तर्काचे तीर

By

माणूस नावाच्या प्राण्याच्या अनेकांनी अनेक अंगांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्या यथार्थ किती, अतिशयोक्त किती, अन् अगम्य किती, ते त्यालाच माहीत. पण वास्तव हे आहे की, तो दिसतो तसा नसतो अन् असतो तसं आचरण असेलच याची शाश्वती काही कुणाला नाही देता येत. तसंही प्रत्येकवेळी तो अथपासून इतिपर्यंत कळेल अन् कळायला हवाच असंही नसतं. त्याला समजून घेताना बऱ्याचदा कोणता तरी हातचा सुटून जातो. उमजून घेताना कानामात्रा कोरायचा राहून जातो. तपासून पाहताना चुकीची सूत्रे सोबत घेतली जातात. किंतु-परंतुचे किनारे पकडून हाती लागलेली गृहीतके लावून उत्तरांपर्यंत पोहचण्याचा प्रयास केला जातो. कुणी म्हणेल, यात नवीन काय! अशी काहीतरी अतार्किक विधाने म्हणजे माणूस समजून घेणं असतं का? अर्थात, हे असं काहीसं म्हणणं एक बाजू म्हणून अमान्य करण्याचं काहीच कारण नाही. कुणाचं काही मत असलं, तर त्याला फाट्यावर मारून पुढे जावं असंही नसतं. मत, मग ते कोणतंही असो, समर्थनाच्या बाजूने असो की विरोधाच्या अंगाने, त्याला टाळून पुढे नाही पळता येत. कारण त्याला काही कंगोरे असतात, तसे काही कोपरेही.


असलं काही मत, तर त्यासोबत लहानमोठा, भलाबुरा काही एक अनुभव असतो. असं असेल तर त्याला नाकारायचं तरी कसं? कारण त्याच्यापुरतं ते सत्य असतं अन् न टाळता येणारं असतं. अनुभव नावाच्या अनुभूतीची लक्षणे अधोरेखित करायची, तर त्यात सापेक्षताही असेलच, नाही का? ही सापेक्षता मान्य केली, तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेला अनुभव वेगळा असण्याची शक्यता अवास्तव ठरवायची कशी? हे सगळं खरं असलं तरी एक किंतु शेष राहतोच तो म्हणजे, वास्तव वेगळं असतं अन् कल्पित त्याहून निराळं.

चांगली माणसे नेहमी बेरजेच्या गणितात नाही सापडत वगैरे कोणी म्हणत असेल, तर तेही स्वीकारायला संदेह नसावा. नसतील बेरजेच्या चिन्हात सापडत, तर वजाबाकीच्या आकड्यात गवसतील इतकेच. तसंही चांगल्या गोष्टींचा अभाव आसपास नांदता असण्यात नवीन असं काही नाही. इहतली कायम अधिवास करून असणारा हा प्रश्न. खरंतर अभाव आहे म्हणून प्रभाव शब्दाला काहीएक अर्थ आहे. असं काहीसं असलं तरी माणूस विचारशील वगैरे जीव असल्याचा निर्वाळा जवळजवळ सगळ्यांनीच दिला आहे. कोणी म्हणेल, यात ते काय विशेष? अन्य जीव काहीच विचार करत नसतील कशावरून? फारतर आपल्याला त्यांचं तसं असणं कळत नसेल इतकंच. यात वादाच्या वाटेने वळायचं कारण नाही. ते विचार करत असतील अथवा नसतीलही. पण माणूस अन् अन्य जीव यात असणारी सीमारेषा नक्कीच अधोरेखित करता येईल नाही का? 

विचार तर सगळेच करतात. म्हणून काही सगळेच सम्यक कृतीचे मालक अन् सुयोग्य विचारांचे धनी असतीलच असं नाही. माणसाकडे विचार आहेत हे मान्य, पण विकारही सोबत आहेतच की. बहुदा काकणभर अधिकच आहेत. त्यांना वगळून निखळ, नितळ वगैरे माणूस सापडला आहे का कोणाला? शोधला अन् लागलंच हाती काही तर कोणता तरी किंतु राहूनच जातो ना! म्हणूनच तर तो माणूस आहे. तो विचार करतो हे ठीक, पण स्वतःचा अधिक आणि आधी करतो, नाही का? असेल तसं. तसंही सगळेच जीव स्वतःपासून सुरू होतात अन् बऱ्याचदा स्वतःजवळ संपतात. त्यांच्या जगण्यात स्व सुरक्षित राखण्याची उपजत जाण असतेच अन् आसपासच्या असण्याचं भानही. भले तर त्याचा परीघ सीमित असेल. जगाचं जगणं समजून घ्यायची आस माणसांच्या अंतरी काकणभर अधिक असते. कदाचित हेच कारण अज्ञात किनारे धरून वाहण्यास प्रेरित करत असेल त्याला. जिज्ञासा दिमतीला घेऊन माणूस आपणास माहीत नसणाऱ्या परगण्यात काय आहे हे डोकावून पाहतो. या कुतूहलामुळेच तो आसपासच्या कोपऱ्यांत दडलेल्या कवडशांचा धांडोळा घेत आला आहे. 

शोधणं आलं म्हणजे, सापडणंही आहेच. पण प्रत्येकवेळी काही सापडेलच असंही नाही. शोधणं, सापडणं दरम्यान आपल्या असण्या-नसण्याचा अन्वयार्थ लावणंही ओघाने आलंच. अर्थ लावायचा तर आपल्या आसपास वसती करून असलेल्या मर्यादांच्या चौकटी पार करणंही आहेच. काही मिळवायचं, तर बंधनांचे बांध पार करायला लागतात. हे खरं असलं तरी बंधने मोडायची तर स्वतःला पारखून पाहावं लागतं. आपणच आपल्याला नीटपणे पाहता यावं म्हणून आपल्या मर्यादांपासून अपग्रेड व्हावं लागतं. त्याकरिता स्वतःच स्वतःला पाखडून घ्यावं लागतं. असलीच काही फोलपटे तर वेगळी करून घ्यावी लागतात. असतील काही पापुद्रे जगण्याला बिलगून तर खरवडून काढायला लागतात. असलीच पुढ्यात पडलेली काही व्यवधाने, तर नव्याने तपासून पाहावी लागतात. बंधने परिस्थितीने निर्माण केलेली असोत अथवा आणखी कुणी, त्यांचे अन्वय लावावे लागतात. बंधनांच्या बांधांपलीकडून बदलाचे सूर साद घालत असतात. त्यांना योग्यवेळी प्रतिसाद तेवढा देता यावा. बदलांना एक आंतरिक नाद असतो. तो कळला की सापडलेल्या सुरांना साज चढवता येतो. जर आवाज ऐकूच येत नसतील कोणाला, तर दोष कानांचा की, कानांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा? पण योग्यवेळी बदलून घेता आलं की, आपल्या आयुष्याचे एकेक अज्ञात पैलू आश्वासक वाटू लागतात. साद घालणाऱ्या अनोळखी आवाजांना आस्थेच्या चौकटीत अधिष्ठित केलं की, तेही कळत जातात. 

अपग्रेड तर व्हावंच लागतं. मग तो माणूस असो अथवा आणखी काही. एवढं कशाला काळालाही अपग्रेड नाही होता आलं तर तोही सोकावतो, आठवणीतून कोमेजतो अन् विस्मरणाच्या वाटेने वळतो. अपग्रेड होणं म्हणजे नेमकं काय? फार अवघड नाही याचं उत्तर. पण कृतीत आणणं बऱ्यापैकी मुश्किल असतं. माझ्यातील न्यून कणाकणाने वेचत राहणे अन् वैगुण्ये क्षणाक्षणाने कमी करत जाणे, म्हणजे उन्नत होणे. पुढे पडत्या पावलांचा प्रवास वर्धिष्णू असावा. अपेक्षा तर हीच असते सगळ्यांची. पण परिस्थिती प्रत्येकवेळी अनुकूल असेलच असं नाही. पावलांना पुढच्या वाटा दिसाव्या. नजरेला क्षितिजांनी खुणावत राहावं. प्रतिसादाच्या पथावर पडलेलं प्रतिकुलतेचं पटल पार करण्यासाठी चालता चालता आपणच आपल्याला गवसणं म्हणजे अपग्रेड होणं. काल आणि आज यात असणारं अंतर अन् या अंतराला पार करताना करावे लागणारे सायासप्रयास म्हणजे अपग्रेड होणं. काळाच्या कुशीत लपलेले कवडसे वेचून आणण्यासाठी कूस बदलणं म्हणजे अपग्रेड होणं असतं, नाही का?

जगण्याचे सोहळे असतात, तसे आयुष्याचे ऋतूही. त्यांना प्रांजळ प्रतिसाद देता येणं असतं अपग्रेड होणं. बदलत्या ऋतूंसोबत बहरता यावं म्हणून सृष्टीने तिच्या विस्तृत पटलावर कोरलेल्या रंगांना समजून घेणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पाण्यासोबत वाहताना लाटांशी सख्य साधत किनाऱ्यांशी गुज करता येणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पाखरांच्या गळ्यातून येणाऱ्या गाण्यांना प्रतिसाद देता येणं म्हणजे अपग्रेड होणं. वाऱ्यासोबत वेडीवाकडी वळणे घेत वाहता येणं असतं अपग्रेड होणं. पावसासोबत रिमझिम बरसणं, ढगांसोबत कोसळणं, विजांसोबत चमकणं असतं अपग्रेड होणं. फुलांसोबत गंध बनून विहरत राहणं म्हणजे अपग्रेड होणं. झाडावरून पिकलेल्या पानासारखं देठ सोडून निखळणं अन् कोवळ्या कोंबातून उगवून डहाळ्यांवर हसत राहणं असतं अपग्रेड होणं. न निरोपाचं दुःख, ना आगमनाचा आनंद. आहे केवळ बदलणं. बदलासाठी नव्या वळणाकडे वळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नितळपण लेवून विहरणाऱ्या लेकराच्या जिज्ञासेत सामावलेलं असतं ते. कुतूहलाने ओथंबलेल्या त्याच्या डोळ्यात एकवटलेलं असतं. ही निर्व्याज नजर कमावणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. 

निसर्ग सहजपणाचे साज घेऊन सजलेला असतो. त्यात कोणतेही अभिनिवेश नसतात. असलंच काही त्याच्या प्रत्येक कृतीत तर एक स्वाभाविकपण असतं. ना कोणते किंतु, ना कोणता परंतु घेऊन तो चालतो. एक वळण पार केलं की, दुसऱ्यालाही तेवढ्याच आस्थेने साद देत सरकत राहतो तो. त्याला प्रतिसाद देता येणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. जगण्यात सहजपण सामावलं की, अपग्रेड होण्याचे ज्ञात-अज्ञात अर्थ आपसूक कळतात. त्यांचे एकेक कंगोरे समजू लागतात. हे कळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पण नेमकं हेच कळायचं राहून जातं, नाही का? 

मी अपग्रेड होतो म्हणजे काय? तर भौतिक सुविधांनी सजलेलं ओंजळभर जग पाहून हरकतो. ते आपलसं करण्यासाठी यातायात करत राहतो. धावत राहतो आडवा-तिडवा. आवाक्यात असलेली-नसलेली सुखं आपल्या अंगणी आणण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतो. या धडपडण्याला अपग्रेड वगैरे म्हणतो. भौतिक सुखांना अपग्रेड करण्याच्या ओघात आंतरिक समाधानाला सोयीस्कर दुर्लक्षित करतो. नको असणाऱ्या किंवा आवश्यक असल्याच तर नगण्य महत्त्व असणाऱ्या गोष्टीना अपग्रेड करत राहतो अन् त्यातून हाती लागलेल्या चारदोन चुकार क्षणांना सुखाच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा समजतो. वास्तविक समाधानाचा जेथून उगम आहे, तो प्रवाह अपग्रेड करायचं राहूनच जातं. 

मी घर अपग्रेड करून बंगला करतो. दुचाकी वरून प्रवास प्रतिष्ठाप्राप्त नाही वाटत, म्हणून चारचाकी आणून दारात उभी करतो. साधसंच पण आपलेपणाने सजलेलं घर समाधान नाही देत, म्हणून ते जमीनदोस्त करून स्वप्नातला महाल उभा करतो. त्याला नानाविध सुविधांनी मंडित करतो. एकाची आवश्यकता असेल तर गरज नसतानाही त्यात आणखी चार गोष्टी आणून पेरतो अन् समाधानाची रोपटी उगवण्याची प्रतीक्षा करत राहतो. मिळायला विलंब होऊ लागला की, कासावीस होतो. हवं ते आणि तेच हाती लागावं म्हणून नाना कवायती करतो. का करतो आहोत आपण एवढी कसरत, याचा काडीमात्र विचार न करता जुळवत राहतो संदर्भांचे सुटलेले धागे. बांधत राहतो एकेक गाठी. उकलत राहतो निरगाठी. पण गुंता काहीकेल्या सुटत नाही तो नाहीच.

सुविधांनी सजलेलं जगणं वावगं असतं असं नाही. पण सीमा पार करून त्यांचा सोस होणं वाईट. हा सोस म्हणजे माझ्यासाठी अपग्रेड होणं असतं का? जगणं सुसह्य करणारी साधने काळाची आवश्यकता असेल, तर त्याला प्रतिसाद देणंही ओघानं आलं. पण प्रतिसादासाठी ठरावीक वस्तूच का असावी? त्याला पर्याय असेल तर तो किमान एकदा पाहून घ्यायला संदेह का असावा? खरंतर आम्ही जगण्याचे साचे तयार करून घेतले आहेत. त्यापलीकडे काही नको अशी काहीशी मानसिकता स्वतःच स्वतःसाठी तयार करून घेतली आहे. विशिष्ट साच्यात तयार झालेली नजर का बदलता नाही येत मला? साधाच पण सुटसुटीत अन् सुंदर संवाद सहज साध्य असेल तर सीमित साधनेही पर्याप्त असतात. मग महागड्या वस्तूंचा मोह का पडावा? गुणवत्ता, दर्जा, सुविधा हे मुद्दे असतील, नाही असं नाही. पण अशा वस्तू माझ्या स्टेटसचा सिम्बॉल होणार असतील, तर उपयुक्तता मुद्दा मागे पडतो अन् उरते केवळ मिरवणूक. मिरवण्याला अपग्रेड होणं असं कुणी म्हणत असतील तर प्रश्नच संपला. सगळ्या व्याख्या येथे पराभूत होतात अन् पर्याय परास्त. समोर दिसणाऱ्या साधनांच्या साच्यात स्वतःला फिट्ट बसवून घेता यावं, म्हणून जी कवायत मी करतो तिला कुणी अपग्रेड होणं समजत असेल तर गती, प्रगतीचे अर्थ नव्याने शोधायला लागतील. सुविधा जगणं सुखावह करण्यासाठी असतील, तर त्याबाबत किंतु असण्याचं कारण नाही. पण केवळ दाखवणं अन् त्यातून क्षणिक सुखावणं असेल, तर त्याचे नव्याने अर्थ शोधायला लागतील.

माझ्या हाती असलेली सगळी साधनं अपग्रेड आहेत. ती तशी असावीत म्हणून मी काय नाही केलं. अनेक खटपटी करून त्यांच्या कडांना स्पर्श केला. पण, मला मी किती अपग्रेड केलंय? समाधानाच्या व्याख्या किती परिणत केल्या? माझी नैतिक, वैचारिक उंची वाढावी म्हणून मी किती धडपडलो? यासाठी मी स्वतःला किती अपग्रेड केलं? हे आणि असं काही मी माझं मला कितीदा विचारतो? खरं हे आहे की, मला सगळं सहज जमतं; पण स्वतःला खरवडून काढणं अवघड. माझेच पापुद्रे काढून बघायला मला वेळ नाही. अन् असला तर तेवढी हिंमतही नाही. जगण्यात उथळपण सामावलं की, अथांग असण्याचे अर्थ हरवतात. अफाट असण्याचे संदर्भ साखळीतून सुटतात. कृतीचे अध्याय आयुष्यात कोरून जगण्याला आयाम देणारे अज्ञात कोपरे मी शोधतच नाही. ते शोधण्यासाठी अपग्रेड करणं काही जमतच नाही. 

माझं माझ्याशी तरी पटतं की नाही, माहीत नाही. पण माझं बऱ्याच जणांशी पटत नाही. माझ्या विचारांच्या वर्तुळात कुणाला विसावण्याएवढी जागाच नसते. त्यांच्या अपग्रेड होण्याच्या व्याख्या मला समजत नाहीत अन् माझ्या बदलांचे कंगोरे त्यांना काही केल्या कळत नाहीत. माझ्याशिवाय अन्य कुणाच्या विचारांशी मला कणभरही जुळवता नाही आलं कधी. ना सूतभर सख्य साधता आलं. ना कुठल्या चौकटी आपल्या वाटल्या. ना कोणते नाते नितळ, निखळ वगैरे वाटले. त्यांची तगमग नाही समजली, ना त्याचं कासावीस होणं कळलं. पटत नाही त्यांच्या मूठभर जगात जगणं अन् चिमूटभर सुखांना समाधानाची लेबले लावणं. असेलही त्यांना मला समजून घेण्यासाठी वेळ. पण मला त्यांनी ठरवून घेतलेल्या स्तरावर अपग्रेड- खरंतर डाऊनग्रेड व्हायला वेळ नाही. समजा असला तरी अपग्रेडच्या व्याख्यांचे आमचे अध्याय काही केल्या जुळत नाहीत. त्यांच्या आयुष्याच्या प्राथमिकता अन् आमच्या गरजा, किती अंतराय आहे? कशी पार करावीत ती अंतरे? किती चालावं, रस्तेच वेगळे अन् मुक्कामाची ठिकाणे निराळी असल्यावर? चालूनही हाती खूप काही लागण्याची शक्यता नसेल, तर कशाला ऊर्जाक्षय करून घ्यावा आपण आपला. काय हवं, हेच बऱ्याचदा नीट माहीत नसतं बऱ्याच जणांना. त्यांना टीकाटिप्पणी करण्यात आनंद. समूहात कोणाला कौतुक, तर कोणी मत्सराने काळवंडलेला. कुणी द्वेषाने कुजलेला. प्रत्येकाच्या तऱ्हा निराळ्या. त्यांच्या दृष्टीने हेच अपग्रेड होणं असेल, तर असल्या विचारधारांना कशाला भीक घालावी? असं काहीसं कुणाला वाटत असेल तर... अर्थात, हा ज्याच्या-त्याच्या आस्थेचा अन् स्वातंत्र्याचा भाग. 

कोणाच्या व्याख्या कोणाला कळत नसतील अन् कुठलीही सूत्रे वापरून गणिते काही केल्या जुळत नसतील, तर याला कोणत्या नावाने संबोधित करावे? यालाच कोणी काळाचा महिमा वगैरे नाव देत असेल, तर त्याने असा कोणतासा फरक पडणार आहे? इहतली अधिवास करणारे सगळेच जीव आपल्या ओंजळभर विश्वात विहार करतायेत. त्यांच्या गती-प्रगतीच्या व्याख्या त्यांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असतील, तर आपले परीघ का विसरावेत? तसेही त्यांचे जगण्याबाबतचे संदर्भ अन् जगाविषयी विचार किमान आपल्यापुरते तरी आऊटडेटेड झाले असतील तर कशाला कवटाळून बसावं, काजळलेल्या काळाला अन् विटलेल्या विचारांना? आपल्याला वेढून असणारी परिस्थितीच यूज अँड थ्रोची पारायणे करणारी असल्यावर आणखी नवे काय असणार आहे त्यात? बहुतांश मूल्ये मलूल होत असताना आशयघन अर्थ नसलेल्या वस्तुंना सांभाळायच्या मोहात का पडावं? असं काहीसं अथवा यापैकी काही कुणास वाटत असेल, तर त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून समजा प्रतिवादासाठी मान्य केलं की हे सगळं खरंय. किमान त्याच्यापुरतं तरी. पण तरीही एक प्रश्न शेष राहतो, आपला आसपास काही वस्तू नाही, वापरा अन् फेका म्हणून जगायला. त्याच्या असण्याचे कणभर का असेनात, काही अर्थ असतात. कंगोरे असतात. संदर्भ असतात. ते समजून घेणं म्हणजे काही असतं की नाही? पण हे कळण्यासाठी आपण संवेदनांनी, संवेदना भावनांनी, भावना विचारांनी अन् विचारांचे स्तर कृतीने अपग्रेड होणं आवश्यक असतं, नाही का?
चंद्रकांत चव्हाण 
•• 

0 comments:

Post a Comment