अपवाद

By
प्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणे आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपणा कोरला असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदते असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. 

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच; ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. 

प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, इंद्रधनुष्याचे रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं अप्रूप उरत नाही. कारण लाचारीचा रंग एकदाका आयुष्यावर लागला की, विचारांचं रंगात न्हाऊन निघणं थांबतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विचारांनी विस्मरणाचा रंग धारण केला की, मेंदू बधिर होतो अन् मन सैरभैर. मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं. लक्तरांना प्रावरणे समजून मिरवणारे एक विसरतात की, याचक बनून पुढ्यात पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही त्यावर मातीचे थर चढले असतील. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो. अविवेकाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असणे उसवते. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही.

याचा अर्थ असाही नाही की, परिस्थितीचं सम्यक आकलन असणारी आणि स्थिती-गतीचं रास्त भान असणारी माणसं नसतात. ती सर्वकाळी, सर्वस्थळी असतात, फक्त त्यांना पाहता यायला हवं. नसतील सहज दिसत, तर शोधता यायला हवं. शोधूनही नसतील सापडत, तर आपणच त्याचा विकल्प व्हावं. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती नगण्य असतील. ती संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. 

अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. हे भ्रमण अज्ञानाने असेल किंवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय पण सत्य आहे. विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, वादही विपुल असतात. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणे सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?
•• 

4 comments:

  1. केलेले प्रयत्न व निवडलेले पर्याय हे वकुब ओळखण्यासाठी पर्याप्त असतात.

    ReplyDelete
  2. लेख नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

    ReplyDelete