परिभाषा

By
काही माणसे जन्माने मोठी असतात. काहींवर मोठेपण लादले जाते. पण काही माणसे असेही असतात ज्यांच्या असण्याने मोठेपणाला नवी उंची मिळते. समाजात वर्तताना सामान्यांच्या जगण्याला नवे आयाम देणे, हेच आपलं जीवितकार्य मानणारी माणसे समाजासाठी आस्थेचं लेणं असतात. भरकटलेल्या गलबतांना किनारा सापडावा म्हणून दीपस्तंभ बनून कार्य करणाऱ्यांची जातकुळीच वेगळी असते. परिस्थितीपरिवर्तनाची मशाल हाती घेऊन, वंचितांच्या वेदनांना समजून घेत; अनवरत संघर्ष करीत असतात ते परंपरागत मिरासदारी या संज्ञेला अपवाद असतात. सर्वसामान्य घरातला कोणी एखादा स्वकर्तृत्त्वाने सेवापरायणतेची शिखरे निर्माण करू शकतो. शोधलंच तर अशी अनेक माणसे आसपास नजरेस येतील. पण त्यासाठी पाहणं नाही, शोधणं घडावं लागतं. प्रतिकूल प्राक्तन घेऊन नांदणाऱ्यांच्या प्रांगणी प्रसन्नतेचा परिमल पसरत राहावा म्हणून प्रयत्नरत राहताना फकिरीही प्रमुदित अंतःकरणाने स्वीकारणारे कशाचीही फिकीर करत नाही, तेव्हा कुबेर शब्दाचा खरा अर्थ आकळतो.
 
परंपरांच्या चौकटी मोडीत काढून परिघाबाहेर पाऊल टाकल्याशिवाय वेगळे साहस सहसा घडत नाही. मनात ध्येयवेडी स्वप्ने उदित झाल्याशिवाय आकांक्षांची क्षितिजे खुणावत नाहीत. क्षितिजांच्या कमानी काळजात कोरल्याशिवाय नवे परगणेही हाती लागत नसतात. ज्याला परंपरांचा पायबंद पडला, त्याला नवे रस्ते कसे निर्माण करता येतील? परिस्थितीला व्यवस्थेच्या वर्तुळातून शोधून वेगळं केल्याशिवाय विचारांची डूब कळत नसते. पद, पैसा, प्रतिष्ठा मिळाली म्हणून कोणी लागलीच असामान्य नाही होत. आसपास झगमग दिसत असलीच तर तो तात्पुरता प्रकाश असतो. परिस्थितीचा अक्ष बदलला की, उजेडाचे अर्थ बदलतात. अंधाराची सोबत घडताना कवडशांच्या परिभाषा आकळू लागतात अन् आयुष्याचे अर्थ समजायला लागतात. मोठेपण मिरवण्यात नसतं, तर इतरांना मोठं करण्यात असतं. हीच खरी दौलत असते. सार्वजनिक जीवनात तत्त्वांसाठी आग्रही असणारे; पण वैयक्तिक जीवनात निराग्रही असणारे उमद्या मनाचे धनी म्हणूनच सगळ्यांना आपले वाटत असावेत. सेवा माणसांच्या संस्कारीत आयुष्याचे अविभाज्य अंग आहे याबाबत संदेह नसला की मूल्यांच्या व्याख्या देखण्या होतात.

परिस्थितीच्या रखरखत्या उन्हात सापडलेल्यांसाठी आल्हाददायक सावली माथ्यावर धरणारं डेरेदार झाड होता नाही आलं, तर एखादं झुडूप तरी बनता यावं. अभावग्रस्तांच्या आयुष्याचे काठ भरजरी विणता नाही आले, तरी किमान प्रभावाची किनार रेखता यावी. वंचित, उपेक्षितांचे कैवारी म्हणून बिरूद धारण करणे सुलभ आहे; पण हे असिधाराव्रत निष्ठेने सांभाळणे सहज नसते. परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग केल्याशिवाय बदलांना चेहरा गवसत नाही. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे म्हणूनच आसपास असायला लागतात. ज्यांच्या जगण्याचं प्रत्येक चरण सत्प्रेरीत प्रेरणांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत घडणारा प्रवास असतो, त्यांना समाजासाठी केलेल्या सेवेचं कौतुक अन् केलेल्या कार्याचं नवल नसतं. कारण, त्यांचं जगणं हीच नवलगाथा असते. 
••

2 comments: