सुखाची परिमाणे

By
माणूस इहलोकीचे नवल वगैरे आहे की नाही, माहीत नाही. माणसांमुळे इहतलास अर्थपूर्णता मिळाली असल्याचं कोणी म्हणत असल्यास त्यालाही विरोध असण्याचं कारण नाही. मग असे असेल, तर वसुंधरेचं वैभव बनून असणाऱ्या बाकीच्या गोष्टींचे मोल काहीच नसते का? धरतीवर जीवनयापन करणारे जीव विशिष्ट प्रेरणा घेऊन आयुष्य व्यतीत करत असतात. त्यांच्या प्रेरणा बहुदा देहधर्माशी निगडित असतात. माणूसही निसर्गाचंच अपत्य असल्याने त्यांच्या गरजा निसर्गक्रमाशी निगडित असणं स्वाभाविकच, पण यापेक्षाही थोडं अधिक काही असतं त्याच्याकडे. काही प्रेरणा असतात, काही प्रमेये, काही प्रयोजने, काही संस्कार, काही अनुभवही. मुळात माणूस आयुष्याचे पट रंगवत जातो, तो स्वप्नांना साकारण्यासाठी. याचा अर्थ सगळ्यांनाच मनी वसणारी मुक्कामाची ठिकाणे गाठता येतात, असा नाही.

जगण्याला अर्थाचे अनेक आयाम असतात. काही भीतीचे असतात, काही प्रीतीचे. भीती अन् प्रीतीच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात राहतो तो आयुष्यभर. भीतीपोटी स्वार्थपरायण बनतो, तर प्रीती त्याच्या मनी स्नेह निर्माण करते. स्नेहाचे सदन हेच त्याच्या आकांक्षांचे गगन बनते. भीतीपोटी संदेह जन्मतो. संदेहातून संकुचित विचार वाढतो. संकुचितपणातून घडणारा प्रवास 'स्व'पासून सुरू होतो आणि 'स्व'पर्यंत येऊन थांबतो. भीती फक्त स्वहित तपासते. प्रीतीचं आकाश अफाटपण घेऊन येतं, आपल्या विस्तीर्ण पटावर आकांक्षांच्या अनेक आकारांना सामावून एकजीव करून घेण्यासाठी. स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडतात. माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांचा मूल्यांवर विश्वास असतो. अशी माणसे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात. द्वेषाची बीजं कधी त्यांच्या हातून पेरली जात नाहीत. त्यांचं स्वप्न असतं, स्नेहाचे मळे फुलवणे. मान्य आहे साऱ्यांनाच स्नेहाचे मळे नाही फुलवता येत; पण आपलेपणाच्या ओलाव्याने ओथंबलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपं नक्कीच रुजवता येतील, नाही का?

जगण्याला विशिष्ट आकार देऊन आपलं असणं-नसणं प्रयत्नपूर्वक साकारावं लागतं. सुयोग्य परिमाणे ठरवून आयुष्याच्या पटावर अस्तित्व कोरावं लागतं. आपल्या असण्याला सहजपण देणारी सूत्रे ठरवून घ्यावी लागतात. उत्तराचे विकल्प शोधावे लागतात. हाती येणारी उत्तरे नव्याने पडताळून पाहावी लागतात. आधीच घडवलेल्या साच्यांच्या मुशीत ओतून मिळालेला आकार, म्हणजे सर्जन नसते. जगण्याचे साफल्य वगैरे नसते. नावीन्य असले, तरी त्याला दीर्घ अस्तित्व असेलच असे नाही. कारणे काही असोत, पलायनाच्या वाटा आणि समर्थनाचे तोडके शब्द शोधून आयुष्याच्या यशापयशाची सूत्रे सापडत नसतात. जगण्याच्या गणितांची उकल होत नसते. आयुष्यातील सगळेच गुंते काही सहज सुटत नसतात. गुंतलेल्या धाग्यांच्या गाठी निरगाठी अपेक्षित दिशेने वळत्या कराव्या लागतात. वळणाला अनुकूल करीत सोडवाव्या लागतात. चुकीच्या दिशेने ओढला गेलेला एक धागाही गुंता अधिक अवघड करतो. गुंत्यांमध्ये गुरफटणे आणि त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविकच. काही गुंते लहान असतात, काही मोठे. काहींचे सुघड, काहींचे अवघड, एवढाच काय तो फरक. बाकी गुंते जवळपास सारखे आणि त्यांचे सातत्यही समानच, फक्त प्रसंग, पात्रे आणि स्थळे तेवढी वेगळी.

जगणं मूलभूत गरजांशी निगडित असतं, तेव्हा सुखाची निश्चित अशी काही परिमाणे असतात का, हा प्रश्नच नसतो. शेकडो सायासप्रयास करूनही सुखाचं चांदणं दूरदूर पळत राहणं, त्याचा कवडसाही अंगणी न दिसणं, हीच समस्या असते. खऱ्या म्हणा किंवा आभासी, काही म्हणा, वर्तनाचे सारे व्यवहार सुखांच्या शोधात माणसाला अस्वस्थ वणवण घडवतात, तेव्हा जगणं आनंदयोग वगैरे असल्याचं म्हणणं किती बेगडी असतं, याचं प्रत्यंतर प्रकर्षानं येतं. मर्यादांच्या चौकटी आखून दिशा सीमित केलेल्या वाटेने चालताना मूलभूत गरजा ज्यांच्या समोरील प्रश्नचिन्हे असतात, ते सुखांचे परगणे काय शोधतील? ज्यांच्या आकांक्षांचं क्षितिज चार पावलांवर दिसतं; पण जगणंच दोन पावलांवर संपतं, त्यांना बहरलेल्या मोसमाचे अप्रूप काय असणार? मोहरलेल्या परगण्यात पोहचण्यासाठी धाप लागेपर्यंत धावूनही हाती शून्यच लागत असेल, त्यांनी सुखांची परिभाषा कुठून अवगत करावी?
**

0 comments:

Post a Comment