारा अन् मंगळावर निघालेला भारत सामर्थ्यसंपन्न मानसिकतेचा आणि अमोघ जिद्दीचा साक्षात्कार आहे. कधीकाळी अभावात जगणारा देश आज अभावानेही कोणी दुर्लक्षित करू शकत नाही. भारताची ही गगनगामी प्रगती प्रामाणिक प्रयत्नांची परिश्रमगाथा आहे. देशांना मिळणारं मोठेपण सहजपणे त्यांच्याकडे चालत आलेले नसते. ते मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तो परिपाक असतो. त्याग, समर्पणाचा परिणाम असतो. शांतीचे स्वप्न डोळ्यात घेऊन मांगल्याची आराधना करीत, विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत असलेला भारत आशेचा किरण आहे. माणूस म्हणून जगण्याचा सन्मान करणाऱ्या विचारांचा एक उत्कट भाव आहे. माणूस नावाची अस्मिता जपण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या प्रयत्नांची यशोगाथा आहे. उद्याचं प्रसन्न, प्रमुदित जग निर्माण करणारे आशास्थान आहे. कलह टाळून सहअस्तित्वाला, सहजीवनाला सहजप्रेरणा समजणाऱ्या समृद्ध विचारांचा सहज सुंदर साक्षात्कार आहे.

देशांच्या विकासाचे लहानमोठेपण उपलब्ध साधनसुविधांनी उंचावलेल्या आर्थिक आलेखांनी निर्देशित करता येते. माणुसकीच्या परित्राणासाठी प्रयत्नरत असणारा विचार हीच विद्यमान विश्वाची आवश्यकता आहे. वैयक्तिक लालसेतून निर्माण होणारे स्वार्थप्रेरित कलह टाळूनच विकास साध्य होतो. विकासाला विधायक विचारांची सोबत असायला लागते. विकासाच्या वाटेने चालताना अवतीभवतीच्या भकासपणाला समजून घेत शुष्क डोळ्यात जगण्याची प्रयोजने पेरून आशावाद निर्माण करावा लागतो. उदास डोळ्यात स्वप्नांचे दीप प्रज्वलित करून आश्वस्त करू शकणारे विचारच शाश्वत सत्ये असतात. मानवकुळाचे आर्त दूर करून जगण्याला नैतिक अर्थ देऊ पाहणारे विचार आपली संपत्ती असते. मांगल्याची आराधना करीत प्रगतीचा प्रकाश निर्मिण्यासाठी प्रयत्नरत असणारे विचार चिरंजीव असतात. आपल्या देशाचे ‘भा-रत’ (आभा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे रममाण) हे नाव म्हणूनच सार्थ ठरते. 

शेकडो वर्षापूर्वी रानावनात, गिरिकंदरात राहणाऱ्या आदिमानवापासून विद्यमानकाळी प्रगतीची एकेक शिखरे संपादित करणाऱ्या माणसाचा जीवनप्रवास एक विस्मयगाथा आहे. माणूस परिणत होत गेला, तसे जगण्याचे संदर्भ बदलत गेले. शतकामागून शतके उलटत जाऊन एकविसाव्या शतकाच्या अस्मितांना सोबत घेत उदित झालेला सूर्य मानवकुलाच्या प्रगतीचा प्रकाश पाहत आहे. दुसऱ्या बाजूने अधोगतीही घडत आहे. प्रगतीच्या प्रखर प्रकाशात अधोगतीचा अंधार नेहमीच अव्हेरला जातो. अंधाराला विसरणे वैचारिक अपराध आहे. सांप्रतकाळी भारताने प्रगतीचे नवे परगणे निर्माण केलेले आपण पाहतो. प्रगतीचा प्रजेला अभिमानही आहे. पण भ्रष्ट्राचार, बेकारी, दारिद्र्य या व्यवधानांची सोबत स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे लोटली तरी घडतेच आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीची, विकासाची फळे सर्वसामान्यांच्या दारी पोहचली आहेत का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही संदेहाच्या सीमेवर उभे आहे.

मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी अद्यापही संघर्ष करायला लागत असेल, तर याला सामाजिक विकास म्हणावा का? एकीकडे संपन्नतेचे, सुखाचे दुथडी भरून वाहणारे प्रवाह आहेत. तर दुसरीकडे परिस्थितीशरण भकासपण उभं आहे. देशातील कोट्यधिशांच्या संपत्तीचे आकडे उंचीच्या परिमाणांशी स्पर्धा करीत आहेत. स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षानंतरही जगण्याच्या वाटेवर सरपटणारी माणसंही आहेत. विस्कटलेलं जगणं सावरण्यासाठी धडपड करीत आहेत. दारिद्र्याच्या दशवातारांना सामोरे जात परिस्थितीशी धडका देत आहेत. दारिद्र्याची प्रशासकीय आकडेवारी कोणती गणितं मांडून केली जाते, माहीत नाही. पण ३५-४० रुपयात माणसं सुखात, समाधानात जगू शकतात, असं म्हणणारे अहवालातील आकडे विकासाच्या वाटेवर वाकुल्या दाखवत उभे आहेत.

काहींकडे सगळंच असावं आणि काहींकडे काहीच नसावं का? एकीकडे भरपेट भोजनाने अजीर्ण झालं असेल, तर अमकंतमकं औषध, गोळी घेण्याचे टीव्हीच्या रंगीत पडद्यावरून सुचविलं जातं. पण पोटापुरते पसाभरही नसल्याने जीर्ण होणाऱ्या देहांचं काय? अन्नसुरक्षा यांच्या उसवलेल्या जगण्याला सुरक्षा देऊ शकेल काय? कुपोषण अजूनही हद्दपार होत नसेल आणि म्हणून काहींची जीवनयात्रा अवकाळीच संपत असेल, तर याला विकास म्हणावे का? स्वातंत्र्य सर्वाना मिळाले असले, तरी त्याची फळे तळागाळातील लोकांपर्यंत सर्वार्थाने पोहचलीत का? अन्नधान्याच्या गोदामातील उंदीर-घुशींनामात्र सुरक्षा नक्की लाभली आहे. असुरक्षित माणसं वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते कसेतरी खाऊन जगण्याची उमेद सोडता येत नाही म्हणून परिस्थितीशी धडका देत आहेत. हजारो माणसांच्या जगण्याची वणवण अद्यापही थांबलेली नाही. त्यांच्यातील माणसाला हरवून टाकणारं अभावाचं वेगळं जग व्यवस्थेत उभे आहे. ना त्यांना घर, ना दार. चारदोन गाडगी, मडकी हाच त्यांचा संसार. गाठोड्याना डोक्यावरून, घोड्या-गाढवावरून घेऊन भटकणाऱ्यांचं भविष्य काय? कोणताही आशावाद न जागवणारं वणवण जगणं प्रगत जगाच्या विकासाच्या कोणत्या चौकटीत आपण बसवणार आहोत?

देशातील दारिद्र्याचा प्रश्न खरंच संपला आहे का? डोळे दिपवून टाकणाऱ्या झगमगीत हाती काहीच नसणाऱ्यांची जगण्यासाठीची तगमग समाजव्यवस्थेला दिसत नसावी का? विकासगामी वाटचालीचा अभिमान देशवासियांना असला, तरी तो सर्वंकष आहे असे म्हणवत नाही. मनात आशेचे दीप प्रज्वलित करण्याएवढी प्रगती देशाने केली असली, तरी अनेक घरांच्या ओट्यांवर आस्थेच्या पणत्या प्रज्वलित करायच्या राहिल्या आहेत. दारिद्र्याचा शाप सामाजिक अभिसरणाच्या वाटेवरचे व्यवधान आहे. वाढत जाणारी खाती तोंडे सांभाळायची, तर हातांना काम मिळणे आवश्यक आहे. बेकारीचा शाप सोबत घेऊन अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण करणारी तरुणाई सैरभैर भटकते आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांच्या हातांनी देशाच्या विकासाचं बांधकाम करावे लागेल. ही नवनवोन्मेषशालिनी, सर्जनशील ऊर्जा विकासाकडे वळती करावी लागेल. या अफाट ऊर्जेला दिशा देण्यात आपण अद्यापही पुरेसे यश मिळवू शकलो नाहीत. या सळसळत्या चैतन्याचा विचार देश घडवतांना करावा लागेल. संधीचा सदुपयोग करणारा सत्प्रेरित विचार सांभाळावा लागेल. सांभाळलेले सामर्थ्य संवेदनांचा साक्षात्कारात परावर्तीत करायचे असल्यास नव्या युगाचा, नव्या दमाचा, नवा शिपाई शस्त्राने नव्हे, तर शास्त्राने संपन्न करावा लागेल.

भ्रष्ट्राचाराचा संसर्ग देशाच्या प्रगतीच्या स्वप्नांना उध्वस्त करणारा शाप आहे. श्रमाशिवाय समृद्धी शोधणाऱ्या स्वार्थांध बांडगुळांच्या लालसेने येथला संपन्न वारसाही मलीन होत आहे. ‘कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरेची चोरी नको’ यासारखी वाक्ये सुविचार बनून शाळेच्या भिंतीवर लटकली आहेत. भ्रष्ट्राचाराचे कोटीच्याकोटी आकडे ऐकून सर्वसामान्यांची मती गुंग होते आहे. अनैतिकमार्गाने मिळवलेली संपत्ती हव्यासाचा सोस बनून उभी आहे. वामनाची विश्वव्यापी तीन पाऊले प्रतीकात्मक असतील; पण भ्रष्ट्राचाराने बरबटलेल्या पावलांनी कोपरानकोपरा व्यापला आहे. भ्रष्ट्राचारमुक्त भारत हे वाक्य म्हणण्यासाठी कितीही चांगले असले, तरी नीतिमूल्यांची घसरलेली पातळी भ्रष्ट्राचारमुक्त भारत उभा राहू देत नाहीये. भ्रष्ट्राचाराने सारेच हात भरले आहेत, असे नाही. चिरीमिरी दिल्याशिवाय कामेच मार्गी लागत नसतील, तर दोष नेमका कुणाचा? स्वातंत्र्याचा की स्वातंत्र्याच्या नावाखाली घडणाऱ्या सैल आचरणाचा की, स्वैराचाराला प्रतिष्ठा मिळत जाणाऱ्या विचारांचा, सांगणे अवघड आहे.

ऊर्जाक्षेत्रातला बाकी असलेला अंधार अजूनही दूर करायचा शिल्लक आहे तो आहेच. विकासाचे पर्याय उभे करूनही अपेक्षांचे दीप आपण प्रज्वलित करू शकलो नाहीत. आठ-दहा तास विजेशिवाय जगणे, हेच आपलं नशीब म्हणून लोकांनी स्वीकारले असेल, तेथे पिकांनी बहरलेली शेते, वाढलेले उद्योग उभे राहतील कसे? अशावेळी रिकामी मने नसते उद्योग करीत असतील, तर दोष नेमका कुणाचा? प्रगतीचे अपेक्षित परिणाम साधता का आले नाहीत, हे सांगताना मोठी लोकसंख्या कारण सांगून क्षणिक समाधान मिळवता येते. हे काही एकमेव कारण नाही. प्रगतीचा झगमगाट ज्यावर अवलंबून आहे, त्या ऊर्जानिर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अपेक्षित फळे अजूनही येत नाहीत. आरोग्यसुविधातील वाणवा जणू नियतीचे देणे झाले आहे. व्याधीग्रस्त जीवन जगणे प्राक्तन समजून जगणारी माणसे कोणते स्वातंत्र्य अनुभवत आहेत? योजना अनेक आहेत. पण अनेकांपर्यंत त्या पोहचतच नाहीत. सामान्यांना सामान्य दरात आणि त्यांच्या दारात आरोग्य सुविधा मिळणे दिवसेंदिवस दुरापस्त बनत चालले आहे. आजारी पडणे जणू महागडा शोक होत चालला आहे. आरोग्यकेंद्रे आहेत; पण त्यांच्याकडून सामन्यांच्या अपेक्षांची पूर्ती होत नसल्याने आरोग्यकेंद्रांचेच आरोग्य तपासून पहायची गरज आहे, असे माणसांना वाटत असेल तर दोष नेमका द्यायचा कुणाला?

शिक्षणक्षेत्र देशाच्या विकासाचा राजमार्ग असतो. अद्यापही आमच्या शिक्षणपद्धतीला प्रवासाचा निश्चित मार्ग सापडत नाही. शिक्षण प्रयोगशाळा झाले आहे. नुसत्या मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून शिक्षणव्यवस्था परिणत वगैरे होत नसते. असली तरी त्यासाठी प्रयोग करायला लागतात. पुस्तकातून मूल्ये शोधून आपणही तसेच वागण्याची शिकवण वर्गातून देता येते; पण आचरणात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. माणसांच्या जीवनातील मूल्ये हरवत चालली आहेत. माणूस हरवू नये, म्हणून शिकवावे काय आणि कसे याचे उत्तर अजूनही सापडत नाहीये. शिक्षणातून सक्षम हात आणि संवेदनशील मने निर्माण होणे अवघड होत आहे. ज्यांच्याकडे साधनं आहेत, मोजण्यासाठी पैसा आहे ते पंचतारांकित शिक्षणसुविधा मिळवितात. ज्यांच्याकडे देण्यासाठी यापैकी नाहीच काही, त्यांच्याकरिता आहेत सरकारी शाळा, आश्रमशाळा नावाची विद्यामंदिरे. नावात मंदिर असले, तरी पावित्र्याचे, प्रसन्नतेचे प्रवाह शिक्षण नाव धारण करून येथून प्रकटायला हवेत, अशी सक्ती नाही. सरकारी आणि खाजगी शाळांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणसुविधात आणि पद्धतीत असणारे उत्तरदक्षिण ध्रुवाइतके अंतर कधी कमी होईल? प्रश्न एवढेच नाहीत. अनेक आहेत. अडचणी आहेत. व्यवधानातून मार्ग काढीत अपेक्षित लक्ष गाठणे दिवसेंदिवस अवघड कसरत होत चालली आहे.

स्वातंत्र्य मिळवून देशाने प्रगतीचे नवनवे आयाम उभे केले आहेत. तरीही झालेल्या प्रगतीच्या खुणांचे ठसे सगळीकडे का दिसत नाहीत? विकासाची पाऊले अप्रगत परगण्यांकडे वळती करावी लागतील. या पथावर उभे असणारे अडथळ्यांचे हर्डल्स बाजूला करावे लागतील. प्रगतीच्या प्रकाशाने प्रत्येक परगणा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्नांच्या मशाली प्रज्वलित कराव्या लागतील. प्रामाणिक प्रयत्नांनी, परिश्रमाने हे साध्य होईल. केवळ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळपासून राष्ट्रभक्तिगीतांचे सूर कानी पडत राहणे, तात्कालिक भावनेचे प्रवाह वाहत राहणे, म्हणजे राष्ट्रप्रेम नसते. क्षणभराच्या भावनिक आवेगाने दिलेल्या उंच आवाजातल्या घोषणा आणि उंचावलेले ध्वज यातून राष्ट्रप्रेमाची प्रतीती येत असेलही; पण हे प्रेम मनातून वर्षभर वाहते का? पंधरा ऑगस्टला सकाळी मनात उदित झालेलं राष्ट्रप्रेम सूर्यास्ताबरोबर मावळत जाऊन विरत जाणे आणि पुन्हा सव्वीस जानेवारीलाच प्रकटणे, जमल्यास अधूनमधून त्याची प्रासंगिक आठवण होताना मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत राहणे, हा राष्ट्रप्रेमाचा उत्कट आविष्कार नसतो. स्वातंत्र्यदिनाची मिळणारी सुटी आजूबाजूच्या सुट्यांमध्ये जोडून हिलस्टेशन गाठण्यासाठी नसून; आपली सामाजिक उद्दिष्टे गाठण्यासाठी आहे, याची जाणीव आपणास असावी. मला देशाच्या प्रगतीसाठी काय योगदान देता येईल, याचे चिंतन करण्यासाठी असावी. राष्ट्रभक्तिगानाबरोबर जनजागरण घडत राहणेही आवश्यक आहे. जयगानासोबत जबाबदारीचे भानही राहावे. लक्षप्राप्तीचे पथ शोधण्याकरिता निघालेल्या पावलांना कर्त्या मनाचे मोठेपण मिळावे. स्वातंत्र्याला स्वयंशिस्त असल्याशिवाय विकासाची शिखरे उभी करता येत नाहीत. आकाशाशी हितगुज करणाऱ्या आकांक्षांच्या शिखरांवर स्थिरावणारी नजर आणि त्या दिशेने निघालेली पाऊले म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य केवळ राजकीय असून चालत नाही. ते जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांमध्ये असणे आवश्यक आहे. तितकेच प्रत्येकाच्या विचारांमध्येही असणे महत्वाचे असते. कारण स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या साऱ्या वाटांचा जन्म विधायक विचारातून होत असतो. विचारांत अस्मिता असेल, तर स्वातंत्र्याचा सूर्य अपेक्षांच्या गगनात आपले सदन शोधतो. त्याच्या प्रकाशाला अन्य क्षितिजे शोधण्याची आवश्यकता उरत नाही.

Paus | पाऊस

By // No comments:
आला पाऊस एकदाचा. त्याच्या लांबलेल्या आगमनाची प्रतीक्षा संपली. आसपासच्या साऱ्या आसमंताला चिंबचिंब भिजवत राहिला. त्याच्या येण्याने सृष्टीचा साराच नूर बदलला. वाऱ्यासोबत पाठशिवणीचा खेळ खेळत थांबला एकदोन दिवस मुक्कामाला प्रसन्न सोबत करीत. हुलकावण्या देणाऱ्या वांझोट्या ढगांकडे पाहून थकलेल्या नजरांचा त्याच्या आगमनाने सारा नजाराच बदलला. काळाचे भकास स्वप्न बदलून आशेचे नवे गीत गवसले. सचैल न्हालेल्या सृष्टीच्या आरस्पानी रूपाने वातावरणात चैतन्याचे सूर निनादू लागले. सुटकेचा मनमोकळा श्वास साऱ्यांनी घेतला. परिस्थितीने कूस बदलली. बरसणाऱ्या धारांनी ताल धरला. माणसांनी हा सुखसोहळा याची देही अनुभवला. मनात आनंदाचं  गोंदण करून गेला. पुन्हा परत येण्यासाठी.

सर्जनाचा गंध घेऊन धरतीवर अवतीर्ण होणारा ‘पाऊस’ चैतन्याचा साक्षात्कार. त्याच्या आगमनात इहलोकीच्या आनंदाची सारी गणिते एकवटली आहेत. चराचराला आपल्यात सामावून घेणारा पाऊस इहलोकी येताना आनंदयात्रा होतो. सृष्टीच्या रंगगंधांना सोबत घेऊन धरतीवर अवतीर्ण होताना सृजनसोहळा बनून प्रकटतो. सहस्रावधी सरींनी चराचराला भिजवणारा पाऊस सुखांची अनवरत बरसात करीत राहतो. त्याच्या आगमनात आशा-आकांक्षांचं आकाश समावलेलं असतं. त्याच्या येण्याने जगण्याच्या वाटा संपन्नतेच्या पथावरून मार्गस्थ होतात. उद्याचं भविष्य त्याच्या आगमनाने सजलेले असते. भविष्यातील सारी सुखं त्याच्या येण्यात सामावलेली असतात. तो यावा, वेळीच यावा; म्हणून त्याच्या येणाऱ्या वाटांकडे असंख्य डोळे लागलेले असतात. त्याच्या आगमनाने केवळ धरतीलाच चैतन्याची पालवी फुटते असे नाही, माणसांच्या मनातही आकांक्षांचे कोंब अंकुरित होतात. हिरवाईने सजलेल्या पानाफुलात मनातील रंगांच्या छटा उमटतात. बरसणाऱ्या धारांनी धरणीसोबत भिजणारी मने उद्याचं आश्वस्त जिणे पदरी आल्याने आनंदाच्या आकाशात मुक्त विहार करीत राहतात.

पाऊस वेळीच बरसला की, चेहरे आनंदाच्या स्मितरेषा सोबत घेऊन प्रसन्न तेजाने उजळून येतात. नसेल वेळेवर तर चेहऱ्यावरील तेजही काळवंडते. तो उदंड बरसावा आणि वेळीच बरसावा म्हणून माणसं मनातून प्रार्थना करीत राहतात. या प्रार्थनेत पुढील परिस्थितीची प्रखर वास्तवता सामावलेली असते. वेळीच येणार म्हणून त्याच्या आगमनाच्या मार्गावर अपेक्षांच्या पायघड्या घालून उभी असतात. पाऊस केवळ आकाशातून कोसळणाऱ्या जलधारा नाहीत. धारांसोबत माणसांची जीवनधारा जुळलेली असते. जगण्याचं आश्वस्त अभिवचन त्यातून प्रवाहित होत असतं. सर्जनाचा सोहळा बनून बरसणाऱ्या जलधारांमुळे जगण्याचे आश्वस्त अभिवचन मिळते. जगण्याचे सगळे संघर्ष आनंदपर्यवसायी व्हावेत म्हणून माणसं प्रतीक्षा करीत असतात. ज्या देशाची कृषीव्यवस्था पाऊस शब्दात सामावलेली असते, त्या देशाला त्याच्या आगमनाची प्रतीक्षा असणे स्वाभाविक आहे. तो येणार म्हणून केवळ शेतकरीच आसुसलेले नसतात, तर त्याच्याशी निगडित सगळेच त्याची करुणा भाकत असतात. 

अनेकांच्या आस्थेशी जुळलेला पाऊस अनेक रुपात धरतीवर अवतीर्ण होतो. तो केवळ पाऊस राहत नाही, तर अनेक रूपं धारण करणारा बहुरूपी होतो. खेळिया होतो. त्याच्या रूपाचं देखणंपण वेगळे आणि त्याच्या येण्याचे सोहळेही आगळे. कधी धो-धो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी थेंबाथेंबातून निथळणारा, कधी मुसळधार कोसळणारा, कधी झड लागून दैनंदिन व्यवहार ठप्प करणारा. त्याच्या प्रत्येक भेटीचं रूपं आगळे, भेटीचा सोहळासुद्धा वेगळा. कसाही येवो, साऱ्यांना प्रिय असणारा पाऊस माणसांच्या जिवाचा जिव्हाळा असतो. म्हणून त्याच्या आगमनाचाही सोहळा होत असतो. साऱ्यांना त्याची ओढ लागलेली असते. वेळीच आला तर मनामनातून आनंद बनून प्रकटतो. नाहीच आला वेळेवर की, काळजाचा ठोका चुकतो.

काही दिवसापूर्वी आईशी बोलत होतो. बोलण्याच्या ओघात विषय शेतीकडे आणि शेतीकडून पावसाकडे वळला. पावसाने यावर्षी चांगल्याच वाकुल्या दाखवल्या असल्याने तिच्या शब्दांतून चिंता प्रकटत होती. पावसाचे आगमन लांबल्याने जगण्याची स्वप्ने विस्कळीत होत चालल्याची वेदना जाणवत होती. आजच्या वास्तवात उद्याच्या भकास भावविश्वाचे भाकित दिसत होते. शेतं उजाड पडत चालल्याचे दुःख होते. माणसांच्या देहात जीव असला तरी न येणाऱ्या पावसामुळे आत्मा हरवत चालल्याची जाणीव प्रकर्षाने प्रकटत होती. उद्याच्या उजाड जगण्याच्या भीतीची भाकिते कळत होती. तो यावा म्हणून मनातील आर्तता शब्द बनून प्रकटत होती. याला केव्हा एकदा वात्सल्याचा पान्हा फुटतो आणि वर्षावात सारा शिवार कधी भिजतो, याची आस मनाला लागली होती. उशिरा का होईना; पण तो येईल ही खात्रीही होती. आजूबाजूचे सारे बंध तुटतात; पण माणसाच्या मनातील आशेचे बंध सहजासहजी नाही तुटत. आई तिच्या दैवशरण भावनेतून आस्थेचे समर्थन करताना म्हणीत होती. ‘सृष्टीचा नियंता साऱ्यांना वाऱ्यावर असे कसे सोडेल. तो कनवाळू आहे. येईल त्याला या हताश माणसांची दया.’ आई अजूनही वास्तव परिस्थिती स्वीकारून पराभव पत्करायला तयार नव्हती. भारतीय शेतकऱ्याच्या याच मानसिकतेने अनेक आघातांना सामोरे जाण्याचे बळ पिढ्या न पिढ्या दिले आहे. शेतकऱ्याचा तो विजीगिषू वारसा तिच्या शब्दातून जाणवत होता.

नेमेचि येणारा पाऊस यावर्षी लांबला. माणसांची परीक्षाच घ्यायचे त्याने ठरविले होते जणू. सत्वपरीक्षा शब्दाचा अर्थ काय असतो, याचे उदाहरण जणू तो देतो आहे. येईन म्हणता, म्हणता अनपेक्षित हुलकावणी देत माणसांच्या आकांक्षांवर पाणी फिरवीत आहे. तो यावा म्हणून माणसं कासावीस होत आहेत. येत नाहीये म्हणून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. माणसं कशीतरी धीर धरून उभी आहेत. ज्याचं सारं जगणं बरसणाऱ्या जलधारांशी बांधलं गेलं आहे, त्याच्या संयमाचे बांध फुटत चालले आहेत. आस्थेचे बंध सुटले आहेत. जीवनाच्या आसक्तीचे धागे तुटत जाऊन उद्याचं भविष्य काय असेल, या भीतीने आजचा वर्तमान उध्वस्त होतोय. जीवनाचे रंग शोधता-शोधता जगण्याचेच रंग हरवत चालले आहेत. त्याच्या असण्याने आणि नसण्याने सारं जगणं मुळापासून ढवळून निघतं. तो यावा, वेळीच यावा म्हणून माणसं आस लावून बसलेली असतात. 

माणूस मुळात श्रद्धाशील प्राणी आहे. उद्याचं भविष्य वर्तमानाच्या वर्तुळात शोधतो. उद्याचं समृद्ध जीवन घडविण्यासाठी धडपडत असतो. धडपडीतल्या कृतकृत्य भावनेचा गंध परिस्थितीच्या अनुकूलतेत सामावलेला असतो. प्रयत्नांनीही प्रारब्ध अनुकूल होत नाही, तेव्हा माणसं गलितगात्र होतात. थकतात. हरतात. जीवनाची स्वप्नेही हरवत जातात. हरवलेलं जगणं शोधताना परिस्थतीशरण होतात. पाऊस येऊन सर्वत्र आबादानी व्हावी, म्हणून देवाला साकडं घालतात. त्यालाच पाण्याखाली कोंडतात. महादेवाचा गाभारा पाण्याने भरतो. तो बुडताना निदान बुडणाऱ्या माणसांना, त्यांच्या स्वप्नांना तरी तरता यावे, ही वेडी आशा मनात घर करते. कोणी धोंडीधोंडी पाणी दे! म्हणीत दारोदार पाण्यासाठी याचना करीत फिरतात, तेव्हा संवेदनशील जिवांच्या मनाचे पाणी पाणी होते. तरीही देवाला पान्हा फुटेलच असे नाही. अशावेळी पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा या विचारांवर विश्वास करावाच लागतो.

माणसाने कितीही प्रगती केलेली असलीतरी अशावेळी माणूस किती छोटा आहे, याची जाणीव निसर्ग प्रकर्षाने करून देतो. माणसांनी धरणे बांधून पाण्याला अडवलं, साठवलं. कधीतरी ते आटणार आहेतच. या वास्तवाला नाकारून चालणार नाही. आडातच नाहीतर पोहऱ्यात कुठून येणार. आणीबाणीच्या वेळी माणसं पाण्याचं महत्त्व जाणून घेतात. पाणी नियोजनाचा, बचतीचा संकल्प करतात. पण आलेली वेळ टळून गेली की, पुन्हा येरे माझ्या मागल्या. वेळ आल्यावर आपण विचार करतो. पाणी बचतीचा संकल्प करून मोकळे होतो. तो पुढे पूर्ण होतोच, असे नाही. याबाबत आपण कधी संवेदनशील मनाने विचार करणार आहोत कुणास ठावूक? आकाशातून बरसणाऱ्या पाण्याचा थेंब न् थेंब अनमोल असल्याचे नुसते सांगून काय उपयोग. त्या थेंबाचे मोल जाणणारे मन आपल्याकडे असावे. परिस्थती हाताबाहेर गेल्यावर मोल कळून काय उपयोग. तहान लागल्यावर विहीर खणण्यात कोणते शहाणपण सामावले आहे. आपल्या मनातील विहिरींना संवेदनशील विचारांचे झरे असायला नकोत का?

लहान असताना अनुभवलेला पाऊस आता फक्त स्मृतीतून उरला आहे. आमच्यासारख्या अनेकांचे बालपण पावसाच्या आठवणींनी समृद्ध केले आहे. संपन्न केले आहे. प्रसन्नतेचे दान आमच्या ओंजळीत भरभरून ओतणारा तो पाऊस आता कुठे गेला, कुणास ठाऊक? अनुभवला तसा पाऊस राहिलाच नाही. त्याचं रंगरूप, नूर सारं काही बदललं आहे. चारपाच दिवस झड बनून बरसणारा पाऊस राहिलाच नाही. आला, गेला एवढंच त्याचं अस्तित्व उरलंय. असा अचानक गेला कुठे? त्याला पळवला कुणी? त्याच्या सतत बरसण्याने कधीकाळी माणसे कंटाळत. तो येत नाही म्हणून आता का तरसतात. पावसाचे धोधो कोसळणे फक्त वाक्प्रचारापुरते उरलेय. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आठवणींचा ठेवा झाल्यात. पुराच्या पाण्यात वाहत येणारी लाकडे पकडण्यासाठी बेधडक उडी टाकणारे शोधूनही दिसत नाहीत. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या छाताडावर नाचत विजयी वीराच्या थाटाने लाकूड ओढून आणणारी माणसं आता दिसतात तरी का?

उफाणलेल्या नदीत बिनधास्त उड्या टाकून पोहणाऱ्यांचे साहस भूतकाळ होऊन स्वीमिंग टँकपुरतेच उरले आहे. उन्हाळ्यातही न आटणाऱ्या नद्या कल्पनाविलासापुरत्या उरल्या आहेत. नदीवर पोहण्यासाठी जाणे हा आमच्या पिढीतील आनंदठेवा होता. आईवडिलांची नजर चुकवून नदीकडे धावणारी अनवाणी पाऊले कशाचीही फिकीर न करता तापलेल्या वाळूतून पोळणाऱ्या पायांना उचलीत पळायची. पोहण्याच्या ओढीने कधी पायाला शेणाने माखून, कधी पाण्यावर जाणाऱ्या म्हशीच्या पाठीवर बसून नदी गाठायची. तासनतास नदीच्या पाण्यात पोहत असायची. नदीच्या अथांग, नितळ पाण्याशी अस्तित्वाची नाळ अशी घट्ट जुळलेली असायची. बऱ्याचदा नदीवरून परत आल्यावर आईच्या हाताचा मार ठरलेला असायचा. पैजा लाऊन नदीचे दोन्ही तीर गाठण्याच्या आनंदापेक्षा मार खाण्यातील दुःख कमी वाटायचे. बालपणातील तो निरागस आनंद वाढत्या वयासोबत दुरावत गेला. नद्यांवरील धरणांनी पाणी साठवले. दुथडी भरलेले पात्र आटवले. नदीकाठ कोरडे पडले. आटणाऱ्या पाण्यासोबत आनंदही आटत गेला. आठवणीचा काठ मात्र अजूनही तसाच अल्याडपल्याड दोन्ही काठ तुडुंब भरला आहे.

पावसाचं येणं जाणं वरचेवर अनियमित होत चालले आहे. माणसांच्या अनिर्बंध हव्यासापोटी निसर्गाच्या चक्रात अक्षम्य हस्तक्षेप करून माणूस निसर्गनियमांचा अधिक्षेप करीत आहे. वैयक्तिक स्वार्थापायी निसर्गाला ओरबडताना आपले अस्तित्व आपल्याच हाताने आज उध्वस्त करीत चालला आहे. जगण्यातील सहजपण विसरून स्वार्थपरायण होत चालला आहे. माणूस जसा बदलत गेला तसा निसर्गही बदलतो आहे. माणसांच्या आवश्यक गरजा पूर्ण करायला समर्थ असणारा निसर्ग त्याच्या स्वार्थाला, लालसेला कसे पूर्ण करू शकेल. ‘धटाशी असावे धट’ या न्यायाने तोही वर्ततो आहे. सहस्रावधी धारांनी बरसताना आनंदाची उधळण करणारा, देहाला भिजवताना मनालाही आकंठ भिजवणारा पाऊस आठवणीत साठला आहे. कधीकाळी संततधार बरसणाऱ्या पाण्याला घालवण्यासाठी पोळवणारी माणसं त्याच्या पाठ फिरवण्याने पोळली जात आहेत. या साऱ्यां बदलांची कारणं माणसांना माहीत नाहीत, असे नाही. पण माणूस काही शहाणा होत नाही. शहाणपण केवळ दिसण्यात नसतं. वागण्यातही असतं, तसं जगण्यातही असतं. आनंदाने जगण्यातच खरे शहाणपण सामावले आहे. असा आनंद आसपासच्या आसमंतात सामावला आहे. हे शहाणपण आम्हा माणसाना कधी येईल? की पावसाप्रमाणे तेही वाट पहावयास लावेल? 

Shantiparate Nahi Sukh | शांतीपरतें नाही सुख

By // No comments:
संत तुकाराम महाराजांचा ‘शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख॥’ पाठ्यपुस्तकात असलेला हा अभंग वर्गात शिकवीत होतो. अभंगाच्या ओळींमधल्या आशयाचे विवेचन माझ्या आकलनाच्या परिप्रेक्षात ज्ञात असलेल्या उदाहरणांच्या साह्याने विशद करीत होतो. वर्गाची ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागलेली. अशा वातावरणात शिकविताना आम्हा शिक्षक जमातीच्या अंगात नेहमीच एक अनामिक उत्साह संचारतो. अनुभव आणि वाचनातून ज्ञानाचं संचित जमा केलेलं असतं. त्यातून असेल नसेल ते आठवून सांगण्याचा प्रयत्न सुरु असतो. विवेचनाने बऱ्यापैकी वेग धारण केलेला असतो. मीही यास कसा अपवाद असेन. जीवनातील शांततेचे महत्त्व, आवश्यकता विशद करून सांगण्यात रंगलो. वर्ग शांतपणे ऐकतोय. माझ्या विवेचनाची वरची पट्टी लागलेली. वाक्यांमागून वाक्ये हात धरून पुढे चालली आहेत. मला थांबवत एक आवाज वर्गातून उमटतो. “सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू!” माझं विवेचन थांबवलं. म्हणालो, “विचार! काय म्हणायचे आहे तुला?” “सर, तुम्ही जीवनातील शांतीचे महत्त्व सांगत आहात, ते सगळं ठीक आहे; पण आपल्या आसपास शांतता खरंच दिसतेय का?”

प्रश्न तसा साधाच होता. उत्तर काय सांगायचे, यासाठी मनातल्यामनात वाक्यांची जुळवाजुळव केली. त्याचे समाधान होईपर्यंत स्पष्टीकरण करीत होतो. त्याच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे पालटणारे भाव नजरेने टिपत राहिलो. साऱ्यांच्या चेहऱ्यावरील संमिश्रभाव आपल्या आसपास यातील काहीतरी, कुठेतरी कमी असल्याचे सांगत होते. उक्ती आणि कृतीतील तफावत जाणवत होती. तास संपला वर्गातून बाहेर पडलो. मुलांच्या शंकांचे निरसन करूनही एक संदेह अस्वस्थपणे सोबत करीत होता. वाटले मुलांना शांततेचे महत्त्व तर पटले; पण शांतता आपल्या आसपासच्या आसमंतात अस्तित्वात नसल्याचे यांना का वाटत असावे? यांच्या आसपासचे वातावरण खरंच एवढे प्रदूषित झाले आहे?

‘शांती’ फक्त दोन अक्षरांचा शब्द. यात माणूस आणि माणूसपण सुरक्षित असण्याचे आश्वस्त करणारे केवढे समाधान साठलेले आहे. माणसांना जीवनयापनासाठी कितीतरी गोष्टी आवश्यक असतात. पण त्यासह शांतताही सोबत असायला लागते. ती नसेल तर सर्वकाही असून नसल्यासारखेच. माणूस कशासाठी जगतो, या प्रश्नाचं उत्तर अनेक पर्यायात देता येईलही. मला वाटतं आयुष्यात येऊन विसावणाऱ्या शांततेच्या चार क्षणांना मिळवण्यासाठी माणूस जगतो. ते मिळाले म्हणजे कृतार्थ जीवन जगण्याचं समाधान अंतर्यामी विलसत राहते. नाहीच ते आनंदाचे चार क्षण मिळवता आले तर अंतर्यामात अस्वस्थता वसतीला येऊन सोबत करते. जीवनातील निरामय आनंदापासून माणूस वंचित राहतो. म्हणूनच तुकाराम महाराजांनी मनाच्या प्रसन्नतेचे सुक्त गायले असेल.

पद, पैसा, प्रतिष्ठा सारेकाही आहे, पण जीवनात शांतताच नसेल तर लाख खटपटी, लटपटी करून महत्प्रयासाने मिळवलेल्या या गोष्टीचे मोल उरतेच किती? अशावेळी मातीमोल शब्दाचे महत्त्व काय आहे, याची जाणीव प्रकर्षाने होते. हजारो वर्षापासून माणूस सुख सर्वत्र शोधतो आहे. अजूनतरी ते त्याला मिळाले नाही. मिळाले असते तर आपल्या आसपास प्रसन्नतेचा परिमल दरवळला असता. कलहाचे नामोनिशाण दिसलेच नसते. प्रसन्नता पहाटेच्या प्रहरी परसदारी पसरलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या परिमलासारखी असते. तिच्या गंधाने मनाचं आसमंत भरून आलं म्हणजे सुखाचा सुगंध जीवनात प्रवेशित होतो. हे सर्वांबाबतीत घडेलच, असेही नाही. सुखातून समाधान आणि समाधानातून शांतता आपल्या अंगणी प्रवेशित होत असते.

शांतता मनाची अशी स्थिती आहे, जी जगण्याचे प्रयोजन अधोरेखित करते. जगावं कसं, या प्रश्नाचं उत्तर कुसुमाग्रजांच्या ‘आकाशापरी जगावे, मेघापरी मरावे, नदीकिनारी फिरुनी तृणपात्यातून उरावे’ या काव्यपंक्तीमधून आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर अन्य स्त्रोत शोधण्याची आवश्यकता राहणार नाही. विद्यमान जगाकडे कटाक्ष टाकल्यास काय दिसते. कलह, संघर्ष, संकटे, शोषण, अतिरेक याचं प्राबल्य वाढत चालले आहे. अन्याय, अत्याचार सहज दृष्टीस पडतो आहे. त्याचीही आम्हाला आता सवय होत चालली आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे आणि संघर्ष करणारे रियल लाईफमधले हिरो दुर्मीळ होत आहेत. चित्रपटाच्या रिल लाईफमध्ये आम्ही त्यांना शोधतो आहोत. शोषक शोषितांच्या असाहयतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी पद्धतशीर करतात. अन्याय घडतो, तो समोर दिसतोही. पण संघर्ष करायला बळ असावे लागते, ते आमच्याकडे असूनही आमची अवस्था किंकर्तव्यमूढ अर्जुनासारखी झाली आहे. संघर्ष करावासा वाटतो. परिस्थितीशी दोनहात करण्याचे विचार मनात येतात. पण का उगीच आपल्या मनाची शांतता घालवून बसा, म्हणून निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ होत जातो. माणसं आहे त्यात समाधान मानायला लागतात.

अस्वस्थ जग आपल्या आसपास नांदत असताना शांतता कशी निर्माण करता येईल? जगातील कलह शांततेच्या मार्गानेच सोडवता येतील, या विचारावर विश्वास असणाऱ्या माणसांनी शांततेचे पथ निर्माण करण्याचे प्रयत्न केले. शांततापूर्ण सहअस्तित्वातून घडणारे सुंदर जग निर्माण करण्याचे स्वप्न अनेक धुरिणांनी आपआपल्या काळी पहिले. पण त्यांच्या प्रयत्नांना फलप्राप्तीचा मोहर आला का? कदाचित पुरेसा नाही. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात सत्ताकांक्षी, साम्राज्यवादी मानसिकतेने वर्तणाऱ्यांकडून विद्वेषाचे वणवेच पेटवले गेले आहेत. विद्वेषातून युद्धे घडली. युद्धाने सारेच प्रश्न सुटू शकतात, असे बऱ्याचदा वाटतेही. अशा विचारांवर विश्वास ठेऊन समर्थन करणाऱ्यांना काही कळत नाही असे नाही. युद्धपिपासू मानसिकतेतून आणखी जटील प्रश्नांचा जन्म होतो. हे आपण सोयिस्कररित्या का विसरतो? 

शंभर वर्षापूर्वी लाखो लोकांच्या जिवाची आहुती देणारा पहिले महायुद्ध नामक रक्तरंजित खेळ विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माणसाने खेळून पहिला. यातून जगात कोणती शांतता प्रस्थापित झाली? युद्धातून तह आले. तहातून अपमानजनक अटी. अपमानकारक अटीतून हुकूमशाही विचारधारा प्रबळ होत जाऊन हुकुमशहा घडत, वाढत राहिले. हुकूमशहांच्या महत्वाकांक्षेतून अनिर्बंध, अविवेकी अस्वस्थता प्रबळ होत राहिली. अशा अवस्थ अशांततेतून भीषण संहार पुन्हा घडलाच ना! या रक्तलांच्छित खेळातून आपणास खरंतर शहाणपण यावयास हवे होते; पण ते न येता पुढच्या वीस वर्षात पुन्हा एकदा त्याहून भीषण संहार घडवणारा कलंकित अध्याय इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने लिहिला गेला.

दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणूहल्ले करून अमेरिका कोणती शांतता प्रस्थापित करू पाहत होती? अविवेकी आकांक्षेतून, अनिर्बंध कृतीतून कोणते सुख, शांती विश्वाच्या ललाटी लेखांकित होत होती. सहकार्य, सहजीवन ही विद्यमान विश्वाची अनिवार्य आवश्यकता असताना अनेक देश, प्रदेश आजही धुमसत आहेत. दहशतवादी, अतिरेकी कारवाया करणारे बंदुकीच्या टोकावरून कोणती शांतता प्रस्थापित करू पाहत आहेत. महत्वाकांक्षा असणाऱ्या धुरिणांच्या अविवेकी निर्णयातून निरपराध लोकांचे जिणे असह्य होत आहे. इराकमध्ये बंदुकी, बॉम्बच्या ज्वालांनी बळी जाणाऱ्या नागरिकांचा दोष काय? इस्त्राईल, इराण, इजिप्त, सिरीया, युक्रेन अफगाणिस्थान यासारख्या देशातून एकांगी विचार का वाढत चालला आहे? अशा विचारला अस्मिता समजणे, हे जगण्याचं कोणतं सुयोग्य तत्वज्ञान आहे? मोठ्या प्रमाणात घडून येणाऱ्या बदलास क्रांती म्हणतात. असा बदल जाणीवपूर्वक घडवून आणला जातो. अन्यायाच्या विरोधात तो एल्गार असतो. पण अविवेकी विचारातून घडवून आणलेल्या क्रांतीने कोणता सकारात्मक बदल माणूस घडवू पाहत आहे. दहशवादी कारवाया करणारे कोणते नवे जग घडवू पाहत आहेत? रक्ताने माखलेल्या पथावरून सत्तेचे सिंहासन मिळवून सत्ता प्राप्त करता येईलही; पण अशा रक्तलांछित सिंहासनावर अधिष्ठित होऊन शांती कशी निर्माण करता येईल?

‘खायला कोंडा आणि निद्रेला धोंडा’ अशी एक म्हण आपण ऐकतो. अंतर्यामी शांतता वसत असेल, तर भोजनपात्रातील कोंडाही पक्वान्नासमान वाटतो. प्रामाणिक परिश्रमाने थकलेल्या शरीराला सुखनिद्रा येण्याकरिता वातानुकूलित घराची आवश्यकता नसते. थंडी, ऊन, वाऱ्यात असेल तशा परिस्थितीत शांत झोप तेव्हाच लागते, जेव्हा हृदयात मनःशांतीने निवारा शोधून वसती केली असते. आपलं अंतर्याम शुद्ध, स्वच्छ, नितळ, निर्विकार, निर्विकल्प असेल तर निद्रा येईल कशीही आणि कोठेही. पण मनात दोषाचं डबकं साचलं असेल, विकल्पाचं तण वाढलं असेल, अविवेकाचं मोहळ उठले असेल, तर पैसा देऊन विकत घेतलेल्या भौतिकसुखांमध्ये झोप येईलच कशी? जीवनातील शांततेने निरोप घेऊन मन सैरभैर झाले म्हणून माणसं शांततेच्या शोधात वणवण भटकंती करीत राहतात. तीर्थक्षेत्री जाऊन देवाला साकडं घालतात. त्याच्याकडे हात पसरून सुख, शांती मागतात. तेथे जाऊन ती मिळते? माहीत नाही. ‘तुझं आहे तुज पाशी; पण जागा चुकलाशी’ अशी स्थिती आपली झाली आहे. हृदयातील भगवंत हृदयातच उपाशी आहे.

आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक तापांनी मन पीडलेले असेल, तर स्वस्थता लाभेलच कशी? आध्यात्मिक ताप साधकांच्या वाट्याला येतो म्हटल्यास आधिभौतिक, आधिदैविक हे दोन ताप आपण सामान्य माणसांच्या वाट्यास विपुल प्रमाणात येतात. ते नाहीसेही करता येतात. याकरिता मनाची प्रसन्नता आपल्या अंतर्यामी असायला नको का? मन शांत असल्यावर असे ताप चढतीलच कसे? केवळ भौतिक सुखालाच जीवन मानणारे संतुष्ट नाही होऊ शकत. आपल्याकडचा पैसा फेकून भौतिकसुविधा प्राप्त केल्या म्हणजे शांतताही जीवनात प्रवेशित होते, असे म्हणणे आपल्या मनाची वंचना नव्हे काय? सौख्य आणि शांती चंद्रमौळी झोपडीतही आवास करीत असते. त्यासाठी दोनतीन कोटीचा बंगला नावावर असायलाच हवा, असे नाही. इंद्रियसुखांना अविवेकी, अतिरेकी महत्त्व दिल्याने त्यांची तृप्ती होणे संभव नाही. आनंदाची प्राप्ती क्षणिक भौतिकसुखांच्या, सुविधांच्या संपादनात नसून अंतरात्म्याच्या समाधानात असते. चिरंजीव आनंदाचे उगमस्थान आपले अंतर्यामच आहे. शरीराचे सोहळे साजरे करणारी सुखं ‘ययातीचं’ जगणं ललाटी लेखांकित करतात. तारुण्याचं वरदान मागता येईलही; पण चिरतारुण्य म्हणजेच सुख असू शकत नाही. देह वृद्ध झाला म्हणून काही बिघडत नाही. मन मात्र तरुण असायला हवे. तारुण्यातच जीवनाला आकार देण्याचे सामर्थ्य असते. हे सामर्थ्य विवेकी विचारातून घडत जाते. अशा घडलेल्या विचारातून शांतीचा सहवास लाभतो.

अमूप सुख ओटीत टाकणाऱ्या साधनांची निर्मिती विज्ञानाने केली, पण या साधनांमुळे जीवनात शांतता आली नाही. अणुशक्तीने विध्वंसही करता येतो आणि विकासही करता येतो. तिचा वापर करायचा कसा, हे माणसाला ठरवावे लागते. विवेकी विचार करणाऱ्यांच्या हाती ती लागली, तर काळवंडलेले आभाळ प्रकाशित करता येते; पण अविवेकाच्या हाती हे सामर्थ्य आले तर अंधाराचे साम्राज्य विश्वात उभे करता येते. वापर करायचा कसा, हे आपल्यालाच ठरवावे लागते. मनात शांतता असल्याशिवाय हे नीट कळेल कसे? कालच्या जगाचं जगणं आणि आजच्या जगाचं जगणं यात खूप अंतर आहे. पूर्वी जीवनात फारशा सुविधा नसतानाही माणसं संतुष्ट वाटत होती. संकटकाळी मदतीला धावून जात होती. आज मला काय त्याचं, या अलिप्ततावादी धोरणाने जगत आहेत. विद्यमानकाळी खूपकाही हाती लागूनही मनातील सुखांची लालसा काही कमी होत नाही. कामक्रोध खवळत आहेत. विवेकशून्य विचार प्रबळ होत आहे. भडकलेल्या कामक्रोधाने जिणं दुष्कर केले आहे. असुरक्षित वाटू लागले आहे. संयमाचे बांध उध्वस्त होत आहेत. कोणातरी निरपराध निर्भयाच्या जीवनयात्रेची सांगता घडत आहे. थोड्याशा धनाच्या लालसेसाठी कोणाचातरी देह धारदार शस्त्राच्या वेदीवर चढत आहे. ‘सुरक्षितता’ शब्दालाच सुरक्षित करायची वेळ आली आहे.

विश्वात माणसाइतका विचारी सजीव कोणीच नाही, हे वास्तव आहे. पण माणसाइतका अविचारही कोणी करू शकत नाही, हेही सत्य नाकारून चालत नाही. उत्क्रांतीच्या टप्यात वानराचा नर आणि नराचा नारायण होणं अपेक्षित आहे. पण परिस्थिती ‘नरेचि केला किती हीन नर’ अशी होत चालली आहे. अशांत विश्वात शांतीचा अधिवास शोधावा कसा आणि कुठे? काय केले असता मानसिक शांती मिळेल, असा प्रश्न निर्माण होतोय. विकारांनी शरीराची बजबजपुरी केली असेल तर तेथे शांती राहीलच कशी? विकारग्रस्त चित्ताला तिळमात्रही शांतता लाभत नाही. विकारांचं अधिष्ठान असणाऱ्या ठिकाणी शांतता असू शकत नाही. मग याकरिता काय करावे? याचे उत्तर तुकाराम महाराजांच्या  ‘बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुख अंतपार नाही ॥’ या अभंगाच्या विचारात आपणास मिळेल. शोधून तर पहा. निष्काम शोधयात्रा आपल्या अंतर्यामी सुख, शांतीचे अधिष्ठान निर्माण करते.

Samadhan | समाधान

By // 2 comments:
चित्ती असू द्यावे समाधान

‘समाधान’ असा शब्द ज्याचं अस्तित्व आपल्या जीवनात कायम असावं, ही साऱ्यांचीच अपेक्षा असते. तसं थोडंफार समाधान प्रत्येकाकडे असतेच; पण ते नुसते असून चालत नाही. त्याचा प्रवाह आपल्या जीवनसरितेला समृद्ध करीत राहावा म्हणून धडपडही सुरु असते. यासाठी हे प्रवाह जेथूनही आपल्याकडे वळते करता येतील, तेथून वळते करण्यासाठी अखंड धावाधाव करताना काही माणसं आपल्या आसपास दिसतात. धावपळीतून त्यांना समाधानाची प्राप्ती होते का? असा प्रश्न बऱ्याचदा मनात डोकावून जातो. नसावी, कारण समाधानाचा एक प्रवाह आपल्याकडे वळता केला की, आणखी नवे स्त्रोत शोधण्याची इच्छा मनात उदित होत असते. आणि जे मिळालेले असते, ते चिरकाल टिकणारे असतेच असेही नाही. मिळाले तेच समाधान आहे, हे मानायला मन बहुदा तयार नसतेच. कारण हातून काहीतरी निसटल्याचे सतत वाटत असते. त्यातून आणखी काही मिळवण्याची तृष्णा जागी होते.

तृप्ती, संतोष, आराम हे समाधान शब्दाचे समानार्थी शब्द शब्दकोशात पहावयास मिळतात. हे शब्द कितीही चांगले वाटत असलेतरी ‘असमाधान’ या विरुद्धार्थी शब्दाचाच आपल्या जीवनात अधिक अधिवास असतो. आपली इहलोकीची यात्रा सुखमंडित असावी, ही अपेक्षा सतत सोबत करीत असते. म्हणून या अपेक्षेच्या पूर्तीसाठी काहीतरी करणं आलंच. कारण ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे वर्तल्यास संपन्न, समृद्ध वगैरे जगणं वाट्याला येणार नाही. पर्यायाने सुखाचा शोध घडणार नाही आणि सुख नाही म्हणून समाधानही नाही. म्हणूनच की काय जगात सुखी माणूस जन्माला यायचा आहे, असं म्हटलं जात असावं. सुख, समाधान ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना. थोड्याशा अनुकूलतेतही काही माणसं तृप्त असतात. काहींना कितीही मिळालं तरी पर्याप्त समाधान नसतं. त्यांना आपल्याकडे आणखी काहीतरी असावं, असं सतत वाटत असतं.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.’ तुकाराम महाराजांना येथे समाधान शब्दाचा काय अर्थ अपेक्षित असेल? सारंकाही देवाच्या हाती सोपवून आपण निश्चिंत राहावे. नाही! असा निष्क्रिय प्रारब्धवाद त्यांना नक्कीच अभिप्रेत नव्हता. आपल्या अंतर्यामी तृप्तीची धारा प्रवाहित राहावी. याकरिता अहर्निश परिश्रमरत राहून अनंताच्या अधिपत्याखाली आनंदाने जगावे. जगताना अनावश्यक गरजांच्या मागे न धावता अंतरीच्या समाधानाला शोधण्यासाठी जीवनाची शोधयात्रा घडावी. पुढे चालताना हीच जगण्याची आनंदयात्रा ठरावी, हेच त्यांना अपेक्षित असावे. आनंद आपल्या अंतरीचा अनमोल ठेवा असतो. त्याला शोधण्यासाठी कस्तुरीमृगासारखं वणवण धावण्याची आवश्यकता नाही. इहलोकीची सारी सुखं मनाच्या समाधानात साठली आहेत, सामावली आहेत. समाधान प्राप्त करण्यासाठी प्रसंगी आपल्या भौतिक गरजा कमी करून पदरी आलेल्या दैन्याचा विनम्रतेने स्वीकार करीत जीवनाचा नम्र शोध घेण्याची वृत्तीच समाधानाचे प्रदेश निर्माण करीत असते. समाधानाने बहरलेल्या वनात आनंदविभोर होणारं आत्मतृप्त, अत्मापर्याप्त, आत्मलीन मन आपल्यापाशी असलं की, समाधान अंतर्यामी सहज अवतीर्ण होतं.

हजारो वर्षापासून माणसाची जीवनयात्रा प्रगतीच्या नवनव्या प्रदेशांच्या शोधात अनवरत सुरु आहे. हा थकवणारा शोध कशासाठी? सुखप्राप्ती, हे त्याचं उत्तर. यासाठीच तो नव्या गोष्टी शोधत गेला. बैलगाडीपासून आगगाडीपर्यंत आणि आगगाडीपासून अवकाशयानांपर्यंत त्याच्या प्रगतीच्या पाऊलांनी गगनगामी झेप घेतली. समुद्रतळापासून अवकाशतळापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांची सफर त्याने सुखाच्या शोधासाठी केली. विज्ञानाचे दीप उजळून त्याच्या प्रकाशात अनेक भौतिक साधनं निर्माण केली; पण या साधनांनी माणूस खरंच सुखी झाला का? या प्रश्नाचं हो, असं उत्तर यायला आणखी खूप अवधी लागेल. शोधांनी काहीकाळ समाधान मिळालं असेल. पण ते काही चिरकाल टिकणारे नाही. त्याला अतृप्तीचा अभिशाप आहे. लागलेल्या शोधांनी माणसाच्या जीवनातील सारी दुःखे संपलीत, असंही कोणी म्हणू शकत नाही किंवा तसं म्हटल्याचं आठवत नाही.

विज्ञाननिर्मित सुधारणांसाठी आपल्याला भौतिकसुखांची विपुलता असणाऱ्या अमेरिकन संस्कृतीकडे पाहण्याची आवश्यकता वाटत असेल; पण जीवन समजून घेण्यासाठी कोठे बाहेर जाण्याची गरजच नाही. कारण शेकडो वर्षापासून समर्पणशील विचारांच्या पायावर भारतीय संस्कृती उभी आहे. येथील संस्कारक्षम जीवनाची महत्तता जाणवेल एवढी मोठी आहे. अमेरिकेचा दरडोई उत्पन्नाचा निर्देशांक अधिक असेलही, पण दरडोई समाधानाचा निर्देशांक भौतिकसुविधांमध्ये हरवत चालला आहे. भारतीय लोक संपत्तीने दरिद्री असतील, सुविधांची येथे वानवा असेलही. पण दारिद्र्यातही मनाची श्रीमंती आहे. हल्ली आपल्याकडेही जगण्याच्या कॅनव्हासवरील चित्र हळूहळू बदलत चालले आहे. सुखप्राप्तीचे नवे रंग माणूस त्यात भरू लागला आहे. सुखाच्या स्वनिर्मित मृगजळामागे धावण्याच्या स्पर्धेत जवळजवळ सगळेच सहभागी व्हायला तयार झाले आहेत.

मनात समाधान नाही म्हणून ते शोधण्यासाठी धावाधाव सुरु होते. निघतात माणसं सुखाच्या शोधात. कोणी कुठे, कोणी कुठे. कुणी यात्रेला, कुणी तीर्थयात्रेला, कुणी पर्यटनाला, कुणी परदेश वारीला. निदान तेथेतरी मनाला समाधान देणारा कोणीतरी सुखकर्ता असेल. तो असला म्हणजे तेथे सुखही नक्कीच सापडेल, असं वाटायला लागतं. एकदाचं आपल्याला सुखं मिळालं म्हणजे समाधानही येईलच असं मानून माणसं नद्या, समुद्रात डुबक्या मारतात, स्नान करतात. येथेही क्षणिक समाधानापलीकडे फारसे काही हाती लागतच नाही. शोधायला गेलो होतो, ते हाती आलेच नाही, म्हणून त्यातून पुन्हा आंतरिक अस्वस्थता निर्माण होते. समाधान आपल्या अंतर्यामी आहे. अंतरीचे हे सुख पाहण्यासाठी आपल्याकडे नुसते डोळे असून चालत नाही. डोळे सगळ्यांना असतात; पण दृष्टी फार थोड्यांना असते. ‘तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकलाशी’ अशीच आपली स्थिती होणार असेल, तर समाधान हाती लागेलच कसे?

समाधानाच्या शोधासाठी क्षणिक सुख पदरी ओतणारी भौतिकसाधनं माणसं पैसे देऊन आणू शकतील. पण समाधान पैसा देऊन विकत घेता येत नाही. घरात टीव्हीसेट आहे, सोफासेट आहे, डिनरसेट आहे, टीसेट आहे; पण माणसं मात्र येथून तेथून अपसेट आहेत. माणसं सुखाच्या शोधात स्वतःला हरवत चालली आहेत. निसर्गातलं निर्व्याज सुख देणारं जंगल दुर्लक्षित करून सिमेंट काँक्रिटच्या जंगलात सुखाचं नंदनवन उभं करायला निघाली आहेत. ते उभं राहावं म्हणून अखंड धडपडतायेत. एअरकंडिशन बसवून समाधानाचा शीतल गारवा निर्माण करू पाहत आहेत. अशा एअरकंडिशन घरांमध्ये काहीकाळ गारवा निर्माण करता येईलही. हा आल्हाददायक गारवा हेच खरे समाधान आहे, असेही वाटेल कदाचित; पण तेही क्षणिकच. कारण बंगल्याबाहेर असमाधानाचा वणवा उभा आहे. त्या वणव्यात गारवा शोधायचा कसा?

घर, बंगला, गाडी, माडीत काहींना संतोष मिळत असतो. पण तो काही चिरंजीव नाही. गाडीचे मॉडेल बदलून नवे आकर्षक मॉडेल बाजारात आले, ते आपल्याकडे असावं म्हणून वाटेल. स्मार्टफोन नव्याने मार्केटमध्ये आला. तो माझ्याकडे का नसावा, म्हणून मन झुरणी लागेल. माडीवर माडी बांधावी म्हणून कधीचा विचार करतोय, म्हणून मन स्वस्थ बसू देत नाही. हे मिळवण्यासाठी अस्वस्थता वाढत जाईल. त्यातून अंतरीचे समाधान अंतर्धान पावेल. आजूबाजूला दिसणारी झगमग आपल्या मनाची तगमग वाढवेल. खरंतर विद्यमान जग आपल्याला जगण्यासाठी कालच्या असुविधायुक्त जगापेक्षा सुसह्यच नाही, तर सुखाचंही झालं आहे. पण उद्याचं अधिक संपन्न, समृद्ध वगैरे प्रगत जग घडवण्याचा हव्यासातून अतृप्तीची बीजें मनात अंकुरतात. आजूबाजूला काटेरी झुडपे सहज नजरेस पडतात; पण चंदनाची झाडे क्वचितच दिसतात. ही चंदनाची झाडे जागोजागी रुजवल्याशिवाय समाधानाचा सुगंध आसपासच्या आसमंतात कसा पसरेल?

काही दिवसापूर्वी माझा एक विद्यार्थी भेटला. दहावीच्या परीक्षेत थोडे कमी गुण मिळाल्याने त्याला आवडणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची खंत व्यक्त करीत होता. शिकायला केवळ तेच महाविद्यालय कशासाठी हवं? इतरही महाविद्यालये आहेत, तेथे शिक्षण घे म्हणून सांगितले तर म्हणाला, “मी निवडलेल्या महाविद्यालयात चांगलं शिक्षण मिळण्याची संधी आहे. तेथे प्रवेश घेणारे विद्यार्थीही अभ्यासू, हुशार वगैरे असतात. मात्र, एवढ्या गुणांनी तशी संधी मिळण्याची शक्यता नाही. म्हणून विचारात पडलोय कोणता पर्याय निवडावा.” त्याच्या मनात समाधान-असमाधानाचे द्वंद्व सुरु झालेले. मिळवायचे होते, ते राहून गेल्याची खंत मनाला सतत कुरतडत राहील. त्यातून असमाधानाचे काटेरी झुडपं त्याच्या विचारविश्वात जोमाने वाढत राहतील. ‘आलीया भोगाशी असावे सादर’ म्हणीत परिस्थितीविषयी थोडा सकारात्मक विचार याला करता आला असता तर... पण नाहीच करीत आपण तसं. खरंतर समाधान शब्दाची परिभाषा आपण आपल्यापुरती तयार करून घेतलेली असते. त्याप्रमाणे जीवनात नाहीच काही घडलं की, मनात अस्वस्थतेचे मळभ जमा व्हायला लागतात अन् त्यातून असमाधानाचे विचार जन्म घेतात. त्यांना मनात एकदाची जागा करून दिली की, ते पद्धतशीर वाढत जातात.

परिपूर्ण समाधानी असणं लौकिक अर्थाने कितीही उत्तम असले, तरी भौतिक सुख-सुविधांकडे नेणाऱ्या मार्गाच्या निर्मितीसाठी अंतर्यामी थोडी अस्वस्थता, थोडे असमाधान असल्याशिवाय नव्या गोष्टी शोधणं माणसाला शक्यच होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सुखासाठी काहीतरी हवं, ही भावनाच माणसाला नव्या परगण्यांकडे चालण्यासाठी प्रेरित करते. कोणत्यातरी अपेक्षेने मनात उदित होणारी अस्वस्थताच नव्याचा शोध घेण्यासाठी उद्युक्त करीत असते. अल्पसंतुष्ट राहून घडणाऱ्या प्रगतीचं बोनसाय होणं, हे लिहिताना अपेक्षित नाही. गरजांतून निर्मित सुविधांचा वटवृक्ष वादळवाऱ्याशी संघर्ष करीत उभा राहणं आणि त्याचा विस्तार घडत राहणं, म्हणजे प्रगती. प्रगती घडताना आवश्यक काय, अनावश्यक काय याची जाण असणं आवश्यक आहे. नैतिकमूल्यांची होणारी पडझड थांबवून, त्यांचा अवनतीकडे होणारा प्रवास टाळला की, समाधान देखण्या पावलांनी चालत आपल्याकडे वसतीला येते.

मिळाले तेवढेच पुरे आहे, अशा समजाने संतुष्ट होऊन माणूस जगला असता, तर प्रगतीचा एवढा मोठा पल्ला त्याला गाठताच आलाच नसता. माणसाची सर्वांगीण प्रगती जीवनाला सुखी करण्यासाठीचा प्रवास असावा. अस्वस्थ दिशेने नेणारा विकास नसावा. संत ज्ञानेश्वरांच्या ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ या भावनेचा परीसस्पर्श विकासाला असावा. त्यातून तृप्तीचे, संतोषाचे निर्झर जन्माला यावेत. या निर्झरांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अनवरत प्रवाहित राहावे. त्याच्या नितळ प्रवाहाने आजूबाजूचा आसमंत फुलून यावा. बहरणे घडावे. या बहरण्याला कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळावे. अशा समाधानातून प्रगतीकडे नेणारा जीवनाचा प्रवास म्हणजे खरे समाधान असेल, नाही का?