Dhulvad | धूळवड

By
वसंताच्या अगमनासरशी सर्जनाच्या नानाविध छटा धारण करून सृष्टी रंगाची मुक्त उधळण करीत असते. चैतन्याचा प्रसन्न गंध वाऱ्यासोबत विहरत असतो. झाडापानाफुलांवरून गंधभारीत रंग ओसंडून वाहताना परिसराला मोहरलेपण आलेले असते. सृष्टीतील सारे रंग साकोळून समष्टीत सहज सामावून गेलेले असतात. रंगांच्या सरमिसळीने धरतीचे देखणे लावण्य सुंदरतेचा साज लेऊन नटते. रंगभरल्या संवेदनांचीं सोबत करीत माणसे रंगांच्या दुनियेत रमतात. आनंदविभोर क्षणांना चैतन्याचा परीसस्पर्श लाभतो. परिस्थितीच्या परिघाभोवती फिरणाऱ्या बेरंग जगण्याच्या चौकटीत रंगांना भरण्यासाठी माणसे आस्थेने चालत राहतात. नियतीने ललाटी लेखलेल्या अभिलेखांना आनंदरंगी रंगवण्याची आस साऱ्यांच्याच अंतर्यामी अधिवास करून असते.

दिसामासाच्या वाटेवर पावलं टाकीत काळाची वारी क्षण-पळांची पालखी घेऊन चाललेली असते. माणसं तिला सोबत करीत चालतात. थकली, भागली की विसावतात. जीवनाला नवे आयाम देणाऱ्या रंगांचा शोध घेत राहतात. वर्षनुवर्षे हे चक्र चालते आहे. आणि धावत्या काळासोबत आपलं असं काही मिळवण्यासाठीची माणसाची शोधयात्राही. मनात असणारं काही लागतं हाती, काही निसटतं. याहीवर्षी ते असेच चार पावले पुढे सरकले, आनंदाचा एक छोटंसं आभाळ शोधण्यासाठी. पण अवकाळी पावसानं होत्याचे नव्हते केले. उजाड आसमंतात माणसं आस्थेचे रंग शोधू लागले. हरविलेल्या आभाळातून आशेचे इंद्रधनुष्य पाहू लागले. लागले काही ज्यांच्या हाती ते रंगांच्या दुनियेत हरवले. आसपासच्या परिस्थितीचे भान विसरले अन् बेभान होऊन आनंदरंगी रंगले.

याचा अर्थ माणसांनी उत्सव साजरा करूच नये, असा अजिबात नाही. असं म्हणायचंही नाही. पण रंगांच्या उत्सवाला साजरे करताना आपल्या आसपास कोठेतरी बेरंग होतो आहे, याचीही थोडीशी जाणीव अंतर्यामी असायला नको का? आनंद शोधताना ताल अन् तंत्र विचलित होत असेल, तर समाजातून शंकेचे सूर प्रकटतातच. आजूबाजूच्या आसमंतात विवंचनेचा, काळजीचा उदास रंग गडद होऊन माणसं विकल होत आहेत. दुसरीकडे आपल्याच तालात झिंगणाऱ्यांना याची काहीच जाणीव नसेल, असे तरी कसे म्हणता येईल? रंगोत्सव साजरा करावा की, करू नये याबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही. पण साजरा कसा करावा, याबाबत विचारांमध्ये भिन्नता असू शकते. साधेपणानेच साजरा व्हावा म्हणून कुठे आग्रह धरला गेला असेल. कुठे मर्यादांच्या चौकटींचे उल्लंघन करीत साजरा झाला असेल. ते पाहून संवेदनशील मने खंतावलीही असतील. कदाचित काहींना याबाबत काहीच घेणे-देणे नसेल, माहीत नाही.

झाले असे की, रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही काही शिक्षक शाळेच्या मधल्या सुटीत चहाच्या दुकानावर थांबलो होतो. नेहमीच्या गप्पा आजही सुरु होत्या. आमच्या क्लर्क भाऊसाहेबांनी आमचं बोलणं मध्येच थांबवलं आणि आम्हां शिक्षकांना उद्देशून म्हणाले, “मास्तर, तुम्ही केलेल्या संस्कारांची लक्तरे पाहा, कशी टांगली गेली आहेत!” त्यांचं म्हणणं नीट न समजल्याने आमच्यातील एक शिक्षक त्यांना म्हणाले, “अहो, भाऊसाहेब तुम्हाला म्हणायचंय तरी काय? संस्कारांची लक्तरे काय? तारांना टांगली आहेत काय? अहो, असं कोड्यात काय बोलता, जरा कळेल असं बोला की राव!” विजेच्या तारांकडे झोकदार अंगुलीनिर्देश करीत ते म्हणाले, “ते पाहा, तुम्ही मुलांवर केलेले संस्कार कसे तारांवर उलटे लटकले आहेत!” साऱ्यांच्या नजरा विजेच्या तारांकडे वळल्या. समोर दिसणारे दृश्य पाहून आश्चर्यदग्ध स्वरात दोनतीन आवाज एकत्र, “अहो, हे काय?”

आता साऱ्यांना उलगडा झाला, त्यांच्या उपरोधिक बोलण्याचा. समोरील प्रकार पाहून व्यथित सुरात एक शिक्षक मनातील वेदना व्यक्त करू लागले. म्हणाले, “सर, काय म्हणावं हो याला? सण साजरा करीत आहात आनंदाने करा, काही कुणाचं म्हणणं नाही; पण आनंद साजरा करायची ही कोणती तऱ्हा? कोणती नवी रीत ही? रंग खेळताना कपडे रंगणारच; पण ते खराब झाले म्हणून फेकायचेच असतील, तर योग्य ठिकाणी फेका. असे विजेच्या तारांवर फेकून लोंबकळत ठेवणे, हा कोणता नवा जगतविख्यात शोध?” “सर, या शोधकर्त्याला सार्वजनिक सभ्यतेचे नोबेल देऊन गौरवान्वित करायला हवं.” दुसरे एक शिक्षक तो प्रकार पाहून उपरोधिक भावनेतून मनातील राग काढते झाले. त्यांच्या विधानाची बाजू धरून तिसरे शिक्षक बोलते झाले. “काय म्हणावं या पोरांना? सर, यांना संस्कार देताना आपण खरंच अपुरे पडलो आहोत. ही पोरं आपल्या शाळेची असती आणि मला दिसती, तर चांगलं चोपूनच काढलं असतं त्यांना.” त्याचं थोडं भावविवश, थोडं रागाने केलेलं बोलणं थांबवत आणखी एक शिक्षक म्हणाले, “कमी वगैरे काही नाही सर! ना आपण कमी पडलो, ना आपले संस्कार. दोष द्यायचाच असेल तर पालथ्या घड्यांना द्या! ते पालथेच राहणार असतील, तर तुम्ही तरी काय करणार आहात? आणि संस्कार वगैरे देणं, घडवणं ही काही फक्त एकट्या शिक्षकाचीच जबाबदारी आहे का? समाजाची नाही का? ते राहू द्या बाजूला. अपत्यांच्या भविष्यावर ज्याचं म्हातारपण अवलंबून आहे, ते त्यांचे जन्मदाते- त्यांनी नको का त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्यायला?”

“अहो, हल्ली येवढा वेळ आहेच कुठे पालकांना मुलांकडे बघायला. त्यांना आस आहे घरात संपन्नता चहुबाजूने यावी आणि नांदती राहावी याची. सुखसुविधांनीमंडित उच्चभ्रू जीवन जगण्याची. सुविधांनीयुक्त जगण्यासाठी हाती खुळखुळणाऱ्या पैशाचा आवाजही असावा लागतो. तो काही सहजी येत नाही. त्याला आणण्यासाठी यातायात, धावाधाव करावी लागते. पैशामागे सुख आणि सुखामागे माणूस धाप लागेपर्यंत धावतोय. पालक राबराब राबतात आणि मुलं आपला आब राखून जगणंच विसरतात. आहे कुणाचं लक्ष त्यांच्याकडे? साऱ्यांचे लक्ष पैसा कसा येईल, याकडे असल्यावर आणखी काय होणार आहे दुसरे?” आणखी एक शिक्षक त्यांच्या मताचे समर्थन करू लागले. त्यांच्या विचाराचा धागा पकडत पहिल्या शिक्षकाने अशा वागण्याचं कारण चंगळवादीवृत्तीत शोधले. म्हणाले, “कोणत्याही गरजांची पूर्तता करणारा ‘पॉकेटमनी’ विनासायास यांच्या हाती लागत असेल, तर हे कशाला कुणाचा विचार करतायेत? आणि ऐकातायेत कुणाच्या बापाचं! अहो, जे आपल्या बापाचेही ऐकत नसतील, त्यांना कुणाचाही बाप वठणीवर आणू शकत नाही. सहज मिळणारा पैसा माणसाला अविचारी कसा बनवतो. याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण आणखी कोणते असू शकते का? पाहा शोधून तुम्ही?” त्यांच्या मनातला राग आता चांगला जाणवायला लागला. मत, मते आणि मतांतरे- धुळवडीने उडवलेल्या रंगाइतकेच, आज येथेही.

हे चर्चेचे गुऱ्हाळ लवकर थांबणार नाही, याचा अंदाज घेऊन एक शिक्षक- ज्यांना चांगलेच ठाऊक आहे, मास्तर लोक चर्चेत लागले, म्हणजे चर्चेचे काय होते ते. म्हणाले, “अहो, तुम्ही कितीही चर्चा केल्यात, कितीही बोललात, कितीही मते मांडली, म्हणून परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? आणि पडायचाच असता, तर हे दृश्य तुम्हाला दिसले असते का? तुम्ही मंडळी फक्त शिक्षकच आहात. कोणी युगपुरुष वगैरे नाहीत. कालचक्राला कलाटणी द्यायला! त्यापेक्षा जे दिसतंय त्याचा तुमची इच्छा असो, नसो स्वीकार करा आणि कालाय तस्मै नमः म्हणा आणि चला परत वर्गात संस्कारांची नवी लक्तरे शिवायला.” उद्वेगजनक सात्विक संताप व्यक्त करीत त्यांनी परिस्थिती बदलणं अवघड असल्याची जाणीव करून दिली. शाळेची मधली सुटी संपण्याची वेळ झाली. तो विषय संपला.

तसं पाहता ही घटना म्हणावी, तर साधी आणि अवघडसुद्धा. कधीकधी लहान गोष्टीतूनही माणूस कळत जातो. कोणताही सणउत्सव साजरा करणे वाईट नसते, वाईट असते ती साजरा करण्याची चुकलेली पद्धत. समाजसंमत, संकेतसंमत वर्तनाच्या चौकटीत ते साजरे होत असतील, तर तो आनंदोत्सव असतो. पण कोणाची तरी, कोणती तरी चुकीची कृती म्हणजे सगळेच तसे असतात असे नाही. सणउत्सव साजरे होताना थोडसं आजूबाजूचं भान असलं तर प्रश्न निर्माण होण्याऐवजी त्यातून उर्जाच माणसांच्या जीवनात संक्रमित होत असते. सण साजरे करताना स्वतःचीही एक शिस्त असावी लागते. आपल्या वर्तनाने दुसऱ्यास त्रास न होणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याला स्वैराचाराचे वसने चढविली जातात, तेव्हा अशी विक्षिप्त दृश्ये समोर प्रकटतात. माणसांचे वर्तनप्रवाह नियंत्रित करण्यासाठी कायदा तयार होतो. कायद्याचा आदर करून वागताना सार्वजनिक वर्तन नीतिसंमत असते, तेव्हा त्याला समाजाची मान्यता असते. समाजात असं वर्तणाऱ्याना सन्मान मिळतो. पण अंगात स्वैराचार संचारत असेल आणि कायदा दुर्लक्षित करण्यात कोणास फार मोठे ‘थ्रील’ वाटत असेल, तर अशावेळी कायद्याने करावे तरी काय? दुचाकीवरून तीनतीन चारचार सीट बसून झिंग आल्यागत सुसाट गाड्या हाकणे, ही काही संस्कारांची श्रीमंती नाही. आजूबाजूच्या परिस्थितीची कोणतीच जाणीव न ठेवता डीजेच्या बेसुमार आवाजावर बेताल थिरकणारी अस्थिर पावलं, ही काही जगण्याची सुयोग्य रीत नव्हे. जगणं तेव्हाच श्रीमंत असतं जेव्हा त्याला संस्कारांच्या कोंदणात अधिष्ठित केलेलं असतं. काही असे वागले असतील, तर वर्तनातील प्रासंगिक स्वैराचार म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं, हा वर्तन विपर्यास नव्हे काय? चुका घडतात. चुकामधून शिकताना आलेलं शहाणपण माणूस घडविते. शहाणपण येण्यासाठी त्याला शिकवावे लागते. पण शिकून न शिकल्यासारखे आचरण कोणाकडून घडत असेल तर याला कोणी काहीच करू शकत नाही.

देशाच्या प्रगतीची फक्त एक आणि एकच उमेद कोणती ते सांगा? असा प्रश्न मला कोणी विचारला, तर क्षणाचाही विलंब न करता माझे उत्तर असेल, तरुणाई. तरुणाईच्या सळसळत्या उर्जेला सकारात्मक मार्गाने वळते केले, तर पराक्रमाचे नवे आयाम उभे राहतील. देशाचं भाग्य उजळवून टाकण्याचं अवघड कार्य सुघड करण्याची शक्ती तरुणाईत असते. देशाला भविष्यात कोणी महान वगैरे करणार असेल, तर तो तरुणवर्गच. अशाप्रकारची मते अभ्यासू विचारवंत अनेकदा आग्रहाने मांडतात आणि ते वास्तवही आहे. पण तरुणाईचा वर्तनाविष्कार रस्त्यावरून उच्छृंखलपणे वाहत असेल, तर हाती येणाऱ्या उत्तरांच्या आधी आणखी काही नवे प्रश्न उभे राहतात. अर्थात दोनचार मुलं असं वागले म्हणून सारीच तरुणाई बेपर्वा आहे. त्यांच्यासमोर जगण्याचे आदर्शच नाहीत, हे म्हणणंही तर्कसंगत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला दुसरीही एक बाजू असतेच. ती पाहून तपासून घेतली, तर दिसणारं चित्र सुस्पष्ट होत जाते.

आमच्या आपापसातील बोलण्याच्या ओघात एक शिक्षक म्हणाले होते, “यांना शेतातील कुंधा खणायला न्या, तेव्हा कळेल कष्टाचं जीणं काय असतं ते.” तरुणाईचा बेफामपणा पाहून वाईट वाटलं, म्हणून आत्मीय तळमळीने त्यांनी हे विधान केले. हे एक सामाजिक वास्तव आहे. या उर्जेला सकारात्मक मार्गाने  वळते करण्यात अपयश आल्यास, असे किंबहुना आणखीही उथळ वर्तनाविष्कार बघणं अटळ आहे. सकारात्मक विचाराच्या रुजवणुकीसाठी उन्नत, उदात्त आदर्श उभे करावे लागतात. पुस्तकातली आदर्श चरित्रे वास्तव जीवनातून दिसायला हवेत. याचा अर्थ आमच्यासमोर आदर्शच नाहीत, असा नाही. ते आहेत, किंबहुना जगात नसतील एवढे आदर्श माणसे या भूमीत जन्माला आले आहेत. त्यांची जीवनाभिमुख कार्यप्रणाली आजही चरित्रचिंतनाच्या वाटेने आम्हांस सोबत करीत आहे. आपणही त्यांच्याप्रमाणे वागावे, तसे व्हावे. असे विचार चुकलेल्यांच्या मनातून निर्माण होणे आवशक आहे. मनात विधायक विचार उदित होतील, तेव्हाच जणात प्रकटतील. याकरिता आपल्या मूल्यांची आणि मूल्यव्यवस्थेचीही उंची वाढवावी लागेल. नैतिकतेची परिमाणं अधिक सात्विक आणि जीवनाभिमुख करावी लागतील. केवळ भौतिक सोयीसुविधांनी संपन्न असलेले जीवन जगणं हे माणूस जन्माचं प्राप्तव्य असू शकत नाही. नैतिकतेच्या, आदर्शाच्या गंधाने जगण्यास गंधित करणे म्हणजे माणूसपण.

मानवेतर प्राण्यांच्या गरजा देहधर्मापुरत्या, जगण्यापुरत्या सीमित असतात. माणसांच्या गरजा संस्कारांचे संवर्धन करून आदर्श जीवनाचे वस्तुपाठ उभे करणाऱ्या असतात. माझ्या आजूबाजूला परिस्थितीने निर्माण केलेल्या समस्यांशी संघर्ष करीत माणसं कसेबसे जीवन जगत आहेत. एकवेळ का होईना पण हातातोंडाची गाठ पडावी, म्हणून ढोर मेहनत करूनही अर्धपोटी, उपाशीपोटी निजत आहेत. आणि मी माझ्याच मस्तीत जगत असेल, तर असं जगणं परिस्थितीशी प्रतारणा करणारं आहे. इतरांच्या वेदना संवेदनशील काळजाला घरं करतात, तेव्हाच माणुसकीचे झरे जीवनात पाझरतात. दैवाने मला सारंकाही दिलं म्हणून बेपर्वा, बेफिकीर जगून स्वतःला वेगळे समजणे विपर्यास आहे. स्वतःसोबत आसपासच्या व्यथा, वेदनांची जाणीव असणारी माणसंच देशाची खरी संपत्ती असतात. पद, पैसा आज आहे उद्या नाही. ते कायम असतीलच याची खात्रीही नाही. मात्र सहवेदनेतून घडलेलं आणि संवेदनाशील विचारांनी प्रगल्भ झालेलं मन, ही कायम टिकणारी संपत्ती आहे. सहानुभूतीपूर्वक दुसऱ्याचा विचार करणे, हीच जीवनाची आणि जगण्याचीही श्रीमंती आहे. तोच खरा जीवनयोग आहे. काहींनी तुपाशी तर काहींनी उपाशी असणं, हा माणसांच्या जगाचा न्याय नसावा. अंधार आहे तेथे आस्थेची, स्नेहाची एक पणती लावण्याएवढे उमदेपण प्रत्येकाकडे असते. गरज असते, आतल्या त्या उमदेपणाला स्मरून पणती पेटवण्यासाठी पुढे येणाऱ्या हातांची. पेटवलेली पणती विझू नये म्हणून आस्थेचा पदर आडवा धरण्याची.

3 comments:

  1. छान सर रंगाची उधळन असणारा आमचा हा पारंपरिक सण. परंतु आजच त्याच स्वरूप तुम्ही छान मांडलय.

    ReplyDelete
  2. छान सर रंगाची उधळन असणारा आमचा हा पारंपरिक सण. परंतु आजच त्याच स्वरूप तुम्ही छान मांडलय.

    ReplyDelete