मोजपट्ट्या

By
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून काही गोष्टी कोणी काळाच्या ओटीत टाकून देतो. कुणी फारसे महत्त्व नाही देत अशा काही गोष्टींना. काहींना काहीच कर्तव्य नसते काही गोष्टींशी. पण काहींना कारण नसताना खोदकाम करायची सवय जडलेली असते. कुदळ हाती घेऊन तयारच असतात ते. अर्थात, अशा वागण्यातून त्यांच्या हाती काय लागते, त्यांनाच माहीत. पण दिसलं कुठे थोडं काही न्यून की, कर आणखी गाजावाजा, असा स्वभावच असतो काहींचा. हे चूक की बरोबर, याच्याशी काही एक देणे-घेणे नसते त्यांना. छिद्रान्वेषीवृत्ती एकदा का विचारांचा भाग बनली की, विस्तीर्ण आभाळाच्या निळाईतही व्यंग दिसतं, झुळझुळ वाहत्या पाण्याचा नादही कर्कश वाटतो, वाऱ्याचा आल्हाददायक गारवाही झोंबतो अन् पक्षांचा गाता गळाही कुरूप वाटतो. एखाद्याला नकाराचं लेबल लावायचं ठरवलं की, किमतीचे टॅग क्षुल्लक वाटायला लागतात, हेच खरं. अशा संकुचित मानसिकतेने वागणाऱ्यांच्या हाती कुठल्या आंतरिक समाधानाचे स्रोत लागतात, त्यांनाच ठाऊक. थोडक्यात, आपलं तेवढं खरं, बाकी सगळं बेगडी वगैरे ठरवणारी मानसिकता म्हणता येईल अशा वागण्याला. 

कुणाच्या वागण्याच्यापद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे आकळतोच असं नाही. खरंतर माणूस दिसतो तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. तो माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, असं काही नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला माणसांच्या गजबटाला टाळून. एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. तो अमका-तमका तसाच आहे. त्याला माणसांच्या मतांची पर्वा नाही. माणूस टाळून माणूस समजू पाहतोय तो. स्वतःला ग्रेट वगैरे प्रकारातला समजतो. माज करण्याइतकं असं काय आहे त्याच्याकडे? परिस्थितीने एवढा पोळला गेला, तरी त्याचा उन्माद काही तसूभरही कमी होत नाही, वगैरे वगैरे. 

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या कक्षेत तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? ज्यास तुम्ही शिष्टपणा संबोधतात, तो त्याच्या व्यक्तित्वाचा भाग असू शकत नाही का? किंवा ज्यास तुम्ही तुसडेपणा म्हणून अधोरेखित करतात, दीडशहाणा असणं म्हणतात, त्याला कुणी सुरक्षित अंतर समजत असेल, तर त्यात वावगं काय आहे? काहीच नाही. सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. मान्य की, माणूस समाजशील, समूहप्रिय वगैरे प्राणी आहे. आसपास कोणी असणं त्याची भावनिक गरज आहे, म्हणून तो हे सगळं काही काळ टाळून जीवनयापन करू शकत नाही का? समजा तो तसा काहीसा असला, तरी समूहातील सगळेच प्राणी समूहाच्या मानसिकतेचे तंतोतंत निर्वहन करतात, असं कुठे आहे? सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का? 

काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आपला वाटत असेल, तर निवडीचे स्वातंत्र्य त्याचेच असते, नाही का? त्याच्यापुरती विशिष्ट विचारधारा निवडून तो वर्तत असेल, तर त्यात वाईट ते काय? तुमच्या विचारांची चाके लावून त्याने पळायला हवं का? माणसांच्या गर्दीत राहणारे सगळेच दर्दी अन् गर्दी टाळून आपणच आपल्याला शोधणारे कोलाहलाची सर्दी झालेले असतात, असं कुणी सांगितलं? कुणी कुठे राहावं, कसं असावं, कसं नसावं, हा सगळा वैयक्तिक निवडीचा भाग. आपल्याच कोशात वास्तव्य करणं ही काही त्याच्या व्यक्तित्वाची पूर्ण व्याख्या नाही होऊ शकत. माणसांच्या गर्दीत राहून माणूसपण कळतेच असे नाही. गर्दीचा भाग बनून स्वार्थ शोधणाऱ्या बगळ्यांपेक्षा कुठल्यातरी एकांतस्थळी विहरणाऱ्या पाखरांचा पैस अधिक असू शकत नाही का? स्वार्थाच्या परिघाभोवती फेऱ्या करण्यापेक्षा आकाशाला पंखावर घेण्यासाठी केलेल्या प्रदक्षिणाचे मोल अधिक असते, नाही का?

तसेही माणसांत राहून विकारांपासून विलग होता येत नसेल, तर आपण अलग होऊन आपल्या वर्तुळात विहार करणे अधिक श्रेयस्कर असते. गर्दीत हरवलेला चेहरा शोधण्यापेक्षा, आहे तो चेहरा आणखी देखणा करणे अधिक चांगले नसते का? आपलीच आपण आरास मांडून मखरात मंडित होण्यापेक्षा आस्थेच्या मुक्त रंगात माखणे अधिक मोहात पाडणारे असते. स्वार्थपुरीत विचारांना सामाजिकतेच्या धाग्यांनी विणलेल्या रंगीबेरंगी झुलींखाली झाकून मिरवत राहण्यापेक्षा, आहे ते आणि आहे तसे असणे अधिक देखणे असते. 

तुम्ही कोण? हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तुम्ही कसे? ते अधिक मोलाचे असते. एखाद्याची किंमत कुणी कशी करावी, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असतात ते स्वनिर्मित निष्कर्ष. निष्कर्ष माणूस आंतर्बाह्य समजण्याचे प्रमाण नसते. असतं ते केवळ अमूर्त एकक, ज्याला जर-तरचा अध्याहृत अर्थ तेवढा असतो. तसेही सजीवांच्या वर्तनव्यवहारांचे कोणतेच निष्कर्ष अंतिम नसतात. ते परिवर्तनीय असतात. निर्णयाप्रत पोहचण्यासाठी प्रयोग करावे लागतात. काही अनुमान अधोरेखित करावे लागतात. प्रत्येकवेळी ते वेगळे असू शकतात. मग माणूस तरी यास अपवाद कसा? अपवाद आले की, प्रवाद पसरतात. प्रवाद संवादाचे सेतू बनले की, अनुमानांना अर्थ गवसतो. संवादाचे किनारे सुटले की, वितंडवाद उभे राहतात अन् वादाचे प्रवाह दुथडी भरून वाहतात. परिवर्तनप्रिय विचार सौहार्दाच्या गगनात आपलं सदन उभं करतो, हे खरं असलं, तरी परिवर्तनाचा प्रवास म्हणजे काही प्राक्तन नसतं, परिस्थितीने पेरलेला प्रयत्नांचा परिपाक असतो तो, नाही का?

••

0 comments:

Post a Comment