माणूस समूहप्रिय असल्याचं आपण म्हणतो. तो आहेच. संदेह असण्याचं कारण नाही. पण सांप्रत स्थितीकडे पाहिलं तर त्याच्या समूहनिष्ठेवर प्रश्नचिन्ह अंकित करण्याइतपत संदेह विचारात वसती करून आहे, हेही दुर्लक्षित नाही करता येत. आपापली कोटरे अन् त्यातले कोपरे प्रिय असण्याच्या काळात अपेक्षा तरी कसल्या अन् कोणत्या कराव्यात? माणूस स्वतःपासून सुटत अन् समाजापासूनही तुटत चालला आहे. क्षणाक्षणाने विलग होत आहे अन् कणाकणाने विखरत आहे.
आसपास माणसांची कमी नाही. नजरेचा कोन किंचित कलता केला तरी अगणित आकृत्या दिसतात. पण त्यांच्या असण्यात अंतर अन् वागण्यात एक शुष्कपण सामावलेलं आहे. संवादाला खंडीभर सुविधा असूनही माणूस माणसापासून विलग होतो आहे. शब्द सहजपणाचे साज चढवून संचार करीत नाहीत. त्याला कोणतातरी किंतु वेढून असतो. संपर्काची साधने संवादाला सहजपणाचा साज चढवण्याइतपत सुलभ असूनही शब्दांसोबत असणारा स्नेह आटत चालला आहे. साधने संप्रेषणाला सक्षम बनवतायेत, पण माणसे संकुचित होत आहेत. संवादातून सहज जुळणाऱ्या स्नेहाचे सूर जगण्यातून सुटतायेत. त्याचं काय करायचं? ते कुठून उसने नाही आणता येत. तो अंतरीच्या ओलाव्यातून वाहता राहतो.
आयुष्याला वेढून असलेल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधूनही सापडत नाहीयेत माणसांना. का सापडत नसावेत सहज जगण्याचे सूर? जगण्यातून साधेपणाने काढता पाय घेतला की, मखरांचं अप्रूप वाटायला लागतं. वास्तव आकार विस्मरणात जावून सजावटीला अन् त्याला चिकटून असणाऱ्या झगमगाटाला महत्त्व मिळालं की, ओंजळभर प्रकाश पेरणारी पणती उपेक्षित राहते अन् कोपरे अंधारे. उजेडाची गाणी गाताना अंधाराचेही अर्थ समजून घेता आले की, भ्रमणाचे अन्वयार्थ समजून सांगायला नाही लागतं. अंधाराच्या पटलाआड अंतरावर कुठेतरी उजेड पहुडलेला असतो, याचं विस्मरण होणं विचारांशी वंचना असते. चमक चिरंजीव नसते हे माणसाला माहीत नसेलच का? कसं शक्य आहे? शेकडो वर्षांपासून संतमहंत कंठशोष करून सांगतायेत की, संमोहित करणाऱ्या चुकार क्षणांचा त्याग करून प्रपंच नेटका करा म्हणून. मग तरीही माणूस विचारांनी असा फाटका का?
सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असं नाही. विवक्षित विकल्प नसल्याने त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. हे स्वीकारलं तरी एक प्रश्न शेष राहतोच, तो म्हणजे विस्ताराच्या परिभाषांचे संदर्भ जगाला माहीतच नसतील का? धूसर पटलाआड दडलेली क्षितिजे यांना कधी साद देतच नसतील का? स्वप्नांचे कोरभर तुकडे यांच्या ओंजळीत सामावत नसतील का?
काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला चौकट मिळते. त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की नाही, माहीत नाही. माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध पडूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित, मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव.
माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने पालटत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःला नियंत्रित करणारे मंत्र अवगत व्हायचे आहेत. सूत्रातून सुटण्याच्या टोकावर तो स्वतःच लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ भास ठरू पाहतोय. आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात, त्यांना भोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडतं. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अहं अंतरी रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो.
यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? अंतरावर राहण्याचे अर्थ कळले आहेत का? या प्रश्नांचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत, याचं भान असणं माणूस समजून घेण्यासाठी पर्याप्त असतं.
चंद्रकांत चव्हाण
▪
0 comments:
Post a Comment