Sairat : Akalan Ani Anvay | सैराट: आकलन आणि अन्वय

By // 12 comments:
 
चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखवेल. त्यावर अविवेकाची काजळी पसरली असेल, तर विचारांची प्रतिमा सुस्पष्ट दिसेल तरी कशी? समाजात दिसतं, घडतं ते दाखवायचा प्रयत्न चित्रपट करतो. समजा ते काल्पनिक असेलही, पण भविष्यात असे काही घडण्याची शक्यता नाहीच, असे आपण म्हणू शकतो का? समाजाकडे हे समजण्याइतकी प्रगल्भता नसावी का? विचार करण्याचं दान नियतीने साऱ्यांच्या ओटीत ओतले असेल, तर संदेहाचे प्रश्नच का उरावेत? भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचा ल.सा.वि. काढणे अवघड आहे, हे माहीत असणारी माणसे अपरिपक्व विचारांनी वर्तने असंभव. देशात जातीयता, धार्मिकता, भेदाभेदाच्या पलीकडे विचार करणारे आहेत, तसे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात वर्तणारेही आहेत.....
 
चित्रपट आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारताच्या लोकजीवनात धर्माइतक्या एकरूप झाल्या आहेत. या विषयांबाबत माहीत नसणारा भारतीय एकतर वेडा असेल किंवा सर्वसंग परित्याग करून आपल्याच चिंतनाच्या परिघात वर्तणारा विरक्त तरी असेल. या विषयांवर आपापल्या वकुबाने मत व्यक्त करणारे सर्वकाळी, सर्वस्थळी आहेत. समर्थनाचे सुरम्य सूर सजवणारे आहेत, तसे नकाराच्या वर्तुळात मतांच्या रेषा ओढणारेही आहेत. गुणगान करणारे आहेत, तसे यांना संदेहाच्या सुळक्यावर चढवून गुंत्यात गुंफणारे आहेत. या दोन गोष्टींबाबत एक बाब सामायिक आहे, ती म्हणजे या विषयांचे ज्ञान असणारे जेवढ्या आत्मविश्वासाने व्यक्त होतात, तितक्याच अभिनिवेशाने काहीही माहीत नसणारे आत्मविश्वासपूर्वक प्रकट होतात. आपल्याकडे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाविषयी वाद होणे जणू आवश्यक बाब झाली आहे, असे वाटण्याइतपत सांप्रत मतमतांतराचा धुरळा उडत राहतो. क्रिकेटचा प्रत्येक सामना आपण जिंकलाच पाहिजे, अशी मानसिकता प्रबळ होत आहे. पराजयाला खेळ म्हणून न स्वीकारता पराभवाची सारी सूत्रे सामनानिश्चितीत शोधून समाधान पावणारेही आहेत. कधीकाळी सिनेमा आणि क्रिकेट मनोरंजनाची माध्यमे होती, आज ती वादाची स्थळे झाली आहेत. चित्रपट प्रदर्शनाआधी कुठूनतरी कसल्यातरी उडत्या वार्ता येतात आणि माथी भडकून विरोधाचे आवाज बुलंद होऊन स्वैरसंचार करतात. हे सगळं करण्यामागे नेमके कारण काय, हे शोधून पाहण्याची कोणाला आवश्यकता वाटत नसते. आपण या गर्दीत सामील का होतो, या प्रश्नाचे उत्तर किती जणांना माहीत असते? माहीत नाही; पण आपल्या अशा वर्तनाला सामुहिक वेडेपणाचा आचार म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही. हे सगळं ऐकून, पाहून मनात प्रश्न येतो, भारतीय माणसे संवेदनशील आहेत, सहिष्णू आहेत, हे म्हणणे वास्तव आहे की, शब्दांच्या बुडबुड्यांमुळे वाऱ्यावर उडणारा केवळ आभास आहे.

लोकशाही व्यवस्थेने जगाला जे काय दिले असेल ते असो, पण भारतीयांना प्रगल्भ मन द्यायला आपली लोकशाही व्यवस्था अजूनही थिटी पडत आहे, असे वाटण्याइतपत वर्तमानाचे विपरीत प्रत्यंतर येत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा लोकशाहीतील शब्द संकुचित होत आहे, असे कोणी म्हणत असेल आणि तसे कोणास वाटत असेल, तर त्यात वावगे काही नाही. परमत सहिष्णुता लोकशाहीच्या यशाचे निःसंदेह परिमाण असते. पण या परिमाणाला परिमित पसंतीच्या परिघात बंदिस्त करण्याचा कळत-नकळत प्रमाद घडतो आहे. माझ्याइतकाच इतरांनाही व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्याला तो सन्मानपूर्वक प्रदान केला पाहिजे, याचं जणू विस्मरण होत आहे की काय असेच वाटते. चित्रपट आणि वाद हे अलीकडील काळाचं अविभाज्य अंग झालंय. कोणत्याही वादाशिवाय नैसर्गिक जन्म घेणारे चित्रपट अपवाद ठरायला लागले आहेत. प्रत्येकवेळी सिझेरियन करूनच त्यांचा जन्म होतो आहे. कधी कुणाच्या, कुठल्या कारणाने भावना दुखावल्या जातील, हे दुखावलेल्या मनांनाही सांगता येणार नाही. सांगणं तर दूरच, पण या दुखावलेल्या भावनांमागील उत्तर सापडणं त्याहून अवघड झालंय. आपल्या स्मृतीची अलीकडील काही पाने उलटून पाहिली, तरी असे वाद आणि वादांचे कारण ठरलेले चित्रपट आपल्या हाती सहज लागतील. सोबतच अशा वादात उड्या घेणारे विचारही सापडतील. कारण नसता कलहप्रिय वाटेने निघालेले हे एकतर समर्थक असतात, नाहीतर विरोधक.

अशाच काहीशा समर्थनाच्या आणि विरोधाच्या वर्तुळांत बंदिस्त झालेला अलीकडचा मराठी चित्रपट सैराट. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रात जणूकाही सैराटचे समर्थक आणि विरोधक अशा दोनच विचारांची माणसे वास्तव्यास असतात की काय, असे वाटण्याइतपत समाजमन ढवळून निघाले. सैराटचं कौतुक करणारे होते, तसे विशिष्ट अभिनिवेशाने निर्मित नकाराच्या आपल्या मतांवर, विचारांवर ठाम असणारे विरोधकही होते. असे असूनही आतापर्यंत मराठी चित्रपटांना साध्य झाले नाही, ते या चित्रपटाने केले. कमालीची लोकप्रियता लाभलेल्या सैराटने शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवले. मराठी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची सगळी गणिते उलटवून टाकणारा हा पहिलाच चित्रपट. एकीकडे कौतुकाचा होणारा अनवरत वर्षाव, तर दुसरीकडे विरोधाचा तीव्र सूर. अशा दोन भिन्न तिरांना धरून तो वाहत राहिला, तरीही यास वारेमाप यश मिळाले. यामागे कारणे काय असतील ती असोत; पण हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात अनुकूल-प्रतिकूल विचारांची वलये निर्माण करीत राहिला. तरुणाईने डोक्यावर घेतलेला. प्रौढांच्या कौतुकास पात्र ठरलेला. वयस्कांनी पसंतीची मोहोर अंकित केलेला आणि समीक्षकांच्या विचारांत दखलपात्र ठरलेल्या या चित्रपटाने यशाचे सारे आयाम संपादित केले. आणि या सगळ्या घटकांना एकत्र आणून दखल घेण्यास बाध्य केले, ते नागराज मंजुळेने.

नागराज मंजुळे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून एव्हाना सर्वांना परिचित आहेत. चित्रपटाच्या चाकोरीतील चौकटींची परिमाणे अवगत असणारा आणि समजणारा हा दिग्दर्शक. व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना माणसाच्या जगण्याचा वाटा अडवणारी वैगुण्य शोधून त्यावर भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून मंजुळे कौतुकास पात्र ठरले असतील, तर तो त्यांच्या संवेदनशील विचारांचा परिपाक आहे. एकीकडे जातीपातीच्या टोकदार काट्यांना घेऊन चित्रपट करणारा दिग्दर्शक म्हणून जसा टीकेचा धनी झाला. तसा समाजवास्तव संवेदनशील मनाने अधोरेखित करणारा म्हणून प्रशंसेस पात्रही ठरला आहे. कौतुक आणि टीका या परस्पर भिन्न टोकांवर प्रवास करणाऱ्या या दिग्दर्शकाला जे सांगायचे होते, ते त्याने आपल्या चित्रपटातून सांगितले आहे. खरंतर सांगणं ही त्यांची खासियत आहे आणि वेगळेपणसुद्धा. फँड्रीसारखा चित्रपट तयार करून जातव्यवस्थेचे प्रखर वास्तव त्यांनी अधोरेखित केले. विज्ञानतंत्रज्ञानयुगाच्या कुणी कितीही वार्ता करीत असले, तरी जात काही आपल्या सामाजिक विचारातून जात नाही, हे वास्तव आहे. नेमका हाच विचार त्यांनी मांडला. जातव्यवस्थेने केलेल्या अन्यायाने त्रस्त जब्याने फेकलेला दगड व्यवस्थेवरचा आघात होता. मनातला लाव्हा उसळ्या घेताना त्याचा स्फोट दगड भिरकावण्यात झाला. या दगडाने जातीच्या चिरेबंदी वाड्याच्या भिंती किती तुटल्या-फुटल्या, हा वादाचा विषय असू शकतो. पण वास्तव असेही असू शकते, हे अमान्य करता येत नाही.

चौकटीतील चाकोऱ्या मोडून ज्यांना मर्यादांची वर्तुळे पार करता येतात, ते आपला नवा परिघ निर्माण करतात. सैराटने नेमके हेच केले आहे. व्यावसायिकतेची परिमाणे या चित्रपटाला असतीलही; पण त्यांना बाधा न समजता त्याचाच आधार घेऊन परिस्थितीवर भाष्य करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. आपले आसपास, उसवत चालेलं सामाजिक भान आणि पारंपरिक मोठेपणाच्या बेगडी जगण्याला हा चित्रपट धक्का देतो. मनात साठलेला कोलाहल उसळ्या मारायला लागतो, तेव्हा कंप होतोच. हे हादरे सहन करून ज्यांना उभं राहता येतं, ते परिवर्तनाच्या दिशेने नव्या वळणाचा शोध घेत, नवे परगणे निर्माण करतात. सैराटने नवा परगणा शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा शेवट धक्कातंत्राचा वापर करणारा असतो. सैराटमधील शेवट म्यूट होतो आणि माणसे अवाक होतात. सुरवातीचा दीड तास झिंगाट होऊन बुंगाट नाचणारी. शिट्या वाजवणारी, आरोळ्या मारणारी माणसे हीच का? असा प्रश्न चित्रपटाच्या उत्तरार्धात मनाला पडतो. एक मूकपण घेऊन माणसे चित्रपट पाहत राहतात. कथानकासोबत सरकत राहतात. पूर्वार्धात प्रसन्नतेचा परिमल घेऊन बहरणाऱ्या प्रेमाची उत्तरार्धात होणारी वाताहत पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहतात. आणि शेवट अस्वस्थतेचे शिखर गाठतो. एक शब्दही न बोलता चित्रपटगृहातून बाहेर पडलेली माणसे मी पाहिली आहेत. एक अस्वस्थ बेचैनी सोबत घेऊन कुठल्यातरी विचारांच्या तंद्रीत घरी येतात. स्वतःला प्रश्न विचारीत राहतात. चित्रपटाचा शेवट असा नको होता करायला म्हणून हळहळत राहतात. पण वास्तव हेही आहे की, हे विचारांचं असह्यपण हळूहळू निवळत जाते. भावनांच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांच्या धडका कमी होत जातात. सारंकाही सावकाश पूर्वपदावर येतं आणि व्यवस्थेने निर्मिलेल्या चौकटींमध्ये परत येऊन प्रेक्षक विसावतो. आहेत त्या गोष्टी घडत राहणार आहेत, म्हणून स्वतःला सांगत राहतो. माझ्या एकट्याने परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग घडणे असंभव असल्याची खात्री असल्याने चाललं आहे, ते मुकाट्याने स्वीकारतो. हे आपलं सामाजिक न्यून आहे. हे अमान्य करण्यात काही हशील नाही.

मला वाटतं अलीकडील काळातील सर्वाधिक चर्चेतला हा चित्रपट. चित्रपट प्रादेशिकच, पण राष्ट्रीयस्तरावरील माध्यमांनी दखल घेण्याइतपत मोठा. त्याचे हे मोठेपण चर्चेच्या अनुकूल-प्रतिकूल आवाजाच्या सुरावटींनी सजत राहिले. कदाचित असे एकही ठिकाण नसेल, जेथे सैराट हा विषय नसेल. काही दिवसापूर्वी सैराटच्या वेगळेपणावर आम्हा मित्रांमध्ये बोलणं सुरु होतं. सरळ सरळ दोन गटात विभागणी झालेली. एक समर्थनाचा सूर, तर दुसरा विरोधाचा बुलंद आवाज. तसेही मी सिनेमे पाहणे कधीच विसरलो आहे. गेल्या आठ-दहा वर्षात पहिल्यांदाच माझ्याबाबतीत असे घडले की, सात वेळा हा सिनेमा थिएटरला जाऊन पाहिला. कॉलेजमध्ये शिकत असताना एखादा चित्रपट आवडायचा म्हणून चार-पाच वेळा पाहणे घडायचे. अर्थात तो का आवडतो, याला काही संयुक्तिक कारणही नसायचे. कदाचित तो वैयक्तिक बावळटपणाचा भाग होता. त्यात काही कळण्यापेक्षा टाईमपास हे एक कारण असायचे. वाढत्या वयानुसार जाणिवांच्या कक्षा रुंदावतात, हेपण सत्यच आहे. असे चित्रपट जे कधीकाळी आम्ही आवडीने पाहत असू, ते आज आमच्यासाठी थट्टेचा विषय झाले आहेत.

काही अपवाद वगळले, तर चित्रपट ही गोष्ट मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात बघायला जाण्याची गोष्ट आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे. बऱ्याच चित्रपटांबाबत हल्ली असे वाटते. कदाचित या मताबाबत बरेच जण असहमत असतील किंवा काही सहमतसुद्धा असू शकतील. मत काहीही असले तरी, कोणाच्याही मतांचा अनादर करायचा नाहीये. पण सैराटबाबत माझ्याकडून असे घडले नाही. मेंदू सोबत घेऊन हा चित्रपट प्रत्येकवेळी नव्याने पाहत राहिलो. कोणी याला बावळटपणा असेही म्हणेल. अर्थात त्यांना तसं म्हणण्याचा अधिकारही आहेच. हा चित्रपट कोणाला तद्दन गल्लाभरू वाटला. कोणी अप्रतिम म्हणून वाखाणला. कोणी व्यावसायिकतेच्या चौकटींमध्ये बसवलेला चांगला चित्रपट म्हटले. कोण काय म्हणतो, त्याचा विचार न करता परत-परत पाहत राहिलो. त्यातून काहीतरी शोधत राहिलो. काहीतरी सापडत राहिले. आनंद घेत राहिलो. ही सगळी पुण्याई संपादित करून चित्रपटातील तपशील, बारकावे, संवाद, संगीत, अभिनय, ग्रामीण वास्तव, समाजवास्तव असे बरेच काही-काही निवडत, वेचत राहिलो. या गोष्टींविषयी माझ्या आकलनाच्या परिघाला समजून घेत मित्रपरिवारात घडणाऱ्या चर्चेत अधिकारवाणीने बोलत राहिलो.

सैराटच्या कौतुकाचे माझे पाढे ऐकून माझे दोन-तीन स्नेही नकाराचे सूर घेऊन आम्हां मित्रांमध्ये सैराटविषयी होणाऱ्या चर्चेत प्रत्येकवेळी तावातावाने व्यक्त होत राहिले. त्यात चांगले काय आहे, यापेक्षा चित्रपटच वाईट कसा आहे, ते अभिनिवेशाने दाखवू लागले. मी प्रत्येकवेळी त्यांच्या मतांना छेद देत राहिलो. एकवेळ तर अशी आली की, त्यांच्या बोलण्यात संवादाऐवजी उपहासाचा आवाज अधिक आक्रमक होऊ लागला. अर्थात, मुद्दे संपलेत की, आपलेच म्हणणे कसे रास्त आहे, हे सांगतांना समर्थनाचे असे गडद रंग विधानांना चढतात. काही दिवस हाच विषय आमच्या संवादाच्या परिघात परिवलन करीत होता. विषय थांबायचं नाव काही घेत नव्हता. रोज नवा मुद्दा आणि त्यांचे प्रत्येकाने आपापल्या मतांनी केलेलं खंडन-मंडन असा सिलसिला सुरु राहिला. मी माझ्या मतांवर ठाम आणि ते त्यांच्या विचारांवर कायम. शेवटी एक दिवस त्यांना म्हणालो, ‘ऐकीव, वाचीव माहिती दिमतीला घेऊन मतमतांतरे घडवीत वाद करण्यापेक्षा निदान एकदा तरी थिएटरला जाऊन हा चित्रपट पहा, मग काय ते ठरवा. नसेल तुम्हाला आवडत, तरी वादावर मुद्देसूद बोलण्यासाठी पहा. मग व्यक्त व्हा!’

सैराटविषयी बोलतांना कदाचित त्यांची काही पूर्वग्रहदूषित मते असतील, ठरवून घेतलेल्या मर्यादा असतील, स्वतःच्या वर्तनाची जीवनविषयक काही तत्वे असतील, विचारांचा सीमांकित परिघ असेल किंवा आणखी काही तत्सम कारणे असू शकतील. ती असू नयेत असे नाही; पण कोणत्यातरी विषयाची एक बाजू घेऊन आपण व्यक्त होतो, तेव्हा त्याची आपल्याला न दिसणारी दुसरी बाजूही असते, याची किमान जाणीव अंतर्यामी असावी, अशी अपेक्षा चर्चेच्या वर्तुळात वर्तताना नेहमीच असते. आणि अशी अपेक्षा करण्यात अवस्ताव काही नाही. खरंतर हे समजण्याइतपत सक्षम असणाऱ्यांच्या विचारविश्वात हे घडत होते. सुशिक्षितांच्या विचारांत एवढे एकांगीपण असेल, तर अन्यांचा विचार करावयास नकोच.

आता अगदी अलीकडे त्या स्नेह्याने हा चित्रपट पाहिला आणि त्याचे मत यू टर्न घेत एकशे ऐंशी अंशाच्या कोनात बदलले. आपलं मत सार्वजनिक करतांना तोही तेच म्हणू लागला, जे एवढे दिवस मी त्यांना सांगत होतो. खरंतर आपल्या आसपास अशी कितीतरी उदाहरणे असतील. जे मतांच्या दोलायमान पुलावरून प्रवास करीत असतील. नेमकी अशीच काहीतरी कारणे असतात, एखाद्या गोष्टीविषयी वादाला रस्ता मिळायला. मत परिवर्तनशील असते, हे मान्य. पण परिवर्तनाला परिपक्वतेचा परीसस्पर्श असणे परिस्थितीसापेक्ष प्रमाण असते. माझ्या या स्नेह्याचं मत परिवर्तनाचं श्रेय कुणाचं? जेवढे त्याच्या समायोजनक्षम विचारांचे आहे, त्याहून अधिक मंजुळेंच्या संवेदनशील विचारातून प्रकटलेल्या कलाकृतीचे आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

चित्रपटांचा समाजमनावर परिणाम होतो का? असेल तर किती? हा परिस्थितीसापेक्ष प्रश्न आहे. मान्य करू या, होत असेलही. तर तो तसा सार्वत्रिक असतो का? चार-दोन संवेदनशील मनाचे धनी वगळले, तर जवळपास होत नाही, हेच खरंय. कुठल्यातरी वर्तमानपत्रात छापून आलेल्या आणि घरून पळून गेलेल्या प्रेमींच्या बातम्या व्हॉटसअपवरील माझ्या एक मित्राने मला फॉरवर्ड केल्या. त्या बातम्यांमध्ये हे सगळं सैराटच्या प्रभावामुळे होत असल्याचं म्हटलं होतं. त्याने लगेच दुसरा मॅसेज पाठवला आणि म्हणाला, “आत्ता बोला सर, तुम्ही सैराटचं एवढं कौतुक का करीत आहात? अशा बातम्या येणार असतील, तर यालाच आपण चित्रपटाचं यश वगैरे असं म्हणायचं का?”

अशा गोष्टींना किती महत्त्व द्यावं याबाबत सुशिक्षितांमध्ये एवढा संदेह असेल, तर अशिक्षितांच्याबाबत न बोललेलं बरं. मी त्याला उत्तर पाठवलं, “बाबारे! हा सगळा बादरायण संबंध आहे. अनेक धार्मिक चित्रपट पाहून कोणी संत झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. श्यामची आई चित्रपट पाहून कोणी श्याम झाल्याचे निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. चित्रपटाचा प्रभाव असतो, पण फार थोडा. कदाचित प्रासंगिकच अधिक. उगीच बातमीमूल्य म्हणून कोणी काही लिहिलं असेल, तर त्याला किती महत्व द्यायचं, हे आपलं आपणास ठरवावं लागतं. कृष्ण आणि रुक्मिणी विवाह काय होता? शंकर-पार्वतीची पुराणकथा तुम्ही ऐकता की नाही? सुभद्रेला अर्जुनाने सोबत नेले, हे मान्य करतात की नाही? नल-दमयंती, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी या प्रेमकथा काय महाराष्ट्रात कोणाला माहीत नाहीत काय? कोणाला पाहून कोणी बिघडत नसतो आणि सुधरतही नसतो. त्याला मनापासून काही करायचेच नसेल, तर सुधरवणारे आणि बिघडवणारे चित्रपट आहेत तरी कोण? माझ्या अडनिड वयात मी ‘एक दुजे के लिये’, ‘कयामत से कयामत तक’ आणि यासारखे काही चित्रपट पाच-सहा वेळा पाहिले. आवडायचे. वाटायचे असे असू शकते का? पण नाही. वास्तवात असे काही नसते, हेही कळायचे की. सैराटआधी का कोणी प्रेम करत नव्हते? प्रेमात पडलेले जीव पळून जातच नव्हते का? मग असे असेल, तर त्याला जबादार कोण? प्रेम सार्वकालिक भावना आहे. ज्यांना समजली, ते माणूस म्हणून यशस्वी झाले. नाही समजले, ते राहिले त्याच चौकटीत. आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो, त्यावर ते अवलंबून असते. या सगळ्या गोष्टीतून काहीतरी वाद उकरून काढणारे आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे काम करतात. आपल्या संकुचित विचारांच्या इमारती भक्कम करू पाहतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे कळण्याइतपत शहाणपण असायला नको का?”

चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखवेल. त्यावर अविवेकाची काजळी पसरली असेल, तर विचारांची प्रतिमा सुस्पष्ट दिसेल तरी कशी? कलाकार समाजात दिसतं, घडतं ते दाखवायचा प्रयत्न करतो. समजा ते काल्पनिक असेलही, पण भविष्यात असे काही घडण्याची शक्यता नाहीच, असे आपण म्हणू शकतो का? समाजाकडे हे समजण्याइतकी प्रगल्भता नसावी का? विचार करण्याचं दान नियतीने साऱ्यांच्या ओटीत ओतले असेल, तर संदेहाचे प्रश्नच का उरावेत? भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचा ल.सा.वि. काढणे अवघड आहे, हे माहीत असणारी माणसे अपरिपक्व विचारांनी वर्तने असंभव. देशात जातीयता, धार्मिकता, भेदाभेदाच्या पलीकडे विचार करणारे आहेत, तसे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात वर्तणारेही आहेत. जातीयतेच्या बेगडी चौकटींमध्ये आत्मशोध घेणारी माणसेही आहेतच. जातीसाठी माती खावी म्हणणारेसुद्धा आहेत. धर्माच्या नावानं घडणारा धिंगाणा लोकांना बऱ्यापैकी परिचयाचा झाला आहे.

एकीकडे संविधानातून संपादित केलेल्या विचारांनी समतेचे सहजपणाने स्वागत करायचे आणि त्याच समाजाने जातींच्या तटबंदी भक्कम करायच्या. ही वर्तनातील विसंगती नाही का? जात विरहित समाजनिर्मितीचा उद्घोष करायचा आणि जातीपातीतच व्यवहार घडतील कसे, ते बघायचं, हे उघडं गुपित आहे. सैराटने खरंतर या जातीव्यवस्थेला धक्का दिला. कदाचित काहींना हे पचवणं अवघड गेलंही असेल, पण वास्तव काही विसरता येत नाही आणि नाकारताही येत नाही. नायक खालच्या जातीचा आणि नायिका उच्चकुलिन असणं सहजी पचनी पडणारं नसतंच. कारण स्त्रीविषयक बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच पुरुषी मानसिकतेचा राहिला आहे. चित्रपट काल्पनिक असतो, हे माहीत असूनही अशा प्रतिक्रिया प्रकटत असतील, तर याला कारण अद्यापही आमच्या मानसिकतेचे परगणे आहेत तसेच आहेत, हे असेल का? जातीयअभिनिवेशातून निर्मित अहं जोपासत आपल्या जगण्याची जात हीच ताकद आहे, असे मानणाऱ्या समाजातील मूर्खपणाच्या चौकटींना आर्ची-परशा सर्व ताकदीनिशी धडका देत राहतात. पण कुटुंब, गाव आणि समाजाची जात हीच ओळख त्यांच्या मार्गावर बुलंद बुरुज बनून उभी राहते.

व्यवस्थेच्या बुरुजांना ध्वस्त करताना अजूनही परिवर्तनप्रिय विचारांनी वर्तणाऱ्यांची ताकद कमी पडते आहे. सत्ता हाती असली की, मनावर संरजामी माज चढतो. पद, पैसा, प्रतिष्ठा एका हाती एकवटल्या की, व्यवस्था आपल्या तंत्राने वाकवता येते, हा समज दृढमूल होतो आणि हाच माज एखाद्या प्रिन्सला वर्गात मास्तराच्या थोबाडीत मारण्याइतपत बेदरकार बनवतो. बेमुर्वत बनवतो. अशा बेताल वागणाऱ्यांच्या वैचारिक विश्वातून सामान्य माणूस कधीच हद्दपार झालेला असतो. माणसापेक्षा आपले वैयक्तिक अहं त्यांना मोठे वाटतात. स्वातंत्र्योत्तरकाळात माणूस हीच एकमेव जात असेल, अशी अपेक्षा होती. पण ते एक स्वप्नंच राहिलं. आणि आतातर ते लक्ष खूप पुढे गेलं आहे. प्रिन्सच्या वर्तनाचे समर्थन करणारी मानसिकता आहे, तोपर्यंत उन्मत्त मनातल्या माजाला परंपरेने दिलेली स्नेहनिर्मित नाती दुय्यम वाटतीलच. सत्तेच्या झापडबंद पट्ट्या डोळ्यांवर बांधल्या असतील, तर फक्त उन्माद मोठा होतो. धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती म्हणून अंधार त्याचं प्राक्तन होतं. या अंधाराच्या भीतीतून पुत्रप्रेमापोटी तो विकल होत गेला; पण गांधारीने डोळे असून उजेड नाकारला आणि अंधाराची सोबत केली. पण तिलाही पुत्रप्रेमाचा मोह टाळता आला नाही. पुढचे संघर्ष टाळता आले असते. पण स्वार्थाची पट्टी डोळ्यांवर बांधली असेल, तर योग्य-अयोग्य समजणे अवघड होते. समाजानेही जातीयतेच्या स्वार्थाच्या अशाच पट्ट्या आपल्या भोवती बांधून घेतल्या आहेत का? असे झापडबंद चालत राहणे पुढच्या अनिष्ठाचे सूचन असते.

एकीकडे देश बदलत असल्याच्या वार्ता करायच्या; समतेवर, प्रगतीवर, काळाच्या बदलत्या परिमाणांवर मोठी मोठी भाषणे झोडायची आणि दुसरीकडे आपापले स्वार्थाचे परगणे पद्धतशीर परिपुष्ट करायचे. इभ्रतीचे स्वयंघोषित निकष निर्माण करून त्यांना सांभाळायचे. जातीपातीची कुंपणे बांधून स्वार्थकेंद्रित विचारांना आपलं समजायचं, हे वास्तव आहे. महाराष्ट्राला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे, म्हणून गोडवे गायचे आणि जातीयतेमुळे घडणाऱ्या अन्यायाविषयी व्यक्त होतांना निर्जीव व्हायचे. हा कोणता पुरोगामीपणा म्हणायचा? आर्ची-परशाच्या माध्यमातून सैराटने जातीपातींचे अंतर विसरून संवादाचा साकव सांधण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न केला आहे, असे म्हटले तर काय हरकत आहे? चित्रपटातील त्यांचे प्रेम कायद्याच्या परिभाषेत सज्ञान आहे. पण समाज अशाबाबतीत सुज्ञ कधी असतो? आर्चीच्या रूपाने डॅशिंग पोरगी व्यवस्थेच्या भिंतीना ध्वस्त करण्यासाठी उभी राहते. प्रसंगी सगळ्या सुखांचा त्याग करून भावनेच्या वादळावर स्वार होऊन धावते. पुढच्या वाटेवर टक्केटोणपे सहन करीत आपल्या प्रेमाची सोबत करीत राहते. कोसळते. हतबुद्ध होते. सावरते. उभी राहते. स्वप्ने पाहते. परिस्थितीशी दोन हात करते. आता सगळं नीट होईल म्हणून नव्या स्वप्नांची रांगोळी मनात रेखाटत राहते. अशा अनेक आर्ची आजही आहेत आपल्या समाजात, फक्त त्या अपयशी ठरतात एवढेच. आर्ची धीट आहे. ती बुलेट पळवते. ट्रॅक्टर चालवते. स्त्री म्हणून समाजाने आखून दिलेल्या परंपरेच्या वर्तुळाभोवती फिरणारी नाहीये. तिचं धीट असणं एकवेळ मान्य केलं जातं, पण स्वतःच्या जोडीदाराच्या निवडीबाबत निर्णय घेतांना जातीयतेच्या भिंती अहं बनून अडथळे होतात.

आपल्याकडील चित्रपटांमध्ये हिरो मार कधीच खात नाही. त्याने हाती घेतलेला दगड नुसता भिरकावला तरी दोनचार जण संपतात. गोळ्यांच्या अखंड वर्षावात त्याला साधं खरचटतदेखील नाही. हे बावळटपण आपण कितीतरी वर्षांपासून पाहत आहोत. आणि त्याला टाळ्याही वाजवत आहोत, पण सैराटमधील परशा वास्तवाच्या वाटेवर उभा आहे. त्याला साथ देणारे मित्र साधेच आणि सामान्यच आहेत. त्यांच्याकडे कोणतीही उन्मादक ताकद नाही. पण मित्रासाठी जीव टाकणं, प्रसंगी संकटाला आपल्या अंगावर घेण्याइतकं दृढपण त्यांच्याकडे आहे. त्यांचं वागणं उत्कट आहे. मैत्रीसाठी मनातल्या मनात तुटणं आहे. सपनीच्या मैत्रीचा सहवास, आनीची अबोल; पण मुग्ध सोबत आर्चीला आहे. आर्ची-परशाचं प्रेम पंचतारांकित कृत्रिमपणाच्या बेगडी चौकटीत गळ्यात गळे घालून फुलत नाही. ते गाव-शिवारात उमलणारं, वाढणारं आहे. गावमातीचा गंध घेऊन वाहणारं आहे. प्रसंगी परिस्थितीचे आघात सहन करून एकमेकांचा शोध घेणारं आहे. नवी स्वप्ने मनात कोरून आकांक्षांच्या क्षितिजावर नवा प्रकाश निर्माण करू पाहत आहे. पण परिस्थितीचा अविचारी अंधार त्यांचे गळे चिरतो. गाफीलक्षणी गाठून त्यांना संपवलं जातं. मनातील आशा, डोळ्यातील स्वप्ने, उद्याची उमेद सारंसारं काही एका क्षणी संपतं आणि रक्ताचे प्रवाह बनून वाहतं. सत्तेचा माज हरकतो, जातीयतेचा उन्माद बेभान होतो. प्रेम जिंकते; पण प्रेमी हरतात. त्यांना आपल्या स्वप्नांचे महाल उभे करण्यात यशही येते. पण दुर्दैवाने ते सुख क्षणिक ठरते. धावणाऱ्या प्रेमींचा माग काढत मृत्यू दारी येऊन उभा ठाकतो. जातीयअभिनिवेशाच्या वणव्यात एका उमलत्या आकांक्षेचा अंत होतो.

प्रेम परगण्याच्या वाटेने आपल्या आकांक्षांचं क्षितिज शोधू पाहणाऱ्यांवर असे किती आघात व्यवस्था करणार आहे कुणास ठाऊक? असे किती रूधिराभिषेक प्रेमाच्या वेदीवर घडणार आहेत, हे नियतीलाच माहीत. नियतीने ललाटी लेखांकित केलेल्या रेषांचे प्राक्तन प्रयत्नांनी बदलता येते असे म्हणतात; पण जात नावाचे वास्तव आम्हाला अद्यापही का बदलता येत नसावे? जात नावाचे अहं आहेत, तोपर्यंत रक्तलांच्छित अध्याय प्रेमग्रंथांच्या पानावर लिहिले जाणारच आहेत. आकाशसारख्या निष्पाप, निरागस पावलांचे रक्ताळलेले ठसे काळाच्या पटलावर उमटणार असतील, तर उत्क्रांतीच्या वाटेवरील सगळ्यात प्रगत जीव म्हणून माणूस उभा आहे, असे म्हणण्यात कोणते शहाणपण आहे? एकमेकांच्या सोबतीने निघालेल्यांच्या मनी विलसणाऱ्या स्वप्नांची रांगोळी अर्धवट राहणारचं आहे का? चित्रपटाचं समीक्षण नाही करत, पण शेवटचा दोनतीन मिनिटांचा सीन कोणत्याही संवेदनशील मनांमध्ये अस्वस्थता निर्माण करतो. सप्तरंगी स्वप्नांच्या प्रदेशात विहार करणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणतो. उदासपणाची काजळी चेहऱ्यांवर पसरत जाते. मनात कालवाकालव होते. आपण काय पाहत आहोत, हे सांगण्याइतपतही शब्द प्रकटत नाहीत. डबडबलेले डोळे मूक आक्रंदन करीत राहतात. चित्रपटगृहातून बाहेर पडणारी जडावलेली पावले सोबत भकासपण घेऊन घरचा रस्ता धरतात. पण हेही सत्य आहे की, दुसऱ्याच्या दुःखाने डबडबलेले डोळे संस्कृती जिवंत असल्याची खूण आहे. आवश्यकता आहे डोळ्यातले हे पाणी जतन करून ठेवण्याची.

Vaari | वारी

By // 19 comments:
 
गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने न चुकता वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. तेथे जावून नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास?...
 
वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं. सृष्टीतील साऱ्या जिवांची काहिली सुरु असते. सगळ्यांना नकोसा असणारा उन्हाळा ऐन उमेदीत असतो. चैत्र, वैशाख, जेष्ठाच्या पावलांनी चालत आलेल्या उन्हाच्या काहिलीत सगळेच कावून गेलेले असतात. त्रस्त करणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे पाऊस घेऊन येणार असतो. मनात काही आडाखे बांधलेले असतात. डोळ्यात काही स्वप्ने असतात. ती पूर्ण करण्याचा सांगावा घेऊन आषाढाचे आगमन होते. पश्चिम क्षितिजावरून एक गंधगार संवेदना सोबत घेऊन वारा उनाड मुलासारखा उधळत अंगणी येतो. त्याच्यामागे धावत येणाऱ्या पावसाचं धरतीवर आगमन होतं. मनात साठलेला पाऊस आकाशातून बरसत राहतो. डोंगरकड्यावरून उड्या मारत मुक्तपणे हुंदडतो. शेतशिवारात येऊन साठतो. उताराच्या वाटेने पळत राहतो. वेडीवाकडी वळणे घेऊन वाहतो. झाडाफुलापानावरून निथळत राहतो.

शेतशिवारातून कामांची एकच धांदल उडते. उद्याच्या भविष्याची बिजे धरतीच्या कुशीत पावसाच्या साक्षीने पेरली जातात. सगळ्यांनाच घाई झालेली. पेरणीची वेळ साधण्यासाठी सगळीच जमवाजमव चाललेली. तुंबलेली कामं एकेक करून हातावेगळी होऊ लागतात. दिवसाचे प्रहर अपुरे पडायला लागतात. कामाच्या धबडग्यात आषाढ मध्यावर येतो तशी वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची आस जागू लागते. डोळे पंढरपुराकडे लागलेले; पण कामांचा रगाडा काही संपायचे नाव घेत नाही. दूर क्षितिजाकडून येणाऱ्या रस्त्यावरून माणसांच्या आकृत्यांचे काही ठिपके दिसू लागतात. कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळा आणि मुखी विठ्ठल नामाचा सोहळा घेऊन भक्तांचा मेळा पंढरपूरच्या वाटेने सरकत राहतो. मनातील भक्तीभाव उसळी घेतो आणि आणखी एक ठिपका त्या मेळ्यात सामावून जातो.

वारकरी आणि विठ्ठलाचे वर्षानुवर्षाचे एकरूप झालेलं नातं. वारी मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित आहे. भक्तीचा सहजोद्गार बनून अनेक वर्षांपासून भक्तांची मांदियाळी वारीच्या वाटेने चालते आहे. या वाटेने चालणाऱ्या सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. त्यांच्या आयुष्याचा उर्जास्त्रोत. तो त्याच्या विचारातच नाहीतर जगण्यात सामावून एकरूप झालेला.

वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणी वारीला निघालेला नसतो. काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने विठ्ठल भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. प्रवासात मिळेल तो घास-तुकडा खातो. सांज समयी आहे तेथे मुक्कामाला थांबतो. दिली कुणी ओसरी देह टेकवायला, तर तेथेच अंग टाकतो. नाहीच काही असले तर गावातल्या मंदिराचा ओटाही त्याला विश्रांतीसाठी पुरेसा असतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचलेला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

काळ बदलला तशी माणसांच्या जगण्याची प्रयोजनेही बदलली. भौतिक सुखांनी माणसांच्या जगात आपला अधिवास निर्माण केला. पण वारी अजूनही तशीच आहे, आपलं साधेपण मिरवणारी. विज्ञाननिर्मित साधने हाती आल्याने कदाचित तिच्यात काळानुरूप सुगमता आली असेलही; पण परंपरेने वाहत येणारे सहजपण आजही तिच्यात कायम आहे.

मनाला ओढ लावणारं वारीत असं काय असावं? माणसं कशाचीही तमा न करता अनवाणी पायांनी वारीच्या वाटेने का धावत राहतात? त्यांच्यात हे सगळं कुठून येत असेल? वारीत एकवटलेली माणसं पाहून हे प्रश्न मनात उगीच भिरभिरायला लागतात. विज्ञानप्रणित निकषांना प्रमाण मानून यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून फार काही हाती लागण्याची शक्यता नसते. भक्तांच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावकल्लोळातून शोधून पाहिले की, ही कोडी उलगडत जातात. ही सगळी श्रद्धावंत माणसं वारीच्या वाटेने वावरताना मनातला अहं गावाची वेस ओलांडतानाच मागे टाकून येतात आणि माणूस म्हणून एक होतात. हे एकरूप होणं त्यांच्या श्रद्धेचं फलित असेल का?

वारी साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, तुमच्याकडील सत्तेची वस्त्रे विसरून वारीत विरून जात असाल, तर सगळ्यांनाच माउलीरूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते. मनात निर्माण झालेलं मीपणाचं बेट या वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण. चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दुःखं दिमतीला घेऊन आलेली असतात. कुणाचं शेतच पिकलं नाही. कुणाचा बैल ऐन पेरणीच्या हंगामात गेला. कुणाचं शेत कर्जापोटी गहाण टाकलेलं, तर कुणाच्या लेकीचं नांदणं पणाला लागलेलं. नाना तऱ्हेची दुःखं सोबत घेऊन भक्त पांडुरंगाला भेटायला आलेला असतो. वारीसोबत वावरतांना अनोळखी मने संवाद साधतात. संवादाचे साकव उभे करून आपलेपणाचा प्रवास घडत राहतो. आपली, त्यांची सुख-दुःखे एकमेकांना सांगितली जातात. ऐकली जातात. मनात लपवलेले दुःखाचे कढ वाटून हलके होत जातात. जगात केवळ मलाच दुःखे, वेदना, समस्या नाहीत. ही जाणीव होऊन जगण्याचं बळ वाढत जातं. माणसाला आपल्यातलं आणि माणसातलं माणूसपण कळत जातं आणि जगण्याची प्रयोजने अधिक गडद होत जातात.

विठ्ठल सर्वसामान्यांचा समन्वयवादी देव आहे. माणसांचं रोजचं अवघड जगणं सुघड करणारा. रोजच्या नव्या मरणाला सामोरे जाणाऱ्या माणसांच्या मनात जगण्याचं स्वप्न पेरणारा. खरंतर दुःखाला ना नाश, ना अंत. माणसं कधी ती स्वतःहून ओढवून घेतात, कधी दुःखंच आपल्या पावलांनी चालून येतात. या साऱ्या कलहात संसाराचा सागर सहिसलामत पार करून पैलतीर गाठणं अवघड असल्याची भक्तांची समजूत झालेली. भवसागर कमरेएवढ्या पाण्याइतकाच तर आहे, तो पार कर, पैलतीर नक्कीच गाठशील, असेच काहीतरी कमरेवर हात ठेऊन खचलेल्या जिवांना विठ्ठल सूचित करीत असावा. विठ्ठल महाराष्ट्राचा सामाजिक देव. ना त्याच्या हातात कोणती आयुधे, ना कोणती अस्त्रे-शस्त्रे. भक्ताला तो हेच सांगत असावा की, तुझं नितळ, निर्मळ मन हेच जग जिंकण्याचं आयुध आहे, ते सांभाळलं की पुरे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकलंस तरी खूप झालं.

श्रद्धाशील अंत:करणातून निर्मित आस्थेने भक्तीचे शिखर गाठणारे आहेत, तसे भक्तांच्या भोळेपणाचा वापर करून स्वार्थ साधणाऱ्यांचीही जगात कमी नाही. ते कालच होते असे नाही, तर आजही आहेत. अनेकांचे अनेक देव-दैवतं असतात. माणसं त्यांच्या कृपाकटाक्षासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत धावाधाव करीत राहतात. कुणी मंत्रतंत्र जागराने ईप्सित साध्य करू पाहतात. कुणी व्रतवैकल्य, जपतप, अनुष्ठानांच्या माध्यमातून सुखाचा सहवास शोधू पाहतात. या साऱ्या धडपडीने सुखं आपल्या अंगणी वास्तव्यास येतात का? हा साधासा प्रश्न भावनांच्या अवेगावर स्वार झालेल्या भक्ताकडून विचारायचा राहूनच जातो. प्राप्त परिस्थितीचे परिशीलन न करता तो सुखाच्या मृगजळामागे धावत राहतो.

वंचित, उपेक्षित, अव्हेरलेल्या जिवांचा जगण्याचा एकमेव आधार श्रद्धा असते. त्यांच्या श्रद्धाशील विचारांचा फायदा घेणारे स्वार्थपरायण माणसे जगात अनेक आहेत. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित युगात ही स्थिती असेल, तर पाच-सहाशे वर्षापूर्वी समाजाचं चित्र काय असेल? अडले-नडलेले जीव सारासार विवेक हरवून बसतात. विवेक हरवलेली माणसे विचार विसरतात. कृती त्यांच्यासाठी दूरचा परगणा ठरते. विवेकी मार्गाने वर्तणाऱ्या कोण्या द्रष्ट्याची नजर समाजातील दुरितांकडे पडणे अशावेळी आवश्यक असते. संतांनी विवेक जागराचे काम केले. नाडल्या जाणाऱ्या समाजाकडे आणि अज्ञाननिर्मित श्रद्धांकडे ही विवेकी माणसं डोळसपणे पाहत होती. लोकांना त्यांच्या दुःखाचे कारण विशद करून सांगत होती. संतांनी विवेक विसरलेल्यांच्या मनात विचाराची बिजे रुजवली. विवंचनेत जगणाऱ्या भक्ताला विवेकी भक्तीमार्गाने नेऊन स्वतःची ओळख मिळवून दिली. सामाजिकस्तरावर स्वतःची कोणतीही ओळख नसणाऱ्यांना विठ्ठलाच्या रूपाने आधार गवसला. भागवतभक्तीच्या भगव्या पताका मुक्तीचे निशाण बनून फडकल्या. येथील मातीचा गंध लेऊन वाहणारा विचार एकवटला. साऱ्यांच्या अंतर्यामी समतेचा एकच सूर उदित झाला. एकत्र आलेली पावले चालत राहिली पंढरपूरच्या वाटेने, मनात श्रद्धेचा अलोट कल्लोळ घेऊन.

संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भक्तीच्या पायावर भागवतधर्माची इमारत उभी राहिली. संत तुकारामांनी तिच्यावर कळस चढवला. भागवतसंप्रदायाची ही सगळी व्यवस्था उभी आहे श्रद्धेच्या पायावर. जगण्याची साधीसोपी रीत संतानी सामान्यांच्या हाती दिली. जातीयतेचे प्राबल्य असलेला तो काळ. विषमता पराकोटीला पोहोचलेली. माणसातील माणूसपण नाकारणाऱ्या मानसिकता प्रबळ झालेल्या. या विपरीत विचारांच्या वर्तुळांना ओलांडून अठरापगड जातीजमातीची माणसे भागवतधर्माचे निशाण हाती घेऊन एकत्र आली. सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी समाजात समताधारीत विचार रुजावा म्हणून सामाजिकक्रांतीचं रणशिंग फुंकलं. संत तुकारामांनी सामान्यांच्या आयुष्यात सन्मानाने जगण्याचा विचार दिला. समतावादी विचारांची गुढी उभारणाऱ्या संतांच्या मांदियाळीने माणसातल्या माणूसपणाला साद घातली. माणसं स्वतःच स्वतःचा शोध घेऊ लागली. जाग्या झालेल्या विचारांचे वारे मनामनातून वाहू लागले.

समाजातील मूठभर मान्यवरांनी निर्माण केलेल्या प्रतिष्ठेच्या परिघाबाहेर आपलं ओंजळभर अस्तित्व सांभाळून जगणाऱ्या माणसांच्या मनात बदललेल्या विचारांचे पडसाद उमटू लागले. भक्तिमार्गाने आत्मसन्मान शोधू पाहणाऱ्या माणसांची पावले पंढरपूरच्या वाटेने वळती झाली. या वाटा समतेच्या दिशेने आणि समन्वयाचा मार्गाने चालत राहिल्या. तत्कालीन समाजाचा परिवेशच सीमांकित होता. त्यात परिवर्तन घडवून आणणे एक अवघड काम होते. दिवा पेटवून रात्रीचा अंधार थोडातरी कमी करता येतो. पण विचारसृष्टीला लागलेलं ग्रहण सुटण्यासाठी परिस्थितीत परिवलन घडून येणे आवश्यक असते. समाज संकुचित विचारांच्या वर्तुळातून पुढे सरकणे आवश्यक होते. सामान्यांच्या विचारकक्षेत असणारा अंधार दूर करण्यासाठी संतांनी सद्विचारांचे पलिते प्रदीप्त करून पावलापुरता प्रकाश निर्माण केला. संतांच्या लेखणी-वाणीतून अभंगसाहित्य प्रकटले. त्याचे पडसाद समाजजीवनावर प्रतिबिंबित होऊ लागले.

भागवत संप्रदाय वर्धिष्णू होण्यामागे महत्त्वाचे कारण त्यात असणारी सर्वसमावेशकता आहे, असे म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत विसोबा, संत नरहरी, संत सावता, संत सेना, संत चोखामेळा अशी कितीतरी नावे पूर्वसुकृताच्या पुण्याईची, सामाजिक मान्यतेची कोणतीही लेबले सोबत नसताना भक्तीचा प्रवाह बनून लोकगंगेच्या पात्रातून वाहत राहिली. समाजमनाला आकार देत राहिली. कोणत्याही समाजाला शासकापेक्षा शांतता आणि समावेशकता कोणत्याही काळी अधिक महत्त्वाची वाटते. परकीय सत्ताधिशांच्या आक्रमणांनी, त्यांच्या सत्ताकाळांनी देशाचे नुकसान केले असेल-नसेल, त्यापेक्षा अधिक नुकसान विषमतेने कधीकाळी केले आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. संघर्ष राजकीय असेल तर शत्रू समोर असतो आणि माहीतही असतो. पण समतेच्या संघर्षात स्वतःशीच लढायचे असते. मनात घर करून वास्तव्यास असणाऱ्या वैगुण्यांशी दोन हात करायचे असतात. संतांचा सगळा संघर्ष समतेच्या जागरासाठी होता. संतांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. वंचनेच्या वर्तुळात बंदिस्त असणाऱ्या समाजाला मी कोण आहे? हे विचारण्याएवढं त्यांनी मोठं केलं. हाती शस्त्रे घेऊन लढणे हा काही अन्यायविरोधात एल्गार ठरत नाही. कधीकधी लेखणीसुद्धा खड्ग बनत असते. संतांच्या लेखणीने नेमके हेच काम केलं आहे. त्यांच्या प्रतिभेतून निर्मित अभंगसाहित्य संघर्षात टिकून राहण्याचं अभंगपण देत होते. किंकर्तव्यमूढ झालेल्या लोकांच्या विचारात प्राण फुंकत होते. सामान्यांसाठी तो स्वजाणिवेचा सहजोद्गार होता.

विठ्ठल सर्वसामान्यांचा हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक. तो साऱ्यांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायासप्रयास करायची आवश्यकताच नाही, हे सांगतांना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, त्याच्या गळा माळ असो नसो.’ भक्ताची भगवंत भेटीसाठी असणारी पात्रतासुद्धा हीच. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे गणवेश म्हणून परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठातून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्यासाठी शास्त्रीय संगीताचा क्लास लावायची गरज नसते. हातात टाळ असला तर उत्तमच, नसला तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता माळी कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदामुळाभाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठल नामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता.

भक्तांची कामे करण्यात कोणतेही कमीपण विठ्ठलास कधी वाटले नाही. तो संत जनाबाईंच्या सोबत दळण दळत होता. संत गोरोबांच्या घरी मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवण्यात त्याला आनंद मिळत होता. संत चोखोबांच्या सोबत मेलेली गुरे ओढत होता. संत रोहिदासांना चांमडं रंगवून देत होता. संत कबीरांचे शेले विणीत असे. म्हणूनच की काय समाजातील साऱ्यांना तो आपला आणि आपल्यातील एक वाटत असे. विठ्ठलाने भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे व्रत कधी टाकले नाही. या सगळ्या गोष्टी कदाचित विज्ञानयुगात कपोलकल्पित वाटतील. विज्ञानाच्या परिभाषेत असंभव वगैरे वाटतील, हे खरंय. पण विज्ञानाचा प्रदेश जेथे संपतो तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो, हे वास्तवही नजरेआड करून चालत नाही. भक्त कोणत्याही युगात वास्तव्य करणारे असोत, त्याच्या जगण्याचे सारे व्यवहार श्रद्धापूर्वक अंतःकरणातून उदित झालेल्या भक्तिभावाने सुरु होतात आणि इच्छित दैवताच्या दर्शनात विसर्जित होतात. महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या श्रद्धा विठ्ठल चरणी समर्पित आहेत. श्रद्धेत डोळसपणा असेल तर अशा भक्तीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. वास्तवाच्या वाटेवर प्रवास करताना श्रद्धाशील अंतःकरण कोणतातरी आधार शोधत असते. त्यांच्या जगण्याला आश्वस्त करणारा आधार विठ्ठल होत असल्यास संदेह निर्माण होण्याचे कारण नाही. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ हे संत नामदेवांचे म्हणणेही अशा भूमिकेत खरेच ठरते. विठ्ठलभक्तीचे साध्यही ज्ञानदीप प्रज्ज्वलित करणे हेच आहे. भक्तीतून भावनांचा जागर करीत माणसांच्या विचारांच्या कक्षा विस्तारत नेणे हेच संतांच्या साहित्याचे, प्रबोधनाचे उद्दिष्ट होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासून वारीचा प्रघात असल्याचे म्हटले जाते. जे काय असेल ते असो; पण गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने न चुकता वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. तेथे जावून नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास? कदाचित आपल्या पाठीशी पांडुरंग उभा आहे आणि तो आपणास जगायला प्रयोजने देतो, असे त्यांना वाटत असेल का? कारणे काहीही असोत, आषाढ मासाचा प्रारंभ झाला की, आजही मराठी माणसाचे मन पंढरपुराकडे धाव घेते एवढं मात्र नक्की. विठ्ठलभक्तीचं हे बीज जणू काही त्याच्या रक्तातच पेरून आलेलं असतं. परिस्थितीच्या अवकाशात ते वाढत जातं. दिसामासाने वाढणाऱ्या भक्तीच्या या रोपट्याला आलेलं फळ म्हणजे विठ्ठल, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

Vartulatale Ani Vartulabaherache | वर्तुळातले आणि वर्तुळाबाहेरचे

By // 7 comments:
आम्ही काही शिक्षक उत्तरपत्रिका तपासत बसलो होतो. या कोंडाळ्यात बसून आमचे एक सहकारी शिक्षक त्यांच्याकडील उत्तरपत्रिका तपासत आहेत. त्यांचं लाल रंगाच्या रेषांनी उत्तरपत्रिका रंगवण्याचं काम सुरू आहे. ‘जसे कर्म तसे फळ’ न्यायाने गुणांचं दान उत्तरपत्रिकेच्या ओटीत ओतले जाते आहे. मध्येच एक उत्तरपत्रिका त्यांच्या हाती लागते. ती पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पालटायला लागतात. त्यांना आश्चर्याचा अनपेक्षित धक्का बसतो. गठ्ठ्यातून उत्तरपत्रिका वेगळी काढून सर्वाना दाखवत ते म्हणाले, “सर, या महोदयाची गुणवत्ता कोणत्या रंगांनी अधोरेखित करू मी आता? याला, याच्या शैक्षणिक प्रगतीला कसं गौरवान्वित करावं? तुम्हीच सांगा, याचं शैक्षणिकविश्व कसं फुलवायचं?” त्यांचं उद्विग्न सुरातलं बोलणं ऐकून इतर विषयावर सुरू असणारे आमचे चर्चेचे गुऱ्हाळ थांबले. साऱ्यांच्या नजरा त्यांच्या बोलण्याकडे केंद्रित. त्यांच्या हाती असलेली उत्तरपत्रिका विस्फारलेल्या नेत्रांनी पाहत राहिले. सगळेच निःशब्द.

थोडावेळ शांतता. त्या नीरव शांततेला छेद देत एक शिक्षक म्हणाले, “सर, हे आपल्या शैक्षणिक प्रगतीचे मधुर फळ आहे. अहो, असं घडणं तुम्ही फार काही मनास लावून घेऊ नका! आत्तापर्यंत प्रगतीच्या शिड्या हा जशा चढत आला, तशी आणखी एक पायरी वर चढवा याला. नाहीतरी कोणाला नापास करायचेच नसल्याने, धोरणाशी प्रतारणा ठरेल तुमचं वागणं. पाठवा पुढे! बघतील पुढचे रस्ते याला कसं घडवायचं, वाढवायचं की अडवायचं ते!”

आणखी एक शिक्षक बोलते झाले. म्हणाले, “सर, कसं शक्य आहे हे? नापास करायचेच नाही, असे कोण म्हणतो? असंच काही नाही बरं का! हां, एक मात्र खरं नापास करायचंच असेल, तर याच्या अभ्यासाचं पुनर्भरण करायला लागेल तुम्हां लोकांना. यासाठी आहे का तुमची मानसिक तयारी? असेल तर बघा, अन्यथा आपलं धोरण यशस्वी समजून मुकाट्याने चाकोरीत चला.”

या सगळ्या प्रकाराचा एवढावेळ मूक साक्षीदार असणारे एक शिक्षक म्हणाले, “सर, येथपर्यंत पोहोचलाच कसा हा? याला येथे आणून टाकणाऱ्यांचा खरंतर सत्कारच करायला हवा. शासनाने अध्ययन-अध्यापनविषयक काही धोरणे आखली असतील. ती अंमलात आणायची म्हणून दिशा निर्धारित केली असेल. उद्दिष्टसाध्यतेच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी पथ तयार केला असेल, तर या विचारांना तिलांजली देणारा कोणीतरी असेलच ना! त्याला व्यवस्थेने जाब विचारायला नको का?”

त्यांचं बोलणं मध्येच थांबवत आणखी एक शिक्षक म्हणाले, “सर, तुमचा आदर्शवाद व्यक्त होण्यापुरता चांगला आहे, पण प्रत्यक्षात आणणे एवढे सोपे आहे का हो? हे सगळं करायचं तर मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? आहे हे करायची मानसिकता आपल्याकडे?” त्यांनी आपला युक्तिवाद आमच्या अंगावर फेकला.

“सर, तुम्ही चुकता आहात. मानसिकता, इच्छा, आशावाद, आदर्शवाद सारंसारं आहे, पण परंपरांचे पायबंद पडल्यावर तुम्ही तरी काय करणार आहात? काहीही भव्यदिव्य न करता ज्यांना प्रशंसेस पात्र होण्याची कला अवगत असते, ते कशाला धोरणांचा विचार करणार आहेत. त्यांचे धोरण एकच, डोळ्यांना झापडं बांधून कुणीतरी दाखविलेल्या मार्गाने चालणे. अशा मानसिकतेत धोरणं असली काय अन् नसली काय, त्यानी काय फरक पडणार आहे?” आणखी एका शिक्षकाचे मत विचार बनून प्रकटले.

संवाद पुढे सरकत होता. चर्चेचा सगळा रोख एकाच दिशेने धावत होता. धोरणे उदंड झाली, पण अंमल करणारे हात हरवत चालले आणि दिशा दाखवणारे दुर्मिळ होतायेत. अर्थात, एखाद दोन बरेवाईट अनुभव गाठीशी असणाऱ्यांकडून व्यक्त झालेली अशी मते समाजात वावरताना कानी येतात. पण प्रत्यक्षात दिसतं तितकं सगळंच काही वाईट घडत नाहीये, हाही अनुभव जमेस असतो, म्हणून ते फारसं मनावर न घेता सोडून देतो. तरीही मनात एक संदेह असतोच. व्यवस्थेततून व्यक्त होणारी अशी मते आपल्या शैक्षणिक प्रगतीच्या दिशा प्रवाहपतित होत चालल्याचे निर्देशित करतायेत का? अर्थात, या प्रश्नांची उत्तरं अशाच कोणत्यातरी अनुभवांच्या, मर्यादांच्या आकलनातूनच प्रकटतात आणि मर्यादांच्या चौकटीतूनच समजून घेतली जातात हेही सत्यच.

कधीकाळी आपल्या देशातील शिक्षणक्षेत्र संख्यात्मक प्रगतीच्या निकषांवर थिटे असेल. त्याला सार्वत्रिकतेचा परीसस्पर्श भलेही झाला नसेल, पण गुणवत्ता त्याचा केंद्रबिंदू होता असं म्हटलं जायचं. हे एका सीमित अर्थाने खरं मानलं तरी त्यात काही अंगभूत दोष होते, हे वास्तव स्वीकारावे लागतेच. परीक्षा नावाच्या वर्तुळाभोवती ही शिक्षणव्यवस्था फिरत राहिली. आज माणूस बदलला, तशी त्याच्या जगण्याची उद्दिष्टेही बदलत आहेत. अंतरंगापेक्षा बाह्यरंगालाच जास्त महत्त्व आलं आहे. बेगडी चमक यशाचं परिमाण ठरू लागली आहे. कधीकाळी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षा आयुष्याचे सार्थक वाटायच्या. जीवनाच्या या निर्णायक वळणावर गुण किती मिळतील, याची साऱ्यांना प्रचंड उत्सुकता असायची. सांप्रत गुणवत्तायादीचा ताण हलका झाला. यादी गेली हे चांगलेच. पण गुणवत्तेचे काय? गुणांच्या दिशेने धावणारे सगळेच; पण गुणवत्तेच्या वाटेने पळणारे अपवादच, असे का? अंतर्गत गुणांचा आयता रतीब शिकणाऱ्याला कागदावरचा ‘पदवीधर’ बनवतो; पण ‘विद्याधर’ बनायचे राहूनच जाते, त्याचे काय? आपणास काय हवे, या प्रश्नाच्या उत्तराचा विकल्प शेवटी समाजालाच निवडावा लागतो. ज्ञानसंपन्न पिढी असणं, हे या प्रश्नाचं उत्तर असेल, तर सध्या समाजात दिसणारी मूठभर हुशारांची पुस्तककेंद्रित शैक्षणिक प्रगती हीच आपल्या धोरणांची यशस्विता समजावी का? आपण ज्ञानाचे आणि गुणांचे विलीनीकरण केले, पण अंगभूत गुणवत्तेचं संवर्धन करायचं विसरलो आहोत का?

विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असेल, तर शिक्षक त्याचा मानबिंदू असावा. शिक्षणप्रणालीतील घटकांची मान उंचावणारी धोरणे व्यवस्थेत अबाधित असणे आवश्यक असते. शिक्षणाविषयी आस्था निर्माण करण्याचे उत्तरदायित्व कुणाचे? शिक्षकाची अस्मिता टिकवण्याची जबाबदारी कुणाची? या प्रश्नांची उत्तरे आपण साऱ्यांचीच, असे का असू नये? शिक्षकाची अस्मिता मुख्याध्यापकाला आपली वाटावी. मुख्याध्यापकाचा सन्मान व्यवस्थापनाला आपला मान वाटावा आणि या साऱ्यांचा समाजाला अभिमान वाटावा. पण दुर्दैवाने या साखळीतील प्रत्येक घटक सुटासुटा होत चालला आहे. समाजाला शिक्षकाचा पेशा दिसतो. व्यवस्थापनाला शिक्षकाची कार्यप्रणाली, मुख्याध्यापकाला मर्यादांचे वर्तुळ, तर शिक्षकाला परिस्थितीचा परिघ.

विद्यमान वातावरणात अध्ययन-अध्यापनाची मानसिकता घडवणारी प्रणाली हरवत चालल्याचे बोलले जातेय, हे खरं असेल का? कधीकाळी डी. एड., बी. एड. करणे प्रतिष्ठेचे समजले जात असे. सांप्रत स्थितीत या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे मोठेच धाडस असायला लागते. समजा काहींनी मनाचा हिय्या करून या प्रांगणात येण्याचे ठरवले आणि प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयात गेले. प्रवेश घेतेवेळीच त्यांच्या हाती पडणाऱ्या माहितीपत्रकात ‘नोकरी- नो गॅरंटी’, असा शासनप्रणित वैधानिक इशारा लिहिलेला असेल तर काय होईल? आश्चर्य वाटले ना! पण हे वास्तव आहे. शासनाचा तसा मानस असल्याची बातमी अलीकडेच वाचनात आली. अशी धोरणे अंमलात येणार असतील, तर आपण प्रगतीच्या वाटेने कुठून कुठे चाललो आहोत, याचे परिशीलन होणे अगत्याचे नाही का? अध्यापक घडवणारी सगळीच महाविद्यालये प्रतिष्ठेच्या प्रांगणात अधिष्ठित झालेली होती असे नाही. पण आहेत त्यांचे आत्ताचे अवकाळी मरण हा आपल्या शैक्षणिक धोरणांचा परिपाक नाही का?

शिक्षकी पेशात खरंतर स्वायत्तता, स्वयंपूर्णता असावी. पण दुर्दैवाने असे चित्र अस्तित्वात असल्याचे प्रत्यक्षात किती दिसते? सुमार गुणवत्ता आणि संकुचित प्रज्ञा असणाऱ्यांच्या हातात शिक्षकांच्या कार्याच्या संयोजनाची सूत्रे असतील तर स्वातंत्र्य, स्वाभिमान, समर्पण यासारख्या शब्दांना अर्थच उरत नाही. शिक्षक विचारांनी पराभूत होणे व्यवस्थेचे अपयश असते. शिक्षकाला उभं करून उद्दिष्टांच्या दिशेने नेण्यासाठी प्रेरित करणारे हात दिमतीला असतील, तर वाळवंटातसुद्धा नंदनवन फुलवण्याची किमया तो करू शकतो. मात्र त्यासाठी प्रेरणेचे सतत सिंचन घडत राहणे आवश्यक असते. अस्मिता हरवलेला, कणा मोडलेला शिक्षक व्यवस्थेत घडणार असेल तर शिक्षणाचं भविष्य काय असेल?

शिक्षण सेवकाचे ‘सहायक शिक्षक’ नामकरण करून परिस्थितीत परिवर्तन घडत नसते. उच्चविद्याविभूषितांना एखाद्या मजुरापेक्षा कमी वेतनावर काम करायला भाग पाडणारी धोरणे गुणवत्तेला मारक ठरतात, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. ज्ञानाचे दीप प्रज्ज्वलित करण्यासाठी हाती आस्थेची पणती घेऊन निघालेल्या पांथस्थाला परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून संरक्षणाचा पदर नसेल, तर पेटलेल्या वाती विझणारच. भरल्यापोटी जगाला शहाणपण शिकवता येते; पण ते अंगीकारता येत नसेल, तर शुष्क कर्मयोग कोणत्या कामाचा? कायद्याने समाजातील वेठबिगारी हद्दपार झाली; पण शिक्षितांच्या जगात नव्या परिभाषेनेमंडित असलेली हीसुद्धा वेठबिगारीच नाही का? शिक्षकांच्या पेशाचा सन्मान करण्यासाठी कुठल्यातरी पुराणग्रंथातून त्याच्या महतीची स्तोत्रे शोधून आणायची, त्याला गुरुवर्य म्हणून संबोधायचे, गुरुपौर्णिमेला त्याच्या चरणी नतमस्तक व्हायचे. त्याचा गौरव करायचा आणि नंतर मर्यादांच्या दोरांनी व्यवस्थेच्या खुंट्यावर आणून बांधायचे, ही कसली मानसिकता विद्येच्या प्रांगणात रुजते आहे कोणास ठाऊक?

मोफत सार्वत्रिक शिक्षण कायद्याच्या वाटेने शिक्षण सामान्यांच्या दारापर्यंत आले. पण धोरण म्हणून हे सगळं स्वीकारताना यातील बाधा बनणाऱ्या फटी शोधून बुजायच्या कशा, याचा किती विचार झाला आहे? शिक्षणाचे सर्वशिक्षा अभियान झाले. अभियानाचे यान वेगाने स्वप्नांच्या अवकाशात झेपावले, पण यशसिद्धी किती? या प्रश्नाने आपण परत जमिनीवर येतो. अभियानाचे यशापयश वादाचा, चर्चेचा विषय असू शकतो. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार वेगात झाला, पण उद्दिष्टे तेवढ्याच वेगात साध्य झालीत का? या प्रश्नाचे उत्तर आपापल्या वकुबानुसार, आकलनानुसार जाणकारांनीच शोधणे संयुक्तिक ठरेल.

शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये देशाचे भविष्य आकारास येते आहे, असे म्हणणे कितीही चांगले वाटत असले, तरी ज्या शाळांना शाळा म्हणण्यासारखे त्यांच्याकडे अद्याप काहीच नाही त्यांचे काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. डोक्यावर धड छत नाही, भिंती नाहीत. फळा आहे तर खडू नाही. हे आहे तर शिक्षक नाहीत आणि हे सगळं आहे तर पुरेसे विद्यार्थीच नाहीत, अशा शाळांचे भविष्य काय? अपुऱ्या सुविधांसह कार्यरत असणाऱ्या शाळांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. कितीतरी शाळांमध्ये पुरेशीच काय, पण किमान सुविधा, साधनेही नसतील, तर त्यांना शाळा या शब्दाच्या व्याख्येत कसे अधिष्ठित करता येईल? अजूनही शेकडो शाळांकडे स्वच्छ पाणी, प्रसाधन गृहे, क्रीडांगण, अध्ययन साहित्य आदी सुविधा उपलब्ध नसतील तर दोष कोणाचा? चार चांगल्या शाळा हा गुणवत्तेचा निकष होऊ शकत नाहीत. भले तर आपण त्यांना मॉडेल म्हणू शकतो. एकेक शिक्षक दोन-तीन वर्ग एकत्र सांभाळतो, तेथे गुणवत्ता कशी काय सांभाळली जात असेल, या प्रश्नाचं उत्तर अजूनही आपला समाज शोधतोच आहे. अर्थात, संबंधित शाळांच्या आणि शिक्षकांच्या गुणवत्तेवर, क्षमतांवर प्रश्नचिन्ह नाही रेखांकित करायचे. पण गुणवत्तेचे संवर्धन हे न उलगडणारे कोडे आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाने परिस्थितीत कायापालट होऊ शकतो हे मान्य; पण साध्यापर्यंत पोहचायचे तर साधनेही सक्षम असायला नकोत का? स्वातंत्र्य मिळवून एकोणसत्तर वर्ष झाली तरी आपल्या देशाचा शिक्षणावरचा खर्च साडेतीन-चार टक्क्यांवर रेंगाळतो आहे. शिक्षण ही भविष्यातील गुंतवणूक असते, असे म्हणतात. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सचा पत्रकार थॉमस फ्रीडमन म्हणाला होता, ‘जेवण वेळेवर करावं म्हणून आम्ही लहान असताना आमचे आईबाप आम्हाला भीती घालताना म्हणायचे, ‘चीनची मुले येतील आणि तुमची भाकरी पळवून नेतील. आहे ते लवकर खावून घ्या.’ आता आम्ही आमच्या मुलांना सांगतो, ‘भारतातली मुले येतील आणि तुमच्या नोकऱ्या पळवून नेतील.’ भाषणात टाळ्यांसाठी हे म्हणणं ठीक; पण वास्तव काय सांगते? आपला उच्चशिक्षणाचा आलेख अठरा-एकोणावीस टक्क्यांच्या वर अजूनही चढत नाहीये. शंभरातील अठरा-एकोणावीस या शिखरावर पोहचले, मग राहिलेल्या बाकीच्यांचे काय? शिखराकडे पाहताना त्याची उंची नजरेत भरते, पण पायथा दुर्लक्षित राहतो. आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवले त्याकाळी आपल्याकडे जेमतेम वीस-बावीस विद्यापीठे होती. आज त्यांची संख्या सातशेच्या आसपास आहे. येथे हजारोच्या संख्येने मुलेमुली शिकतायेत, पण गुणवत्ता मात्र शेकड्यानेच, असे का?

एकविसाव्या शतकाच्या आपण गप्पा करतो, मात्र या शतकाची चाल ओळखून आपण असे किती शोध लावले, ज्याने जगाच्या वर्तनाची दिशाच बदलवून टाकली. कुणी कुठे काही नवे शोधले की, हे तर आमच्याकडे आधीच आहे. आमच्या पुराणात सांगितले आहे. शोधून पहा, असे समर्थन होते. आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती, ग्रहताऱ्यांचे ज्ञान अवगत होते. विमाने पण होती म्हणायचे. मग असे असेल तर अनेक दशके तुम्ही बैलगाड्या, गाढव-घोडे का वापरत होता, असा प्रश्न कोणासही पडत नसावा का? देशाची लोकसंख्या वाढली. ओघानेच शिकणाऱ्यांची संख्याही वाढली. पण शिकणाऱ्यांची संख्या वाढली म्हणून सगळीकडेच गुणवत्ता वाढली का? उच्चविद्याविभूषितांची रोजगाराच्या शोधार्थ वणवण सुरू आहे. ज्यांच्या मागे पद, पैसा, प्रतिष्ठेचे वलय आहे, ते लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन सत्तेची सिंहासने खरेदी करीत आहेत. ज्यांच्याकडे काहीच नाही, ते दैवाला दोष देत परिस्थितीशी दोन हात करीत उभे आहेत. उद्याच्या उज्ज्वल भविष्याच्या शोधात.

प्राथमिक शिक्षण राज्याची घटनात्मक जबादारी आहे. पण या जबादारीच्या निर्वहनात अनेक व्यवधाने आहेत. समस्या आहेत. कारण आपल्या समाजाची चौकट आणि विचारांची बैठकच अशी काही आहे की, तिच्या भिंतीना कितीही धडका देण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा टवकादेखील उडत नाही. कोणत्याही समाजाची उदासीनता एकूणच धोरणावर परिणाम करते. आपल्या सामाजिक जीवनाचा उदासीनता जणू गुण ठरावा अशी सार्वजनिक वर्तनाची रीत दिसते. बालमजुरांचा प्रश्न, आदिवासी, भटक्याजमातीतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अवघड दुखणं आहे. पटसंख्या मोजून, शैक्षणिक प्रगतीचे पडघम वाजवून धोरण ठरवण्यात वावगे काहीच नाही. पटावरील विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी व्यवस्थेच्या आदेशाने शाळा सोडून रानावनात, वाडे, वस्त्या, रस्त्यांवर मुले शोधत शिक्षकांना भटकवले म्हणजे अभियानाची जबाबदारी पार पडली असे होते का? शाळाबाह्य मुलं शोधण्यासाठी आहेत ती मुलं वाऱ्यावर सोडून वणवण करायची. शिक्षणाच्या वर्तुळातून निसटलेली मुले पकडून आणायची. पण त्यांच्या पोटपाण्याचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच. नुसत्या पोषण आहाराने प्रश्न मार्गी लागत नसतात. आपल्या सामाजिक व्यवस्थेतील कुपोषण दूर करणं गरजेचं आहे.

आपल्या समाजाची घडीच बहुपदरी आहे. त्यातून समाजाची मानसिकता घडली आहे. जात, धर्म, संस्कृती, परंपरांतून उभ्या राहणाऱ्या भेदाभेदाच्या भिंती व्यवस्थेचा स्थायीभाव बनला आहे. या सगळ्यांचा प्रभाव शिक्षणावर कळत नकळत असतोच. शिक्षणाला विशिष्ट विचारधारांचे रंग देणं प्रगतीतील अडसर ठरतो. शासनसत्तांच्या बदलांनी शिक्षण बदलणारे नसावे. ते काळाच्या ओघाने आणि जगाच्या प्रगतीच्या दिशेने बदलणारे असावे. त्याला रंगहीन राखण्याची जबाबदारी समाजाची असते.

राष्ट्राच्या धोरणांची दिशा बदलली की सेवाक्षेत्राच्या, उत्पादनक्षेत्राच्या दिशा बदलतात, असे म्हणतात. याला शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. परिस्थितीचा रेटाच भयंकर असल्याने आपल्याला हे धोरण अंगीकारावे लागले. मुक्तवाटांची सोबत करीत परदेशी विद्यापीठे देशात येण्याचा मार्ग प्रशस्त होतो आहे. जेथे शिक्षणाच्या पुरेशा सुविधाही नाहीत तेथे स्पर्धा होणार आहे, तीसुद्धा गुणवत्तेशी. ही स्पर्धा सुविधांशी असणार आहे. ज्याच्या हाती पैसा नावाचा चंद्र आहे, त्यांचा प्रश्नच नाही. पण नाहीरे वर्गाचे काय? सर्वांना शिक्षण हा आपल्या शैक्षणिक धोरणाचा भाग असेल, तर अशा व्यवस्थेत समान न्याय मिळेल का? अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाचे खाजगीकरण झाले. विनाअनुदान तत्वावर सुरू होणाऱ्या शाळामधून विद्यादानाचा संकल्प केला गेला. वाटले शिक्षणाचा कायाकल्प होईल. पण तसे घडले आहे, असे किती जणांना वाटते? विकल्पच प्रश्नचिन्हे बनून समोर उभे राहिले आहेत. सुमार आर्थिक वकुब असणाऱ्या समाजात खाजगीकरण पेलवणारे नाही. खरंतर हे वास्तव दुर्लक्षित व्हायला नको. बरेच जण प्रवाहापासून अंतरावर राहणार असतील तर याचा नेमका फायदा कोणाला?

बहुसंख्यांकडे क्रयशक्तीच नसल्याने प्राप्त परिस्थितीतील विसंगती पाहत बसण्याशिवाय त्यांच्या हाती आहेच काय? राखीव जागा समाजातील समतेचे संपूर्ण उत्तर असू शकत नाही. समता शिक्षणातून मनात रुजायला हवी आणि वर्तनातून प्रकटायला हवी. संधी साऱ्यांच्या हाती लागायला हव्यात. पायाभूत सुविधांचा अभाव, दर्जेदार अध्यापनाची वानवा असणाऱ्या परिघात प्रगतीचा प्रभाव तरी कसा निर्माण व्हावा. सोयी देणे शासनाचे, व्यवस्थापनाचे कर्तव्य. सकस अध्यापन करणे अध्यापकाची जबाबदारी. पण जेथे संस्थांची संकुले उभी राहतात, तेथे नफ्याची गणिते आखली जातात. जेथे चालक सरंजामी थाटात वर्ततात आणि त्यांच्या कृपाकटाक्षासाठी अंगभूत गुणवत्ता नसणारी पात्रता लोटांगण घालण्यात धन्यता मानते, तेथे निखळ गुणवत्ता दुर्मिळ होते. सुमारांची सद्दी आणि सज्जनांना विजनवास घडत असेल, तेथे शिक्षण विकासाच्या वाटांनी कसे चालेल?

परंपरेने शिक्षकाकडे सकलजन शहाणे करण्याची जबाबदारी दिली. समाजाला शैक्षणिक, वैचारिक अंगाने सक्षम करण्याचे उत्तरदायित्त्व दिले. कधीकाळी त्याचा यथोचित सन्मान समाजाकडून घडत असे. त्याच्याप्रती असणाऱ्या कृतज्ञेतून त्याच्या उदरभरणाचा प्रश्न समाजच सोडवत असायचा. गुरुकुलात गुरूला मिळणारा सन्मान ग्लोबलस्कूलच्या वर्तुळात लघू होत गेला. सारे व्यवहार वैयक्तिक फायद्याच्या चौकटीत बंदिस्त झाले. डिव्होशन जावून कॉशन, कॅपिटेशन मनी आले आणि शिक्षणाविषयी असणारे आस्थेवाईकपण दुभंगले. शिक्षकी पेशा आर्थिक गणिताच्या परिघात बंदिस्त झाला. कधीकाळी शिक्षक ‘गुरूजी’ म्हणून आदराने उल्लेखला जायचा. तो अशिक्षित आईबापाच्या मुलांचा पालक व्हायचा. आता तो ‘सर’ झाला आणि त्याच्याविषयी असणारा आदरही सरसर उतरणीला लागला. तो शासन, प्रशासन, व्यवस्थापन यांच्या तंत्राने चालणारा रोबोट झाला.

याचा अर्थ शिक्षणक्षेत्रात काहीच सकारात्मक घडत नाही, असे नाही. व्यवस्थेच्या बंदिस्त चौकटींमध्ये आपल्या अस्मितांचा शोध घेणारे समाजात अनेक आहेत. माळावरील एकाकी फुलासारखे फुलणारे, आपल्या अंगभूत गुणवत्तेच्या गंधाने आसपासचा आसमंत गंधित करणारे आहेतच. दिलेल्या धोरणांच्या चौकटीत मनी विलसणारी छोटी-छोटी स्वप्ने शोधणारे, त्यांच्या पूर्ततेचा ध्यास धरून नव्या दिशांचा शोध घेणारे; मुक्कामाची नवी वसतिस्थळे निर्माण करीत आहेत. शिक्षणाच्या वर्तुळात कोणतेही वाद आले, विसंवाद उभे राहिले तरी त्यातून संवाद साधणारे आहेतच.

काही दिवसापूर्वी नामदेव माळी यांचे ‘शाळाभेट’ पुस्तक वाचत होतो. भेट दिलेल्या शाळांविषयी त्यांनी आत्मीयतेने लिहिले आहे त्यात. या शाळा प्रतिकूल परिस्थिती परिवर्तनाची लहान लहान बेटे आहेत. प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षण धोरणांवर आपली अमिट नाममुद्रा अंकित करणाऱ्या. शासन, प्रशासन, व्यवस्थापन यांच्या चौकटीतील व्यवहारांच्या शुष्क वाळवंटात ओअॅसिस निर्माण करीत, आपल्या पावलापुरती वाट उजळीत नव्या प्रकाशाचा वेध घेणारे त्यांचे प्रयोग एक समर्पणगाथा आहेत. प्राप्त परिस्थितीचे परिशीलन करून प्रमाणिक प्रयास करीत यशोगाथा उभ्या करता येतात, याची मूर्तिमंत प्रतीके असणाऱ्या या सगळ्या शाळा आणि तेथील शिक्षक. ज्ञानसंरचनावाद, स्वयंअध्ययन, अध्ययनसमृद्धी आदी प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळा ठरल्या आहेत.

‘मुलं घडवणं म्हणजे देश घडवणं,’ असं समजून देशाच्या बौद्धिक संपत्तीत भर घालू पाहणारे ध्येयवेडे समाजात आजही आहेत. पैशामागे धावणाऱ्या जगात संस्कारांची संपन्नता शोधणारे समर्पणशील कुबेर आपल्या समाजात काही कमी नाहीत. फक्त त्यांच्याकडील संपत्तीची चमक बेगडी चमकधमक पाहणाऱ्या नजरेला दिसत नाही एवढेच. कुठूनतरी मागून एखादी गोष्ट कदाचित मिळवता येईलही, पण मिळालेल्या गोष्टीला उचित न्याय देता येईलच असे नाही. मोठेपण मागून अथवा लादून कधीही मिळत नसते. त्यासाठी आधी आपली उंची वाढवावी लागते. स्वकर्तृत्वाने एव्हरेस्टहून मोठे व्हावे लागते. आकाशाशी हितगुज करणाऱ्या अशा शिखरांचा शोध मात्र समाजाला घेता यायला हवा.

ज्ञानासोबत संस्कार देतो, तो पिढीच्या जगण्याला आकार देणारा मूर्तिकार असतो. घडणे-घडवणे हा द्विमार्गी संवाद असतो. तो संवेदनांचा अनाहत नाद असतो. स्वप्न वास्तवात आणणारा प्रवास असतो. पण त्यासाठी संवेदना जागृत असायला लागतात. शिक्षक संवेदनशील असावा, असं म्हणतात. पण संवेदना काय फक्त शिक्षकालाच असतात? त्या समाजाकडे, व्यवस्थेकडे नसतात का? याचं उत्तर समाजाने आणि व्यवस्थेनेच शोधणे अधिक संयुक्तिक नाही काय?

Jaate | जाते

By // 9 comments:
जातं:

‘घट्या पाट्या टाकी ल्या…!’ अशी साद घालीत रस्त्यावरून आवाज ऐकू येतो आहे. घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली दुपारच्या निवांतवेळी वाचन करीत बसलो होतो. आवाजाची आवर्तने सुरु. वाढत्या वयाच्या साऱ्या खुणा देहावर धारण करून दारासमोरून एक बाई चालली आहे; घरातलं कुणी जातं, पाटा, वरवंटा टाकून घेतोय का, या अपेक्षेने ती परत-परत साद घालते आहे. कष्टाने रापलेला तिचा देह वार्धक्याच्या वाटेने आयुष्याच्या उतरणीवर लागलेला. अंगावर नववारी लुगडं तेही वापरून जवळपास विटलेलं. एका हातात लहानसा हातोडा. डोक्यावर धडूत्याचं बोचकं. त्यात छिन्नी वगैरे सारखी आणखी काही जुजबी औजारे. माणसांनी गजबजलेल्या वस्तीतून साद घालीत ती बाई चालते आहे. साद घालणाऱ्या आवाजात कुणी आपणास हाक देईल, याची आस लागलेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपापल्या वैभवाला मिरवीत तोऱ्यात उभ्या असलेल्या इमारतीसमोरील रस्त्यावरून तिची थकलेली पावलं आयुष्याच्या चुकलेल्या गणिताचं ओझं दिमतीला घेऊन पुढे सरकत आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये जगण्याच्या प्रवासातील सारी प्रश्नचिन्हे एकवटलेली. सायासप्रयासाने हाती लागणाऱ्या कामातून जीवनकलहाच्या प्रश्नांची उत्तरे ती शोधू पाहते आहे. प्लॉट संस्कृतीच्या तुकड्यांमध्ये विभागलेल्या जगण्यावर मध्यमवर्गीय प्रतिष्ठेची झूल पांघरलेलं कोणतंही दार किलकिलं होत नाही, की कुठूनही थांबा! म्हणून आवाज काही तिच्या कानी येत नाही. येईलच कसा? जवळपास साऱ्यांनीच स्वयंखुशीने आपापल्या घराचे कोंडवाडे करून घेतलेले. पैसा मोजून आणलेल्या आभासी सुखांची त्यात आरास मांडलेली. घरांना विज्ञाननिर्मित साधनांनी वेढलेलं. सुखाच्या मृगजळी सहवासात माणसांनी स्वतःला सीमित करून घेतलेलं. स्वयंघोषित प्रगतीच्या चौकटी उभ्या करून सजवलेल्या बंदिस्त घरात पारंपरिक साधनांना आहेच कुठे जागा. आता आहेत कुठे घरात जाते, पाटे-वरवंटे शिल्लक? असलेच तर तेही अपवाद. जगणं धावत्या चाकावर स्वार झालेलं. प्रगतीच्या प्रचंड वेगात हे संथ लयीतलं जगणं हरवले. त्यासोबत पारंपरिक प्रवाहांचे संदर्भसुद्धा.

साद घालीत जाणाऱ्या आवाजाने पुस्तकाच्या पानातून लक्ष विचलित झालं. भूतकाळातील एकेक आठवणी नकळत मनाभोवती फेर धरू लागल्या. फार काही जास्त नाही, पण पंधरा-वीस वर्षे मागे जावून पाहिले, तर गावात तेव्हा असे एकही घर नसेल, ज्यात ग्रामपरंपरेशी नाते सांगणाऱ्या जाते, पाटा-वरवंटा वगैरे सारख्या वस्तू नसतील. या वस्तूंशिवाय जगण्याची कुणी कल्पनाही करू शकत नसे. अशा कितीतरी गोष्टींची मुळे ग्रामसंस्कृतीच्या मातीत घट्ट रुजलेली होती. या वस्तू दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग होत्या. या वस्तूंच्या निर्मितीसोबत जुळलेला आणि त्यांला उदरनिर्वाहचे साधन मानणारा माणसांचा एक वर्गही होता. दगडापासून पाटा-वरवंटा, जाते तयार करणारे, गुळगुळीत झाल्यावर टाकून देणारे त्यातील एक. त्यांच्या जगण्याच्या वाटा निर्धारित करणाऱ्या या वस्तू काही त्यांच्या पदरी ऐहिक श्रीमंतीचं दान देणाऱ्या नसल्या, तरी कष्ट करून प्रामाणिक जगण्याला प्रतिष्ठेचे प्रांगण उपलब्ध करून देणाऱ्या होत्या. श्रम करून माणसाला सन्मानाने जीवनयापन करता येते, याचा वस्तुपाठ होत्या.

गावागावातून आपला फाटका आणि भटका संसार पाठीवर घेऊन फिरत राहणारी ही माणसे अनिकेत असली, तरी अनेकांच्या निकेतनात यांनी तयार करून दिलेल्या वस्तूंमुळे कोणतातरी कोपरा सजलेला असायचा. दळताना विशिष्ट लयीत ऐकू येणारी जात्यांची घर-घर शब्दांचा साज लेवून कोण्या मानिनीच्या सुरेल आवाजाची सोबत करीत झऱ्यासारखी झुळझुळ वाहत रहायची. दळण करताना कोण्या ललनेच्या ओठी आलेले शब्द जीवनाचं गाणं बनून प्रकटायचे. राग, लोभ, प्रीती, स्नेह, दुःख, वेदना सोबत घेऊन जात्यातून निघणाऱ्या पिठासोबत ते उमलून यायचे. मनात घर करून वसतीला असलेला आनंद, व्यथा, वेदना मनाच्या गाभाऱ्यातून ओठी यायच्या. शब्दांना सूर सापडायचे, सुरांना गाणे आणि गाण्याला जगणे. शब्द कधी आनंदाची पखरण करणारे, तर कधी वेदनांनी विव्हळणारे. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी त्यात आस्थेचे रंग भरले जायचे. कधी काळजाला चिरे पाडणारा, कधी सासर-माहेर द्वंद्वात अडकलेला, कधी सणावाराला माहेरच्या माणसाची प्रतीक्षा करणारा, कधी आईबापाने दिल्याघरी कष्टाचं जगणं जगूनही त्यांना आयुष्य मागणारा आवाज हृदयातून उमलून यायचा.

रात्रीच्या अंधाराला छेद देत प्रकाशाची पखरण करणारा विजेच्या दिव्यांचा लख्ख उजेड गावाच्या सोबतीला तेव्हा नव्हताच. रात्र काय अन् सकाळ काय कंदील, चिमण्यांची सोबत करीत उजेड हलक्या पावलांनी अंगणात उतरायचा. चिमणीच्या, दिव्यांच्या मिणमिणत्या उजेडात सकाळच्या प्रहरी जात्याला सश्रद्ध अंतःकरणाने हात जोडून बायाबापड्या दळण दळायला बसायच्या. वजनदार जातं फिरवताना कस लागायचा. दळताना बारीक पीठ यावं म्हणून जात्यावर दगडाचे वजनदार पेंड ठेवले जायचे. एकट्याने हे ओढणे अवघड असायचं म्हणून दोघीजणी समोर बसून जातं फिरवत असायच्या. सरावाने त्यांचे हात गहू, ज्वारी, बाजरी त्याच्या मुखी मूठ-मूठ ओतीत राहायच्या. त्याभोवती पांढऱ्याशुभ्र पिठाचं गोल खळं पसरलेलं. हलक्या हाताने ते डब्यात, टोपलीत भरलं जायचं. माय, मावशी, आजी, आत्या कुणीतरी जातं बराच वेळ ओढीत राहायच्या. चेहऱ्यावरील घाम लुगड्याच्या पदराने टिपत दळण दळायची लगबग चाललेली असायची. घरातील कामांची झुंबड उडालेली असायची. कामं आवरून शेताचा रस्ता धरायचा असे. घरातलं कुणी तेथूनच पीठ घेऊन चुलीवर भाकरी थापत बसलेलं असायचं. त्यातही एक घाई झालेली असायची, कारण गडी-माणसांना शेतात जातांना भाकरीचं गठुडं सोबत न्यायला लागायचं. 

घराच्या ओसरीत, विशिष्ट जागी ही जाती मांडलेली असायची. त्या जागांनाही स्वच्छतेचा गंध असायचा. जात्याभोवातीच्या जागेला शेणाने सारवणे, मातीने पोतारणे घडायचे. स्वच्छतेची काळजी जाणीवपूर्वक घेतली जायची. कुण्या रसिकमनाच्या कल्पकतेने त्याच्याभोवती गेरू, चुना वगैरे तत्सम साहित्यानिशी रांगोळीसारखे रेखांकन केलेलं असायचं. घरातल्या बायांचा जीव जात्यात गुंतलेला असायचा. सकाळी दळण दळण्याचे, दही घुसळण्याचे सरमिसळ आवाज कानी पडायचे. गायी-म्हशींचे दूध गोठ्याकडून चुलीकडे आणले जायचे. पातेल्यात ओतले जायचे. चुलीतील धुराने अख्खं घर भरलेलं असायचं. बिछान्यातून उठून आम्ही मुलं सरळ जात्याकडे पळत जायचो. पारोश्या अंगाने येथे का आलास, म्हणून हमखास बोलणं ऐकावं लागायचं. कोळशाचं बारीक वाटलेलं असेल, नाहीतर चुलीत जाळलेल्या गोवऱ्यांच्या राखेचं मंजन कोणीतरी जबरदस्तीने हातात कोंबून जायचे. ते हाती घेऊन दात घासत तेथेच बसायचो. दात घासण्याकडे तसेही फारसे लक्षच नसायचं. नजर जात्याभोवती जमा झालेल्या पिठाकडे. मऊशार पिठावर बोटांनी रेघोट्या ओढण्यात काय आनंद वाटायचा कोणास माहीत? पण पांढऱ्याशुभ्र मऊ पिठाला परत-परत स्पर्श करावासा वाटायचा. आई ओरडत राहायची. फारच झालं की, पाठीत धपाटे घातले जायचे. रट्टा बसला की, भोकाड पसरीत बसायचो. आजी, आजोबा असे कुणीतरी आईवर ओरडायचे. आजी तेथून उचलून आपल्यासोबत न्यायची. एव्हाना दात मंजनाने घासले आहेत, याचा विसर पडलेला असायचा. चुलीवर तापायला ठेवलेलं दूध ग्लासात ओतून हाती यायचे. रडतच ते ओठी लावले जायचे.

जातं बहुतेक सगळ्यांच्या आस्थेचा विषय. उदरभरणाचे पहिलं काम त्याच्यामुळेच; म्हणूनच की काय, त्याबाबत मनात एक श्रद्धा असायची. खेळतांना आम्हा पोरासोरांचा पाय नकळत जात्याला लागला की, कुणीतरी पाय पडायला सांगायचे. असे का करत असावेत, याचा उलगडा काही तेव्हा होत नसायचा. पण आज कळतं, की ही आस्था अतीव श्रद्धेतून निर्माण झालेली असायची. रोजच्या जगण्याचे अनेक धागे फिरणाऱ्या जात्याच्या वर्तुळाभोवती गुंफलेले असायचे. जात्यातून केवळ भाकारींसाठी पीठच दळले जात नसे, तर उडीद, मूग, तूर, हरभरा आदी भरडून डाळीही केल्या जायच्या. अर्थात यासाठी आणखी लहानमोठ्या आकाराची जाती असायची. पीठ दळण्यासाठी वेगळे, धान्य भरडण्यासाठी आणखी वेगळे. दळताना त्यांना विशिष्ट लयीत ओढायचे कौशल्यसुद्धा निराळे. हे सगळं सरावाने आत्मसात केलेलं, शिकलेलं. कुणाकडे कधी जातं टाकलेलं नसलं, खराब झालेलं असलं, की शेजारची कुणीतरी सायजा, बायजा दळण घेऊन हक्काने शेजारच्या घरी जायच्या. कुणाला त्यात अवघडल्यासारखे काही वाटत नसायचे. प्रायव्हसी वगैरे सारखे स्वतःची स्पेस शोधणारे आधुनिक प्रकार नसायचे. जगण्याच्या नात्यात स्वकेंद्रित जगण्याला प्रमाण मानणारी ‘स्पेस’ नावाची पोकळी नसायची. आस्था, आपुलकी, स्नेह अंगभूत गोडवा घेऊन साठलेला असायचा. त्यासोबत आपलेपणाचा हक्कही गृहीत असायचा.

मनातले सल, व्यथा, वेदनांना दळण दळताना एकमेकींशी बोलून वाट मोकळी करून दिली जायची. नव्यानेच सासरी आलेल्या मुलीच्या घरकामांची परीक्षा जात्यावरील दळण दळताना व्हायची. काही कामे तिला सफाईदारपणे करता येत नसतील, तर युक्तीच्या चार गोष्टी हक्काने सांगितल्या जायच्या. जावा, नणंदा, वहिन्या एकमेकींची थट्टा करीत राहायच्या. अशावेळी कोणी नवपरिणत वधू त्यांचं सहज सावज असायचं. मनातलं गुज एकमेकींना सांगितलं जायचं. ऐकलं जायचं. दुःखाने भरलेले डोळे आसवांना मोकळी वाट करून देत जात्यासोबत मुक्त वाहायचे. तेवढ्याच आस्थेने त्यांना संयमाचे बांध घातले जायचे. समजुतीच्या चार गोष्टी शिकवल्या जायच्या. स्त्रीचा जन्मच असा. वेदनांचा सहवास टाळूनही न टळणारा, म्हणून परिस्थितीत टिकून राहण्याची नवी उमेद, नवी स्वप्ने मनाच्या मातीत रुजवली जायची. सासरी होणाऱ्या जाचास सामोरे जाणाऱ्या सुनांना धीर द्यायचा. बाईचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी, म्हणून त्या नवख्या पोरीची समजूत काढून दुःखावर फुंकर घातली जायची. आपलं जगणंही जात्यासारखं परिस्थितीभोवती गरगर फिरणारं, म्हणून मनात आसक्तीचे दीप लावले जायचे. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणाऱ्या गोडव्याने, आस्थेने ओथंबलेल्या आश्वस्त शब्दांनी घडणाऱ्या संवादातून खचलेल्या जिवाला धीर यायचा. कधी थट्टामस्करीला उधान आलेलं असायचं. तोंडाला पदर लाऊन ओठी आलेलं हसू कोंडलं जायचं.

आज हे सगळं बदललं. कालचक्राची सोबत करीत, प्रगतीचे पंख लेऊन जग बरेच पुढे निघून आले आहे. गावात पिठाच्या गिरण्या आल्या. जात्यावर केले जाणारे दळण-कांडण भूतकाळात जावून विसावले. आतातर घराघरातून लहान चक्क्यांनी आपलं आसन मांडलं आहे. जात्यांची थकवणारी घरघर संपली. मिक्सर, ग्राईंडर, प्रोसेसर भन्नाट वेगात फिरत आहेत. त्यांच्या कर्कश आवाजात विशिष्ट लयीत चालणारी जात्यांची घरघर संपली. त्या आवाजाचा गोडवाही हरवला. त्यासोबत ओठी येणाऱ्या ओव्या, गाणी इतिहास जमा झाली. बायाबापड्यांच्या मनातील सुख-दुःख बोलून हलकं करायचं हक्काचं ठिकाण हरवलं. बोलणं थांबलं. मनातील अंधाऱ्या गाभाऱ्यात भावना आस्थेचा ओलावा शोधत आहेत. प्रगतीच्या पंख लेऊन विहार करणारी माणसं जगण्याच्या नव्या परिमाणात बंदिस्त झाली आणि मनेही आपल्याभोवती तयार करून घेतलेल्या वर्तुळात कोंडली गेली.

गावात विजेच्या दिव्यांचा लखलखाट होण्याआधी डीझेल इंजिनवर चालणाऱ्या चक्क्या आल्या. त्यावेळी त्यांचीही एक गम्मत वाटत असायची. हाती हॅण्डल घेऊन गरगरा फिरवीत इंजीन सुरु केलं जायचे. सुरु झालेल्या इंजीनमधून निघणारा धूर छतापर्यंत पाईप टाकून बाहेर फेकला जायचा. बऱ्याच ठिकाणी औषधाच्या इंजेक्शनची रिकामी बाटली विशिष्ट कोनात पाईपाच्या तोंडावर बांधलेली असायची. इंजीन सुरु झाले की, त्यातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या हवेने शिट्टीसारखा आवाज ऐकू यायचा. त्या आवाजाने चक्की सुरु झाली आहे, हे गावाला कळायचे. त्यासाठी ओरडून सांगायची गरज नसायची. ज्याच्या मालकीची चक्की असायची असा एखादाच असायचा. त्याची गावातील ओळखही चक्कीवाला म्हणूनच. पुढे सरावाने त्यांना तेच नाव चिकटायचं. अजूनही माझ्या गावात पहिली पिठाची गिरणी सुरु केली, त्या घराची ओळख चक्कीवाला अशीच आहे. आतातर गावात दोन-तीन चक्क्या आल्या. गावात पहिली पिठाची गिरणी सुरु करणाऱ्यांकडे आता ती राहिली नाही, तरी त्यांची चक्कीवाला ही ओळख काही पुसली जात नाही.

पिठाच्या गिरण्या आल्या आणि जात्यांची गरजच संपली. मिक्सर, ग्राईंडरने पाटा-वरवंटा दैनंदिन जगण्यातून हद्दपार केला. त्यासोबत घटे (जातं) पाटे (पाटा-वरवंटा) तयार करणारे, टाकून देणारेही. ही सगळी माणसं गावगाड्यातून हळूहळू उणे होत गेली. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांच्या जगण्याची नवी ओळख निर्माण केली. पण परंपरागत कौशल्यावर जगणाऱ्यांची ओळख हरवली. व्यवस्थेच्या चौकटीतून परिस्थितीने त्यांना हद्दपार केले. नियतीने त्यांच्या ललाटी जगण्यासाठी दाही दिशा वणवण करायला लावणारी भटकंती लेखांकित केली. कुणी म्हणेल गरजच काय या साधनांची आता, एवढी सगळी विज्ञाननिर्मित साधने आणि त्यांच्यासोबत चालत येणारी सुखे हाती असताना. या सगळ्या पारंपरिक वस्तूंची गरज कदाचित संपली असेलही. विज्ञानाने सुखं देणारी साधने माणसांच्या हाती दिली; म्हणून तो सर्वार्थाने सुखी झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर काही असो. कदाचित काही सुखे हाती लागलीही असतील; पण अनेकांना व्यवस्थेतून विस्थापित करून दारोदारी भटकायला लावणारं जगणं ज्यांच्या जीवनात आलं, त्याचं काय?

रस्त्यावरून ओळीने उभ्या असलेल्या ढाबा नामक संस्कृतीला सध्या बऱ्यापैकी बरकत आलेली दिसते. येथे येऊन जिभेचे चोचले पुरवण्याच्या छंदाला हल्ली खवैय्येगिरी, भोजन रसिकता वगैरे असे काही संबोधले, समजले जाते. काही ढाब्यांवर जेवण चुलीवर तयार करून दिले जात असल्याच्या जाहिराती डिजिटल पाट्यांवर वळणदार अक्षरांनी कोरलेल्या दिसतात. सामिष स्वयंपाकासाठी येथे वापरला जाणारा मसाला पाट्यावरवंट्यावर वाटून वापरला जात असल्याचं आश्वस्त केलेलं असतं. लोकांना त्या चवीची मोहिनी पडतेही. जिभेचे चोचले पुरे करता येतात. पण कष्टाच्या जगण्याला आनंदयोग मानून; या वस्तू जीव ओतून तयार करणाऱ्यांचे काय? प्राप्त परिस्थितीलाच जीवनयोग समजून जगणाऱ्यांचं काय? हे प्रश्न कदाचित कोणाच्या मनात येत असतील, नसतील माहीत नाही; पण ही माणसे विज्ञानप्रणित साधनांनी निर्माण केलेल्या सुखांच्या वर्तुळातून बाहेर फेकली गेली. या लोकांनी परंपरागत कौशल्ये वापरून तयार केलेल्या साधनांना चव निर्मितीचे श्रेय द्यायचे आणि हे काम करणाऱ्यांना सोयीस्कर विसरायचे याला काय म्हणावे?

जाते, पाटा-वरवंट्याने कधीकाळी परिसरात श्रमसंस्कार रुजवले, त्यांचं काय? ही साधने केवळ प्रासंगिक गरजपूर्तीची साधने नव्हती, तर जगण्याचं अनिवार्य अंग होती. अजूनही आठवते एखाद्या घरी लग्नकार्य असले की, पहिली खरेदी केरसुणी, माठ, सूप आदी वस्तूंची असायची. वधू-वराच्या अंगाला लागणारी हळद जात्यावरच दळली जायची. आज इव्हेंट मॅनेजमेंटच्या जमान्यातील बेगडी चमक-धमकमध्ये कदाचित या सगळ्यांची आवश्यकता उरली नसेल आणि हे करायला कोणाकडे तेवढा वेळही नसेलही. पण परंपरेचा बंध तुटला तो तुटलाच, त्याला परत सांधणे अवघड आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीच्या पात्रातून वाहताना प्रगतीच्या प्रवाहात हरवल्या. जाते त्यातीलच एक. नुसते जातेच नाही हरवले, तर त्यावर दळताना ओठी येणाऱ्या गाण्यांचे सूरही संपले आणि सोबत सांस्कृतिक अंगाने चालत येणारे संदर्भसुद्धा.

कधीतरी चुकून पाटा-वरवंटा, जाते टाकून देण्यासाठी साद घालणारा आवाज कानी येतो. पण त्या आवाजातला आत्मविश्वासही आता हरवल्यासारखा वाटतो. कोणी प्रतिसाद देईल का? या शंकेतून निर्मित संदेह घेऊन केविलवाणा झाल्यासारखा ऐकू येतो. तो ऐकून मनाच्या गाभाऱ्यात अंग आकसून बसलेल्या स्मृतींची पाने सळसळायला लागतात. एकेक आठवणी जाग्या होतात. ग्रामीण संस्कृतीचे सांस्कृतिकबंध निर्माण करणारे स्वयंपूर्ण चित्र नजरेसमोरून सरकून जाते. मनःपटलावर उमटलेल्या प्रतिमांनी क्षणभर अंतर्यामी अस्वस्थता भरून येते. पण मी यासाठी काय करू शकतो? काहीच नाही, कारण मीसुद्धा विज्ञाननिर्मित संस्कृतीने निर्माण केलेल्या प्रगतीच्या वर्तुळात फिरणारा आणि त्या गतीलाच प्रगती समजणारा मळलेल्या वाटेवरचा पथिक. प्रवास करताना मुक्कामाचे कोणतेही नवे ठिकाण शोधू न शकणारा. फारफारतर यानिमित्ताने मनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त आठवणी हात धरून धूसर झालेल्या काळाच्या सीमेवर आणून उभ्या करतात. भूतकाळ जागा होतो. आपलं असं काही निसटलेलं हाती लागल्यासारखे वाटते. पण माझ्यात, माझ्या शब्दांत कालचक्राला उलट फिरवण्याइतकी ताकद आहेच कुठे? तेवढी पात्रता असायला मी काही असामान्य कोटीतला कोणी नाही. विश्वाच्या पसाऱ्यात आहेच किती जागा माझ्या अस्तित्वाला. परिस्थितीच्या परिघाभोवती घडणाऱ्या परिवलनाला प्रगती समजणाऱ्या अनेकातला मीही एक. काळाच्या प्रवाहाला वेगळे वळण देणारा एखादा युगप्रवर्तक विद्यमानकाळी इहतली असेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही हाती काही न लागणारा. असणे संभव नाही, अशी स्वतःची समजूत काढून घेणारा. कारण विज्ञानप्रणित साधनांनी हाती लागलेल्या स्वयंघोषित सुखांची उंची वाढत जाते, तेव्हा संस्कृतीने निर्माण केलेल्या साध्याशा साधनांनी गाठलेली प्रगती संपते. प्रगतीला परिस्थितीचे पायबंद पडतात तेथे नवे भव्य, दिव्य घडण्याची शक्यता उरतेच किती? अर्थात या वर्गाने असेच पारंपरिकतेच्या चौकटीत अभावात जगावे असे चुकुनही वाटत नाही, पण यांचे जगणं उध्वस्त होताना जगण्याची नवी प्रयोजने, विज्ञानप्रणित प्रगत साधने यांच्या हाती देण्याचे उत्तरदायित्त्व आपले आहे, असे प्रगतीच्या पंखांवर स्वार झालेल्या माणसांनी मानायला नको का? चुकून कधीतरी एखाद्यावेळी परिस्थितीच्या शुष्क होत जाणाऱ्या प्रवाहाच्या पात्रातून वाहत येणारा असा आवाज कानी येतो. काही वर्षांनी तोही असण्याची शक्यता नाही. जातं, पाटा-वरवंटा काय असतो, ते पुढच्या पिढ्यांना चित्रातून दाखवावे लागेल. कदाचित तेव्हा ते यालाच क्लासिक वगैरे असं काही म्हणतील का? माहीत नाही; पण जगण्याच्या वेगात आपण आणखी काय काय हरवणार आहोत, कोणास माहीत?

Gaav | गाव

By // 7 comments:
गाव: आठवणींच्या वर्तुळातील 

शाळेत सोबत शिकणारा सवंगडी परवा अचानक भेटला. काहीतरी कामानिमित्ताने जळगावात आला होता. बऱ्याच दिवसांनी भेट घडली. रस्त्याच्या कडेनेच थांबून लागला बोलायला. रस्त्यावर उभं राहून बोलणं प्रशस्त वाटेना. म्हणून म्हणालो, “अरे, असं रस्त्यावर थांबून आपण काय बोलत उभे आहोत. घरी चल, बोलू निवांत.” मला पुढे बोलायची उसंत न देता म्हणाला, “नाही, तेवढा वेळा नाही. कामं खोळंबली आहेत. बघू नंतर कधी.” त्याच्या आर्जवी नकाराने माझ्या अपेक्षेला पूर्णविराम मिळाला. तेथून चहाच्या टपरीवर गेलो. चहा मागवला. चहा घेताना म्हणाला, “अशात कधी गावाकडे गेला होतास का?” त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात न आल्याने आश्चर्यचकित मुद्रेने पाहत राहिलो थोडा वेळ तसाच. म्हणालो, “हो, पण का रे! काही विशेष घडलं का गावाकडे?” म्हणाला, “नाही, विशेष असं काही नाही; पण हल्ली आपलं गाव किती बदललंय नाही! गावाचं गावपण उरलं नाही. आपल्या वेळचं अख्खं गाव हरवलंय असं वाटतंय. अगदी एखादा दिवस मोठ्या मुश्किलीने थांबावसं वाटतं. सगळा आपलेपणाच संपलाय. जो-तो आपापल्या कोशात दडून बसला आहे. माणसं आता पहिल्यासारखी राहिली नाहीत.” त्याला काय वाटले कोणास ठावूक पण बोलत होता, आपलं काहीतरी हातून निसटल्याची खंत घेऊन. चहा घेईपर्यंत काय काय सांगत होता. एकेक गोष्टी आठवत होता. मला बसस्थानकावर सोड म्हणून सांगितले. निघालो तिकडे. गाडी निघायच्या तयारीत. घाईतच गाडीत बसला आणि निघाला.

घरी आलो. पण ‘गाव बदललं, गावपण संपलं.’ हे त्याचं म्हणणं काहीकेल्या मनातून निघत नव्हतं. एका सीमित अर्थाने ते खरंही होतं. काळाचे संदर्भ बदलतात, तशा इतर काही गोष्टीही ओघाने बदलत जातात. बदल निसर्गाचा सहजभाव असल्याने ते टाळताही येत नसतात. प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही. मग आमचं गावही यास कसे अपवाद असेल! पण गाव बदललं, म्हणजे नेमका काय बदल झाला म्हणायचा त्यात. गावाचा चेहरा-मोहरा, जगणं, वागणं, सणवार, रूढीपरंपरा, माणसे असं सगळंच किंवा थोडंफार काळानुरूप बदललं. हा बदल टाळता न येणारा. मात्र घडणाऱ्या बदलात चेहरा हरवलेलं गाव त्यास नको होते. आमच्या पिढीने जगलेलं गाव अद्यापही त्याच्या मनात रुजलेलं. गावाचं निर्व्याज, साधंस जगणं स्मृतीत जपलं आहे, तेच आणि तसेच त्यास हवे आहे. हे सगळं आठवणींच्या कोंदणात ठीक आहे; पण वास्तवात असेच कसे असेल? वास्तव आणि स्वप्ने यात बरंच अंतर असतं. स्वप्नं कितीही सुंदर असली, तरी ती खरी होतीलच याची कोणाला खात्री देता येते का?

खरंतर माझ्याही मनात गावाची प्रतिमा काहीशी अशीच आहे आणि अद्यापही तशीच जपून ठेवली आहे. काळाचा पडदा दूर करून पाहताना तीस-चाळीस वर्षापूर्वीचे गाव आजही स्मृतींच्या गाभाऱ्यात नंदादीपाचा मंद प्रकाश बनून मनाचं आसमंत उजळत आहे. तिच गजबज, तोच आपलेपणा सोबतीला घेऊन. एकेक आठवणी अनमोल ठेवा आहेत. आजच्या बदललेल्या गावाशी तुलना करताना गावाचं त्यावेळचं साधसं जगणं रमणीय वाटतं. सगळ्या देखाव्यांपासून, चमकधमकपासून कोसो दूर असणारं; पण आपलेपणाचा ओलावा घेऊन नांदणारं. सात्विक जगण्याला संस्कार समजणारं. साधेपणाचा साज लेवून नटलेलं. कोणतेही अभिनिवेश धारण न करता साधंसरळ जगणं, हीच गावाची ओळख. जगण्याच्या दैनंदिन व्यवहारात गुंतलेलं, पण कोणताही गुंता न करता जगणारं गाव आपल्या संथ लयीत चालत राहायचं. कोणाला कसली घाई नाही आणि पुढे निघायची मनात आसक्तीही नाही. लहानमोठ्या कुरबुरी, हेवेदावे असतील; पण मोठ्या कलहांपासून चार हात लांबच असायचं. शेतशिवारात प्रामाणिक कष्ट करायचं. निढळाच्या घामाने कमावलेल्या भाजीभाकरीची गोडी अनुभवत जगायचं. तूपसाखरेचा मोह मनाला पडला, तरी अशा मृगजळापासून सुरक्षित अंतरावर राहायचं. कोणत्यातरी सणवाराच्या निमित्ताने मुखी पडणारा गोडधोडाचा घास मनाच्या प्रसन्नतेची परिसीमा असायचा. ‘मन करारे प्रसन्न...’ या संतवचनावर विश्वास ठेवून वर्तणारे आणि आपल्या ओटीत पडलेले चिमणसुख वरदान समजून सुखाने नांदणारे. कधीकाळी बहुतेक गावे अशीच असायचीही, साधी तरीही सुंदर. अशी गावं गावपणाचा परिघ समृद्ध करीत होती.

काही दिवसापूर्वी गावी जाणं घडलं. एव्हाना गावी जावं तेव्हा प्रत्येक फेरीत काहीना काही बदल झालेले दिसतात. आताही ते दिसले, पण या बदलांना आपलेपणाचा स्पर्श नसल्याचे का कोण जाणे उगीचंच वाटत राहते. गावात प्रवेशताना वाटेवरचा कचरा नेहमीप्रमाणे स्वागताला सज्ज. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उकिरड्यांनी आपापली आसनं धारण केलेली. गटारीच्या पाण्याच्या मुक्त संचाराने त्यांना घडणारा अभिषेक. पाण्याऐवजी गटारी कचऱ्याने तुडुंब भरलेल्या. हे चित्र काही अद्याप बदलायला तयार नाही. स्वच्छता अभियानाने येथे शरणांगती पत्करलेली. हे सगळं पाहून मनास वाटत होते, गावात कोणालाच अशा अस्वच्छतेची खंत वाटत नसेल का? आरोग्याच्या प्रश्नांविषयी कोणी काहीच ऐकले नसेल का? की ही आमच्या सार्वजनिक वर्तनाची सुधारित आवृत्ती आहे?

रस्त्याने चालत पुढे येतो. शासकीय सुविधांमुळे गावातील मातीचे रस्ते इतिहासात जमा होऊन त्यांचं कॉंक्रिटीकरण झालं; पण त्यांच्या नशिबी असणारे दुर्दैवाचे भोग काही संपले नाहीत. दर दहाबारा पावलांवर उखडलेले. तुंबलेलं पाणी दारासमोरून वाहत नाही म्हणून कोणीतरी मध्येच कुदळचे घाव घालून जखमी केलेले रस्ते अंगावर नागमोडी नाल्यांचे गोंदण करून पहुडलेले. घरात पाण्याचा नळ घेतला म्हणून त्यासाठी केलेल्या खड्ड्यांचे सौभाग्य ललाटी मिरवणारे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या घरांचे चेहरे मात्र देखणे झालेले. पूर्वीची धाब्याची, मातीची घरं जाऊन सिमेंट, विटांची पक्की घरं तयार झाली. कुणाची कृपा, कुणाच्या आशीर्वादाची अक्षरे माथ्यावर मिरवणारी. परिसरातल्या निष्काळजीपणात घरांची स्वच्छता ठळकपणे नजरेत भरत होती. येथेही आपपरभाव अधोरेखित केला जातच होता. वैयक्तिक चेहरा सुंदर; पण सार्वजनिक चेहरा कुरूपपणाकडे वळणारा.

थोडं पुढे येऊन मंदिरापाशी थांबलो. त्याचाही कायापालट झालेला आहे. आस्थेचा, भक्तीचा टिळा ललाटी लेऊन वर्षानुवर्ष उभं असणारं लहानसं मंदिर आता इतिहास जमा झालं. त्याचं साधेपणातील सौंदर्य संपलं. लोकांनी सढळ हातानी केलेल्या मदतीने आधुनिक देखणा लूक घेऊन सुंदर झालं. गाभाऱ्यातल्या देवालाही समृद्धी आली. त्याचंही स्टेटस सुधारलं. पण माणसं आपलं सार्वजनिक वर्तनाचं स्टेटस का बदलू शकली नसतील? या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मला सापडत नाहीये. मंदिराच्या भव्यपणात त्याच्या आसपासचा मोकळा परिसरही बंदिस्त झाला आणि तेथल्या मोकळ्या जागी खेळणारी पावलं थबकली. कधीकाळी गावातील मुलांच्या खेळण्याने गजबजलेला हा परिसर आज सुनासुना वाटत होता. आमच्या लहानपणातील खेळत्या पावलांना मन उगीचंच तेथे शोधत राहिले. गावाच्या मध्यावर असणारं हे मंदिर गावातल्या धार्मिक आस्थेचे केंद्र. कुणाघरी शुभकार्य असली की, पहिला कौल येथेच लावला जायचा. सुगीच्या दिवसात शेतात येणारे पहिले कणीस आधी देवाच्या पायाशी वाहिले जायचे. नित्यनेमाने देवाचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरवात करणारे सगळ्या ऋतूत येथे दिसायचे. रात्रीच्या प्रहरी भजनांचा भक्तीरस मिणमिणत्या दिवट्यांच्या प्रकाशात सुरांचे रंग भरायचा. पूजापाठ, पोथ्या-पुराणांचे वाचन, सप्ताह, भंडारा असे काही ना काही वर्षभर सुरु असायचे. परिसर नेहमीच माणसांच्या राबत्याने जागा असायचा. गावाचं जगणं देवाच्या आशीर्वादाने चाललेलं असायचं. त्यातही एक प्रामाणिक श्रद्धा असायची. मंदिर जेवढा आस्थेचा विषय होता तेवढाच उर्जेचाही. मंदिराच्या मोकळ्या जागी खेळणाऱ्या मुलांचा गलका वाढून भांडणं लागली की, कोणीतरी हमखास रागावणार. पण त्यात रागापेक्षा प्रेमच जास्त असायचं. प्रगतीच्या वाटेने आलेल्या बदलांनी हक्काने रागावणंही संपलं. रागावणारेही निसर्गनियमांच्या शिड्या धरून चालते झाले. आहेत काही, ते खूप थकलेले, आपली अखेर शोधणारे.

मंदिराकडे पाहत उभा होतो. मंदिराच्या ओट्यावर माणसांचं हल्लीही थांबणं असतं. गावातील काही जण तेथे बसलेले. त्यातील एकाने विचारले, “काय सर, काय बघतोय मंदिराकडे असं? पहिल्यांदा पाहतोस का?” मंदिराच्या आजूबाजूने पाहत त्यांना म्हणालो, “नाही, पहिल्यांदा वगैरे पाहत नाही. पण हे मंदिर, हा परिसर कसा नीटनेटका ठेवलाय तुम्ही लोकांनी. मग गावात येतानाचे रस्ते, परिसर असे का? कोणालाच काही करावेसे का वाटत नाही, याचा विचार करतोय.” माझ्याकडे पाहत त्यातला एक जण म्हणाला, “सर, तुझं म्हणणं ठीक आहे, पण हे सगळं करेल कोण? येथे कोणालाही सांगून पाहा, एकच उत्तर मिळेल, तू तुझं पाहा ना! आता सांग, अशानं काय होणार आहे. येथे प्रत्येक जण स्वतःला मोठा समजतो. कधीकाळी ठीक होतं, कुणी जुणंजाणतं माणूस बोललं की ऐकून तरी घेत होतो. आता काही कुणाला तशी गरज उरली नाही.” त्याचं म्हणणं ऐकून खंत व्यक्त करीत बोललो, “म्हणजे, असं कसं! आरोग्याचे प्रश्न काय एकट्याची गरज असते का? गावातील स्वच्छतेचा प्रश्न सार्वजनिक आहे, तो सर्वांनी सोडवायचा.” मी माझं मत मांडलं, पण मत कितीही चांगले असले तरी त्याचा उपयोग नाही, असाच सगळ्यांचा सूर होता.

असं का होत असावं? या प्रश्नांचा भुंगा काही केल्या पिच्छा सोडायला तयार नव्हता. मला वाटतं अशा का नावाच्या प्रश्नांचं उत्तर आपल्या मानसिकतेत दडलंय. जगण्यातील साधेपणाला तिलांजली दिली जाते, तेव्हा बेगडी जगणंच देखणं वाटायला लागतं. अशा जगण्या-वागण्याला माणसं आपलं म्हणायला लागली आहेत. जगण्याची परिमाणं बदलवून माणसं स्वतःला तसे सेट करून घेत आहेत. आपलं सुख आणि आपण या सीमित वर्तुळाला जीवनाचा परिघ करून वागणं घडत असेल तर त्यास कोण काय करेल? सगळ्याच व्यवहाराच्या परिभाषा बदलत आहेत. पैशाला माणसापेक्षा अधिक मोल आले आहे. श्रीमंतीची व्याख्याही बदलून ज्याच्याकडे पैसा अधिक तो लोकप्रिय ठरतो आहे. पूर्वी दारासमोर उभ्या असलेल्या बैलगाड्या आणि बैलजोड्या गावातील आसामी ठरवीत असायच्या. दारासमोरून बैलगाड्या जाऊन ट्रॅक्टर, मोटारसायकली उभ्या राहिल्या. गावात पैसाही बऱ्यापैकी आला. जागतिकीकरणाच्या वाटेने जगण्याच्या दिशा समृद्ध केल्या; पण माणसांची मने मात्र संपन्न होण्याऐवजी संकुचित होत गेली. विज्ञाननिर्मित सुखसाधनं आपणाकडे असावीत, म्हणून अहमहमिका सुरु झाली. आमच्या लहानपणी रेडिओ श्रीमंतीचा निकष असायचा. आज स्मार्टफोन, संगणक, एलइडी टीव्ही वगैरे साधनं असलेली घरं प्रतिष्ठाप्राप्त ठरली आहेत. घरांचा चेहरा सुंदर झाला; पण माणसांचा विरूप होत आहे. आस्था, आपुलकी शब्दांतला ओलावा आटत चालला आहे. पैशाने माणसांचा ताल, तोल आणि तंत्र बदलवलं.

गावागावात राजकारण शिरलं आणि माणसांच्या जगण्याचे रंग पालटले. पूर्वी जत्रेच्या निमित्ताने गावातून तमाशाचे फड रंगायचे. आता राजकारणाने गटतट उभे करून शहकाटशहाचे खेळ रंगू लागले आहेत. कोणत्यातरी निवडणुकीच्या निमित्ताने मने कलुषित होतात. भावकीत दोन गट-तट तयार होणं आता कोणी मनाला नाही लावून घेत. त्याहीपुढे मजल गाठून एकाच घरात दोन भाऊ, दोन पक्षांचे कार्यकर्ते बनतात आणि एकमेकाला पाण्यात पाहतात. कोणत्यातरी संघटनांच्या, पक्षांच्या पावसाळ्यातल्या भूछत्राप्रमाणे जागोजागी उगवलेल्या पाट्या गावात प्रवेशताना हार्दिक स्वागत करू लागल्या आहेत. कोण्यातरी दादा, भाऊ, आप्पाचा वाढदिवस पोस्टर बनून भिंतीवर नाहीतर झाडाच्या फांदीवर लटकतो आहे. कधीकाळी आपलेपणाच्या संवादाने हितगुज करणारा गावाचा पार पोरका वाटायला लागला आहे. शेतात जाण्याचा कंटाळा केला म्हणून पारावरच बापाच्या हाताचा मार खाणारी पोरं आता गावात राहिली नाहीत. आहेत ती स्मार्टफोनच्या मोहजालात गुंतली आहेत. गावातल्या निवडणुका आखाडे बनल्या. विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकाही आमदार, खासदारांच्या निवडणुकांसारख्या लढवल्या जात आहेत.

ग्रामीण जीवनाची आयडेंटीटी असणारे गुरावासरांनी भरलेले गोठे. त्यांची गजबज कुठल्या कुठे पळाली. गोठ्यात बांधलेल्या बैलजोड्या मालकाची आर्थिक क्षमता प्रदर्शित करायच्या. आज बैलांचीच फारशी गरज उरली नाही, तेथे गोठ्यातील इतर जनावरांना कोण सांभाळतो. गावात एकवेळ दूध मिळणार नाही, पण कोणत्याही ब्रान्डची कोल्ड्रिंक्स सहज मिळतात. रस्त्याने प्रवास करणाऱ्या पांथस्थांसाठी पूर्वी पाणपोया असायच्या. आता परमिटरूम, बियरबार नामक तीर्थस्थळे दाटीवाटीने उभी राहिली आहेत. ओठावर मिसरूडही न फुटलेल्यांची पावलं तिकडे वळत आहेत. पूर्वी गावात मद्यपान करणारा कोणी असला की, रस्त्याने लपतछपत घरी येवून गुपचूप पडायचा. व्यसन करणाऱ्यासही मोठ्यांचा धाक वाटायचा. हल्ली बऱ्याच गावात हातभट्टीच्या कौशल्याला बरकत आलेली दिसते. विदेशी पेयाच्या प्रेमात असणाऱ्यांसाठी हाकेच्या अंतरावर सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांची सोय झाली आहे.

गावात लाईट येऊन बरेच दिवस उलटले. दिव्यांचा लख्ख प्रकाश रस्त्यावर ओसंडून वाहतो. चिमण्या, कंदील अडगळीत गेले. लोडशेडिंगपासून मुक्तीसाठी इन्व्हर्टर, बॅटऱ्या आल्या. पणत्यांनी कधीच जीव सोडला आहे. दिवाळीच्या उजेडापुरता त्यांचा सहवास उरला. पूर्वी ग्रामपंचायतीचा शिपाई गावातील रस्त्यावरचे खुटकंदील रॉकेल भरून रोज पेटवून जायचा. आता स्ट्रीटलाईटने त्याचीही अवश्यकता उरली नाही. जात्यावर दळण दळण्याचा, नदीवरून घागरी, हंडे भरून पाणी आणण्याचा प्रश्नच लाईटने संपवला. सकाळच्या प्रहरी ऐकू येणाऱ्या जात्यावरच्या ओव्या मुक्या झाल्या. दही घुसळण्याचे आवाज विजेच्या प्रकाशात हरवले. गोठ्यात गायी-म्हशीच नसल्याने दूधदुभते नाही आणि आहे तेथे ते बाजारात जात असल्याने घरातल्या शिंक्यांवर ठेवलेलं दही, दूध, लोणी आता शोधूनही दिसत नाही. असलेच काही शिल्लक ते फ्रीजमध्ये जाऊन कुडकुडत बसलेय. नसेल तेथे कोणत्यातरी डेअरीतून येऊन तेपण गावात मिळायला लागले आहे. दूधदुभते शब्दातला संपन्न आशय संपून तो गरजेपुरते असा झाला आहे.

शेतीचे आधुनिक तंत्र आणि यंत्र शेतकऱ्याच्या सोबतीला आल्याने शेतातल्या कामांची लगीनघाई संपली आहे. एखाद्याकडे हंगामाच्या दिवसात बैलजोडीची, काम करणाऱ्यांची अडचण असली तर मदतीला जाण्याचे उदारपण उरले नाही. शेतीशी निगडित असणारा एक श्रमजीवी वर्ग कधीकाळी गावातच सुखनैव नांदत होता, त्यांचं जगणं यांत्रिकीकरणाने उजाड होत गेलं. शेतकऱ्याकडे वर्षभराच्या कामाचा मोबदला हक्काने घेणाऱ्या अलुतेदार-बलुतेदारांच्या जगण्याच्या वाटा सैरभैर झाल्या. लोहाराचा भाता वेल्डिंगच्या दुकानांनी विस्थापित केला. कुंभाराचा आवा स्टीलभांड्यांच्या आवाजात आणि फिल्टर पाण्याच्या जाहिरातीत कधीच हरवला. सुतारनेट नेट लावूनही उभं राहण्याच्या परिस्थितीत उरलं नाही. पेरणीच्या दिवसातल्या औजारं तयार करताना तेथे घडणारा संवादही संपला. सोबत आपलेपणही. भांड्यांना कल्हई करणारा, बुडे लावणारा चुकूनही दिसत नाही. सकाळ जागवत येणारा वासुदेव, भविष्य सांगणारे, रोमडी लावणारे, अस्वल, नंदीबैल घेऊन येणारे, माकडवाले, कसरतीचे खेळ करणारे, सुयाबिब्बे विकायला येणाऱ्या बाया यातलं हल्ली कोणी दिसतंच नाही.

शेतीकामाला यंत्रे आल्याने ना मळणी राहिली, ना उपणणी. खळे तयार करायची गरजच संपली. सगळे कसे वेगात होऊ लागले; पण या वेगानेच माणसांच्या जगण्याचा आवेग संपवला. सणावाराला घडणारे संस्कृतीचे दर्शनही बदललं. त्यातही आधुनिकतेने बेगडी झगमग आली. कळत नकळत सगळ्याच गोष्टींचे सीमोल्लंघन घडत आहे. दसऱ्याला दिल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानांतला स्नेह संपला. दिवाळीचा प्रकाश विजेच्या दिव्यांनी सजायला लागला आहे. उकिरड्यावरसुद्धा आस्थेने लागणाऱ्या पणत्यांतील आपलेपणाचा स्नेह हरवला. संक्रांतीचा गोडवा कमी झाला. पोळा, होळी, अक्षयतृतीया, नागपंचमी यासारखे सण आपलं ग्रामीण साजाचं अस्तित्व हरवून बसले आहेत. एक सोपस्कार म्हणूनच उरले आहेत. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत असायचं त्या निमित्ताने भरणाऱ्या जत्रा माणसांच्या आस्थेचा आणि संवेदनशीलतेचा उत्कर्षबिंदू असायचा. मॉलच्या गर्दीत जत्रेतली माणसं हरवली आहेत. बर्गर, पिझ्झाची चव घेणाऱ्या पिढीला जत्रेतल्या गुळाच्या जिलेबीची आणि गोडशेवची चव कशी कळेल. काळाच्या ओघात खाद्यसंस्कृतीही बदलली. मोसमानुसार येणाऱ्या रानभाज्या, खाद्यपदार्थ भूतकाळ झाले आहेत. 
    
तमाशा, कीर्तन, आख्यान आधुनिक काळात लोककला म्हणून अभ्यासाचे विषय झाले आहेत. ढोलकीच्या आवाजाने बेधुंद होऊन भिरकावले जाणारे फेटे आता कोणी वापरत नाही. टीव्हीच्या रंगीत दुनियेने माणसांची मने आकर्षित केली. मुलांचं सायंकाळी गल्ल्यांमध्ये हुंदडणं टीव्हीवरील कार्टून्सनी थांबवलं. माणसे शेतातून परत आल्यावर ओसरीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करायला विसरली. काहीही रियल नसणाऱ्या टीव्ही सिरियल्समध्ये गुंतली आणि तेथेच हरवली आहेत. आमच्याकाळी सायंकाळी मुलांचा खेळण्याचा धिंगाणा अंधाराच्या संगतीने सुरु असायचा. आई जेवणाला बोलावून थकायची; पण खेळणं काही थांबत नसायचे. माणसे गल्लीत खाटा टाकून गप्पा करीत बसायची. पाऊसझडीच्या दिवसात ओसरीवर कंदिलाच्या प्रकाशात शेतशिवार, गुरंवासरं, हंगाम असं काही काही बोलत असायची. एखाद्याच्या शेताला फटका बसायचा, अशावेळी कोणीतरी धीर द्यायचे. त्याच्या मनाला उभारी यायची. एक आस्था जगायची. बोलण्याने मने हलकी होत जायची. नकळत स्नेह वाढायचा. त्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज नसायची. आज हे सगळं थांबलं आहे. एक उदासपण परिसरावर पसरलेलं आहे. असं किती आणि काय काय आम्ही या बदलांमध्ये हरवलंय कोणास ठावूक.

आपलेपणाचा ओलावा हल्ली सगळीकडेच वरचेवर कापरासारखा उडत चालला आहे, असे उगीचच वाटायला लागले आहे. आपलेपणाभोवती कोणतीतरी अदृश्य चौकट उभी राहते आहे. या चौकटीने आतले एक आणि बाहेरचे एक अशा दोन जगात विभागणी केलीय. आपलेपणाच्या ओलाव्यातून पाझरणारा माणुसकीचा झरा आटत चालला आहे. चौकटींबाहेरील जग माणसांना सैरभैर करते आहे. आपलं काहीतरी शोधण्यासाठी माणसे वेड्यासारखी धावत आहेत. धावताना हेलपाटत आहेत. धावून धाप लागत आहे, तरी आभासी सुखांमागे मनाचा वारू मुक्त उधळतोय, तोंडाला फेस येईपर्यंत. आपण असे का धावत आहोत? आपणास काय हवे? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची गरजच उरली नसल्यासारखे. अर्थात याला काही अपवाद जरूर आहेत; पण अपवाद म्हणजे काही नियम नसतो. कालाय तस्मै नमः म्हणतात. काळाची गती जाणून प्रगती करतो तो टिकतो बाकी संपतात, हे मान्य. पण काळ अनंत, अगाध असला तरी त्याच्या उदरातून निर्माण होणारा स्नेह, सात्विकता, संस्कार, सौंदर्य हे संस्कृतीचं संचित असतं. संस्कृतीने हाती दिलेलं हे पाथेय सोबत घेऊन जगण्यात प्रकटणारा साधेपणा हीच माणसांची खरी दौलत असते. माणसांच्या जगण्यात बदलांची गती असावी, प्रगतीही असावी; पण शेकडो वर्षाच्या मंथनातून हाती लागलेल्या मूल्यांचं मोल देऊन नाही.
***

Anvay | अन्वय

By // 10 comments:
अन्वय आत्ममग्न असण्याचा

टीव्हीवर कार्यक्रम पाहत निवांत पहुडलेलो. शेजारीच मोबाईल पडलेला. रात्री दहा-अकराची वेळ असावी. फेसबुक, व्हॉटसअप, हाईकची घरं शोधत कुठून कुठून येणारे मॅसेज इनबॉक्स मध्ये येऊन धडकतायेत. वेगवेगळ्या रिंगटोन्सचा आवाज आपल्या आगमनाचा सांगावा घेऊन येतायेत. त्या आवाजांनी लक्ष विचलित होते. कोणते मॅसेज आलेयेत, हे पाहण्यासाठी उत्सुकतेने मोबाईल उचलतो. एव्हाना इनबॉक्समध्ये येणाऱ्या आगंतुक संदेशांची गर्दी बरीच वाढत चालली आहे. मॅसेज चाळताना मोबाईलमधील संपर्क नामावलीत आसनस्थ असणाऱ्या माझ्या एका सहकाऱ्याच्या नावाकडे लक्ष गेले. सहसा कोणाला मॅसेज न पाठवणारा हा गडी. ठरवून मॅसेज पाठवतो म्हणून कुतूहल जागे झाले. वाचून पाहूया, म्हणून पाहिला. ‘संपर्कमाध्यमे: किती उपयुक्त किती अनउपयुक्त’ याबाबत त्याला काही मुद्दे हवे होते. कुठल्यातरी निबंध, वक्तृत्त्व स्पर्धेत त्याचा चिरंजीव सहभागी झाला होता. म्हणून ते पाठवण्याची विनंती केलेली. तो मॅसेज वाचून क्षणभर मनाशीच हसलो. मीडियाचे माध्यम वापरून तू तरी काय करतो आहेस? असा प्रश्न त्याला विचारावासा वाटला, पण तो मोह टाळून त्याच्या समाधानासाठी दिले काही मुद्दे पाठवून.

निमित्त म्हणून हाती घेतलेल्या मोबाईलच्या मायाजालात एव्हाना नकळत गुंतत गेलो. आलेले मॅसेज वाचतांना त्यात हरवलो कधी ते कळलेच नाही. अर्थात हेही नेहमीचेच. एकदा का या मोहजालात गुंतले की, कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेल्या किटकासारखी स्थिती होते. कितीही सुटायचा प्रयत्न करा मुक्तता होणे अवघड. गुरफटणेच जास्त. समोर टीव्हीवर जाहिरातींचा अखंड रतीब सुरु. त्यांचा गलका वाढलेला. प्रत्येकजण आपलेच उत्पादन कसे उत्तम, हे पटवून सांगतोय. ते सांगण्यासाठी गरज असली काय, नसली काय, तरी आखीव, रेखीव देहाच्या लावण्यवती लचकत, मुरडत सुहास्य वदनाने पडद्यावर येतात. नाजूक किणकिणत्या आवाजाने काही सेकंदाचा संवाद साधतात. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्ही टीव्ही घेतला, त्यासाठी डिश आणला तर आम्ही ठरवू तेच पहा, हे त्यांनी परस्परच ठरवलेलं. कार्यक्रम पाहण्यासाठी महिन्याचे काही पैसे तुम्ही मोजत असलात तरी. दुसरा विकल्पच नसल्याने आलिया भोगाशी... म्हणत समायोजन साधणे एवढेच दर्शकाच्या हाती असते. या जाहिराती कितीजण मनापासून पाहतात, ते जाहिरातदारांनाच माहीत. ब्रेकमध्ये मोबाईल हाती घेऊन बसतो. मोबाईलच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित झाल्याने त्या आरडाओरडीचा परिणाम गोंगाटाशिवाय दुसरा शून्यच. मॅसेज एकेक करून वाचले जातायेत. काही आधी, काही नंतर एवढाच काय तो फरक.

मोबाईल आवश्यक की अनावश्यक, हा वादाचा विषय असू शकतो. त्याचं समर्थन करणारे तो दैनंदिन जीवनाची अनिवार्य आवश्यकता कसा ते आग्रहाने सांगतात. विरोधी मत असणारे हे उगीचच ओढवून घेतलेलं विकतचं दुखणं असल्याचं पटवून देतात. कुणी काही म्हणाले, नाही म्हणाले तरी यामुळे परिस्थितीत फारसा काही फरक पडत नाही. ज्याला जे करायचे, ते तो करतो, हेच वास्तव आहे. तसे नसते तर स्मार्ट झालेल्या मोबाईलने माणसांच्या मनांवर एवढी मोहिनी घातलीच नसती. घरात एकवेळ पुरेशा सुविधा नसल्या तरी चालेल; पण मोबाईल असलाच पाहिजे, हा सार्वत्रिक आग्रह. कधीकाळी संवादापुरता सीमित असणारा मोबाईल तंत्रक्रांतीच्या मार्गाने विकसित होत स्मार्ट झाला; पण माणसे तंत्रज्ञानाचा वापर करताना आपला अंगभूत स्मार्टनेस विसरली. महिन्यामहिन्याला बदलणाऱ्या त्याच्या रंगरुपाने विचलित झाली. कंपन्यांमधील तीव्र व्यावसायिक स्पर्धेतून तो नुसता स्मार्टच नाही, तर सुंदर आणि स्वस्तही झाला. संवादाव्यतिरिक्त संप्रेषणाच्या साऱ्या प्रवाहांना आपल्यात सामावून घेताना प्रतिष्ठेचे प्रतीक बनला. नवा मोबाईल, त्याचे नवे मॉडेल हाती असणे प्रगती, तर जुन्या मॉडेलसह वावरणे तंत्रक्षेत्रातील मागासपणा समजला जातोय.

काळासोबत तंत्रज्ञानही कूस बदलते आहे. ते आवश्यकही आहे. तंत्रज्ञानाला परिणत संवेदनांचा स्पर्श असला, तर ते उपयुक्त असते, याबाबत कुणाच्या मनात संदेह असण्याचे कारण नाही. हल्ली सर्वच क्षेत्रात संवेदनांचा प्रवास उतरणीला लागल्याचे बोलले जाते. विश्वाच्या पसाऱ्यात माणसांचे वेगळेपण अधोरेखित करणारे काही असेल, तर त्याच्याजवळ असणारे संवेदनशील मन. मनाचे व्यापार प्रसंगोत्पात कसे असतील, असावेत; याचं विश्लेषण मानसशास्त्रज्ञ करतील. पण हल्ली संवेदनांचा अर्थच मानसशास्त्रज्ञांनाही कळणे अवघड होत चालले आहे की काय, असे वाटण्याइतपत माणसांचे विचार गोठत चालले आहेत. भावना बोथट होत आहेत. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातात मदत करा, म्हणून फलक समोर दिसत असतात. दुर्दैवाने रस्त्यावर एखादा अपघात घडतो, तेव्हा मदती ऐवजी कुणीतरी आपल्याकडील मोबाईलमध्ये रक्ताळलेले चेहरे चित्रांकित करण्यात गुंतलेला असतो. त्याला ते फॉरवर्ड करायची घाई झाली असते. अपघातग्रस्त मदतीची याचना करीत अखेरच्या आचाक्यांकडे सरकत असतो आणि याच्या मोबाईलचा कॅमेरा झूम होऊन वेदनांनी विव्हळणाऱ्या चेहऱ्याजवळ पोहचत असतो. कुठलं हे आपलं माणूसपण? अशावेळी विचारांना थोडातरी वाव नसावा का? की माणसांची मनेही बर्फासारखी गोठत चालली आहेत?

कुणीतरी तो-ती कुठल्याशा तरल क्षणी एकमेकांच्या समीप येतात. स्नेहाच्या रेशीमधाग्यांचे गोफ विणले जातात. सहवासातून सहजपणे जवळीक वाढवण्याचं काम निसर्ग करीत राहतो. माणसं त्याला प्रेम, मैत्री, स्नेह वगैरे अशा काही गोंडस नावांची लेबले लावतात. झोपाळ्यावाचून झुलणाऱ्या क्षणांना सोबत घेऊन मने स्वप्नांच्या आकाशात विहरत असतात. त्या हळुवार क्षणांना स्मृतीच्या कोंदणात कायमचे कोंडण्याचा मोह ठरवूनही टाळता येत नाही. कॅमेराच्या डोळ्यांनी दृश्ये नजरबंद होतात. टिपलेल्या छब्या स्वतःच्या मर्जीने फेसबुकच्या वॉलवर चिटकवल्या जातात. अर्थात हा स्वखुशीचा सौदा असला, तरी त्याला सर्वजनिकतेचा स्पर्श लाभतो, तेव्हा संस्कारांच्या सीमारेषांचे सीमोलंघन घडते आहे का, हे पाहण्याचा विचार मनात येतोच असे नाही. हवे नको ते कॉमेंट्स ललाटी मिरवत त्यांचा प्रवास घडत राहतो. आप्त, मित्र, स्नेही अशा मार्गावरून प्रवास करीत राहतो. त्याच त्या छापाचे अर्थहीन लेबले ललाटी लावून त्यास अप्रतिम म्हणण्याची अहमहमिका लागते. आशयघन शब्दांचा दुष्काळ असलेल्या फालतू कॉमेंट्सची रेखाटने करीत ती पोस्ट भटकत राहते. कधी कुण्या छुप्या नजरेचा पाठलाग घडत राहतो. नको तितक्या समीप आणणारे क्षण कॅमेराच्या करामतीने कंटकांच्या कराल हाती लागतात. आणि पुढचा वेदनादायी प्रवास सुरु होतो. ते सार्वजनिक होताना कुणा अश्राप जिवाचे आयुष्य पणाला लागते. विकृत मानसिकता धारण करून वावरणाऱ्या विचारांचे विकृत शब्द एखाद्या पोस्टवर शब्दांकित होऊन जटिल प्रश्न निर्माण करतात. छुप्या नजरेने कॅमेरा कुठे डोकावेल, हे सांगणं ब्रह्मदेवालाही अवघड आहे. सार्वजनिक ठिकाणी सावज हेरण्यासाठी विकारग्रस्त नजरा भिरभिरत असतात. कपड्यांच्या दुकानातील ट्रायलरूम्सपासून हॉटेल्समधील रूम्सपर्यंत. तेथील मिनिटाच्या चित्रीकरणाने अनेकांच्या आयुष्याची झालेली वाताहत आपण ऐकतो, तेव्हा मनात विचार येतो, ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस.’

डोंगराच्या सुळक्यावर बसून मुलांनी काढलेला सेल्फी काही दिवसापूर्वी सर्वत्र संचार करीत होता. पाय खाली सोडून ही मुले बसली होती तेथून शेकडो फूट खोल दरी खाली. पाहणारा अवघडून जावा असे दृश्य. सेल्फी काढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपण कोणी जगज्जेते सिकंदर, नेपोलियन असल्याचे भाव. एका क्षणाची चूक आणि तिचे भीषण परिणाम काय असू शकतात, हे न समजण्याइतपत ही पोरं विचारांनी वंचित असतील का? सेल्फीच्या नादात जीव गमावणाऱ्यांची उदाहरणे काही कमी नाहीत. जगात रोज लाखोंच्या संख्येने सेल्फी माध्यमांतून फिरत असतात. उगीचच वेडेवाकडे चेहरे करून, विक्षिप्त हावभाव करीत  काढलेली छायाचित्रे फॉरवर्ड करून त्यांना लाईक्स, कॉमेंट्स किती येतील, याची वाट पाहणारे अनेक वेडे जगात आहेत. सतत सेल्फी काढून स्वतःला मिरवत राहावसं वाटणं मनाचा असमतोल प्रदर्शित करीत नाही का? सेल्फी आजार होऊ पाहतो आहे. वैयक्तिक जीवनातील कोणत्या गोष्टी सार्वत्रिक कराव्या, याचेही तारतम्य प्रसिद्धीसन्मुख राहणाऱ्यांना नसावे का? अशा माणसांना स्थलकालाचे काही भान नसावे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या वर्तनात दडलेले असते. माणसाला मुळात मिरवण्याची हौस असतेच. तो कितीही नाही म्हणत असला तरीसुद्धा. कोणीतरी आपल्याला पाहतो आहे, आपल्या वर्तनाला अधोरेखित करतो आहे. हे विचार सुखावणारे असतात. हल्ली मिरवण्यासाठी अनेक प्रगत, अधिक वेगवान साधने हाती आल्याने मिरवणूक सुलभ झाली आहे, हेही सत्यच.

काही दिवसापूर्वी माध्यमांच्या संदर्भात आम्हा मित्रांमध्ये बोलणे सुरु असताना माझ्या एका स्नेह्याने त्याच्या मित्राच्या वर्तनविषयी त्याला आलेले अनुभव सांगितले. म्हणाला, स्वतःभोवती प्रसिद्धीचे आभासी वर्तुळ तयार करून त्यातल्या मृगजळी सहवासात रमणारा हा माणूस. त्याच्या स्वभावाचे अनेक परिचितांनी अनेक मार्गांनी विश्लेषण केले. या माणसाबाबत सगळीकडून उत्तर एकच, स्वतःला मिरवून घेण्यापलीकडे याच्याकडे आणखी काहीही नाही. काहींना मिरवण्याची हौस असते, त्यातलाच हा एक. काहीही करेल, पण प्रसिद्धीच्या प्रकाशात आपण राहायलाच हवे, असे वाटणारा. तीच जगण्याची निदान आपल्यापुरती तरी सुयोग्य रीत मानणारा. कुणी निंदा अथवा वंदा... असे याचे वावरणे. फेसबुकवर शेकडो मित्र, त्यांचे हजारो लाईक्स, व्हॉट्सअपवर एवढे मित्र, त्यांचे असे गृप, हे सांगण्यात श्रीमंती मानणारा. आत्मस्तुतीत रमणारा. स्वतःसाठी अनेक बिरुदावल्या लावून घेणारा. समोरची माणसे आपलं निरीक्षण करतायेत, वर्तनाचे विश्लेषण करीत आहेत. ते काय म्हणतील, याची जराही तमा न बाळगणारा. बरे कुणी समजावून सांगितले, तरी वर्तनात काडीचाही फरक न पडणारा. अशी माणसे शेकड्याने आपल्या आसपास संचार करीत असतात. समाज यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असतो. आत्ममग्न माणसांसाठी माध्यमे मदतीला धावून आली आहेत. व्हर्च्युअल जगात रमणाऱ्यांना अॅक्च्युअल जगाशी डिसकनेक्ट करणारी मनोवृत्ती अमरवेलप्रमाणे वाढतेच आहे. ज्या झाडाच्या पर्णसंभारावर चढली तेथूनच विस्तारणारी. अशा काही प्रसिद्धीपरायण पुण्यात्म्यांच्या सहवासाने पावन होणारी ही साधने अशावेळी वैताग वाटायला लागतो.

स्वतःच्या सर्जनशील विचारांचा अविष्कार असेल आणि तसे काही विचार संप्रेषण माध्यमातून पाठवले जात असतील, तर कुणास संदेह वाटण्याचे काही कारण नाही. कुठूनतरी कॉपी करायचं आणि पेस्ट करून मिरवायचं व्यसनच काहींना लागले आहे. ना त्याला अर्थ, ना कोणते मोल. सगळा कचराच उडत असतो इकडे तिकडे. बरे समोरच्यास काय आवडेल, हे त्यांनीच परस्पर ठरवून घेतलेलं. गृपवर एकच मॅसेज परतपरत फिरून येत असतो. तो पाठवतांना जरा विचार तर कराल की नाही. गृपवर आहात तर आधी बघाना काय आलंय; पण नाही, यांना घाई झालेली. कुठल्यातरी फालतू चित्रावर, संदेशावर पसंतीची मोहर अंकित. व्वा! मस्तच! एक नंबर! असे काय काय लेबले लावून मैत्रीच्या गंधाने उतावीळ गृप दरवळत असतात. हल्ली तसेही माणसांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हसू हरवलेच आहे. ते स्माईलीतून उसनवार घेऊन हसरे चेहरे शोधण्याचा तर्कहीन प्रयत्न घडत राहतो. वाढदिवस शुभेच्छांच्या शुष्क कर्मकांडात पार पाडण्याची चढाओढ लागलेली असते. चित्रांचे केक आणि कुणीतरी केलेल्या अर्थहीन विशेषणांनीमंडित काव्यपंक्ती पाठवण्याची स्पर्धा सुरु असते. वाढदिवस साजरा करताना चिखलात लोळून घेतल्यासारखा केक चेहऱ्यावर चिटकवून काढलेले फोटो नित्याचे झाले आहेत. औपचारिक अभिनंदनात पार पडणाऱ्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणाऱ्याच्या मनात खंत असते. मी शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून समोरच्यास वाईट तर वाटणार नाही ना! म्हणून पाठव काहीतरी. माणूस भावनांनी एवढा क्षूद्र झाला आहे का? कुणी शुभेच्छा नाही दिल्या, म्हणून वाढदिवस पुढे वाढायचा राहणार आहे का?

माणूस समाजशील वगैरे असल्याचे म्हटले जाते. पण समाजपरायण असणे आणि तसेच वर्तने यात बरंच अंतर वाढत चाललंय. समाजाच्या प्रगतीसाठी माध्यमांतून काहीच घडत नाही, असे नाही. काही चांगलेही घडते आहे. पण सामाजिकतेच्या नावाखाली संपर्कमाध्यमातून चमकण्याची संधी शोधली जाते, तेव्हा शहाण्या माणसाने न बोलणंच संयुक्तिक ठरते. कोण्यातरी नेता, अभिनेता, खेळाडूच्या यशाचा उत्सव करणारे अनुयायी कोणती भक्ती प्रकट करतात कोणास ठावूक. इतिहासाच्या पानात विसावलेल्या आणि आपल्या असीम कर्तृत्त्वाची नाममुद्रा कालपटावर अंकित करीत, समाजासाठी आदर्शांची परिमाणे उभी करणाऱ्या थोरांच्या जीवनाचे चित्रण करून त्याखाली आपली छबी चित्रांकित करणाऱ्यांना महापुरुषांचे इहलोकी घडलेले अनुपम कार्य अभ्यासाने तरी अवगत झाले आहे का? असा प्रश्न कोण्याही विचारी माणसाच्या मनात आल्यास नवल वाटायला नको. बरे येथेही थोरांच्या कार्याला विविध जाती, धर्म, पंथ, वंश आदी चौकटींमध्ये बंदिस्त केलेले. ज्यांनी जात, धर्म, वंश भेदांच्या भिंती उभ्या करण्याचा कधी चुकुनही विचार केला नाही. अवघं विश्वच आपलं घर समजून जीवनयापन करणारी ही निर्मोही माणसे. चमकणाऱ्या माध्यमांच्या जगात आंधळ्या अनुयायांच्या विचारांच्या वर्तुळात कोंडले जातात. खरंतर ज्यांच्या जीवनकार्याच्या ज्योतीच्या प्रकाशात सद्विचारांचा पथ सहज सापडावा, त्यांच्या विचारांना वैयक्तिक अभिनिवेशात बंदिस्त करून कोणते समाधान प्रसिद्धीपरायण भक्तांच्या अंतर्यामी उदित होते, सांगणे अवघड आहे.

हल्ली कुठल्या कारणांनी माध्यमांचा वापर करायचा, याचं भान समाजाने सोयिस्कररित्या विस्मृतीच्या कोशात टाकून दिले आहे की काय, असे वाटायला लागले आहे. फेसबुकवर माझे हजार मित्र आणि गल्लीत विचारात नाही कुत्रं, अशी स्थिती आसपास दिसते. माणसातला व्हर्च्युअल संवाद वाढतोय; पण अॅक्च्युअल संवाद संपतोय, त्याचं काय? एक काळ होता, जेव्हा माणसं गावाच्या पारावर, घरी, ओसरीवर, अंगणात चार घटका एकत्र येत. आपापसांत बोलणं घडत रहायचं. भावनांच्या वाटावरून आस्थेचा संवाद घडायचा. संवादाला आपलेपणाचा स्नेहिल स्पर्श लाभायचा. सारंकाही फेस टू फेस असायचं. राग, लोभ, मैत्रीचे बंध जुळवत माणसं जवळ यायची. आजचं चेहरा हरवलेलं जगणं नसायचं. हल्ली प्रत्येकच आत्ममग्न होत चालला आहे. मोबाईलच्या चारपाच इंची खिडकीत बंदिस्त होत आहे. मराठीत एक म्हण आहे, नऊ घरं आणि वाकडी दारं. आज घराची दारं बंद आहेत आणि घरात माणसं बंदिस्त. फ्लॅट संस्कृतीत स्पेस नावाचा विचार की विकार मूळ धरू लागला आहे. स्पेस नावाखाली स्वातंत्र्याचा सोयीस्कर अर्थ शोधला जातोय.

हल्ली कुठेही गेले तरी माणसांची डोकी मोबाईलमध्ये आणि डोळे स्क्रीनवर विसावलेले. संवाद मित्रांसोबत, पण अवधान दुसरीकडेच. कार्यालये, सिनेमागृहे, प्रवास काहीही असो साऱ्यांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खिळलेले दिसतील. कुठल्यातरी वक्त्याच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आधीच सूचित केलेले असते मोबाईल बंद ठेवा. पण कुणीही फारसं मनावर घेत नाही. मध्येच रिंग वाजते. माणसं सरावाने दुर्लक्ष करीत राहतात. काही क्षणभर चिडतात, पण काहीच करू शकत नाहीत. कारण आमचे सार्वजनिक वर्तन असेच असते. एवढेच काय; पण शाळा, महाविद्यालये- जेथे ज्ञानसाधना घडते, तेथे तरी आपापसात संवाद आहे कुठे. पूर्वी शिक्षकदालनात शाळा, शिक्षण, पुस्तके, विद्यार्थी असं काहीकाही शिक्षक आपापसांत बोलत असायचे. चर्चा घडायच्या. वादसंवाद रोजच असायचा. ऑफ तासिका विचारांचा जागर असायच्या. आता प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतला आहे. गुंतलेली माणसे अस्वस्थ होत आहेत. बेचैन झालेली मने उगीच द्वेषाचा, मत्सराच्या मुलाम्याचे मनावर लेपन करीत आहेत. आत्मलीन, आत्ममग्न होणाऱ्या माणसाकडून घडणारी प्रत्येक कृती संवादाला संपवते आहे. अर्थात याची जाणीव कुणास नसेल, असे म्हणणे विपर्यस्त ठरेल. तुटत जाणारी नाती संवादातून कधीकाळी सांधली, बांधली जायची. परिस्थितीच्या आघाताने विखुरलेली माणसे सावरली जात होती. हल्ली नाती विसरलेला संवाद तंत्रज्ञानातून निर्माण झालेली विसंगती ठरू पाहत आहे. दुर्दैव हेच की, हे सगळं माणसांना कळतंय; पण वळत मात्र नाही.

लहानापासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या मनावर मोहिनी टाकणारं हे तंत्रज्ञान सररास वाईट आहे, असे म्हणण्याचे कारण काहीच नाही. तंत्रज्ञान कधीच वाईट नसते. चांगली किंवा वाईट असते, त्यास वापरण्याची पद्धत. तंत्रज्ञान कोणत्या हातात आहे आणि त्या हाताना नियंत्रित करणारे विचार कसे आहेत, त्यावर त्याचे मोल ठरत असते. तंत्रज्ञानाचा मोठा दोष कोणता असेल, तर ते मुक्त असणे हाच आहे. विचारवंतापासून समाजकंटकांपर्यंत कोणालाही त्याचा वापर करता येतो. वापरकर्ता कोण, कसा असेल त्यावर त्याचे परिणाम ठरतात. कधीतरी अनेक वर्षापासून हरवलेलं कुणी या तंत्रज्ञानाच्या संवादाने सापडते. कुण्या पीडितांच्या मुक्तीचे मार्ग माध्यमांचा वापर करून सापडतात. कुण्या गरजवंतास वेळीच मदत पोहचते. कधी विशिष्ट विचारांचे विखार पेटवून वातावरण कलुषितही होऊ शकते. कुणाच्या आयुष्यभराची पुंजी एका क्लिकने लंपास होते. कुणाच्या नावाने फेसबुकची खोटी पेजेस तयार करून अश्लाघ्य वर्तन घडते. कधी विचारांच्या शांत जलाशयात अविचारांचे विष पेरले जाते. माणसे भडकतात आणि दिसेल त्यावर जाऊन धडकतात. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. कधी व्यवस्थेच्या विरोधातले आवाज क्रांतीचा उद्घोष करीत माध्यमांच्या भिंतींवर प्रकटतात. तर कधी अन्यायाच्या विरोधात विचारांना धार लावली जाऊन राजकीय, आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवता येणे शक्य असल्याचे संदेश येथूनच भटकत राहतात. अज्ञात असणारे परगणे, दुर्लक्षित असणारे काम आणि ते करणारी माणसे, सहज घडणारी सेवा माध्यमांच्या संवादातून समाजासमोर येते. सद्विचारांचे मळे फुलत जातात. असं बरंच कायकाय हे तंत्रज्ञान करू शकतं. अर्थात हे वापरणारे हात कोणाचे आणि त्या हातांना वळण देणारे विचार कोणते आहेत, तेच हे ठरवू शकतात.

डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहताना प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग कसा व्हावा, हे ठरवणं अवघड नाही. तंत्रज्ञानाला स्वतःचा चेहरा असावा तो नुसताच देखणा नसावा, तर विचारांनी युक्त असावा. पण हल्ली विचारांची शक्तीच क्षीण होत चालली आहे की काय, असा संदेह विचारांमध्ये निर्माण होऊ पाहतो आहे. कसलाही विचार न करता पोस्ट फॉरवर्ड करणं. खाजगी जगण्यातले क्षण सार्वत्रिक करणं, एखादं क्षुल्लक यश जगजाहीर करणं, एखाद्याचा वाढदिवस म्हणजे कोण्या महात्म्याचा वाढदिवस असावा, या अभिनिवेशात साजरा होतांना फडकत राहणं. हे जरा अतीच होतंय. मीडियावर सकस, सुंदर, संवेदनशील असंकाही नसतं, असं अजिबात नाही; पण ते बोटावर मोजण्याइतकेच. बाकी सारा उकिरडा, असे कोणास वाटत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? तरीही आम्ही या कचऱ्यात का भटकतो आहोत? याचं उत्तर माहीत असूनही कोणी काहीच कसे करीत नसावं? मनात उदित होणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे कोणत्या संपर्कमाध्यमातून शोधावीत?

Kalaha | कलह

By // 10 comments:
कलह, भांडण, संघर्ष, तंटा, वाद असे शब्द बऱ्याचदा त्यांच्या अर्थाचा आशय भिन्न असला तरी बहुदा भांडण या अर्थाने वापरले जातात. अर्थात ढोबळमानाने या शब्दांचा वापर करायचा असेल तर. संघर्ष या अर्थाने बोलताना कलह हा शब्द विपुल प्रमाणात वापरला जातो. मला नाही वाटत या शब्दाविषयी आपल्यापैकी कोणी अनभिज्ञ असेल. जीवनात प्रत्येकाने कधीतरी लहानमोठ्या कलहांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतोच असतो. तसं पाहता कलह शब्दाचा वावर जितका वैयक्तिक असतो तितकाच वैश्विकदेखील. त्याच्या अस्तित्वाच्या सीमा स्वपासून सर्वस्वापर्यंत नेऊन शोधता येतात.

कलहप्रिय परिस्थिती आणि माणसेही कोणास आवडत नाहीत. हा अनुभव सार्वत्रिक असला तरीही कलह घडवून आणणारा परिस्थितीशिवाय आणखी एक घटक माणूसच असतो, हे सत्यही नाकारता येत नाही. जीवनात कलह नसणारा माणूस शोधून सापडणे मुश्कील आहे. जन्मापासूनच माणसांची संघर्षयात्रा सुरु असते. इहलोकी जन्म घेऊन वातावरणात त्याने घेतलेला पहिला श्वास त्याच्या वाट्यास आलेल्या संघर्षाचे फलित असते. जीवशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून एखादाच मॅरेथॉन रेस जिंकतो. ओव्हमशी संपर्क घडून जीव नावाचा आकार निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. खरंतर तेव्हापासूनच या संघर्षाला प्रारंभ होतो. अपेक्षित लक्षाच्या दिशेने धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून काहीच जगतात. बाकीचे मरतात. जगलेल्यातील एखादाच शक्तिशाली असतो, तो अपेक्षित लक्ष गाठतो. जीव नावाचा देह धारण करून आकाराला येईपर्यंत निर्मितीचा संघर्ष सुरूच असतो. जिवांच्या विकासक्रमातील सगळ्याच अवस्थांमध्ये पुढेही अटळपणे सोबत करीत राहतो. या अंगाने विचार करताना संघर्षाचे गुण आपल्या गुणसूत्रांसोबत घेऊनच कोणताही जीव धरतीवर येतो. नंतर सुरु होतो पुन्हा त्याच्या जगण्याचा आणखी एक नवा दीर्घकालीन कलह, हा असतो टिकून राहण्यासाठी.

कलह सजीवांच्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांना व्यापणारा आणि सामावून घेणारा आहे. माणसांच्या आदिम अवस्थेत जिवंत राहण्यासाठी आणि उदरभरणाच्या प्रश्नांपोटी कलह घडत राहिले आहेत. आपला परगणा, परिवार सुरक्षित राखण्यासाठी आणि परिस्थितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माणूस इतरांशी भांडत राहिला आहे. या कलहात स्वरक्षण हेतू असला तरी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न त्यास आंतरिक समाधान देणारा, सुखावणारा असतो. मनोवांछित सुख संपादन करताना माणूस केवळ माणसांशीच लढत राहिला असे नाही. निसर्गातील इतर जिवांशीसुद्धा त्याला दोन हात करीत राहावे लागले आहे. याहीपेक्षा टिकून राहण्यासाठी अधिक तीव्र संघर्ष निसर्गासोबत त्याला करावा लागला आहे. नैसर्गिक संकटांमधून सहिसलामत सुटकेसाठी संघर्षरत असणाऱ्या माणसांना कलहांनीमंडित आयुष्याची सोबत घडणं अनिवार्य होतं. या टाळता न येणाऱ्या संघर्षाचे स्वरूप गरजांनुसार वेळोवेळी बदलत गेले आहे. म्हणूनच जगण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी घडणारा संघर्ष सजीवांची प्राक्तनरेखा ठरला आहे. कोणत्या प्रसंगी कोणास काय हवे, त्यानुसार कलहाचे स्वरूप ठरत आले आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत त्याच्या परिणामात प्रासंगिक परिवर्तन घडत आले आहे. जगात घडलेल्या, वाढलेल्या संस्कृती माणसांच्या हजारो वर्षाच्या संघर्षयात्रेचे फलित आहेत.

रामायण, महाभारत यांना महाकाव्ये म्हणून माणसांच्या मनात मान्यता आणि मान असला, तरी या काव्यांचा केंद्रबिंदू संघर्ष आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. राम-रावण संघर्षात मर्यादांचे घडलेलं उल्लंघन कलहाचे कारण ठरले. तर महाभारतात मानिनीचा झालेला अधिक्षेप युद्धाचे निमित्त ठरला आहे. दोन्ही ठिकाणी ‘स्त्री’ संघर्षाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते; पण या संघार्षांमागे तेवढेच एक कारण आहे असे वाटत नाही, कारण त्या कलहकेंद्राभोवती असणारे अनेकांचे दुखावणारे अहं आणि सन्मानाचे, आत्मसन्मानाचे निकष माणसांना संघर्षापर्यंत ओढत नेणारे ठरले आहेत. मर्यादांचे बांध फोडले जातात, समाजाने निर्माण केलेल्या नियमांच्या आणि नैतिकतेच्या चौकटी तोडल्या जातात, तेव्हा कलह अटळ ठरत असतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती अन्यायातून मुक्तीसाठी घडणाऱ्या विधायक कलहाची प्रतीके आहेत. हा कलह विस्तारवादी सत्ता, सर्वंकष सत्ताधीशांच्या विरोधातला सर्वसामान्यांचा एल्गार होता. कोणतीतरी सर्वंकष सत्ता निर्धारित वर्तुळात राहून सत्तेचा वापर करायचे नियम नाकारते. ताल, तोल, तंत्र सोडून स्वार्थासाठी सत्तेचा वापर करायला लागते. सर्वसामान्यांचे जगणे अशा व्यवस्थेत दुष्कर होते, तेव्हा माणुसकीच्या परित्राणासाठी कोणासतरी हाती शस्त्रे धारण करायला लागतात. व्यवस्थापरिवर्तनासाठी घडणाऱ्या कलहात अनेक अनामिक जिवांच्या आहुती पडतात. तरीही माणूस अशा कलहाचे मोल चुकवूनही आनंदी असतो. असं का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्याच्या स्वातंत्र्यप्रिय मानसिकतेत दडलंय असं वाटतं.

कलहप्रियता सोबत घेऊन जगण्यातही कदाचित मानसिक समाधानाचे काही धागे अनुस्यूत असावेत असे वाटते. माणसाचं मन सुखावण्याइतकी माणसांच्या जगात कोणतीच भावना सुखाची नाही. एखादी व्यक्ती पद, पैसा, प्रतिष्ठेचा वापर इतरांवर जरब बसवण्यासाठी करते, तेव्हा त्याच्या अंतर्यामी असणारा अहं सुखावतो. याकरिता हाती असणाऱ्या पदाचा, अधिकारांचा वापर करून निम्नस्तरावर असणाऱ्या लोकांना प्रताडित करून तो आनंदतो. इतरांना आपण आपल्या अंकित ठेवतो, आपल्या कलाने वर्तण्यास बाध्य करतो, असे वाटणे सत्ताधीशांना सुखावणारे असते. भलेही अशा वर्तनाला नैतिकतेचे कोंदण नसले तरी. कोणी भाईगिरीच्या मार्गाने भीती निर्माण करून सुखावतो. पण हे घडताना स्वअस्मितेच्या तंत्राने चालणाऱ्या माणसांना आपल्या प्रतिष्ठेवर आघात होतोय, असे वाटते आणि ते या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी उभे राहतात. दोन भिन्न वृत्तींमध्ये घडणारा हा कलह सुष्ट आणि दुष्ट असे रूप धारण करतो.

एकाच वर्गात शिकणाऱ्या बालवाडीतील लहान मुलांमध्येही निर्व्याज कलह असल्याचे आपण पाहतो, अगदी पेन्सिलचा एक लहानसा तुकडा घेण्यावरून. थोडे मोठे झाले की समवयस्क मुलांच्या समूहातही दबंगगिरी करण्यासाठी तो सांभाळला जातो. यौवनातील कलह कोण्यातरी तिच्यावर जीव जडला म्हणून सर्वस्व उधळून लावण्यासाठीही घडू शकतो. आप्त, स्वकीय, परिवार, समाजासोबत आपल्या प्रिय पात्राच्या प्रेमासाठी विरोध पत्करताना होत राहतो. विवाहाच्या सप्तपदीवरून फेरे घालून संसारात पावलं रमल्यावर दोघांमध्ये घडणारा कलह ‘भांड्याला भांडं लागणं’ या नावाने ओळखला जातो. अर्थात समाजात घडणाऱ्या कोणत्याही भांडणांना अहंचे टोकदार काटे असतातच. या काट्यांनी कोणी घायाळ होत नाही तोपर्यंत सारे ठीक असते; पण त्याची टोकं टोचायला लागली की, शेवट माणसं दुरावण्यात होतो. कधीकधी संसारातले ताणून धरलेले वैयक्तिक अहं नवराबायको नात्याचा अध्याय कोर्टाच्या साक्षीने संपवतात. भलेही कोणी याला मने न जुळल्यामुळे नात्यांचे विभक्तीकरण म्हटले तरी.

रस्त्याने प्रवास करताना वाहनाचा कोणासतरी कळत नकळत धक्का लागतो. भारतीय रस्त्यांवर नित्य दिसणारे हे दृश्य आहे. असे काही घडले की, प्रत्येकाला आपणच कसे योग्य दिशेने आणि नियमांनी चाललो होतो असे वाटायला लागते. कोणीच हार मानायला तयार नसतो. रस्त्यावर घडणारे असे क्षणिक कलहसुद्धा इतरांचं येणं-जाणं बंद करू शकतात. बसमध्ये, रेल्वेत जागेवरून तू तू मै मै घडणे दैनंदिन कलहाचे सौम्य रूप आहे. कधी आपल्या कोणा परिचिताला, आप्तांना अपघात घडतो. माणसांचा संयम सुटतो. संताप बनून तो रस्त्यावर उतरतो. कधी रस्त्यांवरील बेजाबदार वाहतुकीने समस्या येऊन रागाचे रुपांतर कलहात घडते. रस्ते अडतात. संतापाचा अतिरेक हाती येणारा दगड भिरकावयाला उद्युक्त करतो. रस्ता अडतो. माणसं भडकतात आणि समोर दिसेल त्यावर धडकतात. संतापाला प्रकटण्यास मार्ग मिळण्याऐवजी प्रश्न निर्माण करणारा रस्ता सापडतो. लहानसा वाटणारा प्रासंगिक कलह एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह बनून माणसांसमोर उभा राहतो.

राजकारणाच्या प्रांगणात कलह नेहमीच प्रिय असावा असे वाटण्याइतपत रुजलेला दिसतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन भिन्न विचारधारांना सोबत घेऊन तो नांदतो. कधी पक्षीय अभिनिवेश कलहप्रियतेचे कारण ठरतात. तर कधी पक्षांच्या आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या विचारधारा. कधी वैयक्तिक विचारधारेतून विरोधाचं अस्त्र घेऊन तो रस्त्यावर प्रकटतो. माणसांनी चालते आणि वाहनांनी धावते रस्ते अडतात. परिसरात बंदचा नाद निनादायला लागतो. परिस्थिती नियंत्रणाच्या मर्यादा ओलांडते, तेव्हा सुरक्षायंत्रणेचे कवच रस्त्यांवर, वस्त्यांवर उभे राहते. संचाराला बंदी करून कलहनियंत्रणाचा प्रयत्न घडतो. कधी कलह अशांततेचे विध्वंसक रूप धारण करतात. सार्वजनिक मालमत्तेच्या जिवावर उठतात. कोणाच्यातरी कसल्यातरी कारणाने दुखावणाऱ्या भावना कलह पेटवण्यात इंधनाचे काम करतात. अशा अविवेकी संघर्षाने परिस्थितीबाबत अनभिज्ञ  असणाऱ्या काही जिवांची जीवनयात्रा संपते.

जगात कुठल्या गोष्टी सार्वत्रिक असतील, नसतील माहीत नाही; पण कलह अरत्र, परत्र, सर्वत्र नांदतो आहे. कधी तो जातीय तणावात, कधी पंथीय संघर्षात, कधी धार्मिक अभिनिवेशात प्रकटतो. अहंमन्य मानसिकता कलहाला निमंत्रित करते. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष आघात चाकोरीत चालणाऱ्या जीवनव्यवस्थेवर होतात. कायदासुव्यवस्थेच्या ठिकऱ्या उडून प्रासंगिक परिस्थिती माणसांना विस्थापित करते. माणसं आपलं मत प्रस्थापित करण्यासाठी उभे राहतात. आपली विचारधारा पेरण्यासाठी केल्या जाणाऱ्या कवायतीत कलहाचे आयुध हाती घेतले जाते. अतिरेकी विचारांना प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न अनेक निरपराध्यांच्या जगण्याची सांगता करतो. सार्वभौम अस्मितेवर आघात करणारा अविवेकी विचार अतिरेकी होतो. आतंकवादी मानसिकता दिमतीला घेऊन कोणाच्यातरी अविचारी वागण्यातून प्रकटतो. कलहांपासून कोसो दूर राहू इच्छिणाऱ्या शांतताप्रिय माणसांना विस्थापित करतो. मायभूमी सोडून माणसे वणवण भटकत फिरतात. अनियंत्रित सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या सत्ताधीशांच्या कलहवृत्तीपासून सुटून सुरक्षित परगणा शोधण्याच्या दुसऱ्या नव्या कलहात अडकतात. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धांचा विध्वंस वसाहतवादी, साम्राज्यवादी मानसिकता अंगीकारणाऱ्या स्वार्थपरायण विचारांच्या वर्तनाचा परिपाक होता. सर्वंकष सत्ताधीश होण्याच्या मानसिकतेतून घडलेल्या कलहाचा माणसांनी अनुभवलेला विनाश म्हणजे ही युद्धे. पूर्वीही राजसत्तांचे प्रदेशविस्तारासाठी संघर्षाच्या मार्गाने जाणे घडले आहे. आपले सैनिकी बल, आपली राजकीय ताकद सीमेलगतच्या सत्ताधीशाला दाखवणे, या हेतूने ते घडत असे. आकांक्षापूर्तीसाठी प्रादेशिक सीमा विस्तारताना घडणाऱ्या कलहाने अन्य परगण्यात वास्तव्य करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या सीमांना मर्यादांचे बांध घातले जात.

कलह कुठे नाही, तो घरापासून देशापर्यंत सगळीकडे आहे. घरात सोबतीने वाढणाऱ्या भावंडानाही तो नवीन नाही. वाटण्या होताना तांबा-पितळेच्या एका फुटक्या भांड्यासाठी भांडणारी भावंडे कलहात रक्ताची नाती विसरतात. शेताच्या बांधावरून शेजारच्याच्या टाळक्यात दांडके घातले जाते. शेजारी-शेजारी राहणारे क्षुल्लक कलहातून परस्परांचे कट्टर शत्रू होतात. सासू नावाचं नातं घरगुती कलहाचे सार्वत्रिक रूप असल्याचे अनुभव रंगवून सांगितले जातात. सासू-सून हा द्वंद्व समास कलहातूनच विग्रहित झालेला दिसतो. प्रेमाचं नितळपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांना कौटुंबिक कलह बाधित करतात. काही गावं कलहामुळे बदनाम होतात. सार्वजनिक अशांतता हीच त्या गावांची ओळख होते. गावातील एखादी वस्ती, त्या ठिकाणी असणारी माणसे कलहासोबत जगणारी म्हणून ओळखली जातात. काहींवर कलहप्रिय म्हणून शिक्का बसवून त्याच्या जगण्याला कायद्याच्या कलमांनी बंदिस्त कले जाते. काही माणसांच्या मनात विशिष्ट परिवाराची, परिसराची ओळख कलहप्रिय म्हणूनच गृहीत धरली जाते.

कलह फक्त माणूस नावाच्या प्राण्यातच असतो असे नाही. मानवेतर जिवातही तो मोठ्याप्रमाणात असतो. प्राणीसुद्धा जिवाच्या कराराने सजातीयांशी, अन्यांशी भांडताना दिसतात. पण त्यांच्या कलहामागील प्रेरणा फक्त नैसर्गिक असते. परिसर, मादी यांच्यावर वर्चस्व संपादनाची भावना या कलहाचे केंद्र असतात. अन्य जिवांच्या जगात नैतिक-अनैतिक प्रकार असण्याचे कारण नसते. स्वाभाविकपणे वागायला त्यांचे शरीरधर्म त्यांना उद्युक्त करत असतात. माणसाच्या जगात नैसर्गिक गरजांसोबत भावनिक गरजासुद्धा कलहांचे कारण असल्याचं आपण पाहतो. आपले अहं कुरवाळण्याच्या नादात माणसं वर्तनाच्या चौकटी विसरतात. कलहाला अस्मितेचे वसने चढवून आपले अहं जोपासत राहतात. नियमांना नैतिकतेच्या, मूल्यांच्या खुंटीशी घट्ट बांधून समाजाकडून सत्त्वशील आणि तत्त्वशील वर्तनाची अपेक्षा करतात. मात्र, इप्सित साध्य करण्यासाठी आपले नियम तयार करून जगतात. 

कलहांचे असे सार्वत्रिक आविष्कार पाहताना एक गोष्ट मनात येते, माणसांना आपल्या जगण्यातून कलह संपवता येणारच नाहीत का? मला वाटते संयम, सत्य, अहिंसा या मूल्यांचा अंगीकार कलहप्रिय जगाला शांततेच्या मार्गाने मार्गस्थ करू शकतो. माणसाच्या मनात पेटलेल्या अविवेकी विचारांच्या वणव्यालाही शांत करू शकतो. संतमहात्म्यांनी कलह टाळून प्रेमाची भजने गायली. सुधारकांनी सहअस्तित्वाने सहजपणे जगणाऱ्या जगाचे स्वप्न पाहिले. जगण्याला नैतिकतेच्या चौकटींनी मंडित करून स्वतःचा शोध घेऊ पाहणाऱ्या विचारधारा कोणत्याही संघर्षाला विराम देऊ शकतात. सत्व आणि स्वत्वाची ओळख दाखवणारा मार्गच विद्यमान जगातील माणसांची खरी गरज आहे. असा मार्ग पूर्वसुरींच्या कार्यातून स्मृतीरुपाने सोबत करीत असूनही आम्हां माणसांना अद्याप कळला का नसेल? कळला पण कदाचित वळायचे राहून गेले आहे असे वाटते. हे कळेल त्यावेळी माणूस कलहमार्गाने का वर्ततो? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. कलह टाळून संयमाने सात्विक जगण्याचा मार्ग दाखवणारे संत, महात्म्यांचे विचार वाचून, ऐकून माणसांचे मन आणि मतपरिवर्तन झाले नाही असे नाही; पण वास्तव असेही आहे की, माणूस अजूनही जीवनातील कलहप्रिय विचारांना कोणत्यातरी असुरक्षतेपोटी टाकायला तयार नाही. इतिहास हासुद्धा आहे, की माणसांच्या जगावर आणि जगण्यावर अनेक आघात घडूनही माणूस शहाणा होण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय संघर्षच असल्याचे मानतो. कलहाच्या मार्गाने कुठली शांतता प्रस्थापित करू इच्छितो कोणास ठाऊक? तसेही माणसांच्या जगण्यातून कलह हद्दपार होणे अवघड आहे. कारण काही गोष्टी सजीवांना उपजतच मिळालेल्या असतात, त्यातील एक कलह आहे.