Strijanma | स्त्रीजन्मा...

By
स्त्रीजन्मा तुझी ही कहाणी...

बाईचा जन्म नको घालू शिरीहरी,
रातन् दिस पुरुषाची ताबेदारी.
लोकगीताच्या या ओळी कुठेतरी वाचल्याचे आठवतेय. पुरुषांच्या जगात जगताना परंपरेने दिलेल्या चौकटीत जीवनयापन करताना आलेल्या दाहक अनुभवातून बाईच्या जन्माची वेदना कोण्यातरी विव्हवळणाऱ्या वेदानांकित मनाने व्यक्त केली आहे. जग नियतीने निर्माण केले; पण पुरुषाने त्यावर स्वामित्व संपादन केले. साहजिकच पुरुषाच्या सत्तेवर आणि मत्तेवर चालणाऱ्या जगात बाई म्हणून जगण्यात वाट्याला येणाऱ्या मनातील व्यथा, वेदनांना हे गीत मुखरित करते. जन्माने मिळालेल्या स्त्रीदेहाला पुरुषीसत्तेच्या महाकाय भिंतीनी बंदिस्त केले. या भिंतीना उध्वस्त करण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा एक चिराही ढासळू शकला नाही. सर्व पर्याय संपले, म्हणून परंपरेने दिलेले पराधीन जीवन, हेच प्राक्तन नियतीने आपल्या ललाटी लेखांकित केले आहे, असे समजून स्त्री नियतीने आखून दिलेल्या वाटेने निमूटपणे चालते आहे. स्त्रीदेह धारण करून इहलोकी प्रायश्चित्त घेण्यासाठी नियतीने आपणास पाठविले आहे. हा देह जगवताना पुरुषाचे आश्रित होऊन जगणं हाच एक मार्ग असून, त्या मार्गाने वर्तने हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. या विचाराने वागते आहे. समाजाने स्त्री म्हणून जगताना ठरवून दिलेल्या वर्तनाच्या चौकटी हेच आपले भागधेय असून, नियतीलाही ते आता बदलता येत नाही, म्हणून निमूटपणे कोणातरी पुरुषाची अंकित होऊन जगणे क्रमप्राप्त आहे, असे समजून जगत आहे. या परिस्थितीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करूनही नशीब बदलता येणार नाही, म्हणून देवालाच का सांगू नये, “बाबारे! नको हा स्त्री जन्म.” असे वाटून मनातील वेदना शब्द बनून प्रकटली असावी. माणसाला सांगून काही उपयोग नव्हताच, कारण तो पुरुष असल्याचा अहं त्याला, हे करू देणं शक्य नव्हतं. त्याच्या विचारांना परंपरांचा पायबंद पडला असल्याने गुलामगिरीच्या शृंखला विखंडित करणं कर्मकठीण कार्य होतं. मग श्रीहरिलाच का विनवू नये? पुरे आता हा वेदनादायी स्त्रीदेहासह इहलोकीचा प्रवास. या विचारातून हे गीत लिहले असेल का?

समाजातील पुरुषसत्ताक जीवनपद्धतीची दाहकता कदाचित कोण्या अभागी स्त्रीच्या वाट्याला आली असावी. पुरुषी मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करूनही परिस्थितीत पळभरही परिवर्तन होणं अशक्य असल्याने, मनी आलेल्या हताशेतून कोणा पीडितेच्या मनातला सल लोकगीताच्या गंगेत दुःख होऊन प्रवाहित झाला. हा प्रवाह असाच पुढे अनेक वर्षे चालत राहिला. पण वाहता वाहता पाणी जसे शुद्ध होते तसा तो शुद्ध होऊ शकला नाही. त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याने कोण्या अभागी ललनेची व्यथा या गीतात कथा बनून प्रकटली असावी. वर्षामागे वर्षे सरत गेली; पण ना तिला समजून घेणारा कोणी सहृदय पुरुष भेटला असावा. ना तिच्या जीवनात आनंदाचा कवडसा अवतीर्ण झाला असावा. अखेर ज्याने हे भागधेय लेखांकित केले त्यालाच का म्हणून माझ्या मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग विचारू नये, या भावनेतून प्रकटलेलं हे दुःख असावे. स्त्रीमनाच्या वेदना घेऊन, हे गीत कोण्यातरी ललनेच्या ओठांवर आले असावे. आजच्या काळाशी तुलना करून पाहताना अशा अनुभवांची आर्तता कमी झाली आहे, असे ठामपणे कोणाला म्हणता येईल असे वाटत नाही.

हे गीत प्रथम कधी प्रकटले,  माहीत नाही.  पण यातील वेदनेचे सूर आजही आपल्या आसपास ऐकू येणं, हा परिस्थितीचा विपर्यास नाही का? कालपटलावर प्रगतीच्या पावलांचे काही ठळक ठसे आम्ही अंकित केले. पण विचारांनी किती पावलं पुढे सरकलो? माणूस परिस्थितीचा निर्माता नाही होऊ शकत; पण परिस्थितीत परिवर्तन करणारा प्रेषित जरूर होऊ शकतो. विज्ञानतंत्रज्ञानातील शोधांनी बदललेल्या जगाने आणि माणसाने केलेल्या प्रचंड प्रगतीने, हे सिद्धही केले आहे. विश्वातील अनेक अज्ञात परगण्यांचा शोध घेऊन माणसाने त्यांना मौलिक अस्तित्व प्रदान केले आहे. पण जिच्या अस्तित्वाने त्याच्या जीवनात स्वर्ग अवतीर्ण होऊ शकतो, तिला मात्र तो सोयिस्कर विसरला.  नारी, ललना,  कामिनी,  सौदामिनी अशा वेगवेगळ्या गोंडस नावांच्या देव्हाऱ्यात तिला अधिष्ठित केले. ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता’ म्हणून तिच्या सामर्थ्याला देवतेच्या पातळीवर नेऊन तिचा देव्हारा कायम केला. त्या देव्हाऱ्याला सजवले. ‘तुज भयचकित होऊन नमावे रमणी’ असे म्हणून तिच्या साहसाला आदरयुक्त भयाचे रूप देऊन शक्तीच्या रुपात पाहिले. ‘न मातुः परम दैवतम्’ म्हणीत तिला देवतास्वरूप लेखून पूजनीय केले. त्याचवेळी दुसऱ्याबाजूने ‘न स्त्री स्वातन्त्र्यम् अर्हति’ म्हणून बंधनांच्या शृंखलांनी पाशबद्धही केलं. बंधनांचे पाश अधिकाधिक करकचून घट्ट करताना; ती परवश कशी राहील,  याची काळजी तो घेत राहिला. जीवनाच्या कोणत्याही स्थितीत ती असली, तरी तिला पिता, पती, पुत्र या पुरुषी नात्यांनी बद्ध करून पुरुषाशिवाय तुझ्या जीवनाला गतीच नाही अन् त्यावाचून प्रगतीही नाही, हा विचार तिच्या मनात रुजवत नेला.

मातृत्वाला मान असावा; पण स्त्रीत्वाचा सन्मान नसावा, हा अविचार माणसांच्या जगात का असावा? असा प्रश्न मनात निर्माण होतो. कारुण्यमूर्ती, वात्सल्यमूर्ती म्हणून स्त्रीकडे पाहताना तिच्याठायी असणाऱ्या ममतेचा गौरव समाज करत राहिला आहे. वंश सातत्यात तिची भूमिका अनन्यसाधारण असल्याने प्रत्येक मातेचा सन्मान संस्कृतीत होत आला आहे; पण त्याचवेळी स्त्री म्हणून बऱ्याच जणींच्या वाटेला अवहेलनाच येत राहिली. माता म्हणून तिचा प्रवास कितीही सुंदर असला, तरी तिच्यातील मातृत्व वजा केल्यावर मागे उरणारं तिचं स्त्रीत्व नेहमीच दुय्यम राहिलं. हे दुय्यमत्त्व अधोरेखित करणारे कुंकू, मंगळसूत्र तिच्या सौभाग्याशी जुळवले गेले. यांच्याशिवाय विवाहित स्त्रीला पूर्णत्व नाही, हे तिच्या मनावर प्रतिबिंबित करून, तिला कायम आपल्या अंकित करण्याची व्यवस्था पुरुषसत्तेने करून ठेवली. वटसावित्री पतीच्या जीविताची हमी ठरविली. अहेवपणी आलेलं मरण स्त्रीला जीवनसांगतेची इतिकर्तव्यता वाटू लागलं. पत्नीने सौभाग्यालंकार धारण करून, पतीशी प्रतारणा घडणार नाही, याची हमी म्हणून अभिमानाने मिरवायचे. लग्नानंतर स्वतःचे नावही बदलायचे. जिथे स्वतःच अस्तित्वच विसर्जित करून पतीच्या अस्तित्वाशी निगडित ठेवायचे, तेथे नावाचं काय? व्रतवैकल्ये, सणवारांमध्ये स्वअस्मिता शोधताना तेथेसुद्धा पतीच्या अस्तित्वाच्या खुणा शोधायच्या आणि निवडायच्याही. पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रीला दिलेली ही देणगी आहे. पतिप्रेमाचं, पतिप्रियतेचे दान पदरी घेताना स्वतःला ती पणाला लावत होती, तर कधी लावलीही जात होती. दुःशासनाचे हात द्रौपदीच्या पदराला पोहचले, त्यामागे पुरुषी अहं होताच; पण पुरुषी अहंमधून येणारी पुरुषी अगतिकताही होती. अग्निपरीक्षा फक्त सीतेनेच द्यायची आणि स्वतःला सिद्धही तिनेच करायचे, कारण आजूबाजूला प्रश्न विचारणारे आवाज पुरुषी मानसिकतेचे द्योतक होते. द्रौपदी, सीता ही नावे काही असामान्य नव्हती. या नावाभोवती सत्ता, सामर्थ्य यांचं वलय असूनही पुरुषी मानसिकतेमुळे केवळ स्त्री म्हणून त्यांना या अमोघ दिव्यास सामोरे जावे लागले.

सांप्रतकाळी स्त्रीविषयक विचारांमध्ये मोकळेपण, व्यापकपण आले असेलही; पण सर्वार्थाने ती पाशमुक्त झाली आहे का? पुरुषसत्ताक विचारधारेच्या बंधनातून मुक्त झाली आहे का? स्त्रियांपुढील समस्यांचे पीळ सैल झाले आहेत का? या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने अद्यापही नकारार्थीच मिळते. कौटुंबिक कलह, अत्याचार, हुंडा, स्त्रीत्वावर होणारे आघात इ. साऱ्या समस्यांचे मूळ स्त्रीला मिळालेल्या समाजातील गौण स्थानामध्ये आहे. कधीकाळी स्वयंप्रतिष्ठाप्राप्त असणारे स्त्री हे नाव मातृसत्ताक कुटुंबपद्धतीत स्त्रीत्वाचा मानबिंदू होता. सर्जनशक्तीचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या स्त्रीच्या जिज्ञासापूर्ण निरीक्षणातून माणसांना स्थिर जीवन जगण्यास कारण ठरणाऱ्या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. साहजिकच त्यांचं सामाजिक महत्व व्यवस्थेत वृद्धिंगत झाले. पण मालमत्तेवरच्या मालकी हक्काचा प्रश्न पुरुषाने मसलपॉवरने आपल्याला बाजूने अनुकूल राहील असाच सोडविला. एवढेच नाहीतर स्त्रीवरच तो आपली मालकी सांगू लागला. त्याच्याकडील सामर्थ्यामुळे तो प्रबळ होत गेला. पुरुषी अहंकारातून त्याने अधिकारप्राप्ती केली. आणि आपल्या वाटचालीत प्रतिस्पर्धी, दावेदार नको म्हणून स्त्रीला कर्मकांड, रूढीपरंपरा आणि रीतिरिवाजांमध्ये पद्धतशीर गुंतवले. प्रतिष्ठेच्या स्वनिर्मित संकल्पनांना संस्कारांचे गोड रूप दिले. संस्कारातून संस्कृती उभी केली अन् संस्कृतीरक्षणाची जबाबदारी स्त्रीला देऊन घराचा उंबरठा, ही तिच्या कर्तृत्वाची कमाल मर्यादा ठरवली. चूल आणि मूल, हेच तिचे कार्यक्षेत्र सीमित करून तिची वाढ थांबवली. तिला लांबचं दिसणारे क्षितिज आपल्या बळावर पायतळी घ्यायचे काही संयुक्तिक कारण नाही, घर आणि संसार हेच तुझे कार्यक्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आहे हे मनात रुजवून तिच्या आकांक्षाना बंदिस्त केले. तिलाही मन आहे, भावना आहेत, विचार आहे; हा विचारही त्याच्या मनात तेव्हा आला नसावा का? की योजनापूर्वक स्वतःसाठी सुरक्षित पर्याय म्हणून या गोष्टी त्याने शोधल्या असाव्यात?

परंपरांच्या वाटेने मिळालेल्या विचारांनी घडलेल्या आणि घडणाऱ्या माणसाला वंशाला दिवाच असावा असे वाटणे स्वाभाविक होते, कारण त्याला पुरुषच श्रेष्ठ असतो, या विचारांनी घडविले गेले होते. पुत्राशिवाय त्याच्या कुळास, त्याच्या जीवनास अर्थ नाही आणि परिपूर्णताही नाही हा विचार प्रबळ ठरत होता. म्हणून वंशदीप निर्माण करणारी स्त्री समाजासाठी आस्थाविषय ठरली. तिला आशीर्वाद देतानाही ‘पुत्रवती हो’ म्हणूनच दिला गेला. जातोय(?) ‘पुत्रिवती हो’ म्हणून का नाही? पुत्र-पुत्री जन्माला येणं खरंतर स्त्रीच्या हाती नाही, हे वैद्यकशास्त्राने, विज्ञानाने सिद्ध करून दाखविले आहे. तरीही पुरुषी मानसिकता हे वैज्ञानिक सत्य स्वीकारायला अद्यापही तयार नाही. अशा विसंगत विचारांनी घडणाऱ्या वर्तनाला विज्ञानयुगातील अज्ञान नाही, तर आणखी काय म्हणावे? माणूस पुरुष म्हणून कसाही असला, तरी पती हा परमेश्वर मानून, त्याच्या सेवेत स्त्रीने सारे आयुष्य वेचावे. ही कुठली अपेक्षा? एवढं असूनही विज्ञानाने केलेली प्रगतीच मुलींच्या जन्मावर उठली आहे. जन्माआधीच तिला संपवण्याचे उद्योग सुलभ होऊ लागले आहेत. पुत्रलालसेच्या विक्षिप्त व्याधीने पीडित माणसं स्त्रीभ्रूणाची हत्या करून वंशाचा दिवा शोधू लागली. पण जिच्याशिवाय वंशसातत्यच संभव नाही आणि ती नसेल तर वंश कसा चालेल? याचाही जरा विचार अविचारी माणसांनी करू नये का? अशा मानसिकतेपायी हजारो पणत्या प्रकाशित होण्याआधीच विझत असतील, तर माणूस म्हणून हीच प्रगती आम्ही केली का? एवढं घडूनही एखादी पणती तिच्या बळकट नशिबाने प्रकाशली, तरी जन्मापासून वेदनादायी प्रवास नशीब म्हणून तिच्या सोबतीला आहेच. ती आईबाबांना नकोशी म्हणून तिचं नावच ‘नकुशा’. अशा अभागी नकुशांचा शापित जीवनप्रवास कुण्या जन्माची झाडाझडती असतो कुणास ठाऊक?

पुरुषी मानसिकता असणाऱ्या जगात स्त्रीच्या कर्तृत्वातील, सामर्थ्यातील सुंदरता शोधण्याऐवजी पुरुषाची नजर तिच्या देहात सौंदर्य शोधते. गौरवर्णांकित, नितळ अंगकांती असणारी नारी सौंदर्याची व्याख्या ठरते. अशा संकुचित विचारातून ‘स्त्रीचे सौंदर्य म्हणजे तिचे सामर्थ्य, तर पुरुषांचे सामर्थ्य म्हणजे त्याचे सौंदर्य’ यासारखे विचार जन्माला येताना, स्त्रीने तिचे सामर्थ्य आपल्या सौंदर्यात शोधावे अन् त्या सौंदर्याने पुरुषांना रिझवावे, हेच समाजाला सूचित करायचे असेल का? अपेक्षित असेल का? हे अपेक्षिताना ती नेहमी ‘बार्बीडॉल’ म्हणूनच दिसावी, या विचारांतून तिला पाहिले जाते. मनाचं सौंदर्य देहाच्या सौंदर्यापेक्षा चिरकाल टिकणारे असते, हे विसरून कुण्या अभिनेत्रीच्या झीरो फिगरचेही प्रचंड कौतुक केले जाते. टीव्हीवरील स्त्रियांच्या साड्यांचंही नवल वाटतं. चवळीची शेंग म्हणून तिच्या अटकर, सळसळीत बांध्यात तिचं स्त्रीत्व उभं केलं जातं.

जागतिकीकरणाच्या बदलत्या प्रवाहांनी काही जणांच्या आयुष्यात भौतिक सुख-सुविधांची रेलचेल झाली. त्यातून मिळणाऱ्या सुखांनी भोगलालसाही वाढत चालली आहे. अशा भोगवादी विचारधारेतून स्त्रीला पाहताना आमच्या मूल्यांनी, संस्कारांनी, संस्कृतीने दिलेला परस्त्री माता, भगिनीसमान, या उदात्त विचारला तिलांजली कधी दिली गेली, ते आमचं आम्हाला तरी कळलंतरी का? भोगवादी मानसिकतेतून कुणा निर्भयाच्या जीवनावरच आघात होतो. वखवखलेल्या दानवीवृत्ती प्रबल होऊन स्त्रीमधील माता, भगिनी, कन्या, मैत्रीण या नात्यांना विसरून केवळ मादीरुपात पाहू लागतात. पशूंच्या जगात कधी अत्याचार झाल्याचे ऐकिवात नाही. ते कधी अत्याचार करीतही नाहीत. पण प्रगत माणसांच्या जगात स्त्रीवर ती केवळ मादी म्हणून अत्याचार होत असतील, अत्याचारांनी तिच्या देहाबरोबर मनाचेही शकले होत असतील, तर माणूस हा विश्वातील सर्वात परिणत बुद्धिमत्ता असणारा प्राणी आहे, हे आपण म्हणावे तरी कसे? अविवेकी अन्याय समाजात घडतो, तेव्हा या विकृतीच्या विरोधात सत्प्रेरित, कृतिशील हात संघटीत होतात, हे खरे आहे. पेटत्या मेणबत्त्यांच्या प्रकाशात मनातील साठलेल्या आक्रोशातून आपल्या मूल्याधारित संस्कृतीतील संस्कार शोधले जातात. पण एवढे पुरेसे नसते. अन्यायाविरोधात प्रकटणारा सत्प्रेरित आक्रोश वणवा व्हायला हवा. त्याचा दावानल व्हावा. आणि त्याच्या दाहकतेत दानवांचा अस्त व्हावा; पण असं फारसं घडताना दिसतं का? दुर्दैवाने नाही. अत्याचाराच्या अन्यायग्रस्त कहाण्यांचा अस्त का होत नाही? अत्याचाराच्या वार्ता येण्याचे का थांबत नाही?

परिस्थितीच्या आवर्तात उध्वस्त झालेली शहरे, गावे, गावगाडा अन् त्यातून वाट्याला येणाऱ्या  जीवनातून, भणंग आयुष्यातून विद्वेषाचे वणवे परिसरात पसरत असताना गाव-शहर कुठेही असो, स्त्री सुरक्षित नाही. कधी जातीय, कधी धर्मीय विद्वेषातून घरातल्या संपत्तीसह स्त्रियांची अस्मिता, चारित्र्य लुटले जात असेल, त्यांच्या अब्रूचे धिंडवडे अजूनही निघत असतील, तर आम्ही प्रगत वैगैरे असल्याच्या वार्ता का कराव्यात? स्वतःला प्रगत तरी कसे म्हणवून घ्यावे? माणसांच्या प्रगतीची व्याख्या नेमकी कोणत्या निकषांवर करावी? याचा अर्थ असा नाही की, सर्वत्र अंधाराचं साम्राज्य आहे. अत्याचार होतो आहे. अत्याचार करणारी मानसिकता धारण करून जगणारे एक टक्काही विकृत समाजात नसतील; पण नव्याण्णव टक्के सतशील माणसे विकृती आणि विकृतांच्या विरोधात संघटित होऊन, विकृत विचार धारण करून जगणाऱ्यांचा एक टक्का अद्यापपर्यंत का संपवू शकले नाहीत, हे सत्य नाकारून चालणार नाही. सतप्रेरित विचाराने वर्तणारी माणसे व्यवस्थेला प्रश्न का विचारत नसतील? महात्मा फुलेंच्या शाळेत मिळालेल्या शिक्षणातून स्वअस्मितेचा शोध घेत तत्कालीन समाजाला, परिस्थितीला जाब विचारणाऱ्या मुक्ता साळवे, स्त्रीपुरुषांच्या जगण्यातील विरोधाभासी तफावत, स्त्रियांचे व्यवस्थेतील स्थान नेमके कोणते, याचा विचार करून नरापासून नारायणापर्यंत प्रश्न विचारण्याचे धाडस दाखविणाऱ्या ताराबाई शिंदेचे परखड विचार आमच्या देशातल्या किती स्त्रियांनी अंगिकारले आहेत?

कडूविंद्रावण डोंगरी त्याचा राहावा,
पुरुषाचा कावा, मला येडीला काय ठावा?
कावळ्यानं कोट केलं, बाभुलवनामंदी
पुरुषाला माया थोडी, नारी उमज मनामंदी.
या लोकगीतातून स्त्री मनातील पुरुषाविषयी भावना आविष्कृत झाल्या आहेत. पिढ्यानपिढ्याच्या अनुभवातून प्रकटलेला हा सूर स्त्रीच्या अंतरंगाने जाणलेल्या, लेखलेल्या, जोखलेल्या, पाहिलेल्या, साहिलेल्या, राहिलेल्या पुरुषीवृत्तीचा अन् त्या वृत्तीपायी तिच्या वाट्याला येणाऱ्या करुण कर्मकथेचा अध्याय आहे. असे असेलतर वर्षानुवर्ष स्त्रीला येणारा हा अनुभव विद्यमान काळी किती बदलला आहे? असेल तर किती? नसेल तर का नाही? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला नकोत का? अर्थात सगळीकडे सगळचं वाईट घडतंय, असंही म्हणणं नाही. कालची स्त्री आज खूपच बदलली आहे, तिच्या भोवतालचं जगही बरंच बदलेलं आहे. हे सत्य नाकारून कसे चालेल. पण ती सगळीच अन् सगळीकडेच बदललेली आहे का? ती आज बैलगाडीपासून आगगाडीपर्यंत, आगगाडीपासून अवकाशयानापर्यंत लीलया संचार करीत आहे. पुरुषी अधिसत्ता असणारी कितीतरी क्षेत्रे तिने संपादित केली आहेत. प्रगतीचा हा पल्ला गाठताना शरीराने आणि मनानेही ती कुठेच कमी नाही. हे तिने सिद्ध केले आहे. तरीही अद्याप पुरुषी विचारात ती अबलाच आहे. स्वकर्तृत्वाने सबला झाली. पण स्त्री म्हणून तिचं स्थान व्यवस्थेत नेमके आहे कुठे?

वर्षाच्या कालगणनेत मार्च महिन्यातील आठ तारीख जगात ‘महिला दिन’ म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरा केला जाईल. स्त्री सामर्थ्याचे पोवाडे गायिले जातील. प्रसार माध्यमातून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान, गुणवान महिलांच्या कार्याचे, कौतुकाचे गुणगान परत-परत ऐकवले जाईल. ते करू नये, असे नाही. पण गुणवत्तेच्या आणि यशाच्या निकषांच्या कोणत्याही चौकटीत सामावल्या नाहीत, आसपासच्या कोणत्याही झगमगाटात कधीच कोणाला दिसल्या नाहीत. पण आपापली आस्थेची एक मिणमिणती पणती हाती घेऊन आपल्या चंद्रमौळी घराचा कोपरा उजळवून टाकण्यासाठी धडपड करीत आहेत. पुरुषांच्या जगात स्वतःचं आशादायी जग उभं करून, परिस्थितीच्या वादळवाऱ्यात आपल्या अस्तित्वाची मूळं  घट्ट रुजवून संकटांचं आकाश डोक्यावर घेत असतील. कोणत्यातरी रानावनात पदर कमरेला खोचून जगण्याचे बळ शोधत असतील. काडीकचरा वेचून त्यातून स्वतःचे जीवन वेचत असतील. वणवण भटकंतीचे भिरभिरणारे जीवन सोबत घेऊन रानोमाळ आपल्या मुक्तीदिनाच्या शोधात असतील. अवहेलना सहन करूनही येणारा उद्याचा सूर्य आपल्या जीवनात मुक्तीचा प्रकाश आणेल, म्हणून आजच्या अंधाराशी दोन हात करीत असतील. कदाचित त्यांच्या कामाची दखल घेण्याचे कोणाच्या गावीही नसेल. त्यांची दखल वर्षाच्या कोणत्या दिनी घ्यावी? त्या कर्तृत्ववान यशस्विनींना जागतिक महिला दिवस म्हणजे काय? हेही कदाचित माहीत नसेल. यशस्वी म्हणून सुशिक्षितांच्या जगाला त्या परिचित नाहीत. म्हणून त्याचं यश कुठेही लेखांकित झाले नाही. लेखांकित झाले नाही म्हणून कोणी कधीच वाचलेही नाही. त्यांच्या संघर्षमय जगण्यातून निर्माण झालेली जीवनाविषयी आस्था हीच त्यांची कर्मगाथा आहे. त्यांची छोटीशी जीवनगाथा यशोगाथा बनून प्रेरणा देत आहे. नशिबाने दिलेल्या नकारातही जगताना जीवनाबाबत होकार निर्मिणाऱ्या महिलांचं मुक्तीपथावरील उमटलेलं छोटंसं पाऊल आस्थेचे ठसे उमटवत पाऊलापुरती वाट तयार करतील. त्या पाऊलखुणा पाहत मुक्तीचा मार्ग मिळवण्यासाठी निघालेली अनेक आशादायी पाऊले कदाचित काळालाही समजली नसतील. पण माणसाने कधीच न लिहिलेली मुक्तीगाथा लेखांकित करीत असतील.

1 comment: