शक्यता

By
माणूस बुद्धिमान प्राणी असल्याचं सांगितलं जातंय, त्यालाही शतके लोटून गेली. हे सगळं संगतीची सुसंगत सूत्रे तयार करून सांगणारा अर्थातच माणूसच आहे. त्याला असं सांगण्याची आवश्यकता का असते, हा आणखी वेगळा मुद्दा. तो सांगतो तेही त्याच्यासारख्या हाडामासाच्या माणसाला. त्याला सांगावं लागतं की तू उत्क्रांतीक्रमातला प्रगत, परिणत वगैरे जीव आहेस, म्हणून तुझ्या असण्याला अर्थ आहे. नसल्यावर स्मृतीरूपाने शेष राहण्यास सार्थ संदर्भ आहेत. जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी अनर्थांचे काटे असणाऱ्या वाटा, वळणांना वळसा घालून आयुष्याचे अन्वयार्थ लावावे लागतील. म्हणूनच की काय त्याच्या अवतारकार्याशी अवगत करून देताना माणूस नावाच्या जिवाच्या महतीची स्तोत्रे रचून त्याच्या समोर मांडावी लागतात. इतकं करून तो माणूस म्हणून वागेलच याची कोणत्याच माणसाला हमी नाही देता येत. तो बुद्धिमान वगैरे असला, तरी त्याच्या इतका अविचाराने वागणारा अन्य जीव इहतली असेल की नाही शंकाच आहे. 

विश्व अफाट आहे, त्यातल्या शक्यता अमर्याद आहेत अन् त्यांचं असणं अथांग. काळाच्या विस्तीर्ण पटावर कोरलेल्या तुकड्यांशी प्रत्येक क्षण खेळत असतो आणि माणूस पदरी पेरलेल्या प्राक्तनाशी. आयुष्य काही वाहत्या उताराचं पाणी नाही, दिसली वाट की तिच्या प्रतलावरून घसरायला. पदरी पडलेल्या प्रत्येक क्षणांचं काहीतरी करावं लागतं. असाध्य साध्य करण्यासाठी सायास करावे लागतात. प्रयासांच्या परिभाषा परिमित वकुबाने परत परत पेराव्या लागतात. वैगुण्यांना अधोरेखित करीत अविचारांची काजळी काढावी लागते. सत्प्रेरीत विचारांच्या वाटांवर चालताना पुढच्या वळणांचा शोध घ्यावा लागतो. नयनी वस्तीला उतरलेली स्वप्ने सांभाळावी लागतात. चौकटीत सीमांकित केलेल्या अन् पुढ्यात मांडलेल्या तुकड्यांच्या विस्ताराचे अर्थ लावता येतात, त्यांना परिस्थितीने पेरलेल्या प्राक्तनाचे संदर्भ अवगत असतात. वाहत्या प्रवाहाचे किनारे धरून सरकत राहतात त्यांना साध्याच्या अन् साधनांच्या व्याख्या सहज समजतात. ज्यांचे काठ सुटले त्यांचं काठोकाठ भरून उरणं अवघड. ज्यांना तुडुंब भरता येत नाही त्यांना आसपासच्या परगण्यांच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल कसा पेरता येईल?

अगणित जीव इहतली नांदते होते. आजही आहेत. त्यांचं येणं अवरुद्ध करता येत नाही आणि जाणंही थांबवता येत नाही. आले त्यातले काही काळाच्या कुशीत कायमचे विसावले. काही आघाताने नामशेष झाले. असलंच काही अस्तित्व तर केवळ अवशेषांच्या अन् स्मृतीच्या रूपाने शेष आहे. पण माणूस आपल्या असण्याला अबाधित ठेऊन आहे. उन्मळून टाकणाऱ्या संकटांशी भिडतो आहे. प्राप्त परिस्थितीशी लढतो आहे. पुढ्यात पडलेल्या प्रसंगांशी झगडतो आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्षाची सूत्रे घडवतो आहे. आयुष्याची समीकरणे सोडवतो आहे. कारणे अनेक असतात, नसली तर निवडून घेता येतात, ठरवलं तर मखरात मंडित करता येतात. समर्थनाची सूत्रे सोबत घेऊन सांगता येतात. पण खरं हेच आहे की, ज्यांना समायोजन साधते त्यांच्या असण्याचे पथ प्रशस्त होतात. आपल्या वाट्याला आलेल्या ओंजळभर अस्तित्वाला नवे आयाम देता येतात, त्यांना आयुष्याची सूत्रे सापडलेली असतात. अशी माणसे बिंदूतून सिंधू साकारण्याचे स्वप्ने सजवत राहतात. 

माणूस बऱ्यापैकी विचाराने वागत आला आहे हेही एक वास्तव आहे. कदाचित हेच त्याच्या टिकून असण्याचं मुख्य कारण. याचा अर्थ असाही नाही की, सदासर्वकाळ विचारांच्या ज्योती त्याच्या जगण्यात पेटलेल्या असतात. त्याच्या अविचाराने घडलेल्या कृतींची उदाहरणे शोधली तर शेकड्याने सापडतील. कृतींची प्रयोजने पाहून पदरी पडलेल्या क्षणांना चिरंजीव करणारे विचार पेरणारे संख्यने कमी नाहीत. विचाराने वर्तनाऱ्याभोवती संदेहाचं धुकं नसतं. अविचाराने अवगुंठित आयुष्याभोवती अनेक किंतु असतात. पण, परंतुचं मळभ साचलेलं असतं, नाही का?

अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. हे भ्रमण अज्ञानाने असेल किंवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय पण सत्य आहे. विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, वादही विपुल आढळतील. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद, वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. 

विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. त्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणारे किती असतात. याचा अर्थ असाही नाही की, परिस्थितीचं सम्यक आकलन असणारी आणि स्थिती-गतीचं रास्त भान असणारी माणसं नसतात. ती सर्वकाळी, सर्वस्थळी असतात, फक्त त्यांना पाहता यायला हवं. नसतील सहज दिसत, तर शोधता यायला हवं. शोधूनही नसतील सापडत, तर आपणच त्याचा विकल्प व्हावं. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती नगण्य असतील. ती संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत, नाही का?
••

0 comments:

Post a Comment