संभ्रमाचं पटल

By

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् भोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. खरंतर माणूस असण्याचे अर्थ सगळीकडे सारखे कधीच नसतात. तसे असण्याची शक्यताही नाही. म्हणून त्यांचे अर्थ समजून घेण्यात अन् अन्वयार्थ लावण्यात एक किंतु अनवरत नांदता असतो. कोणी म्हणत असेल की, माणूस मला बऱ्यापैकी कळला. त्याच्या ठायी नांदणारी माणुसकी कळली. तर ते अर्धसत्य आहे. त्याचं म्हणणं त्याच्यापुरतं खरं असलं, तरी त्याच्या असण्याचे आणखी काही कंगोरे असतात. काही ज्ञात संदर्भ असतात. काही अज्ञात कोपरे. ते उमगणे म्हणजे माणूस समजून घेणं असतं अन् त्या समजण्याची सूत्रे सापडणं, म्हणजे माणुसकीच्या व्याख्या कळणं. पण बहुदा हे होणं अवघड. कारण, संभ्रमाचं एक पटल वेढून असतं त्याला. ते पार करून प्रत्येकाला पलीकडील प्रतिमा पाहता येतातच असं नाही.

अवतीभवती माणसांची कमतरता कधीच नव्हती अन् नाही. भविष्यातही नसेल. पण त्या गजबजाटात नितळ विचारांना आयुष्याचं ध्येय समजणारा, निखळ भावनांच्या कळ्यांना काळजीने जपणारा अन् निर्व्याज जगण्याला इतिकर्तव्यता वगैरे म्हणणारा माणूसही कधी कोणाला सापडला नाही. पुढे सापडेल याची खात्री देणंही अवघड. आपल्या आसपास अनेक माणसांचा अनवरत राबता असतो. पण त्यांत संवेदनेचे सारे संदर्भ आपल्यात सामावून असणारी माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी. चेहरा नसलेली. गर्दीला केवळ आकार असतो. आकार म्हणजे माणूस असण्याचं प्रमाणित प्रमाण नसतं. 

माणूस शब्दाची सर्वमान्य अन् पर्याप्त परिभाषा अद्याप तयार झाली नाही. कोणाला तसं वाटत असेल तर तो त्यांच्या विचारधारेचा भाग. खरं हे आहे की, दिसतं त्यातून काही निसटतं. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काही तरी किंतु शेष उरतोच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. भोवती असणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील राहू नको वगैरे चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? 

कुणी म्हणेल, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय पाहत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे समजतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळं नाही होता येत. खरं हे आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यात नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं माणूस समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच पदरी पुण्याई पेरणारा पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो. नाही का?

चंद्रकांत चव्हाण  

0 comments:

Post a Comment