Marathi | मराठी

By
२७ फेब्रुवारी, कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस; हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून आम्ही महाराष्ट्रीयांनी साजरा केला. याच दिवशी वर्तमानपत्रातून एक बातमी वाचली. ‘अभिजाततेच्या उंबरठ्यावर मराठी.’ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आवश्यक निकषांची पूर्तता करून; महाराष्ट्रात मराठीचं अस्तित्व सुमारे दोन-अडीच हजार वर्षापासून असल्याचे पुरावे शोधले. कोणत्याही महाराष्ट्रीय माणसाला आनंद, अभिमान वाटावा, अशी ही बातमी. पण मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला, भाषेचं अस्तित्व पुरातन आहे, असे सिद्ध झाले म्हणून लगेचच आपली भाषा भविष्यात आणखी सर्वांगाने बहरेल, दशदिशांना वाढेल, तिची घौडदौड प्रचंड गतीने होईल, असं समजणे केवळ स्वप्नाळूपणा आहे. बदल घडतील, नाही असे नाही; पण त्यासाठी वेळ द्यावा लागेल. आपण तो वेळ भाषा सर्वांगाने बहरावी म्हणून सत्कारणी लावणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे.

प्रश्नांची उत्तरे काही असोत; पण आज मराठीभाषा महाराष्ट्रातच मरणासन्न अवस्थेत उभी आहे. तिला तिचं स्वतःचं असं अस्तित्व कितीसं राहिलं आहे? असे प्रश्न आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण भाषेबाबत ऐकत असतो. हे ऐकलेलं, बोललेलं आपण खरं मानावं की, आपला भ्रम आहे असं समजून, हे म्हणणं दुर्लक्षित करावं? खरंतर भाषेबाबत प्रत्येक पिढीतला हा काळजीयुक्त सूर आहे. या नकाराच्या सुरावटीना गाणे समजून आपणही तेच गात राहावं का? तिच्या प्रगतीच्या वाटा उजळून निघाव्यात, म्हणून आपापल्या प्रयत्नांची एक लहानशी पणती हाती घेऊन उभं राहणं आपल्या वकुबाप्रमाणे शक्य नाही का?

काळ बदलत असतो. बदल निसर्गाचा सहजभाव आहे. बदलांना आपण थांबवू शकत नाहीत. बदलत्या काळाशी सख्य साधतात, तेच प्रवाहात टिकतात. जे स्वतः बदलून प्रगतीच्या कालोचित पाऊलखुणा शोधत गती धारण करतात, तेच अभ्युदयाचे नवे आयाम उभे करतात. व्यक्तीच्या बाबतीत हे जेवढे सत्य; तेवढेच भाषा, संस्कार, संस्कृतीबाबतही. मराठी मुमूर्षू भाषा झाली आहे, हे विधान मराठीची आजची स्थिती तपासून पाहिली तर भावनिक वाटते ऐवढेच. मराठी भाषा मरणासन्न मार्गावर असती, तर एवढे दोन-अडीच हजार वर्ष अनेक आक्रमणे, आघात घेत टिकली तरी असती का? कोणतीही भाषा टिकवणं जेवढं ती भाषा बोलणाऱ्यांच्या हाती असतं, तेवढंच भाषा वाढवणंही. भाषा संपन्न होण्यासाठी, वाढ होण्यासाठी, ती व्यवहारभाषा होणंही आवश्यक असते अन् यासाठी भाषा बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, वापरणाऱ्या लोकांमध्ये तिच्याविषयी आस्था असणंही आवश्यक असते.

स्वभाषेला कमी लेखून, अन्य भाषेच्या थोरवीचे पोवाडे गात, त्या भाषा कशा प्रगत वगैरे आहेत, म्हणून आपल्या भाषेबाबत उगीच चिंता व्यक्त करीत राहणे कितपत संयुक्तिक आहे? अन्य भाषांमध्ये ज्ञानाचे केवढे मोठे संचित आहे, असे म्हणून कोणतीही भाषा संपन्न वगैरे होत नसते. स्वभाषेला दुय्यम मानून तिच्याबाबत चिंतायुक्त सुरांनी बोलण्यापेक्षा; विश्वातील भाषांमधून परिणत ज्ञान आमच्या भाषेत आणण्यासाठी आपण काय केले आहे, करतो आहोत याचा विचार होणे आवश्यक आहे. कधीकाळी ब्रिटनमधील अभिजनवर्ग फ्रेंच भाषा बोलणे प्रतिष्ठेचे मानून इंग्रजीला फारसं महत्व देत नव्हता. पण आज इंग्रजीचा चौफेर उधळलेला वारू तुफान वेगाने धावताना दिसतो आहे. इंग्रजांनी हा चमत्कार काही एकदोन दिवसात केला नाही. इंग्रजी जागतिक परिमाणात सामावली, कारण अन्य भाषांमधील संकल्पना, शब्द, विचार त्यांनी आत्मसात केले, म्हणूनच ना! बदलाचे वारे त्यांनी आपल्या अंगणी येऊ दिले नसते, तर त्यांना हे शक्य तरी झाले असते का? जे कधीकाळी इंग्रजीला जमले, ते मराठीने विद्यमानकाळी का करू नये? जागतिकीकरणात आम्ही अगतीकरणाच्या गाथा का वाचीत बसावे? आमच्या भाषेला आम्हीच समृद्ध करू शकतो, असा विश्वास अंतर्यामी असल्याशिवाय भाषेच्या प्रगतीचे नवे पथ निर्माण करता येत नाहीत.

काही वर्षापूर्वी कवी कुसुमाग्रजांनी मराठीच्या स्थितीविषयी भाष्य करताना ‘डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर लक्तरे, अशा वेशात मराठी मंत्रालयाच्या दारात उभी आहे.’ असे म्हटले होते. त्याचं हे विधान मराठीची विकलांग अवस्था अधोरेखित करणारे होते. मराठीच्या या अवस्थेत आज बदल झाला आहे का? असल्यास किती? या प्रश्नाचं उत्तर शोधणं तसं अवघडच. पण मराठी जगली आहे. नव्हे, आज सुमारे अकरा कोटी लोकांची ती भाषा आहे. भाषा बोलणाऱ्यांच्या संखेनुसार शोधलंच तिचं अस्तित्व, तर जगात पहिल्या दहाबारा क्रमाकांमध्ये आहे. असे असूनही तिच्या विकासगामी, वर्धिष्णू वाटचालीवर मर्यादा येत आहेत. यास आम्ही मराठी माणसंच कारण आहोत का?

विश्वातील ज्ञानची कवाडे आपल्याला उघडून पाहता यावीत, संपर्कसाधता यावा, संवाद घडावा, म्हणून जगाशी संवाद घडवू शकणारी इंग्रजी आत्मसात करणे आवश्यकच; पण हे ज्ञान फक्त इंग्रजी भाषेतून आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं तरच शक्य होतं, मराठीतून हे घडणं अवघड आहे, असं मानणं आमची मानसिक अंधश्रद्धा आहे. शिक्षणात इंग्रजी माध्यम आल्याने आपण प्रचंड प्रगतीचे धनी होऊ, आपलं व्यक्तित्व सर्वांगाने बहरेल; या आम्ही करून घेतलेल्या समजाला म्हणायचे तरी काय? माझ्या गावातल्या ज्या मातीचं सत्व आणि स्वत्व घेऊन मी वाढलो, शिकलो, त्या शिक्षणाची भाषा आणि माध्यम मराठीच होते. मराठी शिक्षणाने मला, माझ्यासारख्या अनेकांना घडवलं. मायबोलीने दिलेले आत्मविश्वासाचे पाथेय सोबत घेऊन स्वतःला घडवलं. सन्मानाने जगण्यास पात्र बनलो, ते मातृभाषेतून मिळालेल्या संस्कारांमुळेच.

आडवळणी असणाऱ्या एखाद्या लहानशा गावातही हल्ली शिक्षणविषयक आस्था जाणवण्याइतपत ठळक झाली आहे. शिक्षणाचं महत्त्व अडाणी आईबापालाही बऱ्यापैकी कळायला लागले आहे. मुलांना शिकवून भविष्यात सुखाचे चार क्षण आपल्या अंगणी आणता येतील, अशी आशा त्यांच्या मनात उदित झाली आहे. आपली मुलं शिकावीत म्हणून परिस्थितीशी धडका देत, सीमित का असेनात; पण ते प्रयत्न करतायेत. पुरेशा शैक्षणिक सुविधा नाही देता आल्या, तरी गावागावात शाळा उभ्या राहत आहेत. इंग्रजी माध्यमाचे मळवट ललाटी लेखून पब्लिकस्कूलपासून लोकलस्कूलपर्यंतच्या चकचकीत बसेस पोरांना शाळेत आणण्यासाठी आणि परत घरी सोडण्यासाठी गावातून फिरत आहेत. गावी गेलो असताना माझ्याही गावात असंच काहीसं बदललेलं शैक्षणिक पर्यावरण दिसलं. हे पाहून खरंतर कुतूहल वाटलं आणि आनंदही. म्हटलं चला, आपल्या गावातील पोरं काहीतरी वेगळ्या वाटेने आणि वेगळे शिक्षण घेत आहेत. आमच्या मानाने आताची पिढी नशीबवान आहे. टाय-बूटसह गणवेश परिधान करून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांकडे शेतात कामासाठी निघालेले आईबाबा कौतुकाने पाहत असल्याचे दिसले. मुलं शाळेत पाठ करून घेतलेली गाणी इंग्रजीतून बोलू लागली. आईबाबांना मॉम-डॅड म्हणायला लागली. त्याचं बोलणं ऐकून आईबाप हरकून गेले आहेत. मुलांकडे पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान त्यांना वाटते आहे. निदान त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून तरी तसे जाणवते.

मुलांचं उज्ज्वल (?) भविष्य घडविण्यासाठी शेतात राबणारे त्यांचे आईबाबा अशा स्कूलची काही हजारात आकडा असणारी फी द्यायला लागले. मात्र मोफत शिक्षण देणाऱ्या सरकारच्या शाळा विद्यार्थी पटसंख्या जुळवताना हैराण झाल्या आहेत. बरं, ज्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या कधी इंग्रजीचं अक्षरही कोणी पाहिलं नाही, त्यांचा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचा अट्टाहास केवळ अज्ञानमूलक विचारातून मनात उदित झालेला नाही का? याचा अर्थ त्यांनी आपल्या अपत्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शिकवू नये, असा अजिबात नाही. पण निदान आजूबाजूला थोडं तरी पाहावं की नाही? केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा कुणी आपल्या मुलास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवले. त्याचे पोर कदाचित स्मार्ट वगैरे झालं असेल, म्हणून आपलंही मूल तसंच होईल, हा वेडा आशावाद का असावा? ते तसं व्हावं म्हणून ऐपत नसताना त्यांच्याप्रमाणेच सगळं करण्याचा अट्टाहास का? हे कितपत योग्य आहे?

आपल्या आजूबाजूच्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पीक उदंड आलेलं दिसत आहे. दुसऱ्याबाजूला मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. मराठी शाळा ओस पडत जाणं आणि अन्य माध्यमांच्या शाळांचे आकर्षण वाढत जाणे याला मराठीची वैभवशाली वाटचाल, असं आपण म्हणावं का? बरं, इंग्रजी माध्यमातून शिकल्यानं प्रचंड विकास वगैरे झाल्याची अपवाद वगळता, अशी कितीशी उदाहरणे आपल्या आसपास आहेत? आपली भाषा जतन करणं आपल्या सगळ्यांचं काम; पण गेल्या तीसचाळीस वर्षात आम्ही मराठी समाजाने आणि भाषा टिकवण्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर देता येईल असे समाजातील धुरिण, जाणकार, शिक्षक, प्राध्यापक आदी मंडळीकडून मराठीची वाट लागण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न; अपवाद वगळले, तर कितीसे झाले आहेत? वेतनाचा विकास, हाच आमच्या मराठीचा विकास समजून आम्ही काम करीत आहोत का? असा प्रश्न समाज करीत असेल, तर चुकतो कोण आहे? समाज की शिक्षक.

मराठी विषयाचा तास वर्गात सुरु आहे. मुलं तासात रंगली आहेत. साहित्याच्या आस्वादाचं इंद्रधनुष्य त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे. मुलं स्वतःला विसरली आहेत. आणि शिक्षक देहभान हरपून साहित्यरंगाची वर्गात मुक्त उधळण करीत आहेत. दोघांची ब्रह्मानंदी टाळी लागली आहे. ही दृश्ये अपवादानेच वर्गातून दिसत असतील, तर भाषेला वैभव कसे प्राप्त होईल? अवघड सोपं करून सांगतो तो शिक्षक आणि सोपं अवघड करून सांगतो तो प्राध्यापक, असं विनोदाने म्हटलं जातं. यात खरंच तथ्य असेल का? वर्गामधून आजही अध्यापनाला परंपरांचे पायबंद पडलेले दिसतात. पाठाचं वाचन, कठीण शब्दांचे अर्थ, जमल्यास थोडं वेगळं विवेचन, आयत्या नोट्सचा रतीब आणि थोडा गृहपाठ; म्हणजे मराठीचे अध्ययन, अध्यापन संपन्न झाले असं होत नाही. मराठी विशेष विषय घेऊन एम.ए. बी.एड. पदवी धारण करणाऱ्या, मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या काहींना मराठीचे व्याकरण शिकवताना धाप लागत असेल, धड चार वाक्ये अलंकारांनी मोहरलेल्या वाक्यांनी, तर्कशुद्ध, वैचारिक प्रगल्भतेने बहरलेल्या शब्दांनी बोलता येत नसतील, तर ‘भाषिक विकासाचं’ दान कोणत्या क्षितिजाला आपण मागावं? भाषावैभवाचा सूर्य कोणत्या क्षितिजावरून उदित होण्याची आपण प्रतीक्षा करावी?

भाषेची संपन्नता हे भाषेला बोलींचं देणं असतं, असं म्हणतात. हे खरेही आहे. बोलीभाषेला नाकं मुरडून प्रमाणभाषा संपन्न होत नसते. बोलीतील निरागसता प्रमाणभाषेला अनुभवसंपन्न करते. भाषा म्हणजे केवळ प्रमाणभाषाच असते का? पुणे, मुंबईकडील लोकांनी बोललेली, प्रमाण म्हणून पुस्तकातून छापलेली आणि सुशिक्षितांच्या व्यवहारात दिसणारी भाषाच तेवढी शुद्ध वगैरे असते का? व्यवहार म्हणून प्रमाणभाषेचा, शुद्धलेखनाचा आग्रह समजून घेऊ शकतो; पण बोलींच्या स्पर्शापासून प्रमाणभाषेला अस्पर्श ठेवणं, म्हणजे भाषेचा विकास का? ग्रामीण परिसरातील लोकभाषेचा लहेजा प्रमाणभाषेने योग्य ठिकाणी आत्मसात का करू नये? नुसत्या बोलीच कशाला; अन्य भाषांमधील मौलिक विचार, संकल्पना, साहित्य मराठी भाषेत यावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच मराठीतूनही असे साहित्य अन्य भाषेत जाणेही आवश्यक आहे. कोशवाड्.मय भाषेला संपन्नता प्रदान करीत असते. तसे अनुवादित साहित्यानेही विश्वातील साहित्याची, तेथील माणसांच्या जीवनाची, संस्कृतीची, जगण्यातील समस्यांची जाणीव होऊन मन प्रगल्भ होत असते. कोशांची मराठीत कमतरता नाही; पण किती जण कोशवाड्.मयाचे परिशीलन करतात? विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवीत जतन, संवर्धन करताना दिसतात? साहित्याचे अनुवादही होत आहेत, नाही असे नाही; पण तरीही ते सीमित आहेत. प्रवाहापेक्षा वेगळी पुस्तके मराठीत तयार होतात. त्यांच्या जेमतेम हजार प्रती विकण्यासाठी विक्रेत्याला वर्षानुवर्षे प्रतीक्षा करायला लागत असेल, तर प्रकाशक अशा पुस्तकांकडे वळतील कितीसे?

दर्जेदार साहित्याचं लेखन, वाचन, चिंतन, मनन, परिशीलन होणे मानसिक तसेच भाषिक विकासासाठी आवश्यक आहे. वर्षभरात मराठी भाषेतून अनेक पुस्तकं प्रकाशित होतात; पण त्यांच्यातील दर्जेदार निकषांपर्यंत पोहचणारी किती असतात? बोटावर मोजण्याइतकीच. ग्रंथप्रदर्शनातून पुस्तक खरेदीचे आकडे कोटी कोटीचे उड्डाणे घेतात; पण येथेही त्याच-त्याच पुस्तकांना परत-परत मागणी असल्याचे जाणकार बोलतात. म्हणजे मराठी मनाची अभिरुची अद्यापही त्याच त्या वलयात फिरत आहे. बरं, या ग्रंथप्रदर्शनातून उपलब्ध असणाऱ्या वैचारिक आणि मानसिक जाणीवा समृद्ध करणाऱ्या पुस्तकांच्या भागाकडे कितीशी गर्दी दिसते? किती पाऊले त्या पुस्तकांकडे वळतात? किती हात ते खरेदी करतात? पुस्तकप्रदर्शनातून माणसं कोणती पुस्तकं पाहतात, खरेदी करतात; हे पाहिलं तर आपल्या अभिरुचीचा दर्जा आपल्यास कळतो. मराठीच्या साहित्यप्रवाहाला संपन्न करणारी अनेक चांगली पुस्तके महाराष्ट्र शाशनाच्या वतीने प्रकाशित करून, फार थोड्या किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिली जातात. मराठी अभिरुचीचे संवर्धन करणारी, संपन्न करणारी ही पुस्तके. पण ती वेळीच मिळायची मारामार. बऱ्याचदा तर आवृत्ती संपलीचा उद्घोष. मिळालीच तर फक्त मोठ्या शहरातूनच. निदान जिल्हास्तरावर ती नियमित मिळण्यासाठी व्यवस्था करण्याचे शाशनाने ठरविले तर अशक्य आहे का? सरकारी काम अन् सहा महिने थांब, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. त्याचं प्रत्यंतर अशावेळी यावं का? सर्वच स्तरावरून दिरंगाई असेल, अनास्था असेल तर मराठीच्या संपन्नतेचे स्वप्न सर्व सामान्यांनी पाहण्याच्या नादास लागू नये, हेच खरे.

विद्यमान जग आणि काळ मोबाईल, सोशलमीडिया, इन्टरनेटचा आहे. यांचा वापर मोठ्याप्रमाणावर आज जगात, समाजात होतो आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे मराठीला युनिकोडमध्ये लेखांकित करता यायला लागले. मनाची स्पंदने स्वभाषेत, स्वलिपीत मराठी माणसे संगणकाच्या पडद्यावर अंकित करायला लागली. फेसबुकवर मायबोलीतील संवाद सहज आणि सुगम झाला. गुगलने युनिकोडच्या माध्यमातून मराठी आणि मराठी माणसांच्या भावनांना शब्दांकित करणारे साकव उभे केले. नेटकऱ्यांची मांदियाळी उभी राहिली. त्यांची संख्या वाढायला लागली. ईबुक्स, ब्लॉग्ज हजारोने तयार झाले. यातील काही ब्लॉग्जमधून चिंतनशील विचारांची स्पंदने अंकित होत आहेत, नाही असे नाही. भाषासंपर्काच्या, संवर्धनाच्या वाटा आणि क्षेत्रे खूपच विस्तृत होत आहेत. एवढे तंत्रज्ञान हाती असून आणि विश्व हातात सामावण्याएवढे झाले असूनही माणसं मात्र सुटी सुटी होत चालली आहेत. जात, धर्म, पंथ, भाषा अशा अभिनिवेशाचे परगणे आपल्या आजूबाजूला का उभे राहत आहेत? याने भाषा संपन्न होणे तर दूरच; पण माणूसही संपन्न होणार नाही.

नव्या पिढीचा दृष्टिकोन व्यापक, विस्तृत असल्याचे आपण ऐकतो, तसे दिसतेही; पण व्यापक असणं आणि स्वभाषेबाबत, तिच्या सर्वांगीण विकासाबाबत आग्रही असणं वेगळं. एकीकडे भाषाशुद्धीबाबत आग्रह, तर दुसरीकडे नव्या पिढीने मोबाईल मॅसेज, फेसबुक, व्हॉटसअॅपवर लिहिलेले संक्षिप्त संदेश वाचताना केलेली भाषेची, लिपीची मोडतोड. ही वाचताना आपण कोणत्यातरी अगम्य सांकेतिक लिपीचे वाचन करतो आहोत, की काय असे वाटते. तरुणाईची ही भाषा एकीकडे. तर दुसरीकडे मराठी साहित्यात पदवी घेणाऱ्यांचं मराठी बोलणं, लिहणं एक अगम्य, अतार्किक गोष्टच वाटावी असं.

ब्लॉग्जसारखे प्लॅटफॉर्म एक आशास्थळ आहे; पण येथील विषयांमध्ये फक्त नैमित्तिक, प्रासंगिक विचारांची गर्दीच अधिक. विचार प्रकटीकरणासाठी माध्यम हाती आले; पण प्रगल्भपण यायला अजून अवधी आहे. कालांतराने ते येईलही. वरवरचं लेखन आणि त्यातही उथळपण असल्याचा या लेखनावर समाजाकडून, जाणकारांकडून, बुद्धिमंतांकडून आक्षेप घेतला जातोय, हेही खरंय. पण या भाऊगर्दीत काही चांगले लेखनही हाती लागते. कदाचित कालांतराने या परिस्थितीत परिवर्तन होईलही. लेखनातील उथळपण जाऊन शब्द माणसांच्या जीवनातील समस्यांना भिडणारे असतील, समाजातील परिस्थितीचे वास्तव अधोरेखित करणारे असतील. लेखन जितक्या वैचारिक, गंभीर विषयांकडे वळते तितक्या प्रमाणात भाषा प्रगल्भ विचारांना, वाटांना आपल्यात सामावून घेते, हे वास्तव नाकारता येत नाही.

कालौपघात मराठीला अन्य भाषेतील शब्द स्वीकारावे लागतील. म्हणून काही मराठीभाषा प्रदूषित होणार नाही किंवा होत नाही. काही नवं स्वीकारणं, कालबाह्य असेल ते नाकारणं विद्यमान काळाची अनिवार्यता आहे. नव्याचा स्वीकार करताना नवे शब्द, नवे संदर्भ मातृभाषेत वापरले जात असल्यास त्यांचे शक्य तितके मराठीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या भाषेत प्रतिशब्द तयार करावे लागतील, हेही तितकेच खरे. अरबी, फारसी, इंग्रजी आदी परकीय भाषेतील शब्द मराठीत आले आणि कधीच एकजीव होऊन तिच्यात बेमालूम सामावले आहेत. रुळले आहेत. त्यांनी या भाषेचा संसार सजवला आहे. मराठीला आणखी समृद्धपण येण्यासाठी असेच काही अनेकपदरी काम करावे लागेल.

मराठी केवळ राजभाषा झाली म्हणून सारेच प्रश्न सहज सुटतील, असे मानण्याचे कारण नाही. तिला समाजात हवं ते स्थान लागलीच मिळेल, असेही नाही. समाज जेव्हा मातृभाषेचा वापर जाणीवपूर्वक अधिकाधिक करतो, तेव्हाच भाषेच्या मोठेपणाच्या वाटा जवळ येत असतात. याचा अर्थ अन्य भाषांचा अव्हेर करावा, असे अजिबात नाही. त्या भाषा आत्मसात करणे काळाची अनिवार्य आवशकता आहे. पण मातृभाषेचा यथोचित अभिमान त्यासोबत असणेही तितकेच महत्वाचे आहे. आपली भाषा सीमित राहत असेल, तर आपला समाजही विचारांनी, वर्तनाने सीमित होतो. माणसांचे जगण्याचे अनेक प्रश्न रोजचे आहेत. ते कधी सामाजिक, कधी सांस्कृतिक, कधी आर्थिक आहेत. या प्रश्नांना भिडणारं मन मातृभाषेतून घडणं, घडवणं आवश्यक आहे. व्यवस्थेत परिवर्तन घडवण्यासाठी आधी मन घडवावे लागते. मन घडवण्याचे काम भाषा करते. घडलेली मने परिवर्तनाचे पथ निर्माण करतात. आजच्या विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांच्या जगाला संपन्नतेच्या आकांक्षांचं नवं क्षितिज दिलं आहे. डोळ्यात नवं स्वप्न दिलं आहे. त्याचाच वापर करून स्वप्नपूर्तीपर्यंत आम्ही पोहचायला हवं.

मराठी मरणासन्न अवस्थेत जाईल. तिचं अस्तित्व आणखी काही वर्षांनी इहतलावरून संपेलेलं असेल, असं म्हणण्याचं कोणतंही संयुक्तिक कारण आहे, असं वाटत नाही. कारण सुमारे चारपाचशे वर्षे यवन सत्ताधीशांचे, दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य या देश-प्रदेशावर होतं. या काळात मराठीत बदल घडले नाहीत, असंही नाही. बदल घडले म्हणून ती काही नामशेष झाली नाही. जर ती नामशेष होणारच असती, तर गेले दोनअडीच हजार वर्षे महाराष्ट्रदेशी तिचं अस्तित्व असल्याचे पुरावे तरी मिळाले असते का? आजही मराठी संस्कृतीची, संस्कारांची गंगा अनवरत प्रवाहित आहे, अभंग आहे. संत, पंत, तंत साहित्याने या प्रवाहाला संपन्नता प्रदान केली आहे. जोपर्यंत वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या वाटेने चालत राहतील, महाराष्ट्राचा शेतकरी श्रमाने काळ्या मातीतून हिरवी स्वप्ने रुजवतील, लावण्यांमधून शृंगाराचे रंग बरसत राहतील, छावण्यांमध्ये शूरांच्या पराक्रमाचे पोवाडे ऐकायला येतील, भजनांमधून भक्तिरंग भरत राहतील, कीर्तनातून मराठी मनांना आख्याने समृद्ध करतील; तोपर्यंत मराठी अभंग असेल. ती संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेतून, संत तुकोबांच्या गाथेतून, सारस्वतांच्या साहित्यातून, लोकसाहित्यातून, लोककलातून, संस्कृतीच्या पात्रातून जीवनाचे रंग घेऊन; त्यांना नवतेचे साज चढवीत अनवरत वाहत राहील. लोकमानसाच्या अंतर्यामी तिचे स्वर गुंजत राहतील, तोपर्यंत ती अक्षुण्ण असेल. यासाठी गरज आहे, मराठी माणसांनी मराठी अन् मराठमोळेपण जपण्याची.

2 comments:

  1. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'अस आम्ही अभिमानाने म्हणतो ,यातून मराठी बद्दल चा अभिमान जाणवतो.पण मराठीच्या वृद्धिसाठी प्रयत्न मात्र होत नाहीत,आज ती खरी गरज आहे.आशा बाळगुया असे प्रयत्न पुढे होतील.

    ReplyDelete