आपण सगळेच

By
समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. हे केले की तू चांगला आहेस; ते केलं की वाईट आहेस, असं सांगणं नियंत्रणाचा भाग झाला. समूहात वावरणाऱ्यांचे वागणे सर्वसंमत मार्गाने घडत राहावे, म्हणून विचारांत काही नीतीसंकेत कोरून घेणे व्यवस्थेचा भाग असतो. प्रासंगिक गरज म्हणून त्यांना अपेक्षित आकार देऊन सजवावे लागते. आखलेल्या चौकटीत विहार करायला कोणी राजी नसेल, तर त्यास पाप-पुण्य, धर्म-अधर्म वगैरे सारख्या गोष्टींची भीती दाखवून सत्प्रेरीत मार्गाने नेण्याचा प्रयत्न होत राहतो. कधीकाळी समाजात वावरणाऱ्या माणसांचे संबंध सीमित आकांक्षांच्या आवाक्यात असल्याने अशा गोष्टी सहज घडूनही जात. नीती जगण्याचे सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याचे मान्य करणारी माणसे दिलेल्या शब्दांना आणि घेतलेल्या वचनांना जागायची. भीतीपोटी का असेना, सामान्य माणूस आपलं जगणं समाजमान्य संकेतांच्या आखीव चौकटीत सजवण्याचा प्रयत्न करीत राहायचा. अर्थात, आता असे काही होत नाही, असे नाही. अशा गोष्टींना प्रमाण मानून आपले आचरण जाणीवपूर्वक शुद्ध राखण्यासाठी धडपडणाऱ्यांची काही कमी नाही. तसं सरळमार्गी जगण्यास प्रेरित करणाऱ्या विचारांना तुडवणाऱ्यांचीही कमतरता नाही. आचरणामागे असणारे आस्थेचे आणि आस्था नसेल, तर भीतीचे संदर्भ बरेच बदलले आहेत.

व्यवस्थेत वर्तताना काहीतरी विसंगत दिसलं की, आपण स्वतःला माणूस का म्हणवून घेतो? हा प्रश्न पडतो. माणूस म्हणून अंगीकारायचे शहाणपण अद्यापही आपल्यापासून कोसो दूर आहे असे वाटते. दूर दूरच्या परगण्यांचा शोध माणसाने घेतला. माणूस चंद्रावर पोहचला, मंगळावर वसतीची स्वप्ने पाहतो आहे. पण माणूस माणसाजवळ पोहचला आहे का? अर्थात, या प्रश्नांच्या उत्तराभोवती दुसरी अनेक प्रश्नचिन्हे असतील. परिणत विचारांनी वर्तनाऱ्यांनी कार्यकारणभाव जाणून घेत अज्ञाताच्या अंधारात हरवलेले वास्तव शोधून समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सार्वत्रिकीकरण झाले आहे का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही नकाराच्या परिघावरच प्रदक्षिणा करत आहे. यासाठी आपल्या विचारविश्वाला अजूनही खूप मोठी मजल मारायची आवश्यकता आहे. विज्ञानतंत्रज्ञानाने प्रगतीचे अनेक परगणे पादाक्रांत केलेत, पण माणसाच्या मनापर्यंत पोहचून विकल्पांचं तण काही त्याला अजूनही समूळ नाहीसं करता आलं नाही.

'मी' या प्रथमपुरुषी एकवचनी शब्दाच्या मोहात सारेच विचार संकुचित होतात, तेव्हा माणूस म्हणून आपला परीघ किती सीमित आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते. माणसाने उन्माद करावा, असे काय आहे त्याच्याजवळ. ना हत्तीची ताकद, ना गेंड्याचे बळ, ना गरुडाची गगनभरारी. हा एक गोष्ट आहे त्याच्याकडे, मेंदू! पण उत्क्रांतीच्या वाटेने चालताना तोही संकुचित होत चालला आहे की काय, असे वाटण्याइतपत विचारांत संदेह निर्माण होतोय. मन, मनगट आणि मेंदू जागे असणारी माणसे महात्म्ये म्हणून ओळखले जातात, पण सांप्रत महात्मा होण्याचा प्रवासच सवंग होत चालला आहे. संवेदनशील माणसांनी आहे ते मुकाट्याने पाहत राहावे. जे घडते त्यात समाधान मानावे. काळाचे तंत्र असेच होत आहे का? हे तंत्र अवगत करणारे व्यवस्थेत आपलं सुख शोधतात आणि ज्यांना आत्मसात करता आलं नाही, ते अपेक्षांच्या मृगजळामागे धावतात. सुखांच्या संकल्पित चित्रांच्या चौकटीत स्वप्नातले रंग उतरवण्यासाठी आस्थेचे कुंचले शोधत राहतात. एवढं करूनही शिल्लक काय? अर्थात, उत्तर... आपण सगळेच परिघावर प्रदक्षिणा करणारे प्रवासी.

0 comments:

Post a Comment