पेच

By

काही दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे. माझ्या एका स्नेह्याच्या जगण्याला एका आगंतुक समस्येने वेढलं. अनामिक वाटेने चालत आलेल्या अनाहूत प्रश्नाच्या चिन्हांनी ग्रासलं. निमित्त काही फार मोठं होतं असंही नाही. लहानमोठे प्रापंचिक पेच सगळीकडेच असतात. याच्याकडेही असा एक गुंता तयार झाला. अर्थात, तो काही फार जटिल नव्हता. प्रासंगिकच होता. खरंतर खूप विचलित वगैरे होण्यासारखा प्रश्न समोर नव्हता अन् उत्तरही अतिशय अवघड होतं, असंही नाही. पण अंतरी अधिवास करणारे अहं अधिक टोकदार झाले की, त्याच्या जखमा सांभाळण्याचीही तयारी असायला लागते. विचारांनी ‘मी’पणाच्या रंगानी मंडित झुली परिधान केल्या की, आसपासचे सगळेच रंग नजरेला विटलेले दिसतात. याचंही असंच झालं. वादाला कोणतीतरी निमित्त हवीच असतात. ते मिळालं. कारण ठरलं, वयात आलेलं त्याचं पोरगं...

वयात आलेलं पोरगं म्हटल्यावर उगीचच कान टवकारले गेले असतील एव्हाना तुमचे. एवढावेळ मुक्त विहार करणारे विचार एका बिंदूवर येऊन विसावले असतील. कल्पनेची पाखरे पंख लावून उगीचच मनाच्या आसमंतात भिरभिरत असतील. शक्यतांच्या प्रतलावरून अनेक शंका वाहत असतील. मोहरलेपण आलं असेल त्यांना. असेल...! असेल...!! असं काही तुम्हांला वाटत असेल तर काहीच, म्हणजे काहीच संदेह नाही. हरकत घेण्याचं कुणाला काही एक कारण नाही. असं काही असू नये, असं नसतं आणि असावं असंही नसतं. पोरगं म्हटल्यावर, तेही वयात आलेलं; की कल्पनेचे किनारे धरून वाहणे आलेच. वाहू नये असं कोणत्या कायद्यात सांगितलं आहे? नाही ना! हेच तर सांगायचं आहे मला. झालं ना विषयांतर! म्हणतात ना, ‘जित्याची खोड...’

तर झालं असं की, पोरगं कोणतंही असो आईबापासाठी नेहमीच लहान असतं नाही का? माझा हा स्नेहीपण याला अपवाद नाही. अहो, नुसतं स्नेही, स्नेही काय करतायेत. नाव वगैरे काही आहे की नाही, त्याला त्याच्या पिताश्रींनी दिलेलं? आणखी एक प्रश्न तुमच्या मनात. कदाचित ठाम मत तयार झालं असेल तुमचं आतापर्यंत, कशासाठी वेळ वाया घालवतो आहोत आपण या माणसाच्या नादी लागून? थांबा! सांगतो, सगळं सविस्तर सांगतो...! तर, त्याचं नाव प्रकाश! आता नाव प्रकाश असलं, म्हणून सगळीकडे उजेडच असेल, अशी अपेक्षा करणं अवास्तव, हे आधीच सांगून ठेवतो. म्हणजे वाचताना पुढे अपेक्षाभंग वगैरे झाला, तर वाईट वगैरे नको वाटायला. म्हणजे कसं आहे की, तुमचा संयम नको ढळायला! नाही तर ‘देने के लेने’ पडायचे फुकट मला.

तर, हा प्रकाश- नाकासमोर सरळ दिसणाऱ्या वाटेने चालणारा. मूल्य, नैतिकता वगैरे शब्दांवर प्रचंड भक्ती असणारा. परंपरेने मनात कोरलेल्या विचारसरणीला प्रमाण मानणारा. व्यवस्थेने निर्धारित केलेल्या चौकटींतून तसूभरही विचलित न होणारा. पोरगं वयात आलं म्हणून काय झालं? आपल्यासाठी ते लहानच. मग दोन गोष्टी सांगितल्या शहाणपणाच्या त्याला, तर काय फरक पडतो, असं समजणारा. पोराला नेणते बाळ समजून सल्ला देणे; बापाचं आद्य कर्तव्य असल्याचं मानून, त्याचं नि:संदेह निर्वहन करणारा. पोरगं काही दिवस याची प्रवचने निमूटपणे ऐकून घेतं. एकेक करून उपदेशाची पारायणे वाढायला लागतात. मोफतच्या सल्ल्यांना पोरगं उबगतं अन् नंतर पद्धतशीर फाट्यावर मारायला लागतं याला. याचा अर्थ त्याने मर्यादांच्या चाकोऱ्या मोडल्या होत्या, असं नाही. पण त्याचे परीघ विस्तारले आहेत, हे बापाने लक्षात घेतलंच नाही. बाप त्याच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात मश्गूल अन् पोरगं आकांक्षांच्या गगनात विहार करण्यात.

पोरगं लग्न करण्याएवढ्या वयाचं असल्याने कुठून कुठून अनुरूप स्थळं चालून येतायेत. पण प्रत्येकवेळी त्याचा नन्नाचा पाढा. एकदा, दोनदा असं करत करत बरेचदा झालं. पहिल्या पहिल्या वेळी बापाला वाटलं, नसेल योग्य वाटत पोराला तर नसू दे. म्हणून हलक्याने घेतलं सगळं. पण त्याच त्याच घटनांची पुनरावृत्ती घडायला लागली. ज्याही स्थळाविषयी सांगितलं जातंय, त्याला टाळण्याचा पोरगा कसोसीने प्रयत्न करतोय. प्रत्येकवेळी कुठल्याश्या कारणाने त्यावर नकाराच्या रेषा ओढतोय. आता मात्र बापाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपण सोडवायला घेतलेल्या गणिताची बेरीज चुकतेय; याचा अर्थ काही तरी हातचा सुटतोय, असं वाटायला लागलं अन् झालं सुरु या मुद्द्यावरून महाभारताचे सर्ग लेखन. वाद, प्रतिवादांना प्रारंभ झाला. वितंडवाद वाढतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.

बाप चिडला अन् पोरगा वैतागला. पोराला आकांक्षांच्या आभाळात चमकणारी नक्षत्रे खुडून आणायची आहेत. बापाला समोर दिसणारे कवडसे वेचायचे आहेत. कोणी कुणाला शरण जायला तयार नाही अन् माघार दोघांनाही स्वीकार नाही. बापाने एक दिवस पोराला सरळ विचारलं, “काय असेल तुझ्या मनात, तर एकदा सांग! तुला कोणी आवडत वगैरे असेल तर तसे बोल. आमची कोणतीच हरकत नाही. ना तर अजिबातच नाही. अट एकच, समोरच्यांनी आपल्या प्रस्तावाचा आनंदाने स्वीकार करावा. चित्रपटात दाखवतात, तसला रोमान्स काही आपल्याला परवडणार नाही आणि कोणाला पळवून आणण्याची हिंमत पण आपल्याकडे नाही. उगीचच वाद नको. संवादाने काय घडत असेल ते घडू दे!”

एवढं सगळं स्वच्छ सांगूनही पोरगं बापाला म्हणालं, “तसं असतं तर सरळ सांगितलं असतं ना तुम्हांला! उगीचच आढेवेढे नसते घेतले. असं काही नाहीये! आणि मला सध्या तरी अशा गोष्टींमध्ये जरासुद्धा स्वारस्य नाही. तुम्हांला जे काही समजायचं, ते समजायला तुम्ही मोकळे आहात. मला माझ्या करिअरविषयी तेवढा विचार करायचाय. बस्स, विषय संपला! केवळ लग्न वगैरे म्हणजे आयुष्य असतं, असं कोणी सांगितलं तुम्हांला? सफल आयुष्याच्या तुमच्या व्याख्या लग्न, संसार वगैरे जवळ येवून संपणाऱ्या अन् परंपरेभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या. हे मला कणभरही मान्य नाही. तुमचं काय, ते तुम्ही ठरवा. माझ्यावर तुमचा हक्क असला, तरी माझ्या विचारांवर नाही, एवढं मात्र नक्की.”

हे ऐकून आकाशात घिरट्या घालणारे बापाच्या आकांक्षांचे विमान जमिनीवर आलं. समोर दिसणाऱ्या प्रश्नांचा गुंता अधिक जटिल होऊ लागला. पोराला करिअर वगैरे खुणावतंय अन् बापाला त्याच्या भावी सांसारिक आयुष्यातली सुखं साद घालतायेत. सांगून आलेल्या स्थळापैकी एक पोरगी बापाला सून म्हणून परफेक्ट वगैरे वाटते. सुंदर, सोज्वळ वगैरे निकषात अगदी चपखल बसणारी. अशी कन्या पोराला सांगून आली म्हटल्यावर तो हरकतो. पोरगं आपल्या शब्दांच्या पलीकडे नाही. आपण सांगू ते ऐकेल म्हणून पोरगी कशी अनुरूप वगैरे वगैरे साग्रसंगीत वर्णन करून सांगत राहतो. काही इकडच्या, काही तिकडच्या, काही मनातल्या गोष्टी पोराला पटवून सांगतो. आता बाप एवढं सांगतोच आहे तर घ्यावं ऐकून थोडं, म्हणून पोराचे शब्दही थोडे सकारात्मक होऊ लागतात. बापाच्या मनात उमेदीचा अंकुर आकार घेऊ लागतो.

आपल्या मनासारखी सून घरात येईल. पोराच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त झालो की सुटलो एकदाचा, म्हणून काही आडाखे मनातल्या मनात मांडू लागतो. सुखाच्या आकृत्या अंतरी आकार घेऊ लागतात. डोक्यावर अक्षता पडल्या की, बाप नावाच्या नात्याची इतिकर्तव्यता सफल संपूर्ण. असं काहीसं चित्र त्याच्या डोळ्यापुढून सरकन सरकून गेलं. पण नियतीच्या मनात काही वेगळेच आडाखे असतात. ती तिच्या परीने खेळ खेळते. झालंही तसंच. पोराशी बोलणं सुरु असताना विषय मुलीच्या शैक्षणिक चौकटीभोवती येऊन पोहचतो अन् येथेच माशी शिंकते. पोराला मुलीच्या शिक्षणाचा सीमांकित परीघ अमान्य अन् बापाला संस्कारांभोवती घडणारे परिभ्रमण प्रिय. पोराला परोपरीने पोरीबाबत समजावून सांगितलं. ती तुझ्यासाठी किती आणि कशी अनुरूप आहे. संसारविश्वाच्या वर्तुळात विहार करताना कसे आनंदी राहाल, इत्यादी इत्यादी. सांगताना पदरी असतील, नसतील तेवढे अनुभव आणि गाठीशी असतील तेवढे शब्द खर्ची घातले. नात्यातल्या जेष्ठांनी तुझ्या भावी संसारात भविष्यात कोणतेही किंतु-परंतु येणार नाहीत, याची हमी घेतली. मुलगी सुयोग्य असल्याचा सगळ्यांनी एकमुखी निर्वाळा दिला वगैरे वगैरे... पण पोराने सगळ्यांनाच तोंडघशी पाडण्याचा विडा उचललेला. सुंदर वगैरे असणं सगळं ठीक, पण ती करिअरबाबत महत्त्वाकांक्षी आणि उच्चशिक्षित विशेषतः माझ्याच शाखेतलं शिक्षण घेतलेली असावी. अशा काहीशा अपेक्षांची कुंपणे आयुष्याभोवती घालून घेतलेली. पोराच्या भावी जोडीदाराच्या व्याख्येत बापाच्या ओंजळभर आकांक्षा कशा सामावतील?

आताच काही नको त्रागा करून घ्यायला. नंतर सावकाश सगळं समजावून सांगू म्हणजे पोरगं समजेल, या आशेने सगळेच प्रयत्न करीत राहिले. पण पदरी निराशाच पडणार असेल, तर कोण काय करणार. जेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेवढं पोरगं अधिक पेचात पाडायला लागला. अगदी आहे ती लठ्ठ पगाराची नोकरी सोडतो अन् करतो आणखी पुढचं शिक्षण, म्हणून सांगू लागलं. निदान यामुळे तरी तुमची भुणभुण संपेल माझ्या मागची एकदाची, म्हणून थेट बोलू लागलं. आतामात्र सगळ्यांचा संयम सुटायला लागला. पोरगं कधी बापाच्या शब्दांच्या पलीकडे गेलं नाही. बापानेही कधी पोरांच्या आयुष्यात हस्तक्षेप केला नाही. स्वातंत्र्य शब्दाच्या अर्थासह त्यांना जगू दिलं. स्वातंत्र्य शब्दाचे अर्थ क्षणात पालटले. ‘स्व’ घेऊन येणारे सगळे शब्द कोशातल्या अर्थांच्या चौकटींमध्ये सीमांकित झाले. सगळं विपरीत घडत होतं. बाप काकुळतीला येवून सांगतोय अन् पोरगं त्याच्या विचारांपासून तसूभरही विचलित होत नाही.

‘आशा’ ही अशी एक गोष्ट असते, जी विचारातून सहजी निरोप घेत नाही. अधूनमधून फोनवरून बोलून बाप पोराचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत राहिला. पण उपयोग शून्य. उलट त्यालाच दोन अधिकच्या गोष्टी सांगून, नव्या पिढीच्या जगण्याच्या प्राथमिकता, आयुष्याचे अग्रक्रम वगैरे वगैरे तत्वज्ञानपर प्रवचन पोरगं ऐकवू लागलं. आज परत फोन करून बाप पोराला वडिलकीच्या नात्याने समजावून सांगू लागला. पण पोराने फोन दाणकन कट केला. पुढच्या क्षणाला नंबर ब्लॉक. बाप परत नंबर जुळवण्याचा प्रयत्न करतोय. पण उपयोग काय? पोराने संवादाचे विकल्पच संपवले असतील तर...

बापाला आपली जागा नेमकी कुठे आणि कोणती आहे, याची जाणीव होते. मनातल्या मनात लाखदा हळहळतो. पोरासमोर वाचलेल्या प्रत्येक पाढ्याची बेरीज परत परत करून पाहतो, पण हाती शेष शून्यच. परोपरीने प्रयत्न करूनही काहीच हाती नाही लागलं. सगळे पत्ते फेकून पाहिले. थकला. सगळे बाण व्यर्थ गेले.

‘संधी प्रत्येकाच्या आयुष्यात दस्तक देत असते. तिचा आवाज ऐकून प्रतिसाद देता येतो, त्यांना भविष्याचे अर्थ सांगावे नाही लागत. प्रतिसादाचे सूर सजवता आले की, जगण्याचं गाणं होतं. पण कोणी ठरवून दुर्लक्ष करत असेल, साद ऐकून घ्यायला तयारच नसेल, तर त्याला कोण काय करणार? दैव देतं अन् कर्म नेतं, या म्हणीचा अर्थ तरी यापेक्षा वेगळा कुठे असतो?’- हताश बाप स्वतःशीच बोलत होता.

प्रकाशच्या मुखातून प्रकटलेलं हे सगळं पुराण ऐकून घेतलं. त्याला म्हणालो, “हा प्रश्न काही तुझ्या एकट्याचा नाही. आणखीही असे अनेक असतील. आणि प्रश्न कुठे नसतात? हवंतर याला दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर समज. अंतर आलं, तेथे समजून घेण्याला मर्यादाही आल्याच. आपल्या मर्यादा आपल्याला आकळल्या की, आयुष्याचे अन्वयार्थही लावता येतात. मुलाला त्याचे विचार आहेत. त्याचं वागणं आणि तुझं आग्रही असणं एकवेळ समजून घेता येईल. पण स्वतंत्र विचारांचं काय? तू तुझ्या विश्वाच्या वर्तुळातून जगाकडे पाहतो आहे आणि तो त्याच्या जगातल्या दुर्बिणीतून. दिसण्यात अंतराय तर असणारच ना! तुझ्या नजरेचा थोडा कोन बदल. दिसणारे दृश्यही अपोआप बदलेल!”

मला मध्येच थांबवत म्हणाला, “कसा बदलेल? सांग ना, कसा बदलेल? तुमचं विश्व प्रगतीच्या वरच्या पायऱ्यांवर उभं आहे, म्हणून अधिक लांबचं दिसेलही. पण वय नावाच्या अनुभवातून आलेलं शहाणपण दुर्बिणी लावून नाही पाहावं लागत. थोडं अंतर्यामी डोकावून पाहायला लागतं. मनात नांगरलेली गलबते प्रतीक्षेत असतात. प्रवासाची दिशा माहिती असली की, घ्यायचा एखाद्याचा सहारा. पण नाही. आमच्या मनाची शिडे सतत वाऱ्याच्या प्रतिरोधात विपरीत दिशेला उभी. कशी गवसेल दिशा? कुणी याला दैवाचे खेळ वगैरे म्हणतो. मीही कधीकाळी खेळलोय. पण पराभूत होणं एखाद्याच्या प्राक्तनातच असेल तर... समर्थनाची, विरोधाची शेकडो कारणे सांगता येतात. पण तीही वंचनाच. शून्यापासून माझा प्रवास प्रारंभ झालाय. राहिलो झगडत देवाशी अन् दैवाशी. भिडलो नियतीने कोरलेल्या अभिलेखाच्या अक्षरांना, त्यांचे अंगभूत अर्थ समजून घेण्यासाठी. हवं ते सगळंच नाही, पण बरंच काही मिळवलंही, कोणत्याही कुबड्या अन् वशील्यांच्या शिड्या न वापरता, स्वतःची पात्रता सिद्ध करून. जगलोही, स्व प्रज्ञेला प्रमाण मानून. पराभव पचवण्याची प्रचंड कुवत माझ्यात आहे अन् यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही. पण आज असं का वाटतंय, कोणास ठाऊक? माझ्याकडून काहीतरी कमतरता राहिली की काय? काय असेल ते असो, पण सगळं काही करून केवळ कुणाच्या विसंगत वर्तनाने आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे अंकित केली जात असतील तर...?”

त्याच्या मनाला लागलेल्या वणव्याला वाट करून देत पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या रेषांकडे थोडा वेळ निशब्दपणे. थोडी धग कमी झाल्याचं जाणवलं. म्हणालो, “अवमान विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् कर्तव्यांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही कुणी नसतो. असलेच कुणी असला तर अपवाद समज. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका अगदी रास्त असतील, हे कशावरून?”

माझ्या बोलण्याचा तुकडा करत म्हणाला, “पण अवास्तवही नसतात ना! कुणाच्या आयुष्याचे अनुकूल अन्वय लावण्यात गैर ते काय? ज्यांच्यासाठी तिळतिळ तुटावं, तेच सगळे अनुबंध तोडायला निघाले असतील तर... दोरी रेशमाची असली काय किंवा आणखी कसली, त्यानी कोणता फरक पडणार आहे? तुटणं कातळावरची रेष बनून रेखांकित होणार असेल, तर नियतीही त्यांच्या दिशा नाही बदलू शकत. संधी त्यांनाच असते, जे तिच्या नूपुरांचा नाद ऐकून प्रतिसादाचे प्रतिध्वनी बनून साद घालतात. अंतर्यामी जपलेल्या अहंना विसर्जित करून आसपासच्या आसमंतात विहरणाऱ्या सूक्ष्म संकेतांनाही ओळखून घेतात. याने सगळ्याच शक्यतांना अस्वीकार करायचं ठरवलं असेल, तर ब्रह्मदेवही याच्या ललाटी कोरलेले अभिलेख बदलवू शकत नाही.”

“झालं तुझं बोलून सगळं? आता मी एक सांगू का? सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या आणि मताप्रमाणे व्हायला हव्यात, असं कोणत्या ग्रंथात लिहलं आहे? जरा इतरांच्या जीवनग्रंथावरची अक्षरे वाचून पहा ना! नको वाचू सगळे अध्याय. काही आवश्यकता नाही त्याची. पण त्यावर कोरलेली अक्षरे तरी ओळखशील की नाही? येथे प्रत्येकजण आपापली जीवनगीता लिहित असतो. ज्याच्या त्याच्या वकुबाने. अनुभवाने. अपेक्षेने. तुला तुझ्या आयुष्याचे अध्याय आवडत असतील, तर असू दे ना! तुला तुझं स्वातंत्र्य आहेच. पण पोराच्या जीवनग्रंथात तीच अक्षरे लेखांकित करण्याचा अट्टाहास का? का करावीत त्याने ती? तुला हवं तेच का त्या पानांवर लिहिलं जावं?” - मी.

“नाही रे, मीही काही एवढा संकुचित विचारसरणीचा धनी नाही. हे काय तुला माहीत नाही. पण पोरावरच्या अढळ विश्वासाने अन् वयाच्या वाटेने चालत आलेल्या माझ्याकडील शहाणपणाने समजावून पाहिले त्याला. पण नाहीच तो मान्य करत, तर काय करणार आहे दुसरं? आहे ते स्वीकारण्याशिवाय आहे का आणखी दुसरा कोणता पर्याय? पण एक खंत आतल्या आत कुरतडत राहीलच की, काहीतरी कमतरता राहिली माझ्याकडून. मी नाही समजून सांगू शकलो त्याला किंवा असंही म्हणू शकतो, नाही समजून घेता आलं त्याला. किंवा असंही असू शकतं की, त्याला समजून घ्यायचंच नसेल मला. त्याच्या वेगाशी जुळवून नाही घेता आलं मला. हे मान्य करायला कोणताही किंतु नाही माझ्या मनात. पण म्हणून मी अडगळीत फेकण्याएवढा नकोसा झालोय का? असो, जे काही असेल ते. आहे ते काही वाईट नाही आणि घडतं तेही काही वावगं नाही. संधी वगैरे सगळं ठीक. पण संधीच्या पलीकडे आणखीही काही तरी असेलच? करू या प्रतीक्षा त्याही क्षणांची.”

गाडी आणि गडी दोघेही योग्य वळणावर उभे होते. तेवढ्यात वहिनींचा त्याला फोन आला. मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत म्हणाला, “अरे, हिचा फोन आलाय. काय सांगायचं आहे, कोणास ठावूक?”

थोडावेळ त्यांचं काही बोलणं झालं. बोलताना मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. जमा झालेलं मळभ हळूहळू निवरायला लागलं होतं. परिस्थितीचा वारा दिशा बदलून वाहू लागला होता. बोलून झालं अन् माझ्याकडे पाहत तो म्हणाला, “चंद्या, चल मी निघतोय घरी. ही आताच फोनवर बोलली, पोरगं तुमच्याशी काही तरी महत्त्वाचं बोलायचं म्हणतंय...!”

घाईतच तो घराकडे निघण्यासाठी वळला. गाडी सुरु केली अन् भेटतो रे, सवडीने! म्हणत चालता झाला. मी मान होकारार्थी डोलावली. तेथेच उभा राहून लांब जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. हळूहळू आकृती अस्पष्ट होत गेली, तसा मनात एक विचार अधिक गडद होऊ लागला, ‘नेमकं काय सांगायचं असेल, याच्या पोराला...?’
••

5 comments:

  1. सर छान मांडलंय वयात आलेल्या बापाचं मन,त्याची ओढाताण.खरंच आज मुलीच्या लग्नापेक्षा मुलाचं लग्न जमविणे जास्त अवघड झालं आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय आशयगर्भ , मनाच्या खोल आवर्तनातून उलगडत नेलेले पैलू .

    ReplyDelete
  3. Lagn jamavaycha attahas ka? Lagn, sansar hya saglyapalikade khup kahi aahech ki..

    ReplyDelete