कविता समजून घेताना... भाग: आठ

By

अनुभवी केस

ती बसते माझ्यासमोर येऊन
केसाचा घट्ट अंबाडा बांधलेली बाई
अख्ख्या आयुष्याचा अनुभव
तिने तेल लावून व्यवस्थित बसवलेला
हाताच्या मुठीने तिने बाजूला केला पदर
सांडू दिली हवा पोटावर
बायका लोकलच्या याच डब्यात बसतात
अशा निर्धास्त, बेफिकीर, असावध
तिने हातावर ठेवले दोन रुपये
तृतीय पंथीने दिला तिला आशीर्वाद
आंधळ्यांकडेही नाही करत ती कानाडोळा
मी मात्र निरखत असते तिचा अंबाडा
लोकलमधल्या हवेने जराही न हललेला
ती उतरली पुढच्या स्टेशनवर
तेव्हा दिसली तिची व्रण पडलेली पाठ
मी मोकळे केले माझे जरा बांधलेले केस
आणि हाती आला एक गळून
पडलेला अनुभवी केस
- रुपाली पवार
*

स्त्री संस्कृतीचे रमणीय रूप असते, असे म्हणतात. तिच्या सामर्थ्याचा सगळ्याच संस्कृतींनी मुक्तकंठाने गौरव केल्याचे विदित आहेच. वंश सातत्यात तिची भूमिका अनन्यसाधारण असल्याने मातेचा सन्मान संस्कृतीत होत आला आहे; पण स्त्री म्हणून तिच्या वाटेला अवहेलनाच येत राहिली, हेही कसे नाकारता येईल? माता म्हणून तिचा प्रवास कितीही सुंदर असला, तरी तिच्यातील मातृत्व वजा केल्यावर मागे उरणारं स्त्रीत्व नेहमीच दुय्यम राहिलं आहे. तिला आपल्या अंकित करण्याची व्यवस्था पुरुषसत्तेने करून ठेवली आहे. ती अबाधित राहावी, म्हणून तिच्या सामर्थ्याला देवत्त्वाच्या पातळीवर नेऊन तिचा देव्हारा कायम केला. त्याला सजवले. पूजनीय केले. आणि पाशबद्धही. आयुष्याच्या कोणत्याही स्थितीत असली, तरी पुरुषाशिवाय तुला पूर्णत्व नाही अन् त्यावाचून प्रगतीही नाही, हा विचार तिच्या मनात रुजवला. सजवून, मढवून तिचं कौतुक करायचं आणि दुसरीकडे पायातली वाहण पायातच बरी, म्हणून ठोकरत राहायचं. पुरुषपणाला अनुकूल असणाऱ्या जगाचा हा चेहरा काही नवा नाही. स्त्रीला नेहमीच पुरुषांच्या नजरेतून पाहिले जाते. तिने काहीही केलं, तरी तिच्या आयुष्याची प्रयोजने पुरुषाशी निगडित कशी असतील, याची काळजी समाजाचे नीतिनियम तयार करणाऱ्यां धुरिणांनी केली आहे.

नियतीने ललाटी गोंदवलेले दुय्यमत्वाचे अभिलेख वाचत ती जगण्याच्या वर्तुळांना सजवण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही तिच्या प्राक्तनातील भोग काही कमी होत नाहीत. ‘तिच्या’ वेदनांना ही कविता मुखरित करते. स्त्री असण्याचा अन्वय शोधू पाहते. आसपास असंख्य गोष्टी वाहत असतात, कोलाहलाचे किनारे धरून. त्यातून प्रवास घडत असतो. चालत्या पावलांना बऱ्यावाईट गोष्टी नजरेस येतच असतात, पण त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याइतकी स्थितप्रज्ञवृत्ती आपण आत्मसात करून घेतलेली आहे. असे असले तरी सगळ्याच गोष्टी काही विचारांच्या वर्तुळातून विसर्जित नाही होऊ शकत. अशीच कोणीतरी ‘ती’ आपलं ‘बाई’ असणं सांभाळत प्रवास करते आहे. प्रवास माणसांचं प्राक्तन. कोणी पोटाची खळगी बुजवण्यासाठी फिरतो. कोणी जगण्याच्या दिशा शोधण्यासाठी निघतो. कोणी आयुष्य सफल करणारी सूत्रे हाती लागतील म्हणून भटकत असतो. कदाचित तिच्या प्रवासालाही टाळता न येणारं प्रयोजन असेल. केसांचा अंबाडा बांधलेली ही बाई कुठल्याशा गाडीने प्रवासला निघाली आहे. प्रवास तिच्या जगण्याची अनिवार्यता असेल. शक्य आहे हा प्रवास तिच्या जगण्याला वेढून असेल, कोळ्याच्या जाळ्यासारखा. मनपासून अथवा मनाविरुद्ध. तिचं नेटकं असणं तिच्या आखीव-रेखीव आयुष्याच्या वार्ता करतं. पण जगण्याचे पेच समजतो तेवढे सुगम कधी नसतात. आयुष्याचे पोत इतकेही काही तलम नसतात, जेवढं नजरेला दिसतं. प्रवासातल्या रेषांवर धावतांना मुक्कामाची अंतरे कमी होतात, पण प्रश्नांच्या प्रदेशांपासून सुटण्याचे पुरेसे पर्याय असतातच कुठे हाती?

ती साडीचा पदर बाजूला करते. वाऱ्याच्या झोत तिच्या पोटावरून वाहत राहतो. कदाचित त्याच्या स्पर्शातून मनाच्या मातीआड दडलेल्या ममतेचे अर्थ तिला नव्याने उलगडत असतील? की त्याचे पंख लेऊन विहरण्यासाठी गगन गवसत असेल? खरंतर कोण्याही ‘ती’च्या उदरात सर्जनचे अंकुर फुलत असतात. उद्याचं भविष्य श्वास घेत असतं त्यात. कदाचित वाऱ्याला ती हेच सांगत असेल का... की भविष्याला जन्म देण्याचं प्राक्तन निसर्गाने माझ्याच कुशीत पेरलं आहे. अर्थात, सर्जनाचा साक्षात्कार विसरलेल्या नजरांना याची जाणीव असेलच असे नाही? वखवखलेल्या डोळ्यांना कमनीय बांध्यातील रेषा तेवढ्या दिसत असतात. देहाला सतत स्पर्श करणाऱ्या वासनांकित नजरांपासून सुरक्षित राखण्याची तिची धडपड; ती स्त्री असल्याचे क्षणभरही विस्मरण नाही होऊ देत. निदान प्रवासाच्यानिमित्ताने दोनचार मोकळे श्वास वाट्यास येतायेत, तेवढे मुक्तीचे पंख लेवून जगून घ्यावेत. विषाक्त नजरांचे किती शर तिच्या मनात रुतले असतील. किती नकार त्यात साठले असतील. अवहेलनेचे किती क्षण तेथे गोठले असतील. निसर्गानेच तिला वात्सल्य देवून सगळ्या नकार-स्वीकारांना आपलं समजण्याचे संचित दिलं आहे. सगळं विसरून माफ करायला शिकवलं आहे. बाया प्रवास करताना लोकलच्या डब्यात थोड्या निर्धास्त होऊन सामावून जातात. कदाचित तो डबा त्यांच्यासाठी आईचं गर्भाशय होत असेल का? जेथे निश्चिंत, निवांतपणे विसावता येत असेल, सगळ्या व्यापापासून दूर मुक्तीची आस घेऊन.

उद्ध्वस्त करणारे आघात अनेक अभागी मानिनींच्या आयुष्यावर होत आले आहेत. त्यांच्याशी दोन हात करूनही तिच्यातल्या संवेदना स्नेहाचे स्त्रोत बनून वाहत आहेत. तिने आस्थेचा ओलावा आपल्या अंतर्यामी जपून ठेवला आहे. देह वेदनांना झेलत असेलही, पण अंतरीचे ओलावे ती आटू देत नाही. रेल्वेच्या डब्यात पुढे येणाऱ्या कोण्या याचकाच्या हातावर दान टाकण्याइतकं मनाचं उमदेपण तिने अद्याप सांभाळून ठेवलं आहे. डोळे असूनही दृष्टी हरवलेल्या जगात व्यवहारांचे शुष्क किनारे कोरून आस्थेचे झरे शोधणाचा प्रयत्न करणारे खूप असतात, पण ओथंबलेपण कायम ठेऊन अंतरीचे प्रवाह मोकळे वाहू देणारे किती असतात? कारुण्याची नजर धूसर होऊ दिली नाहीये तिने. कवयित्री तिच्या जराही न विस्कटलेल्या अंबाड्याकडे पाहते आहे, मनात प्रश्नांची अनेक चिन्हे गोंदवून. कदाचित तिच्या मनातील चिन्हे त्या ललनेच्या आयुष्यातल्या गुंत्यांच्या गाथा शोधत असतील का? की चापून चोपून बसवलेल्या केसांवरून तिच्या आयुष्याची सूत्रे शोधत असतील?

तिचं प्रवासात उतरण्याचं ठिकाण आलं. गाडीतून उतरल्यावर तिची पाठ दिसली. पाठीवर गोंदल्या गेलेल्या व्रणांनी तिचं सगळं आयुष्य अन् त्यात रुतलेल्या वेदनांच्या कहाण्या एक शब्दही न सांगता कथन केल्या. आयुष्याच्या पात्रातून वेदनांचे प्रवाह घेऊन ते वाहत होते माणसांच्या अथांग, अफाट गलबल्यात हरवून जाण्यासाठी.

सगळ्या अपराधांना मनाच्या तळाशी अंधाऱ्या कप्प्यात बंद करून नव्याने आयुष्य शोधणारी कुणी ती बाहेर पडली आहे. कुण्यातरी ‘तिच्याच’ आयुष्यातच हे भोग का नांदत असतील? ‘तो’ कधीच का नसतो, भोगांचा धनी? केवळ ती स्त्री आहे म्हणून, हे सगळं घडतं? परंपरेच्या पात्रातून वाहत राहणाऱ्या अन्यायाला ती सतत सामोरी जाते आहे. अस्मिता शोधणारे आवाज आसपास बुलंद झाले असले, तरी अवहेलनेचे असंख्य आक्रोश आक्रंदनाच्या आवर्तात हरवलेले असतात. आघात करणारे हात परकेच असतात किंवा असायला लागतात, असे नाही. नात्यांची लेबले लाऊन जगण्यात ते सहज सामावू शकतात. तसे गोतावळ्याचे पदर धरून चालत येऊ शकतात. नियतीने दिलेला देह नारीचा आहे म्हणून त्यावर ओरखडे ओढले जात आहेत, अबला म्हणून तो घडतो आहे. तो शारीरिक आहे, तसा मानसिकही आहे. परंपरेने लादलेलं जगणं जगणारी ती व्यवस्थेच्या वर्तुळात अवहेलना सहन करीत राहते, जन्मण्याआधी आणि जन्मानंतरही.

कवयित्रीनेही बांधलेले आपले केस मोकळे केले. कदाचित वाहत्या वाऱ्याला प्रतिसाद देत ते विहरलेही असतील. पण त्यांच्या मुक्ततेआड दडलेले बंधनाचे पाश कसे विसरता येतील? तिच्या हाती एक गळून पडलेला अनुभवी केस लागला. त्यानेही कधीतरी व्रणांच्या वेदना ओठांवर येऊ न देण्यासाठी असंख्य कळा आतल्याआत थांबवून ठेवल्या असतील. मनावर झालेल्या जखमा झाकण्याचा प्रयत्न केला असेल. देश-प्रदेशाच्या सीमा बदलल्या, म्हणून स्त्रीजन्माच्या कहाण्या काही वेगळ्या नसतात. पात्रे बदलली, प्रवेश बदलले, प्रसंग बदलले तरी प्रश्न तेच असतात. वेदनांचे अध्याय घेऊन त्या लेखांकित होत आल्या आहेत. त्यांना कितीही झाकण्याच्या प्रयत्न केला, तरी त्यातले कारुण्य काही लपवता येत नाही, हेच वास्तव आहे. मनात वसतीला असलेलं आभाळ ओंजळीत भरून आणण्याचा तिने कितीही प्रयत्न केला, तरी परिस्थितीचे मळभ काही त्याला त्याच्या अथांग, अफाटपणासह पंखांवर घेऊ देत नाही. पायाला दोरा बांधलेल्या पक्षाला पंखांवर विश्वास असतो, गगनभरारी घेण्याचा. पण त्याचा परीघ कोणीतरी आपल्या एवढा करून ठेवला असेल, तर आखून दिलेल्या वर्तुळाभोवती असाहय धडपड करण्याशिवाय उरतेच काय?  

ही कविता शब्दांशी कोणतीही झटापट न करता एक वेदनादायी अनुभव मांडते. आशय सहजपणाचे साज लेऊन येतो. अभिव्यक्त अनुभव काळीज कातर करीत राहतात. मन कोरत राहतात, त्यातील शब्द. समोर दिसणाऱ्या दृश्याचे कुण्या चित्रकाराने मोजक्या रंगरेषांच्या संगतीने दिलेल्या चौकटीत चित्र साकारावे, तसे कवितेचं हे शब्दचित्र सहजपणाचा हात धरून, शब्दांशी सख्य साधत चालत येते. कॅनव्हासवरील चित्रात मनाजोगते रंग भरता आले की, ते आनंदाची पखरण करीत राहतात. पण या कवितेत साकारलेल्या अनुभवचित्रातला रंग एक उदास विसकटलेपण घेऊन येतो. मनाच्या आसमंतात पसरत राहतात त्याच्या प्रत्येक छटा, भरून आलेल्या आभाळासारख्या. कविता कोणत्याही विद्रोहांची वार्ता न करता. प्राक्तनाला सोबत घेऊन चालत राहते, उजेडाच्या दिशेने. प्रयत्नांनी परिवर्तन घडवता येतं, हा भाव जागा करीत राहते. एक आश्वस्तपण आशयाच्या अनुषंगाने कवितेतून सोबत करीत राहते. घटना लहानमोठी असू शकते, पण मनावर ओढलेल्या ओरखड्यांची जातकुळी वेगळी कशी असेल? असंच काही सांगायचं असेल का तिला?

स्त्रियांच्या सामर्थ्याचे पोवाडे वेळोवेळी गायिले जातात. काहींच्या कार्याची महती ऐकवली जाते. ते करू नये, असे नाही. पण निकषांच्या कोणत्याही चौकटीत सामावल्या नाहीत, आसपासच्या झगमगाटात कधीच कोणाला दिसल्या नाहीत. पण आस्थेची एक मिणमिणती पणती हाती घेऊन वाट्याला आलेला कोपरा उजळवून टाकण्यासाठी धडपड करीत राहिल्या, त्यांच्या आयुष्याच्या नोंदी कोणाच्या हाती लागतच नसतील का? परिस्थितीच्या वादळवाऱ्यात आपल्या ओंजळभर अस्तित्वाची मुळं घट्ट रुजवून आकाश डोक्यावर घेत असतील. पदर कमरेला खोचून रानावनात जगण्याची प्रयोजने शोधत असतील. काडीकचरा वेचत आयुष्याला सामोरे जात असतील. उद्या येणारा सूर्य आपल्या आयुष्यात मुक्तीचा प्रकाश आणेल, म्हणून आजच्या अंधाराशी दोन हात करीत असतील... त्यांचं काय? खरंतर हे प्रश्न उत्तरांच्या पर्यायात सामावणारे नाहीत, त्यात असंख्य गुंते आहेत. कारण, ती स्त्री आहे म्हणून...?
- चंद्रकांत चव्हाण

 **

2 comments:

  1. नमस्ते सर आपली अक्षर यात्रा खूप वाचनिय आहे.त्यातील शब्द खूप अलंकारिक आहेत.तुमचे संपूर्ण भाग असणारे एकत्रित पुस्तक आहे का? असेल तर सांगा मला ते हवं आहे.मला या नंबर वर कॉन्टॅक्ट करा ९४२३१३१११८ धन्यवाद

    ReplyDelete