आनंदाची नक्षत्रे

By

आता नेमकं आठवत नाहीये, पण बहुदा एखादवर्षापूर्वीची गोष्ट असेल. उन्हाळ्याच्या सुट्या वगैरे नुकत्याच सुरु झालेल्या असाव्यात. गर्दीने गच्च भरलेल्या मार्गावरून व्यापारी संकुलातील अपेक्षित ठिकाणाचा माग काढत निघालो होतो. पायी चालणाऱ्या कोणा जिवाची काडीइतकीही किंमत न करता पळणारी वाहने, रस्ता केवळ आपल्यालाच आंदण मिळालाय अशा आविर्भावात धावणाऱ्या रिक्षा अन् वाटेल तेव्हा, हवे तसे चालण्यासाठीच शहरातील सगळे रस्ते तयार केलेले असून त्यावर फक्त आपलीच मालकी आहे, असं समजून चालणाऱ्यांचे धक्के सराईतपणे चुकवत, सापडली जरा अलीकडे-पलीकडे जागा अन् मिळाली थोडीफार वाट तिकडून भारतीय नागरिक असल्याचे सारे कौशल्य पणास लावून लक्षाच्या दिशेने सरकत होतो. 

दुसरा काही इलाजच नव्हता. सौभाग्यवतीकडून निर्वाणीचा आदेश निर्गमित झालेला. “आज आणतो, उद्या बघू, परवा काय, तर अजिबात वेळ नाहीये. सबबी सांगून सगळे वार संपले, पण तुमचा मुहूर्ताचा वार अन् वेळ अजून काही येत नाहीये. तेच ते सांगून मी आता थकले. मिक्सरच्या भांड्याचे पाते आज बदलून नाही आलं, तर पुढ्यात पडेल तेच खायचं. हेच का, ते का नाही, म्हणून कुठलीच तक्रार ऐकून नाही घेणार!” नवरा नावाच्या प्राण्यावर कारणासह अथवा कारणाशिवाय चिडण्याचा आपला अधिकार परंपरासिद्ध असल्याचे मानून सात्विक वगैरे प्रकारचा दम घरून आधीच मिळालेला. उगीच हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा गर्दीतले चारदोन धक्के खाणं केव्हाही चांगलं. एक प्रश्न टाळून पुढील अनेक प्रश्न पुढ्यात कशाला ओढून घ्यावेत, असा पोक्त विचार म्हणा अथवा उशिरा सुचलेल्या शहाणपणाची सोबत करत जबाबदारीचा अनैच्छिक भार घेऊन निघालो होतो. तसंही बायकोचा आदेश निघाल्यावर जगातल्या कोणत्या नवऱ्याची टाप आहे, त्याचं उल्लंघन करून पुढे निघायची! मग मी तरी यास अपवाद कसा असेन? 

अर्जुनास शरसंधान करताना पोपटाचा केवळ डोळा दिसत असल्याची कथा सांगितली जातेय. लक्षपूर्तीचा अखंड ध्यास अंतरी असल्याशिवाय अपेक्षित पडावावर पोहचता येत नसल्याचा निर्वाळा या कथेतून दिला जातो. परीक्षा, पोपट, डोळा, गुरुवर्यांचा आदेश वगैरे खरंखोटं काय ते अर्जुनालाच माहीत. अर्जुन परीक्षेत उत्तीर्ण झाला असेलही. त्याचा तेवढा अधिकार होता, योग्यता होती. पण आमच्यासारख्या पामरांचं काय? पात्रता नसताना एखाद्याकडून अवास्तव अपेक्षा करण्यात काही अर्थ असतो तरी का? 

अर्थात, असा विचार करण्यासाठी फारसं कष्ट सहसा कुणी घेत नाही. तशी आवश्यकताही कुणास वाटत नाही. त्या समयी अर्जुनाचं एक ठीक होतं, त्याच्या पुढ्यात किमान अशा गहन सांसारिक प्रश्नांचा (!) व्यूह तरी नव्हता. समजा, आपल्या आसपास आज असणारी व्यवधाने तेव्हा असती, तर त्याने लक्षपूर्तीसाठी आत्मसात केलेल्या एकाग्रतेची नवलाई तरी असती का? त्याच्यासमोर असे प्रश्न असते तर, ना बिचाऱ्या पोपटाचा डोळा गेला असता, ना ही नवलकथा कथा काळपटावर कोरली गेली असती. कल्पना करा, शरसंधान करतेवेळी एवढा गलका अर्जुनाच्या आसपास असता, तर द्रोणाचार्यांना त्याने काय सांगितलं असतं? कदाचित म्हणाला असता, “गुरुवर्य, क्षमस्व! अशा परिस्थितीत पोपटाचा डोळाच काय, पण समोरचं झाडही नीट नाही पाहू शकत मी. डोळा तर खूप लहान गोष्ट आहे. आपल्याकडून नाही होणार हा लक्षभेद. लक्षाचा वेध घेण्यासाठी आधी लक्ष तर लागायला हवं.”

या कथेचं तात्पर्य एकाग्रतेसाठी अखंड सायास वगैरे आवश्यक असतात असं काहीसं असेल किंवा आणखी काही. ते काही असो. ते तसं असण्यात दुमत असण्याचं कोणतंच कारण नाही. पण केवळ असण्याला काय अर्थ असतो का सामन्यांच्या आयुष्यात? तर, सांगायचा मथितार्थ एवढाच की, परिस्थितीचा पायबंद पडूनही पडाव पार करण्यासाठी आजचे कितीतरी गंजलेले अन् गांजलेले अर्जुन लक्षाच्या दिशेने रोज धावत असतात, आजूबाजूला सुखनैव नांदणाऱ्या गलबल्यातून आपल्याठायी असणारा संयम तसूभरही कमी होऊ न देता. एकाग्रतेचा हाच वसा अन् वारसा घेऊन दुकानांवरील नावांच्या, उपलब्ध सुविधांच्या पाट्यांचा वेध घेत गजबजलेल्या बाजारातून भटकत होतो. पुढ्यात पडलेल्या प्रश्नाला काही करून आज पूर्णविराम द्यायचाच म्हणून लक्षपूर्तीकडे सारं लक्ष लागलेलं. 

“ओ चंद्या...!” म्हणून ओळखीचा आवाज. लक्षपूर्तीकरता लक्षपूर्वक धारण केलेली माझी लक्षणीय एकाग्रता क्षणाच्या लाखाव्या भागाची गणना केली तर तेवढ्या वेळात भंग. पाठीमागे वळून पाहिले. गर्दीत ओळखीचा चेहरा दिसेना. थोडं इकडेतिकडे बघावं म्हणून मान वळवली. तर हा रस्त्याच्या पलीकडील बाजूने उभा. तेथूनच अंगात आल्यासारखे हातवारे करीत थांब म्हणून खुणावत माझ्याकडे यायला निघालाही. गर्दीतल्या चारदोन जिवांवर धडकून, वाटेवर मुक्तपणे विहरणाऱ्या वाहनांना हुलकावणी देत वनपीस इकडच्या किनाऱ्याला लागला. त्यात एक बरं की, धडकला त्या आकृत्यात कोमल कायेची मालकी असणारं कुणी नव्हतं. समजा, अपघाताने म्हणा अथवा योगायोगाने तसं असतं, तर याच्या आनंदाला ना आर राहिला असता, ना पार. आनंदाची अगणित नक्षत्रे याच्या अंगावर आरपार गोंदली गेली असती. 

आला तसा छातीच्या पिंजऱ्यात अडकलेल्या श्वासाला उधळून देत तक्रारीच्या सुरात म्हणाला, “ओ मास्तर, आपण आहात कुठं एवढ्या दिवसांपासून? सध्या आपलं दर्शनही दुर्लभ होत चाललंय.” 

तर, हा कोण? असा काहीसा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. सांगतो. हा आमचा मित्र. म्हणजे माझाही मित्र. म्हणजे सभ्यतेचे संकेत सांभाळण्या अन् कागदपत्रातून लिहिण्यासाठी दत्तात्रय. बोलण्या अन् बोलणाऱ्यांसाठी दत्त्या. म्हणजे शाळेपासून सोबत असणारा. म्हणजे अशा संगतीला कुणी लंगोटी मित्र वगैरे म्हणतात. पण आमच्या टोळक्यात याची अपरिवर्तनीय ओळख ‘शेपूट’ म्हणून आजही अक्षुण्ण आहे. म्हणजे ते कुठेही अन् केव्हाही चिकटत असतं अथवा चिकटवता येतं.


आधीच्या वाक्यातील पूर्णविराम ते नंतरच्या वाक्यातील पहिला शब्द यादरम्यान मिळाला तेवढ्या अवकाशात मनातच म्हणालो, “साल्या, कुणी दर्शन घ्यावं एवढा दर्शनीय कधीपासून झालो मी?”

मला बोलण्याची थोडीही संधी न देता पुढे बोलू लागला. म्हणाला, “हां बरोबर आहे, तू गुरुजी ना! तुम्हां गुरुजी लोकांचं एक चांगलं असतं, हिवाळा असला की, दिवाळीच्या वीसएक दिवस अन् उन्हाळा रंगात आला की, दीडएकमहिना सुट्या. सटवीने आनंदयोग अंकित केलाय तुमच्या ललाटी. आनंद आनंद म्हणतात, तो यापेक्षा आणखी वेगळा काय असू शकतो? आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करता. आमच्या नशिबात बाराही महिने कार्यालयाच्या रंग विटलेल्या इमारती, त्यांच्या पोपडे सुटलेल्या भिंती अन् रंगकामाची अपार आवड असणाऱ्यां रंगप्रेमींनी तांबूलसेवन करून मुखात तुंबलेला मुखरस मुक्त उधळून रंगवलेले त्यांचे जिने. तोच आमचा स्वर्ग. तेच आमच्या आनंदाचं आगर. तेच आमचं अखंड सुख. मला तर तुम्हां गुरुजी लोकांचा प्रचंड वगैरे काय म्हणतात, तो हेवा वाटतो बुवा! तुमच्याकडे पाहून वाटतं, साला, आपला मार्गच चुकला. झालो असतो गुरुजी मस्तपैकी! कुठून अवदसा सुचली अन् रस्ता बदलून घेतला, कुणास ठाऊक?”

‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’, हे विसरला असावा बहुदा हा ठोंब्या! मनातच म्हणालो. त्याचं बोलणं निमूट ऐकून घेतलं. सुट्या कमी आहेत की अधिक, याचं मोजमाप काढण्याच्या अन् सुट्ट्यांबाबत असणाऱ्या समज-गैरसमजाचं मोहळ उठवून विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता- समजा पडलो असतो, तरी याच्या विचारधारेत काडीचाही फरक पडला नसता. मुद्दामच म्हणालो, “असतं एकेकाचं नशीब, नाही का? आता राहिला प्रश्न तुम्ही आनंद कशाला म्हणतात, सुख कशात मानतात याचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो, नाही का?”
 
एवढया वर्षांच्या मास्तरकीच्या अनुभवातून प्रकटलेलं माझं अमोघ ज्ञान ऐकून त्याच्यातला तत्त्वज्ञ अवकाळी जागा झाला असावा बहुतेक. म्हणाला, “कारे, तूच तर नेहमी सांगतो ना, नशीब वगैरे असं काहीही नसतं. प्रयत्न फसले, अपयश पदरी पडलं तर दोष द्यायला कुणीतरी असावं, म्हणून नशीब नावाचा प्रकार उभा केलाय माणसानं. आज तू नशिबाच्या गोष्टी करतोय?” 

त्याला थांबवत म्हणालो, “ओ साहेब, अजूनही मी माझ्या मतांवर ठाम अन् कायम आहे. असं म्हणायचं असतं, म्हणून म्हणालो.” मार्गी असणाऱ्या विषयाला मध्येच इकडेतिकडे भिरकावून देणं, ही याची आणखी एक खासियत. नेहमीच्या सवयीने मूळ विषयाला भलतीकडे वळता करून म्हणाला, “ते राहू दे, कसं काय चाललय? चेहऱ्यावरून तर मजेत दिसतोय. याचा अर्थ, आपल्या अंगणी आनंदाचं झाड चांगलंच बहरून आलेलं असावं बहुतेक. सुखाचं चांदणं भरभरून वर्षाव करतंय की काय सध्या!”

आता त्याला काय सांगावं, हे आनंदाचं झाड अंगणी असतं, तर एवढं ऊन डोक्यावर धरून कशाला वणवण करत फिरलो असतो? त्याला पुढे आणखी बोलण्यास संधी देणं, म्हणजे हाती असलेल्या वेळेला तिलांजली देणं अन् अर्थहीन विषयांवर आपलं ज्ञान वाढवून घेणं. त्याला ती मिळू न देता म्हणालो, “थांब रे, आज बरीच कामं आहेत! नंतर पुन्हा भेटलो की, सावकाश बोलू या का आपण.” निग्रहपूर्वक त्याला थांबवला नसता, तर पुढचा किमान अर्धाएक तास अक्कलखाती पडला असता. त्याच्या तावडीतून सुटण्याचा म्हणण्यापेक्षा सटकण्याचा प्रयत्न करतोय, हे  चेहऱ्यावर किंचितही दिसू न देता स्नेहार्द विनयाने पुन्हा सवडीने भेटू सांगत निरोप घेतला. 

कामे मार्गी लावून घरी आलो. मोहीम फत्ते करून आलेल्या  विजयी वीराच्या थाटात पिशवी बायकोच्या हवाली केली. नेमकं सांगता नाही येत, पण काहीतरी अवघड काम तडीस नेल्याच्या तोऱ्यात बायकोकडे एक कटाक्ष फेकला. भारदस्त पावले टाकत न्हाणीघराकडे निघालो. धुळीने माखलेले हातपाय अन् ऊन्हाने तेलकटलेला चेहरा गार पाण्याने धुतला अन् माझ्या खोलीकडे वळता झालो. एसी सुरु केला. वर्तमानपत्र हाती घेतलं वाचता-वाचता डुलकी आली. दिली मस्तपैकी ताणून. तास-दोनतास वेळ झाला असेल, सौभाग्यवतीचा आवाज कानी आला. “अहो, जागे व्हा! उठा, सायंकाळचे पाच वाजले. ही काय झोपायची वेळ आहे?” 

उठलो. बेसिनकडे गेलो. पाण्याने चिंब भिजवलेला चेहरा रुमालाने कोरडा करीत परत येऊन टेबलवर निवांत पहुडलेल्या पुस्तकांतून हाती आलं, ते एक पुस्तक घेऊन पाने चाळू लागलो. स्वयंपाकघरातून सौभाग्यवती वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन आल्या. तो हाती देत म्हणाल्या, “झाली झोप? बरंय तुमचं. सुट्यांचं स्वानंद सुख अनुभवतायेत. तुम्हा पुरुष मंडळींचं एक बरं असतं नाही का? बायको दिमतीला असल्याने सारं कसं मनाजोगतं, अगदी आरामात चाललेलं असतं. सुटीचा खरा आनंद तो तुमचाच! आम्हां बायकांना सुटी असली काय अन् नसली काय, नुसती नावालाच. घर आणि घरकाम काही आमच्या आनंदाचे अर्थ आम्हांला सापडू देत नाही.”

सौभाग्यवतीच्या सात्विक संवादाला (की संतापाला?) आणखी पुढे दोनतीन अंकी नाट्यप्रयोग न बनू देता ‘शब्दवीण संवाद’ साधणं हाच पर्याय पर्याप्त वाटला. त्यावरच कायम राहणं पसंत केलं. चहाचा कप रिकामा केला. एव्हाना डोळ्यातली झोप बऱ्यापैकी गेली. 

साला, आज जो कोणी भेटतोय, तो सांगतोय आनंदी दिसतायेत. बोलतोय, तो आनंदाच्या व्याख्याच विशद करून मांडतोय. यांना असा कुठला चष्मा मिळालाय, की त्यातून केवळ अन् केवळ आनंदच बघायला मिळतो? बरं, सगळ्यांना आपलाच आनंद कसा काय दिसतोय? खरंच आहे की काय, यांचं मी आनंदी वगैरे असल्याचं सांगणं. मीच दोलायमान झालो. आनंदी चेहरा असतो तरी कसा? आपला चेहरा परत एकदा आरशात पाहून खात्री करून घ्यावी की काय, म्हणून आरशाकडे जाण्याचा अनिवार मोह अनिच्छेने का असेना, पण टाळला. 

ही मंडळीं ‘आनंद’ नावाचा स्वतःपुरता सापडलेला अर्थ अन् ही जी काही सुख नावाची कल्पना, संकल्पना, जी काही असेल ती, त्याचं खोदकाम करून निष्कर्षाप्रत पोहचू पाहत होते. सापडलेल्या वितभर सुतावरून स्वर्ग गाठू पाहत होते. पैलतीराचा विचार न करता, अलीकडच्या काठावर उभं राहून अन् स्वतःच तयार केलेली सूत्रे वापरून या शब्दाचा अर्थ पडताळू पाहत होते. खरंतर पाहत होते म्हणण्यापेक्षा, तो गृहीतच धरला होता म्हणणे अधिक सयुक्तिक. त्याचा संबंध त्यांनी माझा पेशा अन् त्यातून आलेल्या सुट्यांशी जोडला होता अथवा तसा जुळवण्याचा प्रयत्न चालवलेला होता, तो ‘आनंद म्हणा अथवा सुख’ नावाची संकल्पना नेमकी काय असते, या गोंधळाने उडालेल्या अर्थांचे तुकडे मला वाकुल्या दाखवू लागले. 

‘आनंद’ फक्त तीन अक्षरांचा शब्द. पण त्यात किती मोठ्ठं समाधान सामावलेलं आहे, नाही का? वाचायला छान वाटलं ना, हे असं काहीसं सांगणं! पण त्यासोबत येणाऱ्या अपेक्षाभंगांचं काय? या काय चा विचार आपण बहुदा नंतरच करतो. म्हणून असेल की काय, आनंद असणं अन् आनंदी असणं यात अंतराय असतं. आनंदाची सुनिश्चित परिभाषा अवघडच. कोणाला आनंदाचा अर्थ कसा अभिप्रेत असेल, हे कसं सांगावं? हवी असणारी एखादी गोष्ट मला मिळाली, म्हणजे तो माझ्यासाठी आनंद अन् नाहीच मिळाली ते दुःख. 

अनेकांकडून आयुष्य सुख-दुःखाचा मेळ असल्याचे तत्त्वज्ञान आपण ऐकत आलेलो असतो. कुणी याला ऊनसावलीचा खेळ असंही म्हणतात. आलटून-पालटून ते येत-जात असतं. फारकाळ एकच एक स्थिती टिकत नसते वगैरे वगैरे ते सांगत असतात. सुखानंतर दुःख येणार म्हणून गर्भित भीतीही या शब्दांतून पाझरत असते. सीमित अर्थाने ते खरंही मानता येईल. हा सुखाचा पांढरा आणि हा दुःखाचा काळा, अशा दोन रंगात आयुष्याची सरळसरळ विभागणी नाही करता येत. खरंतर या दोन्हींच्या एकत्रीकरणातून जो रंग तयार होतो, तोच जीवनाचा खरा रंग.

‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असं तुकाराम महाराज सांगून गेले. अजूनही कुणाला हे खोटं ठरवता आलं नाहीये. अर्थात, हे माहीत नाही असं कुणीही नसावं. मनाजोगता आनंद मिळण्याची संभावना जवळपास नसल्याचं अवगत असूनही माणसे त्याचा धांडोळा घेत आहेत, आनंदतीर्थे शोधत आहेत. काळाचा कोणताही तुकडा असूद्या, आनंदाची अगणित नक्षत्रे खुणावत आली आहेतच. ती खुडून आणण्यासाठी माणसे अनवरत प्रयत्न करतायेत. नाहीतरी कणभर सुखासाठी माणूस मणभर कष्ट उपसतोच ना! आयुष्य आनंदमार्गी चालत राहावे, म्हणून सुखाच्या लहानमोठ्या बेटांचा धांडोळा घेतोय. त्यांच्या प्राप्तीसाठी धडपडतोय. ही यातायात ओंजळभर आनंद आपल्या अंगणी नांदता असावा म्हणूनच असते. मग तो पळभर वसती करून असला तरी पुरतो. पण हेही वास्तव दुर्लक्षित नाही करता येत की, पर्याप्त प्रमाणात तो साऱ्यांच्या पदरी पडेलच असं नाही. अंतरी समाधान नांदतं असलं की, आनंदही त्याचा माग काढत चालत येतो. दुःख आवतन न देताही येतच असतं, येण्यासाठी त्याला एकच वाट नसते. 

शेतकरी अहर्निश श्रमरत असतो. भूमीतून डोकावणाऱ्या इवलाल्या कोंबांना पाहून केलेल्या कष्टाचे कढ तो विसरतो. कोवळ्या कोंबातून उगवून आलेला आनंद त्याच्या अंगणी अवतरतो. दिसामासांनी वाढणाऱ्या, बहरणाऱ्या, वाऱ्याच्या संगतीने झुलणाऱ्या पिकांच्या तालावर मनातलं सुखही विहार करायला लागतं. आनंद अंतरी हिंदोळे घ्यायला लागतो. रणरणतं ऊन अंगावर घेत रस्त्यावरची खडी फोडणाऱ्या मजुराच्या मनात उद्याच्या सुंदर दिवसाचं स्वप्न साठलेलं असतं. उगवणारा दिन आनंद घेऊन अंगणी येण्याची आस अंतरी असते, म्हणून आजचं पर्वताएवढं दुःख तो पेलतो.

आनंदाचे संदर्भ सांगता येतीलही, पण अर्थ नेमके काय असतील, हे सांगणं बऱ्यापैकी अवघड गणित आहे. त्याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. ना तो दत्तक घेता येत, ना कुठून उसनवार आणता येत. बाळाच्या बोबड्या बोलांमध्ये आईला तो दिसतो. लटपटणाऱ्या पावलांना सावरत चालणं शिकताना पडू नये म्हणून घट्ट धरलेल्या हातात बाळाला तो मिळतो. रात्रंदिन केलेल्या अभ्यासातून हाती आलेल्या परीक्षेच्या निकालात गुणांचे अंक बनून तो विसावलेला असतो. आकांक्षांच्या क्षितिजावर तो पहुडलेला दिसतो. प्रयोगशाळेत अहर्निश गढलेल्या संशोधकाला परीक्षानळीतल्या द्रावणात तो सापडतो. पावलापुरता प्रकाश पेरणाऱ्या पणतीतून तो गवसतो. आस्थेच्या अंगणात तो असतो. वासरासाठी हंबरणाऱ्या गाईच्या आवाजात तो वसतो. मंदिरातून ऐकू येणाऱ्या भजनांच्या सुरात तो असतो. दिव्याच्या वातीतून तो उजळून निघतो. पांडुरंगाच्या भेटीसाठी अनवाणी धावणाऱ्या भक्ताच्या अंतरी तो अधिवास करून असतो.

निसर्गाच्या नानाविध आविष्कारात तो सामावलेला आहे. कोकिळेच्या सुरात, मोराच्या पिसाऱ्यात, बरसणाऱ्या धारात, धावणाऱ्या वाऱ्यात, वाहणाऱ्या झऱ्यात तो वसतो. पहाडाच्या कुशीतून उडी घेणाऱ्या धबधब्यासोबत कोसळत राहतो. इंद्रधनुष्याच्या रंगांना धरून तो उभा असतो. चंद्राच्या प्रकाशातून पाझरतो. लुकलुकणाऱ्या चांदण्यांतून हसतो. डोंगराआडून डोकावणाऱ्या सूर्यबिंबात सामावलेला असतो. संध्यासमयी क्षितिजावर उधळलेल्या रंगात तो विरघळून गेलेला असतो. 

शोधलं तर सुख कुठे नाही? अरत्र, परत्र, सर्वत्र आहे. सुखाची परिभाषा करायची, तर आनंद शब्दाजवळ येवून विसावेल. सुख आहे म्हणून आनंदही आहेच. पण हे म्हणणंही अतिशयोक्त नाही की, आहे तेथे तो आम्ही शोधत नाहीत. म्हणूनच ‘अमृतघट भरले तुझ्या दारी, का वणवण फिरशी बाजारी’ असं बा.भ.बोरकर लिहिते झाले असतील का? की कवितेच्या ओळींत ओवलेल्या शब्दांचं बोट पकडून निखळ आनंदच त्यांच्या अंगणी आला असेल? आसपास विहरणारा निसर्गातला आनंद पाहून बालकवींना ‘आनंदी आनंद गडे, इकडेतिकडे चोहीकडे’ म्हणावेसे वाटले असेल का?

आनंदप्राप्तीसाठी माणूस अविरत वणवणतोय. पुढे चालून त्याच्या भ्रमंतीला विराम मिळेल याचीही शाश्वती नाही. एवढी यातायात करूनही नितळ, निखळ, निःसीम वगैरे आनंद त्याच्या हाती लागला का? माहीत नाही. असेल. कदाचित नसेलही. आनंदाची आखीव परिमाणे नसतात. दिसतात ते त्याचे केवळ काही आकार. तेही आपापल्या आकांक्षांतून आलेले असतात. आनंद हा असा अन् असाच असतो, हे सांगणं जवळपास असंभव. तरीही तो असतो एवढं मात्र नक्की. कुठून, कसा अन् केव्हा तो गवसेल, हे कसं सांगता येईल? कारण, आनंदाची अभिधाने प्रत्येकाची निराळी अन् प्रयोजने प्रत्येकासाठी वेगळी असतात, नाही का?
चंद्रकांत चव्हाण       
**

0 comments:

Post a Comment