युध्द
मुलं, माणसं, बायका
मरून जातात
हजारोंनी, लाखोंनी
एका दमात किंवा थोडी थोडी
तळमळत, तडफडत, जख्मी होऊन
ती सिरियातली असोत
की कोरियातली
महाभारतातली असोत
की कलियुगातली
देशोदेशीची माणसं
मरत राहातात
सत्तेच्या युध्दात हकनाक
युध्द वाईटच
मग ते घरातलं असो
की घराबाहेरचं
- सारिका उबाळे परळकर
•
जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. येथे विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. जगाला सोयीनुसार विभागून आपआपला फायदा लाटायची घाई प्रत्येकाला झाली आहे. स्वार्थाकरिता कोणी कितीही कुलंगड्या केल्या तरी काही बिघडत नाही, या विचारांवर विश्वास ठेवून वर्तणाऱ्याची जगात वानवा नाही. यातही विशेष असा की, प्रत्येक देश-प्रदेशाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा बदलत असते. तिच्यात प्रसंगानुरूप परिवर्तन घडत असते. सत्तेच्या सारीपटावर सोंगट्या सरकवल्या जातात. लहान-मोठे प्यादे हाती घेऊन वजिराला कोंडीत पकडून राजाला शह देण्यासाठी खेळ खेळले जातात. आपापले अहं सांभाळण्यासाठी अतर्क्य, असंभव, अवास्तव गोष्टी घडवून आणल्या जातात. फायद्याचे गणित जुळत असते, तोपर्यंत विस्तवाशीही खेळले जाते. गरज संपली की, त्याचं सोयिस्कर विसर्जन केलं जातं. स्वार्थाच्या गणिताच्या उत्तरासाठी आपण म्हणू तसे आणि तेच उत्तर देणारी सूत्रे वापरली जातात. नसतील तर तशी तयार करून घेतली जातात. निसटलेच काही हातचे तर पुन्हा नवा खेळ नव्या पटावर मांडला जातो, फायद्याची गणिते नजरेसमोर ठेऊन. पुढे जावून यात फार काही बदल घडेल असे माणसांच्या वर्तनावरून तरी दिसत नाही.
युद्ध वाईटच, कुठल्याही कारणाने ते होत असले तरी त्यातून विनाश वजा नाही करता येत. कोणत्याही काळीवेळीस्थळी झाले, तरी समर्थनाचे टॅग लावून त्याची जाहिरात नाही करता येत. ते काही सेलेबल नसते. त्याच्या दाहकतेच्या कथा सर्वश्रुत असल्या, तरी युद्धपिपासू वृत्ती शेकडो वर्षापासून माणसांच्या मनात अधिवास करून आहेच. घराच्या चौकटींपासून विश्वाच्या वर्तुळापर्यंत त्याच्या संचारला मार्ग आहेतच. हेच नेमक्या शब्दांत या कवितेतून अधोरेखित होतंय. प्रतिमा प्रतीकांचा पसारा न मांडता, आलंकारिक शब्दांचा पिसारा न लावता ही कविता सनातन वेदनेला सहजपणे हात घालते.
वेदनांची भाषा सगळीकडे एकच. जखमांच्या खपल्या सर्वत्र सारख्याच असतात. थोड्याश्या कोरल्या तरी नव्याने वाहणाऱ्या. वेदनांना समर्थनाच्या अथवा विरोधाच्या तुकड्यात नाहीच विभागता येत. वेदनांचा धर्म एकच असतो, ठसठस विसरू न देणं. शेकडो वर्षांपासून हे का सुरु आहे? एवढं क्रौर्य कशासाठी? यामागे नेमक्या कोणत्या प्रेरणा, प्रयोजने असतात? माणसे एवढी क्रूर कशी होऊ शकतात? सिरीया, कोरिया, ट्युनिशिया, लिबिया आदि देशांची नावेच उदाहरणासाठी असावीत, असं काही नाही. जगाच्या पाठीवर हे कुठेही घडू शकतं. अविचार रुजायला अनुकूल पर्यावरण असलं की, अविचारांचं तण दणकून वाढायला लागतं.
ऐकायला सांगायला युद्धाच्या कथा रमणीय वगैरे वाटत असतीलही. पण आयुष्याच्या परिघांना पार करून त्यांचं आपल्या अंगणी अधिवास करण्यासाठी येणं त्रासदायकच. जगात प्रश्न, समस्या काही नव्या नाहीत. त्यांचं असणं माणसांच्या जगण्याइतकंच आदिम. रूपे भिन्न असली तरी. जगात कुठल्या गोष्टी सार्वत्रिक असतील, नसतील माहीत नाही. पण कलह सर्वत्र नांदतो आहे. कधी तो जातीय तणावात, कधी पंथीय संघर्षात, कधी धार्मिक अभिनिवेशात प्रकटतो. अहंमन्य मानसिकता कलहाला निमंत्रित करते. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष आघात चाकोरीत चालणाऱ्या जगण्यावर होतात. व्यवस्थेच्या ठिकऱ्या उडून परिस्थिती माणसांना विस्थापित करते. अविवेकी विचार अनेक निरपराध्यांच्या जगण्याची सांगता करतो. कलहांपासून कोसो दूर राहू इच्छिणाऱ्यांना विस्थापित करतो. मायभूमी सोडून माणसे वणवण भटकत फिरतात.
माणसांचं मरणं निसर्गाचं अटळ सत्य आहे. इहतली जीवनयापन करणारा प्रत्येक जीव निरोप घेऊन चालता होणार हे वास्तव असलं, तरी आयुष्याला अवकाळी मरणाचा विळखा पडणे, हा काही पराक्रम नाही. माणूस विश्वातील वर्तुळात विचारांनी वर्तणारा जीव असल्याचे सगळेच सांगत असतात. हे खरं असलं तरी त्याच्याइतका अविचारी जीव अन्य कोणी इहतली असेल, असे वाटत नाही. अविचाराच्या वाटेने पळण्यासाठी प्रत्येकवेळी सयुक्तिक कारणे असायला लागतातच असे नाही. त्यासाठी टीचभर निमित्त पर्याप्त असते. ते वास्तव असेल अथवा काल्पनिक, त्यांनी फार मोठा फरक पडतोच असे नाही. कलहप्रिय विचारांवर तत्त्वनिष्ठतेचे टॅग लावणाऱ्यांना निमित्ते निमंत्रित करावे नाही लागत.
कोणतातरी विशिष्ट देव, धर्म, वंश हाच जगण्याचा सम्यक मार्ग आहे; अन्य मार्गांनी वर्तणे अन् आचरणात आणणे अयोग्यच, असा संकुचित विचार वाढत जाणे अनेक प्रश्नाचं जन्मस्थान असते. विद्वेषाचे वणवे निर्माण करणारे हात पुढे येत आहेत. विचारांनी वर्तनाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी निसंकोचपणे शस्त्रे हाती धारण केले जातात. माणसं किड्यामुंग्यांसारखी संपवली जातात. विसंगत उन्माद वाढत जातो. असे पाशवी हात पेशावरच्या शाळेतच उगारले जातात असे नाही. तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य धारण करून जीवनपद्धतीतील विसंगतीवर भाष्य करू पाहणाऱ्या, जगण्यातील व्यंग चित्रित करणाऱ्या जीवनचरित्रांनाही रक्तरंजित करीत असतात. शिक्षणाच्या वाटेने शतका-शतकांचा वैचारिक अंधार दूर करू पाहणाऱ्या मानिनीचा देह संपवण्यासाठी हाती शस्त्र घेऊन उभे राहतात. कोणत्यातरी रस्त्यावर बॉम्ब बनून निरपराध्यांच्या जीवनाचा संहार घडवीत असतात. छळ छावणीत मरणाचा उत्सव मांडणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर तो नांदत असतो. हिरोशिमा, नागासाकीच्या विनाशाच्या स्मृतीत सापडू शकतो. अविवेकी विचारांना देशकालपरिस्थितीच्या कोणत्याही सीमा अवरुद्ध नाही करू शकत. अविचारांने वर्तणारे कोणत्याही देशप्रदेशांच्या सीमांवर सहज दिसतील. त्याकरिता एखाद्या विशिष्ट परगण्यात जाऊन शोधण्याची आवश्यकता नसते.
रामायण, महाभारतास महाकाव्य म्हणून माणसांच्या मनात मान्यता आणि मान असला, तरी या काव्यांचा केंद्रबिंदू संघर्ष आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. राम-रावण संघर्षात मर्यादांचे घडलेलं उल्लंघन कलहाचे कारण ठरले. तर महाभारतात मानिनीचा अधिक्षेप युद्धाचे निमित्त ठरला. दोन्ही ठिकाणी ‘स्त्री’ संघर्षाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते. पण या संघार्षांमागे तेवढेच एकच एक कारण आहे असे वाटत नाही. त्या कलहकेंद्राभोवती असणारे अनेकांचे सुखावणारे-दुखावणारे अहं संघर्षापर्यंत ओढत नेणारे ठरले आहेत. सत्ता, संपत्तीवरून घराघरांत भावंडांमध्ये असणारे वाद, सप्तपदी करून संसाराच्या साच्यात सामावण्याची स्वप्ने पाहत आलेली नवथर पावले अपेक्षाभंगाचे दुःख घेऊन चौकटींमध्ये कोंडले जातात, तेव्हा त्याला वैयक्तिक विषय म्हणून दुर्लक्षित करता येतं का?
मर्यादांचे बांध फोडले जातात, नियमांच्या आणि नैतिकतेच्या चौकटी क्षतविक्षत केल्या जातात, तेव्हा संघर्ष अटळ ठरत असतात. सत्ता निर्धारित वर्तुळात राहून नियंत्रणाचे निकष नाकारते. अधिकारांचा अनिर्बंध वापर करायला लागते. सर्वसामान्यांचे जगणे दुष्कर होते, तेव्हा परित्राणासाठी कोणासतरी हाती शस्त्रे धारण करायला लागतात. व्यवस्थापरिवर्तनासाठी घडणाऱ्या कलहात अनेक अनामिक जिवांच्या आहुती पडतात. हेतू विधायक असला, तरी रक्ताचं वाहणं अटळ भागधेय बनतं. अशावेळी मरणाचं उदात्तीकरण करून जय-पराजयाची कारणे विशद करता येतीलही, पण श्वास देहाला सोडून गेल्यावर मागे उरणाऱ्या कलेवरांच्या असण्याला समर्थनाचे लेबले लावून विचारांचे उदात्तीकरण कसे करता येईल?
माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. संघर्षात सामान्य माणसांचे जगणे उसवत आहे. प्रगतीचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. विकृतीने जग फाटतेय, याची जाणीव असून नसल्यासारखे वागणे घडत आहे. सत्तेसाठी, स्वार्थासाठी विधिनिषेधशून्य खेळ खेळत राहायचे आणि अशा जगण्याला माणसांनी नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे. हे जगण्याचं प्राक्तन होऊ पाहत आहे.
माणसे युगांच्या वार्ता करतात. परिस्थिती परिवर्तनाच्या प्रयोगांच्या सुरस कहाण्या कथन करतात, मात्र वास्तव सोयिस्कर दुर्लक्षित करतात. युगांना आकांक्षांचे आभाळ देणाऱ्या अवतारांच्या गोष्टी सांगतात. विश्वाचे वर्तनव्यापार सत्यान्वेशी विचारांनी घडावेत, म्हणून झिजलेल्या महात्म्यांच्या नावाचा जप करतात. पण सगळं काही दिमतीला असूनही युगचक्र काही त्याला फिरवता आले नाही. मूल्यप्रेरित आणि संस्कृतीप्रणीत सद्गगुणांचा येळकोट घालून सुखं माणसांच्या आयुष्यात येत नसतात. त्यासाठी त्यांच्या सोबतीने चार पावले का असेना, चालावे लागते. कलेवरांच्या राशीत विजयाचे ध्वज रोवून इतिहासाचे अध्याय नाही लिहिता येत. तो संवेदनशील विचारांनी लिहावा लागतो.
जग कसे आहे, कसे असावे याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत, मुत्सद्यांच्या मुद्देसूद विचारांमध्ये जगाचे चित्र काही असो, विचारवंतांच्या विवक्षित विचारांमध्ये जगाची प्रतिमा कशीही आकाराला येवो, सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. जगण्याच्या अगणित प्रश्नांच्या भोवऱ्यात ते भिरभिरत असतात. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे, असंख्य प्रश्न घेऊन गरगर फिरणारे. त्यांच्या गरजा समृद्धीची बेटे निर्माण करण्याच्या कधीच नसतात. भाकरीच्या वर्तुळाशी त्याचं जगणं करकचून बांधलेलं असतं. त्याच्याकडून भाकरीच हिरावून घेतली जाते, तेव्हा गुंता वाढत जातो.
साधेसेच प्रश्न अवघड होतात. हाती असलेले उत्तरांचे विकल्प विफल ठरतात, माणसे परिस्थितीने विकल होतात, तेव्हा मनाच्या मातीत गाडून टाकलेला वणवा वेगाने उसळून बाहेर येतो. त्याला कोणी क्रांती नावाने संबोधतात, कोणी परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग म्हणतात. अशा संघर्षांचे मोल शेवटी सामान्यांनाच चुकवावे लागते. अनियंत्रित सत्ताधीशांच्या, अविवेकी आक्रमकांच्या अनन्वित अत्याचारांनी सर्वस्व हरवून बसलेली माणसे दुभंगलेले जगणं सोबत घेऊन रोजचं मरण अनुभवत आयुष्याच्या वाटेने चालत असतात. हरवलेली स्वप्ने शोधत राहतात. आपल्याच ललाटी हे भोग का असावेत? या विचाराने अस्वस्थ होतात. हे अस्वस्थपणच अशांततेची नांदी असते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
आभार!
ReplyDelete