Kalaha | कलह

By
कलह, भांडण, संघर्ष, तंटा, वाद असे शब्द बऱ्याचदा त्यांच्या अर्थाचा आशय भिन्न असला तरी बहुदा भांडण या अर्थाने वापरले जातात. अर्थात ढोबळमानाने या शब्दांचा वापर करायचा असेल तर. संघर्ष या अर्थाने बोलताना कलह हा शब्द विपुल प्रमाणात वापरला जातो. मला नाही वाटत या शब्दाविषयी आपल्यापैकी कोणी अनभिज्ञ असेल. जीवनात प्रत्येकाने कधीतरी लहानमोठ्या कलहांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतोच असतो. तसं पाहता कलह शब्दाचा वावर जितका वैयक्तिक असतो तितकाच वैश्विकदेखील. त्याच्या अस्तित्वाच्या सीमा स्वपासून सर्वस्वापर्यंत नेऊन शोधता येतात.

कलहप्रिय परिस्थिती आणि माणसेही कोणास आवडत नाहीत. हा अनुभव सार्वत्रिक असला तरीही कलह घडवून आणणारा परिस्थितीशिवाय आणखी एक घटक माणूसच असतो, हे सत्यही नाकारता येत नाही. जीवनात कलह नसणारा माणूस शोधून सापडणे मुश्कील आहे. जन्मापासूनच माणसांची संघर्षयात्रा सुरु असते. इहलोकी जन्म घेऊन वातावरणात त्याने घेतलेला पहिला श्वास त्याच्या वाट्यास आलेल्या संघर्षाचे फलित असते. जीवशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून एखादाच मॅरेथॉन रेस जिंकतो. ओव्हमशी संपर्क घडून जीव नावाचा आकार निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. खरंतर तेव्हापासूनच या संघर्षाला प्रारंभ होतो. अपेक्षित लक्षाच्या दिशेने धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून काहीच जगतात. बाकीचे मरतात. जगलेल्यातील एखादाच शक्तिशाली असतो, तो अपेक्षित लक्ष गाठतो. जीव नावाचा देह धारण करून आकाराला येईपर्यंत निर्मितीचा संघर्ष सुरूच असतो. जिवांच्या विकासक्रमातील सगळ्याच अवस्थांमध्ये पुढेही अटळपणे सोबत करीत राहतो. या अंगाने विचार करताना संघर्षाचे गुण आपल्या गुणसूत्रांसोबत घेऊनच कोणताही जीव धरतीवर येतो. नंतर सुरु होतो पुन्हा त्याच्या जगण्याचा आणखी एक नवा दीर्घकालीन कलह, हा असतो टिकून राहण्यासाठी.

कलह सजीवांच्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांना व्यापणारा आणि सामावून घेणारा आहे. माणसांच्या आदिम अवस्थेत जिवंत राहण्यासाठी आणि उदरभरणाच्या प्रश्नांपोटी कलह घडत राहिले आहेत. आपला परगणा, परिवार सुरक्षित राखण्यासाठी आणि परिस्थितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माणूस इतरांशी भांडत राहिला आहे. या कलहात स्वरक्षण हेतू असला तरी स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न त्यास आंतरिक समाधान देणारा, सुखावणारा असतो. मनोवांछित सुख संपादन करताना माणूस केवळ माणसांशीच लढत राहिला असे नाही. निसर्गातील इतर जिवांशीसुद्धा त्याला दोन हात करीत राहावे लागले आहे. याहीपेक्षा टिकून राहण्यासाठी अधिक तीव्र संघर्ष निसर्गासोबत त्याला करावा लागला आहे. नैसर्गिक संकटांमधून सहिसलामत सुटकेसाठी संघर्षरत असणाऱ्या माणसांना कलहांनीमंडित आयुष्याची सोबत घडणं अनिवार्य होतं. या टाळता न येणाऱ्या संघर्षाचे स्वरूप गरजांनुसार वेळोवेळी बदलत गेले आहे. म्हणूनच जगण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी घडणारा संघर्ष सजीवांची प्राक्तनरेखा ठरला आहे. कोणत्या प्रसंगी कोणास काय हवे, त्यानुसार कलहाचे स्वरूप ठरत आले आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत त्याच्या परिणामात प्रासंगिक परिवर्तन घडत आले आहे. जगात घडलेल्या, वाढलेल्या संस्कृती माणसांच्या हजारो वर्षाच्या संघर्षयात्रेचे फलित आहेत.

रामायण, महाभारत यांना महाकाव्ये म्हणून माणसांच्या मनात मान्यता आणि मान असला, तरी या काव्यांचा केंद्रबिंदू संघर्ष आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. राम-रावण संघर्षात मर्यादांचे घडलेलं उल्लंघन कलहाचे कारण ठरले. तर महाभारतात मानिनीचा झालेला अधिक्षेप युद्धाचे निमित्त ठरला आहे. दोन्ही ठिकाणी ‘स्त्री’ संघर्षाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते; पण या संघार्षांमागे तेवढेच एक कारण आहे असे वाटत नाही, कारण त्या कलहकेंद्राभोवती असणारे अनेकांचे दुखावणारे अहं आणि सन्मानाचे, आत्मसन्मानाचे निकष माणसांना संघर्षापर्यंत ओढत नेणारे ठरले आहेत. मर्यादांचे बांध फोडले जातात, समाजाने निर्माण केलेल्या नियमांच्या आणि नैतिकतेच्या चौकटी तोडल्या जातात, तेव्हा कलह अटळ ठरत असतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती अन्यायातून मुक्तीसाठी घडणाऱ्या विधायक कलहाची प्रतीके आहेत. हा कलह विस्तारवादी सत्ता, सर्वंकष सत्ताधीशांच्या विरोधातला सर्वसामान्यांचा एल्गार होता. कोणतीतरी सर्वंकष सत्ता निर्धारित वर्तुळात राहून सत्तेचा वापर करायचे नियम नाकारते. ताल, तोल, तंत्र सोडून स्वार्थासाठी सत्तेचा वापर करायला लागते. सर्वसामान्यांचे जगणे अशा व्यवस्थेत दुष्कर होते, तेव्हा माणुसकीच्या परित्राणासाठी कोणासतरी हाती शस्त्रे धारण करायला लागतात. व्यवस्थापरिवर्तनासाठी घडणाऱ्या कलहात अनेक अनामिक जिवांच्या आहुती पडतात. तरीही माणूस अशा कलहाचे मोल चुकवूनही आनंदी असतो. असं का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्याच्या स्वातंत्र्यप्रिय मानसिकतेत दडलंय असं वाटतं.

कलहप्रियता सोबत घेऊन जगण्यातही कदाचित मानसिक समाधानाचे काही धागे अनुस्यूत असावेत असे वाटते. माणसाचं मन सुखावण्याइतकी माणसांच्या जगात कोणतीच भावना सुखाची नाही. एखादी व्यक्ती पद, पैसा, प्रतिष्ठेचा वापर इतरांवर जरब बसवण्यासाठी करते, तेव्हा त्याच्या अंतर्यामी असणारा अहं सुखावतो. याकरिता हाती असणाऱ्या पदाचा, अधिकारांचा वापर करून निम्नस्तरावर असणाऱ्या लोकांना प्रताडित करून तो आनंदतो. इतरांना आपण आपल्या अंकित ठेवतो, आपल्या कलाने वर्तण्यास बाध्य करतो, असे वाटणे सत्ताधीशांना सुखावणारे असते. भलेही अशा वर्तनाला नैतिकतेचे कोंदण नसले तरी. कोणी भाईगिरीच्या मार्गाने भीती निर्माण करून सुखावतो. पण हे घडताना स्वअस्मितेच्या तंत्राने चालणाऱ्या माणसांना आपल्या प्रतिष्ठेवर आघात होतोय, असे वाटते आणि ते या सगळ्या प्रकाराला विरोध करण्यासाठी उभे राहतात. दोन भिन्न वृत्तींमध्ये घडणारा हा कलह सुष्ट आणि दुष्ट असे रूप धारण करतो.

एकाच वर्गात शिकणाऱ्या बालवाडीतील लहान मुलांमध्येही निर्व्याज कलह असल्याचे आपण पाहतो, अगदी पेन्सिलचा एक लहानसा तुकडा घेण्यावरून. थोडे मोठे झाले की समवयस्क मुलांच्या समूहातही दबंगगिरी करण्यासाठी तो सांभाळला जातो. यौवनातील कलह कोण्यातरी तिच्यावर जीव जडला म्हणून सर्वस्व उधळून लावण्यासाठीही घडू शकतो. आप्त, स्वकीय, परिवार, समाजासोबत आपल्या प्रिय पात्राच्या प्रेमासाठी विरोध पत्करताना होत राहतो. विवाहाच्या सप्तपदीवरून फेरे घालून संसारात पावलं रमल्यावर दोघांमध्ये घडणारा कलह ‘भांड्याला भांडं लागणं’ या नावाने ओळखला जातो. अर्थात समाजात घडणाऱ्या कोणत्याही भांडणांना अहंचे टोकदार काटे असतातच. या काट्यांनी कोणी घायाळ होत नाही तोपर्यंत सारे ठीक असते; पण त्याची टोकं टोचायला लागली की, शेवट माणसं दुरावण्यात होतो. कधीकधी संसारातले ताणून धरलेले वैयक्तिक अहं नवराबायको नात्याचा अध्याय कोर्टाच्या साक्षीने संपवतात. भलेही कोणी याला मने न जुळल्यामुळे नात्यांचे विभक्तीकरण म्हटले तरी.

रस्त्याने प्रवास करताना वाहनाचा कोणासतरी कळत नकळत धक्का लागतो. भारतीय रस्त्यांवर नित्य दिसणारे हे दृश्य आहे. असे काही घडले की, प्रत्येकाला आपणच कसे योग्य दिशेने आणि नियमांनी चाललो होतो असे वाटायला लागते. कोणीच हार मानायला तयार नसतो. रस्त्यावर घडणारे असे क्षणिक कलहसुद्धा इतरांचं येणं-जाणं बंद करू शकतात. बसमध्ये, रेल्वेत जागेवरून तू तू मै मै घडणे दैनंदिन कलहाचे सौम्य रूप आहे. कधी आपल्या कोणा परिचिताला, आप्तांना अपघात घडतो. माणसांचा संयम सुटतो. संताप बनून तो रस्त्यावर उतरतो. कधी रस्त्यांवरील बेजाबदार वाहतुकीने समस्या येऊन रागाचे रुपांतर कलहात घडते. रस्ते अडतात. संतापाचा अतिरेक हाती येणारा दगड भिरकावयाला उद्युक्त करतो. रस्ता अडतो. माणसं भडकतात आणि समोर दिसेल त्यावर धडकतात. संतापाला प्रकटण्यास मार्ग मिळण्याऐवजी प्रश्न निर्माण करणारा रस्ता सापडतो. लहानसा वाटणारा प्रासंगिक कलह एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह बनून माणसांसमोर उभा राहतो.

राजकारणाच्या प्रांगणात कलह नेहमीच प्रिय असावा असे वाटण्याइतपत रुजलेला दिसतो. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन भिन्न विचारधारांना सोबत घेऊन तो नांदतो. कधी पक्षीय अभिनिवेश कलहप्रियतेचे कारण ठरतात. तर कधी पक्षांच्या आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या विचारधारा. कधी वैयक्तिक विचारधारेतून विरोधाचं अस्त्र घेऊन तो रस्त्यावर प्रकटतो. माणसांनी चालते आणि वाहनांनी धावते रस्ते अडतात. परिसरात बंदचा नाद निनादायला लागतो. परिस्थिती नियंत्रणाच्या मर्यादा ओलांडते, तेव्हा सुरक्षायंत्रणेचे कवच रस्त्यांवर, वस्त्यांवर उभे राहते. संचाराला बंदी करून कलहनियंत्रणाचा प्रयत्न घडतो. कधी कलह अशांततेचे विध्वंसक रूप धारण करतात. सार्वजनिक मालमत्तेच्या जिवावर उठतात. कोणाच्यातरी कसल्यातरी कारणाने दुखावणाऱ्या भावना कलह पेटवण्यात इंधनाचे काम करतात. अशा अविवेकी संघर्षाने परिस्थितीबाबत अनभिज्ञ  असणाऱ्या काही जिवांची जीवनयात्रा संपते.

जगात कुठल्या गोष्टी सार्वत्रिक असतील, नसतील माहीत नाही; पण कलह अरत्र, परत्र, सर्वत्र नांदतो आहे. कधी तो जातीय तणावात, कधी पंथीय संघर्षात, कधी धार्मिक अभिनिवेशात प्रकटतो. अहंमन्य मानसिकता कलहाला निमंत्रित करते. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष आघात चाकोरीत चालणाऱ्या जीवनव्यवस्थेवर होतात. कायदासुव्यवस्थेच्या ठिकऱ्या उडून प्रासंगिक परिस्थिती माणसांना विस्थापित करते. माणसं आपलं मत प्रस्थापित करण्यासाठी उभे राहतात. आपली विचारधारा पेरण्यासाठी केल्या जाणाऱ्या कवायतीत कलहाचे आयुध हाती घेतले जाते. अतिरेकी विचारांना प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा प्रयत्न अनेक निरपराध्यांच्या जगण्याची सांगता करतो. सार्वभौम अस्मितेवर आघात करणारा अविवेकी विचार अतिरेकी होतो. आतंकवादी मानसिकता दिमतीला घेऊन कोणाच्यातरी अविचारी वागण्यातून प्रकटतो. कलहांपासून कोसो दूर राहू इच्छिणाऱ्या शांतताप्रिय माणसांना विस्थापित करतो. मायभूमी सोडून माणसे वणवण भटकत फिरतात. अनियंत्रित सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या सत्ताधीशांच्या कलहवृत्तीपासून सुटून सुरक्षित परगणा शोधण्याच्या दुसऱ्या नव्या कलहात अडकतात. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धांचा विध्वंस वसाहतवादी, साम्राज्यवादी मानसिकता अंगीकारणाऱ्या स्वार्थपरायण विचारांच्या वर्तनाचा परिपाक होता. सर्वंकष सत्ताधीश होण्याच्या मानसिकतेतून घडलेल्या कलहाचा माणसांनी अनुभवलेला विनाश म्हणजे ही युद्धे. पूर्वीही राजसत्तांचे प्रदेशविस्तारासाठी संघर्षाच्या मार्गाने जाणे घडले आहे. आपले सैनिकी बल, आपली राजकीय ताकद सीमेलगतच्या सत्ताधीशाला दाखवणे, या हेतूने ते घडत असे. आकांक्षापूर्तीसाठी प्रादेशिक सीमा विस्तारताना घडणाऱ्या कलहाने अन्य परगण्यात वास्तव्य करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या सीमांना मर्यादांचे बांध घातले जात.

कलह कुठे नाही, तो घरापासून देशापर्यंत सगळीकडे आहे. घरात सोबतीने वाढणाऱ्या भावंडानाही तो नवीन नाही. वाटण्या होताना तांबा-पितळेच्या एका फुटक्या भांड्यासाठी भांडणारी भावंडे कलहात रक्ताची नाती विसरतात. शेताच्या बांधावरून शेजारच्याच्या टाळक्यात दांडके घातले जाते. शेजारी-शेजारी राहणारे क्षुल्लक कलहातून परस्परांचे कट्टर शत्रू होतात. सासू नावाचं नातं घरगुती कलहाचे सार्वत्रिक रूप असल्याचे अनुभव रंगवून सांगितले जातात. सासू-सून हा द्वंद्व समास कलहातूनच विग्रहित झालेला दिसतो. प्रेमाचं नितळपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांना कौटुंबिक कलह बाधित करतात. काही गावं कलहामुळे बदनाम होतात. सार्वजनिक अशांतता हीच त्या गावांची ओळख होते. गावातील एखादी वस्ती, त्या ठिकाणी असणारी माणसे कलहासोबत जगणारी म्हणून ओळखली जातात. काहींवर कलहप्रिय म्हणून शिक्का बसवून त्याच्या जगण्याला कायद्याच्या कलमांनी बंदिस्त कले जाते. काही माणसांच्या मनात विशिष्ट परिवाराची, परिसराची ओळख कलहप्रिय म्हणूनच गृहीत धरली जाते.

कलह फक्त माणूस नावाच्या प्राण्यातच असतो असे नाही. मानवेतर जिवातही तो मोठ्याप्रमाणात असतो. प्राणीसुद्धा जिवाच्या कराराने सजातीयांशी, अन्यांशी भांडताना दिसतात. पण त्यांच्या कलहामागील प्रेरणा फक्त नैसर्गिक असते. परिसर, मादी यांच्यावर वर्चस्व संपादनाची भावना या कलहाचे केंद्र असतात. अन्य जिवांच्या जगात नैतिक-अनैतिक प्रकार असण्याचे कारण नसते. स्वाभाविकपणे वागायला त्यांचे शरीरधर्म त्यांना उद्युक्त करत असतात. माणसाच्या जगात नैसर्गिक गरजांसोबत भावनिक गरजासुद्धा कलहांचे कारण असल्याचं आपण पाहतो. आपले अहं कुरवाळण्याच्या नादात माणसं वर्तनाच्या चौकटी विसरतात. कलहाला अस्मितेचे वसने चढवून आपले अहं जोपासत राहतात. नियमांना नैतिकतेच्या, मूल्यांच्या खुंटीशी घट्ट बांधून समाजाकडून सत्त्वशील आणि तत्त्वशील वर्तनाची अपेक्षा करतात. मात्र, इप्सित साध्य करण्यासाठी आपले नियम तयार करून जगतात. 

कलहांचे असे सार्वत्रिक आविष्कार पाहताना एक गोष्ट मनात येते, माणसांना आपल्या जगण्यातून कलह संपवता येणारच नाहीत का? मला वाटते संयम, सत्य, अहिंसा या मूल्यांचा अंगीकार कलहप्रिय जगाला शांततेच्या मार्गाने मार्गस्थ करू शकतो. माणसाच्या मनात पेटलेल्या अविवेकी विचारांच्या वणव्यालाही शांत करू शकतो. संतमहात्म्यांनी कलह टाळून प्रेमाची भजने गायली. सुधारकांनी सहअस्तित्वाने सहजपणे जगणाऱ्या जगाचे स्वप्न पाहिले. जगण्याला नैतिकतेच्या चौकटींनी मंडित करून स्वतःचा शोध घेऊ पाहणाऱ्या विचारधारा कोणत्याही संघर्षाला विराम देऊ शकतात. सत्व आणि स्वत्वाची ओळख दाखवणारा मार्गच विद्यमान जगातील माणसांची खरी गरज आहे. असा मार्ग पूर्वसुरींच्या कार्यातून स्मृतीरुपाने सोबत करीत असूनही आम्हां माणसांना अद्याप कळला का नसेल? कळला पण कदाचित वळायचे राहून गेले आहे असे वाटते. हे कळेल त्यावेळी माणूस कलहमार्गाने का वर्ततो? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. कलह टाळून संयमाने सात्विक जगण्याचा मार्ग दाखवणारे संत, महात्म्यांचे विचार वाचून, ऐकून माणसांचे मन आणि मतपरिवर्तन झाले नाही असे नाही; पण वास्तव असेही आहे की, माणूस अजूनही जीवनातील कलहप्रिय विचारांना कोणत्यातरी असुरक्षतेपोटी टाकायला तयार नाही. इतिहास हासुद्धा आहे, की माणसांच्या जगावर आणि जगण्यावर अनेक आघात घडूनही माणूस शहाणा होण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्याचा उपाय संघर्षच असल्याचे मानतो. कलहाच्या मार्गाने कुठली शांतता प्रस्थापित करू इच्छितो कोणास ठाऊक? तसेही माणसांच्या जगण्यातून कलह हद्दपार होणे अवघड आहे. कारण काही गोष्टी सजीवांना उपजतच मिळालेल्या असतात, त्यातील एक कलह आहे.

10 comments:

 1. सर कलह सर्वत्र आहे घरापासून गल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यन्त कधी अहं ,तर कधी सत्ता,तर कधी संपत्ती कारणीभूत असते पण ही खरे तर वर्चस्वाची लढाई असते.

  ReplyDelete
 2. सर कलह सर्वत्र आहे घरापासून गल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यन्त कधी अहं ,तर कधी सत्ता,तर कधी संपत्ती कारणीभूत असते पण ही खरे तर वर्चस्वाची लढाई असते.

  ReplyDelete
 3. Replies
  1. आभार बावस्कर मॅडम!

   Delete
 4. Very nice sir
  Neha

  ReplyDelete
 5. Khup Chan sir...shivani

  ReplyDelete