कविता समजून घेताना... भाग: १३

By

पासबुक

घरातल्या जुन्या पेटीत
कप्प्यात
एक पासबुक असायचं
बापाच्या नावाचं

निळ्या रंगाचं कव्हर
लक्ष्मीचं चित्र
नि सोनेरी अक्षरात
देना बँक लिहिलेलं

कुतूहलापोटी
कधी-कधी पेटी उघडायचो
नि पासबुक चाळायचो
एकटाच

एक नोंद दिसायची
आठेक वर्षांपूर्वीची
पाच हजार जमा होऊन
चार नऊशे काढल्याची

शंभर
शिल्लक दाखवणारी
ती नोंद
काळाच्या माऱ्यानं
पुसट होत चाललेली

बापला
विचारलं तर सांगायचा
कर्ज काढल्याचं
नि सातबाऱ्यावर बोजा चढल्याचं

पुढं ते पासबुक जीर्ण होत गेलं
कुठल्याही नोंदीविना
नि गुडूप झालं
काळाच्या उदरात

उरला फक्त बोजा
जीवाला घोर लावणारा
बापाच्या उरावर
आयुष्यभर

- दा. रा. खांदवे
*

शेती, शेतकरी या शब्दांभोवती अर्थांचे अनेक दृश्य-अदृश्य वलये आहेत. कुणाला हे जगण्याचे स्त्रोत वाटतात, कुणाला त्यात अस्तित्वाचे अनुबंध दिसतात. तर कुणाला आयुष्याचे आदिबंध त्यात अनुस्यूत असल्याचे वाटते. कोणाला काय वाटावे, हा भाग तसा गौण. सगळ्याच गोष्टी दिसतात तशा असतात का? असतात तशाच आयुष्यात असतात का? कदाचित नाहीच. एखाद्या गोष्टीची दर्शनी बाजू सहजपणे प्रत्ययास येते, म्हणून असेलही तसे. पण न दिसणाऱ्या बाजूच्या शक्यता अनेक परस्पर विरोधी अर्थांना आपल्यात सामावून असतात. हेही वास्तवच.

आपल्याकडे शेतीविषयी एकतर कुतूहलाने बोलले जाते किंवा चिंतेने. पण हा विषय चिंतनाच्या पातळीवर येतो, तेव्हा स्वीकार-नकाराच्या बिंदूवर येऊन थांबतो. लाखांचा पोशिंदा, बळीराजा, शेतकरीराजा हे कौतुकाचे शब्द शेतकऱ्यांविषयी बोलताना आवर्जून वापरले जातात. कदाचित तो तसा असेलही कधीकाळी. वेगाने बदलत जाणाऱ्या परिस्थितीत त्या शब्दांच्या अर्थांची प्रयोजने तशीच अबाधित आहेत का? विचारा कुणालाही शेती कसायला तुम्ही अगत्याने उत्सुक आहात का म्हणून? सगळी हयात शेतीमातीत व्यतीत करणाऱ्या कोणालाही विचारा, तुझ्या आयुष्याची कमाई काय? त्याचं उत्तर ऐकून कोणाला शेतकरी म्हणून जगण्यात सुख सामावलं आहे, असे वाटत असेल तर प्रश्नच संपले. शब्दांची सोबत करीत येणाऱ्या अर्थांचे आणि जमिनीवर असणाऱ्या अर्थांचे वास्तव दोन ध्रुवांइतक्या अंतरावर असते. खूप मोठा समूह या यातनातून मुक्तीचा मार्ग शोधत असल्याचे नजरेचा कोन थोडा वळवला तरी दिसेल. बहुतेक सगळ्यांनाच सुटका हवीय यातून. थांबले आहेत, त्यांच्या हाती विकल्प नाहीत म्हणून. परिस्थितीपासून पलायन करता येत नाही अन् जगणं टाकून देता येत नाही, म्हणून ही माणसे नियतीने आखून दिलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत आहेत. पर्याय असते, तर ही माणसे दैवाधीन जगण्याच्या वर्तुळात वसतीला राहिली असती का?

कोणताही व्यवसाय बेरजेची गणिते आखून आयुष्याच्या चौकटीत आणून रुजवला जातो. कदाचित शेती हा एकमेव व्यवसाय असा असेल, जेथे बेरजेची चिन्हे जगण्याच्या गणितातून आधीच वजा झालेली असतात. परिस्थितीशी अहोरात्र झटाझोंबी घेऊनही हाती लागणारं उत्तर शून्यचं असेल, तर या यांनी जगायचं कोणत्या आशेवर? कसं? प्रश्नाची गर्दी वाढत जाते. जगणंच प्रश्न होतं, तेव्हा उत्तरांचे अंक कुठून जुळवून आणावेत? आस्थेचा ओलावा घेऊन वाहणारे प्रवाह आटत जातात. मागे उरतात फक्त काठ कोरणाऱ्या खुणा अन् त्यांचे ठसे गोंदवून घेतलेले किनारे.

आशेचा बरीकसाही कवडसा कुठून डोकावत नसेल, तर आयुष्याची आसक्ती उरावीच किती? पर्याय नसलेला, परिस्थितीसमोर हरलेला कोणीतरी जीव विकल होऊन डोळ्यात गोठलेल्या वांझोट्या स्वप्नांना सोबत घेऊन डोळे कायमचे मिटून घेतो. एवढ्या टोकाचा निर्णय का घेत असावा तो? त्याच्या कृतीचे अनेक अर्थ शोधले जातात. घटनेचे अन्वयार्थ लावले जातात. माध्यमांच्या रकान्यातून कारणे तपासून पाहिली जातात. पुस्तकी अभ्यासातून विश्लेषण करून बातमीच्या चौकटीत सांगितले जातात. तर्कांवर आधारित शब्दांचा धुरळा उठतो. चर्चांचे फड रंगतात. धूळ बसते. चर्चेचे ध्वनी विरतात. परत आहे ते दिसायला लागतं. त्याचं जगणं, मरणं आहे तेथेच, तसेच उरते. जगणं महाग अन् मरणं स्वस्त झालं आहे, म्हणून तो या निर्णयाप्रत पोहचतो का? संकटांशी दोन हात करायची जन्मापासून ज्याला सवय आहे, तो संकटांसमोर असा एकाएकी कसा हात टेकू शकतो?

जगणंच जुगार झालं असेल तर त्याने काय करावे? कधी व्यवस्थेने मांडलेल्या खेळात आपले पत्ते टाकतो. कधी निसर्गासोबत पुढची चाल चालतो. कधी आपणच आपल्याला डावावर लावत असतो. आसमानी-सुलतानी संकटांशी झुंजत राहतो. एवढं करूनही फेकलेले पत्ते त्याला दगा देत असतील, तर त्याने नेमके काय करावे? आयुष्याला पणाला लावून किती जुगार खेळावा? शेतात एक दाणा पेरला की, हजार दाणे हाती येतात असं म्हणतात. हे खरेच. तो याच विश्वासाने पावसाच्या पहिल्या सरींसरशी काळ्या मातीत हिरवी स्वप्ने पेरत असतो, उगवून येण्यासाठी. पण करपण्याचा शापच नियतीने त्याच्या ललाटी अभिलेखित केला असेल, तर त्याने कोणत्या क्षितिजाला दान मागावे? खात्री नसल्याचे माहीत असूनही, केवळ आशेच्या धाग्यांना हाती घेत तो जगण्याची जमापुंजी मातीत टाकत असेल आणि उत्पादन खर्चही हाती लागत नसेल, तर कोणाकडे पाहावे? नियतीच्या न्यायचे, व्यवस्थेच्या नीतीचे गोडवे गात सुमने उधळावेत का? सगळीकडे अंधारून आल्यावर कोणत्या दिशांकडे मुक्ती मागावी? एकवटलेला सगळाच धीर सुटतो, तेव्हा जगण्यात उरतेच काय?

वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीची कारणे शोधतात. सांगतात. मांडतात. सामाजिक, संख्याशास्त्रीय अभ्यासातून कागदांवर आकडे अंकित होतात. अहवाल सादर होतात. समित्या गठीत होतात. सगळं करूनही त्याच्या आयुष्यात आनंदाचा एखादा कवडसा का अवतीर्ण होत नसेल? त्याच्या दुरवस्थेचे कारण अडाणीपणात सामावले असल्याचं कुणी सांगतो. कुणी व्यसनाधीनता कारण असल्याचा शोध लावतो. कुणी उधळपट्टी करण्याच्या वृत्तीत त्याच्या हतबुद्ध प्राक्तनाच्या रेषा लपल्याचे सांगतो. खरंतर ही सगळी बौद्धिक विलसिते आहेत, जमिनीवरचे वास्तव वातानुकूलित यंत्रणेच्या आल्हाददायक गारव्यात कसे बरे आकळावे?

बांधावर उभं राहून शेतकऱ्याच्या आयुष्याचा अर्थ आणि मातीचे अर्थशास्त्र शोधणारे शेतीमातीचं जगणं तोलामोलाचं असल्याचे सांगतात. अशी कोणती सूत्रे वापरून या जगण्याचं मोल यांना आकळत असेल? समजा असलं तसं मोलाचं, तर शेतीपासून विलग होण्याचा मार्ग शेतकरी का शोधतो आहे? कवडीमोल भावाने घेतलेल्या जमिनी लाखोच्या व्यवहाराने दुसऱ्या हाती सोपवणाऱ्यांना कदाचित त्याचं मोल मिळत असेलही. शेतकऱ्याला हे कळतच नसेल का? यांना असे कोणते शेतीशास्त्र अवगत असते, जे सतत बेरजेची गणिते करत असते? जमीन बळकावणारे मोठे होतात. पण ज्यांच्या हातून ती गेली त्यांच्या आयुष्यातून जगणं वजा होत जातं, त्याचं काय? याचा कधी संवेदना जाग्या ठेऊन विचार करणार आहोत का? विकासाच्या गोंडस नावाने जमिनी घेतल्या जात असतील, अल्प मोबदला देवून ती सोडण्यास भाग पाडले जात असेल, तर त्याने काय करावे? खरंतर ही अश्मयुगीन व्यवस्था जगण्यातून काढणे काय अवघड आहे? वार्ता कल्याणकारी राज्याच्या करायच्या आणि मूठभरांच्या कल्याणाची व्यवस्था करायची, याला व्यवस्थेचं सम्यक सूत्र म्हणावं का? धोरणे आखणाऱ्या सभांचे आखाडे बनतात. शेतकरी मात्र आक्रसत जातो प्रत्येक हंगामात. त्याच्या मरणाला थांबवणारं धोरण काही हाती लागत नाही. एकीकडे हरितक्रांती, धवलक्रांती, नीलक्रांतीच्या वार्ता करायच्या अन् क्रांतीची वर्तुळे आपल्यापुरती राखायची? याला विपर्यास नाही तर काय म्हणायचे?

नेमेचि येतो मग पावसाळा तसे हवामानाचे अंदाज दरवर्षी येतात. आकड्यांचा खेळ सुरु होतो. पावसाळा शेतकऱ्यासाठी आयुष्याचं मलूल रोपटं जगवणारा, आणि आकांक्षाना जागवणारा. आशेची बीजे हाती घेऊन रुजून येण्याच्या आशेने हा खेळत राहतो प्रत्येकवेळी नव्याने. ना निसर्ग साथ देतो. ना व्यवस्था हात देते. जमीन सुधारणाच्या वार्ता करायच्या. विकासाचे आराखडे आखून आकड्यांचा खेळ मांडायचा. पण सुरक्षा? तिचं काय? ती कधी देता येईल? एक थैली बियाणे हाती लागावं म्हणून पोलिसांचे दांडके खावे लागत असतील, तेथे व्यवस्थेच्या सम्यक असण्यावर प्रश्नचिन्हे अंकित होतीलच ना? तंत्रज्ञानाचा खेळ खेळत प्रगतीच्या वाटा कशा निर्माण होऊ शकतात, याची स्वप्ने दाखवायची. परिवर्तनाचे ऋतू वावभर अंतरावर उभे आहेत. त्यांनी कूस बदलली की, नियतीचे अभिलेख बदलतील म्हणायचे. पलीकडे खाजगीकरणाचा मेळ घालत राहायचा. किती आघात त्याने वरचेवर झेलत राहायचे?

ही कविता अशाच काही प्रश्नांची सोबत करीत आपणच आपल्याला खरवडत राहते. विचारत राहते, आयुष्याचं गणित नेमकं कुठे चुकलं? व्यवस्थेने माणसांची आर्थिक पत अंकित करणारी पासबुके छापली, पण जगण्याचे अर्थ कोणत्याच पासबुकात अंकित का झाले नसतील? कितीतरी घरे असतील त्यांच्या कोणत्यातरी सांदी कोपऱ्यात, फडताळात, कोनाड्यात ओळख हरवलेल्या अन् अस्मिता विसरलेल्या चेहऱ्यांचे फोटो चिटकवून पासबुके पडलेली असतील. नियमांची सोबत करीत नावं गोंदवून पासबुक हाती येते, पण त्यावरचे शिलकीचे आकडे कुठे हरवतात? काळाचे प्रवाह नोंदीची शाई पुसू शकतात, पण प्राक्तनाच्या अभिलेखांनी अंकित केलेल्या नोंदी कुठे पुसट होतात, अशा लागलीच. गरज म्हणून असेल किंवा जगण्याला सांभाळणारे स्त्रोत सगळीकडून सुकत चालले म्हणून बँकेच्या दारी उभं राहावं लागलं. त्याची नोंद बोज्यासह सातबाऱ्यावर झाली. दिलेल्या कर्जापोटी जमीन तारण घेऊन बँकेच्या सुरक्षेची काळजी घेतली. व्यवस्थेला फक्त डोळे असतात, मन नसते. तिच्या नोंदी माणूस केंद्रस्थानी घेऊन होत नसतात. बेरजांना मध्यभागी ठेऊन होत असतात. कर्ज घेतले ते कधी फिटलेच नाही. पासबुक काळाच्या पटलाआड दडले. उरला फक्त बोजा आयुष्यभरासाठी उरावर.

परिस्थितीच्या चक्रात फिरण्याचा शाप नियतीने या माणसांना दिला आहे की काय, माहीत नाही. प्रश्नांचा आलेख रोजच अस्थिर होतो आहे. जगण्याची प्रयोजने आणि प्रश्नही बदलत आहेत. पण बापाचं नातं गावातील मातीशी घट्ट जुळलं आहे. शेत, शिवार, गुरावासरांशी त्याच्या मर्मबंधाच्या गाठी बांधल्या आहेत. काळाचा रेटाच मोठा असल्याने तो तरी आणखी काय करू शकतो? व्यवस्थेच्या चौकटी अभ्येद्यच आहेत. बाप फाटक्या कपड्यानिशी देहाची दुखणी सोबत घेऊन शेतात राबतो. माय पायात काट्यांकुट्यांनी केलेल्या कुरूपांची वेदना घेऊन सोबत करते. देव आणि दैवाशी झगडणारी ही माणसे अस्वस्थ वणवण घेऊन व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत आहेत. निमूटपणे ओझं वाहतायेत. फुलांच्या एकेक पाकळ्या देठापासून निखळत जाव्यात, तसं हे तुटणं आहे. शेतीमातीत सारी हयात व्यतीत केलेल्या आयुष्याची कहाणी शोकांतिकेचे किनारे गाठते आहे.

चंद्रकांत चव्हाण
**

0 comments:

Post a Comment