Mazi Aksharyatra | माझी अक्षरयात्रा

By
साधारणतः पाचसहा वर्षापूर्वी माझ्या शाळेत दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम - सर्व विद्यार्थी आपल्या भावविश्वात रममाण. मंचावरील कार्यक्रम संपला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांभोवती गर्दी केली. प्रत्येकाच्या मनातील भाव चेहऱ्यावर आनंद बनून जमा झालेले. त्यात एक भारावलेपण. गर्दीच्या कोंडाळ्यात मीही उभा. गर्दीला थोडे बाजूला करीत काही विद्यार्थिनी आम्हा शिक्षकांकडे आल्या. त्यातील चेतना, श्रुती यांनी रंगीत कागदात बांधलेलं पुस्तकासारखं काहीतरी गिफ्ट सोबत आणलेलं. आग्रहाने ते पुडकं माझ्या हाती कोंबत चेतना म्हणाली, “सर, हे फक्त तुमच्यासाठी.” मी कोणतंही गिफ्ट स्वीकारत नाही, हे त्यांनाही माहीत आहे. नाही म्हणालो. पण त्या जिद्दीलाच पडल्या. म्हणाल्या, “सर, हे गिफ्ट तुम्हाला घ्यावंच लागेल. आणि सर, यात काय आहे, हे नंतर बघा.” माझा नाईलाज झाला. यांना कसे समजावून सांगावे काही कळेना. शेवटी ते घेतले. नाहीतरी मुलांना मीच सांगत असतो, तुम्हाला कुणाला भेटवस्तू द्यायाचीच असेल, तर निदान पुस्तक द्या. म्हणजे तुम्ही दिलेली भेट निदान सत्कारणी तरी लागेल. (पुस्तक सर्वात चांगली भेट असं माझं स्वतःच स्वतः पुरतं तत्वज्ञान.) अर्थात, अशी पुस्तकं भेट म्हणून मिळालीच, तर शाळेच्या ग्रंथालयात देता येतात. अर्थात स्वार्थात परमार्थ साधण्यासाठी मी आचरणात आणलेला कर्मयोग. या भेटवस्तूच्या आकारावरून वाटले, असेल एखादे पुस्तक. आले आहेच तर देता येईल ग्रंथालयात. त्यांना वाईट वाटू नये म्हणून घेतली ती भेटवस्तू अन् दिली ठेऊन शाळेतील माझ्या कपाटात.

दुसऱ्या दिवशी थोडा निवांत वेळ हाती होता. या मुलींनी एवढ्या आग्रहाने काय भेटवस्तू दिली आहे, हे तरी पाहू या, म्हणून त्यावरचा रंगीत कागद वेगळा केला. पाहिले, त्यात एक छानशी वही. तिच्या पहिल्याच पानावर लिहिले होते “सर, तुम्ही खूप चांगलं शिकवतात. शिकवताना खूप काही छान असं बोलतात; पण या बोलण्याला अक्षरांचं कोंदण द्या. निदान आमच्या स्नेहाखातर आता तरी काही लिहा.” कदाचित त्यांच्या लक्षात असावे, मी कधीतरी बोललेलो असेल. शिकवताना बोलतो खूप, पण लिहिण्याचा जाम कंटाळा. (शाळा शिकत होतो तेव्हाही असाच होता.) लिहिणे नकोच, कारण एवढी उठाठेव करायला आहे कुठे मनापासून तयारी. मी काही लिहता हात मिळालेला कोणी सिद्धहस्त लेखक, साहित्यिक वा प्रतिभावान नाही. त्या वहीने कपाटात सुरक्षित निवारा शोधला. कदाचित वहीच्या नशिबी आहे तशीच राहणं असणार.

पाचसहा वर्षानंतर हा प्रसंग आठवतोय कारण, माझ्या या विद्यार्थिनींनी कितीतरी वेळा ‘सर, तुम्ही काहीही लिहा; पण एकदा लिहिण्यासाठी लेखणी हाती घ्याच’, असे अनेकदा म्हटलेले आठवतेय. त्यानंतरही बऱ्याच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असेच सांगून पाहिले, पण हे कधी मी मनावर घेतलेच नाही. आज मात्र आवर्जून हा प्रसंग आठवतोय, कारण त्या मुलींनी दिलेल्या वहीवर मी एक अक्षरही लिहिले नाही. ती होती तशीच कोरी करकरीत राहिली. नंतर काही दिवस वही कपाटात दिसली. पुढे कुठे गेली, माहीत नाही. त्या मुलींचं आत्मीय भावनेने बोलणंही एव्हाना सोयीस्करपणे विसरलो.

माझ्या विद्यार्थिनींनी आग्रहाने दिलेल्या वहीच्या पानांवर मी काहीच लिहिले नाही. तशी मानसिक तयारीही कधी दाखवली नाही. लिहिण्यासाठी कधी पेन हाती घेतला नाही. पण आज अक्षरयात्रा करायला निघालोय. ती वही नाही; पण की बोर्ड हाती आहे. अक्षरयात्रेस मी निघतोय. पण काय लिहावे, हा प्रश्न अनेक दिवसापासून समोर असल्याने अक्षरसाधनेपासून मी आतापर्यत लांब पळत राहिलो. यात्रेतील गर्दीला पाहून कशाला धक्के खायला जावं, म्हणून एखाद्यास दूर दूर राहणेच सुरक्षित वाटते. तसेच काहीसे माझ्याबाबतही. पण दूर राहून सुरक्षित वाटत असले, तरी यात्रेतील गर्दीतून मिळणाऱ्या निरतिशय आनंदापासून वंचित राहतो. अर्थात, याची जाणीव तशी फार उशिरा होते. मीही अक्षरांच्या लिहित्या दुनियेपासून दूर पळत राहिलो. काय लिहावे, हा संदेह मनात होताच अन् सोबत काहीतरी कमी असल्याची भावना.

पाण्यात पोहावे कसे? सायकल चालवायला शिकावे कसे? हे पुस्तक वाचून अथवा व्याख्यान ऐकून नाही शिकता येत. त्यासाठी पाण्यात सूर मारावाच लागतो. हातपाय खरचटल्याशिवाय सायकल कशी चालवता येईल? अक्षरांच्या प्रवाहात असाच सूर मारण्याचा प्रयत्न करतोय. जमला तर ठीक, नाही जमला तर नाही. थोडक्यात काय, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. पण निदान पाण्यात पडल्यावर हातपाय तरी चालवता येतील ना! काही असो, माझ्या या विद्यार्थिनींच्या आग्रहाची पूर्ती उशिरा का होई ना, एक मर्यादित अर्थाने ब्लॉगवरील या लिखाणाच्या माध्यमाने माझ्यापुरती तरी करतोय. माझे हे लेखन कदाचित त्या वाचतील तर म्हणतील, ‘देरसे आये, लेकीन दुरुस्त आये.’

एखाद्या सिद्धहस्त लेखकाच्या, साहित्यिकाच्या अथवा प्रज्ञावंताच्या प्रज्ञेने मी लिहावं, अशी शक्यता सुतराम नाही. निदान या जन्मी तरी! आणि मला तुम्ही लिहाच, असं आग्रहाने सांगणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांचीसुद्धा अशी अपेक्षा नाही. पण तरीही आपलं, आपल्या परिचयाचं कोणीतरी माणूस बोलतं, लिहितं याचं एक प्रकारचं अप्रूप असतं. तसंच माझ्याबाबतही असावं. माझ्या अध्यापनाचं, अध्यापनशैलीचं कौतुक करणारी माझी ती निरागस मुलं-मुली, त्यांचा निर्व्याज, नितळ, निखळ स्नेह या अक्षरयात्रेतील मला मिळालेला ‘अक्षरठेवा’ आहे. त्यांच्या प्रेमळ आग्रहालाच, या यात्रेच्या सफरचं श्रेय आहे. बघू या! अक्षरयात्रेतील प्रवासात मला काय करता येतं आणि काय मिळतंय. ते येणाऱ्या काळाच्याच अधीन असेल!  

0 comments:

Post a Comment