Gun Aani Gunvatta | गुण आणि गुणवत्ता

By
गुण आणि गुणवत्ता: दोन
 
परीक्षातंत्राला आत्मसात करून गुणांचं मोठ्ठं भांडार आपल्या खात्यावर जमा करण्याचा छंद असणाऱ्या जवळपास सगळ्या ‘मार्क्स’वाद्यांनी डॉक्टर, इंजिनियर व्हायची स्वप्ने जणूकाही लहानपणापासून आपल्या मनावर गोंदून ठेवलेली असतात. कौतुकसोहळ्याच्या निमित्ताने या गुणवंतांना वर्तमानपत्रात मनोगते व्यक्त करण्याची संधी अनायासे प्राप्त होते. बरं येथे विचारले जाणारे प्रश्नही जवळपास दरवर्षी तेच किंवा तशाच स्वरूपाचे असतात आणि उत्तरेही जणूकाही मागचीच पाठ करून ठेवल्यासारखी. यांचं रोज बारा-तेरा तास अभ्यास करणं, टीव्ही वगैरे न पाहणं, शिक्षकांचं, आईबापाचं यांना सतत मार्गदर्शन असणं आणि सोबत अनेक पुस्तके दिमतीला असल्याचे हे सांगतात. हे पाहून तर आमच्यासारख्या हंगामी अभ्यास करणाऱ्या पिढ्यांना गरगरायला होते. बरं यातील सगळ्याच गुणवंताना डॉक्टर, इंजिनियर नाहीतर सी.ए.असंच काहीतरी व्हायचे असते. आणखी काही व्हावेसे का वाटत नसावे कोणास ठाऊक? समाजाला अन्य पेशा स्वीकारून जगणाऱ्यांची आता आवश्यकताच उरलेली नाही जणू. या सगळ्या गुणवंतांना घडवणारा कोणीतरी मास्तरच असतो; पण यातला एकही विद्यार्थी मला शिक्षक व्हावंसं वाटतं, असं चुकुनही सांगत नाही. ज्यांना कुठेच काही संधी मिळाली नाही, ते मास्तर बनतात आणि गुणवत्ता यादीत नसलेले हे गुणवान पुढचे ‘गुण’वान घडवतात. याला कोणता काव्यगत न्याय म्हणावे?

स्पर्धेच्या धावत्या जगात धावण्याची ताकद अंगी असायला लागते. ही ताकद गुणपत्रिकेतील गुणांनी कशी मिळेल? त्याकरिता अंगभूत धाडस असायला लागते. जीवघेण्या स्पर्धेत काही कोवळे जीव अक्षम ठरतात, परिस्थितीशी धडाका देत टिकून राहण्याचे बळ उरत नाही, स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो, तेव्हा हे गुण किती मदतीला येतात? प्रसंगी मिळवलेल्या गुणांना टिकवून ठेवण्याचाच ताण अधिक असतो. हे सगळं सहन करण्यापलीकडे गेले की स्वतःचं अस्तित्व विसर्जित करण्यापर्यंत अविचाराचं वागणं घडतं. थोडा धीर धरून टिकणारे कोमेजून जातात, तेव्हा त्यांची होणारी दयनीय स्थिती आणि समाजाच्या जगण्याची कीव करावीशी वाटते. त्याहून जास्त कणव येते त्यांच्या पालकांची. का म्हणून मुलांच्या मानगुटीवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादत असतील? यांना विद्यार्थीदशेत करता आले नाही, ते आपल्या अपत्यांनी करावे, असं वाटत असतं का? यांना मुलांच्या भविष्याची खरंच काळजी असते की, शेजारच्या कोणातरी हुशार असणाऱ्यांशी तुलना करून आमचंही मूल काही कमी नाही, हे दाखवायचे असते. की आपले इगो कुरवाळायचे असतात, माहीत नाही.

शिक्षणातून ज्ञानसंवर्धन व्हावे, ही अपेक्षा असते. पण हल्ली अशा गुणवानांमधून किती गुणवंत ज्ञानसंपादन करून स्वतःला सक्षम करून घेणारे आहेत? नुसत्या माहितीच्या गोण्या भरणे म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी आणि ज्ञानाचं नातं जगण्याशी असतं. असावं. हे नातंचं हल्ली उसवत चाललं आहे. मागच्यावर्षी वर्गात काय शिकलात, ते यावर्षी आठवत नाही. आमचे शिकणे आणि ज्ञानसंपादन करणे त्या वर्षापुरते. वर्ग बदलला की, केलेला अभ्यासही विसरतो आणि ते शिकवणारा मास्तरसुद्धा. असा निष्क्रिय कर्मयोग आचरणे म्हणजे शिक्षण का? मुळात आपल्या शिक्षणपद्धतीत आणि परीक्षापद्धतीत काही वैगुण्ये आहेत. ज्याची स्मरणशक्ती तीव्र तो या व्यवस्थेत प्रज्ञावान ठरतो. या प्रज्ञेला पैलू पाडणारी सध्या बऱ्यापैकी बरकत आणि प्रतिष्ठा असणारी क्लास नावाची व्यवस्था आहेच दिमतीला. येथे काही पैसे पेरून स्मरणशक्तीला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासाच्या सरावाचे अनेक प्रयोग करून विद्यार्थ्याच्या जीवनाचा कर्मयोग साधला जातो. परीक्षेत नेमाक्यावेळी नेमके आठवून तंत्रबद्धरित्या पाठ केलेली आणि घोटून, तासून, तपासून घेतलेली उत्तरे लिहिणे म्हणजे गुणवान का? यातील किती विद्यार्थी कोणीतरी निर्माण केलेली, ठरवलेली चाकोरी नाकारून वेगळी उत्तरे लिहितात? जवळ-जवळ सारखीच उत्तरे, कारण पाठांतर उत्तम. उत्तराबाबत संशोधन केल्यास कळेल बहुतेक साऱ्यांच्या मदतीला पाठांतरासाठी कोणतेतरी मार्गदर्शक पुस्तक आणि तंत्रसाध्यतेसाठी मार्गदर्शन करणारे कोणीतरी तज्ज्ञ धावून आलेले असतात.

समजा एखाद्या विद्यार्थ्याने चाकोरीतला रस्ता नाकारून काही वेगळे लिहिले असेल, तर परीक्षक त्याला आणि त्याच्या लिहिलेल्या उत्तरला किती स्वीकारतात? ज्यांच्या मार्गदर्शनात उत्तरपत्रिका तपासण्याचे काम चाललेले असते, त्या मॉडरेटर्ससाठी बोर्डाने दिलेली नमुना उत्तरपत्रिका धर्मग्रंथांइतकी पवित्र असते. त्यात जे दिले असेल तेच आणि तेवढेच अंतिम सत्य आहे. त्याच्याबाहेर काहीही नाही, हा अढळ विश्वास. आधीच बाजारात परीक्षातंत्रावर आधारित पुस्तकांची वानवा नसल्याने, हे तंत्र अवगत असणारे अनेक अभ्यासू मार्गदर्शन करून गुणवान कसे बनतात, हे शिकवतात. परीक्षेच्या काळात तर अशा दिशादर्शक कृतिसत्रांचे, शिबिरांचे पिक आलेले असते. या सगळ्या सव्यापसव्यातून अपेक्षित तंत्र आत्मसात करणारे ‘गुण’वान ठरतात. उत्तरपत्रिका तपासण्याआधी परीक्षकांना सूचना वजा मार्गदर्शन केले जाते. त्यात एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते की, मुलांनी मागणी केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी दिली जाणार आहे. उत्तरपत्रिका काळजीपूर्वक तपासा. या काळजीपूर्वकचा एक अर्थ असा होतो, मागितल्या गेल्याच उत्तरपत्रिका माहितीच्या अधिकारात तर कोण कशाला ‘आ बैल मुझे मार’ करतो, त्यापेक्षा दिले चारदोन मार्क्स अधिक, तर त्यानी आपल्याला असा काय फरक पडतो. कमी गुण दिले म्हणून त्यांचा गुन्हेगार बनण्यापेक्षा जास्त गुण देऊन कर्ण बनणे केव्हाही चांगले ना!

हे कमी की काय म्हणून अंतर्गत गुणांची शिदोरी आधीच सोबत बांधून दिलेली असते. हे गुण पाहिले की वाटते सगळेच विद्यार्थी सगळ्याच विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनात एकदम गुणवत्ताधारक झाले आहेत. या अंतर्गत गुणांची गुणपत्रकातील सूज उतरवून निकाल पाहिला की, कळेल गुणवत्ता कोणत्या अप्सरेचे नाव आहे आणि काय आहे. बोर्डाच्या परीक्षेत ऐंशी गुणांपैकी दहा-अकरा गुण मिळवणारे इकडे अंतर्गत परीक्षेत वीसपैकी एकोणवीस-वीस गुण मिळवतात, याला कोणते सामायिक समीकरण समजावे? शाळेची प्रगती दहावीच्या गुणांशी जोडून ठरवली जात असेल आणि तोच यशाचा निकष ठरत असेल, तर या निकषास पात्र ठरण्यासाठी प्रयोग आणि प्रयोगांना योगसाधना समजणारेही ओघानेच येतात. प्रत्येकाला आपल्या शाळेचा निकाल अधिक कसा लावता येईल याचाच ध्यास लागलेला. अशा ध्यासपूर्तीसाठी अनेक सर्जनशील विचार जागे होतात. आपले कौशल्य पणास लावून निकाल नावाची अवघड तपस्या साध्य केली जाते. कॉपीमुक्त अभियान कार्यान्वित केले जाते, तरीही बोर्डाच्या दप्तरी असे काही महाभाग आपल्या अलौकिक प्रयोगांच्या अचाट साहसामुळे सुवर्णाक्षरांनी नोंदवले जातात. कारवाई केली जाते. तरीही पुढच्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न हे ठरलेलेच.

एक दहावी-बारावीच्या निकालाभोवती आमची सगळी शिक्षणव्यवस्था फिरते आहे. खरे गुणवान या व्यवस्थेत टिकून राहतात, हेही सत्य नाकारून चालत नाही; पण त्याच वेळी आपल्या उच्चशिक्षणाचा आलेख अद्यापही सतरा-अठरा टक्क्याच्यापेक्षा अधिक वाढताना का दिसत नाही? असे म्हणतात की, पदवीचा टिळा ललाटी लागलेल्यांपैकी फक्त पंचवीस-सव्वीस टक्केच इंजिनियर ज्ञानसंपादन करून खऱ्या अर्थाने पदवीस पात्र ठरतात. बाकीच्यांकडे पदवी आहे पण कौशल्ये नाहीत. मग अशा गुणवानांना गुणवान कसे म्हणावे? जी गोष्ट इंजिनियरिंगची तिच थोड्याफार फरकाने अन्य शाखांची आणि तशीच मास्तरांचीसुद्धा. येथेही टीईटीचे निकाल शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेल्या आपल्या ज्ञानाचे पितळ उघडे पाडतात. जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल. शिक्षणाचा सांधा भाकरी, चाकरी आणि छोकरी यांच्याशी जुळवला जात असेल, तर शिक्षणात ज्ञानलालसा उरतेच किती? शिक्षणातून या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड सुरु होते. हा शुष्क कर्मयोग शिक्षणाला नव्या उंचीवर नाही नेऊ शकत. येथे सुमार उंचीचे खुरटी झाडे वाढतात. पर्णसंभाराने बहरलेले स्वयंभू वृक्ष अपवादानेच दिसतात.

समाजात सगळीकडेच गुणांचे पूजन होत असेल आणि त्यानंतर पुढची बाब म्हणून गुणवत्ता पाहिली जात असेल, तर साहजिकच गुणांचे अवडंबर माजणारच. गुणसंख्येला महत्त्व मिळून वागणे घडताना, गुण कसे मिळवायचे हेच पाहिले जाईल, कारण माणसाचा स्वभावाच मुळी कमीतकमी सायासप्रयासांनी अपेक्षित गोष्टी मिळवू पाहणारा आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गुणपत्रकावरील गुणांनी प्रवेश ठरत असतील, तर गुणपत्रक अधिक देखणे करण्याकडेच बहुतेकांचा कल असणे उघड आहे. अशावेळी सामान्य माणसांनी गुणवत्तेची कोणती अपेक्षा करावी? ज्यांना आपले गुणपत्रक गुणांनी रंगवता येते, ते या तंत्रसाध्य जगात यशस्वी म्हणून गणले जातात. ही मानसिकताच मुळात चुकीची असूनही, त्यात कोणीच वावगं वाटून घ्यायला तयार नसल्याचे दिसते. काही दिवसापूर्वी निकालांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी हेल्प लाईन सुरु केलेल्या कोणा एका मानसोपचार तज्ज्ञांचा अनुभव वर्तमानपत्रात छापून आला होता. दहावीला मुलीने ९२ टक्केच गुण मिळवले म्हणून तिचे डॉक्टर आईबाप प्रचंड रागावले होते. त्यांच्या मते तिने यापेक्षा अधिक गुण मिळवायला हवे होते. ते न मिळाल्याने, समाजात त्यांना मान खाली करायला लागली. आता एवढे गुण मिळवूनही यांना कमीच वाटत असतील तर उपचारांची खरी गरज कोणाला आहे?

समाजात वावरताना एक दृष्टिक्षेप टाकून पाहिल्यास मुलांच्या गुणांची चिंता कोणाला अधिक आहे हे सहज कळेल. एखाद्या शेतकरी, मजूर आईबापाने असा आग्रह केल्याचे मलातरी दिसले नाही. निदान आमच्यावेळी असे काही घडत नव्हते. आता यांच्याकडेही गुणांबाबत असे काही घडत असेल, तर काही अपवाद जरूर असू शकतात. नाहीतरी अपवाद सगळीकडे असतात. प्रस्थापित, सुशिक्षित समूहातही ते असतात. बहुदा शिकून स्थिर झालेले अन् स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्यांचे जग गुणांबाबत अधिक आग्रही (की दुराग्रही?) होत असल्याचे दिसते. हा अवास्तव आग्रह कशासाठी? याचे कारण उज्ज्वल वगैरे भविष्य असल्याचे लटके समर्थन केले जाते. असे असेल तर केवळ गुणांनीच भविष्य उज्ज्वल होते, याचे काही प्रमाण आहे का? हा वैचारिक भ्रम कशासाठी? जगाच्या इतिहासात डोकावून पाहिले की, दिसते गुणांच्या मोजपट्ट्यात मोजताना कधीही जे मोठे नव्हते, त्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर पराक्रमाची शिखरे उभी केली. शिकणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे असते काय शिकावे. काय, कोणते आणि कसे शिकावे यांच्या निवडीचे स्वातंत्र्य मुलांनाच असायला हवे. उगीच आपल्या इच्छा मुलांवर लादण्यात कोणतेही शहाणपण सामावले नाही. मुलं आपली आहेत. आपलं अस्तित्व आहेत; पण याचा अर्थ असा नाही, ते आपली स्थावरजंगम मालमत्ता आहेत आणि एखाद्या वस्तूसारखे त्यांचेही मोल लावता येते. असे कोणाला वाटत असेल तर आधी आपणच आपणास प्रश्न विचारून पहा, आपल्या आईबापानी आपणास असे घडवले असते तर...!

प्रश्न गुणांचा की गुणवत्तेचा, हे वेळीच समजणे महत्त्वाचे असते. गुण महत्त्वाचेच; पण गुणवत्ता त्याहून अधिक मोलाची असते, कारण गुणवत्तेशिवाय गुणांचं खरं मोल कळत नाही. गुणांच्या बेरजा करण्यापेक्षा गुणवत्तेची आराधना करणे माणसाच्या चैतन्यशीलतेचे द्योतक असते. गुण कमी मिळाले म्हणून हताश, निराश होताना हेही स्मरणात असावे की, गुणपत्रकात अंक बनून मुद्रित झालेल्या गुणांनी सगळ्याच गोष्टी काही साध्य होत नाहीत. अंकांचा देह धारण करून अवतीर्ण झालेले गुण काळाच्या प्रवासात विसरले जातात; पण गुणवत्ता एक अशी गोष्ट आहे, जी कालोपघात टिकून असते आणि तिचे स्मरण समाजाला सातत्याने असते. म्हणून शेवटी निवड आपलीच आपणास करायची आहे, आपणास गुण हवेत की गुणवत्ता!
(पूर्ण)

0 comments:

Post a Comment