पर्याय

By
देहाला लाभलेल्या उंचीने आयुष्य सुंदर नाही होत. देहात वसणाऱ्या विचारांनी जगणं देखणं होतं. कर्तृत्व संपन्न उंची संपादनाची कौशल्ये असतीलही; पण ती सगळ्यांना अवगत असतातच असं नाही. म्हणून आयुष्य बेफिकीरपणे उधळून द्यावं असंही नसतं. नसली अवगत काही सूत्रे म्हणून जगण्याची समीकरणे सोडवूच नये असं नसतं. सगळ्या गोष्टी अनुकूल असायलाच हव्यात असं म्हणून स्वप्नांचा संसार सजत नसतो. आयुष्याकडे बघण्याची प्रत्येकाची नजर वेगळी असते. जशी नजर असेल तसा नजारा दिसतो. 

खरंतर कर्तृत्व वगैरे शब्दही तसा संदेहाच्या परगण्यात वसती करून असणारा आहे. कर्तृत्व कशाला म्हणावं हाही प्रश्न बऱ्यापैकी अनुत्तरितच, कारण या शब्दाला आणि त्याच्या अर्थाला घेऊन प्रत्येकाला प्रवाद करता येतात. प्रमादांना पूर्तीची परिमाणे चिटकवता येतात. तशीही उंचीची परिमाणे प्रत्येकाची वेगळी अन् प्रत्येकासाठी निराळी असतात. एखाद्या वृक्षाची उंची पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून नसते, स्वयंभू असते. त्याचा विस्तार पदरी पडलेल्या अनुकूलप्रतिकूल परिस्थितीचा प्रसाद असतो. मुळांशी ओंजळभर ओलावा असला, माथ्यावर प्रकाशाची पखरण करणारं आभाळ असलं आणि वाऱ्याचा आश्वस्त करणारा स्पर्श असला की, ते मातीच्या कणाकणाला प्रतिसाद देत आपणच आपलं अवकाश शोधत आभाळ होऊ पाहतं. आयुष्यही याहून वेगळं काय आहे? परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या अनेक शक्यतांचा प्रवास आहे तो. 

काळ खेळत असतो स्थिती, गती अन् परिस्थितीशीही. त्याला हव्या तशा तिरक्या चाली चालत राहतो. आपण आपल्या पावलांशी प्रामाणिक राहिलो की, पथ प्रशस्त होतात. पर्याप्त पर्याय नसतील तर परिस्थितीचं ओझं घेऊन चालण्याशिवाय हाती काय उरतं? म्हणून चालणं विसरून जावं का? यश अपयश त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक असेल, तर निदान निर्णय घेण्याइतकं धारिष्ट्य आपल्याकडे असायला लागतं. ते चूक की बरोबर, हे काळाला ठरवू द्यावं. त्याने ओंजळीत ओतलेले रंग अधिक गहिरे करत राहावं. हाती आलेल्या तुकड्यांचा कोलाज काळजावर कोरत राहावा. 

अनेक माणसं असतात आसपास. त्यांच्या असण्यानसण्याला बऱ्यावाईट वगैरे प्रकारात कोंबता येईल. सोयीने त्यांचे संदर्भही शोधता येतात. पण एकासाठी चांगलेपणाची परिभाषा दुसऱ्याकरिता वाईट नसेल कशावरून? माणूस त्याच्या अंतरी वसतीला माणुसकी असेपर्यंत माणूस असतो. आवश्यकता म्हणून म्हणा की आणखी काही; आपण माणसे जोडून ठेवतो. आवडो अथवा न आवडो सांभाळून ठेवतो. समाजाचा एक घटक म्हणून ती आपली गरज असते. कोणी कितीही सांगितलं की, समाज वगैरे गोष्टी फारश्या मनावर घेऊ नये. त्यातल्या बऱ्याच फाट्यावर मारायच्या लायकीच्या असतात. हे म्हणणं ठीक वगैरे मानलं तरी माणूस समाजावेगळा नसतो, हेही तेवढेच खरे. 

कर्तृत्वाच्या परिघाला मोजताना समर्थनाची, विरोधाची कारणे सांगता येतात. अमक्या कुळात, तमक्या परिवारात जन्मलो हा अपघात आहे, असं कोणी म्हणत असेल, तर त्याला अर्थ नसतो. कर्तृत्ववान असण्याला सीमांकित नाही करता येत. ते ज्याचं त्याने घडवायचं असतं. कुटुंब व्यक्तित्वाला आकार देणारा घटक असला, तरी तो काही एकमेव नसतो. त्याशिवाय गगनगामी उंची गाठणारी अनेक माणसे समाजात नजरेस पडतात. त्यांचं तसं असणं त्यांच्या अंतरी अधिवास करणाऱ्या आकांक्षांचं प्रतिबिंब असतं.

पावलांना योग्य वाटेने वळते करता आलं की, मुक्कामाची ठिकाणे हाती लागतात. फक्त वाटा तेवढया नेमक्या निवडता यायला हव्या. देहाला लाभलेल्या आकाराला निवडीचा विकल्प नसतो, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या आकृत्यांच्या सावल्या विस्तारता यायला हव्यात. देहाच्या सावलीला चैतन्यदायी अस्तित्व नसेल. निसर्गाने निर्धारित केलेल्या चौकटींच्या मर्यादांएवढं ते असेल; पण कर्तृत्व आयुष्यातला असा एक घटक आहे, ज्याच्या सीमा नियतीलाही निर्धारित नाही करता येत. त्याला अफाट, अमर्याद असण्याचं वरदान असतं, फक्त आपल्याला अथांग होता यावं. अथांग असणं प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयासांचा परिपाक असतो. देशकालपरिस्थितीमुळे तो अवरुद्ध होणारच नाही असं नाही; पण त्याची पळती पावले थांबवणं अवघड असतं. त्यासाठी आवश्यकता असते ती एकच, अंतरी नांदणाऱ्या आकांक्षांना अंत नसावा अन् स्वप्नांना शेवट. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. पण अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?
•• 

0 comments:

Post a Comment