Shikshan Lekinche | शिक्षण लेकींचे

By
२०१३, डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस महाराष्ट्र टाईम्स वाचत होतो. वाचता-वाचता एक बातमीवर स्थिरावलो. ‘लेकींच्या पूर्ण शिक्षणासाठी मोहीम’ असे नामकरण असलेली ही बातमी- शिक्षणातून मुलींची गळती रोखण्यासाठी शिक्षण विभाग ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा’ अभियानास ३ जानेवारी २०१४ पासून राज्यभर प्रारंभ करत असल्याची - यावेळी विद्यार्थिनी ‘मी शिक्षण अर्धवट सोडणार नाही’ असा संकल्प करतील - या आशादायी वार्तेने सरणाऱ्या वर्षाने नवीन वर्षात तुम्हाला काहीतरी चांगले करता येईल याचं आश्वस्त चित्र डोळ्यासमोर उभं केलं. त्याच त्या भ्रष्ट्राचार, राजकारण, राजकारणातील शह काटशह, स्त्रियांचा आत्मसन्मान विखंडित करणाऱ्या वेदनादायी घटनांच्या बातम्या रोजच्याच झाल्या आहेत. हल्ली अशा बातम्यांचेही आम्हाला काही वाटेनासे झाले आहे. इतक्या त्या सरावाच्या झाल्या आहेत. मनावर एकही ओरखडा न येता निर्लेपपणे वाचून आम्ही पुढील कामाला लागतो. अविचारास प्रतिकार करणारे चारदोन संवेदनशील आवाज ऐकू येतात, ते वगळता जसं चाललं आहे, तसंच स्वीकारण्याची सहनशील मानसिकता घेऊन आम्ही जगत आहोत. अंधाराचं सावट सोबत घेऊन येणाऱ्या अशा वार्तांच्या गर्दीत एक थोडासा काहीतरी सकारात्मक विचार अन् भावनिक दिलासा ‘लेक शिकवा अभियानाची’ ही बातमी देऊन गेली.

प्रयत्न आणि प्रारंभ तर चांगला होतोय. पण मुलींचं आपल्या शिक्षणव्यवस्थेतील स्थान शिक्षणात टिकून राहण्याच्या मुद्याभोवतीच अजूनही फिरत आहे, हे वास्तवही यातून प्रकर्षाने अधोरेखित झाले. शिक्षण या समाजनिर्मित व्यवस्थेविषयी आज समाजाचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा खूपच सकारात्मक असूनही, ती केवळ मुलगी आहे म्हणून व्यवस्थेतून हद्दपार होणार असेल तर यामागील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक कारणांचा शोध घेऊन, ते समजून घेणं आवश्यक आहे. परंपरेने ललाटी लिहिलेला दुय्यमत्वाचा अभिलेख सोबत घेऊनच स्त्रिया पुरुषांची सत्ता असणाऱ्या जगात संघर्ष करीत आपले अस्तित्व सिद्ध करीत आहेत. तिचे अस्तित्व तिने स्वबळावर अनेकदा सिद्ध करूनही वारंवार अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे. ज्या व्यवस्थेचे कायदे, नीतिनियम पुरुषपणाला अनुकूल असतील, त्या व्यवस्थेत तिला सर्वस्व पणाला लावूनच संघर्ष करीत उभं राहावं लागतं, हे सत्य कसं नाकारावं.

स्त्रीच्या मातृत्वाला मान असावा; पण तिच्या स्त्रित्वाचा सन्मान नसावा. पुरुषांनी सर्वत्र असावं, पण स्त्रीने कुठेच नसावं, असं का? तिच्या वात्सल्याचा, ममतेचा गौरव करावा; पण त्यांना गौरवान्वित करताना तिच्या सामाजिक वर्तनाच्या वर्तुळात उत्कट, व्यापक मोकळेपणाचा अभाव का दिसतो? केवळ स्त्रीदेह धारण करून ती इहलोकी जन्मली म्हणून तिच्या जन्माचाच तिरस्कार करणारी मानसिकता ज्या समाजात दृढतम असेल, त्या समाजात समतेचा जागर करणाऱ्यांनी संघर्ष करत व्यवस्थेसमोर उभं का राहू नये? वंशाच्या दिव्यासाठी झुरणारी मंडळी हिला जन्मण्याआधीच मारणारी होत असतील; अन् अशाही परिस्थितीत तिला मिळालाच जन्म, तर तिच्या जीवनपथावरील पुढील वाटेत काटेच असतील, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता  नाही.

शिकलेली आई घरादाराला पुढे नेई, असं कितीही सांगितलं, तरी तिला शिकवायची वेळ येते तेव्हा तिच्यासाठी शिक्षणपथ निर्मिताना शेकडो प्रश्नचिन्हं उभे राहतात. घरात मुलगा-मुलगी यांच्यातील कोणी एक, असा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिलाच तर त्याग मुलीनेच करायचा. हा जणू काही अलिखित नियम असतो. मुलीस खूप सारं शिकवून काय करायचंय, शेवटी परक्याचंच धन. ही मानसिकता मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम अजूनही प्रामाणिकपणे करीत असेल तर परिवर्तन किती घडेल हाही प्रश्न आहेच.

या समाजातील लेकीबाळींनी शिकावं यासाठी जीवाचं रान करणारे महात्मा फुले अन शिक्षणातून परिवर्तन घडवू पाहणाऱ्या त्यांच्या स्वप्नांना असिधाराव्रत मानून; आपल्या जीवनाचं हेच अंगीकृत कार्य आहे; म्हणून लोकांचे वाक्बाण, दगडधोंडे सावित्रीबाईंनी झेलले. त्याच सावित्रीच्या लेकी आजही व्यवस्थेचे नसतील; पण परिस्थितीचे दगडधोंडे झेलत आहेतच. आजही शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत परिसरात, समाजात मुलगी आईबापाच्या जीवाला घोर वाटतो. तिच्या आईला तिच्या शिक्षणापेक्षा तिला उजवून टाकण्याचीच अधिक चिंता वाटते. घराची आर्थिक परिस्थिती यथातथा असेल, आर्थिक गणितं जुळत नसतील तर पालकांच्या बजेटमध्ये कात्री लागते ती मुलीच्या शिक्षणावरच. आईबाबांचे हातावर पोट असेल, शेतात राबणारे असतील तर त्यांनी शेतात जावं; मुलीने घर अन् लहान भावंडांना सांभाळावं म्हणून तिची हक्काची नेमणूक. अशा स्थितीत मुलीने शिकावं कसं, हा यक्षप्रश्न बनून उभा राहतो. मुलींचे शाळेतून, शिक्षणातून गळतीची आर्थिक कारणं आहेत, तशी सामाजिक, सांस्कृतिकही कारणं आहेत. यात परिवर्तन घडत नाही तोपर्यंत तिच्या जीवनग्रंथात शाळा आणि शिक्षण नावाचा अध्याय अर्धवटच असेल.

मुली जात्याच समजूतदार असतात. त्यांच्यात शिकण्याची आणि संघर्ष करीत व्यवस्थेत टिकून राहण्याची वृत्ती उपजतच असावी, असे वाटते. मुली शिक्षणाविषयी अधिक जागरूक अन् दक्ष असल्याचे वर्गात विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींना शिकवताना शिक्षक या नात्याने मला तरी अनेकदा प्रत्ययास आले आहे. त्यांचा शैक्षणिक गुणवत्ता आलेखही खूप चांगला असतो; पण गुणांचं एव्हढं संचित असतांनाही बऱ्याच मुली शिक्षणापासून का वंचित? या प्रश्नाचं उत्तर केवळ शाळेतील शिक्षणातून शोधून कसे चालेल.

‘मी शिक्षण अर्धवट सोडणार नाही’, असा संकल्प या मुली करतील, प्रतिज्ञा घेतील. पण ही प्रतिज्ञा, हा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ त्यांची अन् त्यांचीच आहे का? तिचा वडील, तिचा भाऊ या नात्याने ती जबाबदारी माझी आहे, असं आम्हाला का नाही वाटत? असा संकल्प या मुलींनी करण्याआधी खरं तर पुरुषांच्या जगालाच आधी तो करायला हवा. जोपर्यंत तिच्या सोबत आई, वडील, भाऊ उभे राहत नाहीत, तोपर्यंत तिचा संघर्ष असाच सुरु राहील. समस्यांशी दोन हात करताना त्यात कदाचित ती यशस्वी होईलही; पण तिच्या संघर्षाला समाजाचं, घरच्यांचं  नैतिकबळ मिळालं तर उद्याचं सामर्थ्य तिच्याच पावलांनी आपल्या अंगणी चालत येईल. म्हणून, आपणही तिचे वडील, तिचा भाऊ या नात्याने एक प्रतिज्ञा, एक संकल्प करू या, ‘मी माझ्या लेकीला, माझ्या बहिणीला शिक्षण कधीही अर्धवट सोडू देणार नाही’.

0 comments:

Post a Comment