चाकोऱ्या

By
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या वाटा अवघड करते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी,’ हे शब्द अशावेळी सुविचारांपुरते उरतात. 

आर्थिक समृद्धीची परिमाणे काही असोत. ती सर्वमान्य असोत अथवा नसोत, पण जगणं श्रीमंत होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले, तरी पर्याप्त असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे? 

कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘पाहीसनी लोकायचे येवहार खोटेनाटे, बोरीबाभळीच्या अंगावर आले काटे.’ हव्यासापायी जखमा देणाऱ्या काट्यांची कुंपणे आपण स्वतःभोवती का तयार करावीत?  केवळ जगाला दाखवता यावे म्हणून? कुंपणाला मालकी असली, तरी अपेक्षित विस्तार असतोच असं नाही. आणि तसंही काट्यांशी सख्य करायला कोणाला आवडेल?

नाहीतरी आपण कोणते तरी ऐच्छिक, अनैच्छिक मुखवटे धारण करून वावरत असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो आणि वेळ मिळताच ते मिरवतही असतो. 

मुखवट्यांना टाळून माणसांना जीवनयापन करणे काही अवघड नाही. सीमित अर्थाने मान्य करूया की, कधी कधी अनिच्छेने मुखवटेही परिधान करायला लागतात. समजा केला परिस्थितीवश धारण किंवा करावा लागलाच, तर त्यामागचा हेतू स्व-पलीकडे असायला काय संदेह असावा? प्रश्न फक्त एवढाच असतो की, आपण निवडलेला मुखवटा कसा आहे. मुखवटा म्हणजे माणूस नाही, हे माहीत असूनही अंतर्यामी असणारी कोणतीतरी अस्वस्थता माणसांना मुखवटे धारण करून जगायला बाध्य करते, तेव्हा गुंते अधिक जटिल होत जातात.

जग एक रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला आपापली भूमिका घेऊन जीवनयापन वगैरे करावे लागते, असे काहीसे आपण अनेकदा ऐकले असेल. पण या मंचावर वावरताना आपली भूमिका कोणती असेल, हे ठरवायचे कुणी आणि कसे? एकीकडे दिसणारी अगदी साध्यासरळ स्वभावाची माणसं, तर दुसऱ्या बाजूने अंगभूत पात्रता नसतानाही कोलांटउड्या मारून आपली मखरे तयार करून स्वतःची आरास मांडणारीही आसपास बरीच असतात. स्वतःचा वकुब ओळखून वागणारी माणसंही समाजात संखेने खूप आहेत. अशा माणसांच्या सत्प्रेरीत वर्तनातून निर्मित विचार साधेपणाची संगत करीत जगावे कसे, हे सांगणारा वस्तुपाठ असतो. अशा चेहऱ्यांकडे पाहण्याऐवजी आपलं लक्ष मुखवट्यांकडेच का वळत असेल?

-चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment