अंतरीचे धावे...

By
अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून माणसांकडून उपयोगात असणाऱ्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतो, नाही का? नसता तर ते काही भाषेच्या परगण्यात विहार करत नसते. आशयाच्या अंगभूत छटा असतात त्यांना, तसे अर्थाचे अनेक पदरही. अभिव्यक्तीचे कंगोरे असतात, तसे आकलनाचे आयामही. अंतरीचे भाव व्यक्त करताना एखादा शब्दच का निवडला जातो, तो आणि तोच कशासाठी वापरला जातो याची काही पारिभाषिक कारणमीमांसा करता येईलही. निवडीची परिमाणे सांगता येतील. पण प्रत्येकवेळी केवळ हा आणि हाच अर्थ आपण निवडलेल्या शब्दाला असेल, असं ठामपणे सांगणं अवघड आहे. तसा तो असतोच, नाही असं नाही. पण बऱ्याचदा त्या शब्दाच्या आधी आणि नंतर येणाऱ्या वाक्यांच्या अनुषंगाने त्याचं असणं असतं. कोणी कोणत्या कारणाने आणि प्रयोजनाने तो प्रयोगात आणला यावर अर्थाचं असणं अवलंबून असतं.

एखादा शब्द कसल्याशा कारणाने कुणाकडून वापरला जातो, तेव्हा त्याला अवगत असणाऱ्या आशयाच्या अनुषंगाने त्याचा उपयोग तो करत असतो. शब्दप्रयोग करणाऱ्याच्या अंतरीचा सगळा भाव त्यातून व्यक्त होईलच असंही नाही. त्यात अभावाचे काही किंतु असू शकतात, काही प्रभावाचे परंतु असतात, तसे आकलनाचे काही कंगोरे असतात हेही वास्तव विसरून नाही चालत. आसपासच्या वाक्यांना धरून वाहणारे काही अनावृत अर्थ त्यात असू शकतात. अध्याहृत आशय असू शकतो. वाच्यार्थापुरता तो सीमांकित नाही करता येत. लक्षार्थाच्या वाटेने वळणे असू शकते, तसे व्यंगार्थाची सोबत करीत प्रकटणेही असतेच. प्रासंगिकतेचे प्रयोजने सोबत घेऊन शब्द मनाच्या प्रतलावरून वाहत असतात. भाषा वाहत्या प्रवाहासारखी असते, तिचे किनारे धरून पुढे तेवढं सरकता यावं.

खरं तर हेही आहे की, असं किनारे वगैरे धरून किती जणांना पुढच्या वळणाकडे वळता येतं? प्रवाहासोबत वाहणारे अनेक असतात. पण त्याच्या गतीप्रगतीचा विचार करणारे संख्येने किती असतात? पसारा करून मांडणारे शोधलेच तर आसपास असंख्य सापडतील. अघळपघळ असणारेही अनेक असतील. अघळपघळ असणं काही अपराध नसतो अन् नवलाई तर नाहीच नाही. ओंजळभर का असेनात आयुष्याची प्रयोजने प्रत्येकासाठी असतात. सगळ्यांसाठी असली म्हणून ती काही समान सूत्रात ओवलेली असतील असं नाही. जगण्याच्या चौकटी प्रत्येकाच्या वेगळ्या अन् प्रत्येकासाठी निराळ्या असतात. जशी अनुभूती तशी अभिव्यक्ती अन् विचारांची बैठक, तसं असणं स्वाभाविक. सहज असणं निराळं. सम्यक असणं आगळं अन् तारतम्याने वागणं वेगळं. असं असलं तरी व्यवस्थेने निर्धारित केलेल्या चौकटीतून नामानिराळं नाही होता येत, हेही खरंय. भाषिक व्यवहार व्यवस्थेने सजवलेली चौकट आहे. तिला देखणं करण्याचा प्रयास वर्षानुवर्षे हा नाही तर तो, कुणीतरी करतोच आहे. आपापले कुंचले घेऊन पुढयात पडलेल्या चौकटींच्या तुकड्यात रंग भरतो आहे. अर्थात, भाषा साचली की, तिचं देखणेपण हरवतं. भावनांच्या प्रतलावरून पुढे सरकताना ती अधिक साजरी दिसते हे सांगायला नको. तिच्या विस्ताराच्या विश्वात सामावलेल्या व्यवधानांना खोडत जाण्याला म्हणूनच अधिक महत्त्व असतं, नाही का?

काहीच कळत नाहीये ना! हे असं वाह्यात लिहिलेलं वाचून आपण कशासाठी वेळ वाया घालवतो आहोत वगैरे वाटलं असेल. नाही का? हा सगळा फाफट पसारा आवरताना... चुकलो. वाचताना असं म्हणायचं होतं मला! खरंतर तुम्ही तो आवरतायेत याची शतप्रतिशत खात्री आहे. खरं सांगू का. एक अनामिक आनंदही. असुरी आनंद असाही एक शब्द मनात आला. पण तसं सांगणं रास्त नाही वाटत, म्हणून असे संकेतप्रिय शब्द पेरावे लागतात लिहिताना...

हे सगळं प्रवचन काय आहे? नेमकं काय सांगायचंय या माणसाला? असा काहीसा विचार मनात आला असेल. येऊ द्या! चांगली गोष्ट असते, असं काही मनात येणं अन् त्या अनुषंगाने विचार करणं. त्यात प्रमाद तुमचा नाही. परिस्थितीने पेरलेल्या प्राक्तनाचा आहे... परत असंबद्ध वाक्य. साला, काय वैताग आहे नुसता! वाटलं ना असं काहीसं. वाटायलाच हवं. वैताग न यायला आपण काय संत, महात्म्ये, योगी वगैरे आहोत का? नाही ना! मग करा वैताग हवा तेवढा आणि हवा तसा. मीही असाच वैतागलो, म्हणून तर लिहितोय हे.

असो, आता जास्त नाही ओढत. तर त्याचं झालं असं की, आमचा एक मित्र. एक असंच म्हणूयात! त्याला नाव आहे आणि चांगलं भारदस्त वगैरे प्रकारातलं आहे. पण येथे ते काही फारसं महत्त्वाचं नाही. त्याच्या असण्याला अर्थ आहे. नावं वगैरे सगळ्यांना असली तरी नावामुळे असे कोणते तीर आपण मारतो? आपल्या मायबापाची आवड म्हणून ते आयुष्यभर मिरवतो अन् मायबाप वंशाची वेल विस्तारली, या समाधानात त्या नावाला आनंदाचं अभिधान वगैरे मानतात इतकंच. नावात काय आहे, असं शेक्सपिअर का कोणी कोणी म्हटलंय म्हणे! म्हणू द्या कोणालाही. आपलं काय जातं. त्याने नसतं म्हटलं, तर कुणीतरी म्हटलंच असतं की कधीतरी. कदाचित वेगळ्या अर्थाने म्हणाला असता इतकंच. पण मुक्कामाचं ठिकाण एकूण एक तेच. खरंतर मीही असं म्हणालो असतो; पण ते तुम्हांला खरं वाटलं नसतं. म्हणून कोण्यातरी मोठ्या नावाला हे नाही, पण अशी वाक्ये चिटकवून दिली की वजन वगैरे वाढतं.

परत विषयांतर... साला, हा माणूस चाकोऱ्या धरून चालत नसेल का कधी... वाटलं ना असंच काहीसं! कोणी काही म्हणा, ज्यांना नवं काही शोधायचं त्यांनी चाकोऱ्या नाकारायला हव्यात. व्वा, काय वाक्य आहे! नाही, नाही मी नाही म्हणत असं. आपलं आवडलं म्हणून घेतली थोडी थोपटून. लाल वगैरे रंग आवडत असेल, तर त्या शब्दाचा प्रयोग करता येईल तुम्हांला. पण तो केवळ आणि केवळ मनातल्या मनात. त्याला ध्वन्यांकित नाही करायचा. नाहीतर कानाखाली ध्वनी निनादतील. काय सांगता येतं कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या गेल्यात तर. हल्ली दुखावणं जरा जास्तीच. प्रतिकारशक्तीच कमी होत चालली आहे हो. झाला थोडा इकडचा तिकडचा बदल की, लागलीच शिंका, खोकला सुरु होतो. आपण आपली काळजी घेतलेली बरी. कुण्याही जिवाचा न घडो मत्सर, असं काहीसं आपल्या तुकोबांनी नाही का सांगितलेलं आपल्याला. कागदावर असं काही टोकदार नाही लिहू. संकेत हो सभ्यतेचे, दुसरं काय! सभ्यता, संस्कृती आपण नाही संवर्धित करायची तर कुणी करायची? आपली कर्तव्ये आपणच पार पाडायची. ती काही वस्तू नाही आणली कुठून आयात करून. शतकांचा वारसा असतो हो तो! आपणच त्याची काळजी घ्यावी. आपल्या अवतारकार्याचं एवढं उदात्त प्रयोजन असल्यावर उसन्या गोष्टी कशाला आणायच्या कुठून कुठून.

तर मी काय म्हणत होतो? हे बघा, असं होतं कधी कधी. एकाचवेळी डोक्यात अनेक विषय असले की, काय सांगू आणि काय नको असं होतं. विषय अनेक असण्यात काही वाईट वगैरे नाही; पण ते नीट न सांगता येणं कुठे चांगलं असतं, नाही का? सांगणं, बोलणं, ऐकवणं माणसांची सहजवृत्ती. ऐकणं असेल तर खूप चांगलं. पण हल्ली अशी सहनशील, सात्विक वगैरे विचारांची माणसे सापडणे अवघड होतंय हो! बरं वाटतं आपलं कुणीतरी ऐकतोय हे पाहून. सहज सापडलं तावडीत कुणी ऐकणारं तर सोडू नये, असा काहीसा नवा शिष्टाचार रुजू पाहतोय. याला आधुनिक सभ्यता म्हणा हवं तर. अर्थात, हे आपल्यापुरतं हं. थोडक्यात याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्ती, घटना किंवा स्थळांशी संबंध नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा इत्यादी इत्यादी... हं, आता कसं सुरक्षित वगैरे वाटतंय, नाही का? काय असतं, एकदाका काल्पनिक म्हटलं की, आपली देखणी (!) देहाकृती घडवणारी सगळी हाडं एकसंध आणि जागच्याजागी असल्याची खात्री पटते. काय असतं की, साहित्यलेखनाची काही प्रयोजने असतातच ना! त्यात शहाणे करून सोडावे सकळजन, असंही काहीतरी असेलच की! एखादा नवोदित, उदयोन्मुख कवी आपल्या कविता ऐकवण्यासाठी कसा उत्सुक असतो नाही का? किती कौतुक असतं त्याचं त्याला. असा उत्साह असावा सोबत. कुणी ऐकलं अथवा न ऐकलं तरी. सुखदुःखे समे कृत्वा वगैरे म्हटलंय की आपल्या गीतेत. अगदी असं असावं नाही का? स्थितप्रज्ञ का काय म्हणतात ना, अगदी तसंच! अगदी तसं आणि तसंच नसेल होता येत, तर निदान त्यासारखं तरी.

परत चाकोरी सुटली वाटतं. सुटू द्या. येईल, येईल विषय रुळावर. चालत्या पावलांची चाकोरी सुटली तरी ती काही वेगळ्या विश्वात नाही नेत कुणाला. इहतलीच विहार असतो की तिचाही. फक्त एखादं वळण कमी-अधिक किंवा इकडे-तिकडे एवढंच. कोणी म्हणेल, नावासाठीच तर सगळे सायासप्रयास सुरु असतात माणसांचे. असेल असेल तसंही असेल! ज्यांना हवं त्यांना ते करू द्यावं. आपल्यासाठी ते फारसं महत्त्वाचं नाही. आणि सगळ्याच लेखांमध्ये पात्राचं नाव सांगायला हवं असं कुठे आहे? हा कोणीतरी एक तुम्ही अथवा मी, असा कोणी असू शकत नाही का? असायला काय हरकत आहे?

तर त्याचं असं झालं की, माझा हा मित्र खूप चांगला कलाकार. संगीत वगैरे याच्या जगण्यात एकजीव झालेलं. आयुष्याचं अविभाज्य अंग. एकवेळ याचा आत्मा वेगळा करता येईल याच्यापासून; पण याच्या कुडीतून सूर आणि साज निराळे नाही करता येणार. जन्मदत्त देणगी घेऊन येतात काही लोक. कदाचित इहतली आपल्याला अवतार धारण करून काळ व्यतीत करायचा, तर आयुष्याला अर्थ देण्यासाठी काहीतरी साधन हाती असावं, म्हणून हा सुरांचा साज सोबत घेऊन आलेला. नाहीतर आपलं संगीताचं ज्ञान डब्बे वाजवण्यापुरतं. वर्गात एखादं खट्याळ पोरगं काहीतरी आगळीक करतं आणि अनायासे हाती लागतं. त्याला थोपटण्याची संधी सापडते तेवढ्यापुरतं. शेवटी काय असतं की अशा मातीच्या गोळ्यांच्या आयुष्याला आकार देण्याची अन् घडवण्याची नैतिक जबादारी आपल्या शिक्षकी पेशाची प्राथमिकता असते, नाही का? मूल्यवर्धन आणि संस्कृतीसंवर्धन करण्याचं दायित्व व्यवस्थेने आपल्याला आंदण दिलेले असल्याने सुंदर शिल्पे घडवण्यासाठी टाकीचे काही घाव घालावे लागतात ओबडधोबड कातळावर. म्हणून हा दगड... माफ करा. मला पोराला असं म्हणायचं होतं हो! कधीकधी अतिउत्साहात असं भलतं काही लिहलं जातं बघा. निगुतीने धोपटणं, नाहीतर बडवणं एवढ्या परिघात विहार करणारं. फार झालं तर आपण एकजात सगळे बाथरूम सिंगर. पण माझा हा स्नेही काही तरी वेगळं रसायन आहे. हा वर्गात कुणाला बडवतो तेव्हाही सुरात अन् धोपटतो तेव्हापण त्याला साज आणि आवाज असतो.

आता तुम्ही म्हणाल की, मुलांना बडवणं, धोपटणं वगैरे तर्कसंगत नाही अन् कायदेसंमत तर मुळीच नाही. तुम्ही लोक अपराध करतायेत, असं नाही का वाटत? खरंय हो तुमचं म्हणणं, पण कधी कधी नाठाळाच्या माथी सोटा टाकावा लागतो त्याचं काय? अहो, ही पोरं सगळं मानसशास्त्र कोळून प्यायलीयेत. यांच्या समिप येताना सगळी शास्त्रे आपली शस्त्रे म्यान करून येतात. धोपटणं, बडवणं वगैरे शब्दांचा शब्दशः अर्थ नका घेऊ. परिमित प्रताडीत करणे, तेही आंतरिक आस्थेने असा अभिप्रेत असतो हो आम्हां लोकांना! अर्थात, या अनुशासनामागे मुलांनी सत्प्रेरीत विचारांचे अनुसरण अन् सभ्यतेच्या संकेतांचं अनुकरण करावं, हा शुद्ध, सात्विक वगैरे हेतू अनुस्यूत असतो. आमच्यातले काही सन्माननीय अपवाद विलग केले, तर कुठल्याही मास्तराच्या मनात आपल्या आसपास झुळझुळ वाहणाऱ्या चैतन्याच्या प्रवाहांविषयी आपलेपण असते. संस्कारांच्या मातीआड दडलेल्या बियांतून अंकुरित होणाऱ्या कोंबांचे जतन, संवर्धन करताना अथांग ओलावा अन् अफाट आस्था अंतरी नांदती असते, हेही वास्तवच. चला, एवढं स्पष्टीकरण ज्ञात अज्ञात स्त्रोतांच्या रोषापासून मुक्तीसाठी पर्याप्त आहे, नाही का?

असो, खूप स्तुतिसुमने उधळली. असं लिहणं कृत्रिम वाटतं. म्हणून मोह टाळून आवरतं घेतो. केवढा त्याग केला या बाबाने, असं वाटलं असेल तुम्हांला नाही का? वाटू द्या. मनातल्या भावना जिवंत असल्याचं लक्षण असतं ते. हां एक गोष्ट अधोरेखित करायला लागेल याच्याबाबत, नियतीने आपल्या पदरी टाकलेल्या दैवी देणगीचा कुठलाही माज नसलेला हा जीव. पाय सतत जमिनीच्या सानिध्यात. नव्हे मातीशी याच्या जीवनमुळांनी सख्य साधलेलं. त्यांच्याशी एकजीव झालेला. माणूस म्हणून असलेच काही दोष, तर तेही प्रजातीच्या उत्क्रांतीक्रमाने सोबत दिले म्हणून घेऊन आलेला.

श्वासाची स्पंदने सोबत घेऊन आलेला प्रत्येक जीव आपल्यापुरता विचार करतो वगैरे म्हणतात. पण माणूस स्वार्थाला परमार्थाच्या रुपेरी किनारीने मंडित करतो, हाही इतिहास आहेच. याची किनार इतरांपेक्षा थोड्या कमी रुंदीची, एवढाच काय तो बारीकसा फरक. स्वार्थाच्या कर्दमात राहूनही मनाचं उमदेपण अबाधित राखलेला. केवळ संगीत आणि संगीत एवढंच याच्या जगण्याचं वर्तुळ. त्याच्या प्रगतीचा परीघ ताल, सुरांभोवती प्रदक्षिणा करणारा. विचारांचा विस्तार ओंजळभर वाटत असला तरी त्याच्या विश्वापुरता तो कुबेर. बाजारात बऱ्याचदा कुठलेतरी सेल लागलेले असतात. अमकी वस्तू घेतली तर तमकी वस्तू मोफत. कदाचित नियंत्याच्या दरबारात याच्या आगमनसमयी सेल लागलेला असावा. येताना संगीतसोबत दोनतीन गोष्टी घेऊन आलेला. शब्दांची बऱ्यापैकी जाण असलेला आणि त्यांचा समयोचित उपयोगही करता येणारा. शब्दांच्या जंजाळात कोणाला केव्हा घेईल, सांगणे मुश्कील. भाषा वगैरे अध्यापनाचा आणि अध्ययनाचा परगणा असणाऱ्यांनाही घोळवण्यात माहिर. कोणाला कधी आणि कसा गुंडाळेल सांगणं अवघड. याने टाकलेल्या शब्दांच्या जाळ्यात मी सहसा सापडत नाही, पण हा कधी हाती लागतो आणि शिकार करतो याची संधी सतत शोधणारा.

अर्थात, त्याच्या अशा असण्यात एक स्वाभाविकपण सामावलेलं. कळीचं फूल व्हावं इतकं सहज अन् सूर्याने डोंगराआडून डोकावून हलक्या पावलांनी क्षितिजाच्या कमानीवर विराजमान व्हावं इतकं स्वाभाविक. एखाद्याला ठरवून शब्दांशी सख्य साधता येईलही. पण काही गोष्टी उपजत असतात की काय कोण जाणे. कदाचित हाही त्याच जातकुळीचा असावा. शब्दांच्या राशीतून ओंजळी भरून उधळण्यात कोणतीही कसर राहू न देणारा. बोलताना अर्थाशी कोणतीही झटापट नाही की, ओढूनताणून आणलेले अभिनिवेश. सहजपणाचे साज लेवून आलेले शब्द एखाद्या लावण्यखणीने परिधान केलेल्या अलंकारांसारखे. देखणेपणाला सुंदरतेचा साज चढवणारे. वैखरीच्या वाटेने वळणारी याची पावले आनंदाचं अभिधान म्हटलं तर वावगं ठरू नये, अतिशयोक्त वाटत असलं तरी. सवड मिळाली की, याचं शब्दांसोबत मुक्त विहार करणं सुरु. शाब्दिक कोट्या याच्याकडे कोटीच्या संख्येत असाव्यात. कोणत्या शब्दाचा संबंध कशाशी जोडेल, हे त्याचं त्यालाही सांगता येणं अवघड. सोबत तेवढाच हजरजबाबी. आमच्यासोबत असणारे काही सहकारी याने ठरवून निवडलेले बकरे. दिसले की हलाल करण्यात याला कोण आनंद. अर्थात, त्यांनाही यात काही वावगं नाही वाटत. घटकाभर विरंगुळा म्हणून याने प्रयोग केलेल्या प्रत्येक शब्दकृतींना अन् अर्थ चमत्कृतींना सहर्ष अंत:करणाने हेही झेलतात. कधी एखाद्याच्या बोलण्याची टर उडवेल, कधी कुणाच्या भाषेचा लहेजा साभिनय सांगेल, तर कधी लेखनशैलीची नक्कल करेल याचा अंदाज बांधणे अवघड. एकवेळ हवामानाचे अंदाज अचूक ठरतील; पण याच्या अंतरी अधिवास करून असलेल्या आभाळाचा अदमास लावणे जवळपास अशक्य.  

शब्दांचा संसार सोबत घेऊन संवाद साधणारे अनेक; पण अंतरी उदित होणाऱ्या भावनांना नजाकतभरल्या शब्दसंभाराने सजवणारे संख्येने किती असतात? शब्दांची अस्त्रे शस्त्रे दिमतीला घेऊन जगण्याचं शास्त्र समृद्ध करणारे म्हणूनच कुतुहलाचे विषय होतात. मनी उमटणाऱ्या भावनांची स्पंदने अनवरत निनादत ठेवता येतात, त्यांना शब्दांशी असणाऱ्या स्नेहाच्या परिभाषा नाही शोधाव्या लागत.

शब्दसंगतीची महती माणसाला काही नवी नाही. संत ज्ञानेश्वरांना अमृतातही पैजा जिंकणाऱ्या अभिव्यक्तीवर आस्थेवाईक आत्मविश्वास होताच ना. शब्दांच्या सामर्थ्याची प्रचीती असल्यामुळेच तुकाराम महाराजांना ‘आम्हा घरी धन...’ म्हणून सांगावंसं वाटलं असेल का? कारणे काही असोत. त्यांना शब्दांचं सामर्थ्य अवगत होतं, म्हणूनच निर्धारपूर्वक शब्दांची अस्त्रे-शस्त्रे आपलीशी केली.

भाषा भावनांच्या प्रतलावरून प्रवास करीत असते. तिच्या जडणघडणीचा प्रवास शतकांच्या प्रयत्नांचा परिपाक असतो. ओंजळभर कालावधीत घडलेला चमत्कार नसतो तो. भाषेचा विस्तार अनुभूतीच्या प्रतलावरून पुढे पळताना गवसलेलं अर्थपूर्ण असं काही असतं. इहतली अधिवास करणारे इतर जीवही संवाद करतात, नाही असे नाही. त्यांच्या अभिव्यक्तीला काही अंगभूत मर्यादा असतात. पण आपल्या पुढयात पेरून ठेवलेल्या मर्यादांना सामर्थ्य बनवून माणसांनी आदानप्रदानाला अभिव्यक्तीचं क्षितिज दिलं. म्हणूनच भाषा केवळ संवादाचे साधन न राहता संप्रेषणाच्या सेतू झाल्या.

माणसांना शब्द कसे आणि केव्हा गवसले असतील? ते आणि तसेच का तयार झाले असतील? उच्चारलेल्या ध्वनींना आशयघन अर्थ कसे मिळाले असतील? वगैरे वगैरे अनेक प्रश्न आपल्या आसपास नांदते आहेत. काहींची उत्तरे सहज गवसतात. काही हाती येतायेता निसटतात. काही सहजी हाती लागत नसतात. त्यासाठी काळाच्या कुशीत विसावलेल्या खुणांचे उत्खनन करावे लागते. भाषा आणि अभिव्यक्ती अन् तिच्याभोवती विहार करणारे प्रश्न तसेही जटिलच. अभ्यासक, संशोधक, भाषाशास्त्रज्ञ वगैरे मंडळींना वगळलं तर सामान्यांच्या गावी त्यांचा मुक्काम सहसा नसतो. शब्दांना घेऊन भावनांच्या विश्वात विहार करता येणं एवढीच परिमित अपेक्षा असते त्यांची.

शब्दांचा परगण्यात लीलया विहार करणाऱ्याचा शब्दप्रभू म्हणून कुणीतरी कुतूहलमिश्रित भावनेतून उल्लेख करतो. तो करू नये असे नाही. पण त्यात वास्तवाचे भान असण्यापेक्षा संतुष्ट करण्याचाच भाग अधिक असतो, कौतुकाची स्तोत्रे सुरात गायलेली असतात, असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरू नये. संवाद माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे. तो सुखावह, सहज करण्याचं साधन भाषा आहे. मनात उदित होणाऱ्या विचारांना मुखरित करण्याचं ती माध्यम असल्याचं कोणालाही नाकारता नाही येत. शब्दांचा प्रयोग करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असण्यात नवलाई नाही. शब्दांसोबतचे असणारं सख्य, अक्षरांशी असणारा स्नेह, संभाषणाचा हात धरून येणारा संवाद वगैरे अनेक गोष्टी त्याच्या या कृतीत अनुस्यूत असतात. चिमूटभर वास्तव अन् ओंजळभर अंदाजावरून एखाद्याला शब्दप्रभू वगैरे म्हणणं थोडं अधिक वाटतं, नाही का? अर्थात, हे कुणाला वास्तव अवास्तव वगैरे वाटत असलं तरी एक सत्य विचारांच्या तळाशी निवांतपणे पहुडलेलं असतं ते म्हणजे, शब्दच आपले प्रभू असल्याचं सविनय मान्य करणारे खऱ्या अर्थाने शब्दांचे सवंगडी असतात. नाही का?

2 comments:

  1. व्यक्तिरेखा छान रेखातलीत सर. काहींना शब्दरूपी धन उपजतच मिळालेले असते त्यातलीच ही एक व्यक्तिरेखा.

    ReplyDelete