Gandhkoshi | गंधकोशी

By
गंधकोशी: भाग एक

काही दिवसापूर्वी शाळेतील मुलांसंदर्भात बातम्या- जळगाव जिल्ह्यातील गिरड येथील शाळेत मुलांच्या आपापसातील भांडणात पाचवीच्या मुलाने जीव गमावला. संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या शाळेत सातवीतील मुलांनी सोबत शिकणाऱ्या आपल्याच वर्गातील मुलास मुलींकडे पाहतो, म्हणून बदडून काढले. मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाला. जीवनाचे पैलूच ज्यांना अजून पुरते कळायचे आहेत; त्या मुलांच्या जगात हे काय अतर्क्य घडतंय, म्हणून सारेच अवाक झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चिंतेची अस्पष्टशी लकेर उमटली. प्रत्येकाने आपापल्यापरीने संबंधित घटनेचे अर्थ शोधले. अन्वयार्थ लावले. संबंधित बातम्या लोकांपर्यंत पोहचल्या. काही संवेदनशील मने क्षणभर अस्वस्थ झाली. हे काय विपरीत घडतेय म्हणून विचार करायला लागले. घडणाऱ्या अशा घटनांचा अन्वयार्थ लावणे जरा अवघडच असते, कारण अशा घटनांशी अर्थाचे अनेक दृश्य-अदृश्य पदर निगडित असतात. परिसरात चोऱ्या, मारामाऱ्या यासारख्या काही घटना घडत असतात. आसपास असे काही घडले की, संवेदना हरवलेला समाज रोजच्या जगण्याच्या व्यापात निष्क्रिय मतांनी निर्मित प्रतिक्रियांची लेबले त्या-त्या घटनांवर चिटकवून व्यक्त होतो. अन्यायाची कोणाला चीड नाही आणि मूल्यांची चाड राहिली नाही, म्हणून समाजाला दोष देतो, क्षणभर हळहळतो. माणसाचं सर्वच स्तरावरून कसं नैतिक अधःपतन घडत आहे, याची खंत व्यक्त करतो आणि आपल्या दैनंदिन व्यापात विरघळून जातो. पुढेही काही अप्रिय घटना घडत राहतात. त्या टाळता येणे संभव असले, तरी बऱ्याचदा टळत नाहीत. त्यांचे क्षणिक, तात्कालिक, भावनिक पडसाद उमटतात. कोणालातरी दोष द्यायचा अन् अशा घटनांची जबाबदारी कुठेतरी निर्धारित करायची म्हणून संस्कार, नैतिकता, मूल्ये, संवेदनशीलता अशा काही धाग्यांनी घटनांच्या परिणामांना बांधून समाज मोकळा होतो. व्यवस्थेचा कोणावरच वचक राहिला नाही म्हणीत क्षणभर हताश, निराश होतो. घडणाऱ्या घटनांबाबत त्रागा करूनही फारसे काही हाती येत नाही. अर्थात घडणाऱ्या अशा घटना हे काही समाजाचं सार्वकालिक दर्शन नसतं. समाजात त्या घडतच असतात, या वास्तवास दुर्लक्षित कसे करता येईल.

घडलेल्या या घटनाही तशा दुर्दैवीच. त्याहून आणखी दुर्दैव हे की, या घटनांत बळी जाणाऱ्या आणि घेणाऱ्या मुलांचे वय अवघे तेरा-चौदा वर्षे एवढेच. ज्या वयात खेळावं, बागडावं, हसावं, रडावं त्या वयात अचानक असं काय घडलं की, मुलांचा संयम ढळावा? अशी अनपेक्षित आक्रमकता यांच्यात कुठून येते आहे? या घटनांकडे अपघात म्हणून कदाचित पाहता येईलही; पण अपवाद म्हणून पाहणे म्हणजे आपणच करून घेतलेली आपली वैचारिक वंचना तर नाही ना? पाश्चात्य देशात वर्गात हल्ले घडण्याच्या घटनांमध्ये काही नावीन्य नसेलही; पण ज्या देशात संस्कारांची गंगोत्री संयमाच्या तटांना धरून प्रवाहित आहे, त्या देशात एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत उमलत्या मनांमध्ये क्षोभ उफाळून यावा, हे न समजणारं आहे. या घटनांचं उत्तरदायित्व नेमकं कोणाचं? समाज, पालक, शिक्षक, शिक्षणव्यवस्थेचं की सगळ्यांचं? कोणाकडे बोट दाखवायचं, तर कोणासही दोष देता येईल. या घटनांमागील कारणं शोधली, तर आपल्या हाती काय लागते? हाती शून्यच येणार असेल, तर अशा विचारांना आत्मवंचनेशिवाय आणखी काही म्हणता येईल, असे वाटत नाही. अशा काही घटना घडल्यानंतर समाज व्यथित होतो. क्षणभर हळहळतो, खळबळून जागा होतो आणि विचार करतो. भविष्यात असे अघटित घडू नये म्हणून काहीतरी करावयास हवे, या जाणिवेतून काही उपाय सुचवले जातात. जुन्या पिढीतील माणसं आमच्याकाळी असं काही नव्हतं, म्हणून आपल्या मतांचे शिक्के संबंधित घटनांवर ठोकून मोकळे होतात. उगीच एखाद्या घटनेने थेट सगळ्यांनाच एका मापात मोजण्याचे पाप का करतात, म्हणून नव्या पिढीचे प्रतिनिधी व्यवस्थेला प्रश्न विचारतात. मतमतांतारांचा प्रचंड धुरळा उठतो. प्रत्येकाला आपण आणि आपलीच मते योग्य असल्याचा साक्षात्कार होतो. घटनांचे अन्वेषण बाजूला पडते. मूळ मुद्दा तसाच शिल्लक राहतो आणि इतर गौण गोष्टींकडेच लक्ष केंद्रित होते. मुलांचं वर्तन पाहून आपल्या सामाजिक जगण्याचं वास्तव कळत नकळत समोर येते. स्वैरपणाला स्वातंत्र्य समजणाऱ्या मुलांकडून मर्यादांचे सीमोल्लंघन घडत आहे. मुलांच्या बेताल वागण्याने पालक हेलपाटलेले आहेत, हताश झाले आहेत. आपलीच मुलं आपल्या हाताबाहेर निघून गेली, म्हणून चिंतीत झाले आहेत.

काळाचा महिमा अगाध असतो. त्याचा प्रवास घडताना तो आपल्या सोबत जशी संपन्नता आणतो, तशा समस्याही घेऊन येतो. आल्याच समस्या तर त्यांची उत्तरे शोधावी लागतात. त्यासाठी वेळ देऊन काही प्रासंगिक प्रयोग करायला लागतात. पण सांप्रत समाजात जगण्याचे प्रश्नच एवढे जटील झाले आहेत की, त्यांची सर्वसमावेशक उत्तरे सहज हाती लागणं अवघड होत आहे. माणसांच्या कालच्या आणि आजच्या जगण्यात प्रचंड अंतराय निर्माण झालं आहे. कधीकाळी आला दिवस दारिद्र्यात कंठणाऱ्यांनाही संस्कारांनीमंडित जगण्याची श्रीमंती फार मोलाची वाटत असे. पण वर्तमानाने लोकांचं जगणं बदलवलं. जागतिकीकरणाच्या उसळणाऱ्या लाटांवर स्वार होऊन अनेकांचं जगणं आर्थिक आघाड्यांवर संपन्न झालं. भक्कम आर्थिक स्त्रोतांनी हाती चार पैसे खुळखुळायला लागले. आवश्यक गरजा भागवून उरलेला पैसा भौतिकसुखांच्या वाटेने वळून भोगवादाच्या दिशेने पळतो आहे. सोबतीला विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुखाचं व्हर्च्युअल जग उभं राहिलं आहे. या जगाने अॅक्च्युअल जगाचा विसर पाडण्याएवढी साधनं माणसांच्या दारात आणून उभी केली आहेत. नैतिक मूल्यांना प्रमाण मानून जीवनयापन करण्याच्या पद्धतीत या साधनांनी बदल घडवून आणलाय. सुखप्राप्तीची गणिते श्रमाच्या सूत्रांनी सोडवण्याऐवजी संक्षिप्त पायऱ्यानी सोडवण्याचे फॉर्मुले शोधण्याच्या पद्धतींना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. विनासायास सुख संपादित करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कवायतींचा हा परिपाक आहे.

लॅपटॉप, मोबाईल, प्लेस्टेशन, गेमिंग संस्कृती विज्ञानतंत्रज्ञानाच्या शिड्या सोबत घेऊन माणसांच्या जगण्यात प्रवेशित झाली आहे. काळाच्या वाहत्या प्रवाहात मोबाईलच नाहीतर मुलंही स्मार्ट झाली आहेत. टचस्क्रीनच्या चार-पाच इंचाच्या पडद्यावर जगाचे हवे तसे, हवे तेव्हा, हवे ते रंग दिसायला लागले. या आभासी जगण्याचं व्यसन नव्या पिढ्यांना लागत आहे. एकवेळ आवश्यक गरजांची पूर्तता नसेल होत तरी चालेल; पण फेसबुक, व्हाटस् अॅप हाती असलेच पाहिजे, अशी मानसिकता प्रबळ होत आहे. भावनांना विचलित करून मनाला दोलायमान करणाऱ्या हजारो वेबसाईटस् दिवसाचे चोवीस तास दिमतीला आहेत. या वाटांनी घडणारा प्रवास वेगाने आणि सुगम व्हावा म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्क हाती लागले आहे. आईबापाला आपलं मूल स्मार्टफोन वापरताना पाहून स्मार्ट झाल्याचा आनंद होतोय. ते आणखी स्मार्ट व्हावं म्हणून ऐपत नसतानाही नेक्स्ट जनरेशनचे महागडे मोबाईल त्यांच्या हाती दिले जात आहेत. पण मुलांकडून त्याचा उपयोग कसा केला जातोय आणि काय होतोय, हे पाहण्याएवढे तंत्रज्ञान बहुसंख्य पालकांना अवगत नाही अन् असलेच तर त्याकडे पाहण्यासाठी हाती तेवढा वेळही नाही. गेल्या काही वर्षात कधी नव्हे एवढी सुशिक्षितांची संख्या वाढून घरात कमावते हात वाढले. कमावत्या हातांना समृद्धीचे दान देत लक्ष्मी घरी आली आणि बऱ्यापैकी विसावलीही आहे. आम्ही लहान असताना हे असं काही आम्हाला घेता आलं नाही, करता आलं नाही; याचा सल पालकांच्या मनात असल्याने मुलांना काहीच कमी पडू द्यायचे नाही, या विचारातून ही आभासी सुखं पालक घरात आणत आहेत. हाती लागणाऱ्या अशा सुखांमध्ये ऑनलाईन असणाऱ्या पिढीची जगण्याची लाईनच चुकतेय, याचं भान उरलं नाही.

चेहऱ्यावरच्या सूक्ष्म रेषाच काय; पण वाऱ्याने उडणारा डोक्यावरील एखादा केसही स्पष्ट दिसेल याची शाश्वती देणाऱ्या एलइडी, एचडी, प्लाझ्मा टीव्हीच्या पडद्यांनी जगातील सगळे रंग साकोळून बैठकीच्या खोलीपर्यंत आणून ठेवले आहेत. स्क्रीनवरील सप्तरंगांनी मंडित मालिका, चित्रपट मनाच्या कप्प्यांना साचेबंद चौकटीत आणून उभे करीत आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या प्रणयी जोड्या, त्यांचे प्रणयाराधन, भौतिक सुखांनी संपन्न जगणं, लाखालाखाच्या महागड्या गाड्या, प्रशस्त बंगले. कोणाचीही नजर विस्मयाने फिरावी असं जगणं आणि असंच किंग साईज लक्झरीयस जगणं म्हणजेच खरं सुख, असा समज पाहणाऱ्यांच्या मनात दृढ होत चालला आहे. टीव्हीच्या पडद्यावरील मालिकेतील पात्रांची परस्परातील नाती, नात्यांतील संबंधांचं चित्रीकरण आणि समाजात दिसणारं वास्तव यांची कोणतीही चिकित्सा न करता तेथे दिसणाऱ्या काल्पनिक जगालाच वास्तव समजण्याचा प्रमाद उमलत्या मनांकडून घडतो. पडद्यावरील जोड्या प्रेम करताना दिसतात. तसेच, तेच आणि तेव्हढंच प्रेम उमलत्या वयातील मुलामुलींना खरं जगणं वाटायला लागते. पडद्यावरील प्रणयाराधन अडनिड वयातील मनाला संमोहित करतंय. समाजात, परिसरात जे काही बरंवाईट दिसतं, त्याची प्रतिबिंबे मुलांच्या उमलत्या मनांवर उमटत असतात. मनांवर उमटलेल्या अशा काही प्रतिमातून संस्कृती त्यागात नसून भोगात आहे, असा समज नकळत वाढत जातो. धूम्रपान, मद्यपान आरोग्यास हानिकारक असल्याच्या सूचना पडद्यावर कितीही ठळक अक्षरांनी लिहिल्या जात असल्या तरी त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करून; साध्या सुगंधी सुपारीच्या तुकड्यापासून प्रारंभ झालेला व्यसनांचा प्रवास केव्हा सिगारेट, घुटका, मद्यपानापर्यंत पोहचतो, ते कळतही नाही. व्यसनांना अनामिक प्रतिष्ठा प्राप्त होते. मद्यपान करणे हा इव्हेंटचा भाग बनतो. पिण्याला सोशलड्रिंकच्या नावाखाली प्रतिष्ठा प्राप्त होणे, हा प्रवास नैतिक उंची वाढवणारा नक्कीच नाही.

एककाळ असा होता की, जगण्याशी निगडित बऱ्याच गोष्टींची माहिती होण्यासाठी वयाची वीसएक वर्षे तरी उजळायला लागायची. हल्ली विज्ञाननिर्मित साधनांमुळे अशी माहिती वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच मुलांच्या हाती लागते आहे. पाचवी-सहावीच्या मुलामुलींच्या मनात भावनिक गुंत्याची जाळी विणली जात असल्याच्या वार्ता कानी येतात. हे ऐकणे अवघड वाटत असले, तरी वास्तव असेच काही दिसते आहे. अशी काही प्रकरणे घडतात, ती समोर येतात तेव्हा माणसे अवाक होतात. आपला वाढदिवस साजरा करताना कुणीतरी तीन-चार वर्षाचे मूल प्रपोज स्टाईलने मुलीच्या हाती फूल देतो आणि तीही तितक्याच नजाकतीने त्या फुलाचा स्वीकार करते. पाहणाऱ्यांना त्यांच्या निरागसतेचे कौतुक वाटते; पण त्यांच्या मनांवर, विचारांवर अशा कृतीचे काही चिन्हे, ठसे जेथून अंकित झाले त्याचं काय? तेरा-चौदा वर्षाची मुलंमुली फ्रेडशिप, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असणं स्टेटस सिम्बॉल समजायला लागतात. स्वतःला मेड फॉर इच अदर समजू लागतात. ज्या वयात स्वतःचीच नीट ओळख अजून व्हायची आहे; त्या वयात एकदुसऱ्यासाठी झुरणी लागायचं, हा कोणता जीवनयोग आहे? कालांतराने अशा वर्तनाची विफलता समोर येते. प्रखर वास्तव बनून काही प्रश्न समोर उभे ठाकतात. आकर्षणातून  निर्माण झालेल्या अशा तात्कालिक आणि तकलादू नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो. संयमाचे बांध फुटतात अन् ब्रेकअप घडते. वाटा वेगळ्या होतात. मने सैरभैर होत जातात. त्यातून आलेली विमनस्कता विचारांना अवरुद्ध करते. अविचाराने वागणे घडते अन् अविचाराची सोबत करीत वैगुण्ये आणि व्यसनाधिनता जीवनात प्रवेशित होते.
(क्रमशः)

5 comments: