Sairat : Akalan Ani Anvay | सैराट: आकलन आणि अन्वय

By
 
चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखवेल. त्यावर अविवेकाची काजळी पसरली असेल, तर विचारांची प्रतिमा सुस्पष्ट दिसेल तरी कशी? समाजात दिसतं, घडतं ते दाखवायचा प्रयत्न चित्रपट करतो. समजा ते काल्पनिक असेलही, पण भविष्यात असे काही घडण्याची शक्यता नाहीच, असे आपण म्हणू शकतो का? समाजाकडे हे समजण्याइतकी प्रगल्भता नसावी का? विचार करण्याचं दान नियतीने साऱ्यांच्या ओटीत ओतले असेल, तर संदेहाचे प्रश्नच का उरावेत? भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचा ल.सा.वि. काढणे अवघड आहे, हे माहीत असणारी माणसे अपरिपक्व विचारांनी वर्तने असंभव. देशात जातीयता, धार्मिकता, भेदाभेदाच्या पलीकडे विचार करणारे आहेत, तसे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात वर्तणारेही आहेत.....
 
चित्रपट आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारताच्या लोकजीवनात धर्माइतक्या एकरूप झाल्या आहेत. या विषयांबाबत माहीत नसणारा भारतीय एकतर वेडा असेल किंवा सर्वसंग परित्याग करून आपल्याच चिंतनाच्या परिघात वर्तणारा विरक्त तरी असेल. या विषयांवर आपापल्या वकुबाने मत व्यक्त करणारे सर्वकाळी, सर्वस्थळी आहेत. समर्थनाचे सुरम्य सूर सजवणारे आहेत, तसे नकाराच्या वर्तुळात मतांच्या रेषा ओढणारेही आहेत. गुणगान करणारे आहेत, तसे यांना संदेहाच्या सुळक्यावर चढवून गुंत्यात गुंफणारे आहेत. या दोन गोष्टींबाबत एक बाब सामायिक आहे, ती म्हणजे या विषयांचे ज्ञान असणारे जेवढ्या आत्मविश्वासाने व्यक्त होतात, तितक्याच अभिनिवेशाने काहीही माहीत नसणारे आत्मविश्वासपूर्वक प्रकट होतात. आपल्याकडे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाविषयी वाद होणे जणू आवश्यक बाब झाली आहे, असे वाटण्याइतपत सांप्रत मतमतांतराचा धुरळा उडत राहतो. क्रिकेटचा प्रत्येक सामना आपण जिंकलाच पाहिजे, अशी मानसिकता प्रबळ होत आहे. पराजयाला खेळ म्हणून न स्वीकारता पराभवाची सारी सूत्रे सामनानिश्चितीत शोधून समाधान पावणारेही आहेत. कधीकाळी सिनेमा आणि क्रिकेट मनोरंजनाची माध्यमे होती, आज ती वादाची स्थळे झाली आहेत. चित्रपट प्रदर्शनाआधी कुठूनतरी कसल्यातरी उडत्या वार्ता येतात आणि माथी भडकून विरोधाचे आवाज बुलंद होऊन स्वैरसंचार करतात. हे सगळं करण्यामागे नेमके कारण काय, हे शोधून पाहण्याची कोणाला आवश्यकता वाटत नसते. आपण या गर्दीत सामील का होतो, या प्रश्नाचे उत्तर किती जणांना माहीत असते? माहीत नाही; पण आपल्या अशा वर्तनाला सामुहिक वेडेपणाचा आचार म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही. हे सगळं ऐकून, पाहून मनात प्रश्न येतो, भारतीय माणसे संवेदनशील आहेत, सहिष्णू आहेत, हे म्हणणे वास्तव आहे की, शब्दांच्या बुडबुड्यांमुळे वाऱ्यावर उडणारा केवळ आभास आहे.

लोकशाही व्यवस्थेने जगाला जे काय दिले असेल ते असो, पण भारतीयांना प्रगल्भ मन द्यायला आपली लोकशाही व्यवस्था अजूनही थिटी पडत आहे, असे वाटण्याइतपत वर्तमानाचे विपरीत प्रत्यंतर येत आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हा लोकशाहीतील शब्द संकुचित होत आहे, असे कोणी म्हणत असेल आणि तसे कोणास वाटत असेल, तर त्यात वावगे काही नाही. परमत सहिष्णुता लोकशाहीच्या यशाचे निःसंदेह परिमाण असते. पण या परिमाणाला परिमित पसंतीच्या परिघात बंदिस्त करण्याचा कळत-नकळत प्रमाद घडतो आहे. माझ्याइतकाच इतरांनाही व्यक्त होण्याचा अधिकार आहे आणि त्याला तो सन्मानपूर्वक प्रदान केला पाहिजे, याचं जणू विस्मरण होत आहे की काय असेच वाटते. चित्रपट आणि वाद हे अलीकडील काळाचं अविभाज्य अंग झालंय. कोणत्याही वादाशिवाय नैसर्गिक जन्म घेणारे चित्रपट अपवाद ठरायला लागले आहेत. प्रत्येकवेळी सिझेरियन करूनच त्यांचा जन्म होतो आहे. कधी कुणाच्या, कुठल्या कारणाने भावना दुखावल्या जातील, हे दुखावलेल्या मनांनाही सांगता येणार नाही. सांगणं तर दूरच, पण या दुखावलेल्या भावनांमागील उत्तर सापडणं त्याहून अवघड झालंय. आपल्या स्मृतीची अलीकडील काही पाने उलटून पाहिली, तरी असे वाद आणि वादांचे कारण ठरलेले चित्रपट आपल्या हाती सहज लागतील. सोबतच अशा वादात उड्या घेणारे विचारही सापडतील. कारण नसता कलहप्रिय वाटेने निघालेले हे एकतर समर्थक असतात, नाहीतर विरोधक.

अशाच काहीशा समर्थनाच्या आणि विरोधाच्या वर्तुळांत बंदिस्त झालेला अलीकडचा मराठी चित्रपट सैराट. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून महाराष्ट्रात जणूकाही सैराटचे समर्थक आणि विरोधक अशा दोनच विचारांची माणसे वास्तव्यास असतात की काय, असे वाटण्याइतपत समाजमन ढवळून निघाले. सैराटचं कौतुक करणारे होते, तसे विशिष्ट अभिनिवेशाने निर्मित नकाराच्या आपल्या मतांवर, विचारांवर ठाम असणारे विरोधकही होते. असे असूनही आतापर्यंत मराठी चित्रपटांना साध्य झाले नाही, ते या चित्रपटाने केले. कमालीची लोकप्रियता लाभलेल्या सैराटने शंभर कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवले. मराठी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची सगळी गणिते उलटवून टाकणारा हा पहिलाच चित्रपट. एकीकडे कौतुकाचा होणारा अनवरत वर्षाव, तर दुसरीकडे विरोधाचा तीव्र सूर. अशा दोन भिन्न तिरांना धरून तो वाहत राहिला, तरीही यास वारेमाप यश मिळाले. यामागे कारणे काय असतील ती असोत; पण हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात अनुकूल-प्रतिकूल विचारांची वलये निर्माण करीत राहिला. तरुणाईने डोक्यावर घेतलेला. प्रौढांच्या कौतुकास पात्र ठरलेला. वयस्कांनी पसंतीची मोहोर अंकित केलेला आणि समीक्षकांच्या विचारांत दखलपात्र ठरलेल्या या चित्रपटाने यशाचे सारे आयाम संपादित केले. आणि या सगळ्या घटकांना एकत्र आणून दखल घेण्यास बाध्य केले, ते नागराज मंजुळेने.

नागराज मंजुळे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणून एव्हाना सर्वांना परिचित आहेत. चित्रपटाच्या चाकोरीतील चौकटींची परिमाणे अवगत असणारा आणि समजणारा हा दिग्दर्शक. व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना माणसाच्या जगण्याचा वाटा अडवणारी वैगुण्य शोधून त्यावर भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून मंजुळे कौतुकास पात्र ठरले असतील, तर तो त्यांच्या संवेदनशील विचारांचा परिपाक आहे. एकीकडे जातीपातीच्या टोकदार काट्यांना घेऊन चित्रपट करणारा दिग्दर्शक म्हणून जसा टीकेचा धनी झाला. तसा समाजवास्तव संवेदनशील मनाने अधोरेखित करणारा म्हणून प्रशंसेस पात्रही ठरला आहे. कौतुक आणि टीका या परस्पर भिन्न टोकांवर प्रवास करणाऱ्या या दिग्दर्शकाला जे सांगायचे होते, ते त्याने आपल्या चित्रपटातून सांगितले आहे. खरंतर सांगणं ही त्यांची खासियत आहे आणि वेगळेपणसुद्धा. फँड्रीसारखा चित्रपट तयार करून जातव्यवस्थेचे प्रखर वास्तव त्यांनी अधोरेखित केले. विज्ञानतंत्रज्ञानयुगाच्या कुणी कितीही वार्ता करीत असले, तरी जात काही आपल्या सामाजिक विचारातून जात नाही, हे वास्तव आहे. नेमका हाच विचार त्यांनी मांडला. जातव्यवस्थेने केलेल्या अन्यायाने त्रस्त जब्याने फेकलेला दगड व्यवस्थेवरचा आघात होता. मनातला लाव्हा उसळ्या घेताना त्याचा स्फोट दगड भिरकावण्यात झाला. या दगडाने जातीच्या चिरेबंदी वाड्याच्या भिंती किती तुटल्या-फुटल्या, हा वादाचा विषय असू शकतो. पण वास्तव असेही असू शकते, हे अमान्य करता येत नाही.

चौकटीतील चाकोऱ्या मोडून ज्यांना मर्यादांची वर्तुळे पार करता येतात, ते आपला नवा परिघ निर्माण करतात. सैराटने नेमके हेच केले आहे. व्यावसायिकतेची परिमाणे या चित्रपटाला असतीलही; पण त्यांना बाधा न समजता त्याचाच आधार घेऊन परिस्थितीवर भाष्य करण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. आपले आसपास, उसवत चालेलं सामाजिक भान आणि पारंपरिक मोठेपणाच्या बेगडी जगण्याला हा चित्रपट धक्का देतो. मनात साठलेला कोलाहल उसळ्या मारायला लागतो, तेव्हा कंप होतोच. हे हादरे सहन करून ज्यांना उभं राहता येतं, ते परिवर्तनाच्या दिशेने नव्या वळणाचा शोध घेत, नवे परगणे निर्माण करतात. सैराटने नवा परगणा शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा शेवट धक्कातंत्राचा वापर करणारा असतो. सैराटमधील शेवट म्यूट होतो आणि माणसे अवाक होतात. सुरवातीचा दीड तास झिंगाट होऊन बुंगाट नाचणारी. शिट्या वाजवणारी, आरोळ्या मारणारी माणसे हीच का? असा प्रश्न चित्रपटाच्या उत्तरार्धात मनाला पडतो. एक मूकपण घेऊन माणसे चित्रपट पाहत राहतात. कथानकासोबत सरकत राहतात. पूर्वार्धात प्रसन्नतेचा परिमल घेऊन बहरणाऱ्या प्रेमाची उत्तरार्धात होणारी वाताहत पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहतात. आणि शेवट अस्वस्थतेचे शिखर गाठतो. एक शब्दही न बोलता चित्रपटगृहातून बाहेर पडलेली माणसे मी पाहिली आहेत. एक अस्वस्थ बेचैनी सोबत घेऊन कुठल्यातरी विचारांच्या तंद्रीत घरी येतात. स्वतःला प्रश्न विचारीत राहतात. चित्रपटाचा शेवट असा नको होता करायला म्हणून हळहळत राहतात. पण वास्तव हेही आहे की, हे विचारांचं असह्यपण हळूहळू निवळत जाते. भावनांच्या किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांच्या धडका कमी होत जातात. सारंकाही सावकाश पूर्वपदावर येतं आणि व्यवस्थेने निर्मिलेल्या चौकटींमध्ये परत येऊन प्रेक्षक विसावतो. आहेत त्या गोष्टी घडत राहणार आहेत, म्हणून स्वतःला सांगत राहतो. माझ्या एकट्याने परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग घडणे असंभव असल्याची खात्री असल्याने चाललं आहे, ते मुकाट्याने स्वीकारतो. हे आपलं सामाजिक न्यून आहे. हे अमान्य करण्यात काही हशील नाही.

मला वाटतं अलीकडील काळातील सर्वाधिक चर्चेतला हा चित्रपट. चित्रपट प्रादेशिकच, पण राष्ट्रीयस्तरावरील माध्यमांनी दखल घेण्याइतपत मोठा. त्याचे हे मोठेपण चर्चेच्या अनुकूल-प्रतिकूल आवाजाच्या सुरावटींनी सजत राहिले. कदाचित असे एकही ठिकाण नसेल, जेथे सैराट हा विषय नसेल. काही दिवसापूर्वी सैराटच्या वेगळेपणावर आम्हा मित्रांमध्ये बोलणं सुरु होतं. सरळ सरळ दोन गटात विभागणी झालेली. एक समर्थनाचा सूर, तर दुसरा विरोधाचा बुलंद आवाज. तसेही मी सिनेमे पाहणे कधीच विसरलो आहे. गेल्या आठ-दहा वर्षात पहिल्यांदाच माझ्याबाबतीत असे घडले की, सात वेळा हा सिनेमा थिएटरला जाऊन पाहिला. कॉलेजमध्ये शिकत असताना एखादा चित्रपट आवडायचा म्हणून चार-पाच वेळा पाहणे घडायचे. अर्थात तो का आवडतो, याला काही संयुक्तिक कारणही नसायचे. कदाचित तो वैयक्तिक बावळटपणाचा भाग होता. त्यात काही कळण्यापेक्षा टाईमपास हे एक कारण असायचे. वाढत्या वयानुसार जाणिवांच्या कक्षा रुंदावतात, हेपण सत्यच आहे. असे चित्रपट जे कधीकाळी आम्ही आवडीने पाहत असू, ते आज आमच्यासाठी थट्टेचा विषय झाले आहेत.

काही अपवाद वगळले, तर चित्रपट ही गोष्ट मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात बघायला जाण्याची गोष्ट आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे. बऱ्याच चित्रपटांबाबत हल्ली असे वाटते. कदाचित या मताबाबत बरेच जण असहमत असतील किंवा काही सहमतसुद्धा असू शकतील. मत काहीही असले तरी, कोणाच्याही मतांचा अनादर करायचा नाहीये. पण सैराटबाबत माझ्याकडून असे घडले नाही. मेंदू सोबत घेऊन हा चित्रपट प्रत्येकवेळी नव्याने पाहत राहिलो. कोणी याला बावळटपणा असेही म्हणेल. अर्थात त्यांना तसं म्हणण्याचा अधिकारही आहेच. हा चित्रपट कोणाला तद्दन गल्लाभरू वाटला. कोणी अप्रतिम म्हणून वाखाणला. कोणी व्यावसायिकतेच्या चौकटींमध्ये बसवलेला चांगला चित्रपट म्हटले. कोण काय म्हणतो, त्याचा विचार न करता परत-परत पाहत राहिलो. त्यातून काहीतरी शोधत राहिलो. काहीतरी सापडत राहिले. आनंद घेत राहिलो. ही सगळी पुण्याई संपादित करून चित्रपटातील तपशील, बारकावे, संवाद, संगीत, अभिनय, ग्रामीण वास्तव, समाजवास्तव असे बरेच काही-काही निवडत, वेचत राहिलो. या गोष्टींविषयी माझ्या आकलनाच्या परिघाला समजून घेत मित्रपरिवारात घडणाऱ्या चर्चेत अधिकारवाणीने बोलत राहिलो.

सैराटच्या कौतुकाचे माझे पाढे ऐकून माझे दोन-तीन स्नेही नकाराचे सूर घेऊन आम्हां मित्रांमध्ये सैराटविषयी होणाऱ्या चर्चेत प्रत्येकवेळी तावातावाने व्यक्त होत राहिले. त्यात चांगले काय आहे, यापेक्षा चित्रपटच वाईट कसा आहे, ते अभिनिवेशाने दाखवू लागले. मी प्रत्येकवेळी त्यांच्या मतांना छेद देत राहिलो. एकवेळ तर अशी आली की, त्यांच्या बोलण्यात संवादाऐवजी उपहासाचा आवाज अधिक आक्रमक होऊ लागला. अर्थात, मुद्दे संपलेत की, आपलेच म्हणणे कसे रास्त आहे, हे सांगतांना समर्थनाचे असे गडद रंग विधानांना चढतात. काही दिवस हाच विषय आमच्या संवादाच्या परिघात परिवलन करीत होता. विषय थांबायचं नाव काही घेत नव्हता. रोज नवा मुद्दा आणि त्यांचे प्रत्येकाने आपापल्या मतांनी केलेलं खंडन-मंडन असा सिलसिला सुरु राहिला. मी माझ्या मतांवर ठाम आणि ते त्यांच्या विचारांवर कायम. शेवटी एक दिवस त्यांना म्हणालो, ‘ऐकीव, वाचीव माहिती दिमतीला घेऊन मतमतांतरे घडवीत वाद करण्यापेक्षा निदान एकदा तरी थिएटरला जाऊन हा चित्रपट पहा, मग काय ते ठरवा. नसेल तुम्हाला आवडत, तरी वादावर मुद्देसूद बोलण्यासाठी पहा. मग व्यक्त व्हा!’

सैराटविषयी बोलतांना कदाचित त्यांची काही पूर्वग्रहदूषित मते असतील, ठरवून घेतलेल्या मर्यादा असतील, स्वतःच्या वर्तनाची जीवनविषयक काही तत्वे असतील, विचारांचा सीमांकित परिघ असेल किंवा आणखी काही तत्सम कारणे असू शकतील. ती असू नयेत असे नाही; पण कोणत्यातरी विषयाची एक बाजू घेऊन आपण व्यक्त होतो, तेव्हा त्याची आपल्याला न दिसणारी दुसरी बाजूही असते, याची किमान जाणीव अंतर्यामी असावी, अशी अपेक्षा चर्चेच्या वर्तुळात वर्तताना नेहमीच असते. आणि अशी अपेक्षा करण्यात अवस्ताव काही नाही. खरंतर हे समजण्याइतपत सक्षम असणाऱ्यांच्या विचारविश्वात हे घडत होते. सुशिक्षितांच्या विचारांत एवढे एकांगीपण असेल, तर अन्यांचा विचार करावयास नकोच.

आता अगदी अलीकडे त्या स्नेह्याने हा चित्रपट पाहिला आणि त्याचे मत यू टर्न घेत एकशे ऐंशी अंशाच्या कोनात बदलले. आपलं मत सार्वजनिक करतांना तोही तेच म्हणू लागला, जे एवढे दिवस मी त्यांना सांगत होतो. खरंतर आपल्या आसपास अशी कितीतरी उदाहरणे असतील. जे मतांच्या दोलायमान पुलावरून प्रवास करीत असतील. नेमकी अशीच काहीतरी कारणे असतात, एखाद्या गोष्टीविषयी वादाला रस्ता मिळायला. मत परिवर्तनशील असते, हे मान्य. पण परिवर्तनाला परिपक्वतेचा परीसस्पर्श असणे परिस्थितीसापेक्ष प्रमाण असते. माझ्या या स्नेह्याचं मत परिवर्तनाचं श्रेय कुणाचं? जेवढे त्याच्या समायोजनक्षम विचारांचे आहे, त्याहून अधिक मंजुळेंच्या संवेदनशील विचारातून प्रकटलेल्या कलाकृतीचे आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

चित्रपटांचा समाजमनावर परिणाम होतो का? असेल तर किती? हा परिस्थितीसापेक्ष प्रश्न आहे. मान्य करू या, होत असेलही. तर तो तसा सार्वत्रिक असतो का? चार-दोन संवेदनशील मनाचे धनी वगळले, तर जवळपास होत नाही, हेच खरंय. कुठल्यातरी वर्तमानपत्रात छापून आलेल्या आणि घरून पळून गेलेल्या प्रेमींच्या बातम्या व्हॉटसअपवरील माझ्या एक मित्राने मला फॉरवर्ड केल्या. त्या बातम्यांमध्ये हे सगळं सैराटच्या प्रभावामुळे होत असल्याचं म्हटलं होतं. त्याने लगेच दुसरा मॅसेज पाठवला आणि म्हणाला, “आत्ता बोला सर, तुम्ही सैराटचं एवढं कौतुक का करीत आहात? अशा बातम्या येणार असतील, तर यालाच आपण चित्रपटाचं यश वगैरे असं म्हणायचं का?”

अशा गोष्टींना किती महत्त्व द्यावं याबाबत सुशिक्षितांमध्ये एवढा संदेह असेल, तर अशिक्षितांच्याबाबत न बोललेलं बरं. मी त्याला उत्तर पाठवलं, “बाबारे! हा सगळा बादरायण संबंध आहे. अनेक धार्मिक चित्रपट पाहून कोणी संत झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. श्यामची आई चित्रपट पाहून कोणी श्याम झाल्याचे निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. चित्रपटाचा प्रभाव असतो, पण फार थोडा. कदाचित प्रासंगिकच अधिक. उगीच बातमीमूल्य म्हणून कोणी काही लिहिलं असेल, तर त्याला किती महत्व द्यायचं, हे आपलं आपणास ठरवावं लागतं. कृष्ण आणि रुक्मिणी विवाह काय होता? शंकर-पार्वतीची पुराणकथा तुम्ही ऐकता की नाही? सुभद्रेला अर्जुनाने सोबत नेले, हे मान्य करतात की नाही? नल-दमयंती, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी या प्रेमकथा काय महाराष्ट्रात कोणाला माहीत नाहीत काय? कोणाला पाहून कोणी बिघडत नसतो आणि सुधरतही नसतो. त्याला मनापासून काही करायचेच नसेल, तर सुधरवणारे आणि बिघडवणारे चित्रपट आहेत तरी कोण? माझ्या अडनिड वयात मी ‘एक दुजे के लिये’, ‘कयामत से कयामत तक’ आणि यासारखे काही चित्रपट पाच-सहा वेळा पाहिले. आवडायचे. वाटायचे असे असू शकते का? पण नाही. वास्तवात असे काही नसते, हेही कळायचे की. सैराटआधी का कोणी प्रेम करत नव्हते? प्रेमात पडलेले जीव पळून जातच नव्हते का? मग असे असेल, तर त्याला जबादार कोण? प्रेम सार्वकालिक भावना आहे. ज्यांना समजली, ते माणूस म्हणून यशस्वी झाले. नाही समजले, ते राहिले त्याच चौकटीत. आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो, त्यावर ते अवलंबून असते. या सगळ्या गोष्टीतून काहीतरी वाद उकरून काढणारे आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचे काम करतात. आपल्या संकुचित विचारांच्या इमारती भक्कम करू पाहतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे कळण्याइतपत शहाणपण असायला नको का?”

चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखवेल. त्यावर अविवेकाची काजळी पसरली असेल, तर विचारांची प्रतिमा सुस्पष्ट दिसेल तरी कशी? कलाकार समाजात दिसतं, घडतं ते दाखवायचा प्रयत्न करतो. समजा ते काल्पनिक असेलही, पण भविष्यात असे काही घडण्याची शक्यता नाहीच, असे आपण म्हणू शकतो का? समाजाकडे हे समजण्याइतकी प्रगल्भता नसावी का? विचार करण्याचं दान नियतीने साऱ्यांच्या ओटीत ओतले असेल, तर संदेहाचे प्रश्नच का उरावेत? भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचा ल.सा.वि. काढणे अवघड आहे, हे माहीत असणारी माणसे अपरिपक्व विचारांनी वर्तने असंभव. देशात जातीयता, धार्मिकता, भेदाभेदाच्या पलीकडे विचार करणारे आहेत, तसे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात वर्तणारेही आहेत. जातीयतेच्या बेगडी चौकटींमध्ये आत्मशोध घेणारी माणसेही आहेतच. जातीसाठी माती खावी म्हणणारेसुद्धा आहेत. धर्माच्या नावानं घडणारा धिंगाणा लोकांना बऱ्यापैकी परिचयाचा झाला आहे.

एकीकडे संविधानातून संपादित केलेल्या विचारांनी समतेचे सहजपणाने स्वागत करायचे आणि त्याच समाजाने जातींच्या तटबंदी भक्कम करायच्या. ही वर्तनातील विसंगती नाही का? जात विरहित समाजनिर्मितीचा उद्घोष करायचा आणि जातीपातीतच व्यवहार घडतील कसे, ते बघायचं, हे उघडं गुपित आहे. सैराटने खरंतर या जातीव्यवस्थेला धक्का दिला. कदाचित काहींना हे पचवणं अवघड गेलंही असेल, पण वास्तव काही विसरता येत नाही आणि नाकारताही येत नाही. नायक खालच्या जातीचा आणि नायिका उच्चकुलिन असणं सहजी पचनी पडणारं नसतंच. कारण स्त्रीविषयक बघण्याचा दृष्टीकोन नेहमीच पुरुषी मानसिकतेचा राहिला आहे. चित्रपट काल्पनिक असतो, हे माहीत असूनही अशा प्रतिक्रिया प्रकटत असतील, तर याला कारण अद्यापही आमच्या मानसिकतेचे परगणे आहेत तसेच आहेत, हे असेल का? जातीयअभिनिवेशातून निर्मित अहं जोपासत आपल्या जगण्याची जात हीच ताकद आहे, असे मानणाऱ्या समाजातील मूर्खपणाच्या चौकटींना आर्ची-परशा सर्व ताकदीनिशी धडका देत राहतात. पण कुटुंब, गाव आणि समाजाची जात हीच ओळख त्यांच्या मार्गावर बुलंद बुरुज बनून उभी राहते.

व्यवस्थेच्या बुरुजांना ध्वस्त करताना अजूनही परिवर्तनप्रिय विचारांनी वर्तणाऱ्यांची ताकद कमी पडते आहे. सत्ता हाती असली की, मनावर संरजामी माज चढतो. पद, पैसा, प्रतिष्ठा एका हाती एकवटल्या की, व्यवस्था आपल्या तंत्राने वाकवता येते, हा समज दृढमूल होतो आणि हाच माज एखाद्या प्रिन्सला वर्गात मास्तराच्या थोबाडीत मारण्याइतपत बेदरकार बनवतो. बेमुर्वत बनवतो. अशा बेताल वागणाऱ्यांच्या वैचारिक विश्वातून सामान्य माणूस कधीच हद्दपार झालेला असतो. माणसापेक्षा आपले वैयक्तिक अहं त्यांना मोठे वाटतात. स्वातंत्र्योत्तरकाळात माणूस हीच एकमेव जात असेल, अशी अपेक्षा होती. पण ते एक स्वप्नंच राहिलं. आणि आतातर ते लक्ष खूप पुढे गेलं आहे. प्रिन्सच्या वर्तनाचे समर्थन करणारी मानसिकता आहे, तोपर्यंत उन्मत्त मनातल्या माजाला परंपरेने दिलेली स्नेहनिर्मित नाती दुय्यम वाटतीलच. सत्तेच्या झापडबंद पट्ट्या डोळ्यांवर बांधल्या असतील, तर फक्त उन्माद मोठा होतो. धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती म्हणून अंधार त्याचं प्राक्तन होतं. या अंधाराच्या भीतीतून पुत्रप्रेमापोटी तो विकल होत गेला; पण गांधारीने डोळे असून उजेड नाकारला आणि अंधाराची सोबत केली. पण तिलाही पुत्रप्रेमाचा मोह टाळता आला नाही. पुढचे संघर्ष टाळता आले असते. पण स्वार्थाची पट्टी डोळ्यांवर बांधली असेल, तर योग्य-अयोग्य समजणे अवघड होते. समाजानेही जातीयतेच्या स्वार्थाच्या अशाच पट्ट्या आपल्या भोवती बांधून घेतल्या आहेत का? असे झापडबंद चालत राहणे पुढच्या अनिष्ठाचे सूचन असते.

एकीकडे देश बदलत असल्याच्या वार्ता करायच्या; समतेवर, प्रगतीवर, काळाच्या बदलत्या परिमाणांवर मोठी मोठी भाषणे झोडायची आणि दुसरीकडे आपापले स्वार्थाचे परगणे पद्धतशीर परिपुष्ट करायचे. इभ्रतीचे स्वयंघोषित निकष निर्माण करून त्यांना सांभाळायचे. जातीपातीची कुंपणे बांधून स्वार्थकेंद्रित विचारांना आपलं समजायचं, हे वास्तव आहे. महाराष्ट्राला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे, म्हणून गोडवे गायचे आणि जातीयतेमुळे घडणाऱ्या अन्यायाविषयी व्यक्त होतांना निर्जीव व्हायचे. हा कोणता पुरोगामीपणा म्हणायचा? आर्ची-परशाच्या माध्यमातून सैराटने जातीपातींचे अंतर विसरून संवादाचा साकव सांधण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न केला आहे, असे म्हटले तर काय हरकत आहे? चित्रपटातील त्यांचे प्रेम कायद्याच्या परिभाषेत सज्ञान आहे. पण समाज अशाबाबतीत सुज्ञ कधी असतो? आर्चीच्या रूपाने डॅशिंग पोरगी व्यवस्थेच्या भिंतीना ध्वस्त करण्यासाठी उभी राहते. प्रसंगी सगळ्या सुखांचा त्याग करून भावनेच्या वादळावर स्वार होऊन धावते. पुढच्या वाटेवर टक्केटोणपे सहन करीत आपल्या प्रेमाची सोबत करीत राहते. कोसळते. हतबुद्ध होते. सावरते. उभी राहते. स्वप्ने पाहते. परिस्थितीशी दोन हात करते. आता सगळं नीट होईल म्हणून नव्या स्वप्नांची रांगोळी मनात रेखाटत राहते. अशा अनेक आर्ची आजही आहेत आपल्या समाजात, फक्त त्या अपयशी ठरतात एवढेच. आर्ची धीट आहे. ती बुलेट पळवते. ट्रॅक्टर चालवते. स्त्री म्हणून समाजाने आखून दिलेल्या परंपरेच्या वर्तुळाभोवती फिरणारी नाहीये. तिचं धीट असणं एकवेळ मान्य केलं जातं, पण स्वतःच्या जोडीदाराच्या निवडीबाबत निर्णय घेतांना जातीयतेच्या भिंती अहं बनून अडथळे होतात.

आपल्याकडील चित्रपटांमध्ये हिरो मार कधीच खात नाही. त्याने हाती घेतलेला दगड नुसता भिरकावला तरी दोनचार जण संपतात. गोळ्यांच्या अखंड वर्षावात त्याला साधं खरचटतदेखील नाही. हे बावळटपण आपण कितीतरी वर्षांपासून पाहत आहोत. आणि त्याला टाळ्याही वाजवत आहोत, पण सैराटमधील परशा वास्तवाच्या वाटेवर उभा आहे. त्याला साथ देणारे मित्र साधेच आणि सामान्यच आहेत. त्यांच्याकडे कोणतीही उन्मादक ताकद नाही. पण मित्रासाठी जीव टाकणं, प्रसंगी संकटाला आपल्या अंगावर घेण्याइतकं दृढपण त्यांच्याकडे आहे. त्यांचं वागणं उत्कट आहे. मैत्रीसाठी मनातल्या मनात तुटणं आहे. सपनीच्या मैत्रीचा सहवास, आनीची अबोल; पण मुग्ध सोबत आर्चीला आहे. आर्ची-परशाचं प्रेम पंचतारांकित कृत्रिमपणाच्या बेगडी चौकटीत गळ्यात गळे घालून फुलत नाही. ते गाव-शिवारात उमलणारं, वाढणारं आहे. गावमातीचा गंध घेऊन वाहणारं आहे. प्रसंगी परिस्थितीचे आघात सहन करून एकमेकांचा शोध घेणारं आहे. नवी स्वप्ने मनात कोरून आकांक्षांच्या क्षितिजावर नवा प्रकाश निर्माण करू पाहत आहे. पण परिस्थितीचा अविचारी अंधार त्यांचे गळे चिरतो. गाफीलक्षणी गाठून त्यांना संपवलं जातं. मनातील आशा, डोळ्यातील स्वप्ने, उद्याची उमेद सारंसारं काही एका क्षणी संपतं आणि रक्ताचे प्रवाह बनून वाहतं. सत्तेचा माज हरकतो, जातीयतेचा उन्माद बेभान होतो. प्रेम जिंकते; पण प्रेमी हरतात. त्यांना आपल्या स्वप्नांचे महाल उभे करण्यात यशही येते. पण दुर्दैवाने ते सुख क्षणिक ठरते. धावणाऱ्या प्रेमींचा माग काढत मृत्यू दारी येऊन उभा ठाकतो. जातीयअभिनिवेशाच्या वणव्यात एका उमलत्या आकांक्षेचा अंत होतो.

प्रेम परगण्याच्या वाटेने आपल्या आकांक्षांचं क्षितिज शोधू पाहणाऱ्यांवर असे किती आघात व्यवस्था करणार आहे कुणास ठाऊक? असे किती रूधिराभिषेक प्रेमाच्या वेदीवर घडणार आहेत, हे नियतीलाच माहीत. नियतीने ललाटी लेखांकित केलेल्या रेषांचे प्राक्तन प्रयत्नांनी बदलता येते असे म्हणतात; पण जात नावाचे वास्तव आम्हाला अद्यापही का बदलता येत नसावे? जात नावाचे अहं आहेत, तोपर्यंत रक्तलांच्छित अध्याय प्रेमग्रंथांच्या पानावर लिहिले जाणारच आहेत. आकाशसारख्या निष्पाप, निरागस पावलांचे रक्ताळलेले ठसे काळाच्या पटलावर उमटणार असतील, तर उत्क्रांतीच्या वाटेवरील सगळ्यात प्रगत जीव म्हणून माणूस उभा आहे, असे म्हणण्यात कोणते शहाणपण आहे? एकमेकांच्या सोबतीने निघालेल्यांच्या मनी विलसणाऱ्या स्वप्नांची रांगोळी अर्धवट राहणारचं आहे का? चित्रपटाचं समीक्षण नाही करत, पण शेवटचा दोनतीन मिनिटांचा सीन कोणत्याही संवेदनशील मनांमध्ये अस्वस्थता निर्माण करतो. सप्तरंगी स्वप्नांच्या प्रदेशात विहार करणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणतो. उदासपणाची काजळी चेहऱ्यांवर पसरत जाते. मनात कालवाकालव होते. आपण काय पाहत आहोत, हे सांगण्याइतपतही शब्द प्रकटत नाहीत. डबडबलेले डोळे मूक आक्रंदन करीत राहतात. चित्रपटगृहातून बाहेर पडणारी जडावलेली पावले सोबत भकासपण घेऊन घरचा रस्ता धरतात. पण हेही सत्य आहे की, दुसऱ्याच्या दुःखाने डबडबलेले डोळे संस्कृती जिवंत असल्याची खूण आहे. आवश्यकता आहे डोळ्यातले हे पाणी जतन करून ठेवण्याची.

12 comments:

 1. सर लेख खूपच छान आहे.अगदी वास्तव आहे.आपण तटस्थपणे आमचा आजचा समाज अन समाजाचा दृष्टिकोन सैराटच्या निमित्ताने अचूक रेखटला आहे.मुळात जात हि आमच्या समाजाला अन समाज जातीला इतक्या घट्ट चिपकल्या आहेत,कि त्या वेगळ्या होऊच शकत नाही.प्रेम या सहज भावनेलही येथे अनेक चौकटी आहेत.समाजाच्या या चौकटीतून जरा कोणी वेगळेपणाने वागण्याचा प्रयत्न केला तर समाजाला ते रुचत नाही.समाजाचे रक्षक म्हणवणारेच त्याच्या मार्गात अडथळे बनतात. त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात.प्रसंगी आयुष्य संपवतात.हेच चालत आले आहे,चालत आहे,व आणखी किती काळ असेच चालेल सांगता येत नाही.

  ReplyDelete
 2. Thank u sir.ji...salute to u👍
  Khup important asha subject var apan keleli post Kharach khup kautukaspad aahe.

  ReplyDelete
 3. Thank u sir.ji...salute to u👍
  Khup important asha subject var apan keleli post Kharach khup kautukaspad aahe.

  ReplyDelete
 4. भारतात चिञपट आणि क्रीकेटचे एवढे तरृण पिढीला याड लागले आहे की अब्दुल कलामांच्या2020 स्वप्नाला विसरून दूर जात आहे त्यात चिञपट व क्रिकेट त्यांच्या मनावर खोलावर परिणाम करतात तुमच्या लेखनितुन हे दिसून येते । अप्रतिम सर।।।।।

  ReplyDelete
 5. सर तुमचा हा लेख खूप छान आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतीक, मनःपूर्वक आभार!

   Delete
 6. प्रकाशित झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर 'सैराट आकलन आणि अन्वय' हलेख वाचण्यात आला. विविधतेसाठी आसुसलेल्या आपल्या समर्थ लेखणीने 'चित्रपट' हे क्षेत्रही लीलया पादाक्रांत केले हे मात्र निश्चित !
  चित्रपट हा माझा लहानपणापासूनचा 'वीक पाॅईंट'! चित्रपट पाहतांना त्याच्या पात्रांशी, दिग्दर्शकाशी, संगीतकाराशी समरस होऊन डोळ्यातून घळघळ अश्रू ढाळत चित्रपट पाहणे त्याचा आनंद घेणे ही माझी पद्धत आहे. परंतु सध्या वाद निर्माण करून चित्रपटाला जी भंपक प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न होतो किंवा चार दोन बाजारू लेखक, समीक्षक, तथाकथित बुद्धिवाद्यांना सोबत घेऊन चित्रपटाची जाहिरात करण्याची जी कीळसवाणी पद्धती सध्या रूढ झाली आहे त्यामुळे माझ्यासारख्या संवेदनशील प्रेक्षकाला अपेक्षाभंगाचे प्रचंड दु:ख सहन करावे लागते. त्यामुळेच कदाचित सैराट या वादाश्रित चित्रपटाबाबत माझे प्रथम नकारात्मकच मत होते हे मि प्रामाणिकपणे मान्य करतो. तुमच्या लेखातील 'यु टर्न' घेणाऱ्या मित्रांपैकीच मि एक आहे. चित्रपट पाहिल्यानंतरच मला त्यातील वास्तव लक्षात आले. चित्रपटातून स्वातंत्र्याच्या सुमारे ७० वर्षानंतरही जैसे थे असलेले किंबहुना अधिक विखारी झालेले जातीयतेचे विदारक सत्य समोर आले आहे. जातीयतेचे कणभरही उच्चाटन झालेले नाही किंबहुना सोशल मीडियाच्या युगात जात हाच आता स्वाभिमान झाला आहे. हे सत्य प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाने ते मान्यही करून टाकले आहे. परंतु सैराटच्या माध्यमातून जेंव्हा ते प्रत्यक्ष समोर आले आणि त्याने धारण केलेले विक्राळरूप स्पष्ट झाले तेंव्हा त्यामुळे सर्वचजण हबकून गेले आहेत. पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्या विचारवंतांच्या सकट सर्वांच्याच मानसिकतेत धेल्याचाही फरक पडलेला नाही हे नागड सत्य नागराज मंजुळेंनी समोर आणले आहे. प्रिन्सला परश्याचे खालच्या जातीतील असणे सहन न होणे व त्याने थंडपणे बहिणीसह परश्याला संपविणे हे तर सत्यच आहे! त्यात वेगळेपण काहीच नाही वर्षानुवर्षे हे चालत आले आहे आणि अशा प्रवृत्तीचा धिक्कार करतच अनेक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, पुरोगामी, बुद्धिमंत मोठे झालेले आहेत. अशाने उच्चकुलीन लोकांच्या मानसिकतेत बदल होईल असे मानणे म्हणजे शुद्ध भाबडेपणाच! अशा मानसिकतेसमोर ठामपणे उभे राहणे व लढणे आवश्यक आहे. पोराला चांगल्या कॉलेजात शिकविणारा व सम्पूर्ण चित्रपटात सुमारे २६ ब्रँडेड टी शर्टस् आणि जीन्स घेऊन देणारा परश्याच्या बापाची आणि त्याच्या समाजाची व्यापक मानसिकता कुठे दिसलीच नाही उलट वडाच्या झाडाखाली भरलेल्या जात पंचायतीत परश्याच्या बापाने स्वत:ला थोबडावून घेण्यात व जात पंचायतीने त्याच्या त्या कृतीवर समाधानाने माना दोलाविण्यात धन्यता मानलेली दिसते. जात पंचायतीने त्याला लढण्याची ताकत का दिली नाही? म्हणजे त्यांनाही उच्चकुलीन आर्ची सून म्हणून नकोच होती असाच त्याचा अर्थ होत नाही का? हा एक प्रकारे प्रिन्सच्या विचारांचाच विजय नाही का? उच्चकुलीन डॅशिंग सुनेच्या पाठीशी हा समाज का नाही उभा राहिला? 'आता समद ठीक होईल' असे म्हणण्यासाठी आर्चीला तिच्या आईशीच बोलण्याची गरज का भासली? सासू सासरे तिला का जवळचे वाटले नाही? तो विश्वास तिच्या मनात का निर्माण झाला नाही? उच्चकुळात सून म्हणून गेलेल्या निम्नकुळातील मुलींमध्ये तो विश्वास निर्माण होतो व ती आपले माहेर पूर्णपणे विसरते हे येथे अधोरेखित करावेसे वाटते. आता २१ व्या शतकात कोणी असे म्हणत असेल की 'त्यांच्यापुढे आमचा टिकाव कसा लागणार?' तर मि त्याला केवळ पळपुटेपणा व सन्धीसाधुपणाच म्हणेल. उपरोल्लेखीत सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, बुद्धीमंत, ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहतीलच असा विश्वास या समाजाला अजूनही वाटत नाही असाही एक अर्थ यातून निघतो! बदल कोणालाच नको आहे जो तो आपल्याच जातीच्या नशेत गुंग आहे आपला ब्रान्ड पिणारा भेटल्यावर नशाबाजांना होतो तसा आनंद प्रत्येकाला आपल्या जातीचा भेटल्यावर होतो आहे.तीन मिनिटे म्युट करू आर्ची व परश्याला ठार मारण्याच्या पारंपारिक शेवटापेक्षा आर्चीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या परश्याच्या समाजाने प्रिन्सला व त्याच्या सहकाऱ्यांना भोसकून ठार मारल्याचा शेवट खरा नागराज मंजुळे टच राहिला असता व पुरोगामी महाराष्ट्रासाठी तो जास्त परिणामकारक व आशावादी ठरला असता!
  आपल्याला माझा स्वभाव व विचार करण्याची वृत्ती माहित असल्याने आपण माझ्या भावना - केवळ एका उच्चवर्णीयाने सैराट मधील शोधलेल्या उणीवा असे न समजता - समजून घ्याल अशी आशा करतो...... संजय पिले

  ReplyDelete